10 Oct 2016

* आदिशक्तिचें कवतुक मोठें * * दशमोल्लास *

आज नवरात्राची दहावी माळ, यंदा तिथीच्या वृद्धीमुळे नवरात्र दहा दिवसांचे झाले. आज आश्विन शुद्ध नवमी, नवरात्रोत्थापन !
गेले नऊ दिवस आपण आदिशक्ती जगत्रयजननी भगवती श्रीजगदंबेच्या अद्भुत स्वरूपाचे, विविध अवतारांचे तसेच अलौकिक कार्याचे यथामती गुणवर्णन आईसाहेबांच्याच कृपेने करीत आहोत. पराम्बिका आदिशक्ती हीच सर्व विश्वाची जननी असल्याने तिच्या रूपांना, अवतारांना मितीच नाही. तिच्या अक्षरश: हजारो अवतारांचे आणि अपूर्व-मनोहर लीलांचे वर्णन पुराणांनी केलेले आहे.
भगवती जगदंबा माता ही जशी वैष्णवी माया बनून जगाची निर्मिती करते आणि विनोदाने खेळ खेळावा तसे परमआनंदमय अशा शिवांचा जीव करून त्याला नाना कर्मांच्या कचाट्यात गोवते; तशीच ती श्रीभगवंतांची अनुग्रहशक्ती होऊन, आपणच निर्माण केलेल्या त्या जाळ्यातून भाग्यवान जीवांना अलगद बाहेर देखील काढते ! हीच भगवती मग सरस्वती रूप धारण करून त्याच्या हृदयातील अज्ञान नष्ट करून तेथे आत्मज्ञानाचा अलौकिक प्रकाश करते.
' माया ' या शब्दातच त्याचा अर्थ आणि कार्य दोन्ही लपलेले आहे. " या मा सा माया " अशी मायेची व्याख्या करतात. जी अस्तित्वातच नाही ती माया ! रस्त्यात पडलेल्या दोराला अंधारात आपण साप समजून घाबरतो आणि प्रसंगी संकटातही पडतो. पण दिवा लावून पाहिले की आपला भ्रम नाहीसा होतो. साप मुळात तेथे कधी नव्हताच, होता तो सापाचा भास, तोही अंधारामुळे झालेला ! तसे मायेने निर्माण केलेल्या या जगात आपण ' मी आणि माझे ' या, आपणच निर्माण करून सतत पोसलेल्या प्रचंड मोठ्या भ्रमामुळे कायम सुख-दु:खांची अनुभूती घेत असतो. या मोहापायी निव्वळ कल्पनाच असणा-या सुख-दु:खांमध्ये आपण किती गुरफटलेलो आहोत, बापरे! बरं, हे सुख-दु:खांचे गणितही किती अवघड? यात एकाचे सुख हे नेहमीच दुस-याचे दु:ख ठरत असते. कसा निवाडा करणार आपण योग्य अयोग्याचा? या सुख-दु:खांना खरेतर आपलीच पूर्वकर्मे कारणीभूत होतात, हेच आपण विसरतो आणि आपल्या भोगांच्या कर्तृत्वाचा उगीचच दुस-या कोणावर तरी आरोप करीत बसतो. आजच्या आपल्या सुख-दु:खांना सर्वस्वी आपणच जबाबदार असतो, हे पक्के लक्षात ठेवायला हवे.
जेव्हा त्या श्रीजगदंबेची आपल्यावर कृपा होते, तेव्हा आपण वरीलप्रमाणे खोलात जाऊन विचार करायला लागतो आणि मग या सुख-दु:खांच्या चक्रातून कायमचे सुटण्यासाठी धडपड करू लागतो. याच स्थितीला शास्त्रांमध्ये ' मुमुक्षुता ' म्हणतात. मोक्षाची इच्छा म्हणजे मुमुक्षा!
अशी मुमुक्षुता आपल्यामध्ये निर्माण झाली की, आपोआपच आपण परमार्थाकडे वळतो, भजन- कीर्तन- प्रवचनाची व श्रीदासबोध, श्रीज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांची आपल्याला आवड निर्माण होते. पुढे भगवत्कृपेने योग्य सद्गुरूंची गाठ पडून त्यांची कृपा होऊन आपण साधना करू लागतो.
साधनेने मग आपले मूळचे आनंदमय स्वरूप आपल्याला अनुभवाला येते. हे सर्व ती भगवती जगदंबाच घडवून आणत असते. म्हणून तिच्या या परमकरुणामय मातृवात्सल्याचे सा-याच संतांनी भरभरून कौतुक केलेले पाहायला मिळते.
हीच जगन्माता आदिमाया जगदंबा भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या माध्यमातून जगदोद्धारासाठी 'श्रीज्ञानेश्वरी'च्या रूपाने अवतरली ! आज गेली साडेसातशे वर्षे या भगवती ज्ञानेश्वरीने अक्षरश: लाखो लोकांना सन्मार्गाला लावून, विशुद्ध परमार्थ देऊन अखंड सुखी केलेले आहे व पुढेही जगाच्या अंतापर्यंत हे कार्य अव्याहत चालूच राहील.  भगवान श्री माउलींची ज्ञानेश्वरी हा भगवती श्रीशारदेचा अतिशय विलक्षण व करुणामय अवतारच आहे !!
