13 Mar 2017

होलिकोत्सव विशेष - लेखांक दुसरा


रामीरामदासी होळी केली संसाराची धुळी
फाल्गुन पौर्णिमेला सायंकाळी होळी पेटवतात व कृष्ण प्रतिपदेला धूलिवंदन करतात. होळीच्या राखेने अभ्यंगस्नान करण्याची आपल्याकडे पद्धत आहेे. या बरोबरच रंग खेळण्याचीही परंपरा आहे. विशेषत: उत्तरभारतात आजच रंग खेळला जातो. पण महाराष्ट्रात मात्र रंगपंचमीलाच रंग खेळला जातो. म्हणूनच आपल्या मराठी संतांच्या वाङ्मयात येणारे होळीचे वर्णन हे होळी पेटवण्याचे आहे; तर उत्तरेतील संतांच्या वाङ्मयात येणारी होळी ही रंगांची उधळण आहे. तो भगवान श्रीकृष्णांचा व गोपगोपींचा फाग आहे, रंगोत्सव आहे.
भगवान श्रीकृष्ण व गोप-गोपींच्या फागुन लीला भारतीय संतकवींनी खूप विशेषत्वाने गायलेल्या आहेत. त्या लीलांचा लौकिक अर्थ जरी होळी-रंगोत्सव असा असला तरी त्यांचा गूढार्थ फारच अलौकिक आहे. त्यावर अनेक अधिकारी महात्म्यांनी सुरेख चिंतन मांडलेले आहे. योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या अधिकारी शिष्या, प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी श्रीसंत मीराबाईंच्या 'फागुन के दिन चार रे' या अभंगावर अप्रतिम विवरण केलेले आहे. त्यातून त्यांनी संपूर्ण होळीचा मनोहर योगार्थच विशद केलेला आहे. श्रीवामनराज प्रकाशनाचे हे पुस्तक वाचल्यावर फागुनलीलेचा विलक्षण मथितार्थ आपल्या ध्यानी येतो आणि अक्षरश: आपण भारावून जातो !
समर्थ श्री रामदास स्वामी देखील आपल्या होळीवरील भारुडातून होलिकोत्सवाचे स्वानुभूत मार्मिक स्वरूप सांगताना म्हणतात,
अवघेचि बोंबलती ।
होळी भोंवते भोविती ॥१॥
मायाहोळी प्रज्वळली ।
सृष्टि वेढारे लाविली ॥२॥
ज्याकारणे गुंडाळती ।
तेचि वाचे उच्चारती ॥३॥
होळीमध्ये खाजे आहे ।
ते तूं विचारुनि पाहे ॥४॥
खाजे खातां सुख होय ।
परी कठिण हातां नये ॥५॥
खोल दृष्टीने पाहिले ।
खाजे त्याच्या हातां आले ॥६॥
एक झडा घालूं जाती ।
लंडी चकचकून पळती ॥७॥
एक देहाचे पांगिले ।
ते आंगी हुर्पळले ॥८॥
उडी अवघ्यांचीच पडे ।
परि ते हातांसी न चढे ॥९॥
एके थोर धिंवसा केला ।
खाजे घेऊन पळाला ॥१०॥
एक आपणचि खाती ।
एक सकळांसि वांटती ॥११॥
एक घेऊन पळाले ।
परी कवंठी वरपडे जाले ॥१२॥
रामीरामदासी होळी ।
केली संसाराची धुळी ॥१३॥

