22 Oct 2016

जाला गवसणी गुरुभक्तीसी


आज आश्विन कृष्ण सप्तमी, परम आदर्श श्रीगुरुभक्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् नृसिंह सरस्वती ( दीक्षित) स्वामी महाराजांची पुण्यतिथी !!
प. प. श्री. दीक्षित स्वामी हे पंचम श्रीदत्तावतार प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांचे स्वनामधन्य शिष्योत्तम होत. प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी संपूर्ण हयातीत केवळ श्री. दीक्षित स्वामींनाच संन्यासदंडदीक्षा दिलेली होती; तेही त्यांची तीव्र परीक्षा पाहून. श्री. दीक्षितस्वामींनी प. प. श्री. थोरल्या महाराजांना रात्री निजताना आपल्याला दंड देण्याची प्रार्थना केली. पण श्री. स्वामी महाराज म्हणाले, आम्हांला आज्ञा नाही, इतर कोणाकडून दंड घ्यावा. असे म्हणून श्री. थोरले महाराज छाटी पांघरून झोपून गेले. त्यांच्या पायाशी उभे राहिलेले श्री. दीक्षितस्वामी डोळ्यांतून अश्रू गाळत तसेच उभे होते. पहाटे श्रीगुरुमहाराजांना जाग आली तर, रात्री जसे श्री. दीक्षितस्वामी उभे होते, तसेच उभे होते, खाली मान घालून, अविचल व अडीग. आपल्या शिष्याची दृढ निष्ठा पाहून श्रीगुरु महाराजांनी सुहास्य वदनाने विचारले, " स्वामी, तुम्ही अजून तसेच उभे आहात? जा, तयारी करा दंडदानाची ! " श्री. दीक्षित स्वामींनी प्रेमभराने गुरुचरणांवर दंडवत घालून अश्रूंचा अभिषेक केला. पुढे वाडीतच दंडदान झाले व नारायण दीक्षितांचे श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज झाले. त्यांना वाडीत राहूनच उपासना चालविण्याची गुरुआज्ञा झाली, जी त्यांनी मनापासून पाळली.
प. प. श्री. दीक्षितस्वामी हे श्रीनृसिंहवाडीचे राहणारे व त्याकाळात बी. ए पर्यंत शिक्षण घेतलेले होते. त्यांचा परमार्थ अधिकार फार मोठा होता. ते प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांचे लीलासहचरच होते व कार्यासाठीच त्यांच्यासोबत अवतरलेले होते.
श्रीगुरुभक्तीचा परम आदर्श म्हणजे श्री. दीक्षित स्वामी !! प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराज कायम त्यांच्या विलक्षण गुरुसेवेचे कौतुक करीत व त्यांना खूप मानही देत असत. शेवटच्या गरुडेश्वर वास्तव्यात श्री. ब्रह्मानंद तीर्थ स्वामींना श्री. थोरल्या महाराजांनी जीवन्मुक्तीची लक्षणे शिकवून त्यांचा अभ्यासही करवून घेतला होता. त्यावेळीच त्यांनी सांगितले, " स्वामी, आपण कधी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला गेला आहात काय? नसाल तर एकदा जरूर जा. तेथे आपणांस शिकविलेल्या जीवन्मुक्त लक्षणांची साक्षात् मूर्तीच आम्ही स्थापन करून ठेवलेली आहे. ते  तेथीलच आहेत, पण त्यांना कोणी ओळखत नाही. आमच्यापेक्षाही ते काकणभर अधिक आहेत !" आपल्या शिष्याविषयी एवढे गौरवोद्गार, तेही प्रत्यक्ष श्रीमत् टेंब्येस्वामींसारख्या श्रीदत्तस्वरूपाने काढणे, हे सोपे नाही. यातच श्री. दीक्षितस्वामींचा अद्भुत अधिकार दिसून येतो. त्यांचे चरित्रही अगदी श्री. टेंब्येस्वामींसारखेच विलक्षण आणि सुंदर आहे.
एकदा प्रत्यक्ष सूर्यचंद्रादी नवग्रह मनुष्यरूप घेऊन त्यांच्या दर्शनाला आले व त्यांनी प्रार्थना केली की, " उद्या पासून तुम्हाला शनीची साडेसाती सुरू होणार आहे. तरी आपली त्यासाठी परवानगी असावी. " त्यावर ते शांतपणे म्हणाले, " आपण आपले कार्य करावे. आमची काही हरकत नाही. " दुस-याच दिवशी त्यांच्यावर वाडीच्या पुजा-यांनी चोरीचा आळ घेतला आणि वाडी सोडून जाण्यास फर्मावले. ज्या वाडीत त्यांना प्रत्यक्ष देवांइतका मान होता, तिथेच त्यांच्यावर खोटा आळ लावला गेला. त्यांच्या चित्तात प्रारब्धवशात् आलेल्या या बालंटाने कसलेही तरंग उठले नाहीत, ते पूर्ण स्थितप्रज्ञच होते. हीच देवांची इच्छा समजून ते वाडीतून कृष्णेच्या समोरील तीरावरील औरवाड येथे जाऊन राहिले. तेथे त्यांनी श्रीदत्तामरेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या प्रसाद पादुका स्थापून " श्रीवासुदेवानंद सरस्वती पीठ " निर्माण केले.
प. प. श्री. टेंब्येस्वामी आपल्या प्रत्येक नवीन ग्रंथाची हस्तलिखित प्रत प. प. श्री. दीक्षितस्वामींनाच पाठवत असत, एवढे त्यांचे आपल्या या पट्टशिष्यावर प्रेम होते. त्यांचा व दीक्षित स्वामींचा झालेला पत्रव्यवहारही फार सुंदर असून पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. श्री. दीक्षित स्वामींनी लिहिलेला ' गुरुशिष्य संवाद ' हा आवर्जून वाचावा असा प्रश्नोत्तररूप अप्रतिम लघुग्रंथही त्यांनीच प्रकाशित केलेला आहे.
श्री. दीक्षितस्वामींनी प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या आज्ञेनुसार भरपूर भ्रमंती करून वैदिक धर्माचा विकास केला. हजारो लोकांना श्रीदत्तभक्तीला लावले. अनेकांना अडचणींतून सहज सोडविले. तेही अत्यंत प्रेमळ, उदार व कोमल अंत:करणाचे होते. त्यांच्या रचनाही मनोहर आहेत. प. प. श्री. टेंब्येस्वामींची त्यांनी रचलेली " जय जय श्रीमत् गुरुवर स्वामिन् परमात्मन हंसा । " ही संस्कृत आरती तर अतीव प्रासादिक आहे.
अखंड गुरुभजनात, गुरुसेवेत रममाण झालेल्या या थोर अवतारी सत्पुरुषाने शरयू नदीच्या तीरावरील अयोध्या नगरीत नश्वर देहाचा त्याग केला. " आम्ही संपूर्ण जग फिरलो पण श्रीनृसिंह सरस्वतींसारखा ज्ञानाला सुपात्र व परम गुरुभक्त शिष्य दुसरा पाहिला नाही ! " असे प्रशंसोद्गार ज्यांच्याबद्दल साक्षात् भगवान श्री. टेंब्येस्वामींनी काढले, त्या थोर सत्पुरुष प. प. श्री. नृसिंह सरस्वती ( दीक्षित)  स्वामी महाराजांचा कीर्तिसुगंध व पावन नाम पृथ्वीच्या अंतापर्यंत श्रीदत्त संप्रदायामध्ये अजरामर राहणार आहे; अगदी ' या सम हा ' असे !
आज त्यांच्या पुण्यतिथीच्या पुण्यपर्वावर, प. प. श्रीमत् नृसिंह सरस्वती ( दीक्षित ) स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत घालून, सर्वांसाठी श्रीगुरुभक्तीचाच आशीर्वाद त्यांना मागूया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

