26 Feb 2019

भाग्य आम्हीं ताई देखियेल्या



जे थोर महात्मे देहातच ब्रह्मस्वरूप झालेले असतात, त्यांच्या कोणत्याच लीला पांचभौतिक राहिलेल्या नसतात. मग तो देह सोडण्याचा का प्रसंग असेना, ती देखील त्यांची एक लीलाच ठरते. कालच्या माघ कृष्ण सप्तमीला पुनश्च पावन करीत, राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या पूर्णकृपांकित व प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी, भक्तिमार्गातील परमोच्च आणि अद्वितीय अधिकार असलेल्या, परमाराध्य प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे यांनी अशीच ७२ वर्षांची एक अद्भुत लीला साकारून, गोलोकधामातील आपल्या नित्यलीलेत पुन्हा प्रवेश केला.
सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात,
कां झाकलिये घटींचा दिवा ।
नेणिजे काय जाहला केव्हां ।
या रीती जो पांडवा ।
देह ठेवी ॥ ज्ञाने.८.१०.९८ ॥
"घटात झाकून ठेवलेला एखादा दिवा जसा आतल्या आत केव्हा शांत झाला हे बाहेर कळतही नाही, अगदी तशाच प्रकारे, घंटेचा नाद त्या घंटेतच पुन्हा लय पावावा, विरून जावा, तसा देहातच ब्रह्मस्वरूपच झालेला महात्मा आपल्या नश्वर देहाचा त्याग करून ब्रह्मरूप होऊन जातो !"
प.पू.सौ.शकाताईंच्या परमदिव्य गुरुपरंपरेचेच हे वैशिष्ट्य म्हणायला हवे. श्रीस्वामीतनया प.पू.सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे, त्यांचे शिष्योत्तम व पुत्र प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज आणि आता प.पू.श्री.मामांच्याच मानसकन्या प.पू.सौ.ताई ; या तिघांनीही झाकलेल्या दिव्याप्रमाणेच आपली मर्त्यलोकातली लीला आवरून घेतली. सद्गुरु श्री माउलींची ओवी न् ओवी प्रत्यक्ष जगून दाखवण्याचीही अद्भुत परंपरा या गुरुपरंपरेत पाहायला मिळते !
या मृत्युलोकात आलेले सर्वच आपले देह इथेच सोडून जातात, कोणीच अपवाद नाहीत. प्रत्यक्ष श्रीभगवंत देह ठेवतात, तसेच महात्मेही देह ठेवतात ; अगदी कपडे बदलावेत असा. त्यांच्यासाठी जाणे-येणे हे काही वेगळे नसतेच. तीही त्यांची एक सहजलीला. पण पांचभौतिकातच राहणा-या तुम्हां-आम्हां सर्वांसाठी, त्या निर्गुणब्रह्माचेच सर्व गुण अंगी मिरवणा-या आपल्या श्रीसद्गुरूंच्या सगुण स्वरूपाचे नाहीसे होणे क्लेशदायकच ठरते. आपले सद्गुरु कुठेही गेलेले नाहीत, मुळात ते गेलेलेच नाहीत, ते सदैव आपल्या हृदयात, स्मरणात साक्षात् आहेतच ; हे जरी मनोमन पटत असले तरीही ; ज्या दिव्यपावन देहातून त्यांनी आपल्यावर कृपेचा वर्षाव केला, आपले लाड पुरवले, गोड आवाजात अनेकवेळा हाक मारली, प्रसंगी लटका राग दाखवून आपल्या दोषांची जाणीव करून दिली, भरभरून निखळ आणि निरपेक्ष प्रेम केले, सेवा करवून घेतली, सहज घडणा-या प्रसंगांमधून देखील अध्यात्माची गूढगहन तत्त्वे समजावून सांगितली, मायेने पाठीवरून हात फिरवला, वात्सल्याने