9 Mar 2018

झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म - पंचम उन्मेष

पंचम उन्मेष
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. )
विलक्षण अधिकार
सद्गुरु मातु:श्री पू.पार्वतीदेवी देशपांडे या राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या कृपा-परंपरेतील अद्वितीय विभूतिमत्त्व होत्या. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलेली स्थितप्रज्ञाची, प्राप्तपुरुषाची, अनन्यभक्ताची, ज्ञान्याची अशी सर्व दिव्य गुणवैशिष्ट्ये एकाचवेळी त्या अंगी मिरवीत होत्या. मेणाहून मऊ आणि त्याचवेळी वज्राहूनही कठोर असणे, सामान्य माणसाला जमणारच नाही कधी. मातु:श्री ते लीलया करीत असत. पू.पार्वतीबाई अशा महासिद्धांनाही मार्गदर्शन करतील एवढ्या थोर योग्यतेच्या होत्या. त्या आपल्या दैवी सद्गुणांनी राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांची कन्या शोभतात. म्हणूनच त्यांचे "श्रीस्वामीतनया" हे नाम यथार्थ आहे. त्यांचे चरित्र हा परमार्थ मार्गातील साधकांसाठी अक्षय बोध-ठेवा आहे. त्यानुसार जर एखाद्याने आपली साधकीय मनोवृत्ती, विचारांची पद्धत व दिनचर्या ठेवली, तर परमार्थाचा अत्यंत कठीण पण अद्भुत व मनोहर प्रांत निश्चितच आपलासा होईल.
पू.दत्तूअण्णांनी देह ठेवण्यापूर्वी काही दिवस आधी राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज त्यांच्यासमोर प्रकटले व म्हणाले, "बये, तुला आता दुर्दैवाचे दशावतार पाहायचे आहेत, तयार आहेस ना?" त्यावर मातु:श्रींनी शांतपणे पण आदरपूर्वक विचारले, "आपण आणि माझे भगवंत त्यावेळी माझी साथ सोडून जाणार का?" श्रीस्वामी महाराज म्हणाले, "अगं, बाप कधी पोरीला एकटे सोडतो का असा?" त्यावर तितक्याच निर्धाराने मातु:श्री उत्तरल्या, " महाराज, मग कितीही भयंकर असे दुर्दैवाचे दशावतारच नाहीतर शतावतार देखील बघायला मी आनंदाने तयार आहे !" आपल्या लाडक्या पोरीची ही ' तयारी ' पाहून श्रीस्वामी महाराज प्रसन्नतेने हसले. साक्षात् श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवर बालपणी खेळलेल्या होत्या पार्वतीदेवी. त्यांचा अद्भुत अधिकार आपल्याला वर्णन करता येईल थोडाच?
त्या प्रसंगानंतर काही दिवसांनीच पू.दत्तूअण्णांनी देह ठेवला व मातु:श्रींवर दु:खांचे, कष्टांचे डोंगरच्या डोंगर कोसळू लागले. पण किंचितही विचलित न होता, कसलाही किंतू मनात न आणता, त्यांचे साधन व भगवत् अनुसंधान तसल्या भयानक काळातही विनाखंड चालू होते. "जशी हरीची इच्छा !" या एका वाक्यावरच त्यांनी सर्व काही सोडलेले होते. श्रीसद्गुरुचरणीं पूर्ण शरणागत होऊन त्यांनी शांतपणे ते बिकट प्रारब्धही आनंदाने सहन केले. केवढे धैर्य हवे यासाठी ! आपण बारकेसे संकट आले तरी लगेच निराश होऊन दैवाला व देवांना दोष देत बसतो. अगदी तुटपुंजी, नावापुरती उपासना आपण केलेली असते, पण अशा संकटांमध्ये आपला आव असा असतो की बस. आम्ही "एवढे" देवांचे करतो तरी ते आमच्याकडे लक्ष देत नाहीत, आम्हांला दु:ख कसे भोगायला लावतात....वगैरे बडबड आपण करू लागतो. त्यावेळी आपला विश्वास पार रसातळाला जातो. खरेतर अशी परिस्थिती बदलण्याचा हक्काचा उपाय असणारे हातचे साधन सोडून आपण नुसते दु:खाचे कढ काढत बसतो. हाच आपल्यामधला व संतांमधला महत्त्वाचा फरक आहे. मातु:श्री पार्वतीदेवींच्या अंगी परमार्थ परिपूर्ण मुरलेला होता, म्हणूनच त्या अवघड परिस्थितीतही त्यांच्या मनाची शांती ढळली नाही की त्या विचलित झाल्या नाहीत. साधक म्हणून आपण याचे सतत मनन करायला हवे.