12 comments:

  1. धन्यवाद.उत्तम.

    ReplyDelete
  2. अतिशय ऊद्बबोधक माहिती धन्यवाद

    ReplyDelete
  3. श्री दीक्षित स्वामीमहाराजांचे दर्शन वाडीला घेतलेय..अनेकदा . पण ही माहिती नव्हती,..धन्यवाद

    ReplyDelete
  4. पुन्हा एक दिव्य संताची आनंदमय भेट। अवरूद्ध कंठ आणि अश्रू त्यांच्या कृपेची पावती देत आहेत।
    शतशः आभार।

    ReplyDelete
  5. प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं मनोभावे दंडवत!

    ReplyDelete
  6. एव्हडा मोठा सत्पुरुष ! ! ! शतशः दंडवत !

    ReplyDelete
  7. प. प. श्रीमत् नृसिंह सरस्वती ( दीक्षित ) स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत ||

    ReplyDelete
    Replies
    1. प.प. दीक्षित स्वामी महाराजांच्या चरणी सादर प्रणाम एवंम दंडवत...

      Delete
  8. आपल्या मुळे आम्हाला अनेक अप्रसिद्ध परंतु अधिकारी संत सत्पुरुषांची माहिती उपलब्ध होते, आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद

    ReplyDelete
  9. धन्यवाद

    ReplyDelete
  10. धन्यवाद दादा. खूप छान लेख

    ReplyDelete
  11. गुरुदेव दत्त

    ReplyDelete