22 Dec 2018

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा





भगवान श्रीदत्तात्रेय हे साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच आहेत. लौकिक अर्थाने सत्त्व, रज व तम या तिन्ही गुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव व भगवान शिवांचा त्रिगुणात्मक अवतार म्हणजे भगवान श्रीदत्तात्रेयप्रभू होत. त्रिगुणात्मक भासणारे परंतु सगुणत्वाला येऊनही मुळात निर्गुण-निराकारच असणारे भगवान श्रीदत्तात्रेयप्रभू हे प्रत्यक्ष जगद्गुरूच आहेत. श्रीदत्तप्रभूंच्याच स्वरूपातून या जगात गुरुतत्त्व विविध रूपांतून साकार होत असते. म्हणूनच गुरुतत्त्वाचा मूलाधार भगवान श्रीदत्तप्रभूच आहेत !
सत्ययुगात भगवान ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आणि सप्तर्षींमधील श्रेष्ठ अशा भगवान अत्रिमुनी व त्यांच्या पतिव्रता पत्नी भगवती अनसूयामातेच्या पोटी, त्यांच्या तपश्चर्येचे फळ देण्याच्या मिषाने भगवंतच "दत्त" रूपात प्रकटले. ज्यांच्यापाशी कोणतेही त्रिगुण नाहीत, त्या "अ-त्रि" मुनींपासून हे त्रिगुणात्मक ब्रह्म प्रकटले. जिच्यापाशी असूया नावालाही नाही, ती "अन्-असूया" त्या परब्रह्माची माता झाली. निर्गुण निराकार परब्रह्म त्रिगुणांचा अंगीकार करून "श्रीदत्तात्रेय" रूपात सगुण साकार झाले ; आणि ज्या दिवशी ते असे साकारले, तोच आजचा मार्गशीर्ष पौर्णिमेचा, श्री
दत्तजयंतीचा पुण्यपावन दिवस होय !

भगवान ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार उत्तम पुत्र प्राप्त व्हावा म्हणून महर्षी अत्रि व माता अनसूयेने कठोर तप केले. त्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या श्रीभगवंतांनी स्वतःलाच त्यांना देऊन टाकले. दिलेले म्हणून "दत्त" आणि अत्रिंना दिले म्हणून "आत्रेय"; यापासून "दत्तात्रेय" हे पुण्यनाम साकारले. ते "दत्तात्रय" नाहीत, "दत्तात्रेय" आहेत ; हे लक्षात घ्यावे. सर्वसामान्यपणे त्यांचा "दत्तात्रय" असा चुकीचा उच्चार केला जातो, म्हणून हा खुलासा केला.

महाराष्ट्रात गेली हजार वर्षे तरी श्रीदत्तसंप्रदाय सुस्थिर झालेला आहे. कलियुगातील प्रथम दत्तावतार भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज व द्वितीय दत्तावतार भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे महाराष्ट्रातच बराच काळ वास्तव्य व कार्य झाल्यामुळे, या प्रदेशात श्रीदत्तभक्ती रुजली व खूपच विस्तारली देखील. तृतीय श्रीदत्तावतार राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज व पंचम दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् टेंब्येस्वामी महाराज आणि यांच्याच सारख्या इतरही अनेक अवतारी महात्म्यांनी श्रीदत्तभक्तीचा वटवृक्ष जोपासून मोठा केला. म्हणूनच आजमितीस महाराष्ट्रातील प्रमुख उपासना संप्रदायांमध्ये श्रीदत्त संप्रदायाची गणना होते. वारकरी संप्रदायानेही श्रीमद् भागवतात कथन केलेल्या चोवीस अवतारांपैकी एक असणाऱ्या श्रीदत्तप्रभूंना मोठ्या प्रेमादराचे स्थान दिले आहे. श्रीनाथ संप्रदायात तर श्रीदत्तप्रभू हे नवनाथांचे गुरुस्वरूपच आहेत. या सर्व कारणांमुळे श्रीदत्त हे दैवत तळागाळापर्यंत पोचलेले आहे. अर्थातच, अगदी थोड्या उपासनेने प्रसन्न होणारे दैवत असल्यामुळेही श्रीदत्तप्रभूंची सेवा-उपासना करण्याकडे सर्वसामान्य जनांचा कल दिसून येतो. शिवाय असंख्य भक्तांना तशा अलौकिक अनुभूती देखील आलेल्या आहेतच

