*** आदिशक्तिचें कवतुक मोठें *** ** पंचमोल्लास **
आज नवरात्राची पाचवी माळ, पण तिथीने सूर्योदयाला चतुर्थीच असल्याने भगवती कूष्माण्डा देवीची आज उपासना करतात. कोहळा हे फळ जिला प्रिय आहे ती कूष्माण्डा. तसेच त्रिविधतापरूप चराचर जगताला तिने आपल्या उदरात धारण केलेले आहे, म्हणूनही श्रीजगदंबेला कूष्माण्डा म्हणतात. अजून एक अर्थ असा की, कूष्मांड म्हणजे माया, म्हणून जी मायारूप आहे आणि तसेच आभासमय जगत निर्माण करते, तीच कूष्माण्डा म्हटली जाते.
सूर्यसिद्धांतानुसारी पंचांगात आज सूर्योदयाला चतुर्थी असली तरी अपराण्हकालात म्हणजे दुपारी एकनंतर पंचमी आहे. म्हणून आजच ' श्रीललिता पंचमी ' देखील आहे. आज भगवती महात्रिपुरसुंदरी श्रीललिता जगदंबिकेचा मुख्य आराधना दिवस.
पराम्बिका भगवती श्रीललिता महात्रिपुरसुंदरीच्या उपासना पद्धतीला " श्रीविद्या " म्हणतात. ही अत्यंत गूढ आणि विलक्षण फलदायी अशी महाविद्या आहे. विशिष्ट अधिकाराशिवाय या विद्येचा उपदेश केला जात नाही. भगवान श्रीदत्तात्रेय प्रभू हे याही महाविद्येचे प्रमुख आचार्य आहेत. या संप्रदायाचे एकूण बारा आचार्य पूर्वीच्या काळी होऊन गेले. त्यांपैकी केवळ दोनच परंपरा आज अस्तित्वात आहेत. आचार्य कामदेवांची ' कादिविद्या ' परंपरा आणि अगस्ति ऋषींच्या पत्नी महासाध्वी लोपामुद्रा यांची ' हादिविद्या ' परंपरा. श्रीविद्येचा महामंत्र हा दोन प्रकारे सांगितला जातो. पंधरा अक्षरी मंत्र तसा जास्त प्रसिद्ध असून त्यास ' पंचदशी श्रीविद्या ' म्हणतात तर सोळा अक्षरी मंत्राला ' षोडशी विद्या ' म्हणतात. श्रीदत्तसंप्रदायात ' एकाक्षरी श्रीविद्या ' देखील प्रचलित आहे, पण आजवर ती अत्यंत गोपनीय ठेवली गेलेली आहे. केवळ श्रीगुरुपरंपरेनेच त्याचे विधान दिले जाते. प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांना भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनीच स्वमुखाने या एकाक्षरी मंत्राचा उपदेश दिला होता. त्यांच्याकडून योगिराज श्री. गुळवणी महाराजांना ही विद्या मिळाली व त्यांनी प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांना त्याचा उपदेश दिला. आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथे प्राचीन काळी याच एकाक्षरी श्रीविद्येचा, भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंचे शिष्योत्तम भगवान श्रीपरशुरामांनी भगवान श्रीगोरक्षनाथ महाराजांना उपदेश केला होता. या अत्यंत गोपनीय ठेवलेल्या एकाक्षरी महाविद्येचा संदर्भ आजवर पहिल्यांदा प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी आपल्या ' स्मरणयात्रा ' या ग्रंथात दिलेला आहे.
श्रीविद्या उपासना आणि तत्त्वज्ञानाचे अत्यंत सुरेख वर्णन करणारा भगवान श्रीदत्तप्रभू आणि भगवान परशुराम यांचा संवाद असणारा ' त्रिपुरा रहस्य ' हा सुंदर ग्रंथ प्रसिद्ध आहे. भगवत्पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज हे या श्रीविद्या परंपरेचे फार थोर अधिकारी आचार्य होते. त्यांनी आपल्या वाङ्मयातून श्रीविद्या उपासनेचे अलौकिक मार्गदर्शन करून ठेवलेले आहे. त्यांचे ' सौंदर्यलहरी ' हे श्रीविद्येचे सर्वांगीण स्वरूप विशद करणारे स्तोत्र अतिशय अद्भुत आहे. त्यांनी आपल्या श्रृंगेरी, द्वारका, जगन्नाथपुरी, बदरीनाथ व कांची या सर्व पीठांवर सुरू केलेली श्रीविद्येची उपासना आजही चालू आहे.
