30 Apr 2017

भाष्यकाराते वाट पुसतू

आज वैशाख शुद्ध पंचमी, अद्वैतज्ञानभास्कर भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांची जयंती !
"जगद्गुरु भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराज" असे नुसते नाव जरी उच्चारले तरी आम्हां भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि दोन्ही हात जोडले जाऊन केव्हा मस्तक नमवले जाते, ते कळत देखील नाही. इतका या श्रेष्ठ, प्रत्यक्ष शिवावतारी व अलौकिक, अद्भुत विभूतिमत्वाचा आम्हां भारतीयांच्यावर प्रेमळ पगडा आहे. त्यांचीच प्रात:स्मरण स्तोत्रे म्हणत-ऐकत आमचा दिवस उजाडतो तर त्यांची अपराधक्षमापन स्तोत्रे म्हणत रात्री आम्ही भारतीय लोक झोपी जातो. आमच्या दैनंदिन जीवनात श्रीमद् शंकराचार्यांचा असा 'अक्षर सहवास' आम्हांला सतत लाभतो व त्यातील अद्भुत माधुर्य, गेयता, रसिकता व ज्ञानप्रकर्षामुळे तो हवाहवासाही वाटतो.
भारतीय तत्त्वपरंपरेत सर्वात श्रेष्ठ व मानाचे स्थान भूषविणा-या अद्वैत-वेदान्त दर्शनाचे प्रणेते भगवान भाष्यकार श्रीमद् शंकराचार्य हे आमचे परमपूजनीय, प्रात:स्मरणीय मार्गदर्शक आहेत. श्री आचार्यांच्या भव्य जीवन-कार्याचे एका श्लोकात वर्णन करताना म्हणतात,
अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रवित् ।
षोडशे कृतवान्भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात ॥

केरळ प्रांतातील कालडी गावी शिवगुरु-आर्यांबा या सात्त्विक दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या या परिपूर्ण शिवावताराने वयाच्या आठव्या वर्षी चारही वेदांचा संपूर्ण  व सांगोपांग अभ्यास केलेला होता. त्यांना बाराव्या वर्षी यच्चयावत् सर्व शास्त्रे मुखोद्गत झालेली होती. नर्मदा किनारी सद्गुरु श्री गोविंदयतींकडून कृपाप्रसाद प्राप्तीनंतर, प्रमुख दश उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, विष्णुसहस्रनाम आदी ग्रंथांवरील सर्व भाष्ये त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी लिहून पूर्ण केली. पुढील सोळा वर्षे संपूर्ण भारतखंडामध्ये अद्वैत वेदान्ताचा प्रचार प्रसार करून हा दिग्विजयी अवतारी महात्मा केवळ बत्तिसाव्या वर्षी मर्त्य जगाचा निरोप घेऊन निजधामी परतला. अर्थात् त्यांचे लौकिक रूप अदृश्य झाले असले तरी, आपल्या ग्रंथांच्या दिव्यरूपाने ते सदैव सर्वांच्या पाठीशी आहेतच.
श्री आचार्यांचे हे जीवनकार्य नुसते वाचतानाही आपल्या मनात धडकी भरते. त्यांचे एकेक ग्रंथ सुद्धा एका मानवी आयुष्यात पूर्ण समजून घेता येणार नाहीत इतके अद्भुत आहेत.
श्री शंकराचार्य व श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या जीवन व कार्यात खूप साम्य आहे व हे दोघेही आपल्याकडचे अद्वितीय चमत्कारच आहेत !
श्रीमद् आचार्यांच्या भाष्यांपेक्षाही त्यांचे खरे स्वरूप त्यांच्या, "प्रबोधसुधाकर, शतश्लोकी, अपरोक्षानुभूती, ब्रह्मज्ञानावलीमाला" इत्यादी प्रकरणग्रंथ तसेच त्यांच्या रसाळ, मोहक स्तोत्रांच्या अभ्यासानेच कळते. श्री आचार्य हे फार रस-भावपूर्ण अंत:करणाचे भक्तश्रेष्ठ होते. त्यांच्या स्तोत्रांमधील भक्तश्रेष्ठाच्या भाव-विश्वाचे मनोज्ञ प्रेमदर्शन आपल्याला अंतर्बाह्य स्तिमित करणारे, खळाळत्या असीम भक्तिगंगेत अंतर्बाह्य ओलेचिंब भिजवणारे आहे. "मूकास्वादनवत् ।" अशी सर्वांग-तृप्ती प्रदान करणारे आहे !!
सनातन वैदिक धर्माचे त्यांनी केलेले संरक्षण व पुनरुज्जीवन कार्य हे वादातीत अलौकिक आहे. श्री आचार्य झाले नसते तर संपूर्ण भारतीय उपखंड हा वेदविरोधी व अपूर्ण अशा नास्तिक संप्रदायांनी गिळंकृत केला असता. श्री आचार्यांच्या थोर कार्यामुळेच अजरामर व सर्वश्रेष्ठ अशी आपली वैदिक संस्कृती आपण आजही अभिमानाने जोपासू शकलेलो आहोत. हे त्यांचे आपल्यावरचे कृपाऋण विसरून चालणार नाही. आपल्या होऊन गेलेल्या पूर्वजांच्या शेकडो पिढ्या व पुढे होणा-या वंशजांच्याही शेकडो पिढ्यांपर्यंत हे आचार्य-ऋण आपण मस्तकावर सादर, सप्रेम वागविणार आहोत, नव्हे ते आपले आद्य कर्तव्यच होय!
श्रीमद् आचार्यांचा आणखी एक खूप मोठा उपकार म्हणजे, त्यांनी त्या काळात प्रामुख्याने प्रचलित असलेल्या, गणपती, शंकर, विष्णू, देवी व सूर्य या पाच ब्रह्मस्वरूप देवतांच्या सर्व उपासना संप्रदायांचा "पंचायतन पूजा" या एकाच प्रकारात केलेला विलक्षण समन्वय, हा होय. आचार्यांच्या या सुरेख समन्वयामुळेच विविध संप्रदाय आपापले हेवे-दावे सोडून एकत्र आले व भारतीय संस्कृती शकले होण्यापासून वाचली.
सनातन वैदिक हिंदू धर्माच्या रक्षण व संवर्धनासाठी त्यांनी भारताच्या चार दिशांना जगन्नाथपुरी, शृंगेरी, द्वारका व बद्रिनाथ अशी चार व कांचीला पाचवे पीठ स्थापन केले. आपल्या प्रमुख शिष्यांची त्यावर स्थापना करून त्यांना कार्य-नियमावली व उपासना घालून दिली. सनातन धर्माच्या संधारणेसाठी प्रचंड ग्रंथरचना करून भक्कम तात्त्विक आधार निर्माण करून ठेवला. विविध स्थानांवर देवतांची प्रतिष्ठापना करून लोकांना उपासना करण्यासाठी प्रोत्साहित केले. कन्याकुमारीपासून ते पार अफगाणिस्तानापर्यंत आणि पश्चिम सागरापासून ते पूर्वेच्या कामाख्येपर्यंत अखंड भ्रमण करून त्यांनी धर्मस्थापना केली. त्याच काळात त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील भूवैकुंठ पंढरीत येऊन भगवान श्रीपांडुरंगांचे दर्शनही घेतले. ते सावळे सुकुमार राजस रूप पाहून, उत्स्फूर्त अष्टक रचून या मदनमोहनाची स्तुती करायचा मोह आचार्यांच्या रसिकाग्रणी भक्तहृदयाला आवरला नाही. अवघ्या बत्तीस वर्षात एवढे प्रचंड व अमानवी कार्य केवळ श्रीभगवंतच करू शकतात, यात किंचितही शंका नाही. म्हणूनच आमचे सर्व मायबाप साधूसंत श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांना प्रत्यक्ष अपरशिवच जाणून भजतात.
श्रीमद् भगवत्पादाचार्यांचे विभूतिमत्त्व कसे आहे माहितीये? बहरलेल्या डेरेदार महान वटवृक्षासारखे; असंख्य पारंब्या असलेल्या, आपल्या प्रचंड विस्ताराने मोठा भूभाग व्यापलेल्या, शेकडो पक्षांना आधार देणा-या !! या अखिलमंगलरूप, शिवरूप वृक्षराजाच्या कृपासावलीत, जन्मजन्मांतरी जिची जीवाला एकमात्र आस लागलेली, सतत हवीहवीशी वाटलेली चिन्मयविश्रांती सहजतया लाभते. अंगांग मोहरून टाकणारी ही सुखद शांतशीतल जाणीव, जीवपणाचे भानही विसरायला लावणारी आहे !
श्रीमद् आचार्यांच्याच तत्त्वरूप पदचिन्हांचे अनुसरण करीत करीत गेली अनेक शतके कोट्यवधी जीवांचा उद्धार झालेला आहे, पुढेही होतच राहणार आहे. अहो, या महन्मंगल, परमतेजस्वी अद्वैतज्ञानभास्कराचा एकेक कृपाकिरणही आयुष्याच्या धन्यतेला पुरेसा आहे. शिवाय हा ऊर्जस्वल ज्ञानमार्तंड तेज:पुंज असला तरी दाहक अजिबातच नाही. क्षीरसागराला भरती आणणा-या अमृतकराला, त्या शीतल चंद्रालाही सुशीतलत्व प्रदान करणारा हा परमशांत चिद्गगनभुवनदिवा आहे, विश्वाभास मावळवीत साधकहृदयी अद्वय-अब्जिनीचा विकास करण्यासाठी उदयलेला नवल-चंडांशू आहे ! या अपूर्व-मनोहर अलौकिक-सुंदर सहस्रकराला वारंवार दंडवत घालतो, तेवढीच माझी परंपरेने आलेली मिराशी आहे; आणि तीच माझे सकलैश्वर्यदायक महद्भाग्यही !!
जगद्गुरु भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांचे किती व कसे गुणगान करावे? आपली लेखणी-वाणी फार फार तोकडी आहे त्यासाठी. अहो, साक्षात् ज्ञानावतार भगवान श्री ज्ञानेश्वर माउली देखील, *"भाष्यकाराते वाट पुसतू ।"* असे म्हणून त्यांचे तत्त्वज्ञान प्रांतातील सार्वभौमत्व मान्य करतात आणि त्यांच्याच अद्वैतसिद्धांताचे स्वानुभूत प्रतिपादन आपल्या वाङ्मयातून करतात. म्हणून आपण केवळ सद्गुरुकृपेनेच लाभलेल्या, श्री आचार्यांच्या चरणींचे अनमोल रज:कण मस्तकी धारण करण्याच्या आपल्या अद्भुत भाग्याचा वारंवार हेवा करावा, यात नवल ते काय? हे अपूर्व सुखभाग्य तरी काय थोडे म्हणता येईल का?
भगवान श्रीमद् शंकराचार्य स्वामी महाराजांचा अद्वैत सिद्धांत केवळ एका वाक्यात "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर: ।" असा सांगता येत असला, तरी त्याच्या सविस्तर आकलनासाठी आजवर उत्तमोत्तम ग्रंथच्या ग्रंथ लिहिलेले आहेत महात्म्यांनी. पण त्या सर्वंकष सिद्धांताची व्याप्ती एखाद्याच्या पूर्ण कवेत आलेली आहे, हे म्हणणे धारिष्ट्याचेच ठरावे. तरीही माझ्या वाचनात आलेल्या एका विलक्षण ग्रंथाचा मुद्दाम उल्लेख करतो. संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक पूजनीय श्री.शिरीषदादा कवडे यांनी बेळगाव येथील श्रीशंकर जयंती महोत्सवात केलेली, श्री आचार्यांच्या "शिवानंदलहरी" या भावगर्भ स्तोत्रातील अडतिसाव्या श्लोकावरील चार प्रवचने *"चित्तडोहावरील आनंदलहरी"* या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित झालेली आहेत. या ग्रंथात पू.दादांनी सर्वसामान्यांनाही सहज समजेल अशा सोप्या मराठी भाषेत श्री आचार्यांचे समग्र तत्त्वज्ञान नेमकेपणे विवरिले आहे. माझी सर्वांना प्रेमळ विनंती आहे, हा जबरदस्त ग्रंथ जरूर पाहा, अभ्यासा. त्यातून समोर उभे ठाकणारे श्रीमत्शंकर भगवत्पादाचार्यांचे भव्य-दिव्य स्वरूप आपल्याला कायमच तत्त्व-ऊर्जा देणारे, आपले लळे पाळीत आपल्याला ब्रह्मबोधाचे खाजे सप्रेम भरवणारे व निरंतर आनंदमय करणारेच आहे. आचार्य तत्त्वज्ञानावरचा दुसरा इतका सोपा व सुंदर मराठी ग्रंथ आजवर मी तरी पाहिलेला नाही !
भारतभूमीचे चिरंतन आणि अमूल्य वैभव असणा-या भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या पावन, सर्वतीर्थास्पद श्रीचरणीं, आजच्या श्रीशंकरजयंतीच्या पर्वावर, आपण सर्वांनी मिळून प्रेम-कृपादानाची याचना करीत वारंवार नतमस्तक होऊया; आणि भगवान श्री माउली म्हणतात त्याप्रमाणे श्रीमद् आचार्यांनी दाखवलेल्या उपासनावाटेवरून मार्गक्रमण करीत ब्रह्मबोधाच्या महानगरीत सुखरूप पोहोचूया !
आजच्या पावन दिनापासून भगवान श्री आचार्यांचे कमीतकमी एक तरी स्तोत्र दररोज न चुकता म्हणायचा सेवाप्रयत्न आपण सर्वांनी अंगवळणी पाडूया व त्या स्तोत्रमाधुर्यात, त्यातील भक्तिप्रेमात रंगून जाऊन येणारा आपला प्रत्येक दिवसही सत्कारणी लावूया. एवढे तरी नक्कीच करू शकतो आपण. त्याद्वारे आचार्यांच्या कृपाऋणाचे, त्यांच्या त्रिभुवनपावन नामाचे स्मरणही आपल्याला अविरत होत राहील. हेही भाग्यच मोठे ! त्यातूनच हळूहळू त्यांच्या समग्र वाङ्मयब्रह्माचेही अनुसंधान होऊन आपण "चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहं ।" या आचार्यांच्या तत्त्वज्ञानाच्या सारसिद्धांताचीही अनुभूती त्याच्याच कृपेने लाभून धन्य धन्य होऊन जाऊ !
श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयम् ।
नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् ॥
श्रीमदाद्य शंकराचार्य भगवान की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

