28 Oct 2016

ज्ञानाची दिवाळी



नमस्कार मित्रहो,
आज धनत्रयोदशी, भारतीय संस्कृतीतील प्रमुख महोत्सव, दीपावलीचा दुसरा दिवस. आजच्याच तिथीला देव-दानवांनी समुद्राचे मंथन केल्यामुळे, त्या रत्नाकरातून चौदा रत्ने लोककल्याणासाठी निर्माण झाली होती. म्हणून त्या चौदा रत्नांपैकी भगवान विष्णूंची पत्नी भगवती लक्ष्मी व भगवान विष्णूंचे अवतार भगवान धन्वंतरी यांची जयंती आज साजरी होत असते. उत्तर भारतात ही धनतेरस खूप मोठ्या प्रमाणावर साजरी होते.
आज भगवती लक्ष्मीमाता व धनाधिपती कुबेरांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. तसेच सप्त धान्यांचीही पूजा करतात, नवीन वस्त्र, धातू, दागिने, सोने अशा वैभवसूचक  गोष्टींची देखील खरेदी करतात. सायंकाळी प्रदोष समयी श्रीलक्ष्मी-कुबेर पूजन करून साळीच्या लाह्या व बत्तासे आणि धने-गुळाचा नैवेद्य अर्पण करून, धन-धान्य समृद्धी व्हावी म्हणून कृतज्ञतापूर्वक श्रीभगवंतांची प्रार्थना करायची असते.
आजच्या तिथीलाच सायंकाळी धर्मदेवता यमराजाच्या नावाने दक्षिणेकडे तोंड करून एक दीप अर्पण करायचा असतो. एरवी आपण वर्षभर कधीही दक्षिणेकडे वात करून दिवा लावत नाही. या दीपदानाने अकालमृत्यू पासून सुटका होते असे म्हणतात.
भगवान विष्णूंच्या श्रीमद् भागवतातील चोवीस अवतारांमध्ये भगवान धन्वंतरींची गणना होते. हे देवांचे वैद्य मानले जातात. दीर्घकाल आयुष्य व उत्तम आरोग्य टिकून राहावे म्हणून आज त्यांची देखील पूजा केली जाते.
आरोग्य हीच खरी संपत्ती असून तेच सुखी व आनंदी जीवनाचे द्योतक आहे; व तेच सर्वथा साध्य देखील ! म्हणूनच की काय, भगवती लक्ष्मी व श्रीधन्वंतरींचा जन्म एकाच वेळेला झाल्याची गोष्ट शास्त्रांमध्ये आलेली आहे. पण दुर्दैवाने लक्ष्मीच्या पाठीमागे लागून लोक पहिल्यांदा आपल्या शरीराचे व आरोग्याचेच वाटोळे करून घेतात. पैसे मिळवण्यात इतके गढून जातात की अत्यंत दुर्मिळ असणारा मनुष्यजन्म, हेलपाट्याच्या गाढवासारखा झापडे लावून तेच ते करण्यात वाया घालवतात. एवढे मर मर मरून कमावलेली संपत्ती देखील मग त्यांना सुखाने उपभोगताही येत नाही. मिळालेला पैसा औषधांवरच खर्च होऊन जातो. ना समाधान ना आरोग्य, ना सुख ना आनंद, फक्त कष्ट; अशा विवंचनेतच सर्व आयुष्य नष्ट होऊन जाते. मानवजातीचे हेच भविष्य बहुदा पूर्वीच्या द्रष्ट्या ऋषींनी आधीच ओळखून लक्ष्मी व धन्वंतरींची सांगड घातलेली असावी.
प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज एक मार्मिक गोष्ट सांगत असत. भगवती लक्ष्मीचे वाहन आहे घुबड. त्याला संस्कृतमध्ये उलूक म्हणतात. हिंदीत उल्लू म्हणतात. उल्लू म्हणजे बावळट देखील. जेव्हा ही लक्ष्मी एकटीच येते तेव्हा ती घुबडावर बसून येते व ज्याच्याकडे येते त्याला ' उल्लू ' बनवून लगेच निघूनही जाते. पण ती जेव्हा भगवान विष्णूंसोबत येते तेव्हा ती गरुडावरून येते व त्यावेळी ती स्थिर देखील राहाते. भगवान श्रीज्ञानेश्वर माउली मुद्दाम म्हणतात की, " मुकुंदीं स्थिरावली लक्ष्मी जैसी ।" एरवी अत्यंत चंचल असणारी भगवती लक्ष्मी श्रीभगवंतांबरोबर आली की एकदम स्थिर राहाते. म्हणून जो फक्त लक्ष्मीच्या मागे लागतो तो 'उल्लू'च बनतो. त्याला मग धन्वंतरींचाच आधार घ्यावा लागतो.
भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे दैवत मानले जातात. त्यांच्या एका हातात अमृतकुंभ असतो. हा सर्व औषधांचे प्रतीक आहे. औषध हे भगवान विष्णूंचे एक नाम आहे. त्यांची " अमृत, भेषज, भिषक्, वैद्य " इत्यादी अनेक नामे विष्णुसहस्रनामामध्ये आलेली आहेत. या नामांमधून श्रीभगवंतांचेच करुणामय धन्वंतरीस्वरूप आणखी स्पष्ट होते. म्हणून भगवान धन्वंतरींचा हात न सोडता अर्थात् आरोग्य न बिघडवता, गरुडावरून श्रीभगवंतांबरोबर येणारी लक्ष्मी प्राप्त करण्यासाठीच आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. अशी लक्ष्मी प्राप्त झाली तरच आयुष्य अमृतमय होते. अमृतासाठी पूर्वी जे समुद्रमंथन झाले, त्या गूढ प्रक्रियेचे हे विचारमंथनच आजच्या धनत्रयोदशीचे खरे रहस्य आहे ! हे जाणून जर धनत्रयोदशी साजरी झाली, तरच मग दीपावलीचा शाश्वत आनंद लाभेल !
दीपावलीची सुरुवात वसुबारसेला गोपूजनाने होते. गायीच्या सर्वांगात, शेणात, मूत्रातही पावित्र्याचा, मांगल्याचा, आरोग्याचा, लक्ष्मीचा वास असतो. म्हणून तिचे महत्त्व आधी जाणून तिची सेवा करायची, मग धनत्रयोदशीला आरोग्यासह लक्ष्मी प्राप्त होते. त्यानंतरच नरकासुराचा वध श्रीभगवंत करतात. तीच नरकचतुर्दशी ! मग आपल्या आयुष्यातील पापरूपी नरकाची अर्थात् आपले दुर्गुण, व्यसने व वाईट सवयी यांची व आपली संगत सुटते. तेव्हाच मिळालेली स्वर्गीय संपत्ती संपूर्ण कुटुंबासह आपल्याला सुखाने व योग्य पद्धतीने उपभोगता येते. तेच लक्ष्मीपूजन होय ! यातून आपल्या आयुष्यात एक नवे प्रकाश-पर्व सुरू होते, तोच दीपावली पाडवा होय. असा जेव्हा बोध-दीपोत्सव संपन्न होतो, तेव्हाच सर्वत्र, सर्व समाजात असूया व द्वेषरहित बंधुभाव, स्नेहभाव उत्पन्न होत असतो, म्हणून दीपावलीची सांगता ही भाऊबीजेने होते. हीच संतांना अभिप्रेत असणारी खरी बोध-दीपावली होय !
आपल्या प्रचंड बुद्धिमान व ज्ञानी ऋषीमुनींनी या सर्व भूमिकांचा सांगोपांग विचार करूनच हा तेजाचा, प्रकाशाचा महोत्सव, दीपावली महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. आपण त्यांचे मर्मच जाणून घेत नाही, हे आपलेच दुर्दैव नाही का?
आजच्या या पर्वावर आपण सर्वांनी असा निर्धार करूया की, आम्ही आमच्या प्रगल्भ संस्कृतीचा यथायोग्य मान ठेवू, ती जाणून घेऊन आपले आयुष्य खरे सुखी करू व अभिमानाने भारतीय वैदिक संस्कृतीचे पाईक म्हणून जगात मिरवू ! अशी अलौकिक बोध-जाणीव निर्माण होऊन कायमची स्थिर होणे, हीच खरी दीपावली आहे व अशाच बोध-दीपावलीच्या तुम्हां सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा !!
( आजच्या दिवशी कोल्हापूरच्या भगवती महालक्ष्मीचा धन्वंतरी रूपातलाच फोटो या लेखासोबत मुद्दाम शेयर करीत आहे. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.com )

