6 Mar 2018

रंगी रंगला श्रीरंग

नमस्कार मित्रहो,
आज रंगपंचमी  !!
महाराष्ट्रामध्ये आज रंगोत्सव साजरा होतो. रंगांची उधळण करून लोक आपला आनंद व्यक्त करतात, एकमेकांना रंग लावून परस्परांमधील प्रेमभाव दृढ करतात.
महाराष्ट्राचे कुलदैवत, आराध्यदैवत आहेत भगवान श्रीपांडुरंग. त्यांच्या नावातच ' रंग ' आहे. पण मजा म्हणजे, नाव आहे पांडुरंग, म्हणजे शुभ्रवर्णाचा आणि प्रत्यक्षात आहेत काळेकुट्ट ! गंमतच आहे सगळी.
संतांनी वर्णन केले आहे की ते निळे, सावळे दिसतात. काहीवेळा काळे दिसतात. या राजस सुकुमार नयनमनोहर रूपाचा खरा रंग कोणता मग?
सर्व रंग हे तांबड्या पासून सुरू होऊन जांभळ्या रंगापर्यंत विभागलेले आहेत. सूर्य किरणाचे जलबिंदूमधून विकिरण होते तेव्हा हे सप्तरंग इंद्रधनुष्याच्या रूपाने पाहायला मिळतात. या सर्व रंगांचा मूळ रंग हा पांढरा आहे. एका पांढ-या रंगातून सर्व रंग निर्माण होतात. तसेच आमचे भगवान श्रीपंढरीनाथच सर्वांचे आद्य आहेत. सर्व देवदेवता, मनुष्यादी योनी, दिसणारे, भासणारे यच्चयावत् सर्व जग हे त्यांच्यापासूनच निर्माण झालेले आहे. म्हणूनही त्यांना आपण " पांडुरंग " म्हणू शकतो. ( http://rohanupalekar.blogspot.in )
आता हे सर्व रंग स्वत:चे वेगळेपण टाकून, बेमालूमपणे कोणत्या रंगात सामावतात? तर केवळ काळा रंगच तसा आहे. काळ्या रंगात इतर कोणताही रंग मिसळला तर तो एकरूप होऊन जातो. ( अपवाद फक्त पांढ-या रंगाचा आहे, पण तो तर त्यांचाच रंग आहे. ) तसे हे सर्व जग अंतिमत: त्या काळ्या श्रीविठ्ठलांमध्ये लय पावत असते. तेच काळाचेही महाकाळ आहेत. त्याचे द्योतक म्हणून  त्यांनी " काळा " हा रंग धारण केलेला आहे.
श्रीसंत तुकाराम महाराज या भगवंतांचे स्वरूप सांगताना म्हणतात,
सकळ देवांचे दैवत ।
उभे असे या रंगात ॥
रंग लुटा माझे बाप ।
शुध्द भावे खरे माप ॥
रंग लुटिला बहुती ।
शुक नारदादि संती ॥
तुका लुटिताहे रंग ।
साह्य झाला पांडुरंग ॥
श्रीतुकोबा सांगतात, जगाच्या रूपाने अनेक रंगांमध्ये अभिव्यक्त होणा-या या सकळ देवांच्याही आराध्य दैवताचा, भगवान श्रीपांडुरंगांचा भक्तिरंग जर लुटलात तरच खरी रंगपंचमी साजरी केल्यासारखे होईल. ज्याचा भाव जितका शुद्ध तितकेच कृपेचे माप त्याला प्राप्त होणार. पूर्वी शुकदेव, नारदादी संतांनी हा रंग अमाप लुटलेला आहे व आता श्रीपांडुरंगांच्या कृपेने सद्गुरूंच्याकडून ती युक्ती कळल्यामुळे तुकोबारायही तो भक्तिरंग भरभरून लुटत आहेत. खरी रंगपंचमी साजरी करीत आहेत व आपल्या सर्वांनाही आग्रहाने ही अलौकिक रंगपंचमी साजरी करण्यासाठी बोलावीत आहेत.
याच स्थितीचे वर्णन करताना, लौकिकार्थाने निरक्षर पण सद्गुरुकृपेने अद्भुत अनुभूती लाभलेल्या श्रीसंत सोयराबाई (श्रीसंत चोखामेळा महाराजांच्या पत्नी ) म्हणतात, "अवघा रंग एक जाला । रंगी रंगला श्रीरंग ॥" भक्त आणि भगवंत एकरूप होऊन गेले व त्या अलौकिक भक्तिरंगात दोघेही निरंतर रंगून राहिलेले आहेत. भक्ताला देवाचा चुकूनही विसर पडत नाही आणि देव भक्ताला क्षणासाठीही अंतर देत नाही, अशी अपूर्व प्रेमस्थिती होऊन गेलेली आहे. हीच खरी रंगपंचमी आहे व ती अनन्यभक्तीशिवाय साध्य होणार नाही. अनन्यभक्ती सद्गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नसते. यासाठीच माउली उपदेश करतात की, "म्हणोनि जाणतेने गुरु भजिजे । तेणे कृतकार्य होईजे ।"
सर्वांना या अनंगरंगसागर भगवान श्रीपांडुरंगांच्या प्रेमरंगात निरंतर रंगून जाण्याचे, त्यांच्या भक्तिरंगाचे सप्तरंगी इंद्रधनुष्य सप्रेम अनुभवण्याचे देवदुर्लभ सौभाग्य लाभो, हीच आजच्या या रंगपंचमीनिमित्त श्रीगुरुचरणी सादर प्रार्थना !!
रंगपंचमीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा  !!
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )


13 comments:

  1. खुप छान !! रंगपंमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. रंग पंचमीचे यथार्थ सुंदर निरूपण💐💐

    ReplyDelete
  3. किती नेमके वर्णन, रूपक अप्रतिम

    ReplyDelete
  4. खूप छान निरूपण

    ReplyDelete
  5. मस्त आजच्या दिवसाचे सार्थक झाले

    ReplyDelete
  6. 🙏🙏🙏

    ReplyDelete
  7. काळा, पांढरा रंग, भक्तीरंग आणि पांडुरंग यांचा परस्पर संबंध सुंदर निरूपण केलात, खरच, आपण ही सर्वांनी " अवघा रंग एक झाला'" या प पु संत सोयरबाईंच्या संकल्पनेत विरून जाऊ या
    पांडुरंग हरी, वासुदेव हरी

    ReplyDelete
  8. 🙏🙏🌹🌹🙏🙏

    ReplyDelete
  9. आपला लेख अतिशय 👌👌 सगळे रंग आणि भाव हे एकाच ठिकाणी अर्थात श्री पांडुरंगाच्या चरणी 'भक्ती रसात एकरूप' झाले. धन्यवाद!

    ReplyDelete
  10. खुपच छान लेख !
    ही पारमार्थिक रंगांची रंगलिला आहे

    ReplyDelete