29 Apr 2017

अक्षयतृतीयेचा अमृतयोग

नमस्कार सुहृदहो,
सूर्यसिद्धांतानुसार आज वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय्यतृतीया !!
आपली वैदिक संस्कृती ही फार प्रगल्भ विचारांतून निर्माण झालेली आहे. या संस्कृतीचा मूळ पायाच विवेक-विचार हा असल्याने यात काहीही अनाठायी किंवा वावगे नाही. आपण नीट विचार न करता उगीचच भुई धोपटत बसतो; म्हणूनच आपले प्राचीन वैभव आपल्याला कवडीमोलाचे वाटते, हे मोठे दुर्दैव आहे.
आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत व्यास वाल्मीकादी थोर थोर ऋषी. त्यांच्या अलौकिक ऋतंभरा प्रज्ञेतून साकार झालेल्या सर्व गोष्टी देखील अलौकिकच असणार यात शंका ती काय?
उदाहरणार्थ साधी सणांची संकल्पनाच घ्या. आपल्या संस्कृतीचे सण हे निसर्गचक्र, ऋतुमान, शारीरिक व मानसिक आरोग्य यांचा सुयोग्य विचार करून, समाजहित-देशहित तसेच अंतिमत: मानवजातीचे शाश्वत हित डोळ्यांसमोर ठेवूनच तयार केलेले आहेत. या सणांमधून कायम सर्वांचे कल्याणच पाहिलेले दिसून येते. ऋषीमुनींच्या प्रातिभ व सात्त्विक बुद्धीचे निखळ प्रतिबिंबच या सणांमधून साकारलेले आपल्याला दिसते. म्हणूनच भारतीय सणांची संकल्पना हा एक नाही तर अनेक पीएचड्यांचा विषय आहे !
भारतीय सणांमध्ये साडेतीन शुभमुहूर्त महत्त्वाचे मानले जातात. त्यातील आज अक्षय्यतृतीया हा साडेतीनावा, म्हणजेच अर्धा शुभमुहूर्त आहे. ही तिथी त्रेतायुगाची सुरुवात मानली जाते म्हणून तिला 'युगादि' असेही म्हणतात. पुराणांमध्ये या शुभ मुहूर्तावर अनेक उत्तम प्रसंग घडल्याची नोंद सापडते.
आपला प्रत्येक सण हा काही विशेष गोष्टीशी निगडित असतो. पाडव्याला गुढीचे तर दिवाळीत दिव्यांचे महत्त्व; दस-याला सोने लुटायचे असते. आजच्या तृतीयेला "दान" महत्त्वाचे मानले जाते. ही पितृतिथी आहे. या दिवशी आपल्या कुळातील दिवंगत पितरांसाठी आवर्जून दानधर्म केला जातो.
"दान" हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. पण त्याचे खरे मर्म मात्र कोणीच समजून घेतलेले नसते. त्यासाठीच आजच्या सुमुहूर्तावर आपण भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी मांडलेली दानाची संकल्पना थोडक्यात समजून घेऊया.
भगवान श्री ज्ञानेश्वरमाउली दानाचेही तीन प्रकार मानतात, सात्त्विक, राजस व तामस. यातले सात्त्विक दानच संतांनी श्रेष्ठ मानलेले असून आजच्या तिथीला त्याचेच विशेष महत्त्व असते. सात्त्विक दानाचे मर्म सांगताना, श्रीज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायातील विसाव्या श्लोकाच्या विवरणात श्री माउली म्हणतात, "जे दान प्रामाणिकपणे व स्वधर्मानुसार मिळालेल्या आपल्या स्वकष्टार्जित संपत्तीतून निरपेक्षपणे केले जाते तेच दान सात्त्विक होय. उत्तम क्षेत्रस्थानी, सुयोग्य व गरजू व्यक्तीला, मनात कसलाही अहंकार न ठेवता आणि आढ्यतेची, मी दान दिले आहे अशी किंचितही भावना न ठेवता, तसेच परतफेडीची किंवा मोबदल्याची कसलीही अपेक्षा न ठेवता जे दिले जाते, तेच सात्त्विक दान होय. दुधाच्या अपेक्षेने गायीचा प्रयत्नपूर्वक सांभाळ करणे, याप्रकारचे दान राजस दान होय. तर वाईट काळात, वाईट गोष्टींवर म्हणजे नाचगाणे, तमाशा सारख्यांवर खर्च करणे हे तामस दान होय."
आजच्या तिथीला जो प्रेमादरपूर्वक सात्त्विक संपत्तीचे यथाशक्य दान करतो, त्याला त्या दानाचे अक्षय्य म्हणजे कधीही कमी न होणारे, कधीही नष्ट न होणारे पुण्य मिळते, असे आपले संत म्हणतात.
यावर्षी अक्षय्यतृतीया शनिवारी आलेली आहे. त्यात दुपारी तीन वाजेपर्यंत रोहिणी नक्षत्र असल्याने अमृतसिद्धी योगही घडलेला आहे. या परमपुण्यदायक योगावर जो तीर्थस्नान, दान, सद्गुरु दर्शन, वंदन, साधना, श्रीभगवंतांचे नामस्मरण, उपासना अशी कर्मे प्रेमादराने करेल, त्याला त्याचे अनंतपट व अक्षय्य फल प्राप्त होईल, असे शास्त्र सांगते. थोडक्या कष्टात मोठा लाभ मिळवून देणारे आपले सण किती प्रगल्भ विचारांतून निर्माण झालेले आहेत पाहा !
अक्षय्यतृतीया उन्हाळ्याच्या दिवसात येत असल्याने, पाण्याचा माठ, छत्री, वस्त्र, पंखा, पन्हे अशा उष्णताशामक गोष्टींचे आवर्जून दान करायला शास्त्राने सांगितलेले आहे. यातही किती विचार केलाय बघा ऋषीमुनींनी. त्यांची एकही गोष्ट निरर्थक नाही, हे पाहून आपला ऊर अभिमानाने भरून यायला हवा !
आजच्या या पावन पर्वावर, तुम्हां आम्हां सर्वांना आपल्या प्रगल्भ प्राचीन वारशाचे महत्त्व उमजो आणि सात्त्विक, पारमार्थिक कर्मांमध्ये सर्वांची रुची वाढो, श्रीभगवंतांचे अक्षय्य, अमृतमय नाम घेण्याची सद्बुद्धी सर्वांना लाभो, हीच जगन्नियंत्या भगवान श्रीपांडुरंग परमात्म्याच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक प्रार्थना करून पुनश्च सर्वांना अक्षय्यतृतीयेच्या शुभेच्छा देतो !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

28 Apr 2017

नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम्

आज वैशाख शुद्ध तृतीया, भगवान महाविष्णूंचे सहावे अवतार महावीर चिरंजीव श्री परशुराम यांची जयंती. ऋषिवर्य जमदग्नी व भगवती श्रीरेणुकामातेचे हे चतुर्थ व सर्वात धाकटे सुपुत्र होत.
त्याकाळातील निर्दय व प्रजाहिताचा विचार न करणा-या, सत्तेमुळे माजलेल्या, अनाचारी अशा क्षत्रिय राजांच्या विनाशासाठी हा अवतार झाला होता. साक्षात् शिवावतार जमदग्नी ऋषी व जगदंबा रेणुकामातेच्या पोटी भगवंतांनी अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी, रोहिणी नक्षत्रावर अवतार धारण केला.
महासिद्ध आणि श्रेष्ठ राजा कार्तवीर्यार्जुन यांनी प्रारब्धवशात् जमदग्नींचा अपमान करून त्यांची कामधेनू त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बरोबर नेली. त्या अयोग्य गोष्टीचा बदला घ्यायचा म्हणून परशुरामांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांचे हजार हात कापून टाकले व शेवटी महापराक्रमी सहस्रार्जुन राजाचा वधही केला.
खरेतर, सहस्रार्जुन हे भगवान श्रीदत्तप्रभूंचे शिष्य होते व त्यांनीच श्रीदत्तप्रभूंना वर मागितला होता की, माझा मृत्यू तुमच्यासारख्याच कोणा महापुरुषाच्या हातून व्हावा. देवांच्याच प्रेरणेने परशुरामांनी त्यांचा वध केला. पण सहस्रार्जुनाच्या मुलांनी सूडाच्या भावनेने परशुरामांना मारण्यासाठी आश्रमावर हल्ला केला. परशुराम तेथे नव्हते म्हणून त्या आततायी राजपुत्रांनी जमदग्नींचाच वध केला. त्यांच्या त्या मूर्खपणावर संतापून, भ्रष्ट राज्यकर्त्यांचा पूर्णच नायनाट करण्याच्या आपल्या जन्मकार्याला पुढे ठेवून, परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वीवरील सर्व अनाचारी क्षत्रिय राजांचा संपूर्ण वंशच नष्ट केला. त्यांच्या रक्ताने भरलेल्या पाच तळ्यांच्या काठी पितृतर्पण करून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.
याठिकाणी लोक खूप मोठी गल्लत करतात. परशुरामांनी हे अयोग्य केले, संपूर्ण पृथ्वीवरचे क्षत्रिय मारले तर मग पुढे निर्माण कसे झाले, वगैरे अनभ्यस्त प्रश्न निर्माण करतात. एक लक्षात ठेवायला पाहिजे की, भगवान श्रीपरशुराम हे साक्षात् श्रीभगवंतांचे अवतार होते, ते कधीच चुकीचे वागणार नाहीत. त्यांनी केवळ जे अनाचारी व दुष्ट राजे होते, त्यांचाच वध केला. तोही सलग २१ वेळा. त्यांनी चांगल्या वागणा-या राजांना मारलेले नाही.
पुढे मारलेल्या राजांच्या रक्ताचे पाच डोह भरल्यावर, पूर्वी केलेल्या प्रतिज्ञेनुसार तेथे त्यांनी आपल्या वडलांचे क्रियाकर्म केले व त्या रक्ताने तर्पण केले. रेणुकामाता सती गेल्या. हा सगळा कथाभाग माहूर येथे घडला. तेथे प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंनीच त्या क्रियाकर्माचे पौरोहित्य केले होते. नंतर श्रीदत्तप्रभूंनी परशुरामांना रेणुकामातेचे दर्शन करविले व जमदग्नी-रेणुका हे साक्षात् शिव-पार्वती असल्याची जाणीव करवून दिली. त्यावेळी जमिनीतून श्रीरेणुकामातेचे मुख बाहेर आले, ज्याची आजही माहूर येथे पूजा केली जाते.
भगवान परशुरामांनी नंतर भगवान श्रीदत्तप्रभूंच्या पावन उपस्थितीत मोठा यज्ञ करून हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त घेतले व महर्षी कश्यपांना सर्व पृथ्वीचे दान दिले. दिलेल्या दानाचा आपण स्वत: पुन्हा उपभोग घ्यायचा नसतो. म्हणून आता राहायचे कोठे? या विचाराने त्यांनी पश्चिम सागराला काही जागा मागितली, तीच आजची कोकण भूमी होय. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा सर्व भाग भगवान परशुरामांनी वसवलेला असून त्यांनीच तेथील आदिवासी जनतेला शिक्षण दिले, ज्ञानी केले. परशुराम हे धनुर्विद्येचे महान आचार्य मानले जातात. त्यांनी पुढे भीष्माचार्य, कर्ण आदी महावीरांना धनुर्विद्या शिकवली. रामावतारात त्यांचे भगवान श्रीरामरायांशी युद्ध झाले व त्यांच्या ठिकाणचे क्षत्रिय तेज भगवान रामरायांमध्ये सामावले. त्यानंतर भगवान परशुराम ब्रह्मर्षी होऊन आजही कोकण प्रांतात वास्तव्य करून आहेत. चिपळूण जवळील परशुराम क्षेत्री त्यांचे मोठे स्थान आहे. ते चिरंजीव अवतार आहेत. भगवान परशुरामांना स्वत: भगवान श्रीशिवांनी धनुर्विद्या शिकवली होती. प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी त्यांच्या "श्रीदत्तमाहात्म्य" या अद्भुत ग्रंथात अध्याय अठरा ते चोवीस या सात अध्यायांमधून भगवान परशुरामांचे सविस्तर चरित्र फार बहारीने वर्णिलेले आहे.
भगवान परशुराम हे साक्षात् भगवान श्रीदत्तप्रभूंचे शिष्य होते. त्यांना भगवान श्रीदत्तप्रभूंनी त्रिपुराविद्या अर्थात् श्रीविद्येचा अनुग्रह केलेला होता. त्या दोघांचा संवाद असलेला ' त्रिपुरा रहस्य ' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पुढे भगवान परशुरामांनी ही त्रिपुराविद्या कोयनानगर जवळील श्रीक्षेत्र दत्तधाम या पावन स्थानी, भगवान श्री गोरक्षनाथांना कृपापूर्वक प्रदान केली.
सप्त चिरंजीवांमधील थोर विष्णुअवतार व ब्राह्मणांचे तारणहार, श्रीदत्तशिष्य परशुरामांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीयेला, अक्षय्य तृतीयेला रात्रीच्या पहिल्या प्रहरात झाला. आज दुपारी वैशाख शुद्ध तृतीया लागलेली असल्याने, आजच श्री परशुराम जयंती साजरी केली जात आहे. मात्र सूर्यसिद्धांतानुसार अक्षय्यतृतीया उद्या साजरी होणार आहे.
भृगू ऋषींच्या कुळात जन्मले म्हणून "भार्गवराम", हातात परशु म्हणजे कु-हाड धारण करतात म्हणून "परशुराम",  रेणुकामातेचे पुत्र म्हणून "रेणुकानंदन" अशी त्यांची विविध नावे संतांनी गायलेली आहेत.
अधर्माचा संपूर्ण नि:पात करणा-या, वेदवेदांगे तसेच धनुर्विद्येचे महान आचार्य असणा-या, परमतेजस्वी भगवान श्री परशुरामांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत प्रणाम !!
(आम्ही सूर्यसिद्धांताचे पंचांग वापरीत असल्याने, आमच्याकडे अक्षय्यतृतीया उद्या साजरी होणार आहे. त्यामुळे अक्षय्यतृतीयेचे महत्त्व सांगणारा लेख उद्या पोस्ट केला जाईल.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