22 Oct 2016

जाला गवसणी गुरुभक्तीसी


आज आश्विन कृष्ण सप्तमी, परम आदर्श श्रीगुरुभक्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् नृसिंह सरस्वती ( दीक्षित) स्वामी महाराजांची पुण्यतिथी !!
प. प. श्री. दीक्षित स्वामी हे पंचम श्रीदत्तावतार प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांचे स्वनामधन्य शिष्योत्तम होत. प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी संपूर्ण हयातीत केवळ श्री. दीक्षित स्वामींनाच संन्यासदंडदीक्षा दिलेली होती; तेही त्यांची तीव्र परीक्षा पाहून. श्री. दीक्षितस्वामींनी प. प. श्री. थोरल्या महाराजांना रात्री निजताना आपल्याला दंड देण्याची प्रार्थना केली. पण श्री. स्वामी महाराज म्हणाले, आम्हांला आज्ञा नाही, इतर कोणाकडून दंड घ्यावा. असे म्हणून श्री. थोरले महाराज छाटी पांघरून झोपून गेले. त्यांच्या पायाशी उभे राहिलेले श्री. दीक्षितस्वामी डोळ्यांतून अश्रू गाळत तसेच उभे होते. पहाटे श्रीगुरुमहाराजांना जाग आली तर, रात्री जसे श्री. दीक्षितस्वामी उभे होते, तसेच उभे होते, खाली मान घालून, अविचल व अडीग. आपल्या शिष्याची दृढ निष्ठा पाहून श्रीगुरु महाराजांनी सुहास्य वदनाने विचारले, " स्वामी, तुम्ही अजून तसेच उभे आहात? जा, तयारी करा दंडदानाची ! " श्री. दीक्षित स्वामींनी प्रेमभराने गुरुचरणांवर दंडवत घालून अश्रूंचा अभिषेक केला. पुढे वाडीतच दंडदान झाले व नारायण दीक्षितांचे श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज झाले. त्यांना वाडीत राहूनच उपासना चालविण्याची गुरुआज्ञा झाली, जी त्यांनी मनापासून पाळली.
प. प. श्री. दीक्षितस्वामी हे श्रीनृसिंहवाडीचे राहणारे व त्याकाळात बी. ए पर्यंत शिक्षण घेतलेले होते. त्यांचा परमार्थ अधिकार फार मोठा होता. ते प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांचे लीलासहचरच होते व कार्यासाठीच त्यांच्यासोबत अवतरलेले होते.
श्रीगुरुभक्तीचा परम आदर्श म्हणजे श्री. दीक्षित स्वामी !! प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराज कायम त्यांच्या विलक्षण गुरुसेवेचे कौतुक करीत व त्यांना खूप मानही देत असत. शेवटच्या गरुडेश्वर वास्तव्यात श्री. ब्रह्मानंद तीर्थ स्वामींना श्री. थोरल्या महाराजांनी जीवन्मुक्तीची लक्षणे शिकवून त्यांचा अभ्यासही करवून घेतला होता. त्यावेळीच त्यांनी सांगितले, " स्वामी, आपण कधी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला गेला आहात काय? नसाल तर एकदा जरूर जा. तेथे आपणांस शिकविलेल्या जीवन्मुक्त लक्षणांची साक्षात् मूर्तीच आम्ही स्थापन करून ठेवलेली आहे. ते  तेथीलच आहेत, पण त्यांना कोणी ओळखत नाही. आमच्यापेक्षाही ते काकणभर अधिक आहेत !" आपल्या शिष्याविषयी एवढे गौरवोद्गार, तेही प्रत्यक्ष श्रीमत् टेंब्येस्वामींसारख्या श्रीदत्तस्वरूपाने काढणे, हे सोपे नाही. यातच श्री. दीक्षितस्वामींचा अद्भुत अधिकार दिसून येतो. त्यांचे चरित्रही अगदी श्री. टेंब्येस्वामींसारखेच विलक्षण आणि सुंदर आहे.
एकदा प्रत्यक्ष सूर्यचंद्रादी नवग्रह मनुष्यरूप घेऊन त्यांच्या दर्शनाला आले व त्यांनी प्रार्थना केली की, " उद्या पासून तुम्हाला शनीची साडेसाती सुरू होणार आहे. तरी आपली त्यासाठी परवानगी असावी. " त्यावर ते शांतपणे म्हणाले, " आपण आपले कार्य करावे. आमची काही हरकत नाही. " दुस-याच दिवशी त्यांच्यावर वाडीच्या पुजा-यांनी चोरीचा आळ घेतला आणि वाडी सोडून जाण्यास फर्मावले. ज्या वाडीत त्यांना प्रत्यक्ष देवांइतका मान होता, तिथेच त्यांच्यावर खोटा आळ लावला गेला. त्यांच्या चित्तात प्रारब्धवशात् आलेल्या या बालंटाने कसलेही तरंग उठले नाहीत, ते पूर्ण स्थितप्रज्ञच होते. हीच देवांची इच्छा समजून ते वाडीतून कृष्णेच्या समोरील तीरावरील औरवाड येथे जाऊन राहिले. तेथे त्यांनी श्रीदत्तामरेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या प्रसाद पादुका स्थापून " श्रीवासुदेवानंद सरस्वती पीठ " निर्माण केले.
प. प. श्री. टेंब्येस्वामी आपल्या प्रत्येक नवीन ग्रंथाची हस्तलिखित प्रत प. प. श्री. दीक्षितस्वामींनाच पाठवत असत, एवढे त्यांचे आपल्या या पट्टशिष्यावर प्रेम होते. त्यांचा व दीक्षित स्वामींचा झालेला पत्रव्यवहारही फार सुंदर असून पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. श्री. दीक्षित स्वामींनी लिहिलेला ' गुरुशिष्य संवाद ' हा आवर्जून वाचावा असा प्रश्नोत्तररूप अप्रतिम लघुग्रंथही त्यांनीच प्रकाशित केलेला आहे.
श्री. दीक्षितस्वामींनी प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या आज्ञेनुसार भरपूर भ्रमंती करून वैदिक धर्माचा विकास केला. हजारो लोकांना श्रीदत्तभक्तीला लावले. अनेकांना अडचणींतून सहज सोडविले. तेही अत्यंत प्रेमळ, उदार व कोमल अंत:करणाचे होते. त्यांच्या रचनाही मनोहर आहेत. प. प. श्री. टेंब्येस्वामींची त्यांनी रचलेली " जय जय श्रीमत् गुरुवर स्वामिन् परमात्मन हंसा । " ही संस्कृत आरती तर अतीव प्रासादिक आहे.
अखंड गुरुभजनात, गुरुसेवेत रममाण झालेल्या या थोर अवतारी सत्पुरुषाने शरयू नदीच्या तीरावरील अयोध्या नगरीत नश्वर देहाचा त्याग केला. " आम्ही संपूर्ण जग फिरलो पण श्रीनृसिंह सरस्वतींसारखा ज्ञानाला सुपात्र व परम गुरुभक्त शिष्य दुसरा पाहिला नाही ! " असे प्रशंसोद्गार ज्यांच्याबद्दल साक्षात् भगवान श्री. टेंब्येस्वामींनी काढले, त्या थोर सत्पुरुष प. प. श्री. नृसिंह सरस्वती ( दीक्षित)  स्वामी महाराजांचा कीर्तिसुगंध व पावन नाम पृथ्वीच्या अंतापर्यंत श्रीदत्त संप्रदायामध्ये अजरामर राहणार आहे; अगदी ' या सम हा ' असे !
आज त्यांच्या पुण्यतिथीच्या पुण्यपर्वावर, प. प. श्रीमत् नृसिंह सरस्वती ( दीक्षित ) स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत घालून, सर्वांसाठी श्रीगुरुभक्तीचाच आशीर्वाद त्यांना मागूया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