http://sadgurubodh.blogspot.in
मातु:श्री पू.पार्वतीबाईंच्या अलौकिक करारीपणाचा एक विलक्षण प्रसंग मुद्दाम सांगतो. प.पू.श्री.मामांचा पाठचा भाऊ, यशवंत हा व्यसनाधीन झालेला होता. पू.मातुःश्रींनी त्याला गोड बोलून बरेच वेळा समजावून सांगितले पण त्याने सुधारणा केली नाही. शेवटी सद्गुरु श्रीस्वामी महाराजांचा कौल घेऊन त्यांनी एकदा त्याला कडक शब्दांत विचारले. तो काहीच उत्तरला नाही. त्यावेळी पू.मामांनीही त्याला समजवायचा प्रयत्न केला. पण त्याने मामांनाच उलट उत्तरे द्यायला सुरू केले. त्यासरशी मातुःश्रींनी त्याला घराबाहेर काढले आणि "पुन्हा या घराची पायरी चढू नकोस !" म्हणाल्या. त्यावेळी त्या उंब-याच्या बाहेर बसलेल्या होत्या. तिथूनच त्यांनी पू.मामांना पाणी तापवायला सांगितले व पाणी तापल्यावर यशवंताच्या नावाने अंघोळ करूनच त्या घरात आल्या. पुन्हा कधीही यशवंताला त्या घरात प्रवेश मिळाला नाही. केवढे धाडस म्हणायचे हे ! आपल्या परमार्थासाठी, नैतिकतेसाठी अडसर झालेल्या पोटच्या पोरालाही असे क्षणात, मनावर माया-मोहाचा तरंगही न उठू देता दूर करणे हे एक आई म्हणून फार फार अवघड आहे. आपण त्याचा साधा विचारही करू शकणार नाही. त्यासाठी खरोखरीच अत्यंत अद्भुत अधिकार आणि आपल्या ध्येयाविषयी तीव्र तळमळ हवी. असा विलक्षण पारमार्थिक अधिकार होता मातुःश्रींचा ! "देव मिळवायचे तर संसारातल्या कुठल्याही पाशात अगर कुठल्याही वाईट गोष्टीत अडकून राहायचे नाही", हा एक फार महत्त्वाचा धडा मामा त्यादिवशी शिकले.
पू.मामांचा लौकिक संसार
प.पू.मातुःश्रींनी आपल्या नात्यातीलच बबी बोपर्डीकरशी प.पू.श्री.मामांचा विवाह करून दिला होता. सौ.इंदिरा बनून बबी मातु:श्रींच्या घरात प्रवेशली. परंतु नियती वेगळीच होती. सौ.इंदिरा आपल्या नवजात पुत्रासह पहिल्या बाळंतपणातच निवर्तली. मामांची वृत्ती मुळातच वैराग्यपूर्ण असल्याने त्यांना संन्यास घेण्याची तीव्र इच्छा होऊ लागली. त्यावर पू.मातु:श्रींनी त्यांची समजूत घातली की, "तुझ्या प्रारब्धात संन्यास नाही, तुला लग्न करायला हवे. पुढे तुला एक मुलगा होईल." त्याप्रमाणे त्यांनी ओळखीच्याच आपटीकर यांच्या शांताशी पू.मामांचे दुसरे लग्न ठरवले देखील. तिची पत्रिका पाहिल्यावर मामा म्हणाले, "आई, ही पण अल्पायुषी आहे." मातुःश्री म्हणाल्या, " माहीत आहे, पण मी आता शब्द दिलाय. तुला लग्न करावेच लागेल." या चर्चेच्या दुस-याच दिवशी मातु:श्रींनी देहत्याग केला.