26 Apr 2017

नृसिंह सरस्वती अतिप्रिय धन्य नारायण यतिराय

आज चैत्र अमावास्या, श्रीदत्तप्रभूंची राजधानी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील अग्रपूजेचा मान असलेल्या प.प.श्री.नारायणस्वामी महाराजांचा वैकुंठगमन दिन.
जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांप्रमाणेच, साक्षात् वैकुंठाला गेलेले हे दुसरे विभूतिमत्व होय. ही घटना फार जुनी नाही, इ.स.१८०५ मध्ये घडलेली आहे. या प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे शिष्य श्री. गोपाळस्वामी यांनी त्याचे वर्णन करणारे पद रचलेले आहे. ते "सांगावे, कवणा ठाया जावे ।" हे पद श्रीदत्त संप्रदायात विनवणीचे पद म्हणून दररोज आवर्जून म्हटले जाते. तसेच वाडीलाही पालखीसेवेच्या समाप्तीला म्हटले जाते.
प.प.श्री.नारायणस्वामींवर भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे अपार प्रेम होते. पूर्वाश्रमी श्री.नारायणशास्त्रींची पत्नी निवर्तली होती, त्यांना दोन लहान मुली होत्या. एकदा त्यांनी रात्री मुलींना जेऊ घालून झोपवले व स्वत: समाधी लावून बसले. नेमके त्या मुलींना संडास लागल्याने जाग आली. त्यांनी बाबांना हाक मारली, पण ते तर समाधीत होते. त्यांना ऐकू जाण्याचा प्रश्नच नव्हता. पण भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज चटकन श्री. नारायणशास्त्रींचे रूप घेऊन आले व त्या दोघींना परसाकडेला घेऊन गेले. त्यांची स्वहस्ते शुद्धी केली व पुन्हा आणून झोपवले. सकाळी हा प्रसंग श्री.नारायणशास्त्रींना कळला. प्रत्यक्ष देवांना आपल्यासाठी असे हीन कृत्य करावे लागले, याचे त्यांना अतीव वाईट वाटले. त्यांनी लवकरच आपल्या मुलींना योग्य वर शोधून त्यांची लग्ने लावून दिली व सद्गुरुसेवेसाठी मोकळे झाले. त्यांचे कोल्हापूर परिसरात भरपूर वास्तव्य व लीला झालेल्या आहेत.
वाडीला एके दिवशी ते कृष्णेत स्नानाला गेलेले असताना अद्भुत घटना घडली. प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा नदीच्या पात्रातच त्यांना संन्यास दीक्षा दिली. ते नदीत स्नानाला उतरले नारायणशास्त्री म्हणून, पण डोहातून बाहेर आले ते भगवी छाटी घालून व हाती दंड कमंडलू घेऊनच. त्यांनी दुर्गमानगडावर वाघाच्या पायातील काटा काढून त्याला दु:खमुक्त केले होते. त्या भयानक जनावराने गायीसारखे प्रेमळ होऊन त्यांच्याकडून सेवा करून घेतली. दक्षिणेतील साक्षात् शिवावतार श्री.चिदंबर महास्वामींचाही प.प.श्री.नारायणस्वामींवर लोभ होता. तीन महिने त्यांनी स्वामींना आपल्यापाशी ठेवून घेतले होते. त्यांच्या चरित्रातील असे सगळेच प्रसंग अत्यंत भावपूर्ण आणि हृद्य आहेत. योगिराज सद्गुरु श्री. वामनरावजी गुळवणी महाराजांच्या घराण्यावर या प.प.श्री.नारायणस्वामींचीच परमकृपा होती. त्यांच्या कृपेनेच गुळवणी वंश चालला व त्यात पुढे श्रीमहाराजांचा जन्म झाला. प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी बारा संस्कृत श्लोकांमधून प.प.श्री.नारायणस्वामींचे चरित्र गायलेले आहे.
प.प.श्री.नारायणस्वामींचे चरित्र अलौकिक असून प्रासादिकही आहे. सदर ग्रंथ श्री.गुळवणी महाराजांचे शिष्य वै.रामकवींनी रचलेला असून तो पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेला आहे. या पंधरा अध्यायी छोटेखानी पोथीमध्ये महाराजांच्या सर्व लीलांचे वर्णन आलेले आहे. योगिराज श्री.गुळवणी महाराजांचे आशीर्वाद लाभलेली ही पोथी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज अनेक भक्तांना अडीअडचणींमध्ये आवर्जून वाचायला सांगत असत व त्याचे अद्भुत अनुभवही लोकांना येत असत.
आज श्रीनृसिंहवाडी येथे श्री नारायणस्वामींचा आराधना उत्सव संपन्न होत असतो. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे त्यांच्यावर इतके प्रेम होते की, आजही श्री मनोहर पादुकांच्या पूजेपूर्वी प.प.श्री.नारायणस्वामींची पूजा होत असते. तसेच देवांची स्वारी ( उत्सवमूर्ती ) देखील एरवी प.प.श्री.नारायणस्वामींच्याच ओवरीत विराजमान असते. देवांनाही आपल्या या अनन्य भक्ताचा विरह क्षणभर देखील सहन होत नसावा !
एकदा भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी एका कुष्ठरोग झालेल्या माणसाला स्वप्नात जाऊन सांगितले की, "तू नारायणस्वामींच्या अंगावरून येणा-या पाण्यात स्नान कर, तुझे कुष्ठ जाईल." तो आनंदाने दुस-या दिवशी पहाटे कृष्णेच्या काठी जाऊन वाट बघत बसला. तेवढ्या पहाटे त्याला तिथे पाहून नारायणस्वामींनी त्याला विचारले. त्याने सगळे सरळ मनाने सांगून टाकले. देवांचीच आज्ञा म्हणून नारायणस्वामींनी त्याला आपल्या खालच्या बाजूला स्नान करू दिले. त्याचे कुष्ठही त्यामुळे गेले. कोणाला हे कळू नये म्हणून त्याला त्यांनी सूर्योदयापूर्वी गाव सोडायलाही सांगितले. नंतप नारायणस्वामी आपले स्नान झाल्यावर मनोहर पादुकांसमोर आले खरे, पण त्यांनी दंडाला मुद्रा बांधायला सुरुवात केली. त्याचा अर्थ आता ते तिथून निघून जाणार, असाच होता. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्यांना विचारले, "काय कारण आज मुद्रा बांधायचे?" त्यावर कृतक कोपाने नारायणस्वामी उत्तरले, "आपल्याला आम्ही नकोसे झालेलो आहोत, म्हणून असल्या उपाधी मागे लावायला सुरू केलेले दिसते. तेव्हा आता आम्ही वाडी सोडून जात आहोत." त्यांचे हे उत्तर ऐकून श्री नृसिंह सरस्वती स्वामी म्हणाले, "अहो, असे काय करता? तुम्ही गेलावर आम्हांला करमेल का? बरे, नाही लावणार उपाधी काही तुमच्या मागे, पण वाडी सोडून जाऊ नका !" देवांचे नारायणस्वामींवर इतके प्रचंड प्रेम होते की, देवांनी सुद्धा त्यांच्या इच्छेसमोर हार मानली. देव-भक्ताचे हे जगावेगळे नाते आपल्या मानवी कल्पनेत बसणारे नाहीच !!
प. प. श्रीनारायण स्वामी महाराजांचे अनेक शिष्य विख्यात झाले. त्यात श्री.गोपाळस्वामी, श्री.अच्युतस्वामी व श्री.कृष्णानंद स्वामी (काशीकर स्वामी) हे तीन संन्यासी शिष्य व 'गुरुभक्त' नावाने रचना करणारे श्री.ढोबळे पुजारी हे गृहस्थाश्रमी शिष्य मोठे अधिकारी होते. श्री.गुरुभक्तांच्याच अनेक रचना वाडीला काकड्यापासून शेजारतीपर्यंत म्हटल्या जातात. "दत्तात्रेया तव शरणम् ।" व "सावळा सद्गुरु तारू मोठा रे ।" अशा श्री.गुरुभक्तांच्या काही सुप्रसिद्ध रचना अनेकांच्या नित्यपठणात आहेत.
आजच्या पावन आराधना दिनी, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे लाडके शिष्योत्तम प.प.श्री.नारायणस्वामी महाराजांच्या श्रीचरणीं सादर दंडवत प्रणाम  !!
( " श्रीनारायणस्वामी चरित्ररत्नाकर " हा ग्रंथ हवा असल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा. श्रीवामनराज प्रकाशन, पुणे -५१ , © : 020-24356919 )
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