भागवत संप्रदायाचे मुख्यस्तंभ मानलेल्या शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांनी रचलेली "त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।" ही भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंची सुंदर आरती सर्वदूर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील जवळपास निम्म्याहून जास्त जनतेला तोंडपाठ असणारी ही लालित्यपूर्ण आरती अतिशय अर्थगर्भ आणि तत्त्वज्ञानप्रचुर आहे. दररोजच्या म्हणण्यात असल्याने या आरतीच्या अर्थाचा फारसा विचार केला जात नसावा. अर्थ जाणून पठण केल्यास एखाद्या रचनेचा आनंद अधिक प्रमाणात मिळतो हेही खरेच आहे. म्हणूनच आजच्या पावन पर्वावर प्रस्तुत लेखातून आपण या प्रासादिक आरतीच्या मार्मिक भावार्थाचा यथाशक्य विचार श्रीसद्गुरुकृपेने करू या.

( http://rohanupalekar.blogspot.in )

श्रीसंत एकनाथ महाराज आपल्या चार चरणांच्या श्रीदत्तप्रभूंच्या सुप्रसिद्ध आरतीत म्हणतात,
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्दें न ये अनुमाना ।
सुरवरमुनिजनयोगी समाधि न ये ध्याना ॥१॥
जयदेव जयदेव श्रीगुरुदत्ता ।
आरती ओवाळितां हरली भवचिंता ॥ध्रु.॥
सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।
पराहि परतली तेथे कैंचा हा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥२॥
दत्त येऊनियां उभा ठाकला ।
सद्भावें साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥
दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान ।
हारपलें मन झालें उन्मन ।
मी तूं पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥४॥


[ या आरतीचे अनेक पाठभेद लोकांच्या म्हणण्यामुळे तयार झालेले आहेत. येथे दिलेला पाठ अतिशय शुद्ध आहे. या पाठानुसारच अर्थ केलेला आहे. ]

सत्त्व, रज व तम या त्रिगुणांचा आपल्या लीलेसाठीच भासमान अंगीकार करून हा परमात्मा त्रिमूर्ती रूप धारण करून प्रकटलेला आहे. प्रत्यक्ष त्रैलोक्याचे अधिपती असणारे भगवंतच हा सर्वसामर्थ्यसंपन्न असा त्रिगुणात्मक अवतार घेऊन सगुणसाकार झालेले आहेत. श्रेष्ठ देवदेवता, तपस्वी मुनी व अलौकिक अधिकाराच्या योगिजनांच्या ध्यानातही जे परमतत्व सहजासहजी प्रकटत नाही ; आणि ज्ञाननिधी वेदही ज्यांचा स्वरूपाचा थांग न लागल्याने नेति नेति म्हणून मौनावतात ; तेच परिपूर्ण परब्रह्मतत्त्व निर्गुण असूनही केवळ भक्तप्रेमाचा आस्वाद घेण्यासाठीच श्रीदत्तरूपाने साकारले आहे. (१)

म्हणूनच आता आपण या परमकरुणामय श्रीगुरु दत्तात्रेय प्रभूंची मनोभावे आरती करू या. त्यांची अशी आरती केल्याने, सहन करण्यास अतिशय कठीण मानली गेलेली भवचिंता देखील सहजासहजी हरते, नष्ट होते. (ध्रु.)

अहो दत्तात्रेय भगवंता, या विश्वाच्या आत-बाहेर, सर्वत्र तुम्हीच भरून राहिलेला आहात. तुमच्याशिवाय अन्य काहीच नाही या सृष्टीत. परंतु ज्याच्यापाशी तेवढी पुण्याई व सद्भाग्यच नाही त्याला कसे काय कळणार बरे हे ? परा वाचा देखील तुमच्या स्वरूपाचे वर्णन करू शकली नाही, तिथे माझी निर्बल वैखरी कितीशी उपयोगी पडणार ? परंतु तुमच्या गुणवर्णनाचे, नामस्मरणाचे माहात्म्यच असे अगाध आहे की, वैखरीने जरी ही सेवा केली तरीही दुर्लंघ्य अशी ही जन्ममरण परंपराच खंडित होते. तो भक्त तुमच्या कृपेने जन्ममरण चक्रातून पार जातो. (२)

