29 Mar 2019

श्रीज्ञानेश्‍वरीचे अपूर्व भाष्यकार - प.पू.सद्गुरु श्री.मामा



‘‘आई, श्री ज्ञानेश्‍वर माउली ‘पायाळू’ हा शब्द खूप वेळा वापरतात. ‘पायाळू’ चा नेमका अर्थ काय गं ?’’ त्यावर मातु:श्री म्हणतात, ‘‘सख्या, सांग बरे, आपण ‘मायाळू’ कोणाला म्हणतो ? तर ज्याच्या हृदयात सर्वांविषयी अपार माया असते, तो मायाळू. तसे ज्याच्या हृदयात सद्गुरूंचे पाय, श्रीचरण अखंड प्रतिष्ठापित असतात तोच पायाळू.’’ असा माउलींच्या दिव्य शब्दांचा विलक्षण आणि अपूर्व अर्थ सांगणार्‍या मातु:श्री म्हणजेच राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण कृपांकित प.पू.सद्गुरु पार्वतीदेवी देशपांडे होत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजेच थोर स्वातंत्र्यसेनानी व विश्‍वविख्यात सत्पुरुष, प.पू.सद्गुरु श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे हे होत. आज फाल्गुन कृष्ण नवमी, २९ मार्च २०१९ रोजी पू.श्री.मामांची २९ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त या अलौकिक प्रतिभासंपन्न ज्ञानेश्‍वरी अभ्यासकाच्या कार्याचा हा अल्प परिचय.
प.पू.श्री.मामासाहेब हे भगवान श्री ज्ञानेश्‍वर माउलींचे निष्ठावंत भक्त व संतवाङ्मयाचे साक्षेपी, रसज्ञ अभ्यासक होते. ‘माउली’ हे त्यांचे हृदय अधिष्ठाते होते. माउलींच्या वाङ्मयाचा अखंड अभ्यास हा त्यांचा एकमात्र ध्यास होता. माउलींच्या वाङ्मयाच्या शब्दान् शब्दावर त्यांनी सखोल चिंतन केलेले होते. झोपेतून उठल्याक्षणीसुद्धा ते माउलींच्या ओव्यांचे चिंतन करू शकत असत. इतकी ज्ञानेश्‍वरी त्यांच्या आत मुरलेली होती. एवढा प्रचंड अधिकार असूनही हा थोर उपासक आजन्म स्वत:ला माउलींचा दासानुदास मानीत होता. स्वत:ची अभ्यासू वृत्ती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ताजी, टवटवीत ठेवलेली होती. म्हणूनच माउलींच्या कृपेने त्यांचा हृदयगाभारा अलौकिक ज्ञानतेजाने लखलखीत उजळलेला होता. 
प.पू.श्री.मामांचा जन्म प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या आशीर्वादाने व त्यांच्याच अंशाने झाला. आषाढ शुद्ध द्वितीया, २५ जून १९१४ रोजी प.पू.दत्तोपंत व प.पू.सौ.पार्वतीदेवी देशपांडे या सत्त्वशील दांपत्याच्या पोटी पू.मामा जन्मले. त्यांना सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवींकडून श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेची शक्तिपातदीक्षा लाभली. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना भगवान श्रीपंढरीनाथांचा सगुणसाक्षात्कार झाला. पुढे योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांकडून शक्तिपातपूर्वक मंत्रदीक्षाही त्यांना लाभली. त्यांच्यावर श्री ज्ञानेश्वर माउलींचीही पूर्णकृपा होती. अशाप्रकारे प.पू.श्री.मामा हे नाथ-दत्त-भागवत या तिन्ही संप्रदायांचे थोर अध्वर्यू ठरले.
प.पू.श्री.मामांनी आजन्म पंढरीची वारी केली. संपूर्ण हयातीत लाखो प्रवचनांच्या माध्यमातून श्री माउलींचा ज्ञानसंदेश जनमानसात वितरित केला. १९७३ साली इंग्लंडमधील त्यांच्या प्रवचनांनी भारावून जाऊन अनेक परदेशी व्यक्तींनी देखील ज्ञानेश्‍वरीचा अभ्यास सुरू केला. संतविचारांच्या आधारे उपासनेला सुरुवात केली.
प.पू.मामा हे तरुणपणी उत्तम नाट्य दिग्दर्शक व नाट्य क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी माउलींच्या जीवनावर लिहिलेले ‘चैतन्य चक्रवर्ती’ हे चार अंकी संगीत नाटक अतिशय बहारीचे आहे. त्यांच्या संहितेवरूनच काही वर्षांपूर्वी ‘ज्ञानोबा माझा’ हे संगीत-नाटक रंगभूमीवर आले व हिंदुस्थानभर गाजले होते. 
