7 Oct 2016

* आदिशक्तिचें कवतुक मोठें * * षष्ठोल्लास *



आज नवरात्रीची सहावी माळ, पण तिथीने पंचमीच आहे. नवदुर्गांपैकी भगवती स्कंदमाता ही आजची देवता आहे. स्कंद म्हणजे कार्तिकेय. तसेच छांदोग्य उपनिषदामध्ये भगवद्भक्त सनत्कुमारांना स्कंद म्हटले आहे. म्हणून या थोर महात्मे असणा-या सनत्कुमारांची व देवसेनापती कार्तिकेयांची माता म्हणून श्रीजगदंबेला स्कंदमाता म्हटले जाते. भगवती स्कंदमातेच्या रूपाचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. अहो, ती तर आई आहे ना, तिचे परमप्रेम हेच तिचे अस्त्र, शस्त्र, सर्वकाही आहे. ती त्याच्या बळावरच सर्वांना आपलेसे करून घेते. आईला अन्य शस्त्राची गरजच काय?
भगवती जगदंबा मातेच्या महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तीन मुख्य रूपांनी विश्वाचा सर्व कारभार संपन्न होतो. विश्वाचे सृजन, पालन व संहार ही तिन्ही कार्ये या तीन रूपांच्या माध्यमातून भगवती जगदंबा करीत असते. याच रूपांमधून पुढे दुर्ग दानवाला मारण्यासाठी दुर्गा, महिषासुराला मारण्यासाठी महिषासुरमर्दिनी, दुष्काळातून प्रजेला वाचवण्यासाठी शाकंभरी, तसेच नंदा, चंडिका, रक्तदंतिका, कालिका इत्यादी विविध अवतार धारण करून वेळोवेळी जगन्मातेने भक्तरक्षणाचे, भक्तोद्धाराचे कार्य संपन्न केलेले आहे.
श्रीक्षेत्र माहूर येथे भगवती श्रीरेणुकामातेचे स्थान आहे. तेथेच जवळ भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंचेही निद्रास्थान आहे. या भगवती श्रीरेणुकामातेची कथा मोठी विलक्षण आहे.
भगवान शिवांच्या अंशाने जमदग्नी ऋषी जन्मले तर भगवती पार्वतीच्या अंशाने रेणुकराजाच्या पोटी रेणुकामाता जन्मली. यथावकाश त्यांचा विवाह झाला. त्यांना वसुमंत, वसु, सुषेण आणि विश्वावसु असे चार पुत्र झाले. त्यानंतर प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी आपला सहावा अवतार जो परशुराम, तो या अवतारी दांपत्याच्या पोटी धारण केला. जमदग्नी ऋषी हे महान तपस्वी असले तरी ते अत्यंत क्रोधी म्हणूनही प्रसिद्ध होते.
एकदा रेणुकामाता पाणी भरण्यासाठी नदीवर गेलेली होती. तेथे एक गंधर्वराजा आपल्या अनेक स्त्रियांसहित जलक्रीडा करीत असलेला पाहून ती क्षणभर घोटाळली. रेणुकामाता महापतिव्रता असूनही, दैवयोगाने आपली परपुरुषावर नजर गेली, याचे खूप वाईट वाटून ती त्वरित  आश्रमात परतली. पण तेथे पोचण्यापूर्वीच तिचे हे कृत्य मुळात अत्यंत कोपिष्ट अशा जमदग्नींनी जाणले व तिचा तिरस्कार करीत ते तिच्यावर प्रचंड रागावले. त्या रागाच्या भरात त्यांनी आपल्या वसुमंत पुत्राला आपल्या आईचाच शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. त्याने तसे करण्यास असमर्थता दाखवल्याने जमदग्नींनी त्याला क्षणात जाळून भस्म केले. तीच गती इतर तिघांचीही झाली.