25 Apr 2017

वेणा पावली पूर्णविराम

आज चैत्र कृष्ण चतुर्दशी, समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराजांच्या स्वनामधन्य शिष्या श्रीसंत वेणाबाई महाराजांची आज पुण्यतिथी !!
समर्थ श्री रामदास स्वामींचे सर्वच शिष्य मोठे विलक्षण होते, तरीही त्यांतील श्रीसंत कल्याणस्वामी व श्रीसंत वेणास्वामी हे दोघे श्री समर्थांचे मानसपुत्र व मानसकन्या म्हणून शोभून दिसतात. दोघांचेही अलौकिक चरित्र श्रीगुरुभक्तीचा परमादर्श आहे. या दोघांचाही सद्गुरुस्वामींना किती अभिमान वाटत असेल, याची आपण कधी कल्पनाही करू शकणार नाही.
समर्थस्वामींनी आपल्या सर्व शिष्यिणींमध्ये केवळ श्री वेणाबाईंनाच कीर्तन करण्याची अनुज्ञा दिलेली होती आणि इ.स.१६५६ मध्ये मिरज येथे मठ स्थापून त्याचे मठाधिपती पदही दिलेले होते, यातच त्यांचा थोर अधिकार दिसून येतो.
श्री समर्थांच्या आज्ञेने श्री वेणाबाईंनी मोठा शिष्य संप्रदायही निर्माण केलेला होता. त्यांनी संप्रदाय कार्यार्थ फार भ्रमंती केल्याचे संदर्भ नाहीत, पण त्यांनी मोठे कार्य केले हे मात्र पूर्ण सत्य आहे. 'समर्थप्रतापा'सारखी प्रचंड रचना करणारे श्री गिरिधरस्वामी हे श्री वेणाबाईंचेच प्रपौत्र शिष्य होते.
श्रीसंत वेणाबाईंचे वाङ्मय अल्प असले तरी ते श्रीसमर्थांच्या कृपेने प्राप्त झालेल्या अद्भुत प्रतिभेचाच सुरेख प्रत्यय देणारे आहे. त्यांची समग्र अभंगरचना अलवार-प्रेमाने गुरुभक्ती गाणारी, अनन्य निष्ठेने गुरुमहिमा प्रकट करणारी व नित्यसुगंधी प्राजक्तासारखी देखणी आहे. त्या अभंगसुमनांमधून त्यांच्या हृदयीचे निखळ श्रीगुरुप्रेम, साधनेने आलेल्या आपल्या स्वानुभूतींचे सुंदर शब्दकोंदण ल्येऊन भरभरून व्यक्त होताना दिसते. त्यांचा तो प्रचितीफुलोरा वाचकांच्या चित्ताला नुसता सुखावहच नाही तर गुरुप्रेमाचा अद्भुत डोल आणणाराही आहे !
श्रीसंत वेणाबाईंच्या चरित्रातील अत्यंत हृद्य प्रसंग म्हणजे त्यांनी आजच्याच तिथीला साक्षात् आपल्या श्रीसद्गुरुस्वामींच्या समक्ष केलेले देहविसर्जन होय. पूर्वी कधीतरी शिवथरघळीत सद्गुरुसेवेत मग्न असताना एकदा अचानक श्री समर्थांनी त्यांचे वाळत घातलेले पातळ स्वत: छाटीसारखे नेसले होते. त्यांची ही भावपूर्ण लीला गुरुशिष्यांच्या एकरूपतेचेच दर्शन करविते, असे म्हणायला हरकत नाही. ते पवित्र वस्त्र वेणाबाईंनी जपून ठेवलेले होते. विलक्षण आठवणींचा भावबंध असणारे तेच पातळ त्या नेसल्या व श्री समर्थांची अनुज्ञा घेऊन कीर्तनास उभ्या राहिल्या. त्यांच्या आयुष्यातले ते शेवटचेच कीर्तन होते. साक्षात् सद्गुरुभगवान समोर बसलेले होते व वेणाबाई आपली श्रीगुरुभक्ती समरसून मांडत होत्या. कीर्तनासाठी त्यांनी "बंध विमोचन राम माझा ।" हा स्वरचित अभंगच मुद्दाम घेतलेला होता. आपल्या हृदयीचे कोमल भाव श्रीगुरुचरणीं समर्पून त्या धन्य झाल्या व अभंगाचे शेवटचे चरण, "वेणा पावली पूर्णविराम ।" हे विवरून, श्रीगुरु समर्थांच्या श्रीचरणीं वंदन करून खरोखरीच तेथेच पूर्ण विरामल्या !! हा दिव्य सोहळा समोर प्रत्यक्ष अनुभवणा-या साधकांच्या चित्ताची काय स्थिती झाली असेल बरे? त्याहीपेक्षा श्री समर्थांच्या चित्तात झालेली कालवाकालव वर्णूही शकत नाही. आपल्या या मानसकन्येचा हा अपूर्व सोहळा पाहताना नक्कीच त्यांची स्थिती, माउलींच्या समाधीप्रसंगीच्या श्री निवृत्तिनाथांप्रमाणे झाली असेल, यात शंका नाही. असे श्रीगुरुचरणीं एकरूप होण्याचे त्रिभुवनदुर्लभ भाग्य जगाच्या इतिहासात आजवर फारच थोड्या गुरुभक्तांना लाभलेले आहे. श्रीसंत वेणाबाई म्हणूनच धन्य धन्य होत. श्रीसज्जनगडावरील समर्थ समाधी मागील श्रीवेणाबाईंचे समाधी वृंदावन या मनोहर प्रसंगाची स्नेह-आठवण, कुपीत जपलेल्या नित्यसुगंधी अत्तराच्या फायासारखी आजही दशदिशांत दरवळवत उभे आहे.
श्री वेणाबाईंचे यथोचित माहात्म्य सांगताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'अभंग आस्वाद भाग सात' मध्ये म्हणतात, "आपल्या आदर्श आणि भावोत्कट सद्गुरुप्रेमामुळे, श्रीसंत वेणाबाई प्रत्येक सद्गुरुभक्ताकरिता प्रात:स्मरणीय, नित्य वंदनीय आहेत."
श्रीगुरुभक्ताग्रणी, स्वकर्तृत्वाने समर्थकन्या म्हणून शोभून दिसणा-या श्रीसंत वेणाबाई महाराजांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर दंडवत घालून लेकुरवाचेने प्रार्थना करतो, "माये, आपल्या कृपेचा लवलेश आम्हां लेकरांवर वर्षवून, आपला जन्मविशेषच असणारे ते विलक्षण श्रीगुरुप्रेम आमच्याही हृदयात प्रकट कराल का?"
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - सानंद सांगता

नमस्कार श्रीस्वामीभक्तहो,
भगवान सद्गुरु श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या प्रकट दिनापासून, गेले सत्तावीस दिवस, आपल्या ग्रूप व फेसबुक पेजवरून "श्रीस्वामीसमर्थ नामपाठ" या प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या प्रासादिक रचनेतील एकेक अभंग आपण रोज अभ्यासत होतो. श्रीस्वामीकृपेने या अभिनव उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यासाठी तुम्हा सर्व स्वामीभक्तांचे मन:पूर्वक आभार मानतो.
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे हे श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील थोर अधिकारी विभूतिमत्व आहेत. राजाधिराज श्री स्वामी महाराज - प.पू.नारायणभट्ट सोनटक्के - प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे - प.पू.मामासाहेब देशपांडे - प.पू.शिरीषदादा कवडे; अशी ही कृपायोगाची महान गुरु-परंपरा आहे.
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांना खूप दिवस श्री स्वामी महाराजांच्या लीला व नामाचे माहात्म्य सांगणारी एखादी रचना करून त्यांच्या श्रीचरणी अर्पण करण्याची तीव्र इच्छा होती. परंतु बरेच दिवस त्यावर काहीच कार्यवाही होऊ शकली नाही. पुढे एकेदिवशी अचानक श्री स्वामी महाराजांनी त्यांना लेखनाची आज्ञा केली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर अवघ्या तीन-चार तासांमध्येच पू.दादांकडून हे सत्तावीस अभंग लिहून पूर्ण झाले. म्हणूनच ही प्रासादिक रचना 'प्रकटलेली' आहे, असे आवर्जून म्हणतोय. श्री स्वामींच्याच परमकृपेने हा २७ अभंगांचा नामपाठ स्फुरला. ही रचना पूर्ण झाल्यावर पू.दादांनी श्री स्वामी महाराजांची प्रार्थना करून त्यांच्या समोर हस्तलिखित ठेवल्यावर, स्वत: श्री स्वामी महाराजांनी "जो जे वांच्छील तो ते लाहो ।" असा विलक्षण आशीर्वाद दिला. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांमध्ये अक्षरश: हजारो भक्तांनी या नामपाठाच्या सप्रेम पठणाचे अद्भुत अनुभव घेतलेले आहेत व आजही घेत आहेत.
या नामपाठामध्ये सद्गुरु श्री स्वामी महाराजांच्या संप्रदायाचे विविध निगूढ पैलू तसेच तत्त्वज्ञान व उपासना क्षेत्रातील अनेक रहस्ये स्पष्ट करून सांगितलेली आहेत. त्या दृष्टीने हा छोटासा नामपाठ श्री स्वामीसंप्रदायाचे सर्वांगीण 'रेफरन्स बुक'च आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या नामपाठाची छापील पुस्तके तर उपलब्ध अाहेतच; पण या लेखासोबत सार्थ अभंगांची पीडीएफ देखील देत आहोत. सर्व स्वामीभक्तांनी हा दिव्य नामपाठ आवर्जून संग्रही ठेवावा व त्याचे नित्य पठण करून स्वामीकृपा संपादन करावी, ही कळकळीची विनंती.
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी अत्यंत प्रेमाने सोशल मिडियावर नामपाठ प्रसिद्ध करण्याची अनुमती दिली, हे आपले महद्भाग्यच म्हणायला हवे. त्यासाठी त्यांचे सादर वंदनपूर्वक आभार मानतो.
कालच्या श्री स्वामीसमर्थ पुण्यतिथीच्या पावन दिनी संपन्न झालेली ही "श्रीस्वामी गुणवर्णन सेवा" सर्वांच्या वतीने, श्रीस्वामी महाराजांच्या परम पावन व अम्लान श्रीचरणीं सादर समर्पित करतो व त्यांच्या करुणाकृपेची याचना करून विराम घेतो !
( या श्रीस्वामीसमर्थ नामपाठाचे आवर्तन, पारायण अथवा अनुष्ठान करण्यापूर्वी त्यासाठीचे नियम कृपया आधी नीट समजून घ्यावेत, ही विनंती. 'श्रीस्वामी समर्थ संप्रदायाचे विशिष्ट दंडक' सर्व स्वामीभक्तांनी मनन चिंतन करून आत्मसात करावेत, ही नम्र विनंती.)
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥
[ श्रीस्वामीसमर्थ नामपाठाचे अभंग, त्यांचा सरलार्थ, नामपाठाच्या पठणासंबंधीचे नियम व स्वामी संप्रदायाचे दंडक यांसह तयार केलेली पीडीएफ खालील लिंकवरून डाऊनलोड करावी.
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wVnRqQTlVcWxuTUk/view?usp=drivesdk ]

