सूर्य_दिवाळी
आज सकाळी पूजा सुरू करण्यापूर्वी पावणे सात वाजता काहीतरी पाहायला मंदिराच्या बाहेर आलो, तर पूर्वेच्या कॅनव्हासवर भगवान सूर्यनारायणांनी ही अप्रतिम आणि देखणी तेज-रांगोळी रेखाटलेली होती. क्षणभर मी स्तब्धच झालो आणि ती देखणी सूर्य_दिवाळी न्याहाळली. लगेच मोबाईल घेऊन आलो आणि देवांचे हे मनोरम रेखांकन कायमचे छायांकित करून ठेवले.
फारतर पाचच मिनिटे हा नजारा होता, मग तो रंगांचा अनोखा खेळ आवरून तेजोनिधी भुवनभास्कराने आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात केलेली होती; सडासंमार्जन होऊन रांगोळी काढून झाल्याबरोबर आजीने घरकामाला सुरुवात करावी तसे. सूर्याचा तो तेजोमय आधार सुटल्याबरोबर ते ढग, पाचवीला पुजलेले आपले काळेपण पुनश्च त्याच केविलवाणेपणाने दाखवीत आहोत, असे मला वाटू लागले. यातून हेच जाणवले की, आपल्या संपन्न अधिष्ठान-माहेराचे अलौकिक माहात्म्य अशाच प्रसंगी प्रकर्षाने पटते, बरोबर ना ?
छायाचित्राच्या तळवटीला दिसणारा निष्पर्ण बहावा त्या देखाव्यात एक विलक्षण पण अनवट असा गूढ-रम्य भाव निर्माण करतोय. त्यावरच विचार करतोय मी सकाळपासून. काय सांगत असावा तो बहावा? मला तरी तो बहावा आपलेच प्रतिनिधित्व करतोय असेच वाटत आहे.
श्रीभगवंतांच्या तप्त-तेजस्वी, बहुरंगी, बहुढंगी विस्तारासमोर, स्वत:कडे प्रत्यक्षात काही नसतानाही स्वत:ला मोठे मानणारे आपण मानव असेच रखरखीत, निष्पर्ण, आळसावलेले व एकप्रकारे ती नकारात्मकता दाखवणारे आहोत? की त्या जगव्यापी तेजातही न्यून पाहणारे, काळेकुट्ट अंधारे वास्तव आहोत? का त्या तेजाने न्हाऊन निघून नवसर्जनाच्या फुलो-याची आस पाहणारे, उज्ज्वल भविष्य नजरेसमोर ठेवून मनापासून प्रयत्नशील असणारे सकारात्मक भान आहोत? का "आदित्याची झाडे । सदा सन्मुख सूर्याकडे ।" असे आदित्याचे झाड बनून आपल्या इवल्याशा बाह्या पसरून त्या तेजोनिधीचा तो तेजपसारा कवटाळू पाहणारे, त्या तेजाचीच शिदोरी मागणारे याचक आहोत? काहीच कळत नाहीये बुवा त्या बहाव्याचे कृष्णकोडे. पण ते असो.
उत्तम चित्रकाराने अवघा एकच दमदार फटकारा मारून एखादी जगविख्यात आणि नेत्रदीपक चित्राकृती निर्मावी, तसे भगवान सूर्यनारायणांनी तितक्याच सहजतेने, एका क्षणात रेखलेले हे नेत्रसुखद वासंतिक " चैत्रांगण " सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या एका बहारदार श्रुतीची आठवण करून देणारेच आहे. मराठी भाषेचे हे अनभिषिक्त चक्रवर्ती सम्राट, सद्गुरुकृपेने हृदयी जागलेल्या आत्मविवेकाने अवघे चराचर विश्वच त्या परमात्म्याचे चिन्मय स्वरूप आहे, हे जाणणा-या महात्म्याच्या त्या अद्भुत प्रतीतिखुणांचे मोठ्या माधुर्याने वर्णन करताना म्हणतात,
जैसी पूर्वदिशेच्या राउळीं ।
उदया येतांचि सूर्य दिवाळी ।
कीं येरीही दिशां तियेचि काळीं ।
काळिमा नाहीं ॥ज्ञाने.५.१६.८६॥
पूर्वेच्या क्षितिजावर सूर्य_दिवाळी साजरी झाल्याबरोबर बाकीच्या सर्व दिशा देखील त्याक्षणी तेजाळून उठतात, त्यांच्यातील जन्मजन्मांतरीचा काळिमा कुठल्याकुठे नाहीसा होतो, जणू तो कधी अस्तित्वात नव्हताच !!
अहो दयावंता, करुणाब्रह्म सद्गुरुराया, आपल्या कृपासूर्याची दिवाळी साजरी करणारे असे तेजाळलेले नयनमनोहर चैत्रांगण माझ्या अंतराकाशात आपण कधी रेखाटणार?
रोहन विजय उपळेकर
8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )
0 comments:
Post a Comment