श्री माउलींचे वाङ्मय हे बहुआयामी, प्रगल्भ आणि एकाच वेळी अनेक अर्थांनी प्रकटणारे आहे. त्यासाठी त्याचा अभ्यासकही तसाच अष्टावधानी, रसज्ञ, अभिजात सौंदर्यदृष्टी असणारा व भक्तिमानच असावा लागतो. तरच त्याच्या बुद्धीत माउलींच्या साहित्याचे बीज रुजते. पू.मामा हे माउलींच्या वाङ्मयाचे असेच आदर्श अभ्यासक होते. त्यांची दृष्टीदेखील माउलींसारखीच सूक्ष्म आणि शुद्ध होती. माउलींना नेमके काय म्हणायचे आहे? हे त्यांना अचूक समजत असे. ज्ञानेश्‍वरीच्या अतिशय कठीण समजल्या जाणार्‍या सहाव्या अध्यायातील अभ्यासयोगावर फारच थोड्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. या विषयावरील पू.मामांचेच विवरण जगभर प्रमाण मानण्यात येते. त्यांना आजवरच्या सर्वच थोर महात्म्यांनी व विचारवंतांनी ‘ज्ञानेश्‍वरीचे अपूर्व भाष्यकार’ म्हणून एकमुखाने गौरविले आहे. आचार्य अत्रे देखील पू.मामांकडे येऊन आवर्जून ज्ञानेश्‍वरीचे मार्गदर्शन घेत असत.
 [  प.पू.मामांचे चरित्र पूर्वी एका स्वतंत्र लेखमालेद्वारे लिहिले गेले होते. त्या अल्पचरित्राची पीडीएफ खालील लिंकवर उपलब्ध आहे. ज्यांना वाचायची असेल त्यांनी डाऊनलोड करून घ्यावी. 
झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wQTNHanAzM01KWHM/view ]
प.पू.मामा हे फार दूरदृष्टीचे महात्मे होते. प्रवचनांमधून सांगितलेले ज्ञान हे तेवढ्यापुरतेच राहते. त्यातले सगळे काही लोकांच्या लक्षात राहत नाही. पण त्याच उपदेशाचे संकलन जर पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर मात्र त्याचा लाभ अनंत काळपर्यंत होत राहतो. याच संपन्न जाणिवेतून पू. मामांनी ‘श्रीवामनराज प्रकाशन’ नावाने एक संस्था स्थापन करून माउलींच्या व इतर संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास पुस्तकांच्या माध्यमातून ना नफा तत्त्वावर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आजमितीस अडीचशे पुस्तके  प्रकाशित करून अल्पदरात विक्री करणारी ही एकमात्र आध्यात्मिक प्रकाशन संस्था म्हणून विख्यात आहे. माउलींचे वाङ्मय जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा पू.मामांचा एक महान संकल्पही हळूहळू पूर्ण होत आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून जगाच्या पाचही खंडांमध्ये मराठी संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास होत आहे ही फार अभिमानाचीच बाब आहे. 
आजच्या या पुण्यतिथी-योगाचे औचित्य साधून ज्ञानेश्‍वरीच्या या अलौकिक आणि अपूर्व भाष्यकाराच्या, प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या श्रीचरणीं ही सप्रेम शब्दसुमनांजली अर्पण असो ! त्यांनी लावलेली ही ज्ञानज्योत आपण सर्वांनी अनुसरून हा अभ्यास-वसा जोपासणे, वाढवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व प.पू.श्री.मामांचे अत्यंत दृढ प्रेमनाते होते. आषाढी वारीतील फलटण मुक्कामात व इतरही वेळी प.पू.मामा प.पू.काकांकडे येत असत. दोघांची ज्ञानेश्वरी या अत्यंत जिव्हाळ्याच्या  विषयावर सखोल चर्चा होत असे. प.पू.काकांनी एकदा प.पू.मामांच्या मनातील गोष्ट जाणून न विचारताच त्यांना अडलेल्या काही ओव्यांचे मार्गदर्शन आपणहून केले होते. प.पू.मामा नेहमीच प.पू.काकांविषयी अतीव प्रेमादराने बोलत असत. या दोन थोर ज्ञानेश्वरी-भक्तांची प्रत्येक भेट अवर्णनीयच होत असे.
फाल्गुन कृष्ण नवमी, दि.२१ मार्च १९९० रोजी पहाटे तीन वाजता पूर्वसूचना देऊन प.पू.श्री.मामा श्रीदत्तब्रह्मी लीन झाले. त्यांनी स्थापन केलेल्या श्रीपाद सेवा मंडळ या धर्मादाय विश्वस्त संस्थेद्वारे त्यांनीच घालून दिलेल्या आदर्शांनुसार महान कार्य संपन्न होत आहे. प.पू.श्री.मामांचे उत्तराधिकारी प.पू.सौ.शकाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी मंडळाचे कार्य जगभर पोचवलेले आहे. प.पू.सौ.शकाताई आगटे यांनी महिन्याभरापूर्वीच पूर्वसूचना देऊन देहत्याग केला. त्यांच्याही श्रीचरणीं सादर दंडवत.
आजच्या २९ व्या पुण्यतिथी दिनी प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक साष्टांग नमस्कार  !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

