22 Mar 2017

स्वामीचिया मनोभावा जाणणे हेचि परमसेवा

आज श्रीपादनवमी !!
श्रीदत्तसंप्रदायाचे महान अध्वर्यू सद्गुरु योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची पुण्यतिथी !
बरोबर सत्तावीस वर्षांपूर्वी आजच्याच तिथीला, पहाटे तीन वाजता एक अतीव तेजस्वी व विलक्षण 'श्रीदत्तब्रह्म', प्रचंड कार्य करून आपल्या मूळ स्वरूपी पुन्हा निमग्न झाले. अर्थात् जाणे-येणे असे त्यांच्यासाठी काहीच नसते. सर्वकाळी, सर्वत्र तेच परमानंदमय श्रीदत्तब्रह्म नित्य-निरंतर संचलेलेच आहे ! "अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव ।" असे त्यासाठीच म्हटलेले आहे.
संतांच्या जन्माने किंवा देहत्यागाने एखादी तिथी अधिक पुण्यपावन ठरत असते. तो त्या सत्पुरुषांचाच त्या तिथीवरचा मोठा कृपा-संस्कारच म्हणायला हवा. अशा पुण्यतिथीला जे त्या संतांचे, त्यांच्या अलौकिक सद्गुणांचे, त्यांच्या लोकविलक्षण कार्याचे, त्यांच्या जगावेगळ्या करुणाकृपेचे आणि महापातक्यांनाही परमपुनीत करण्याचे अद्भुत सामर्थ्य अंगी मिरवणा-या त्यांच्या लीलांचे स्मरण, मनन, कथन व पठण करतात, तेही त्यांच्या त्या कृपालेशाने पावन होतात; असे आजवरच्या सर्व संतांनीच सांगून ठेवलेले आहे. याच प्रेमादराच्या भावनेने श्रीपादनवमीच्या या पुण्यपर्वावर आपण नाथ-दत्त-वारकरी संप्रदायांचे अध्वर्यू असणा-या सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे अल्पसे पण भावपूर्ण स्मरण करून आजच्या तिथीचे नाम यथार्थ करूया; 'श्रीपादनवमी'ला 'श्रीपादचरणीं' ही स्मरण-वंदना सप्रेम समर्पून धन्य धन्य होऊया !
श्रीगुरुसेवा ही अवघ्या सद्भाग्यांचेही दैवत आहे; तेच सर्वश्रेष्ठ भाग्य आहे, असे सद्गुरु श्री माउली कथन करतात. परमार्थतील चरम अनुभूतीच्या वैभवसंपन्न रत्न-दालनाचे दर्शन करविणारी एकमात्र किल्ली म्हणजे परमादरपूर्वक झालेली निष्काम, निष्कपट श्रीगुरुसेवा हीच होय. सर्व कुलुपे उघडणा-या किल्लीला म्हणूनच 'गुरुकिल्ली' म्हणत असावेत ! सद्गुरु श्री माउलींनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात 'आचार्योपासनं' या पदावर भाष्य करताना अगदी बहार केलेली आहे. सद्गुरु श्री माउलींनी कथन केलेली श्रीगुरुसेवा आजवरच्या असंख्य महात्म्यांनी प्रत्यक्ष आचरून दाखवलेली आहे, त्याचे अनेक दाखले आपल्याला त्यांच्या चरित्रात सापडतात.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउली आदर्श गुरुभक्ताचे वर्णन करताना म्हणतात, "जो गुरुसेवाव्यसनें सव्यसन । निरंतर ॥ ज्ञाने.१३.७.४४४ ॥" या गुरुभक्ताला जणू गुरुसेवेचे व्यसनच असते; आणि माउलीच सांगतात की, व्यसनी माणसाला आपल्या व्यसनांचा कधीच कंटाळा येत नसतो. त्या न्यायाने हा गुरुभक्त रात्रंदिवस, अखंड गुरुसेवेच्या आनंदातच रममाण असतो. क्षणोक्षणी नवीन कल्पना वापरून, अभिनव कलांचा अंगीकार करून तो जगावेगळ्या पद्धतीने गुरुसेवा करीत असतो. त्यासाठी आपल्या सर्व सामर्थ्याचा, बुद्धिमत्तेचा व क्षमतांचा तो पुरेपूर आणि नेमका वापरही करीत असतो.
सद्गुरु भगवान श्री माउलींच्या या सांगण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे होत !
श्रीगुरुसेवा हा पू. मामांचा उपजत स्थायीभावच होता. त्यांच्यासारख्या अवतारी संतांना गुरुसेवा अंगी बाणवण्याची काहीच आवश्यकता नसते. ती त्यांची अंतरंग वृत्तीच असते. त्यांच्या मनात अविरत त्या सेवेचेच वेगवेगळे विचार असतात.
आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा, कल्पकतेचा पुरेपूर वापर असे थोर गुरुभक्त पदोपदी करीत असतात. छोट्या छोट्या कृतींमधूनही त्यांचे ते अलौकिक गुरुप्रेम आणि सेवावृत्ती स्पष्ट जाणवते. पू.मामांच्याच बाबतीतला एक छोटासाच, पण गोड प्रसंग सांगतो. त्यावरून हे सहज ध्यानी येईल.
योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराज आधी २०, नारायण पेठ येथे, गोवईकरांच्या चाळीत राहात असत. त्यावेळी त्याच वाड्यात वै.पू.नाना भालेरावही राहात असत. या भालेराव कुटुंबाने श्रीमहाराजांची मनापासून सेवा केली. पू.ती.नाना हे श्रीमहाराजांचे जीवाभावाचे मदतनीस होते. श्रीमहाराजांचेही त्यांच्यावर अतीव प्रेम होते.
त्या वाड्यात श्रीमहाराजांचे बिऱ्हाड दोन खोल्यांमध्ये होते. पुढे दोन खोल्या सोडून भालेराव राहात असत. श्रीमहाराजांचे लागले-सवरले सगळे भालेरावच पाहात. रोज दोन वेळच्या उदरपूर्तीसाठी श्रीमहाराज त्यांच्याच घरी जात. दिवसभरातही बऱ्याचवेळा काही निरोप सांगायला किंवा काही हवे असल्यास श्री.गुळवणी महाराजांना तेथवर जावे लागे. भालेरावांच्या मुलांपैकी कोणी असेल तर हाक मारल्यावर पटकन् ते महाराजांकडे येऊन असेल ते काम करून जात. नाहीतर श्रीमहाराजांनाच प्रत्येकवेळी त्यांच्या खोलीपर्यंत जाऊन निरोप सांगावा लागे.
प.पू.श्री.मामा त्याकाळात नोकरी निमित्त राजकोटला वास्तव्याला होते. पण त्यांचे वरचेवर पुण्यात येणे होई. त्यावेळी श्रीमहाराजांचे दर्शन व सहवास त्यांना लाभत असे. त्यांच्या चाणाक्ष नजरेने श्रीमहाराजांना नेहमी होणारा हा त्रास नेमका टिपला. पू.मामा जात्याच अत्यंत हुशार व कल्पक होते. त्यांनी लगेच यावर छोटासा पण अचूक उपाय शोधला. बाजारात जाऊन त्यांनी एक बेल विकत आणली व ती बेल भालेरावांच्या घरात बसवली. त्याचे बटन श्रीमहाराजांच्या खोलीत होते. आता तेथे बसल्या बसल्यासुद्धा श्रीमहाराज बेल वाजवून भालेरावांपैकी कोणालाही बोलावून घेऊ शकत होते. श्रीमहाराजांना तेथवर जाऊन निरोप सांगण्याचा त्रास त्यामुळे आपोआप वाचला. पू.मामांच्या या सहजसोप्या आणि नेमक्या युक्तीमुळे श्रीमहाराजांची मोठीच सोय झाली.
गोष्ट म्हटली तर अगदी छोटीशीच आहे. पण तिचा परिणाम? तो केवढा उपयोगी ठरला ! पू.मामा हे सद्गुरु श्री माउलींना अभिप्रेत असणारे सच्चे गुरुभक्त होते, आदर्श गुरुसेवाव्रती होते. म्हणूनच त्यांच्या मनोमानसी, विचारांमध्ये सदैव आपल्या श्रीगुरूंना सुख कसे होईल? त्यांची योग्य सोय कशी होईल? त्यांचे कष्ट कसे कमी करता येतील? याचेच चिंतन चालत असे. त्यामुळेच अशा नवनवीन युक्त्या योजून, आपल्या हृदयी बहरलेले गुरुप्रेम पू.मामा सेवेच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा आस्वादत असत. सद्गुरु माउली म्हणतात तसे, "स्वामीचिया मनोभावा । जाणणे हेचि परमसेवा ॥" हेच त्यांचे जणू परमकर्तव्य होते !
संतांच्या, सद्गुरूंच्या चरित्रातील असे प्रसंग हे आपल्यासाठी केवळ आनंदाचे अनुभव नसतात; तर ते आपल्याला निरंतर मार्गदर्शकही असतात. आपल्या अंतरीचा सद्भाव, सेवाभाव वृद्धिंगत करून, आपल्यालाही सेवापरायण करणारे ते स्निग्ध प्रकाशाने उजळलेले तेजोमय रत्नदीपच असतात ! म्हणूनच अशा लीलांचे वारंवार अनुसंधान आपण आवर्जून करायला हवे.
संत हे केवळ स्मरणानेही कृपा प्रदान करीत असतात. त्यांचे कार्य आईसारखे असते. लहानग्या बाळाने आपल्या आईला नुसती प्रेमाने "आई गं" एवढी हाक मारायचा अवकाश, तिचा प्रेमप्रवाह खळखळून वाहू लागतो. तसेच या मातृहृदयी संतांचेही असते. इथे तर 'मामा' आहेत. मा म्हणजे आई, पू.मामांच्या नावातच त्या आईपणाची द्विरुक्ती आहे. त्यांचे स्वरूपच त्यांच्या नावाप्रमाणे आहे. पू.श्री.शिरीषदादा म्हणतात, "अहो, 'मामा' या शब्दालाच आईचे काळीज लाभलेले आहे !"
आपणही आजच्या श्रीपादनवमीच्या या पावन पर्वणीवर, योगिराज सद्गुरु श्री.मामांच्या चरणीं प्रेमादरपूर्वक दंडवत घालून, लेकुरवाचेने त्यांच्यातील त्या अपरंपार बहरलेल्या मातृत्वाला प्रेमळ साद घालूया व त्यांना करुणाकृपेचे दान मागूया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया ही पेजेस जरूर लाईक करावीत.
1. https://m.facebook.com/sadgurubodh/


0 comments:

Post a Comment