गोंजारले, समजूत काढली, मनस्थिती बिघडलेली असताना आतून बाहेरून सावरले, परमार्थाला लावले, कर्माने समोर येणा-या प्रत्येक प्रसंगांतून श्रीभगवंतांच्या जवळ कसे जावे हे शिकवले, प्रत्येक गोष्टीतून भगवंतांचेच सौंदर्य कसे पाहावे याचा स्वत:च्या वर्तनातून वस्तुपाठ घालून दिला, अगदी हाताला धरून भाजी चिरण्यापासून ते पुरणपोळी करण्यापर्यंत सर्वकाही हातचे काहीही न राखता शिकवले, जीवनाचा खरा आनंद उपभोगण्याची दुर्मिळ कला आत्मसात करविली आणि आपल्या देवदुर्लभ प्रेमकृपेचे पांघरूण घालून सर्व बाबतीत संरक्षण केले व अजूनही करीत अाहेत ; तो पांचभौतिक दिसत असला तरी चिन्मयच असणारा देह इथेच ठेवून दिला व आपल्या मूळच्या स्वरूपात पुन्हा कायमचा प्रवेश केला ; हे दु:ख कसे सहन करायचे ? आता तो मायेचा हात दृश्य स्वरूपात पुन्हा कधीच पाठीवरून फिरणार नाही, या जीवघेण्या दुर्दैवाची भळभळती जाणीव कशी घालवायची ?? आता ते त्रिभुवनमोहक वात्सल्यपूर्ण हास्य पुन्हा कधी पाहायला मिळणार ? आणि तो मातृत्वाने भारलेला, करुणेने ओथंबलेला गोड आवाज पुन्हा कधी ऐकायला मिळणार ? यांसारख्या असंख्य अनाकलनीय प्रश्नांची उत्तरे आता मी कोणाला विचारायची ??
श्रीसद्गुरु हे व्यक्ती नसून तत्त्व आहेत ; हे मनोमन पटलेलेही आहे. पण तरीही ते तत्त्व ज्या देहाच्या आश्रयाने समोर होते, तो दिव्य देह आता पुन्हा समोर दिसणार नाही, हा विचारच फार फार भयानक आहे. पण आता ते लीलामय सगुण रूपडे तत्त्वत:च पाहावे लागणार आहे. त्यासाठीचे बळ आता तेच सद्गुरुतत्त्व आम्हां सर्वांना प्रदान करो, ही प्रार्थना.
श्रीभगवंतांच्या परमकृपेने बावीस वर्षे मला प.पू.सौ.ताईंचा पावन सहवास लाभला. श्रीक्षेत्र दत्तधाम येथे दरवर्षी साधारणपणे दोन महिने त्यांच्या बरोबर राहता आले, त्यांची जमेल तशी सेवा करता आली, या महद्भाग्याची खरोखर कशाशीही तुलना करता येणार नाही. सद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, "धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां । भाग्य आम्हीं तुका देखियेला ॥" हाच भाव या क्षणी माझ्या मनात आहे. खरोखर सांगतो, भाग्य आम्हीं ताई देखियेल्या । हेच सत्य आहे. प.पू.सौ.ताईंनी सदैव साधनेचा पुरस्कार केला, साधनेचाच ध्यास धरला, त्याच साधनेचा वसा आणि वारसा त्यांनी स्वत: जोपासून आपल्यालाही प्रदान केला आहे. तो वसा प्राणपणाने जपून आणि त्यांच्या उपदेशानुसार वर्तन करून त्यांना आनंद होईल हे पाहणे, हीच त्यांच्या पुण्यस्मृतीस वाहिलेली खरी आदरांजली ठरणार आहे !
प.पू.सद्गुरु सौ.शकाताईंच्या श्रीचरणीं प्रेमभावपूर्वक श्रद्धा-सुमनांजली समर्पितो आणि अनंतकोटी दंडवत प्रणाम करतो !!
- रोहन विजय उपळेकर
[ लेखासोबतचे चित्र प.पू.सौ.ताईंच्या साधनबोध या ग्रंथातील असून, या प्रसंगावर अतिशय नेमके भाष्य करणारे आहे. ]