26 Mar 2019

जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत

आज श्रीएकनाथ षष्ठी !!
भागवत महामंदिराचे मुख्यस्तंभ असणा-या शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांची आज पुण्यतिथी. आजच्या तिथीला "पंचपर्वा षष्ठी" असे म्हणतात.
आपल्या अमृतोपम वाङ्मयरूपाने अजरामर झालेले श्रीसंत एकनाथ महाराज हे फार विलक्षण महापुरुष होते. त्यांचे समग्र चरित्र हे आदर्श हरिभक्ताचा वस्तुपाठच आहे. सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराजांच्या त्या दिव्यपावन चरित्राचा खालील लिंकवरील लेखात यथामती परामर्श घेतलेला आहे. आजच्या पावन दिनी, या लेखाद्वारे आपणही श्रीचरणीं मनोभावे शब्दसुमनांजली समर्पून श्रीसंत एकनाथ महाराजांचा जयजयकार करू या !!
जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत
https://rohanupalekar.blogspot.com/2017/03/blog-post_18.html?m=1

25 Mar 2019

रंगी रंगला श्रीरंग

आज रंगपंचमी !
महाराष्ट्रात साजरा होणा-या या लौकिक रंगोत्सवाचा निगूढ गहनार्थ संतांनी आपल्या वाङ्मयातून सुरेखपणे मांडलेला आहे. भगवान श्रीपांडुरंगांच्या रंगात रंगलेले महात्मे तर असा रंगोत्सव निरंतर साजरा करीत असतात. आजच्या आनंदी दिनी आपणही संतांच्या त्या बोधमय सप्तरंगात रंगून जाऊन दिव्य रंगपंचमी साजरी करू या ; आणि परमानंदकंद भगवान श्रीपांडुरंगांच्या नाम-गुण-कीर्तिरंगांचा त्रिभुवनपावन रंगोत्सव सप्रेम अनुभवून आनंदमय होऊन जाऊ या !!
रंगी रंगला श्रीरंग
https://rohanupalekar.blogspot.com/2018/03/blog-post_6.html

22 Mar 2019

तुका तोचि तो हा परब्रह्म ठेवा

आज फाल्गुन शुद्ध द्वितीया, अर्थात् श्री तुकाराम बीज. हा वारकरी संप्रदायातला एक सर्वात मोठा महोत्सव आहे. भगवान श्रीपंढरीनाथांचे परमभक्त सद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांची ही वैकुंठगमन तिथी, हा आम्हां वारकरी भक्तांसाठी दसरा-दिवाळीपेक्षाही मोठाच सण आहे. आजच्याच पावन तिथीला सद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान श्रीपंढरीनाथांच्या विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले.
श्रीसंत तुकोबारायांचे परमशिष्य श्रीसंत निळोबाराय महाराज पिंपळनेरकर आपल्या नमनात म्हणतात,
तुका भासला मानवी देहधारी ।
परि हा लीलाविग्रही निर्विकारी ।
स्वयें श्रीहरी व्यापकु सर्वजीवा ।
तुका तोचि तो हा परब्रह्म ठेवा ॥४॥
जयां पूजिलें आदरें पांडुरंगें ।
विमानस्थ केलें प्रयाण प्रसंगे ।
तनु मानवी दिव्य रूपीच केली ।
न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली ॥५॥