श्रीविद्येचे स्थूल स्वरूप म्हणजे ' श्रीयंत्र ' होय. या श्रीयंत्राची पूजा, सेवा करण्याने या संप्रदायाची स्थूल उपासना होते. यालाच ' बहिर्यजन ' म्हणतात. प्रत्येक परंपरेप्रमाणे यात विविधता आहे. तसेच या बहिर्यजनात बरेच कर्मकांड देखील अनुस्यूत असते.
योग्य अधिकारी श्रीगुरूंकडून शक्तिपातपूर्वक प्राप्त झालेल्या श्रीविद्येच्या मंत्राच्या साधनेने या संप्रदायाची सूक्ष्म उपासना होते. यालाच ' अंतर्यजन ' म्हणतात. या महामंत्राच्या उपासनेसाठी शास्त्रांनी शक्तिपाताची अनिवार्यताच मानलेली आहे. श्रीविद्येचे तात्त्विक स्वरूप व मंत्र माहात्म्य ऋग्वेदान्तर्गत ' देवी अथर्वशीर्ष ' स्तोत्रामध्ये सविस्तर विशद केलेले आहे. आत्ताच्या काळातील श्रीविद्या परंपरेतील एक विभूतिमत्व प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी ' श्रीदेवात्मशक्तिसूत्राणि ' या आपल्या संस्कृत सूत्रग्रंथामधून श्रीविद्येच्या गूढ अशा अंतर्यजनावर मौलिक प्रकाश टाकलेला आहे. त्यांनी या ग्रंथातील बावन्न सूत्रांमधून ही संपूर्ण प्रक्रिया सांगोपांग वर्णिलेली आहे. भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींनी देखील श्रीविद्येचे अनेक सिद्धांत आपल्या परमपावन श्रीज्ञानेश्वरीमधून संकेताने सांगून ठेवलेले आहेत. ही विद्या अत्यंत अलौकिक, अद्भुत आणि सुलभपणे मोक्षकारक आहे. यच्चयावत् सर्व मंत्रांची श्रीविद्या हीच माता मानली जाते.
श्रीविद्येचे लौकिक स्वरूप असणारे श्रीयंत्र किंवा श्रीचक्र हे अनेक त्रिकोण व चौकोनांच्या माध्यमातून बनवलेले असते. ही अतिशय क्लिष्ट रचना असून महात्म्यांनी तिचे सविस्तर वर्णन करून ठेवलेले आहे. या श्रीचक्राच्या मध्यभागी असणारा त्रिकोण ही भगवती जगदंबा व त्याच्या आत असणारा छोटा बिंदू म्हणजेच परमशिव होय. या बिंदूच्या ठिकाणी शिवशक्तीचे सामरस्य मानलेले असल्याने काही ग्रंथांमध्ये या बिंदूलाच भगवतीचे स्वरूप मानतात. तसेही शिव शक्ती काही भिन्न नाहीतच. भगवान श्रीमाउली अमृतानुभवात स्पष्टच सांगतात, " प्रियुचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचिये सरोभरी । "
या श्रीयंत्रावर मंत्रोच्चारपूर्वक शुद्ध कुंकवाचा हाताची मृगी मुद्रा करून अभिषेक केला जातो व तो श्रीजगदंबेला अत्यंत प्रिय देखील आहे. यालाच ' कुंकुमार्चन ' असे म्हणतात. सिद्ध श्रीयंत्रावरील श्रीयंत्र सिद्ध करण्याची प्रक्रिया अवघड आहे. नुसत्या यंत्राचे पूजन करून चालत नाही, त्यातील देवत्व प्रकट करण्याची प्रक्रिया व त्यासाठी आवश्यक असणारे मंत्र माहीत असतील तरच खरी उपासना होते. हे सर्व यथायोग्य जाणणारे महात्मे आज हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेही नाहीत.
आज कलियुगाच्या अतिरेकामुळे हे दिव्य साधनही अगदी बाजाराच्या स्तरावर आलेले आहे. कोठेही आता श्रीयंत्र विकत मिळते व पैसा पैसा करत आयुष्य काढणारे लोक वैभव मिळावे म्हणून ते गल्ल्यात, तिजोरीत वगैरे ठेवतात. ज्योतिषाची दुकाने काढून बसलेले कुडमुडे ज्योतिषी श्रीयंत्र बनवणा-यांकडून कमिशन घेऊन ही यंत्रे वाटेल ती अशास्त्रीय माहिती आणि खोटेनाटे उपयोग सांगून सर्रास विकत असतात. पण हा सर्व अनाचार आहे. श्रीयंत्र हे सिद्ध केले तर त्यात प्रत्यक्ष श्रीभगवतीचे अस्तित्व असते, त्याचे नियमही अतिशय कडक असतात, हे अजिबात विसरता कामा नये.