24 Apr 2017

हम गया नही जिंदा है

आज चैत्र कृष्ण त्रयोदशी, राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची १३९ वी पुण्यतिथी !
साक्षात् परब्रह्मच श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या रूपाने करुणावतार घेऊन तुम्हां-आम्हां जडजीवांचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले. चैत्र शुद्ध द्वितीयेला, शके १०७१, इ.स.११४९ मध्ये छेली खेड्यामध्ये प्रकटलेल्या या परब्रह्ममूर्तीने, अतर्क्य, अद्भुत आणि बोला-बुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून, शके १८०० च्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला, मंगळवारी दि. ३० एप्रिल १८७८ रोजी दुपारी ४-४.३० च्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली.
देहत्यागाची लीला म्हणण्याचे कारण म्हणजे, श्रीस्वामीगुरूंनी प्रत्यक्ष देह ठेवलेलाच नाही. त्यांनी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वमुखाने सांगितले होते की, ते ८०० वर्षे त्याच देहातून कार्य करीत असून, पुढची १००० वर्षे ते कार्य चालूच राहणार आहे ! शिवाय त्यांचे वचन आहेच, "हम गया नही जिंदा है ।" त्यामुळे श्री स्वामी महाराज कुठेही गेलेले नाहीतच.
वटवृक्षाखाली बसून "अनन्याश्चिन्तयन्तो मां..." हे गीतावचन पुन्हा पुन्हा उच्चारून, भक्तांना अभयदान देऊन श्री स्वामी निजानंदी निमग्न झाले. भक्तांनी गहिवरल्या अंत:करणाने, स्वत: श्री स्वामींनी पूर्वीच बांधवून घेतलेल्या बुधवार पेठेतील ब्रह्मानंद गुंफेमध्ये श्री स्वामींचा पावन देह ठेवून त्याचे द्वार बंद केले. तरीही दररोज श्री बाळप्पा महाराज श्रीगुरु स्वामींना अत्तर लावण्यासाठी त्या गुंफेत उतरत असत. तीन-चार दिवस झाल्यावर श्री स्वामींनी डोळे उघडून श्री बाळप्पांना बास म्हणून सांगितले. त्यानंतर मात्र पुन्हा त्या गुंफेत कोणीही उतरले नाही. तेव्हा श्री स्वामींनी आपला विशुद्ध देह तिथून अदृश्य केला व आजही त्याच अलौकिक देहाने ते कार्य करीत आहेतच !
देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळील नीलेगांवच्या भाऊसाहेब जहागिरदारांना श्री स्वामींनी "शनिवारी घरी येऊ" असे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी व एक अद्भुत लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर पाच दिवसांनी श्री स्वामी महाराज नीलेगांवाच्या वेशीबाहेर प्रकटले. या लीलेचे वैशिष्ट्य म्हणजे, श्रीस्वामीगुरु एकटे नाही तर संपूर्ण लवाजमा, सेवेकरी यांच्यासह तेथे प्रकटले होते. गावातील सर्व लोकांचे दर्शन झाल्यावर ते सगळ्यांसह अचानक कोठेतरी निघून गेले. लोकांनी खूप शोधले. शेवटी दुस-या दिवशी, रविवारी त्यांनी खुलाशासाठी अक्कलकोटात जासूद रवाना केला. तोवर दुपारी आणखी एक लीला घडली. श्री स्वामी जहागिरदारांच्या वाड्यात एकटेच प्रकटले, पूजा स्वीकारली पण मौनच बाळगून होते. भाऊसाहेबांना दर्शन देऊन ते साक्षात् परब्रह्म तेथेच अदृश्य झाले. इकडे तो जासूद अक्कलकोटाहून श्री स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊनच परतला. नीलेगांवच्या भक्तांना या अतर्क्य स्वामीलीलेचे आश्चर्य वाटून स्वामीप्रेमाने भरून आले. आजही श्री स्वामी महाराज त्याच पावन देहाने प्रत्यक्ष कार्यरत आहेत, भक्तांचा सर्वतोपरि सांभाळ प्रेमाने करीत आहेत व पुढेही करतीलच !
श्री स्वामी समर्थ महाराजांचे अधिकारी शिष्योत्तम श्री अानंदनाथ महाराज श्रीसद्गुरूंच्या या निजानंदगमन-लीलेचे रहस्य सांगताना म्हणतात,
स्वामी माझा पूर्णकाम l
तया कैचें निजधाम  ॥१॥
ठाव ठाया भरूनी गेला l
मूळ स्वरूपी राहिला ॥२॥
वटवृक्षातळी जाणा l
स्वामी बैसला कारणा ॥३॥
जड मूढ उद्धराया l
खरे दावियले पाया ॥४॥
शके अठराशे हे जाणा l
मास चैत्र हो पूर्णा ॥५॥
तिथी वद्य त्रयोदशी l
पडदा दिला जगासी ॥६॥
आनंद म्हणे पूर्ण धाम l
तया कैचे निजधाम ॥७॥

राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांनी देहत्यागाची लीला केली. श्री आनंदनाथ महाराज म्हणतात, "आमचे स्वामी महाराज पूर्णकाम आहेत. तेच सर्व विश्व व्यापून उरलेले आहेत. त्यामुळे त्यांना वेगळ्या निजधामाला पुन्हा  जाण्याची गरजच नाही. सर्व विश्व हेच त्यांचे निजधाम आहे. त्यामुळे त्यांनी लौकिकदृष्टीने धारण केलेला देह अदृश्य करून सर्वाठायी ते पुन्हा भरून राहिले.
हा चिन्मय देह देखील त्यांनी तुम्हां आम्हां भक्तांचा उद्धार करण्यासाठीच तर धारण केला होता. त्या देहाने ते अक्कलकोटी वटवृक्षाखाली राहून निरंतर लीला करीत होते. तो देह केवळ त्यांनी शके १८०० मधील चैत्र कृष्ण त्रयोदशीला गुप्त केला; मात्र त्यांचे कार्य अाजही चालूच आहे. त्यांनी जगासमोर प्रकट होऊन सुरू केलेले कार्य या दिवसापासून पडद्याआडून सुरू ठेवले इतकेच. आमचे श्रीगुरु स्वामी महाराज हेच पूर्णधाम आहेत, भक्तांचे निजविश्रांतीचे स्थान आहेत. त्यांचे परमपावन श्रीचरण हेच आम्हां भक्तांचे निजधाम आहे !"
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हेही श्री स्वामी महाराजांच्या परंपरेतील थोर सत्पुरुष. श्री स्वामींची अवधूती मस्ती अंगी पूर्ण पैसावलेला हा महात्माही स्वामीपरंपरेचे भूषण ठरला, यात नवल ते काय? पुण्याच्या एका भक्ताला प.पू.श्री.काकांनी स्वत:च्या ठिकाणी श्री स्वामींचे दर्शन करवून, मंडई जवळील स्वामीमठात नित्य दर्शनाला जाण्याची आज्ञा केली होती. आजही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्षरश: लाखो अनुभूती भक्तांना येत असतात. कारण श्री स्वामी महाराज हे या युगातील नित्यजागृत दैवत आहेत, तेच जगद्गुरु आहेत, साक्षात् परिपूर्णब्रह्म आहेत !
आज श्री स्वामी महाराजांच्या समाधीलीलेचे सप्रेम स्मरण करण्याचा पावन दिवस. श्री स्वामींचे चराचरातील चिरंतन अस्तित्व पुन्हा एकवार दृग्गोचर करणारा हा दिवस, तुम्हां-आम्हां सर्व भक्तांच्या अंत:करणात स्वामीकृपेचे व स्वामीप्रेमाचे, भक्तीचे लक्ष लक्ष दीप उजळो व त्या भक्तीने आपले सर्वांचे जीवन धन्य होवो, हीच श्रीस्वामीमाउलींच्या चरणीं याप्रसंगी वारंवार प्रार्थना ! "अशक्यही शक्य करतील स्वामी" ही सार्थ जाणीव, ही पक्की खात्री तर श्रीस्वामीकृपेने आपल्या अंत:करणात नित्य जागती आहेच !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी. 
http://rohanupalekar.blogspot.in )

23 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ- अभंग - सव्विसावा

एकांती बैसोनी, निवांत आसनी ।
नामपाठ मनी, आळवावा ॥१॥
स्वामीराज पदीं, अर्पोनी उपाधी ।
पावावी समाधी, नामछंदे ॥२॥
असाध्य-आसन, चित्तनियमन ।
प्राणनिरोधन, नलगेचि ॥३॥
वाक्य उपदेश, योगज संतोष ।
उभय विशेष, नामापाशी ॥४॥
गुरुमुखे नाम, वोळले निष्काम ।
अमृतीं आराम, ठसावला ॥५॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ : या 'श्रीस्वामीसमर्थ नामपाठा'चे वाचन अथवा श्रीस्वामीनामाचा जप हे विनाकष्टाचे अतिशय सुलभ व अमोघ फलदायी साधन कसे आहे, हे स्वानुभवपूर्वक सांगताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "एकांतामध्ये निश्चिंत मनाने, योग्य आसन घालून बसावे व हा नामपाठ (श्रीस्वामीनाम जप ) भावपूर्ण अंत:करणाने पठण करावा. सद्गुरु श्री स्वामी महाराजांच्या चरणीं सर्व प्रापंचिक व आध्यात्मिक उपाधी, अडचणी समर्पण करून शांत चित्ताने जप केल्यास, त्या नामाच्या छंदाने आपोआप समाधीचा लाभ होतो. या सहज-सुलभ नामपाठामध्ये, विविध अवघड आसने, चित्ताचे नियमन, प्राणांचा निरोध अशी कठीण योगांगे न करताच समाधीची प्राप्ती होत असते. योगसाधनेने लाभणारे समाधान व महावाक्यांच्या उपदेशाने होणारे आत्मज्ञान या दोन्ही गोष्टी श्रीस्वामीनामपाठाने (नामजपाने) विशेषत्वाने प्राप्त होतात. पण त्यासाठी आधी हे श्रीस्वामीनाम, श्रीस्वामींच्या कृपापरंपरेतून आलेल्या अधिकारी श्रीगुरूंच्या मुखातूनच मिळालेले हवे. अशा प्रकारे परमदिव्य असे हे श्रीस्वामीनाम, अमृतेला श्रीगुरुमुखातून नुसते प्राप्तच झाले असे नाही, तर ते नाम सर्वस्वाने वोळल्यामुळेच आता तिच्या ठायी आराम, निश्चिंतताही पैसावलेली आहे. त्या नामजपाने अमृता अंतर्बाह्य सुखरूप झालेली असून, तिच्या आतबाहेर तेच ब्रह्मस्वरूप पूर्ण ठसावलेले आहे !"
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

22 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - पंचविसावा

राया करावा सांभाळ ।
लेकुराचे काय बळ ॥१॥
मायतात बंधुजन ।
तुम्हांवीण माझे कोण?॥२॥
दीन, अज्ञ मी अनाथ ।
बहुपापी दैवहत ॥३॥
नामपाठ आधारासी ।
तेचि बापाची मिरासी ॥४॥
आशा लावोनी बैसले ।
अमृतेसी सांजावले ॥५॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ : परमदयामय भगवान श्री स्वामी महाराजांकडे अत्यंत करुणापूर्ण शब्दांत प्रार्थना करताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे तथा अमृता म्हणते की, "हे सद्गुरुराया, मी आपले लहानगे लेकरू आहे, माझे बळ ते केवढे? आपणच माझा सर्वतोपरि सांभाळ करावा. आपणच माझे माय-बाप, माझे सर्वस्व आहात. आपल्याशिवाय मला दुसरे कोण आहे या जगात?
मी अत्यंत दीन, अज्ञानी व अनाथ आहे, शिवाय माझ्या गाठीशी खूप पापे देखील जमलेली आहेत, माझे दैवही चांगले नाही. पण असे असले तरीही, माझ्या श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन दिलेला हा आपला नामपाठच माझा भक्कम आधार आहे. हा नामपाठच माझी वडिलार्जित मौल्यवान संपत्ती आहे, माझी हक्काची मिराशी आहे."
नामपाठाच्या अंतिम टप्प्यावर सद्गुरु श्री स्वामी महाराजांना अत्यंत कळकळीने, कातर शब्दांत अमृता विनविते, "सद्गुरु श्री स्वामीराया, मी आपल्या करुणाकृपेची आशा लावून आपल्या चरणीं केव्हाची बसले आहे; आता माझ्या आयुष्याची सांज व्हायला आली, आपण केव्हा आपला कृपावर्षाव माझ्यावर करणार? या दीन लेकराची आपल्याला केव्हा दया येणार?"
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]
(अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया ही दोन्ही पेजेस लाईक करावीत.
https://m.facebook.com/sadgurubodh/  )

21 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - चोविसावा

भवार्णवी महातारू ।
स्वामीनामाचा उच्चारू ॥१॥
दैन्य जाय उठाउठी ।
वाचे पडता नाममिठी ॥२॥
स्वामीनामाचे साधन ।
धन्य तयाचे जीवन ॥३॥
नामापाठी महायोग ।
अमृतेसी जाला सांग ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ : सद्गुरु श्रीस्वामींच्या नामाचा उच्चार करणे, हीच अथांग व भयंकर असा हा भवसागर हमखास तरून जाण्यासाठीची श्रेष्ठ नौका आहे. ज्या भक्ताच्या वाचेला श्रीस्वामीनामाची मिठी पडते, म्हणजे ज्याची जिव्हा स्वामीनामाशिवाय अन्य वायफळ काहीही करीत नाही, त्याचे सर्व प्रकारचे दैन्य तत्काल नष्ट होते. तो सर्वांगांनी संपन्न होऊन जातो. श्रीसद्गुरूंच्या असीम कृपेने ज्याला स्वामीनामाचे साधन प्राप्त होते, त्याचे सारे जीवनच धन्य होते. याच श्रीसद्गुरुप्रदत्त स्वामीनामाच्या साधनेत, या नामपाठाच्या उपासनेत अत्यंत गूढ व प्रभावी मानल्या गेलेल्या महायोगाची सर्वांगीण व परिपूर्ण अनुभूती अमृतेला सहज लाभली आणि तिचे अवघे जीवनच धन्य झाले !