"आमचे सद्गुरुमहाराज हे जरी देहधारी भासत असले, तरी ते देहात राहूनही देहसंबंधात गुंतलेले नाहीत, ते या मायेतही पूर्ण निर्विकारीच आहेत. ते साक्षात् लीलाविग्रही भगवान श्रीहरीच आहेत व सर्व विश्व व्यापून उरलेले आहेत. तेच प्रत्यक्ष परब्रह्मरूप आहेत. अहो, ज्यांची साक्षात् परिपूर्णब्रह्म भगवान श्रीपांडुरंगांनी पूजा केली, ज्यांना प्रयाणाच्या प्रसंगी स्वहस्ते दिव्य विमानात बसवून आपल्या सोबत वैकुंठधामी नेले आणि आपला मर्त्य पांचभौतिक देह सुद्धा ज्यांनी दिव्यरूप केला, त्या सद्गुरु श्री तुकोबारायांचा अद्भुत महिमा म्या पामराने कुठवर कथन करावा ?"
खरोखरीच, श्री तुकोबा जन्मभर जे बोलले तेच त्यांनी प्रत्यक्ष करूनही दाखवले. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी । किंवा कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ॥ हे ते नुसते म्हणाले नाहीत, तर त्यांनी स्वत:च ते घडवूनही दाखवले. सद्गुरुकृपेने साधलेल्या सततच्या हरि-कीर्तनभक्तीने आपल्या पांचभौतिक देहासकट ते हरिरूप होऊन ठाकले होते. जे देहातच हरिमय झाले त्यांना देहत्यागसमयी त्या देहाची कसली बंधने अडवू शकणार सांगा बरं ? म्हणूनच, आतबाहेर हरिमय झालेले श्री तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. जशी सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी एकमेवाद्वितीय आहे, तसेच श्री तुकोबांचे वैकुंठगमनही अद्वितीयच आहे !!
आजच्याच पावन तिथीच्या मध्यान्हीला, ३६९ वर्षांपूर्वी वैकुंठगमनाचा तो दिव्य सोहळा साकारला होता. म्हणून या मध्यान्हसमयी आपणही श्री तुकोबांच्या नामाचा जयजयकार करीत त्यांच्या वैकुंठगमनाचा सोहळा बसल्या जागी मनोभावे साकारू या. खालील लिंकवरील लेखात त्या दिव्य सोहळ्याचे आणि सद्गुरु श्री तुकोबारायांचे माहात्म्य यथामती कथन केले आहे. त्याच्या मनन-चिंतनाद्वारे आपणही श्री तुकोबारायांच्या श्रीचरणीं सादर भावपुष्पांजली समर्पू या आणि धन्य धन्य होऊ या !! 
तुकीं तुकला तुका, विश्व भरोनि उरला लोकां
https://rohanupalekar.blogspot.com/2017/03/blog-post_14.html

21 Mar 2019

होलिकोत्सव विशेष - लेखांक दुसरा*

रामीरामदासी होळी केली संसाराची धुळी
आज धूलिवंदन !!
कालच्या होळीच्या राखेने आज अंघोळ करायची असते. उत्तरभारतात आजच रंग खेळतात, आपल्याकडे मात्र रंगपंचमीलाच रंग खेळला जातो.
काल आपण श्रीसंत एकनाथ महाराजांच्या होळीच्या रूपकाचा विचार केला. आज समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेल्या होळीच्या गूढगहन रूपकाचा विचार करू या. सद्गुरु समर्थांनी यात अतिशय मार्मिकपणे परमार्थतत्त्व कथन केले आहे. श्रीसद्गुरुकृपेने प्रस्तुत रूपकाचे खालील लिंकवरील लेखात सविस्तर विवरण केलेले आहे.
https://rohanupalekar.blogspot.com/2017/03/blog-post_13.html

20 Mar 2019

एका जनार्दनी मारिली बोंब

आज हुताशनी पौर्णिमा, आपल्या भाषेत होळी !!
भारतीय सणांमधील एक विशेष सण म्हणजे होळी. दुष्टप्रवृत्तीचा कायम नाशच होतो, हे उच्चरवाने सांगणारा हा महोत्सव.
या होलिकोत्सवावर आपल्या ज्ञानी संतांनी फार सुंदर अशा रूपकात्मक रचना केलेल्या आहेत. असे दोन विशेष अभंग आज व उद्या आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यातील पहिल्या, श्रीसंत एकनाथ महाराजांच्या अभंगाच्या आधारे आपण होलिकोत्सवाचे महत्त्व आजच्या लेखात जाणून घेऊ या.
आजच्या तिथीला ज्यांची जयंती असते त्या श्रीकृष्णप्रेमस्वरूप श्री गौरांग-चैतन्य महाप्रभूंच्याही चरणी नतमस्तक होऊ या !
खालील लिंकवरील लेख आवर्जून वाचावा ही विनंती !!
एका जनार्दनी मारिली बोंब
https://rohanupalekar.blogspot.com/2017/03/blog-post_12.html