11 Oct 2016

*** आदिशक्तिचें कवतुक मोठें   *** ** एकादशोल्लास **

सर्व भगवत्प्रेमी सुहृदांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज दसरा, नवरात्रीच्या सांगतेचा दिवस ! आजच्या तिथीलाच विजयादशमी देखील म्हणतात. भगवती श्रीजगदंबेने महिषासुराचा व भगवान श्रीरामांनी रावणाचा वध आजच्याच तिथीला केला होता. त्यांच्या त्या विजयाचे द्योतक, धर्माच्या अधर्मावरील विजयाचे प्रतीक म्हणून प्राचीन काळापासून या तिथीला उत्सव साजरा करून सीमोल्लंघन करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. सगळीकडे झेंडूच्या फुलांची आरास करून, देवांना झेंडूची फुले वाहून, शमी व आपट्याच्या फांदीची पूजा करायची. देवांना व श्रीसद्गुरूंना विशिष्ट पद्धतीने आपट्याची व शमीची पाने आणि झेंडूचे फूल अर्पण करायचे. देवी सरस्वतीची व तिचे प्रतीक असणा-या ग्रंथांची पूजा करायची. नंतर एकमेकांना आपट्याचे सोने द्यायचे आणि सर्वांचे अभीष्ट चिंतून आनंद व्यक्त करायचा; आपल्या गुरुजनांची आवर्जून भेट घेऊन त्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, अशी या दिवशीची प्रथा आहे. या सगळ्यांचा खूप मोठा अर्थ आपल्या ऋषी-मुनींनी सांगून ठेवलेला आहे. आपण आपल्या जगावेगळ्या संस्कृतीचा खोलात जाऊन विचारच करत नाही, हे आपलेच दुर्दैव आहे. आता फक्त दिवसभर व्हॉटसपवर पडीक राहून, स्वत: न वाचताच भरमसाठ मेसेज नुसते फारवर्ड करायचे, दुपारी भरपेट गोडधोड हाणून ताणून द्यायची आणि सणाचे, सुट्टीचे सार्थक करायचे; हीच सध्या आपल्याकडील उत्सवांची पद्धत रूढ होत चाललेली आहे. दुर्दैवाने बळावलेला हा मूर्खपणा खरंच कुठेतरी थांबायला हवा.
संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक पूजनीय सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज या विजयादशमीच्या प्रतीकांचा गूढ अर्थ फार सुंदर रितीने स्पष्ट करून सांगत असत. त्यांचे उत्तराधिकारी पूजनीय श्री. शिरीषदादा कवडे यांनी आपल्या ' महेशें शिवेसी निजखूण दाविली ' या ग्रंथातील ' विजयादशमी रहस्य ' या प्रवचनात हे सर्व मर्म उलगडून सांगितलेले आहे. आपण त्याचा येथे थोडक्यात आस्वाद घेऊया.
कालच्या लेखामध्ये आपण वैष्णवी माया म्हणून भगवती जे कार्य करते ते पाहिले. तीच मायारूपिणी अंबा सद्गुरुरूपाने जीवावर अनुग्रहकृपा करून त्याचा देहभाव आटवते व त्याला जीवदशेतून पुन्हा मूळच्या शिवस्वरूपात एकरूप करते. याच प्रक्रियेला खरे ' सीमोल्लंघन ' म्हणतात आणि त्याच्या विधीलाच ' नवरात्र ' म्हणतात. जीवाचा जीवभाव नष्ट होण्याची प्रक्रिया म्हणजेच साधना व ही साधना नऊ प्रकारांनी संपूर्ण होते. यांनाच नवविधा भक्ती म्हणतात. श्रीसद्गुरूंची कृपाशक्ती साधकाला क्रमाने, टप्प्यात टप्प्याने या नऊ पाय-यांवरून आत्मस्वरूपाच्या महालात नेऊन ठेवते.
श्रवण, कीर्तन, नामस्मरण,  पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य व  सख्य या आठ भक्तीपाय-या ओलांडून तो जीव आत्मनिवेदन या नवव्या पायरीवर येतो. तेथे तो श्रीकृपेने भगवंतांशी पुन्हा एकरूप होऊन जातो. त्यालाच विजयादशमी म्हणतात. जीवत्वातून शिवत्वात पुन्हा झालेले हेच खरे सीमोल्लंघन होय. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आधी श्रीगुरुचरणीं शरण जाऊन त्यांची कृपा संपादन करावी लागते. त्यांच्या कडून ते कृपाबीज हृदयात प्रतिष्ठापित होणे हीच घटस्थापना होय. मग त्यांनी कृपावंत होऊन दिलेले साधन प्राणपणाने जपून वाढवावे लागते. हेच आपल्यासाठी नवरात्र अनुष्ठान असते आणि याची परिपूर्ती म्हणजेच विजयादशमी होय !
प्रत्यक्ष भगवंतच विजयस्वरूप आहेत, तर अर्जुनाचे एक नाव विजय देखील आहे. अर्जुन म्हणजेच हा जीव व तो विजया नावाच्या शक्तीच्या कृपेने भगवंतांशी एकरूप होऊन पुन्हा विजयस्वरूप होऊन जातो. जीव विजयस्वरूप होण्याची ही सर्व प्रक्रिया म्हणजेच नवरात्र होय !
विजयादशमीला देवांना आणि श्रीसद्गुरूंना आपटा व शमीची पाने आणि झेंडूचे फूल वाहतात. याचे शास्त्रीय कारणही खूप सुंदर आहे.
आपट्याला दोन दले असतात. आपट्याला संस्कृतात कांचन म्हणतात. कांचन म्हणजेच मोह, म्हणून तो आपल्या मोहाचे प्रतीक आहे. ' मी ' व ' माझे ' या दोन रूपांनी आपला मोह कार्य करीत असतो. म्हणून ही दोन दले मिटून श्रीसद्गुरुचरणीं वाहतात. " माझे द्वैत मिटले जावो आणि मोह तुमच्या चरणी अर्पण असो," अशी त्यामागची भावना असते.
शमीची पाने ही चिंचेच्या पानांसारखी असतात. तो आपल्या मनाचे प्रतीक आहे. आपल्या मनाला असे अनेक फाटे फुटलेले असतात. ही सगळी पाने हिरवी म्हणजे टवटवीत देखील असतात. आपल्या मनाच्या वृत्ती ह्या अशाच असतात. म्हणून त्या श्रीगुरुचरणीं अर्पण करून आपण मनाला आवर घालायचा असतो. म्हणून शमीचे पान पालथे अर्पण करतात. " माझ्या मनाच्या वृत्ती प्रपंचातून निघून तुमच्या चरणी आश्रयाला येवोत, 'पालटोत' ," हे त्यातून आपण श्रीगुरूंना विनवायचे असते.
याबरोबर झेंडूचे फूलही वाहतात. झेंडूला तसा सुगंध नाही, पण एक विशिष्ट तीव्र गंध असतो. शिवाय हे एक स्वतंत्र फूल नाही, तो अनेक फुलांचा गुच्छ आहे. तसे आमच्या मनाचा भाव जरी वरून एकविध दिसत असला तरी तो बहुविधच असतो. अनेक वासनांचा मिळून बनलेला असतो. त्याला आपापल्या वासनांचा तीव्र गंधही असतो. तो वासनांचा रंग या झेंडू सारखा भगवा होवो, वैराग्याचा होवो म्हणून झेंडू वाहायचा; तोही देठ देवांकडे करून. तो वासनामूळांनी बनलेला देठ श्रीसद्गुरूंनी हातात घेतला तरच आपण त्या वासनांच्या कचाट्यातून सुटणार ना !
असा या प्रतीकांचा सुरेख गूढ अर्थ आहे. हे सगळे रहस्य समजावे, त्यामागचे विचार कळून आपले उत्सव अधिक जाणीवपूर्वक, वाढत्या उत्साहाने व प्रेमाने साजरे व्हावेत यासाठीच आपल्या ऋषीमुनींनी व संतांनी मांडलेले चिंतन आपण वारंवार वाचले, अभ्यासले पाहिजे.
गेले दहा दिवस आपण भगवती श्रीजगदंबा मातेची यथामती शब्दपूजा करीत आहोत. भगवती जगदंबिकेच्या विविध अवतारांच्या लीलांचे आपल्याकडून या नवरात्रात सप्रेम स्मरण घडले. आज या सुमुहूर्तावर, दस-याच्या पावन दिवशी तिच्याच करुणाकृपेने माझ्याकडून लेखन व तुम्हां सर्वांकडून वाचन, मनन रूपाने संपन्न झालेली ही सर्व वाङ्मयसेवा श्रीशारदा भगवतीच्या परमपावन श्रीचरणीं अर्पूया आणि सद्गुरुस्वरूपिणी भगवती जगज्जननी श्रीअंबामातेकडे, ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही प्रकारचे वैभव आम्हांला भरभरून द्यावे, असा कृपाप्रसाद मागूया. ही कोमलहृदयाची परमप्रेमळ माता आपली लेकुरवाचेने केलेली प्रार्थना नक्कीच पूर्ण करेल.
सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराजांनी आपल्या सुप्रसिद्ध जोगव्यातून श्रीआदिशक्तीचे स्वरूप व कार्य यांचे सर्वांगीण दर्शन घडवलेले आहे. आपण गेले दहा दिवस जे चिंतन करतोय, ते सर्व नाथमहाराजांनी या एकाच अभंगात साररूपाने व्यक्त केले आहे. म्हणून त्याच पावन शब्दांद्वारे आपण कृपापसाय मागून, विजयादशमीचा असा ज्ञानपूर्ण उत्सव साजरा करूया आणि सरतेशेवटी विश्वजननी श्रीभगवतीमातेच्या प्रेमार्द्र मायकुशीत निरंतर विसावूया !
अनादि निर्गुण प्रकटली भवानी ।
मोहमहिषासुर मर्दनालागुनी ।
त्रिविध तापांची करावया झाडणी ।
भक्तांलागोनी पावसी निर्वाणीं ॥१॥
ऐसा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारूनी माळ मी घालीन ।
हातीं बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा ।
करुनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा ।
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा ।
दंभ संसार सांडीन कुपात्रा ॥३॥
पूर्णबोधाची भरीन परडी ।
आशा-तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी ।
अद्भुतरसाची भरीन दुरडी ॥४॥
आतां साजणी मी झालिये नि:संग ।
विकल्प नव-याचा सोडियेला संग ।
कामक्रोध हे झोडियेले मांग ।
केला मोकळा मारग सुरंग ॥५॥
ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।
जाऊनी महाद्वारीं नवस फेडिला ।
एकपणें जनार्दन देखिला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