23 Feb 2019

औदुंबर पंचमी

आज माघ कृष्ण पंचमी, या तिथीला औदुंबर पंचमी म्हणतात. श्रीदत्तसंप्रदायात औदुंबर वृक्षाचे माहात्म्य खूप गायलेले आहे. औदुंबर वृक्षाच्या ठायी साक्षात् भगवान श्रीदत्तप्रभूंचाच वास असतो, म्हणून औदुंबरवृक्ष पूजनीय मानला जातो. औदुंबराचे माहात्म्य परमपावन श्रीगुरुचरित्राच्या एकोणिसाव्या अध्यायामध्ये सविस्तर वर्णिलेले आहे. कल्पवृक्षसम औदुंबराच्या नित्य पूजनाने व सेवेने श्रीदत्तप्रभूंची कृपा लाभते.
आजच्या तिथीला श्रीक्षेत्र औदुंबर व श्रीनृसिंहवाडी येथे खूप महत्त्व असते. तसेच आज श्रीसंत श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंती असते. अशा या पुण्यपावन तिथीचे माहात्म्य खालील लिंकवरील लेखात वर्णिलेले आहे.
https://rohanupalekar.blogspot.com/2018/02/blog-post_5.html

22 Feb 2019

नमन गुरुराया स्वामी लोकनाथ सदया

नमस्कार !!
आज माघ कृष्ण तृतीया,
श्रीसंत नरहरी सोनार महाराज व प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांची पुण्यतिथी !
सद्गुरु श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराज हे कोमल अंत:करणाचे दैवी सद्गुणसंपत्तीने युक्त असे थोर संन्यासी होते. अतिशय ऋजू वृत्तीचे स्वामी महाराज, कोणी शास्त्रविरुद्ध वागले किंवा परंपरेच्या दंडकाविरुद्ध वागले तर रौद्र रूप धारण करून त्याला रागावत असत. शक्तिपातदीक्षेच्या बाबतीत तर ते अत्यंत काटेकोर होते. सध्याच्या काळात शिष्याचा कोणताही अधिकार न पाहता, खिरापतीसारखी वाटली जाणारी शक्तिपात दीक्षा पाहून, त्यांनी असल्या तथाकथित दीक्षाधिकारी लोकांना बडवूनच काढले असते. पण शेवटी कलियुगाचाच महिमा आहे हा, इथे खोट्यालाच खरे म्हटले जाते. असो. आज त्यामुळेच तर प.प.श्री.लोकनीथतीर्थ स्वामी महाराजांचे विशेष स्मरण होते. त्यांच्यासारखे काटेकोर, शास्त्रशुद्ध आचार-विचार असणारे महात्मे फार दुर्मिळ होत चाललेले आहेत.
या दोन्ही महात्म्यांच्या चरित्रावर अल्पसा प्रकाश टाकणारा खालील लिंकवरील लेख आवर्जून वाचावा ही विनंती.
नमन गुरुराया स्वामी लोकनाथ सदया
https://rohanupalekar.blogspot.com/2018/02/blog-post.html?m=1

20 Feb 2019

श्रीगुरुप्रतिपदा

आज श्रीगुरुप्रतिपदा !!
श्रीदत्तसंप्रदायातील एक महत्त्वाची तिथी. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची शैल्यगमन तिथी व सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराजांची जयंती.
आजच्या पावन तिथीला श्रीसद्गुरु भगवंतांचे मनोभावे व प्रेमाने स्मरण करणे हे आपले कर्तव्य आणि परमभाग्य देखील आहे.
यासाठीच आपण श्रीपादुका रूपाने साकारलेल्या श्रीसद्गुरुकृपाशक्तीच्या सगुण स्वरूपाचे माहात्म्य जाणून घेऊ या व सदैव त्याच श्रीचरणीं शरणागत राहून आपलेही जीवन धन्य करू या !!
तेचि वंदू श्रीचरण
https://rohanupalekar.blogspot.com/2017/02/blog-post_11.html?m=1

10 Feb 2019

आज वसंत पंचमी


अतिशय महत्त्वपूर्ण मुहूर्तांपैकी एक सुमुहूर्त. म्हणूनच खालील लिंकवरील लेखात आजच्या पावन तिथीचे धार्मिक महत्त्व अधोरेखित केलेले आहे.
भगवती श्रीशारदेच्या या पावन तिथीला, आम्हां सर्व साधकांना अलौकिक आत्मज्ञान प्रदान करण्याची तिला मनोभावे प्रार्थना करू या ! श्रीसद्गुरुकृपेचा, आत्मबोधाचा प्रसन्न वसंत आमच्याही हृदयवनात भरभरून फुलावा आणि त्यायोगे आमचेही जीवन धन्य व्हावे, अशीच सप्रेम प्रार्थना आजच्या पुण्यदिनी श्रीसद्गुरुचरणीं करू या !
वसंतपंचमीचा सुमुहूर्त
https://rohanupalekar.blogspot.com/2017/02/blog-post.html?m=1