[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk

सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]
(अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया ही दोन्ही पेजेस लाईक करावीत.
https://m.facebook.com/sadgurubodh/  )


20 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - तेविसावा

नित्य नामरत, पारंबी धरोनी ।
भक्तिराजधानी, पैठा होय ॥१॥
स्वामीनाम मुखी, ते नर दैवाचे ।
उद्धरती त्यांचे, वंशजन ॥२॥
स्वामीकृपा शिरी, भाग्ये मिरविती ।
देवही वंदिती, भावे तयां ॥३॥
धन्य स्वामीनाम, विश्वाचे जीवन ।
काळाचे बंधन, तोडी वेगे ॥४॥
अमृतेचे कंठी, नामचिंतामणी ।
स्वामीरूप ध्यानी, निरंतर ॥५॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ  : भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या परंपरा चालविणा-या अधिकारी शिष्यांना 'पारंब्या' म्हणत असत. ते स्वत: वटवृक्ष व त्यांच्या स्वरूपात एकरूप झालेले त्यांचे ते अधिकारी शिष्य या पारंब्या होत. पारंब्या आणि वटवृक्ष काही वेगळे नसतात. श्री स्वामी महाराज भक्तांना उपदेश करीत की, *"पारंब्या धरून राहा."* याच स्वामीवचनाचा संदर्भ विचारात घेऊन प.पू.श्री.शिरीषदादा कवडे प्रस्तुत अभंगात सांगतात की, जो स्वामीभक्त स्वामीपरंपरेतील अधिकारी श्रीगुरूंकडून कृपापूर्वक लाभलेले दिव्य स्वामीनाम नित्य घेतो व श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार वागतो, तो भक्तिराजधानीचा राजाच होतो. असा दैववान साधक स्वामीनामात स्वत: दंग तर होतोच, पण त्याचे वंशज देखील त्यामुळे उद्धरून जातात. स्वामीकृपेने ज्याला असा परंपरेतून अनुग्रह लाभतो, त्याच्या भाग्याची तुलनाच होऊ शकत नाही. देव-देवता सुद्धा त्याला प्रेमादराने वंदन करतात.
अवघ्या विश्वाचे संजीवन असणारे स्वामीनाम, कळिकाळाचे अत्यंत अवघड बंधन क्षणात नष्ट करणारे आहे. म्हणूनच हा स्वामीनामरूपी परमदिव्य चिंतामणी, अमृतेने अतीव प्रेमादरपूर्वक आपल्या कंठात निरंतर धारण केलेला असून, ती सतत त्या अद्भुत स्वामीरूपाचेच ध्यानही करीत असते. ( तुम्हां-आम्हां सर्व भक्तांनी असेच करावे व त्याद्वारे अमृतमय होऊन जावे, असा हा अनुभव सांगण्यामागचा पू.दादांचा मुख्य हेतू आहे.)
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

19 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग -  बाविसावा

जया मुखी स्वामीनाम ।
पवित्र तो पूर्णकाम ॥१॥
जया चित्ती स्वामीध्यान ।
शांती तया पायवण ॥२॥
स्वामीसेवा कुलधर्म ।
त्याचे वंशी संतजन्म ॥३॥
ज्याचा देह स्वामीपायीं ।
त्याची कीर्ति शेष गायी ॥४॥
स्वामीवेध जनी वनी ।
तया विश्व लोटांगणी ॥५॥
अमृतेसी स्वामीबोध ।
गेला अंतरीचा खेद ॥६॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ : ज्या भक्ताच्या मुखात निरंतर श्री स्वामीनाम असते, तोच भक्त पवित्र आणि नित्यतृप्त देखील होतो. ज्याच्या चित्तात स्वामीध्यान स्थिर होते, त्या भक्ताची शांती दासी होते, त्याच्या अंत:करणाची शांती कोणत्याही प्रसंगी ढळत नाही. श्री स्वामींची सर्वभावे सेवा हाच ज्या कुळाचा मुख्यधर्म असतो, त्या कुळाचे इतके पुण्य निर्माण होते की, त्या कुळात संत जन्माला येतात. जो आपला देह सर्वार्थाने श्री स्वामीचरणीं समर्पण करतो, त्या भाग्यवंताची कीर्ती प्रत्यक्ष भगवान शेष आपल्या हजार मुखांनी गातात, आनंदाने स्तुती करीत त्याचे गुणगान करतात. ज्या भक्ताला एकांतात, लोकांतात, सर्वत्र सद्गुरु श्री स्वामींचीच प्रचिती येते, स्वामीमहाराजांशिवाय क्षणभरही ज्याला इतर काहीच सुचत नाही, त्याच्या पायी सारे जग लोटांगण घालत येते. अमृतेला श्रीसद्गुरुकृपेने श्रीस्वामीस्वरूपाचे ज्ञान झाल्याने आता तिचा सर्व खेद, सर्व दु:खे  लयाला गेली आहेत. कारण श्री स्वामी महाराजांचे स्वरूप अखंड आनंदमय असल्यामुळे ज्याला त्यांचे ज्ञान होते, तोही अखंड आनंदमयच होऊन जातो.
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

18 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग -  एकविसावा

स्वामीकथा पडो श्रवणीं ।
नेत्र जडो स्वामीचरणीं ॥१॥
दिव्यगंधी हरपो भान ।
वाचे स्वामींचे गुणगान ॥२॥
स्वामीनाम श्वासोच्छ्वासी ।
छंद लागो अंतरासी ॥३॥
विश्व अवघे स्वामीमय ।
अमृतेसी तरणोपाय ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ : या अभंगातून प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी, आपली भक्ती दृढ होण्यासाठी श्रीस्वामीभक्तांनी दयाघन श्री स्वामीमाउलीकडे काय मागावे? याचा आदर्शच घालून दिलेला आहे. हे श्री स्वामी महाराजांच्या परंपरेचे पसायदानच म्हणायला हवे.
पू.शिरीषदादा सद्गुरु श्री स्वामींना विनवतात की, "हे स्वामीराया, माझे कान सदैव आपल्याच लीलाकथा श्रवण करोत, माझे नेत्र सर्वत्र अखंड आपलेच रूप पाहोत. आपल्या शरीरातून सतत स्रवणा-या दिव्य सुगंधामध्ये माझे देहभान हरपून जावो. माझ्या वाचेने सतत आपलेच गुणगान होवो. माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर अापलेच नामस्मरण होवो. आपल्या सेवेचे हेच सर्व छंद माझ्या अंत:करणाला सतत लागून राहोत. यच्चयावत् सर्व विश्व मला कायम श्री स्वामीमयच दिसो, सर्वत्र आपलेच अलौकिक स्वरूप भरून राहिलेले दिसो. (असा कृपाशीर्वाद आपण मला द्यावा.) अहो श्री स्वामीराया, आपली अशी परमकृपाच माझ्यासाठी एकमात्र तरणोपाय आहे ! "
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

17 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - विसावा

स्वामी मायतात, स्वामी गणगोत ।
स्वामी कुलव्रत, कलियुगीं ॥१॥
योगाची राणीव, भक्तीचे वैभव ।
आनंद उद्भव, स्वामीनाम ॥२॥
सुखाचे कारुण्य, मौनाचेही मौन्य ।
शांतिप्रेम स्तन्य, स्वामीनाम ॥३॥
गुरुकृपा जाली, बहु विस्तारली ।
नामबीज वेली, अमृतेची ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ : भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हेच आम्हां भक्तांचे माय-बाप आहेत. तेच आमचे खरे सोयरे, गणगोत देखील आहेत. श्री स्वामी महाराजांची सर्वभावे सेवा करणे हेच आमच्या कुळाचे व्रत आहे, श्री स्वामी महाराजच आमचे कुलदैवतही आहेत.
योगसाधनेने लाभणारी राजयोगाची श्रेष्ठ स्थिती हेच भक्तियोगाचेही वैभव आहे. तीच परमानंदाची अद्भुत अनुभूती, स्वामीनामाच्या सप्रेम उच्चारणाने भक्तांना सहजगत्या प्राप्त होते. श्री स्वामीमहाराजांच्या करुणाकृपेतून निर्माण होणारे ते दिव्य सुख एकदा प्राप्त झाले, की मौनालाही मौन पडते. तो भक्त स्वामीरूपात मग्न होऊन जातो. त्याला दुस-या कशाचे भानही राहात नाही. मग ते श्री स्वामीनामच आईचे रूप धारण करून त्या अनन्य स्वामीभक्ताला शांती व प्रेमाचे दूध पाजून वाढवते, सर्वार्थाने, सर्व बाजूंनी मोठा करते. श्रीसद्गुरूंनी अपरंपार करुणेने *अमृतेच्या* हृदयात जे स्वामीनामरूपी अमोघ कृपाबीज पेरले होते, त्याची वेल आता खूप विस्तारलेली आहे; ती त्या कृपेचा मूळ आधार असणा-या श्रीस्वामीचरणांपाशीच जाऊन पोचलेली आहे.
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

16 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - एकोणिसावा

स्वामीनाम तारू, स्वामी कल्पतरू ।
सप्रेम उच्चारू, भय नाशी ॥१॥
स्वामीनामी भाव, चरणांसी ठाव ।
आणिक उपाव, कासयांसी ॥२॥
बहुता दिसांचे, जरी पुण्य साचे ।
स्वामीराजयाचे, नाम मुखी ॥३॥
अमृतेची दिठी, पदी देत मिठी ।
स्वामीनामपाठी, शून्य जाली ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ :  राजाधिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम हीच भवसागरातून तारून नेणारी नाव आहे. स्वामीनाम हे कल्पतरू प्रमाणे भक्तांचे सर्व मनोरथ पुरविणारे आहे. स्वामीनामाचे प्रेमभराने नित्य उच्चारण करणा-या भक्ताचे सगळे भय श्री स्वामी महाराज तत्काल नष्ट करतात. एवढेच नाही तर त्याला जन्ममृत्यूचेही भय उरत नाही. श्री स्वामी महाराजांच्या नामस्मरणामध्ये भक्ती जडली व त्यांनी कृपावंत होऊन आपल्या श्रीचरणीं ठाव दिला, की मग ( व्यावहारिक व पारमार्थिक अशा दोन्ही स्तरांवर ) इतर कोणत्या साधनांची त्या भक्ताला गरजच राहात नाही. ते स्वामीनामच त्याचा सर्वार्थाने उद्धार करते.
अनेक जन्मांचे पुष्कळ पुण्य गाठीशी असल्याशिवाय, श्री स्वामी महाराजांचे दिव्य नाम मुखात येत नाही किंवा ते घ्यावे अशी बुद्धीच होत नाही. सद्गुरुकृपेने अमृतेची दृष्टी श्री स्वामींच्या पदी कायमची स्थिरावलेली असून, सतत स्वामीनामाचा पाठ ( ; श्रीस्वामीसमर्थ नामपाठ ) करता करताच तिला उन्मनी अवस्था लाभलेली आहे; ती त्या स्वामीनाम जपाने ब्रह्मरूपच होऊन ठाकलेली आहे. जो असा हा श्रीस्वामीनामपाठ प्रेमाने व नेमाने करेल, त्यालाही हाच अनुभव श्री स्वामीकृपेने निश्चितच लाभेल !
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

15 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - अठरावा

स्वामीनाम पूजा, स्वामीनाम धर्म ।
कलियुग मर्म, पुराणींचे ॥१॥
आचरावे कर्म, विहित सप्रेम ।
वाचे यावे नाम, दंभहीन ॥२॥
नाम आळविता, भावलोट चित्ता ।
देही पवित्रता, सर्वकाळ ॥३॥
अनंत जन्मींचा, पापनाश साचा ।
स्वामीनामे वाचा, धन्य होय ॥४॥
वेदांहुनी थोर, अनंत अपार ।
स्वामीनाम सार, अमृतेसी ॥५॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥
अर्थ : भगवान सद्गुरु श्री स्वामींचे नामस्मरण हीच खरी पूजा व तोच भक्ताचा खरा धर्म होय. हे कलियुगासाठी पुराणांनी सांगितलेले मर्म आहे. शास्त्रांनी सांगितलेले कर्म मनापासून करावेच; पण त्यातही वाणीने स्वामीनाम घेत जावे. नामस्मरण लोकांना दाखवण्यासाठी, दंभाने केलेले नसावे, खरोखरीच्या प्रेमाने करावे. मन:पूर्वक आणि प्रेमाने नाम आळवले की अंत:करणात भावलोट येतात, भक्तिभावाने हृदय ओसंडून वाहू लागते. त्यामुळे अवघा देहच पवित्र होऊन जातो. स्वामीनामाने जसजशी वाचा पवित्र होऊ लागते, सततच्या नामस्मरणात रंगू लागते, तसतशी जन्म जन्मांतरीची सर्व पापे नष्ट होतात आणि आपल्याला धन्यतेचा अनुभव येऊ लागतो. श्री स्वामीचरणीं अनन्य झालेल्या अमृतेच्या दृष्टीने, स्वामीनाम हे वेदांहूनही थोर आहे, त्याचा महिमा अनंत, अपार असून तेच सर्व साधनांचेही सार आहे, यासाठीच श्रीस्वामीनाम जप हेच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ साधन आहे !
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk
सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]
(अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया ही दोन्ही पेजेस लाईक करावीत.
https://m.facebook.com/sadgurubodh/