10 Oct 2016

* आदिशक्तिचें कवतुक मोठें * * दशमोल्लास *

आज नवरात्राची दहावी माळ, यंदा तिथीच्या वृद्धीमुळे नवरात्र दहा दिवसांचे झाले. आज आश्विन शुद्ध नवमी, नवरात्रोत्थापन !
गेले नऊ दिवस आपण आदिशक्ती जगत्रयजननी भगवती श्रीजगदंबेच्या अद्भुत स्वरूपाचे, विविध अवतारांचे तसेच अलौकिक कार्याचे यथामती गुणवर्णन आईसाहेबांच्याच कृपेने करीत आहोत. पराम्बिका आदिशक्ती हीच सर्व विश्वाची जननी असल्याने तिच्या रूपांना, अवतारांना मितीच नाही. तिच्या अक्षरश: हजारो अवतारांचे आणि अपूर्व-मनोहर लीलांचे वर्णन पुराणांनी केलेले आहे.
भगवती जगदंबा माता ही जशी वैष्णवी माया बनून जगाची निर्मिती करते आणि विनोदाने खेळ खेळावा तसे परमआनंदमय अशा शिवांचा जीव करून त्याला नाना कर्मांच्या कचाट्यात गोवते; तशीच ती श्रीभगवंतांची अनुग्रहशक्ती होऊन, आपणच निर्माण केलेल्या त्या जाळ्यातून भाग्यवान जीवांना अलगद बाहेर देखील काढते ! हीच भगवती मग सरस्वती रूप धारण करून त्याच्या हृदयातील अज्ञान नष्ट करून तेथे आत्मज्ञानाचा अलौकिक प्रकाश करते.
' माया ' या शब्दातच त्याचा अर्थ आणि कार्य दोन्ही लपलेले आहे. " या मा सा माया " अशी मायेची व्याख्या करतात. जी अस्तित्वातच नाही ती माया ! रस्त्यात पडलेल्या दोराला अंधारात आपण साप समजून घाबरतो आणि प्रसंगी संकटातही पडतो. पण दिवा लावून पाहिले की आपला भ्रम नाहीसा होतो. साप मुळात तेथे कधी नव्हताच, होता तो सापाचा भास, तोही अंधारामुळे झालेला ! तसे मायेने निर्माण केलेल्या या जगात आपण ' मी आणि माझे ' या, आपणच निर्माण करून सतत पोसलेल्या प्रचंड मोठ्या भ्रमामुळे कायम सुख-दु:खांची अनुभूती घेत असतो. या मोहापायी निव्वळ कल्पनाच असणा-या सुख-दु:खांमध्ये आपण किती गुरफटलेलो आहोत, बापरे! बरं, हे सुख-दु:खांचे गणितही किती अवघड? यात एकाचे सुख हे नेहमीच दुस-याचे दु:ख ठरत असते. कसा निवाडा करणार आपण योग्य अयोग्याचा? या सुख-दु:खांना खरेतर आपलीच पूर्वकर्मे कारणीभूत होतात, हेच आपण विसरतो आणि आपल्या भोगांच्या कर्तृत्वाचा उगीचच दुस-या कोणावर तरी आरोप करीत बसतो. आजच्या आपल्या सुख-दु:खांना सर्वस्वी आपणच जबाबदार असतो, हे पक्के लक्षात ठेवायला हवे.
जेव्हा त्या श्रीजगदंबेची आपल्यावर कृपा होते, तेव्हा आपण वरीलप्रमाणे खोलात जाऊन विचार करायला लागतो आणि मग या सुख-दु:खांच्या चक्रातून कायमचे सुटण्यासाठी धडपड करू लागतो. याच स्थितीला शास्त्रांमध्ये ' मुमुक्षुता ' म्हणतात. मोक्षाची इच्छा म्हणजे मुमुक्षा!
अशी मुमुक्षुता आपल्यामध्ये निर्माण झाली की, आपोआपच आपण परमार्थाकडे वळतो, भजन- कीर्तन- प्रवचनाची व श्रीदासबोध, श्रीज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांची आपल्याला आवड निर्माण होते. पुढे भगवत्कृपेने योग्य सद्गुरूंची गाठ पडून त्यांची कृपा होऊन आपण साधना करू लागतो.
साधनेने मग आपले मूळचे आनंदमय स्वरूप आपल्याला अनुभवाला येते. हे सर्व ती भगवती जगदंबाच घडवून आणत असते. म्हणून तिच्या या परमकरुणामय मातृवात्सल्याचे सा-याच संतांनी भरभरून कौतुक केलेले पाहायला मिळते.
हीच जगन्माता आदिमाया जगदंबा भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या माध्यमातून जगदोद्धारासाठी 'श्रीज्ञानेश्वरी'च्या रूपाने अवतरली ! आज गेली साडेसातशे वर्षे या भगवती ज्ञानेश्वरीने अक्षरश: लाखो लोकांना सन्मार्गाला लावून, विशुद्ध परमार्थ देऊन अखंड सुखी केलेले आहे व पुढेही जगाच्या अंतापर्यंत हे कार्य अव्याहत चालूच राहील.  भगवान श्री माउलींची ज्ञानेश्वरी हा भगवती श्रीशारदेचा अतिशय विलक्षण व करुणामय अवतारच आहे !!
प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांनी आजन्म श्री माउलींची आणि ज्ञानेश्वरीची सेवा केली व अनेकांना या सेवेची गोडी लावली. ते म्हणत असत की, " जो कोणी माउलींना शरण जाऊन प्रेमाने आणि नेमाने ज्ञानेश्वरी व हरिपाठ दररोज वाचेल, किंवा नुसते यांचे स्मरण जरी करेल तरी त्याची सर्व काळजी माउली वाहतील, त्याला सुखरूप करून टाकतील ! " प. पू. काकांच्या या अमोघ शब्दांचा अनुभव हजारो लोकांनी आजवर घेतलेला आहे.
संतश्रेष्ठ जनाबाईंनी माउलींच्या या श्रीज्ञानेश्वरीची जगदंबेच्याच रूपात फार सुंदर स्तुती केलेली आहे. त्या म्हणतात,
भाव अक्षराची गाठी ।
ब्रह्मज्ञानाने गोमटी ॥१॥
ते हे माय ज्ञानेश्वरी ।
संतजनां माहेश्वरी ॥२॥
ज्ञानेश्वर मंगलमुनी ।
सेवा करी दासी जनी ॥३॥
ब्रह्मज्ञानरूप गोमटी अक्षरे प्रेमभावाचे सुरेख कोंदण ल्येऊन श्रीज्ञानेश्वरीच्या रूपाने अवतरलेली आहेत. तीच ही ज्ञानेश्वरी संतजनांसाठी भगवती माहेश्वरी आहे, भगवान महेश्वरांपासून चालत आलेली अक्षुण्ण श्रीगुरुपरंपराच आहे. जनांचे परम मंगल करणारे श्रीज्ञानेश्वर माउली हेच या परंपरेचे मुकुटमणी आहेत, म्हणून मी जनाबाई त्यांची व त्यांचेच स्वरूप असणा-या श्रीज्ञानेश्वरीची दासी बनून त्यांच्याच अविरत सेवेत मग्न  आहे.
नवरात्र हा वर्षातून एकदाच साजरा करण्याचा सोहळा नाही. नऊ दिवस पाट्या टाकल्याप्रमाणे उपासना केली व उरलेले वर्ष श्रीजगदंबेचे तोंडही नाही पाहिले; तर ती पुढच्या वर्षीच्या नवरात्रात आपल्याला ओळख तरी देईल काय? म्हणून नव-रात्र हे फक्त नऊ दिवसांचे न राहता पूर्ण जन्मभराचाच सोहळा व्हायला हवे. घट जरी आज उठले तरी त्या श्रीजगन्मातेबद्दल हृदयात निर्माण झालेली प्रेमाची वीण मात्र तशीच घट्ट राहायला हवी. घटाबरोबर ती उठता कामा नये. आणि मग त्याच प्रेमापोटी रोज नव-नवीन उत्साहाने हे नवरात्र साजरे झाले, तर आदिमाया श्रीभगवतीच्या अद्भुत कृपा विलासाची नवनवोन्मेषशालिनी अनुभूती आपल्याला निरंतर मिळाल्याशिवाय राहणार नाही ! असे साजरे करायला जमले तर तेच खरे नवरात्र होय ! पण हेही तिच्या कृपेशिवाय शक्य नाही.
ही प्रेमानुभूती सतत यावी असे वाटत असेल तर, भगवती श्रीज्ञानेश्वरी माउलीची, जशी जमेल तशी व जेवढी जमेल तेवढी, पण प्रेमादरपूर्वक सेवा दररोज व्हायलाच हवी. हा निर्धार करून प्रार्थना केली तर ती आई आपल्या लेकराची तहान-भूक भागवणार नाही का? माझ्या म्हणण्याचा विश्वास वाटत नसेल तर एकदा प्रार्थना करून प्रयत्न करून पाहा की. मला नक्की खात्री आहे श्री माउलींच्या जगावेगळ्या मातृवात्सल्याची, पुरेपूर आणि पक्की!
श्री माउलींच्या या मंत्रप्रतिपाद्य भगवती श्रीज्ञानदेवीवर सर्वांचा अढळ विश्वास व प्रेमादरपूर्वक श्रद्धा बसून तिची निरपेक्ष आणि निरंतर सेवा व सेवन करण्याची सद्-बुद्धी सर्वांना लाभो हीच यानिमित्ताने श्रीगुरुचरणीं कळकळीची प्रार्थना !

