1 Oct 2016

*** ब्रह्मानंद स्थिती काय वर्णू ***

श्रीगुरूंनी ज्यांचे वारंवार कौतुक करावे, ज्यांच्याविषयी भरभरून बोलावे व ज्यांना पाहिल्यावर श्रीगुरूंचाही ऊर अभिमानाने व प्रेमाने भरून यावा; असे शिष्य फारच थोडे असतात. आणि अशा परमपावन स्वनामधन्य शिष्योत्तमांच्या श्रेयनामावलीमध्ये, श्रीसंत ब्रह्मानंद महाराज गाडगोळी बेलधडीकर ह्या श्रीसंत गोंदवलेकर महाराजांच्या पट्टशिष्यांचे नाव फारच वरच्या स्तरावर आहे. आपल्या अशा थोर शिष्याचा यथार्थ गुणगौरव करून, " मी रामदास नसलो तरी ब्रह्मानंदबुवा नक्कीच कल्याणशिष्य आहेत ! " असे गौरवोद्गार काढताना श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचा भाव काय असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही ! खरोखरीच, जन्माला येऊन जे काय मिळवायचे ते सर्व श्रीब्रह्मानंदबुवांनी पूर्णपणे मिळवले !  धन्य ते बुवा !!
एकेकाळी संपूर्ण कर्नाटकात गाजलेले प्रकांड पंडित अनंतशास्त्री श्रीगुरुचरणीं एवढे विनटले की त्यांना स्वत:चे स्वतंत्र अस्तित्वच उरले नाही. सर्वार्थाने गुरुमय होणे म्हणजे काय? हे अनंतशास्त्री गाडगोळी तथा श्रीसंत  ब्रह्मानंदबुवांकडे पाहून समजते.
श्रीब्रह्मानंद बुवांची गुरुभक्ती खरोखरीच अलौकिक आहे. अलौकिक हा शब्दही अपुराच. आपल्या बोलाबुद्धीच्या पलीकडे होती त्यांची भावस्थिती. श्रीगुरूंनाच साक्षात् परब्रह्म मानून त्याच भावात ते वावरत असत. श्रीगुरुदर्शनाच्या तीव्र ओढीने कर्नाटकातून रेल्वेने कोरेगांव स्टेशनवर उतरत व तेथून दहा-बारा किलोमीटर वहाणा काढून मोकळ्या पायाने गोंदवल्यास चालत येत. आपल्या श्रीगुरूंचे पावन चरणकमल सर्वांगी मिरवणा-या पुण्यभूमीला वहाणा कशा लावायच्या ना? बुवा श्रीगुरूंचे चरण पाहिल्याशिवाय पाणीही घेत नसत तोंडात. कधी एकदा ते सगुण साकार परब्रह्म डोळे भरून पाहतो, असे त्यांना होऊन जाई. " तुका म्हणे जे येथे । तेथे तैसेचि असेल ॥" या न्यायाने श्रीमहाराजही आपल्या या शिष्योत्तमाची तेवढ्याच उत्कंठेने वाट पाहत असत. पण असे हे जगावेगळे गुरुप्रेम काय सहजच मिळते का हो?
श्रीब्रह्मानंदांना तरुणपणीच अंगावर कोड फुटले होते. पण त्यांना त्याची काहीच फिकीर नव्हती कधी. एकदा श्रीरामरायासमोरच श्रीमहाराज सिंहासनावर बसलेले होते, नेहमीप्रमाणे ब्रह्मानंदबुवा हात बांधून बाजूला उभे होते. श्रीमहाराज त्यांना म्हणाले, " बुवा, तुम्ही सत्पुरुष आहात. पण तुमच्या अंगावर कोड आहे, याबद्दल फार लोकांच्या मनात विकल्प येतो. दुसरे असे की लोकांच्या मनात येते, मी तुमचा गुरु म्हणवतो, तर मग मला तरी हे कोड खपते कसे? तेव्हा आपण असे करूया का, रामरायालाच विनवूया. रामराया आपले ऐकेल आणि तुम्ही या कोडातून कायमचे मुक्त व्हाल. तर असे करूया का?"
यावर ब्रह्मानंदबुवा काय म्हणाले पाहा, " महाराज, दुसरे काहीही करा पण एवढी कृपा मात्र करू नका ! या कोडामुळे माझे देहावरचे प्रेम जायला फार मदत झाली. आणि देहावरचे प्रेम गेल्याखेरीज आत्मज्ञान होत नाही हा जबरदस्त अनुभव मला आहे ! या कोडाची त्यासाठी मला इतकी मदत झालीये की त्याचे उतराई होण्यासाठी मला हे कोड देहावर सांभाळलेच पाहिजे. हे असल्यामुळे चुकून सुद्धा कधी मला प्रपंच करावासा वाटला नाही आणि त्यामुळे मला ब्रह्मचारी राहता आले. महाराज, तुम्ही म्हटल्यावर हे कोड जाईल यात काही शंकाच नाही. पण तसे ते गेल्यावर मला पुन्हा देहाचे प्रेम लागले तर मला तो सौदा किती महागात पडेल? मी खाली येईन. मग मी ही जोखीम का घेऊ? म्हणून काहीही करून हे कोड घालवू नका ! " महात्मेपण हे असे अतीव कष्टानेच साधलेले असते. ते काही फुकट मिळत नाही.