तेवढ्यात समिधांसाठी जंगलात गेलेले श्रीपरशुराम परत आले. त्यांना सगळा वृत्तांत सांगून जमदग्नींनी आईचा शिरच्छेद करण्यास सांगितले. त्यांना आपल्या पित्याच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असल्याने, कोणतीही शंका मनात न आणता त्यांनी श्रीरेणुकामातेचा शिरच्छेद केला. ते पाहून प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी ' वर माग ' म्हटल्यावर बुद्धिमान परशुरामांनी, आपले भाऊ आणि आई जिवंत व्हावी व त्यांना या कटू प्रसंगाची काहीच स्मृती नसावी, असा विलक्षण वर मागितला. जमदग्नींच्या कृपेने जणू काही घडलेच नाही, असे सगळे जिवंत झाले.
काही काळानंतर महापराक्रमी कार्तवीर्यराजाने एकदा जमदग्नींच्या आश्रमाला भेट दिली. त्यावेळी ऋषींनी आपल्या कामधेनूच्या साह्याने सर्वांचा आदरसत्कार केला. तिचे हे अद्भुत सामर्थ्य पाहून राजाने ती कामधेनूच मागितली. ती ऋषींची होमधेनू असल्याने त्यांनी देण्यास नकार दिला. म्हणून राजाने बळजबरीने ती गाय पकडून आपल्या सोबत नेली.
श्रीपरशुराम वनातून आल्यावर त्यांना हा वृत्तांत कळला, त्यांनी उद्दामपणे वागलेल्या  कार्तवीर्यार्जुनाशी युद्ध करून त्याचा वध केला. कार्तवीर्यार्जुन हे प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तप्रभूंचेच अलौकिक अधिकारसंपन्न शिष्य होते. त्यांनी स्वत:च श्रीदत्तप्रभूंना, तुमच्यासारख्या थोराच्याच हातून मला रणांगणावर मृत्यू यावा, अशी प्रार्थना केलेली होती. म्हणून भगवान परशुरामांना समोर पाहिल्यावर ते खरेतर समाधान पावले व शांतपणे त्यांच्या हातून त्यांनी मृत्यू स्वीकारला. पण हे पाहून राजाच्या मुलांनी परशुरामांशी युद्ध करायचे ठरवून पुन्हा हल्ला केला. पण ते आश्रमात नाहीत हे पाहून अविचाराने जमदग्नींचाच वध केला. त्यांचे हे पापकृत्य पाहून भगवान श्रीपरशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वीवरील अशा अधर्माने वागणा-या सर्व क्षत्रिय राजांचा वध करून, त्यांच्या रक्ताने भरलेल्या तळ्यांतील जलाने आपल्या पित्याला तिलांजली देण्याची प्रतिज्ञा केली. हेच भगवान श्रीविष्णूंच्या श्रीपरशुराम अवताराचे मुख्य कार्यच होते.
या जमदग्नींच्याबरोबर रेणुकामाता सती गेल्या, त्यावेळी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंनीच सर्व क्रियाकर्म पार पाडले. नंतर परशुरामांना आत्मज्ञानाचा व श्रीविद्येचा उपदेश केला व त्यांच्या प्रतिज्ञेसाठी आशीर्वाद दिले. हा प्रसंग घडला माहूरच्या डोंगरावर. त्यानंतर श्रीदत्तप्रभूंनी, आई वडलांच्या विरहाने व्याकूळ झालेल्या श्रीपरशुरामांना त्यांच्या आई-वडिलांचे ख-या रूपात, अर्थात् शिवपार्वती रूपात दर्शन करविले. नेमके त्यावेळी पुत्रवात्सल्याने जमिनीतून रेणुकामातेचे शिर बाहेर आले व त्या मुखाने तिने आपल्या लाडक्या परशुरामांचे चुंबन घेतले. माहूर येथे आजमितीस याच स्वयंभू श्रीरेणुका-मुखाची पूजा होते. माहूर हे महाराष्ट्रातील श्रीजगदंबेच्या साडेतीन पीठांपैकी एक पीठ आहे.
भगवान श्रीदत्तप्रभूंच्या अमोघ आशीर्वादांच्या बळावर, श्रीपरशुरामांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण करून, पापक्षालनार्थ महायज्ञ केला. यावेळी युद्धात जिंकलेल्या संपूर्ण पृथ्वीचे कश्यपऋषींना दान केले. नंतर स्वत:ला राहण्यासाठी कोकण किनारपट्टीचा भाग समुद्राकडून मागून घेतला व तेथे राहू लागले. भगवान परशुरामांचे ते निवासस्थान चिपळूण जवळ लोटे गावी आहे. प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी आपल्या " श्रीदत्तमाहात्म्य " या अलौकिक ग्रंथात हे सर्व श्रीरेणुका-परशुराम चरित्र सविस्तर व सुंदर पद्धतीने सांगितलेले आहे.