14 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग सतरावा

नाम गावे, नाम ध्यावे ।
स्वामीब्रह्मीं लीन व्हावे ॥१॥
स्वात्मसुखी लागे टाळी ।
कृपा देहाते सांभाळी ॥२॥
ब्रह्मविद्येचे आगर ।
स्वामीनाम शुभंकर ॥३॥
अमृतेसी प्रेमवेणा ।
जनी वनी स्वामीराणा ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ : भगवान सद्गुरु श्री स्वामींचे नाम सतत घ्यावे, त्याचे चिंतनही करावे. या अखंड अनुसंधानाने भक्त त्या स्वामीब्रह्मामध्येच एकरूप होऊन जातो. अशा एकरूप झालेल्या भक्ताची स्वात्मसुखामध्ये, स्वामीनामाने लाभलेल्या सहजसमाधीमध्ये टाळी लागली, की श्री स्वामींची कृपाशक्तीच त्याच्या देहाचा सांभाळ करते. एवढेच नाही तर, त्याच्या माध्यमातून ती कृपाशक्तीच जगदोद्धाराचे कार्य देखील करते.
श्री स्वामींचे नाम हे साक्षात् ब्रह्मविद्येचे आगर असून, तेच केवळ आपले सर्वार्थाने व निरंतर कल्याण करणारे आहे, याची भक्तांनी कायम जाण ठेवावी. या अखंड स्वामीनामस्मरणामुळे अमृतेच्या अंत:करणात प्रचंड प्रेमलहरी उसळत असून, तिला जनी, वनी, सगळीकडे त्या परम प्रेममय श्रीस्वामीस्वरूपाचीच प्रचिती येत आहे.
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

13 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग -  सोळावा

स्मरा स्मरा स्वामीरायां ।
नरजन्म जातो वाया ॥१॥
प्रेमद्वीपीचे गलबत ।
नाममंत्र अनाहत ॥२॥
कळिकाळासी दरारा ।
अंगी वाहे नामवारा ॥३॥
नाम गोमटे साधन ।
अमृतेसी क्षणोक्षण ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ : भगवान सद्गुरु श्री स्वामीमहाराजांच्या भक्तांना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे कळकळीने विनवतात की, "भक्तजनहो, परम कनवाळू श्री स्वामीरायांचे निरंतर स्मरण करा. नाहीतर त्यांच्याच कृपेने लाभलेला हा दुर्मिळ मनुष्यजन्म हकनाक वाया घालविल्यासारखे होईल. त्यांच्या स्मरणाशिवाय गेलेला प्रत्येक क्षण हा व्यर्थच होय.
भगवान श्री स्वामींचे अनाहत नादासारखे मधुर नाम हे जणूकाही आपल्याला कराल, भयंकर भवसागरातून प्रेमरूपी द्वीपावर सुखरूप नेऊन पोचविणारे गलबतच आहे. या गलबतात आरामशीर बसून प्रत्येक श्वासाबरोबर स्वामीनाम घेतले तर या दुष्ट कलिकालाची कसलीही भीती बाळगण्याचे कारण नाही. अमृता प्रेमभावे सांगते की, श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन दिलेले हे श्रीस्वामीनामाचे गोमटे, दिव्य साधन मी क्षणभरही सोडत नाही, तुम्ही देखील त्याच सर्वार्थाने भगवत्प्राप्ती करून देणा-या पावन स्वामीनामाला क्षणभरही अंतर देऊ नका !"
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

12 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग -  पंधरावा

स्वामी दयाघन, ब्रह्मरसखाण ।
निवारिती शीण, जन्मभाग ॥१॥
स्वामीनामे भुक्ती, स्वामीनामे मुक्ती ।
उपजे विरक्ती, नामपाठी ॥२॥
नामीं तळमळ, डोळां अश्रुजळ ।
ध्यान सर्वकाळ, जडे चित्ती ॥३॥
व्यथा हृदयासी, द्यावी कृपे ऐसी ।
अमृते मानसी, आन नाही ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ  :  भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे दयेचा अखंड वर्षाव करणारे अकारणकृपाळू महामेघ आहेत. ते अलौकिक ब्रह्मानंदाची, ब्रह्मरसाची खाणच आहेत. जीवांना कर्मांमुळे पुन्हा पुन्हा होणारा जन्म-मरणाचा त्रास दूर करणारेही तेच एकमेव आहेत. श्रीस्वामीनाम घेतल्याने प्रपंचातील सुखे तर मिळतातच, पण सहजासहजी न मिळणारी मुक्ती देखील मिळते. त्याच नामजपाने हळू हळू या निरस प्रपंचाचे यथार्थ रूप समजून येते व त्याची आसक्ती कमी होऊन वैराग्य देखील निर्माण होते.
श्रीस्वामीनामाने असा वैराग्यलाभ झाल्यावर, त्या नामजपातील तळमळ वाढून स्वामीदर्शनासाठी जीव कासावीस होऊ लागतो, श्री स्वामी महाराजांच्या नुसत्या स्मरणानेही डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागतात आणि अशा प्रेमभावातूनच मग सर्वकाळ स्वामीध्यान जडू लागते. त्या भक्ताला मग परमाराध्य सद्गुरु श्री स्वामींशिवाय दुसरे काही सुचतच नाही की गोड लागत नाही. श्रीस्वामीनामाने पावन झालेली अमृता दयाघन श्री स्वामी महाराजांना विनवते की, "देवाधिदेवा, आपल्या कृपेने अविरत आनंददायक अशी प्रेममय विरहव्यथा माझ्या चित्ताला निरंतर लागून राहावी, याशिवाय मला आणखी काही नको ! "
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.

11 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - चौदावा

आम्ही भाग्याचे भाग्याचे ।
मोक्ष अंगणासी नाचे ॥१॥
स्वामीरायाचे डिंगर ।
नाम गर्जू वारंवार ॥२॥
नाम गाता नाम ध्याता ।
आली काळावरी सत्ता ॥३॥
स्वामीप्रेमाचे माहेर ।
अमृतेसी अलंकार ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ : स्वामीभक्तांच्या ख-या भाग्याचे अत्यंत मार्मिक वर्णन करताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, " सद्गुरु श्री स्वामी महाराजांच्या चरणांशी आम्ही आलो आहोत, त्यांची कृपादृष्टी आम्हांवर आहे व त्यांचे पावन नाम घेण्याची सुबुद्धी होत आहेे, हे आमचे केवढे मोठे भाग्य आहे. श्री स्वामींची कृपा असताना आम्हांला मोक्षाचीही फिकीर नाही, अहो तो मोक्षच श्री स्वामी महाराजांच्या अंगणात नाचतो. म्हणूनच तर श्री स्वामीमहाराज म्हणतील त्यांना मोक्षाची सहज प्राप्ती होते.
आम्ही राजाधिराज श्री स्वामींचे डिंगर, सेवेकरी आहोत. आम्ही त्यांच्या दिव्यनामाचा सतत गजर करू. स्वामीनामाच्या गजराने अवघे त्रैलोक्यच भरून टाकू. त्या नामाचे स्मरण व चिंतन केल्याने प्रत्यक्ष काळावरही सत्ता चालवण्याचे सामर्थ्य मिळते. भगवान सद्गुरु श्री स्वामी महाराज हेच आमचे हक्काचे प्रेमळ माहेर आहेत व त्यांची प्रेम-कृपा हाच स्वामीपदाश्रित अमृतेचा खराखुरा मौल्यवान अलंकार आहे !"
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.

10 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग -  तेरावा

स्वामीकीर्तनी लीन चराचर ।
इंद्र चंद्र सुर सिद्ध महेश्वर ॥१॥
दिक्पती ऋषिगण वंदिती भावे ।
नारद तुंबरू स्तविती स्वभावे॥२॥
स्वामीराजरूप अति मनोहर ।
तळपती वदनी कोटी भास्कर ॥३॥
भक्ता रक्षिती सहज परोपरी ।
नामपाठ कली अमृतलहरी ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ  :  श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामसंकीर्तनात सारे चराचर मग्न आहे. त्यात इंद्र चंद्रादी देव आहेत, सिद्ध मुनी, ऋषी आहेत. भगवान महेश्वर देखील आहेत. श्री स्वामींना आठही दिशांचे अधिपती, अनेक ऋषी-मुनी मनोभावे वंदन करीत असतात. देवर्षी नारद, तुंबरू हे त्यांचे निरंतर स्तवन करीत असतात.
श्री स्वामीराजांचे रूप अत्यंत मनोहर असून, त्यांच्या मुखावर कोट्यवधी सूर्यांचे तेज विलसत असते. श्री स्वामी समर्थ महाराज इतके कनवाळू आहेत की, ते आपल्या भक्तांचे सर्वबाजूंनी परोपरीने रक्षण करतात. भक्तांनी कळवळून प्रार्थना करण्यापूर्वीच श्री स्वामी महाराज त्यांची अडचण दूर करतात. म्हणून या भयाण कलियुगात केवळ दिव्य असे श्रीस्वामीनामच भक्तांना अमृतमय करणारे आहे, सर्वार्थाने सांभाळणारे आहे !
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.

9 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - बारावा

स्वामीलीला अपरंपार ।
ब्रह्मरसाचे भांडार ॥१॥
कुणा मुखी दिधला घास ।
कुणा मोक्ष अनायास ॥२॥
तारियेलें मूढ जन ।
अज्ञ, पापी, जातिहीन ॥३॥
सर्वांतरी स्वामीवास ।
चराचर स्वामीश्वास ॥४॥
शब्दातीत लीलाभाव ।
अमृतेसी अनुभव ॥५॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ  :  सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अलौकिक लीला अपरंपार आहेत. त्या सर्व लीला प्रत्यक्ष ब्रह्मरसाचे भांडारच आहेत. म्हणून जे कोणी या लीला वाचतील-ऐकतील-सांगतील त्या सर्वांना तो ब्रह्मानंद प्राप्त होतो. ज्याला ऐहिक इच्छा असतात त्याच्या त्या इच्छा श्री स्वामीसमर्थ महाराज पूर्ण करतात आणि ज्याला केवळ मोक्षाची इच्छा असते त्याच्यावर पारमार्थिक कृपा करतात. त्यांच्या श्रीचरणी शुद्ध भावाने प्रेमादरपूर्वक प्रार्थना करायचा अवकाश, ही करुणाघन स्वामीमाउली दयार्द्र अंत:करणाने त्वरित कृपा करतेच करते. दयार्णव श्री स्वामी महाराजांनी त्यांच्या अवतारकालात शरण आलेल्या अनेक जड-मूढ, अज्ञानी, पापी, पतित अशा अनंत जीवांचा उद्धार केला. आजही त्यांचे हे कृपाकार्य चालूच आहे व अनंतकाळपर्यंत चालूच राहणार आहे.
राजाधिराज श्री स्वामी महाराजच सर्वांच्या अंतर्यामी वास करून आहेत, कारण तेच सर्वांचे आत्मरूप आहेत. अवघे चराचर विश्व हा त्यांचाच श्वास आहे. म्हणूनच त्यांच्या दिव्य लीलांचे वर्णन करणे कोणालाही निव्वळ अशक्य आहे. स्वामीकृपांकित अमृता म्हणते की, त्यांच्याच परमकृपेने मी मात्र त्यांच्या अतर्क्य लीला असंख्य वेळा प्रत्यक्ष अनुभवलेल्या आहेत.
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk
सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