श्रीब्रह्मानंद महाराज आपल्यावर झालेल्या श्रीगुरूंच्या धुंद कृपावर्षावाचे व तो वर्षाव करणा-या श्रीगुरूंचे महिमान सुंदर शब्दांत वर्णन करताना म्हणतात,
महाराजांसारिखा नाही त्रिभुवनी ।
आनंदाची खाणी गुरुराव ॥१॥
गुरुराव माझे रामचि केवळ ।
वासनेचे मूळ दूर केले ॥२॥
दूर केला भव कृपादृष्टिपाते ।
मायापाश भुते पळविले ॥३॥
पळविली भ्रांती राहोनिया चित्ती ।
ब्रह्मानंद स्थिती काय वर्णू ॥४॥
आपल्या श्रीगुरु महाराजांसारखा अन्य कोणीही अवघ्या त्रिभुवनात नाही, हाच शिष्याचा दृढभाव असावा लागतो. श्रीमाउली देखील, " गुरुवीण देव नाही दुजा पाहतां त्रिलोकी ॥" असेच म्हणतात. हा गुरुभाव बुवांचा इतका पराकोटीचा होता की ज्याचे नाव ते !  म्हणून ते प्रेमादराने स्वानुभव सांगतात, माझे श्रीगुरु नुसतेच अलौकिक नाहीत, तर तेच परम आनंदाची खाण देखील आहेत. तेच माझ्यासाठी साक्षात् भगवान रामराय आहेत. त्यांच्याच कृपेने माझ्या अंतरीच्या वासना समूळ नष्ट झालेल्या आहेत. त्यांच्या कृपादृष्टीतून झालेल्या परमरहस्यमय शक्तिपाताने माझे भवभय तत्काळ दूर झाले आणि माया व तिचे सर्व पाशही त्याक्षणी विरून गेले. माझे श्रीगुरुदेव त्या कृपेक्षणाद्वारे माझ्याच हृदयी कायमचे प्रकटले आणि त्यांच्या त्या वास्तव्याने " मी देह, मी जीव, मी अमका.." अशा प्रकारची सगळी भ्रांती पळून गेली. चित्तात, अंत:करणात अंतर्बाह्य आत्मानंदच स्थिरावला. या अलौकिक स्थितीचे मी वर्णन तरी काय करणार?
श्रीगुरुसेवेचा परममंगल व अद्भुत आविष्कार म्हणजे श्रीब्रह्मानंद महाराज होत. श्रीमहाराज हेच आपले सर्वस्व, श्रीमहाराजांनी दिलेले कृपायुक्त नाम हेच एकमात्र साधन आणि  श्रीमहाराजांची सादर परिचर्या हेच एकमेव कर्तव्य; असे मनापासून जाणून त्यानुसार वागणारे श्री ब्रह्मानंदबुवा म्हणजे साक्षात् मूर्तिमंत श्रीगुरुभक्तीच ! शुकासारिखे पूर्ण वैराग्य अंगी मिरवणारा हा महात्मा, आपल्या अपूर्व-मंगल निष्ठेने श्रीगुरु ब्रह्मचैतन्यांचेही चैतन्यच होऊन ठाकला होता, यात नवल ते काय?
श्रीमहाराजांनाही ज्यांच्या स्मरणाने डोळ्यांत पाणी येत असे, त्या शिष्याग्रणी श्रीब्रह्मानंद बुवांच्या श्रीचरणीं, ९८ व्या पुण्यतिथी दिनी आज आपण प्रेमादरपूर्वक साष्टांग दंडवत करूया. बुवांनी सर्वपित्री अमावास्येला देह ठेवला. त्यांचे यच्चयावत् सर्व पितर तर त्यांच्यामुळे मुक्त झाले यात शंका नाहीच, पण ब्रह्मानंदबुवांच्या नुसत्या सप्रेम स्मरणाने आपलेही पितर उत्तम गतीला जातील. म्हणून त्यांच्या पावन चरणीं दंडवत घालून आपणही  श्रीगुरुभक्तीरूपी प्रसादयाचना करूया आणि त्यांच्या लीलाकथांचे सप्रेम अनुशीलन व अनुगमन करून, श्रीगुरुभक्तिप्रासादाच्या या महाद्वारातून आत प्रवेश करूया !

लेखक - रोहन विजय उपळेकर भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
rohanupalekar.blogspot.in )

13 comments:

  1. अप्रतिम.... 🙏🙏

    ReplyDelete
  2. श्रीराम समर्थ

    ReplyDelete
  3. ब्रह्मानंद महाराजाम्बद्दल ही नवीन माहिती मिळाली आणि ते श्रीमहाराजान्चे का पट्टशिश्य होते हे उमगले ! धन्यवाद !

    ReplyDelete
  4. नेहमीप्रमाणे छानच!! गुरूभक्तीचा वस्तुपाठ!!

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर

    ReplyDelete
  6. असा शिष्य नि असा गुरू ,शतशः दंडवत

    ReplyDelete
  7. Nitin Kalambe10/02/2024 5:55 pm

    अतिशय सुंदर

    ReplyDelete
  8. श्रीराम जय राम जय जय राम ll 🌹🙏🌹ll

    ReplyDelete
  9. धन्य ते गुरु व धन्य ते शिष्य ।।श्रीराम समर्थ।। जय श्रीराम।।

    ReplyDelete