( श्रीसंत एकनाथ महाराजांच्यावर कृपा करण्याच्या मिषाने, त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवान श्रीदत्तात्रेयप्रभू त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्या प्रसंगाचा उल्लेख करून श्री नाथ महाराज म्हणतात ; ) माझ्यावर कृपा करण्यासाठी साक्षात् श्रीदत्तात्रेय भगवान माझ्यासमोर दत्त म्हणून उभे ठाकले. मी अतिशय सद्भावपूर्वक त्यांच्या श्रीचरणीं साष्टांग दंडवत घातला. त्यामुळे सुप्रसन्न झालेल्या अत्रितनय श्रीदत्त भगवंतांनी मला भरभरून आशीर्वाद दिल्याने माझी जन्ममरण परंपरा त्याक्षणी खंडित झाली. त्यांच्या दर्शनानेच मला पुनरावृत्तिरहित असा मोक्ष प्राप्त झाला. (३)

श्रीभगवंतांच्याच परमकृपेने आता मला "दत्त दत्त" असेच ध्यान सदैव लागून राहिलेले आहे. माझ्या चित्तवृत्ती अंतर्बाह्य दत्तमय झालेल्या आहेत. त्यामुळे सतत संकल्पविकल्प करणारे माझे मन आता उन्मन झालेले आहे. मनच नाहीसे झाल्याने त्याच्या आधारावर भासणारा मी-तू पणाने भरलेला प्रपंचभ्रमही पूर्ण नष्ट झालेला आहे ; आणि मी आता माझे सद्गुरु श्री जनार्दन स्वामींच्या परमकृपेने श्रीदत्तध्यानातच अखंड, अविरत मग्न होऊन गेलेलो आहे. आता माझ्या आत-बाहेर फक्त भगवान श्रीदत्तप्रभूच विराजमान आहेत आणि मी देखील दत्तरूप होऊन वर पुन्हा त्याच परमानंदमय श्रीदत्तांचे ध्यान करण्यातच निमग्न झालेलो आहे. (४)

आरतीच्या या शेवटच्या चरणातील शेवटच्या वाक्याचा आणखी एक सुंदर अर्थ होतो. सद्गुरुकृपेने लाभलेले आणि श्रीदत्तप्रभूंपासूनच परंपरेने आलेले दिव्य असे ते साधन करता करता श्री एकनाथांना आपले सद्गुरु श्री जनार्दन स्वामी हेच प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू आहेत याची साक्षात् अनुभूती आलेली आहे. म्हणूनच ते म्हणतात की, "एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ।" श्रीगुरूंकडून लाभलेल्या त्या "श्री" म्हणजेच परंपरेच्या कृपाशक्तीची साधना करता करता, श्रीदत्तप्रभू व श्री जनार्दन हे दोन्ही एकरूपच आहेत व सर्वत्र, सर्व ठिकाणी, तुझ्या व माझ्यासकट सर्व बाबतीत आता ते श्रीदत्तप्रभूच व्यापून उरलेले आहेत ; असा अद्भुत अद्वैतानुभव श्रीसंत एकनाथ महाराजांना पूर्णपणे अनुभवायला मिळाला. त्या सुमधुर अनुभूतीचाच प्रसन्न आनंदाविष्कार या श्रीदत्तप्रभूंच्या आरतीच्या माध्यमातून त्यांनी शब्दबद्ध केलेला आहे.

संतांचे शब्द हे बहुअर्थ प्रसवणारे असतात. त्यांचा गूढार्थही विशेषच असतो. जितके आपण त्याचे चिंतन-मनन करू तितका तो प्रत्येकवेळी आणखी उलगडत जातो. म्हणूनच आपण सतत त्या अनुसंधानातच राहिले पाहिजे.

भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंची ही आरती आज जगभरात म्हटली जाते. तिच्या निमित्ताने रोजच श्रीदत्तसंप्रदायाचे हे गूढगंभीर तात्त्विक स्वरूप आपल्या मुखात येतेच. अशा त्या तत्त्वरूपाचे अल्पसे का होईना, पण चिंतन-मनन देखील सर्वांकडून व्हावे, या सदिच्छेनेच व श्रीगुरुकृपेने प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून या सुरेख आरतीचा थोडासा अर्थ उलगडला गेला आहे. तुम्हां-आम्हां सर्वांची चिंतनाची प्रक्रिया सुरू व्हावी व सुरू झालेली कायमच चालू राहावी ; यासाठीच श्रीगुरुचरणीं मनोभावे प्रार्थना करून, त्यांच्याच कृपेने झालेली ही लेखनसेवा श्रीदत्तजयंतीच्या पावन पर्वावर भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या महन्मंगल श्रीचरणीं तुलसीदलरूपाने समर्पितो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481