मातुःश्रींच्या देहावसानानंतर लगेचच प.पू.श्री.मामांचा द्वितीय विवाह झाला. पण तोही अल्पकाळच टिकला. द्वितीय पत्नी देखील बाळंतपणातच अपत्यासह निवर्तली. प्रथेप्रमाणे रुईच्या झाडाशी तिसरा विवाह होऊन बाळेकुंद्रीच्या रंगराव हुद्दारांच्या शकुंतलाशी पू.मामांचा चाैथा विवाह झाला. शकुंतलाची सौ.लक्ष्मी झाली. यांची प.पू.श्री.मामांवर प्रचंड भक्ती होती. दोन वर्षांच्या संसारात त्यांना एक पुत्र झाला. त्यानंतर मंगळागौरीचे खेळ खेळताना पडून सौ.लक्ष्मी यांचे कंबरेचे हाड मोडले. त्यांनी अंथरुण धरले. त्या आजारपणात प.पू.श्री.मामा आपल्या पत्नीची मनापासून सेवा करीत असत. त्यासाठी त्यांनी आपला व्यवसायही बंद केला. त्यांना शिवलीलामृत आवडते म्हणून ते वाचून दाखवीत. पू.मामांनी त्यांना, "भगवंतांचे स्मरण करीत जावे ", असे सांगितले की त्या म्हणत, "माझा देव माझ्या नित्यपूजनात आहे." पण त्यांनी त्यांच्या देवाचा फोटो कधीच मामांना दाखविला नाही. त्या आजारपणातच त्यांचा अंत झाला. आपल्या पतीच्या मांडीवर डोके ठेवून, पतिमुखी दृष्टी ठेवून अहेवपणी जाण्याचे दुर्लभ भाग्य त्यांना लाभले. त्या गेल्यावर उत्सुकतेने प.पू.श्री.मामांनी त्यांच्या उशाजवळचा फोटो पाहिला तर तो मामांचाच होता. इतक्या त्या थोर पतिव्रता होत्या. सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे प.पू.श्री.मामांच्याही नित्याच्या पूजेत शेवटपर्यंत सौ.लक्ष्मी यांचा एक छोटा फोटो होता. पती-पत्नीच्या इतक्या भावोत्कट आणि अलौकिक प्रेमनात्याचे दुसरे उदाहरण क्वचितच सापडेल ! म्हणतात ना, भक्त जेवढे देवांवर प्रेम करतो त्याच्या कैकपटींनी देव भक्तावर प्रेम करतात. देवच खरे भक्त असतात, हेच या भावपूर्ण गोष्टीतून पाहायला मिळते.
वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी प.पू.श्री.मामांचा लौकिक संसार संपला. सौ.लक्ष्मी यांनी आपल्या लहानग्याला, श्रीनिवासला मृत्यूपूर्वीच आपल्या भावजयीच्या हवाली केले होते. श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने १५ जून १९४८ रोजी प.पू.श्री.मामांनी गृहत्याग केला. त्यावर्षीची आषाढी वारी झाल्यावर लगेचच बनेश्वर स्थानी त्यांनी पहिले श्रावण अनुष्ठान केले. तेथे त्यांना एका महासिद्धांचे दर्शन लाभले.
१९३६ पासूनच प.पू.श्री.मामांनी पंढरीची वारी करण्यास मातृआज्ञेने सुरुवात केलेली होती. पहिली १२ वर्षे अत्यंत खडतर अशी ' पडशीची वारी ' झाली. १९४८ नंतर त्यांनी ह.भ.प.केशवराव देशमुख महाराजांच्या दिंडीतून जाण्यास सुरुवात केली. १९८० पर्यंत या दिंडीतून व त्यानंतर शेवटपर्यंत पुढे स्वतंत्रपणे ते वारी करीत होते.
बनेश्वरचे अनुष्ठान झाल्यावर प.पू.श्री.मामा राजकोट येथे राहावयास गेले. तेथे सौराष्ट्र परिवहन खात्यामध्ये त्यांनी नोकरी धरली. राजकोट येथील कैवल्यधाम योगाश्रमाच्या शाखेतील स्वामी दिगंबरजींबरोबर त्यांचे स्नेहबंध जुळले आणि त्यांच्या विनंतीवरून ते योगाश्रमातच राहावयास गेले. स्वामी दिगंबरजींनी त्यांना हठयोगाच्या अनेक क्रिया शिकवल्या. ७२ तासांपर्यंत मातीमध्ये स्वतःला पुरून घेऊन राहण्याची विद्या पू.मामांना साधली होती. तसेच पूर्वजन्मीच्या जलसंकर्षिणी, प्राणसंकर्षिणी इत्यादी अनेक अद्भुत विद्याही त्यांच्याठायी आपोआप प्रकटल्या. दिगंबरजींबरोबर अनेकदा हिमालय यात्राही झाल्या. गिरनारची वारीही त्याच सुमारास सुरू झाली. प.पू.श्री.मामांनी आपल्या आयुष्यात एकूण सहा वेळा हिमालय, दोन वेळा अमरनाथ, एकवीस वेळा गिरनार, पाच वेळा रामेश्वर; द्वारका, कुरवपूर इत्यादी अनेकवेळा, एकदा मानससरोवर, तुंगनाथ, पायी नर्मदा परिक्रमा इत्यादी यात्रा, पंढरीची वारी सलग ५३ वर्षे, इतक्या तीर्थयात्रा केल्या. नुसती यादी वाचूनच आपण आश्चर्याने थक्क होतो. त्यांचे असे वैशिष्ट्य पू.शिरीषदादा सांगतात की, भारतात असे एकही तीर्थक्षेत्र नाही जेथे मामा गेलेले नाहीत. त्यांना त्या सर्व तीर्थांचे पौराणिक व आध्यात्मिक माहात्म्य पुरेपूर माहीत असे. तेथील लोकांना ते वैयक्तिक ओळखतही असत.