श्रीविद्या ही परमश्रेष्ठ साधनापद्धती असून साधकाला परमफलदायक, प्रत्यक्ष मोक्षकारकच आहे. ती काही लौकिक लाभ, पैसा, प्रसिद्धी वगैरे देणारी क्षुद्र विद्या नाही.
सिद्ध श्रीयंत्राच्या नुसत्या दर्शनाने शेकडो जन्मांतले पाप क्षणात भस्म होते व अपार पुण्यलाभ होतो, असा अनेक महात्म्यांनी आपला स्वानुभव सांगून ठेवलेला आहे. अशी महासिद्ध श्रीयंत्रे अगदी मोजकीच आहेत. कोल्हापूरच्या श्रीमहालक्ष्मी मंदिरात श्रीअंबाबाईच्या उजव्या बाजूला ओवरीत असणारे, दगडावर कोरलेले भूपृष्ठ श्रीयंत्र प्रत्यक्ष भगवान श्रीमदाद्य श्रीशंकराचार्य स्वामी महाराजांनीच स्वहस्ते स्थापलेले आहे. दुसरे एक मेरुपृष्ठ श्रीयंत्र पुण्याच्या सद्गुरु श्रीगुळवणी महाराजांच्या ' श्रीवासुदेव निवास ' या आश्रमात अाहे. तिसरे भूपृष्ठ श्रीयंत्र पुण्यातच योगिराज श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या ' माउली ' आश्रमात असून ते स्वत: योगिराज श्री. गुळवणी महाराजांनीच त्यांना प्रसाद म्हणून दिलेले आहे. काशीच्या अन्नपूर्णा मंदिरामध्ये सोन्याचे मोठे मेरुपृष्ठ श्रीयंत्र आहे. ही चारही यंत्रे अत्यंत विलक्षण व अद्भुत आहेत. यांच्या नुसत्या दर्शनानेही महालाभ होतो.(भूपृष्ठ म्हणजे चपटे, पत्र्यावर कोरलेले; कूर्मपृष्ठ म्हणजे कासवाच्या पाठीसारखे फुगीर पण पत्र्यावरच कोरलेले व मेरुपृष्ठ म्हणजे डोंगराच्या सुळक्यासारखे उंच. ह्या तीन प्रकारांनीच सर्व यंत्रे बनवली जातात.)
भगवान श्रीज्ञानेश्वर माउली या कृपामयी जगज्जननीची प्रार्थना करताना म्हणतात,
म्हणोनि साधकां तूं माउली ।
पिके सारस्वत तुझिया पाउलीं ।
याकारणें मी साउली ।
न संडीं तुझी ॥ज्ञाने.१२.०.८॥
हे सद्गुरुमाउली, तूच साधकांची परमप्रेमळ माता आहेस, तुझ्या चरणकृपेने अवघे सारस्वत पिकते, म्हणजे आत्मज्ञान सर्वार्थाने प्राप्त होते, म्हणून मी तुझ्या चरणांची साउली कधीही सोडत नाही. कायम त्या शांतशीतल साउलीतच विसावलेलो आहे.
आज श्रीललितापंचमीच्या परमपावन महापर्वावर या श्रीयंत्रस्थित भगवती महात्रिपुरसुंदरी पराम्बिका जगज्जननीच्या श्रीचरणीं आपण सर्व नतमस्तक होऊया आणि माउलींच्याच शब्दांत प्रार्थना करून, प्रेमादरपूर्वक उपासना निरंतर आमच्याकडून घडो, असा तिच्याकडे कृपाशीर्वाद मागूया !!
आजच्या श्रीललितापंचमीच्या पवित्र दिवशी, बुध-अनुराधा अमृतसिद्धी योगावर खास दर्शनासाठी श्रीयंत्राचे रेखाचित्र व कोल्हापूर येथील श्रीशंकराचार्य स्थापित श्रीयंत्राचा फोटो लेखासोबत देत आहोत.
भगवती राजराजेश्वरी महात्रिपुरसुंदरी जगदंबा माता की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )
खूप सुंदर माहिती दिली आहे
ReplyDeleteएका गूढ विषयावर फारच सुंदर विवेचन। 🙏🙏
ReplyDeleteEk Alokik Mahiti Denya Baddal Shashtag Namashkar...
ReplyDeleteश्रियन्त्रावर सुरेख माहिती मिळाली,नमस्कार आणि धन्यवाद
ReplyDelete