*** आदिशक्तिचें कवतुक मोठें *** ** चतुर्थोल्लास **
आज नवरात्रीची चौथी माळ, पण तिथीने आश्विन शुद्ध तृतीयाच आहे.
श्रीमहालक्ष्मी, श्रीमहाकाली आणि श्रीमहासरस्वती ही भगवती जगदंबेची त्रिगुणात्मक मुख्य स्वरूपे आहेत. भगवान महाविष्णूंची शक्ती हीच सत्त्वगुणात्मक महालक्ष्मी होय. भगवान महाशिवांची शक्ती ही तमोगुणी महाकाली होय. भगवान महाब्रह्मा यांची शक्ती हीच रजोगुणी महासरस्वती मानली जाते. विश्वाचे सृजन, पालन व संहार करण्याचे कार्य ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन शक्तींच्याच माध्यमातून करतात. महालक्ष्मी ही वैभवाची, संपन्नतेची अधिष्ठात्री तर महासरस्वती ही ज्ञानाची स्वामिनी आहे आणि महाकाली ही महामृत्यूची देवता.
या तीन स्वरूपांचे आणि त्यांच्या लीलांचे फार सुंदर वर्णन मार्कंडेय पुराणांतर्गत येणा-या " श्रीदुर्गासप्तशती " या अत्यंत अद्भुत ग्रंथामध्ये केलेले आहे. देवीच्या उपासकांमध्ये या मंत्रमय सप्तशती ग्रंथाला वेदतुल्य मानून, साक्षात् श्रीजगदंबेचे वाङ्मयरूप समजूनच उपासना केली जाते. ' चिंतामणी' समान फलप्राप्ती करवून देणारा हा ग्रंथ, जणू काही संपूर्ण वेदविद्येचे सारच आहे. सप्तशतीचे अतिशय अनोखे आणि विलक्षण असे हजारो अनुभव उपासकांनी ग्रथित करून ठेवलेले पाहायला मिळतात.
या सातशे श्लोकांच्या प्रासादिक ग्रंथामध्ये, प्रथमचरित्र, मध्यमचरित्र आणि उत्तरचरित्र असे तीन भाग मिळून एकूण तेरा अध्याय आहेत. सुरथ राजा व समाधि वैश्य या दोन देवीभक्तांनी श्रीजगदंबेची कृपा कशी प्राप्त करून घेतली, हे सांगण्याच्या निमित्ताने भगवान मार्कंडेय ऋषींनी ही कथा सांगितलेली आहे. यामधून श्रीजगदंबा भगवतीच्या याच तीन स्वरूपांमधून झालेले विविध अवतार व त्यांच्या मनोहर लीला रसाळ भाषेत सांगितलेल्या आहेत. अचिंत्य अशा देवीरूपाचे तात्त्विक दर्शन घडवण्यासाठी व उपासकांना ज्ञान प्रदान करण्यासाठी दुर्गा सप्तशतीची रचना केलेली आहे. हा संपूर्ण ग्रंथ मंत्रमय असून अद्भुत फलदायी मानला जातो. श्रीभगवती जगदंबा मातु:श्रींनाही या सप्तशतीचे विशेष प्रेम आहे. म्हणूनच श्रीजगदंबेचा कृपाप्रसाद व्हावा यासाठी थोर थोर महात्मेही याचे आवर्जून पाठ करताना दिसतात.
सप्तशतीचे पाठ करण्याचे स्वतंत्र शास्त्र आहे. त्याचे काही आवश्यक नियम पाळूनच ते केले पाहिजे. त्यात आपल्या मनाने बदल करून वाटेल तसे वागणे चूक आहे. सप्तशतीची संथा झाल्याशिवाय म्हणजे योग्य व्यक्तीकडून शिकून घेतल्याशिवाय पाठ करण्याचा अधिकारच मिळत नाही. हा ग्रंथ पूर्ण मंत्ररूप असल्यामुळे चुकीच्या उच्चारांचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. त्याऐवजी सप्तशतीत आलेली स्तोत्रे म्हणणे जास्त सोपे आहे, असे महात्मे सांगतात.
आपल्या वारकरी संतांनी त्यांचे आराध्य दैवत असणा-या भगवान पंढरीनाथांचेच जगज्जननीच्या स्वरूपात पूजन, वर्णन केलेले आहे. पंढरीचे सर्वश्रेष्ठ दैवत भगवान पंढरीनाथच त्यांची विठाई माउली होतात आणि ते संत तिचे अजाण लेकरू होतात. तिच्या अलौकिक वात्सल्यप्रेमाची, तिच्या विलक्षण मायकुशीची इच्छा करीत तिचे गुणगान गातात. मग ती विठाई माउली देखील प्रेमपडिभराने आपल्या या लेकरांना उचलून कडेवर घेते व त्वरित आपला कृपा-पदर त्यांच्यावर पांघरून त्यांना आपले प्रेमस्तन्य पाजून धन्य करते ! ' विठो माझा लेकुरवाळा । ' म्हणवून घेण्यात, आपल्या लाडक्या बाळांना अंगाखांद्यावर खेळवत ते संपन्न लेकुरवाळेपण मिरवण्यातच या कृष्णाई कान्हाई माउलीला खरा आनंद आहे !
भगवान सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउली तर अपूर्व अवतार आहेत. ते एकीकडे भगवान पंढरीनाथांचे अबोध लेकरू आहेत, तर तेच दुसरीकडे सर्व संतांची मायमाउली देखील आहेत. काय अद्भुत आहे ना त्यांची ही लीला? वात्सल्यप्रेमाचा असा उभयरूप आविष्कार क्वचितच इतरत्र पाहायला मिळेल. त्यांनी मोठ्या प्रेमळ शब्दांत विठाईमाउलीची स्तुती करीत रचलेल्या अशाच एका सुप्रसिद्ध व अत्यंत भावपूर्ण अभंगाद्वारे, आज नवरात्रीच्या चौथ्या माळेला आपण भगवती जगत्रयजननी आई श्रीजगदंबेच्या चरणीं नतमस्तक होऊया ! " आमच्या हृदयात लवकरात लवकर प्रकट होऊन तेथेच कायमचा निवास कर ", अशी प्रार्थना तिच्या परमकोमल श्रीचरणीं करून, उदो बोला उदो उदो सद्गुरुमाउलीचा वो " असा जयजयकार करूया !!
रंगा येई वो ये रंगा येई वो ये ॥
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥
वैकुंठवासिनी वो जगत्रयजननी ।
तुझा वेधु ये मनीं वो ॥१॥
कटीं कर विराजित मुकुट रत्नजडित ।
पीतांबरु कासिया तैसी येई कां धावत ॥२॥
विश्वरूप विश्वंभरे कमळनयने कमळाकारे वो ।
तुझे ध्यान लागो बापरखुमादेविवरे वो ॥३॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )
श्री दुर्गा सप्तशती एक परम रहस्यमय, अतिशय गूढ ग्रंथ आहे। श्री सद्गुरु कृपेने श्री भगवतीची कृपा होते।
ReplyDeleteVery nice blog.
ReplyDelete🙏🙏🙏💐💐💐
ReplyDeleteखूपच सुंदर...
फक्त नमस्कार, दंडवत, प्रणाम..🙏🙏🙏
यथार्थ भावविभोर शब्दांकन 🙏🙏
ReplyDeleteयथार्थ भावविभोर शब्दांकन 🙏🙏
ReplyDelete