6 Feb 2019

श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनीचा अमृतयोग

आज माघ शुद्ध द्वितीया, प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांची १३१ वी जयंती. त्यानिमित्त श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
प.पू.श्री.काकांच्या चरित्रावर आजवर बरेच लिहिले गेले. नुकतेच प.पू.श्री.काकांच्या पुण्यतिथीला त्यांचे अल्पचरित्र व भक्तांच्या आजवर अप्रकाशित असलेल्या अतर्क्य व अलौकिक हकिकतींवरील स्वानंदचक्रवर्ती हा ग्रंथही प्रकाशित झाला. तुम्हां सर्व सद्भक्त वाचकांच्या उत्तम प्रतिसादाने या सुरेख ग्रंथाच्या सहाशेपेक्षा जास्त प्रती संपल्या देखील. अनेक वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या, ग्रंथ आवडल्याचे मनापासून कळवले. हा सर्व मी प.पू.श्री.काकांचाच अमोघ कृपाप्रसाद समजतो. कारण तेच तुम्हां वाचकांच्या रूपाने आमच्या पाठीवरून कौतुकाचा हात फिरवीत आहेत. आता पुढच्या ग्रंथाचे कामही त्यांच्याच कृपेने सुरू झालेले आहे.
प.पू.सद्गुरु श्री.काकांच्या अद्भुत कृपेचा एक विलक्षण प्रत्यय नुकताच आला. प.पू.श्री.काकांनी श्री ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांवरील आपले स्वानुभूत निगूढ चिंतन श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनी या नावाने प्रकाशित केले होते. हे अठरा खंड मिळून जवळपास अडीच हजार पृष्ठांचे अलौकिक वाङ्मय माउलीकृपेने निर्माण झाले. आजमितीस हे सर्व ग्रंथ दुर्मिळ झालेले आहेत. अनेक भाविक वाचक वारंवार मागणी करीत असूनही आम्ही ते उपलब्ध करवून देऊ शकलो नव्हतो. परवा नेटवर सर्च करीत असताना, अमेरिकेत राहणारे प.पू.काकांचे एक भक्त श्री.सुमित अध्यापक यांना हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाने त्यांच्या ग्रंथालयातील पू.काकांचे काही वाङ्मय स्कॅन करून अपलोड केलेले सापडले. त्यांनी अत्यानंदाने पुण्यातील आपले बंधू श्री.पराग अध्यापक यांना त्या पीडीएफ पाठवल्या. तेच सर्व अक्षरधन श्री.सचिन प्रभुणे यांनी तातडीने गुगल ड्राईव्हवर अपलोड करून दिले. त्यांच्या लिंक्स या लेखासोबत जोडलेल्या आहेत. आपण त्या लिंक्सवरून प.पू.श्री.काकांचे हे वाङ्मय डाऊनलोड करून प्रेमाने वाचावे ही प्रार्थना. या निरलस सेवेसाठी अध्यापक बंधूंचे व प्रभुणे यांचे मी सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो.
एरवी एवढे प्रचंड वाङ्मय स्कॅन करणे आम्हांला शक्य झाले नसते. देवदयेने स्कॅन केलेलेच सापडले. ही नि:संशय प.पू.श्री.काकांचीच करुणाकृपा आहे.
यामध्ये श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनीचे १ ते ६, ९, ११ ते १४ व १८ असे एकूण बारा अध्याय ( एकूण २५० MB ) आहेत. यातील केवळ सहाव्या अध्यायाचे संस्कृत भाषांतर आहे, बाकी सर्व मराठीमध्येच आहेत. प.पू.श्री.काकांच्या कृपेने लवकरच इतरही वाङ्मय अशाप्रकारे उपलब्ध करून देता येवो, हीच त्यांना कळकळीची प्रार्थना आहे.
