8 Oct 2016

* आदिशक्तिचें कवतुक मोठें * अष्टमोल्लास * *



आज नवरात्राची आठवी माळ, पण तिथीने सप्तमीच आहे. रात्री अष्टमी असल्याने आजच अष्टमीचा महालक्ष्मी जागरही आहे. भगवती कालरात्रीची आज उपासना करतात. श्रीकालरात्री ही अनुल्लंघ्य अशा काळाचाही ग्रास करणारी, भगवान शिवांची एक शक्ती आहे. ती मृत्यूची अधिष्ठात्री देवता मानली जाते. तिचे रूप भयंकर आहे. तिचे वाहन गाढव असून ती हातात तीक्ष्ण खड्ग धारण करते. अंधारासारखा काळाकुट्ट रंग असलेल्या तिने आपले केस मोकळे सोडलेले असून, तिचे डोळे आग ओकल्यागत लाल आहेत. तिचे रूप जरी भेसूर असले तरी ती आपल्या भक्तांचे मात्र कायम कल्याणच करते.
केन उपनिषदामध्ये भगवती आदिशक्तीच्या " उमा " या विलक्षण अवताराचे फार सुंदर वर्णन आले आहे. एकदा देव-दानवांचे तुंबळ युद्ध झाले. त्यामध्ये परमात्म्याच्या कृपेने देवांचा विजय झाला. पण देवांना मात्र आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला. तो गर्व दूर करण्यासाठी परब्रह्म परमात्मा एका यक्षाच्या रूपाने त्यांच्यासमोर प्रकटले. ते यक्षरूप कोण आहे, हे जाणून घेण्याची देवांची इच्छा झाली. म्हणून मग प्रथम अग्निदेव त्याच्याकडे गेले व गर्वाने म्हणाले, " मला जातवेद म्हणतात, मी काहीही जाळू शकतो. " यक्षाने तेथेच पडलेली एक काडी उचलली आणि ती जाळून दाखवण्यास सांगितली. पण अग्नी काही त्या क्षुल्लक काडीला जाळू शकला नाही. कारण त्याचे सामर्थ्य यक्षरूपी परमात्म्याने आधीच काढून घेतले होते.
नंतर हीच गत वायुदेवाची झाली. तोही ती काडी सर्व सामर्थ्य पणाला लावूनही उडवून दाखवू शकला नाही. अशाप्रकारे सर्व देव पराभूत झाले. शेवटी इंद्र पुढे आला.
इंद्र समोर आल्याबरोबर तो यक्ष अदृश्य झाला आणि त्याच्याजागी एक अत्यंत देदीप्यमान आणि तेजस्वी अशी देवी प्रकटली. इंद्राने तिला वंदन करून विचारले की, " हे माते, तू कोण आहेस? तो यक्ष कोण होता? कुठे गेला? "
ती देवी उत्तरली, " इंद्रा, मी भगवती उमा आहे. मीच एखाद्या दो-यामध्ये मणी गुंफावेत त्याप्रमाणे ही अनेक ब्रह्मांडे स्वत: मध्ये धारण केलेली आहेत, म्हणूनच मला 'उमा' म्हणतात. मीच तुम्हा सर्वांचे सामर्थ्य असून, मीच या अनंत ब्रह्मांडांचा कारभार चालवते. तुम्ही देवता केवळ माझ्या हातातल्या बाहुल्या आहात, तुम्हांला काहीही स्वतंत्र सामर्थ्य नाही, तेव्हा फुकटचा गर्व बाळगू नका. तो यक्ष दुसरा-तिसरा कोणी नसून ते प्रत्यक्ष परब्रह्म होते. मीच त्या परब्रह्माची कार्यशक्ती आहे ! " त्यानंतर देवी उमेने इंद्राला तत्त्वज्ञानाचा उपदेश केला. ही भगवती उमाच परब्रह्माची आद्याशक्ती असून तीच सर्वश्रेष्ठही आहे.
श्रीजगदंबेचा आणखी एक अवतार म्हणजे 'योगमाया' ! भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा देवकीगर्भात प्रवेश केला, तेव्हाच त्यांच्या योगमायेने गोकुळात यशोदामातेच्या गर्भात प्रवेश केला. भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यावर, त्यांच्याच आज्ञेने श्रीवसुदेवांनी त्यांना गोकुळात नेऊन ठेवले व तेथे जन्मलेल्या योगमायेला ते मथुरेत घेऊन आले.
दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे कंसाने देवकीचे बाळ मारण्यासाठी त्याला पाय धरून उचलले, त्यासरशी ती आदिमाया त्याच्या हातून निसटली आणि आकाशात जाऊन कंसाला म्हणाली, " दुष्टा, तुझ्या पापाचा घडा आता भरलेला आहे. तुझा कर्दनकाळ गोकुळात वाढतोय, तो निश्चितच आणि लवकरच तुला मारेल !"
कंसाच्या हातून सुटलेली ती योगमाया पुढे विंध्य पर्वतावर जाऊन स्थिरावली आणि 'विंध्यवासिनी' नावाने प्रसिद्ध झाली. आजही मध्य भारतात विंध्य पर्वतावर तिचे मंदिर असून दर्शनासाठी अनेक भाविक तिथे आवर्जून जातात.
श्रीमद् देवी भागवतात एका ठिकाणी भगवान वेदव्यास देवीच्या नामाचे विलक्षण सामर्थ्य सांगताना म्हणतात की, " जगात एवढे मोठे पापच अस्तित्वात नाही की जे भगवती जगदंबेच्या नामासमोर टिकू शकेल. म्हणून जर एखाद्याने श्रीजगदंबेचे पावन नाम एकवार जरी प्रेमाने व श्रद्धेने घेतले, तरी तो सर्व पापांपासून क्षणात मुक्त होतो ! "
श्रीमद् देवी भागवताच्या नवव्या स्कंधामध्ये असे म्हटले आहे की, आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांच्या डाव्या भागापासून भगवती श्रीराधिकादेवी प्रकटल्या व परब्रह्माच्या त्या आदिप्रकृती श्रीराधादेवींपासूनच सर्वच्या सर्व देवीरूपे प्रकट झाली व नेहमीच होत असतात. म्हणून श्रीराधा-श्रीमाधव हेच जगाचे आदिजनिते आहेत. भगवान श्री माउली अमृतानुभवाच्या नमनात याच आदिदांपत्याला प्रेमभावे वंदन करतात,
ऐशीं हीं निरुपाधिकें ।
जगाचीं जियें जनकें ।
तियें वंदिलीं मियां मूळिकें ।
देवोदेवी ॥१॥
श्री माउली आपला स्वानुभव सांगतात की, शिव-शक्ती म्हणूनही ज्यांचे वर्णन केले जाते, तेच राधा-माधव हे जगाचे आदितत्त्व असून त्या निरुपाधिक दांपत्याला मी सादर वंदन करतो.
हेच आदिपुरुष-आदिमाया श्रीराधा-श्रीदामोदरांचे अलौकिकत्व आणि अभिन्नत्व आपल्या मराठी संतांनी स्वानुभवाने पूर्णपणे जाणून, सगुणब्रह्म भगवान श्रीपंढरीनाथांनाच देव-देवी अशा दोन्ही रूपांमध्ये एकाचवेळी वर्णिलेले-पूजिलेले आहे. भगवान पंढरीनाथांचे अंबामातेच्या, कृष्णाबाईच्या रूपात अप्रतिम असे वर्णन करून तिच्या लीलांचा गोंधळ मांडताना शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज म्हणतात,
स्वर्ग मृत्यु पाताळ त्याचा मंडप घातिला वो ।
चार वेदांचा फुलवरा बांधिला वो ।
शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडिला वो ॥१॥
उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माउलीचा हो ॥ध्रु.॥
जीव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती वो ।
अठ्यांयशी सहस्र ऋषी दिवटे तिष्ठती वो ।
तेहतीस कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती वो ॥२॥
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो ।
पुंडलिक दिवटा शोभे वाळुवंटी वो ।
एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटी वो ॥३॥
( या सर्व वर्णनाला साजेसे कोल्हापूरच्या श्रीअंबाबाईचे श्रीविठ्ठल रूपातील व पंढरपूरच्या श्रीरुक्मिणीमातेचे कृष्णरूपातील अलंकाराचेच सुंदर फोटो, हे त्यांचे अनादि अभिन्नत्व दाखवण्यासाठी आज मुद्दाम वापरलेले आहेत. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in  )


4 comments:

  1. जय जगदंब
    जय अंबे

    ReplyDelete
  2. सर्व रूप मयं देवी, सर्व देवी मयं जगत... ��

    ReplyDelete
  3. सुन्दर ! राधा कृष्णा ची माहिती छान !

    ReplyDelete