(समर्थ गाथा -  ओवी १००५.)
समर्थ म्हणतात, भगवंतांच्या मायेने ही सृष्टी रचलेली आहे, तीच जणू त्यांची मायारूप होळी पेटलेली आहे. यच्चयावत् सर्व जड-जीव आपापल्या कर्मांनी बद्ध होऊन या पेटलेल्या मायारूप होळीभोवती बोंबलत फिरत आहेत. त्यांना या रामरगाड्यात ज्या कर्मांनी बांधलेले आहे, त्याच कर्मांविषयी ते सतत बोलत आहेत, त्यातच गुरफटून पडलेले आहेत. त्या बंधनकारक कर्मांशिवाय त्यांना दुसरा चिंतन-विषयच नाही.
ही माया देखील भगवंतांची अचिंत्यशक्तीच आहे. त्या माध्यमातून भगवंतच सृष्टीरूप झालेले असल्याने, त्या सृष्टीचे मूळकारण हे परब्रह्मच आहे. तेच होळीतील खाजे होय. होळीत पुरणपोळी व नारळ घालतात, तो नारळ नंतर प्रसाद म्हणून खातात. तेच त्यातले खाजे वरवर पाहता सापडत नाही. पण ज्या जीवावर श्रीसद्गुरूंची कृपा होते, त्याच्या दृष्टीला फाटा फुटतो व जेव्हा तो त्या दृष्टीने पाहू लागतो तेव्हाच त्याला भासमान मायेच्या आत गढलेले आनंदमय परब्रह्मतत्त्व दिसू लागते. अशी खोल दृष्टी लाभणे म्हणजेच सद्गुरुकृपा होणे, असे श्री समर्थ आवर्जून सांगतात.
पण जे स्वत:च्याच बळावर त्या मायेचा थांग लावू पाहतात, तिचा झाडा घेऊ जातात, ते तिच्या झगमगाटात, विविधरंगी शोभेत वाहावत जाऊन कुठल्या कुठे फापलतात. ती माया त्या लंडी जीवांना भुलवतेच. आपण निघालो कशासाठी व जायचे कुठे? हेच ते पार विसरून जातात. जे जीव आपल्या देहाच्या बंधनात अडकलेले असतात, म्हणजे ज्यांची देहबुद्धी खूप तीव्र असते, ते त्या मायारूप होळीत होरपळून जातात, त्यांचे अस्तित्वच पूर्णपणे संपते. देहजळात मासोळी बनून बुडी दिलेल्या जीवालाच सुख-दु:खरूपी अनुभवात अडकून पडावे लागते, असे माउली देखील सांगतात.
आनंदाचे ते खाजे मिळवण्यासाठी या मायारूप होळीवर सर्वच जण जाणतेपणी वा अजाणतेपणी  आपापल्या परीने उडी घेतात, पण ते खाजे तसे सहजासहजी कोणाच्याही हाती लागतच नाही. त्यातूनही ज्या जीवांवर सद्गुरुकृपा होते व जे सद्गुरुचरणीं शरण जाऊन धैर्याने साधना करतात, त्यांनाच ते परब्रह्मरूप खाजे प्राप्त होते. मात्र असे भाग्यवान जीव ते खाजे घेऊन त्या मायेपासून दूर पळून जातात.
अशा मायेचे रहस्य जाणणा-या महात्म्यांचेही दोन प्रकार असतात, असे समर्थ येथे सांगतात. एक प्रकार म्हणजे मायाहोळीतून मिळालेले खाजे फक्त स्वत: एकटेच खाऊन तृप्त होणारे महात्मे व दुसरा प्रकार म्हणजे तेच खाजे अधिकार जाणून इतरांनाही वाटून खाणारे महात्मे. पहिल्या प्रकारातील महात्मे म्हणजे आत्माराम अवस्थेला पोचून जगाशी काहीही घेणे देणे नसणारे अवलिया संत होत. ते लोकांच्या भानगडीत पडत नाहीत, आपल्याच आनंदात रममाण होऊन राहतात. तर दुस-या प्रकारातील महात्मे हे श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात तसे, "जाणते व दाविते" असे असतात. ते स्वत: तर ब्रह्मस्वरूप होतातच, पण जनांच्या कळवळ्याने तोच ब्रह्मरूप कृपाप्रसाद सुयोग्य व्यक्ती पाहून प्रदान करतात व त्यांचाही उद्धार करतात.