[ खालील लिंक्स वरून श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनीचे बारा अध्याय स्वतंत्रपणे डाऊनलोड करून घेता येतील.
श्रीज्ञानेश्वरी - सुबोधिनी अध्याय - १
https://drive.google.com/file/d/1RRMKTcfiw4hy7T9mADUs9R7fpxjThxIw/view?usp=drivesdk
श्रीज्ञानेश्वरी - सुबोधिनी अध्याय - २
https://drive.google.com/file/d/1PAYsRhmg_xw4AHf1ODQxp6MHO7gts3-y/view?usp=drivesdk
श्रीज्ञानेश्वरी - सुबोधिनी अध्याय - ३
https://drive.google.com/file/d/19NiwWn7l8eYDuz3-9hPnMElGzFV63O98/view?usp=drivesdk
श्रीज्ञानेश्वरी - सुबोधिनी अध्याय - ४
https://drive.google.com/file/d/12nSxrLvpZDQ3I4nEezHYtmvEIi6FrxRR/view?usp=drivesdk
श्रीज्ञानेश्वरी - सुबोधिनी अध्याय - ५
https://drive.google.com/file/d/17mnLxefPWisdvDFJOsrpaMoAwJH5t48m/view?usp=drivesdk
श्रीज्ञानेश्वरी - सुबोधिनी अध्याय - ६
https://drive.google.com/file/d/1mtdcp9olpWvxWoboaEj41l0m1-erJ0Sy/view?usp=drivesdk
श्रीज्ञानेश्वरी - सुबोधिनी अध्याय - ९
https://drive.google.com/file/d/1NICMrQjVb0Kl8633THtC2lGHHsZN-oIu/view?usp=drivesdk
श्रीज्ञानेश्वरी - सुबोधिनी अध्याय - ११
https://drive.google.com/file/d/1EPq-ZTBDS-mHqRxU3fANYZ7qmhWwiwya/view?usp=drivesdk
श्रीज्ञानेश्वरी - सुबोधिनी अध्याय - १२
https://drive.google.com/file/d/1_FON7yycYh1-YmpOa_7w51vmPIPhdfTw/view?usp=drivesdk
श्रीज्ञानेश्वरी - सुबोधिनी अध्याय - १३
https://drive.google.com/file/d/1YO0hZTuq0ynKZCFWKe0UPGZJT3wGtx2h/view?usp=drivesdk
श्रीज्ञानेश्वरी - सुबोधिनी अध्याय - १४
https://drive.google.com/file/d/1MrcjQ7ywDfb-w_fzGxJHRUe1UQyWeY-i/view?usp=drivesdk
श्रीज्ञानेश्वरी - सुबोधिनी अध्याय - १८
https://drive.google.com/file/d/1GBsYfHUOWn7POV45MopZpMrin8escNI1/view?usp=drivesdk ]
श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनी हे प.पू.काकांनी श्रीज्ञानेश्वरीवर स्वानुभवपूर्वक लिहिलेले भाष्य आहे. नाव जरी सुबोधिनी असले तरी वस्तुत: एका अलौकिक अशा अवधूती स्थितीमध्ये लिहिलेले असल्याने हे भाष्य तसे सोपे नाही. तसेच प.पू.काकांच्या पल्लेदार वाक्यशैलीची सवय झाल्याशिवाय ते नीट उमजतही नाही. तरीही सद्गुरु श्री माउलींच्याच अपरंपार करुणाकृपेचा प्रसन्न आविष्कार असणारी ही सुबोधिनी वाचकाला आनंददायक ठरेलच, यात अजिबात शंका नाही.
आज हे भाष्य आपल्याला उपलब्ध करून देताना प.पू.श्री.काकांच्या स्मरणाने भरून आलेले आहे. त्यांनी आपल्या कृपेने आम्हां सर्वांकडून अशीच अविरत सेवा घडवून घ्यावी हीच याप्रसंगी मनोभावे प्रार्थना !!
( प.पू.श्री.काकांवरील 'स्वानंदचक्रवर्ती' ग्रंथ पाहिजे असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा. सेवामूल्य रु.५०/- मात्र. )
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481