5 Dec 2018

भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी महोत्सव

आज कार्तिक कृष्ण त्रयोदशी, आमचे परमाराध्य मायबाप भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांचा संजीवन समाधी दिन !
सद्गुरु भगवान श्री माउली हे साक्षात् भगवान श्रीकृष्ण परमात्माच आहेत. माउलींच्यानंतर आपल्याकडे झालेल्या आजवरच्या जवळपास प्रत्येक महात्म्याने आपल्या वाङ्मयात कुठे ना कुठे सद्गुरु श्री माउलींची स्तुती केलेलीच आहे. इतकी श्री माउलींची मोहिनी जबरदस्त आहे. जसे भगवान श्रीराम अद्वितीय, जसे भगवान श्रीकृष्ण अद्वितीय, जसे श्रीमदाद्य शंकराचार्य महाराज अद्वितीय ; तसेच सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजही एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्यासारखे तेच, अत्यंत अलौकिक व अद्भुत !
सद्गुरु श्री माउलींचे नुसते नाव जरी उच्चारले तरी हृदयी प्रेमादराचे तरंग उठतात, त्यांच्याविषयीच्या निखळ प्रेमाचे, उत्कट श्रद्धेचे आणि अपूर्व गुरुभावाचे अनुकार आपले अंगांग व्यापून वर अष्टसात्त्विक भावांची मांदियाळी निर्माण करतात. आळंदीला कार्तिकी वारीत किंवा आषाढीच्या वारीत त्यांच्या नामाचा गगनभेदी गजर जेव्हा होतो ना, तेव्हा आपण असे मोहरून येतो की बस ! हा अनुभव ज्याचा त्यानेच एकदातरी घ्यायला हवा. ज्यांच्या नामातच अज्ञानाचा निरास आहे, वेदान्ताचा परमअनुभव आहे आणि ज्यांच्या नामात पराभक्तीचा अपूर्व-मनोहर आविष्कार आहे, त्या कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती परमानंदकंद श्रीविठ्ठलप्राणजीवन भक्तहृदयसिंहासनविहारी अलंकापुराधिपती जगज्जीवन सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांच्या श्रीचरणीं त्यांच्याच ब्रह्मनामाच्या उच्चारात सहजतेने अापल्याला दंडवत घालता येतोय, हे तुम्हां आम्हां भाविकांचे केवढे मोठे भाग्य आहे. खरोखरीच, देवांनी आपल्याला माउलींच्या नंतर जन्माला घातले यातच सगळे आले ! देवदेवतांनाही दुर्लभ असे भगवान श्री माउलींचे दर्शन, त्यांचे नामस्मरण व त्यांच्या अवीट गोडीच्या सारस्वताचे अनुशीलन-अनुगमन आपण त्यामुळेच तर आज करू शकतोय. मी यासाठी सृष्टिकर्त्या परमात्म्याचा जन्मजन्मांतरी ऋणाईत आहे. माझा मलाच या भाग्यासाठी सदैव हेवा वाटतो.
सद्गुरु श्री माउलींच्या स्तुतिगायनात आज स्वर्गादि लोकांत, वैकुंठातही मोठमोठ्यांच्यात अहमहमिका लागलेली असेल, तिथे माझ्यासारख्या मशकाने काय मिजास मारावी हो ? पण मी तर ही माझी मिराशी मानतोय, माझ्यावरचा श्रीजगन्नाथांचा महान उपकार मानतोय की, आजच्या परमपावन दिनी मला ते सद्गुरु श्री माउलींचे स्मरण करून देत आहेत, माझ्याकडून व त्याचवेळी तुम्हां सहृदय वाचकांकडूनही स्मरण करवूनही घेत आहेत.
म्हणूनच माझे तदभिन्न सद्गुरुराज प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या दोन अभंगांच्या विवरणाच्या माध्यमातून मीही सद्गुरु श्री माउलींच्या सर्वार्थदायक अम्लान श्रीचरणकमली ही अल्पशी वाङ्मयसेवा समर्पून, आज त्यांच्याच स्मरणानंदात मौनावतो ! आपणही खालील लिंकवरील लेखाचा आस्वाद घेऊन श्री माउलींच्या चरणी स्मरणसेवा समर्पावी ही प्रार्थना !
सरतेशेवटी श्रीज्ञानेश्वरकन्या सद्गुरु श्री.गुलाबराव महाराजांच्या शब्दांत मायतात सद्गुरु श्री माउलींच्या चरणी सप्रेम प्रार्थना करतो,
माझ्या समान न जनी अति पापकारी |
नाही तुम्हां समही पावन पापहारी |
यालागि पदकमले नमिते स्वभावे |
ताता तुम्हां दिसेल योग्य तसे करावे ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित

https://rohanupalekar.blogspot.com/2016/11/blog-post_27.html?m=1