याव्यतिरिक्त अजून तिसरा प्रकारही श्री समर्थ मार्मिकपणे सांगतात की, असे काही जीव असतात, जे ते खाजे समजून फक्त नारळाची करवंटीच घेऊन पळून जातात, पण शेवटी त्यांची फसगत होते. त्यांच्यावर सद्गुरुकृपा नसल्याने सुरुवातीला परमार्थच होतोय असे दिसते पण शेवटी ते त्या मायेच्या कचाट्यात पूर्ण अडकतात व आत्मलाभ न होता त्याचा केवळ आभासच त्यांना प्राप्त होतो. असे जीव भगवंतांच्याच संकल्पाने महात्मे म्हणून जगात मिरवतात खरे, पण त्यांच्यापाशी परमार्थाची कसलीही खरी अनुभूतीच नसते. यांनाच शास्त्रांनी 'असद्गुरु' असे नामाभिधान दिलेले आहे. म्हणूनच श्री समर्थ त्यांना नारळ सोडून करवंटीच लाभली, असे खेदाने म्हणतात.
समर्थ रामदास स्वामींना मात्र सद्गुरुकृपेने मायारूप होळीचे रहस्य पुरेपूर समजले व त्यांनी श्रीसद्गुरूंनी सांगितलेल्या युक्तीनुसार, रामदास्य करून मायेची होळी पेटवली व तिचेच भस्म सर्वांगाला लावून धुळवडही साजरी केली. त्यांनी श्रीसद्गुरुप्रदत्त साधन करून मायारूप भ्रामक संसाराचीच धुळवड केली. त्यांचा कर्मबंधरूप संसार धुळीला मिळाला व अखंड आनंदरूप परमार्थ त्यांचे सर्वस्व व्यापून भरून उरला !
समर्थ श्री रामदास स्वामींचा होळीचा हा गूढ अभिप्राय समजून घेणे खरेतर अत्यंत अवघड आहे, पण सद्गुरुकृपेने त्याचा थोडा विचार होऊ शकला. समर्थांच्या या प्रसन्न  रूपकाचे सार म्हणजे, "श्रीसद्गुरूंनी दिलेली साधना निष्ठेने व प्रेमाने तसेच त्यांनी सांगितलेल्या युक्तीने मनापासून करणे, हेच आहे. असे जो करतो, त्याचीच होळी खरी साजरी होते व तोच अखंड, अद्वय आनंदाचा धनी होतो. त्याच्या भावभक्तीने वश झालेले भगवान श्रीहरी मग प्रत्यक्षच त्याच्याशी होळी खेळतात व त्याला आपल्या अलौकिक प्रेमरंगाने भरलेल्या पिचकारीने सचैल माखून टाकतात. आपल्या भूमानंदाचे खाजे ते स्वत:च्या मंगलहस्तानेच त्याला भरवतात. भगवान श्रीरंगांच्या त्या अपूर्व-मनोहर रंगांमध्ये मग तो कायमचा रंगून जातो, अंतर्बाह्य मोहरून जातो आणि "अवघा रंग एक जाला ।" अशी चिन्मय अनुभूती निरंतर लाभून, तोही श्रीरंगांचेच अभिन्न-स्वरूप होऊन ठाकतो. हाच संतांना अभिप्रेत असणारा अविरत साजरा होणारा खरा फाल्गुनी रंगोत्सव आहे !!"
असाच सप्रेम रंगोत्सव तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्यात श्रीगुरुकृपेने साजरा होवो, हीच या होलिकोत्सवाच्या प्रसंगी श्रीगुरुचरणीं सादर प्रार्थना  !!!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

8 comments:

  1. होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. गुरुदेव दत्त रोहनजी

    ReplyDelete
  3. Ekdam badhiya...rupake khup mast aahet










    ReplyDelete
  4. होळीचे विविधांगी दर्शन भावले !

    ReplyDelete
  5. फारच छान . पुन्हा पुन्हा वाचल्यावरच थोडे थोडे लक्षात येतंय.

    ReplyDelete
  6. पुन्हा वाचून आनंद झाला

    ReplyDelete
  7. Dhnyavad Farach Surekh Daivee Likhan

    ReplyDelete