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

http://rohanupalekar.blogspot.in )⁠⁠⁠⁠


9 Oct 2016

*** आदिशक्तिचें कवतुक मोठें *** ** नवमोल्लास **

' दुर्गा ' म्हणजे जाणून घेण्यास, ओळखण्यास जी अत्यंत कठीण आहे अशी. दुर्ग नावाच्या दैत्याचा वध केला म्हणूनही श्रीजगदंबेला दुर्गा म्हटले जाते. भगवती श्रीदुर्गेच्या नऊ रूपांचे वर्णन पुराणांनी केलेले आहे. यांनाच नवदुर्गा म्हणतात. नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये त्यांची रोज एक याप्रमाणे उपासना केली जाते. आपण दररोज यांची थोडी माहिती घेतली. आज नवव्या माळेला नवदुर्गांची पुन्हा एकत्रित माहिती घेऊया.
१. *भगवती शैलपुत्री*
दक्षकन्या सतीने योगमार्गाने देहत्याग केल्यानंतर ती नगाधिराज हिमालय व मेनका या दांपत्याच्या पोटी ' पार्वती ' नावाने जन्माला आली. हिमालयाची कन्या म्हणून तिला ' शैलपुत्री ' म्हणतात.
२. *भगवती ब्रह्मचारिणी*
हिमालयसुता पार्वतीने भगवान शिवशंकरच पती म्हणून प्राप्त व्हावेत, यासाठी घोर तपश्चर्या केली होती. त्यामुळे तिला ' ब्रह्मचारिणी ' नावाने ओळखले जाते.
३. *भगवती चंद्रघंटा*
चंद्रघंटा म्हणजे चंद्राप्रमाणे शीतलता देणारी, आल्हाद देणारी. शरण आलेल्या भक्तांना सर्व प्रकारचे सुख प्रदान करणारी.
४. *भगवती कूष्माण्डा*
कूष्मांड म्हणजे कोहळा. या कोहळ्याचाच बळी देतात देवीच्या यज्ञांमध्ये. हा कोहळा जिला आवडतो ती कूष्माण्डा. दुसरा तात्त्विक अर्थ असा की, कूष्मांड हे एक प्रकारचे पिशाच असते व ते आभासी असते. यालाच Thought form असेही म्हणतात. माया ही अशीच भ्रामक व आभासी असते व ही श्रीजगदंबाच श्रीभगवंतांची मायाशक्ती असल्याने तिला ' कूष्माण्डा ' म्हणतात.
५. *भगवती स्कंदमाता*
स्कंद म्हणजे कार्तिकेय किंवा सनत्कुमार. त्यांची आई ती स्कंदमाता. ही पूर्ण प्रेमळ देवता आहे. शास्त्रामध्ये वर्णिलेले तिचे रूपही छान आहे. तिच्या हातात दोन कमळे व एक हात वरमुद्रेत असतो. एका हाताने तिने कार्तिकेयांना धरलेले असते. जगदंबेचे हे परम प्रेमळ मातृस्वरूप असल्याने तिच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. कार्तिकेयांना सहा मुखे असतात, तसेच आपण सर्व जीव; काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या सहा विकारांद्वारे व्यक्त होत असतो. अशा आपल्यासारख्या पापी, विकारी जीवांचाही सर्व बाजूंनी सांभाळ करणारी म्हणूनच ती जगदंबा स्कंदमाता म्हटली जाते.
६. *भगवती कात्यायनी*
कत नावाच्या ऋषींचे पुत्र कात्य, त्यांच्याच वंशात पुढे थोर ज्ञानी असे कात्यायन ऋषी झाले. त्यांची कात्यायन संहिता प्रसिद्ध आहे.  या ऋषींनी जगदंबेची कठोर तपश्चर्या करून तिला आपली मुलगी हो, म्हणून वर मागितला. तीच ही कात्यायनी. अनुत्तरभट्टारिका श्रीराधाजी व सर्व गोपींनी मिळून भगवान श्रीकृष्ण हे पतीरूपात लाभावेत यासाठी व्रजवनातील अधिष्ठात्री देवता भगवती कात्यायनीचे व्रत केले होते. प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज हे महिनाभर चालणारे व्रत मोठ्या प्रेमाने करीत असत.
७. *भगवती कालरात्री*
भगवान श्रीशिवांचे एक रूप काल म्हणजे मृत्यू, त्याची स्वामिनी ती कालरात्री. ही भगवान शिवशंकरांची संहारक शक्ती आहे. ही भक्तांचे सर्व प्रकारच्या भयांपासून संरक्षण करते.
८. *भगवती महागौरी*
अत्यंत गौरवर्णाची ती महागौरी. हीच भगवती पार्वती होय. गौर वर्ण हा शुद्धतेचे, पावित्र्याचे द्योतक आहे. नित्यपवित्र अशा विशुद्ध सत्त्वगुणाचे मूर्तिमंत रूप म्हणजे महागौरी होय.
९. *भगवती सिद्धिदात्री*
सिद्धी प्रदान करणारी किंवा भक्तांना उपासनेचे योग्य फळ देणारी ती सिद्धिदात्री होय.
या नऊ दुर्गांचे जो रोज स्मरण करतो, तो सर्व संकटांपासून सहज मुक्त होतो, असे मार्कंडेय पुराणात म्हटलेले आहे.
या नवदुर्गांशिवाय तंत्रशास्त्रांमध्ये श्रीजगदंबेच्या आणखी दहा रूपांची उपासना केली जाते. यांना ' दश महाविद्या ' असे म्हणतात. काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या दहा रूपांनी श्रीजगदंबा महाविद्या रूपाने जनांच्या कल्याणासाठी प्रकटलेली आहे. या महाविद्या अत्यंत प्रभावी असून भोग-मोक्षदायक आहेत. पण यांची उपासना अतिशय कठीण व कष्टदायक आहे. या सर्व महाविद्यांची पूर्वीच्या काळात आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर उपासना प्रचलित होती. यांची अनेक स्थाने देखील वैभवसंपन्न होती. या महाविद्यांची उपासना अत्यंत गुप्त राखलेली आहे. आज क्वचितच यांची शास्त्रशुद्ध उपासना अगदीच मोजक्या स्थानी होताना दिसते.
देवी भागवतामध्ये माता श्रीअंबेच्या अंश, अंशांश, कला आणि कलांश अशा अनेक रूपांचेही वर्णन केलेले पाहायला मिळते. त्यांमध्ये यच्चयावत सर्व स्त्रिया या श्रीआदिशक्तीच्या कलांशच असल्याने त्यांचा नेहमीच आदर करावा, सन्मानाने वागवावे, अन्यथा जगदंबेच्या रोषाला कारणीभूत व्हावे लागेल असे स्पष्ट म्हटलेले आहे !
भगवती श्रीजगज्जननीच सर्व चराचर सृष्टीच्या रूपाने नटलेली आहे. त्यामुळे आपल्याला दिसणारे, भासणारे, जाणवणारे व प्रत्ययाला येणारे यच्चयावत् सर्व विश्व हे तिचेच रूप आहे, त्यामुळे तिच्या अवतारांची संख्या करणे केवळ अशक्यच आहे !
परमकरुणामूर्ती भगवती श्रीजगदंबेची श्रीवैकुंठनिवासिनीच्या रूपामध्ये महापूजा बांधून भक्तांनी तिच्यासमोर मांडलेला वैष्णव गोंधळ, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज फार बहारीच्या शब्दांमध्ये सांगत आहेत. आज नवरात्रीच्या अष्टमी दिनी, नवव्या माळेला आपण त्याच गोंधळाद्वारे आदिमाया भगवती श्रीनारायणी मातेच्या श्रीचरणीं सादर वंदन करून तिच्याकडे ज्ञान, भक्ती व प्रेमाचा जोगवा मागूया आणि भगवती अंबामातेच्या उदोकारात दंग होऊया !!
सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो ।
पंच प्राण दिवटे दोनी नेत्रांचे हिल्लाळ वो ॥१॥
पंढरपुरनिवासे तुझे रंगीं नाचत असे वो ।
नवस पुरवी माझा मनींची जाणोनिया इच्छा वो ॥२॥
मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवनामाझारीं वो ।
चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥३॥
बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणे वो ।
उद्गारे गर्जती कंठीं तुळसीची भूषणे वो ॥४॥
स्वानंदाचे ताटी धूप दीप पंचारती वो ।
ओवाळिली माता विठाबाई पंचभूती वो ॥५॥
तुझे तुज पावले माझा नवस पुरवी आतां वो ।
तुका म्हणे राखे आपुलिया शरणागता वो ॥६॥

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in  )