https://www.facebook.com/sadgurubodh/
प.पू.श्री.मामांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास प.पू.मातुःश्रींच्या मार्गदर्शनानुसार सुरू होताच. विष्णुप्रयागला झालेल्या भगवान श्री माउलींच्या विष्णुरूपातील दिव्य दर्शनानंतर त्यांना ज्ञानेश्वरीचे गूढ अर्थही आपोआपच उलगडू लागले. परंतु त्यांचा अभ्यास स्वांतःसुखायच होता. १९५३ च्या रामनवमीच्या दिवशी मात्र एका विलक्षण घटनेने त्यांनी पहिल्यांदा प्रवचनसेवा केली. राजकोटच्या राममंदिरात कैवल्यधामाच्या वतीने प्रवचनसेवा असे. पण त्यावर्षी ठरलेले प्रवचनकार येऊ न शकल्याने मामांनाच सेवा करावी लागली. त्यांच्या अद्भुत विवरणशैलीमुळे लोकांना त्यांचे ते पहिलेवहिले प्रवचन खूप भावले आणि आयुष्यभराच्या एका प्रबोधनलीलेचा शुभारंभ झाला. आपल्या हयातीत प.पू.श्री.मामांनी अक्षरशः हजारो प्रवचने केली. त्यांनीच स्थापन केलेल्या ' श्रीवामनराज प्रकाशन ' या संस्थेने त्यांच्या प्रवचनांवर आधारित अनेक ग्रंथ प्रकाशित केलेले असून ते अभ्यासकांनी वाखाणलेलेही आहेत. जवळपास चार हजार पृष्ठांचे अपूर्व असे पू.मामांचे वाङ्मय आजवर प्रसिद्ध झालेले आहे. त्यातून प्रकट होणारे पूू.मामांचे संतवाङ्मयाचे सखोल व अभिनव चिंतन खरोखरीच विलक्षण आहे. माउलींच्या कृपेने त्यांची ऋतंभरा प्रज्ञा जागृत झालेली होती आणि म्हणूनच संतांच्या शब्दांचे अचूक मर्म ते नेमके सांगू शकत असत.
प.पू.मातुःश्री पार्वतीदेवींनी सांगितल्याप्रमाणे प.पू.श्री.मामांचे तीव्रतम तप चालू होते. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाने आणि नित्य कृपाछत्राने पू. मामांचा साधना पारिजात पूर्ण बहरला होता. जोडीने ज्ञानेश्वरीचे चिंतनही चालू होतेच. आता मामांना तळमळ लागली होती ती मंत्रप्रदात्या सद्गुरूंच्या भेटीची. मातु:श्रींनी भाकित केलेला बारा वर्षांचा काळही आता संपत आला होता. त्यामुळे ती तळमळही दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. त्यातच १९५४ साल उजाडले. पू.मामा नेहमीप्रमाणे राजकोटहून आळंदीला येऊन आषाढी वारीत सामील झाले. आषाढी एकादशीला वारी पूर्ण झाली. त्यावेळी एक अद्भुत घटना त्यांची वाट पाहात होती. पू.मामांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ती घटना आपण उद्या पाहू.
( क्रमश: )
( प.पू.श्री.मामांचे प्रासादिक वाङ्मय ३०% सवलतीत मिळविण्यासाठी संपर्क क्रमांक -
श्रीवामनराज प्रकाशन, पुणे - 020-24356919 )
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

0 comments:

Post a Comment