प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांनी आजन्म श्री माउलींची आणि ज्ञानेश्वरीची सेवा केली व अनेकांना या सेवेची गोडी लावली. ते म्हणत असत की, " जो कोणी माउलींना शरण जाऊन प्रेमाने आणि नेमाने ज्ञानेश्वरी व हरिपाठ दररोज वाचेल, किंवा नुसते यांचे स्मरण जरी करेल तरी त्याची सर्व काळजी माउली वाहतील, त्याला सुखरूप करून टाकतील ! " प. पू. काकांच्या या अमोघ शब्दांचा अनुभव हजारो लोकांनी आजवर घेतलेला आहे.
संतश्रेष्ठ जनाबाईंनी माउलींच्या या श्रीज्ञानेश्वरीची जगदंबेच्याच रूपात फार सुंदर स्तुती केलेली आहे. त्या म्हणतात,
भाव अक्षराची गाठी ।
ब्रह्मज्ञानाने गोमटी ॥१॥
ते हे माय ज्ञानेश्वरी ।
संतजनां माहेश्वरी ॥२॥
ज्ञानेश्वर मंगलमुनी ।
सेवा करी दासी जनी ॥३॥
ब्रह्मज्ञानरूप गोमटी अक्षरे प्रेमभावाचे सुरेख कोंदण ल्येऊन श्रीज्ञानेश्वरीच्या रूपाने अवतरलेली आहेत. तीच ही ज्ञानेश्वरी संतजनांसाठी भगवती माहेश्वरी आहे, भगवान महेश्वरांपासून चालत आलेली अक्षुण्ण श्रीगुरुपरंपराच आहे. जनांचे परम मंगल करणारे श्रीज्ञानेश्वर माउली हेच या परंपरेचे मुकुटमणी आहेत, म्हणून मी जनाबाई त्यांची व त्यांचेच स्वरूप असणा-या श्रीज्ञानेश्वरीची दासी बनून त्यांच्याच अविरत सेवेत मग्न  आहे.
नवरात्र हा वर्षातून एकदाच साजरा करण्याचा सोहळा नाही. नऊ दिवस पाट्या टाकल्याप्रमाणे उपासना केली व उरलेले वर्ष श्रीजगदंबेचे तोंडही नाही पाहिले; तर ती पुढच्या वर्षीच्या नवरात्रात आपल्याला ओळख तरी देईल काय? म्हणून नव-रात्र हे फक्त नऊ दिवसांचे न राहता पूर्ण जन्मभराचाच सोहळा व्हायला हवे. घट जरी आज उठले तरी त्या श्रीजगन्मातेबद्दल हृदयात निर्माण झालेली प्रेमाची वीण मात्र तशीच घट्ट राहायला हवी. घटाबरोबर ती उठता कामा नये. आणि मग त्याच प्रेमापोटी रोज नव-नवीन उत्साहाने हे नवरात्र साजरे झाले, तर आदिमाया श्रीभगवतीच्या अद्भुत कृपा विलासाची नवनवोन्मेषशालिनी अनुभूती आपल्याला निरंतर मिळाल्याशिवाय राहणार नाही ! असे साजरे करायला जमले तर तेच खरे नवरात्र होय ! पण हेही तिच्या कृपेशिवाय शक्य नाही.
ही प्रेमानुभूती सतत यावी असे वाटत असेल तर, भगवती श्रीज्ञानेश्वरी माउलीची, जशी जमेल तशी व जेवढी जमेल तेवढी, पण प्रेमादरपूर्वक सेवा दररोज व्हायलाच हवी. हा निर्धार करून प्रार्थना केली तर ती आई आपल्या लेकराची तहान-भूक भागवणार नाही का? माझ्या म्हणण्याचा विश्वास वाटत नसेल तर एकदा प्रार्थना करून प्रयत्न करून पाहा की. मला नक्की खात्री आहे श्री माउलींच्या जगावेगळ्या मातृवात्सल्याची, पुरेपूर आणि पक्की!
श्री माउलींच्या या मंत्रप्रतिपाद्य भगवती श्रीज्ञानदेवीवर सर्वांचा अढळ विश्वास व प्रेमादरपूर्वक श्रद्धा बसून तिची निरपेक्ष आणि निरंतर सेवा व सेवन करण्याची सद्-बुद्धी सर्वांना लाभो हीच यानिमित्ताने श्रीगुरुचरणीं कळकळीची प्रार्थना !

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

http://rohanupalekar.blogspot.in )⁠⁠⁠⁠


2 comments:

  1. अलौकिक लेखन, साक्षात देवी दर्शन घडले...

    ReplyDelete
  2. दिलीप लोणकर10/14/2021 9:01 pm

    आपल्या लिखाणातून नव नवीन शिकायला मिळते

    ReplyDelete