श्रीरेणुकामाता ही अत्यंत मातृवत्सल मानली जाते. तिची भक्ती फार सोपी आहे. तिला मोठी पूजा नको की भरमसाठ उपचार नकोत, नैवेद्य नको की बळी नको. असले तिला काहीच लागत नाही. बालकवत् प्रेमाने एखाद्याने तिला नुसते ' आई ' म्हटले, तरी ती तत्काळ प्रसन्न होऊन आपला कृपाप्रसाद त्या भक्ताला बहाल करते. माहूर येथील थोर रेणुकाभक्त कविश्रेष्ठ विष्णुदास म्हणूनच आपल्या एका पदात म्हणतात, " रेणुके तुजला आई म्हणणे पुरे ।"
श्रीरेणुका रूपाचेही एक फार मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तिने कोणतेही आयुध धारण केलेले नाही. श्रीजगदंबेच्या इतर सर्व रूपांमध्ये काही ना काही आयुध, शस्त्र आहेच व तिने कोणा ना कोणा राक्षसाचा वध केलेलाच आहे. पण रेणुकामाता ही सर्वार्थाने ' आई ' आहे. प्रेम हेच तिचे शस्त्र व तोच तिचा जगातील सर्वश्रेष्ठ, मौल्यवान दागिना देखील ! आजची देवता श्रीस्कंदमाता व श्रीरेणुकामाता यांचे हे समान वैशिष्ट्य आहे.
या भगवती श्रीरेणुकामातेचे पूर्ण कृपांकित भक्त व प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे उत्तराधिकारी, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या कुळात आजवर भगवती रेणुकामातेची कृपा झालेले अनेक भक्त होऊन गेलेले आहेत. पू. श्री. दादांनाही बालपणातच श्रीरेणुका मातु:श्रींचे अद्भुत दर्शन लाभले होते. आजच्या लेखासोबत श्रीरेणुकाआईचे जे छायाचित्र दिलेले आहे, ते माहूरच्या श्री.विष्णुदासांनी त्यांना झालेल्या दिव्य दर्शनानुसार स्वत:च चितारलेले आहे. अगदी त्याच रूपात प. पू. दादांनाही श्रीरेणुकाभगवतीचे दर्शन झाले होते. त्यांच्याही नित्यपूजेत त्यामुळे असेच एक देखणे तैलचित्र आहे. लेखासोबतच्या या चित्राचे डोळे पाहा, वात्सल्यप्रेमाने नुसते ओसंडून वाहत आहेत; ते पाहिल्याक्षणी रेणुकाआईच्या प्रेमकुशीत विसावण्याची आपल्यालाही अनावर ओढ लागली नाही तरच नवल !
पू. श्री. शिरीषदादांनी आपल्या एका अभंगात, त्यांना माहूरगडावर झालेल्या श्रीरेणुकामातेच्या अलौकिक दर्शनाचे सुरेख वर्णन केलेेले आहे. त्याच अभंगाद्वारे आज नवरात्राच्या सहाव्या माळेला, करुणावरुणालय जगज्जननी, जगन्माता श्रीरेणुकाभगवतीच्या श्रीचरणीं आपणही प्रेमादराने ही भावसुमनांजली अर्पून कृपायाचना करूया !!
मूळपीठवासिनी, दैत्यमहिषमर्दिनी ।
त्रिभुवनांची स्वामिनी, उभी माय रेणुका ॥१॥
देव वृंद पूजिता, भक्तस्नेह गर्विता ।
वरद सिद्ध सेविता, उभी माय रेणुका ॥२॥
मंद हास्य मोहिनी, सकल ताप नाशिनी ।
प्रेमनीर लोचनी, उभी माय रेणुका ॥३॥
स्मर्तृगामी पातली, अमृतेसी भेटली ।
परशुराम साउली, उभी माय रेणुका ॥४॥

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )⁠⁠⁠⁠


3 comments:

  1. जय श्री रेणुका माते। सतत रक्षण कर... 🙏🌹

    ReplyDelete
  2. वात्सल्याची पुतली रेतूकामातेस साष्टांग प्रणिपात ! ! !

    ReplyDelete