8 Oct 2016

* आदिशक्तिचें कवतुक मोठें * अष्टमोल्लास * *



आज नवरात्राची आठवी माळ, पण तिथीने सप्तमीच आहे. रात्री अष्टमी असल्याने आजच अष्टमीचा महालक्ष्मी जागरही आहे. भगवती कालरात्रीची आज उपासना करतात. श्रीकालरात्री ही अनुल्लंघ्य अशा काळाचाही ग्रास करणारी, भगवान शिवांची एक शक्ती आहे. ती मृत्यूची अधिष्ठात्री देवता मानली जाते. तिचे रूप भयंकर आहे. तिचे वाहन गाढव असून ती हातात तीक्ष्ण खड्ग धारण करते. अंधारासारखा काळाकुट्ट रंग असलेल्या तिने आपले केस मोकळे सोडलेले असून, तिचे डोळे आग ओकल्यागत लाल आहेत. तिचे रूप जरी भेसूर असले तरी ती आपल्या भक्तांचे मात्र कायम कल्याणच करते.
केन उपनिषदामध्ये भगवती आदिशक्तीच्या " उमा " या विलक्षण अवताराचे फार सुंदर वर्णन आले आहे. एकदा देव-दानवांचे तुंबळ युद्ध झाले. त्यामध्ये परमात्म्याच्या कृपेने देवांचा विजय झाला. पण देवांना मात्र आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला. तो गर्व दूर करण्यासाठी परब्रह्म परमात्मा एका यक्षाच्या रूपाने त्यांच्यासमोर प्रकटले. ते यक्षरूप कोण आहे, हे जाणून घेण्याची देवांची इच्छा झाली. म्हणून मग प्रथम अग्निदेव त्याच्याकडे गेले व गर्वाने म्हणाले, " मला जातवेद म्हणतात, मी काहीही जाळू शकतो. " यक्षाने तेथेच पडलेली एक काडी उचलली आणि ती जाळून दाखवण्यास सांगितली. पण अग्नी काही त्या क्षुल्लक काडीला जाळू शकला नाही. कारण त्याचे सामर्थ्य यक्षरूपी परमात्म्याने आधीच काढून घेतले होते.
नंतर हीच गत वायुदेवाची झाली. तोही ती काडी सर्व सामर्थ्य पणाला लावूनही उडवून दाखवू शकला नाही. अशाप्रकारे सर्व देव पराभूत झाले. शेवटी इंद्र पुढे आला.
इंद्र समोर आल्याबरोबर तो यक्ष अदृश्य झाला आणि त्याच्याजागी एक अत्यंत देदीप्यमान आणि तेजस्वी अशी देवी प्रकटली. इंद्राने तिला वंदन करून विचारले की, " हे माते, तू कोण आहेस? तो यक्ष कोण होता? कुठे गेला? "
ती देवी उत्तरली, " इंद्रा, मी भगवती उमा आहे. मीच एखाद्या दो-यामध्ये मणी गुंफावेत त्याप्रमाणे ही अनेक ब्रह्मांडे स्वत: मध्ये धारण केलेली आहेत, म्हणूनच मला 'उमा' म्हणतात. मीच तुम्हा सर्वांचे सामर्थ्य असून, मीच या अनंत ब्रह्मांडांचा कारभार चालवते. तुम्ही देवता केवळ माझ्या हातातल्या बाहुल्या आहात, तुम्हांला काहीही स्वतंत्र सामर्थ्य नाही, तेव्हा फुकटचा गर्व बाळगू नका. तो यक्ष दुसरा-तिसरा कोणी नसून ते प्रत्यक्ष परब्रह्म होते. मीच त्या परब्रह्माची कार्यशक्ती आहे ! " त्यानंतर देवी उमेने इंद्राला तत्त्वज्ञानाचा उपदेश केला. ही भगवती उमाच परब्रह्माची आद्याशक्ती असून तीच सर्वश्रेष्ठही आहे.
श्रीजगदंबेचा आणखी एक अवतार म्हणजे 'योगमाया' ! भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा देवकीगर्भात प्रवेश केला, तेव्हाच त्यांच्या योगमायेने गोकुळात यशोदामातेच्या गर्भात प्रवेश केला. भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यावर, त्यांच्याच आज्ञेने श्रीवसुदेवांनी त्यांना गोकुळात नेऊन ठेवले व तेथे जन्मलेल्या योगमायेला ते मथुरेत घेऊन आले.
दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे कंसाने देवकीचे बाळ मारण्यासाठी त्याला पाय धरून उचलले, त्यासरशी ती आदिमाया त्याच्या हातून निसटली आणि आकाशात जाऊन कंसाला म्हणाली, " दुष्टा, तुझ्या पापाचा घडा आता भरलेला आहे. तुझा कर्दनकाळ गोकुळात वाढतोय, तो निश्चितच आणि लवकरच तुला मारेल !"
कंसाच्या हातून सुटलेली ती योगमाया पुढे विंध्य पर्वतावर जाऊन स्थिरावली आणि 'विंध्यवासिनी' नावाने प्रसिद्ध झाली. आजही मध्य भारतात विंध्य पर्वतावर तिचे मंदिर असून दर्शनासाठी अनेक भाविक तिथे आवर्जून जातात.
श्रीमद् देवी भागवतात एका ठिकाणी भगवान वेदव्यास देवीच्या नामाचे विलक्षण सामर्थ्य सांगताना म्हणतात की, " जगात एवढे मोठे पापच अस्तित्वात नाही की जे भगवती जगदंबेच्या नामासमोर टिकू शकेल. म्हणून जर एखाद्याने श्रीजगदंबेचे पावन नाम एकवार जरी प्रेमाने व श्रद्धेने घेतले, तरी तो सर्व पापांपासून क्षणात मुक्त होतो ! "
श्रीमद् देवी भागवताच्या नवव्या स्कंधामध्ये असे म्हटले आहे की, आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांच्या डाव्या भागापासून भगवती श्रीराधिकादेवी प्रकटल्या व परब्रह्माच्या त्या आदिप्रकृती श्रीराधादेवींपासूनच सर्वच्या सर्व देवीरूपे प्रकट झाली व नेहमीच होत असतात. म्हणून श्रीराधा-श्रीमाधव हेच जगाचे आदिजनिते आहेत. भगवान श्री माउली अमृतानुभवाच्या नमनात याच आदिदांपत्याला प्रेमभावे वंदन करतात,
ऐशीं हीं निरुपाधिकें ।
जगाचीं जियें जनकें ।
तियें वंदिलीं मियां मूळिकें ।
देवोदेवी ॥१॥
श्री माउली आपला स्वानुभव सांगतात की, शिव-शक्ती म्हणूनही ज्यांचे वर्णन केले जाते, तेच राधा-माधव हे जगाचे आदितत्त्व असून त्या निरुपाधिक दांपत्याला मी सादर वंदन करतो.
हेच आदिपुरुष-आदिमाया श्रीराधा-श्रीदामोदरांचे अलौकिकत्व आणि अभिन्नत्व आपल्या मराठी संतांनी स्वानुभवाने पूर्णपणे जाणून, सगुणब्रह्म भगवान श्रीपंढरीनाथांनाच देव-देवी अशा दोन्ही रूपांमध्ये एकाचवेळी वर्णिलेले-पूजिलेले आहे. भगवान पंढरीनाथांचे अंबामातेच्या, कृष्णाबाईच्या रूपात अप्रतिम असे वर्णन करून तिच्या लीलांचा गोंधळ मांडताना शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज म्हणतात,
स्वर्ग मृत्यु पाताळ त्याचा मंडप घातिला वो ।
चार वेदांचा फुलवरा बांधिला वो ।
शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडिला वो ॥१॥
उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माउलीचा हो ॥ध्रु.॥
जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती वो ।
अठ्यांयशी सहस्र ऋषी दिवटे तिष्ठती वो ।
तेहतीस कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती वो ॥२॥
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो ।
पुंडलिक दिवटा शोभे वाळुवंटी वो ।
एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटी वो ॥३॥
( या सर्व वर्णनाला साजेसे कोल्हापूरच्या श्रीअंबाबाईचे श्रीविठ्ठल रूपातील व पंढरपूरच्या श्रीरुक्मिणीमातेचे कृष्णरूपातील अलंकाराचेच सुंदर फोटो, हे त्यांचे अनादि अभिन्नत्व दाखवण्यासाठी आज मुद्दाम वापरलेले आहेत. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in  )


