22 Mar 2018

स्वामीनाम तारू स्वामी कल्पतरू

अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामीसमर्थ महाराज हे साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच होत ! प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच हा अद्भुत आणि अकल्पनाख्य अवतार धारण करून पृथ्वीवर प्रकटले व आजही त्याच रूपाने कार्य करीत आहेत. श्रीस्वामी समर्थ महाराज हे तुम्हां-आम्हां भक्तांसाठी प्रत्यक्ष श्रीभगवंतच आहेत. जो त्यांना अनन्यभावे शरण जाऊन त्यांची सेवा करतो, तो निश्चितच या भवसागरातून सहजतेने पार जातो.
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या असंख्य कृपांकित शिष्यांपैकी प.पू.मातुःश्री पार्वतीदेवी देशपांडे यांची परंपरा मोठी विलक्षण आहे. या परंपरेतील प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांवर श्रीस्वामी समर्थ महाराजांची पूर्णकृपा होती. श्रीस्वामी समर्थ महाराज त्यांना ‘सख्या’ म्हणत असत. श्रीस्वामी महाराजांचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते व प.पू.श्री.मामांचीही श्रीस्वामी महाराजांवर अनन्य भक्ती होती. प्रत्येक गोष्ट ते श्रीस्वामी महाराजांना विचारूनच करीत. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे उत्तराधिकारी प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्यावरही राजाधिराज श्रीस्वामी महाराजांची परिपूर्ण कृपा आहे. त्या कृपेचा परिपाक म्हणून, प.पू.श्री.दादांकडून ‘श्रीस्वामी समर्थ नामपाठ’ या लघुग्रंथाची रचना झाली. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या हरिपाठाप्रमाणेच, सत्तावीस अभंगांचा हा नामपाठ श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या नामाचे व कृपापरंपरेच्या तत्त्वाचे यथार्थ विवरण करतो. यातून श्रीस्वामी महाराजांच्या परंपरेचे अनेक निगूढ सिद्धांत प्रथमतःच प्रकट झालेले आहेत. या नामपाठाला साक्षात् श्रीस्वामी महाराजांचे पूर्ण आशीर्वाद लाभलेले असल्याने ही रचना प्रासादिक व दिव्य झालेली आहे. याच्या नित्यपठणाने असंख्य भक्तांनी श्रीस्वामीकृपेचे अद्भुत अनुभव आजवर घेतलेले आहेत. आज चैत्र शुद्ध द्वितीया, राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या ८७० व्या प्रकटदिनी, श्रीस्वामी महाराजांची सेवा म्हणून त्या पावन नामपाठातीलच एका सुरेख अभंगाचा आपण या लेखातून आस्वाद घेऊया !
https://www.facebook.com/sadgurubodh/
राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या मनोहर नामाचे महत्त्व आणि माहात्म्य सांगताना नामपाठाच्या एकोणिसाव्या अभंगात प.पू.श्री.शिरीषदादा म्हणतात,
स्वामीनाम तारू, स्वामी कल्पतरू ।
सप्रेम उच्चारू, भय नाशी ॥१॥
स्वामीनामी भाव, चरणांसी ठाव ।
आणिक उपाव, कासयांसी ॥२॥
बहुतां दिसांचे, जरी पुण्य साचे ।
स्वामीराजयाचे, नाम मुखी ॥३॥
अमृतेची दिठी, पदी देत मिठी ।
स्वामीनामपाठी, शून्य जाली ॥१९.४॥

राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे "श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ " हे पंचदशाक्षरी नाम हीच जणू दुस्तर भवसागर तरून जाण्यासाठीची खात्रीची नौका आहे. श्रीस्वामी समर्थ महाराज हे प्रत्यक्ष कल्पतरू आहेत. म्हणूनच त्यांच्या पुण्यपावन नामाचे प्रेमभराने सतत उच्चारण केले तर भवभय पूर्णपणे नष्ट होते. श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या श्रीचरणी विसावून त्यांचेच नाम प्रेमभावपूर्वक सतत जपले तर इतर कोणतेही उपाय करण्याची गरजच नाही. या नामस्मरणानेच भुक्ती व मुक्ती प्राप्त होतात. परंतु हे पुण्यपावन स्वामीनाम मुखी येण्यासाठी अनेक जन्मांची पुण्याई गाठीशी असावी लागते. तरच हे नाम मुखी येते व त्याचे स्मरण करण्याची सद्बुद्धी होते. सद्गुरुकृपेने अमृतेची (प.पू.श्री.शिरीष दादांची काव्य-नाममुद्रा ‘अमृता’ अशी आहे.) दृष्टी श्रीस्वामीचरणीच मिठी मारून दृढ स्थिरावली आणि या श्रीस्वामीनामाच्या पाठामुळे ( श्रीस्वामीनामपाठाच्या पठणामुळे ) अमृता सर्वांगाने ब्रह्मस्वरूप होऊन ठाकली !
‘श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ |’ हा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेचा नित्यसिद्ध महामंत्र आहे. हा मंत्रच या कराल कलिकाळात भयंकर असा भवसागर तरून सुखरूप पैलतीरावर जाण्यासाठीची सुरक्षित नौका आहे. हे स्वामीनामाचे तारू, अकल्पनाख्यकल्पतरू असणाऱ्या श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने ज्याला प्राप्त झाले तो धन्य होय ! ज्या गोष्टीची कल्पनाच करता येत नाही असे अकल्पनाख्य परब्रह्मच जिथे श्रीस्वामीनामाच्या सतत जपाने प्राप्त होते, तिथे लौकिक सुख-समृद्धीची व भौतिक लाभांची तर गोष्टच सोडा ! म्हणून श्रीस्वामी महाराजांचे नाम प्रेमभराने जपल्यास आपला संसार तर सुखमय होतोच; परंतु अत्यंत अवघड म्हणून सांगितलेला परमार्थही आपल्याला अतिशय कमी कष्टात साध्य होतो.
यासाठीच श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या नामाचे प्रेमभावे सतत उच्चारण करावे आणि आपल्या मनाला, आपल्या चित्तवृत्तींना श्रीस्वामीचरणीच गुंतून राहायला शिकवावे. हे दोन्ही जर साधले तर अन्य कोणताही उपाय करण्याची गरजच नाही. असे करणाऱ्या साधकाची, त्याच्या संसाराची, त्याच्या पूर्वीच्या सर्व भल्या-बुऱ्या कर्मांची पूर्ण जबाबदारी श्रीस्वामी समर्थ महाराजच घेतात. त्याला अन्य कोणतेही साधन न करता, केवळ प्रेमाने केलेल्या स्वामीनामाच्या स्मरणाने यच्चयावत् सर्व गोष्टींची सुलभतेने प्राप्ती होतेच !
पण हे अतिशय मोठे परिणाम करणारे आणि नित्यसिद्ध असे स्वामीनाम काही सहज प्राप्त होत नाही बरे का ! हे नामस्मरण अत्यंत सुलभ असले तरी ते नाम मुखात यायला मात्र आपल्या गाठीशी पूर्वजन्मांचे प्रचंड पुण्य असावे लागते. तसे पुण्य नसेल तर मग हे नाम एकदाही घ्यायची बुद्धीच होत नाही. श्रीस्वामी महाराजांची कृपा नसेल, आपल्या गाठीशी पुण्य नसेल, तर आपले मन टीव्हीवरील फडतूस सिरीयलमध्ये किंवा इतरांची उणी-दुणी काढण्यात, बाष्कळ चर्चेत किंवा झोपा काढण्यातच अधिक रमते. परंतु त्याला महाप्रभावी असे स्वामीनाम घेण्याची सद्बुद्धी अजिबात होत नाही. त्यामुळेच संत सांगतात की भगवन्नामाचे साधन अतिशय सुलभ असले तरी ते नाम मुखी येणे मात्र अत्यंत दुर्लभ आहे ! असे हे दुर्लभ स्वामीनाम आपल्या मुखी जर कायमचे स्थिरावले तर आपल्या भाग्याची जगात कशाशी तुलनाच होऊ शकणार नाही !
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे अभंगाच्या शेवटच्या चरणात आपली अलौकिक आणि देवदुर्लभ अनुभूती कथन करून तुम्हां-आम्हां स्वामीभक्तांना बोध करतात. सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेले हे दिव्य-पावन श्रीस्वामीनाम प.पू.श्री.दादांच्या मुखी कायमचे स्थिरावले आणि त्यांची दृष्टी स्वामीचरणी घट्ट मिठी मारून बसली. त्यामुळे घडलेल्या या स्वामीनामपाठाच्या उपासनेने ती दृष्टीच ब्रह्मदृष्टी बनून, सर्वत्र त्यांना तेच अफूट स्वामीब्रह्म प्रत्ययाला येऊ लागले. ती दृष्टी ब्रह्मरंध्री जाऊन परब्रह्माशी एकरूप झाली, सर्वत्र ते स्वामीरूपच ती पाहू लागली. म्हणून जो प्रेमभावाने स्वामीचरणी दृढ शरण जाऊन, सदैव या स्वामीनामाचे अनुसंधान ठेवेल, तो अंतर्बाह्य स्वामीरूपच होऊन जाईल, त्याला अन्य कोणतेही साधन करण्याची आवश्यकताच राहणार नाही; असे प.पू.श्री.दादा येथे स्वानुभवपूर्वक कथन करीत अहेत.