17 Mar 2019

श्रीसंत प्रीतिनंद स्वामीकुमार तथा श्री.गोपाळबुवा केळकर

आज फाल्गुन शुद्ध एकादशी. परिपूर्णब्रह्म राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पूर्णकृपांकित शिष्य व श्रीस्वामी समर्थ बखरीचे लेखक श्रीसंत प्रीतिनंद स्वामीकुमार तथा श्री.गोपाळबुवा केळकर यांची आज पुण्यतिथी. आज त्यांची ९९ वी पुण्यतिथी असून, आजपासून त्यांच्या पुण्यतिथी शताब्दीवर्षाला सुरुवात होत आहे.
श्रीसंत गोपाळबुवा हे रंगलेले श्रीस्वामीभक्त होते. त्यांची श्रीस्वामीचरणीं अपरंपार निष्ठा व अनन्य शरणागती होती आणि त्यामुळेच श्रीस्वामीराज माउली त्यांच्यावर पूर्ण वोळलेली होती. ते अखंड स्वामीसेवेतच रममाण असत. म्हणूनच त्यांचे चरित्र आपल्यासारख्यांना सदैव बोधप्रद ठरणारे आहे. खालील लिंकवरील लेखात श्रीसंत गोपाळबुवांच्या चरित्राचे अल्पसे चिंतन मांडलेले आहे. आजच्या पावन दिनी त्यांच्या चरित्राचे वाचन-मनन करून आपणही या अनन्य स्वामीभक्ताच्या श्रीचरणीं सादर भावपुष्पांजली समर्पून धन्य होऊ या !
प्रीतिनंद मागतसे प्रीती सेवादान
https://rohanupalekar.blogspot.com/2017/03/blog-post.html

10 Mar 2019

हृदयीच्या गाभेवनातील अमर देवराई


परमवंदनीय प.पू.सद्गुरु सौ.शकाताई आगटे यांना देह ठेवून आज चौदा दिवस झाले. त्यानिमित्त माझ्या हृदयात निरंतर जपलेल्या त्यांच्या अलौकिक आणि पावन स्मृतिचित्रांचा छोटासा आलेख आजच्या दै.तरुण भारत मधील हृदयीच्या गाभेवनातील अमर देवराई या लेखात मांडलेला आहे. प.पू.सौ.शकाताईंच्या पावन स्मृतीस सादर अभिवादन !!




4 Mar 2019

महाशिवरात्री

आज महाशिवरात्री, आदिदेव भगवान श्रीशिवशंकरांच्या पूजनाचा सर्वोत्तम महायोग !
आशुतोष भगवान श्रीशिव हे परमविलक्षण तत्त्व आहे, ज्याचा थांगपत्ता कोणालाही कधीच लागत नाही. तेच शिवतत्त्व सद्गुरुरूपाने प्रकट होत असल्याने, या सद्गुरुतत्त्वाचाही थांग कधीच कोणालाही लागत नाही. कल्पनेच्या, शब्दांच्या, विचारांच्या, वृत्तीच्याही अतीत असणारे हे प्रेममय तत्त्व, केवळ त्या विशुद्ध प्रेमाच्याच बळावर पूर्णपणे जाणले जाते. मात्र ते प्रेमही अनन्यच असावे लागते.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी या त्वरित प्रसन्न होणा-या भगवान श्रीमहादेवांचे यथार्थ गुणगान केलेले आहे. शिवाय त्रिभुवन व्यापून राहिलेल्या त्या परमदिव्य शिवलिंगाची अभिनव महापूजाही ते मांडतात. आजच्या या महाशिवरात्रीच्या पावन पर्वकाली, त्यातही सोम-श्रवण अमृतसिद्धी योगावर आपणही भगवान सद्गुरु श्री माउलींच्या अमृतमय शब्दांच्या माध्यमातून परमदयाळू सद्गुरुरूप भगवान श्रीशिवशंकरांची महापूजा बांधू या आणि प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी कथन केलेल्या त्यांच्या अलौकिक भक्तवात्सल्य-ब्रीदाचे स्मरण करून धन्य धन्य होऊ या !!
लिंग देखिले देखिले त्रिभुवनीं तिहीं लोकी विस्तारिले
https://rohanupalekar.blogspot.com/2017/02/blog-post_24.html