7 Oct 2016

*** आदिशक्तिचें कवतुक मोठें   *** ** सप्तमोल्लास **

आज नवरात्रीची सातवी माळ, पण तिथीने षष्ठी. आज भगवती कात्यायनी मातेचा उपासना दिवस. कत नावाच्या ऋषींनी तपश्चर्या करून देवीला प्रसन्न करून घेतले व तिला, " पुत्रीरूपाने माझ्या घरात राहा," असा वर मागितला. कत ऋषींची कन्या म्हणून श्रीजगदंबेला 'कात्यायनी' म्हणतात. आजचे सोडा, पण त्या प्राचीन काळी खास मुलगी व्हावी म्हणून ऋषी तपश्चर्या करीत असत भारतात !
भगवती कात्यायनी ही व्रजमंडलाची अधिष्ठात्री देवता आहे. महारासेश्वरी श्रीराधाजी व गोपींनी मिळून, भगवान श्रीकृष्णच पती म्हणून लाभावेत, यासाठी कात्यायनी व्रत केले होते, असा पुराणात उल्लेख आहे. आधुनिक काळातील थोर सत्पुरुष, प्रज्ञाचक्षू श्रीज्ञानेश्वरकन्या श्रीसंत गुलाबराव महाराज देखील हे ३३ दिवसांचे कात्यायनी व्रत मोठ्या समारंभाने करीत असत.
नवरात्रामध्ये षष्ठी किंवा सप्तमीला मूळ नक्षत्र असते. मूळ नक्षत्रावर भगवती श्रीसरस्वतीचे आवाहन करतात. दुस-या दिवशी पूर्वाषाढा नक्षत्रावर पूजन व तिस-या दिवशी उत्तराषाढा नक्षत्रावर सरस्वतीला बलिदान अर्पण करून मग श्रवण नक्षत्रावर तिचे विसर्जन करतात. हा उत्सव विशेषत: बंगाल प्रांतात साजरा होतो. आज मूळ नक्षत्र असल्याने आपणही भगवती श्रीसरस्वतीचे आवाहन करूया.
मूळ नक्षत्र तसे आपल्याकडे वाईटच मानतात. या नक्षत्रावर जन्म झालेले मूल आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत होते असे म्हटले जाते. यावरूनच " मुळावर येणे " असा वाक्प्रचार आपल्याकडे रूढ झालेला आहे. पण श्रीसरस्वतीचे आवाहन याच नक्षत्रावर करतात. यामागे काय संदर्भ असावा? याचे चिंतन  करताना सहज काही विचार सुचले. ही सरस्वती मूळ नक्षत्रावर प्रकट झाली की, आपल्याठायी अनंत जन्मांपासून वसणारे अज्ञान नष्ट करून ज्ञानाचा दीप लावते. म्हणजे ती अज्ञानाच्या मुळावर येते, असे म्हणायला हरकत नाही. म्हणूनच मुद्दाम तिचे मूळ नक्षत्रावर आवाहन करीत असावेत.
पुराणांमध्ये श्रीजगदंबेच्या पुण्यस्थानांच्या संदर्भात एक विशेष कथा येते. दक्ष प्रजापती हे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र, त्यांना सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवांनी आज्ञा केली. त्याप्रमाणे दक्षांनी भगवान मनूंच्या प्रसूती नावाच्या कन्येशी विवाह केला. त्यांना तिच्यापासून सोळा मुली झाल्या. त्यांपैकी तेरा मुलींचा विवाह धर्मदेवतेशी झाला. एक कन्या अग्नीला, एक पितृगणांना आणि ' सती ' नावाची कन्या श्मशानवासी भगवान शिवांना अर्पण केली.
दक्ष प्रजापतीला आपला हा जावई खरंतर कधीच आवडला नाही, त्यामुळे त्याने काही अपराध नसतानाही सतीशी देखील संबंध तोडले. पुढे एकदा दक्षाकडील यज्ञाच्या प्रसंगी दक्षांनी भगवान शिवांचा अपमान केला व त्यांना शाप दिला. हे ऐकून नंदीने दक्षाला शाप दिला. भृगू ऋषींनी नंदीला शाप दिला, अशाप्रकारे शिव व दक्ष यांचे संबंध पूर्णपणे बिघडले.
नंतर काही काळाने दक्षाने आणखी एक महायज्ञ सुरू केला, पण त्यात अधिकार असूनही श्रीशिवांना हविर्भाग देणे मुद्दामच बंद केले. शिवाय या यज्ञासाठी आपल्या सर्व कन्या-जावयांना बोलावले पण सतीला आमंत्रण दिले नाही. बिचा-या सतीला माहेरी जाण्याची ओढ लागली होती, म्हणून ती बोलावले नसतानाही आणि शिवशंभूंनी तिला, " जाऊ नकोस, अपमान होईल "; असे बजावलेले असूनही माहेरी गेलीच.
अपेक्षेप्रमाणे दक्षांनी तिचा भर यज्ञशाळेत अपमान केला. तो सहन न झाल्याने तिने तेथेच योगमार्गाने प्राण त्यागून यज्ञातच आपला देह भस्मसात् केला.
भगवान शिव हे वृत्त ऐकून संतप्त झाले आणि त्यांनी दक्षावर स्वारी करून त्याच्या यज्ञाचा विध्वंस केला व शिवगणांचा प्रमुख असणा-या वीरभद्राने दक्षाचे मुंडके छाटले.
त्यानंतर शिवांनी सतीचे ते अर्धवट जळालेले प्रेत खांद्यावर घेऊन विमनस्कपणे संपूर्ण भारतखंडात भ्रमण केले. श्रीशिवांच्या त्या विमनस्क स्थितीने चिंताक्रांत झालेल्या श्रीविष्णूंनी बाणाने सतीच्या देहाचे अनेक तुकडे केले व ते विविध ठिकाणी पडले. याच जागी आजची एकशेआठ शक्तिपीठे आहेत. काही ग्रंथांमध्ये एकावन्न शक्तिपीठे आहेत असेही म्हटले जाते. पण देवीभागवतात एकशे आठ सिद्धपीठांची व तेथील देवीची नावे दिलेली आहेत.
ही सर्व शक्तिपीठे अत्यंत प्रभावी असून भगवती श्रीजगदंबेची प्रत्यक्ष निवासस्थानेच आहेत. या सर्व स्थानांवर केलेली सेवा, साधना अनंत पटींनी फलद्रूप होते, असे श्रीदेवी भागवतामध्ये स्पष्ट म्हटलेले आहे.
आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी-सप्तश्रृंगी ही चारही श्रेष्ठ शक्तिपीठेच असून त्यांचा देवीभागवतामध्ये उल्लेख आहे. पण या एकशे आठ पीठांच्या यादीमध्ये फक्त कोल्हापूर व माहूर याच दोन पीठांची गणना होते. एकावन्न पीठांच्या यादीत कोल्हापूर व पंचवटी-नाशिक ही पीठे येतात.
कोल्हापूर, तुळजापूर, माहूर व वणी यांना महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे म्हणतात. वणीची सप्तश्रृंगी हे अर्धपीठ मानतात. अर्धपीठ किंवा पूर्णपीठ असा फरक तेथील देवीतत्त्वामुळे झालेला नाही. ही सर्वच पूर्णपीठे आहेत. ॐकाराच्या साडेतीन मात्रा असतात, त्यानुसार ही साडेतीन पीठांची गणना केलेली आहे. म्हणजे ॐकार जसा परब्रह्माचे प्रकट शब्दरूप आहे, तशी ही पीठे श्रीजगदंबेचे साक्षात् अधिष्ठानच आहेत. यात कमी जास्त वगैरे काहीही भेद नाहीत, हे आपण नीट लक्षात ठेवायला हवे.
आज नवरात्राच्या सातव्या माळेला भक्तश्रेष्ठ श्रीनामदेवरायांनी केलेल्या पंढरीच्या विठाई माउलीच्या अभंगरूपी पूजेच्या माध्यमातून आपण भगवती श्रीजगदंबेच्या चरणीं वंदन करूया !!
सद्गुरु श्रीनामदेव महाराज येथे आपल्या सद्गुरु श्रीविसोबा खेचर महाराजांचाच श्रीजगदंबेच्या, विठाईमाउलीच्या रूपात उल्लेख करीत आहेत व त्यांच्या श्रीचरणांच्या दर्शनाची, त्यांच्या भेटीची आपली तीव्र ओढही व्यक्त करीत आहेत.
वाजविली डांक चौक ठेवियला वो ।
ठायी पंढरीचे विठ्ठले तुज हाकारा केला वो ॥१॥
रंगा येई वो खेचरे विठाई सुंदरी वो ।
तुझीं पाउलें गोजिरीं कैं मी दृष्टी देखेन वो ॥२॥
पाजळला दीपू फिटला अंधकारू वो ।
न लावा उशीरू पांडुरंगे माउलीये वो ॥३॥
तमोगुणाचा रज जाळुनी धूप केला वो ।
उशीरू का लाविला पांडुरंगे माउलीये वो ॥४॥
तनुमनाची मूद टाकीन तुजवरोनी वो ।
वैकुंठवासिनी पांडुरंगे माउलीये वो ॥५॥
अहंकार दैवतें झडपिले नामयासी वो ।
येऊनिया रंगासी रंग राखीं आपुला वो ॥६॥