श्रीस्वामी समर्थ महाराजांवर दृढ विश्वास ठेवून फक्त त्यांचेच स्मरण करायला हवे. मग कोणतेही संकट समोर येवो की आपल्याच प्रारब्धाने एखादा भयंकर अनुभव येवो; आनंदाचा एखादा क्षण येवो की दु:खाचा डोंगर कोसळो; अपमानाचा प्रसंग येवो की बहुमानाचे, सन्मानाचे पद प्राप्त होवो; अशी अनन्यता प्राप्त होण्यासाठी आपण सदैव प्रार्थनापूर्वक प्रयत्नशील राहिले पाहिजे. कोणत्याही आणि कसल्याही परिस्थितीत आपल्याला श्रीस्वामी समर्थ महाराजांचाच आधार वाटला पाहिजे. प्रसंग आनंदाचा असो किंवा दु:खाचा, आपल्याला श्रीस्वामी समर्थ महाराजांची आठवण व्हायला हवी. जे काय सांगायचे ते त्यांनाच सांगायचे, जे काय मागायचे तेही केवळ त्यांनाच मागायचे. त्यांच्याशिवाय दुस-या कोणाच्या तोंडाकडे चुकूनही पाहायचे नाही. अशी जर आपली दृष्टी, आपली वृत्ती श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्याच श्रीचरणी घट्ट मिठी मारून राहिली, तर प.पू.श्री.दादा सांगतात तसा अनुभव आपल्यालाही आल्याशिवाय राहणार नाही.
हे घडण्यासाठी आपल्या मनाचा वारू स्वामीप्रेमाच्या लगामाने नियमित करून स्वामीनामाच्या तारूशीच बांधून टाकायला हवा. एकदा का हे साधले की बस ! बाकी सगळे आपल्याला त्याचक्षणी प्राप्त होईल, कारण श्रीस्वामी समर्थ महाराज साक्षात् कल्पतरूच आहेत. त्यासाठीच प.पू.श्री.दादा या सत्तावीस अभंगांच्या दिव्य नामपाठातून आपल्याला स्वामीनामाचे अविरत अनुसंधान ठेवण्याचा उपदेश करतात ! म्हणूनच येता-जाता, खाता-पिता, उठतां-बसता, कामधंदा करता, सुख-दु:खाची अनुभूती घेत असता, मनातून मात्र ते स्वामीनाम सदैव जपायची सवय लावून घ्यायला हवी. ही सवय लावणे कठीण असले तरी अशक्य नाही; आणि ' अशक्य ही शक्य करतील स्वामी । ' हे तर श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे ब्रीदवचनच आहे. तेव्हा अत्यंत तळमळीने, मनापासून आणि प्रेमाने आपण 'श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।' असा जयजयकार करू या व सतत करत राहू या !
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु समर्थ श्रीअक्कलकोट स्वामी महाराज की जय ।
( http://rohanupalekar.blogspot.in )
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481



13 comments:

  1. Il श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 'll
    🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐

    ReplyDelete
  2. स्वामी महाराजाना साष्टांग दंडवत

    ReplyDelete
  3. || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || 🙏🙏 🌷🌷

    ReplyDelete
  4. ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।

    ReplyDelete
  5. सद्गुरू शिरीशदादांचा अभंग अप्रतिम, भक्तीरसाने ओथंबलेला आहे💐🎂

    ReplyDelete
  6. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏

    ReplyDelete
  7. ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।

    ReplyDelete
  8. "SHREE SWAMI SAMARTHA JAY JAY SWAMI SAMARTHA"

    ReplyDelete
  9. 🙏🙏🙏

    ReplyDelete
  10. श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete
  11. श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  12. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    ReplyDelete
  13. Anantkoti Brahmandnayak Rajadhiraj Sadguru Samartha Shri Akkalkot Swami Samarth Maharaj ki Jay !

    ReplyDelete