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

* आदिशक्तिचें कवतुक मोठें * * षष्ठोल्लास *



आज नवरात्रीची सहावी माळ, पण तिथीने पंचमीच आहे. नवदुर्गांपैकी भगवती स्कंदमाता ही आजची देवता आहे. स्कंद म्हणजे कार्तिकेय. तसेच छांदोग्य उपनिषदामध्ये भगवद्भक्त सनत्कुमारांना स्कंद म्हटले आहे. म्हणून या थोर महात्मे असणा-या सनत्कुमारांची व देवसेनापती कार्तिकेयांची माता म्हणून श्रीजगदंबेला स्कंदमाता म्हटले जाते. भगवती स्कंदमातेच्या रूपाचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. अहो, ती तर आई आहे ना, तिचे परमप्रेम हेच तिचे अस्त्र, शस्त्र, सर्वकाही आहे. ती त्याच्या बळावरच सर्वांना आपलेसे करून घेते. आईला अन्य शस्त्राची गरजच काय?
भगवती जगदंबा मातेच्या महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तीन मुख्य रूपांनी विश्वाचा सर्व कारभार संपन्न होतो. विश्वाचे सृजन, पालन व संहार ही तिन्ही कार्ये या तीन रूपांच्या माध्यमातून भगवती जगदंबा करीत असते. याच रूपांमधून पुढे दुर्ग दानवाला मारण्यासाठी दुर्गा, महिषासुराला मारण्यासाठी महिषासुरमर्दिनी, दुष्काळातून प्रजेला वाचवण्यासाठी शाकंभरी, तसेच नंदा, चंडिका, रक्तदंतिका, कालिका इत्यादी विविध अवतार धारण करून वेळोवेळी जगन्मातेने भक्तरक्षणाचे, भक्तोद्धाराचे कार्य संपन्न केलेले आहे.
श्रीक्षेत्र माहूर येथे भगवती श्रीरेणुकामातेचे स्थान आहे. तेथेच जवळ भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंचेही निद्रास्थान आहे. या भगवती श्रीरेणुकामातेची कथा मोठी विलक्षण आहे.
भगवान शिवांच्या अंशाने जमदग्नी ऋषी जन्मले तर भगवती पार्वतीच्या अंशाने रेणुकराजाच्या पोटी रेणुकामाता जन्मली. यथावकाश त्यांचा विवाह झाला. त्यांना वसुमंत, वसु, सुषेण आणि विश्वावसु असे चार पुत्र झाले. त्यानंतर प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी आपला सहावा अवतार जो परशुराम, तो या अवतारी दांपत्याच्या पोटी धारण केला. जमदग्नी ऋषी हे महान तपस्वी असले तरी ते अत्यंत क्रोधी म्हणूनही प्रसिद्ध होते.
एकदा रेणुकामाता पाणी भरण्यासाठी नदीवर गेलेली होती. तेथे एक गंधर्वराजा आपल्या अनेक स्त्रियांसहित जलक्रीडा करीत असलेला पाहून ती क्षणभर घोटाळली. रेणुकामाता महापतिव्रता असूनही, दैवयोगाने आपली परपुरुषावर नजर गेली, याचे खूप वाईट वाटून ती त्वरित  आश्रमात परतली. पण तेथे पोचण्यापूर्वीच तिचे हे कृत्य मुळात अत्यंत कोपिष्ट अशा जमदग्नींनी जाणले व तिचा तिरस्कार करीत ते तिच्यावर प्रचंड रागावले. त्या रागाच्या भरात त्यांनी आपल्या वसुमंत पुत्राला आपल्या आईचाच शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. त्याने तसे करण्यास असमर्थता दाखवल्याने जमदग्नींनी त्याला क्षणात जाळून भस्म केले. तीच गती इतर तिघांचीही झाली.
तेवढ्यात समिधांसाठी जंगलात गेलेले श्रीपरशुराम परत आले. त्यांना सगळा वृत्तांत सांगून जमदग्नींनी आईचा शिरच्छेद करण्यास सांगितले. त्यांना आपल्या पित्याच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असल्याने, कोणतीही शंका मनात न आणता त्यांनी श्रीरेणुकामातेचा शिरच्छेद केला. ते पाहून प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी ' वर माग ' म्हटल्यावर बुद्धिमान परशुरामांनी, आपले भाऊ आणि आई जिवंत व्हावी व त्यांना या कटू प्रसंगाची काहीच स्मृती नसावी, असा विलक्षण वर मागितला. जमदग्नींच्या कृपेने जणू काही घडलेच नाही, असे सगळे जिवंत झाले.
काही काळानंतर महापराक्रमी कार्तवीर्यराजाने एकदा जमदग्नींच्या आश्रमाला भेट दिली. त्यावेळी ऋषींनी आपल्या कामधेनूच्या साह्याने सर्वांचा आदरसत्कार केला. तिचे हे अद्भुत सामर्थ्य पाहून राजाने ती कामधेनूच मागितली. ती ऋषींची होमधेनू असल्याने त्यांनी देण्यास नकार दिला. म्हणून राजाने बळजबरीने ती गाय पकडून आपल्या सोबत नेली.
श्रीपरशुराम वनातून आल्यावर त्यांना हा वृत्तांत कळला, त्यांनी उद्दामपणे वागलेल्या  कार्तवीर्यार्जुनाशी युद्ध करून त्याचा वध केला. कार्तवीर्यार्जुन हे प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तप्रभूंचेच अलौकिक अधिकारसंपन्न शिष्य होते. त्यांनी स्वत:च श्रीदत्तप्रभूंना, तुमच्यासारख्या थोराच्याच हातून मला रणांगणावर मृत्यू यावा, अशी प्रार्थना केलेली होती. म्हणून भगवान परशुरामांना समोर पाहिल्यावर ते खरेतर समाधान पावले व शांतपणे त्यांच्या हातून त्यांनी मृत्यू स्वीकारला. पण हे पाहून राजाच्या मुलांनी परशुरामांशी युद्ध करायचे ठरवून पुन्हा हल्ला केला. पण ते आश्रमात नाहीत हे पाहून अविचाराने जमदग्नींचाच वध केला. त्यांचे हे पापकृत्य पाहून भगवान श्रीपरशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वीवरील अशा अधर्माने वागणा-या सर्व क्षत्रिय राजांचा वध करून, त्यांच्या रक्ताने भरलेल्या तळ्यांतील जलाने आपल्या पित्याला तिलांजली देण्याची प्रतिज्ञा केली. हेच भगवान श्रीविष्णूंच्या श्रीपरशुराम अवताराचे मुख्य कार्यच होते.
या जमदग्नींच्याबरोबर रेणुकामाता सती गेल्या, त्यावेळी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंनीच सर्व क्रियाकर्म पार पाडले. नंतर परशुरामांना आत्मज्ञानाचा व श्रीविद्येचा उपदेश केला व त्यांच्या प्रतिज्ञेसाठी आशीर्वाद दिले. हा प्रसंग घडला माहूरच्या डोंगरावर. त्यानंतर श्रीदत्तप्रभूंनी, आई वडलांच्या विरहाने व्याकूळ झालेल्या श्रीपरशुरामांना त्यांच्या आई-वडिलांचे ख-या रूपात, अर्थात् शिवपार्वती रूपात दर्शन करविले. नेमके त्यावेळी पुत्रवात्सल्याने जमिनीतून रेणुकामातेचे शिर बाहेर आले व त्या मुखाने तिने आपल्या लाडक्या परशुरामांचे चुंबन घेतले. माहूर येथे आजमितीस याच स्वयंभू श्रीरेणुका-मुखाची पूजा होते. माहूर हे महाराष्ट्रातील श्रीजगदंबेच्या साडेतीन पीठांपैकी एक पीठ आहे.
भगवान श्रीदत्तप्रभूंच्या अमोघ आशीर्वादांच्या बळावर, श्रीपरशुरामांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून, पापक्षालनार्थ महायज्ञ केला. यावेळी युद्धात जिंकलेल्या संपूर्ण पृथ्वीचे कश्यपऋषींना दान केले. नंतर स्वत:ला राहण्यासाठी कोकण किनारपट्टीचा भाग समुद्राकडून मागून घेतला व तेथे राहू लागले. भगवान परशुरामांचे ते निवासस्थान चिपळूण जवळ लोटे गावी आहे. प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी आपल्या " श्रीदत्तमाहात्म्य " या अलौकिक ग्रंथात हे सर्व श्रीरेणुका-परशुराम चरित्र सविस्तर व सुंदर पद्धतीने सांगितलेले आहे.
श्रीरेणुकामाता ही अत्यंत मातृवत्सल मानली जाते. तिची भक्ती फार सोपी आहे. तिला मोठी पूजा नको की भरमसाठ उपचार नकोत, नैवेद्य नको की बळी नको. असले तिला काहीच लागत नाही. बालकवत् प्रेमाने एखाद्याने तिला नुसते ' आई ' म्हटले, तरी ती तत्काळ प्रसन्न होऊन आपला कृपाप्रसाद त्या भक्ताला बहाल करते. माहूर येथील थोर रेणुकाभक्त कविश्रेष्ठ विष्णुदास म्हणूनच आपल्या एका पदात म्हणतात, " रेणुके तुजला आई म्हणणे पुरे ।"
श्रीरेणुका रूपाचेही एक फार मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तिने कोणतेही आयुध धारण केलेले नाही. श्रीजगदंबेच्या इतर सर्व रूपांमध्ये काही ना काही आयुध, शस्त्र आहेच व तिने कोणा ना कोणा राक्षसाचा वध केलेलाच आहे. पण रेणुकामाता ही सर्वार्थाने ' आई ' आहे. प्रेम हेच तिचे शस्त्र व तोच तिचा जगातील सर्वश्रेष्ठ, मौल्यवान दागिना देखील ! आजची देवता श्रीस्कंदमाता व श्रीरेणुकामाता यांचे हे समान वैशिष्ट्य आहे.
या भगवती श्रीरेणुकामातेचे पूर्ण कृपांकित भक्त व प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे उत्तराधिकारी, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या कुळात आजवर भगवती रेणुकामातेची कृपा झालेले अनेक भक्त होऊन गेलेले आहेत. पू. श्री. दादांनाही बालपणातच श्रीरेणुका मातु:श्रींचे अद्भुत दर्शन लाभले होते. आजच्या लेखासोबत श्रीरेणुकाआईचे जे छायाचित्र दिलेले आहे, ते माहूरच्या श्री.विष्णुदासांनी त्यांना झालेल्या दिव्य दर्शनानुसार स्वत:च चितारलेले आहे. अगदी त्याच रूपात प. पू. दादांनाही श्रीरेणुकाभगवतीचे दर्शन झाले होते. त्यांच्याही नित्यपूजेत त्यामुळे असेच एक देखणे तैलचित्र आहे. लेखासोबतच्या या चित्राचे डोळे पाहा, वात्सल्यप्रेमाने नुसते ओसंडून वाहत आहेत; ते पाहिल्याक्षणी रेणुकाआईच्या प्रेमकुशीत विसावण्याची आपल्यालाही अनावर ओढ लागली नाही तरच नवल !
पू. श्री. शिरीषदादांनी आपल्या एका अभंगात, त्यांना माहूरगडावर झालेल्या श्रीरेणुकामातेच्या अलौकिक दर्शनाचे सुरेख वर्णन केलेेले आहे. त्याच अभंगाद्वारे आज नवरात्राच्या सहाव्या माळेला, करुणावरुणालय जगज्जननी, जगन्माता श्रीरेणुकाभगवतीच्या श्रीचरणीं आपणही प्रेमादराने ही भावसुमनांजली अर्पून कृपायाचना करूया !!
मूळपीठवासिनी, दैत्यमहिषमर्दिनी ।
त्रिभुवनांची स्वामिनी, उभी माय रेणुका ॥१॥
देव वृंद पूजिता, भक्तस्नेह गर्विता ।
वरद सिद्ध सेविता, उभी माय रेणुका ॥२॥
मंद हास्य मोहिनी, सकल ताप नाशिनी ।
प्रेमनीर लोचनी, उभी माय रेणुका ॥३॥
स्मर्तृगामी पातली, अमृतेसी भेटली ।
परशुराम साउली, उभी माय रेणुका ॥४॥

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )⁠⁠⁠⁠