8 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - अकरावा

कलियुगी साकारले ।
परब्रह्म रूपा आले ॥१॥
विश्वरूप गुणातीत ।
स्वामी माउली अचिंत्य ॥२॥
मूळब्रह्म चितिकळा ।
ऐसा अगम्य सोहळा ॥३॥
स्वामी सगुण निर्गुण।
अमृतेचे आत्मभान ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ  : या भयंकर कलियुगात भक्तांवर कृपा करण्यासाठी साक्षात् परब्रह्मच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने सगुण साकार होऊन अवतरले आहे. श्री स्वामी महाराज हे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांच्या पलीकडचे अाहेत. त्रिगुणात्मक अखिल विश्व हेही त्यांचेच स्वरूप आहे. तुम्हां-आम्हां भक्तांची प्रेमळ माउली असणा-या श्री स्वामी महाराजांच्या विलक्षण स्वरूपाची कोणालाही कल्पनाच करता येणे शक्य नाही.
तेच मूळ परब्रह्म असून अनंतकोटी ब्रह्मांडांतील मूळ चैतन्यसत्ता, आधारभूत चालकशक्ती देखील तेच आहेत. त्यांचे कार्य आणि लीला दोन्ही देवतादिकांनाही अगम्यच आहेत. श्री स्वामी महाराज एकाचवेळी सगुण व निर्गुण दोन्हीही असून त्याचवेळी गुणातीतही आहेत. त्यांचे अखंड 'प्रकट असणे' हाही त्यामुळे एक अद्भुत सोहळाच आहे. त्यांच्याच अलौकिक कृपा-प्रसादाने आता अमृतेचे आत्मभानही स्वामीमयच झालेले आहे. सद्गुरु स्वामींनी अमृतेला अंतर्बाह्य व्यापलेले आहे.
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

7 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - दहावा

सुवर्ण झळाळ, दिव्य परिमळ ।
पद्मसुकोमळ, स्वामीकांती ॥१॥
साजे कटीकर, टिळा माळा भार ।
ना भी ऐसा वर, नेत्र देती ॥२॥
मृदु कर्णपातीं, सुहास्ये डुल्लती ।
उदरी आवृत्ती, स्वानंदाची ॥३॥
ब्रह्मांडे अनंत, लीले खेळवत ।
गोटी नाचवीत, स्वामीराज ॥४॥
अमृते हृदयी, मोडी मांडी काही ।
ऐशाकृपे पाही, देवा आता ॥५॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥ 

अर्थ  : सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य-पावन देहाचे, त्यांच्या अलौकिक दर्शनाचे स्वानुभूतिपूर्ण व अतिशय सुरेख वर्णन करताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, राजाधिराज श्री स्वामींची अंगकांती सोन्यासारखी झळाळणारी असून त्यांच्या अंगातून सतत दिव्य सुगंध सर्वत्र दरवळत असतो. त्यांचे सारे शरीर कमळाच्या नाजूक पाकळ्यांसारखे कोमल आहे. त्यांचा डावा हात कंबरेवर शोभून दिसतो. त्यांच्या भव्य कपाळावर केशर-चंदनाचा सुरेख टिळा व गळ्यात रुद्राक्षांच्या व तुळशीच्या माळा अतीव शोभून दिसतात. त्यांचे पाणीदार व प्रेमपूर्ण नेत्र "भिऊ नकोस" असे भक्तांना जणू आश्वासनच देत असतात. ते जेव्हा प्रसन्न होऊन हसू लागतात, तेव्हा त्यांच्या कानांच्या मृदू पाळ्या छान डुलतात, तर त्यांच्या विशाल उदरात जणू स्वानंदाच्या लाटाच उचंबळून येत असतात. ते अनंतकोटी ब्रह्मांडांच्या सर्व घडामोडी बसल्या जागीच आपल्या लीलेने करीत असतात. त्याचे प्रतीक म्हणून ते बोटांमध्ये गोटी नाचवतात. यासाठीच त्यांना 'अनंतकोटीब्रह्मांडनायक' हे बिरुद सर्व संतांनी यथार्थपणे दिलेले आहे.
श्री स्वामीकृपेने धन्य झालेली अमृता श्रीस्वामीचरणीं प्रार्थना करते की, "देवा, माझ्या हृदयातही मोडण्याजोगे (अज्ञान) ते मोडा व मांडण्याजोगे (ज्ञान) ते मांडा. आपल्या चरणीं असलेला माझा भाव आणखी दृढ करा. आपल्याला जे पाहिजे व जसे पाहिजे तसे करा, पण अशीच कृपादृष्टी मात्र माझ्यावर कायम ठेवा !"
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

6 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ- अभंग - नववा

नामसमाधीची खूण ।
एक सगुण निर्गुण ॥१॥
अबोलणे प्रेमसुख ।
सामोरले निजमुख ॥२॥
गोडावला घनानंद ।
निराकार गुणकंद ॥३॥
प्रकाशला स्वामीपाठ ।
अमृतेसी आत्मभेट ॥४॥
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ  :  हा 'श्रीस्वामीनामपाठ' कसा प्रकट झाला, याचा अद्भुत अनुभव प.पू.श्री.शिरीषदादा कवडे या अभंगातून सांगतात.
श्रीस्वामीनामामुळे लाभणारी समाधी दोन प्रकारची असते. एक सगुण समाधी व दुसरी निर्गुण समाधी होय. सगुण समाधीत स्वामींचे प्रसन्न मुख समोर दिसते तर निर्गुण समाधीत मौनातच त्या प्रेमसुखाचा अनुभव लाभतो. या दोन्ही प्रकारच्या समाधींमुळे तो कृपांकित साधक अंतर्बाह्य गोडावतो, स्वामीमयच होऊन ठाकतो. सर्व सद्गुणांचे बीज असणारा पण कोणताही आकार नसणारा असा हा अलौकिक परमानंद, श्रीस्वामीकृपेने जेव्हा माझ्या अंत:करणात अपरंपार दाटून आला, तेव्हा त्या आनंदातूनच हा नामपाठ प्रकट झालेला आहे, असे प.पू.श्री.दादा सांगतात. म्हणूनच अमृता म्हणते की, राजाधिराज सद्गुरु श्री स्वामींनी कृपावंत होऊन, या नामपाठाच्या रूपाने जणू मला ही आत्मभेटच दिलेली आहे. ( जो नित्यनियमाने व अतीव प्रेमाने, श्री स्वामींच्या प्रसादकृपेने प्रकटलेल्या या सत्तावीस अभंगांच्या नामपाठाचे पठण करेल, त्या नामधारकालाही राजाधिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज करुणापूर्वक अशीच 'आत्मभेट' देतील ! )[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

5 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - आठवा

स्वामीनाम मनोहर ।
नित्यशांतिसरोवर ॥१॥
चैतन्याचा नीलगाभा ।
स्वामीनाम ब्रह्मशोभा ॥२॥
सुखानंद मूळपेठ ।
स्वामीनामी रसभेट ॥३॥
ह्मविद्येची आरास ।
स्वामीनाम महावेस ॥४॥
अमृतेसी घरा आले ।
स्वामीनाम तारू भले ॥५॥
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।
अर्थ  : सद्गुरु श्री स्वामीसमर्थांचे नाम मनाला मोहविणारे असून अखंड शांतीचे सरोवर आहे. आकाशाच्या किंवा अथांग जलाशयाच्या निळाई सारखी स्वामीनाम ही चैतन्याची अद्भुत निळाई आहे. त्यामुळेच ते तनामनाला आनंद देते. परब्रह्माची शोभा स्वामीनामात वास्तव्य करते. ब्रह्मसुखाची मूळ बाजारपेठ, त्या सुखाच्या प्राप्तीचे एकमेव स्थान श्रीस्वामीनाम हेच आहे. स्वामीनाम घेणा-याला भक्तिरसाचा आपोआप लाभ होतो. अलौकिक आरास असलेल्या ब्रह्मविद्या-मंदिराचे श्रीस्वामीनाम हे महाद्वारच आहे. अर्थात् स्वामीनाम घेतल्याशिवाय ब्रह्मानंद मिळणार नाही. म्हणूनच स्वामीनामाचे विलक्षण माहात्म्य सांगताना अमृता म्हणते की, ही स्वामीनामरूपी सुंदर नौका आपल्याला भवसागरातून सहज पार नेण्यासाठी श्रीसद्गुरुकृपेने आपल्या घरीच जणू आलेली आहे; तिचा सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावा.
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.

4 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ- अभंग - सातवा

साधने सकल, स्वामीकृपाबल ।
लाधता सफल, कलिमाजी ॥१॥
साधनी वरिष्ठ, स्वामीनाम श्रेष्ठ ।
अधिकार कष्ट, तेथ कैचें ॥२॥
मनी पश्चात्तापें, घेता नाम सोपे ।
बारा वाटां पापे, नष्ट होती ॥३॥
देशकाल शुची, प्राणायाम रुची ।
सिद्धारिचक्राची, मात नाही ॥४॥
गुरुमुखे चोज, पुरले सबीज ।
अमृता सहज, सुखावली ॥५॥
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।

अर्थ : सद्गुरु श्री स्वामींचे कृपाबळ लाभले तरच कलियुगातही सर्व साधने फळ देणारी होतात. भगवत्प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये स्वामीनामजप हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. कारण इतर साधनांसारखे कष्ट यात अजिबात नाहीत. आपल्या इतर कामांमध्येही आपण जप करू शकतो. इतर धर्मकृत्यांसारखी अधिकार-अपेक्षा या नामजपाला नाही. आपल्या हातून घडलेल्या दुष्कृत्यांचा पश्चात्ताप होऊन जर आपण प्रार्थनापूर्वक हे सोपे नामस्मरण करू लागलो, तर आपली पूर्वीची सारी पापे बारा वाटांनी पळून जातात.
नामजपाला देश, काल, स्नान, आसन, प्राणायाम, सिद्धारिचक्र (कोणते बीज आपल्याला लाभते कोणते नाही हे पाहण्याचे मंत्रशास्त्रातील कोष्टक) इत्यादी कोणत्याच गोष्टींची अडचण कधीच येत नाही. प्रेमाने व मनापासून नाम घेतले की झाले. स्वामीनामाच्या अशा जपाने धन्य झालेली अमृता आपला स्वानुभव सांगते की, श्रीगुरुमुखाने हे दिव्य स्वामीनाम मिळाले आणि त्याच्या अनुसंधानाने कोणत्याही कष्टांशिवाय माझे सारे मनोरथ पूर्ण होऊन मी अखंड सुखसागरात बुडाले.
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/…/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU…/view…

सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.](अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया ही दोन्ही पेजेस लाईक करावीत.

3 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - सहावा

नाम आवर्तन, स्वामीरूप ध्यान ।
कुंभकाकारण, अनायास ॥१॥
केवल सहज, अनुहत गाज ।
ब्रह्मानंद साज, नादातीत ॥२॥
नामबीज बळ, धाक वाहे काळ ।
समाधी अचळ, उदेजत ॥३॥
नामपाठी गेले, पदी लोभावले ।
स्वामीमय जाले, सर्वभाव ॥४॥
स्वामीनाम खूण, अमृतेचे धन ।
नित्य समाधान, जोडलेसे ॥५॥
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।

अर्थ  : श्री स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य रूप चित्तात साठवून त्यांच्या नामाचा जप केल्याने आपोआप केवल कुंभक होतो. त्या स्थितीतच अत्यंत दुर्लभ असे अनाहत नादही ऐकू येऊ लागतात. त्याबरोबरच त्या नादाच्याही पलीकडे असणारा ब्रह्मानंद देखील त्या नामधारकाला अनुभवाला येतो. स्वामीनामाचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की, दुर्लंघ्य काळालाही त्या नाम घेणा-याच्या जवळ जाण्याची भीती वाटते. याच नामजपाने अतिशय दुर्मिळ असणारी निर्विकल्प समाधी देखील सहज लागते. जे भक्त स्वामी नामजप करीत करीत त्यांच्या चरणी खिळून राहतात, ते सर्वभावाने स्वामीमयच होऊन जातात. यासाठीच अमृता आपला स्वानुभव सांगताना म्हणते की, स्वामीनामच माझे श्रेष्ठ धन असून त्या नामामुळेच मला नित्य समाधान प्राप्त झालेले आहे !
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

2 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - पाचवा

स्वामीनाम निजानंद ।
स्वामीनाम शांतिकंद ॥१॥
स्वामीनाम पंथराज ।
स्वामीनाम संतकाज ॥२॥
स्वामीनाम मंत्रसार ।
उच्चारणी कुलोद्धार ॥३॥
स्वामीनामाचा जिव्हाळा ।
अमृतेची प्रेमकळा ॥४॥
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।

अर्थ  : भगवान सद्गुरु श्री स्वामींचे नाम उच्चारणे हाच आत्मानंद आहे. श्री स्वामींचे नाम आणि त्यांचे रूप यांत भेद नाही. ते आत्मस्वरूप असल्याने त्यांचे नाम उच्चारणे हाच आत्मानंद होय. त्यांचे नाम हे शांतीचे आगर असल्यामुळे त्या नामोच्चारातून परमशांती निर्माण होते. म्हणून जो त्यांचे नाम प्रेमाने उच्चारतो तो हळूहळू आतूनच शांत होत जातो. त्यांचे नाम घेणे हाच पंथराज अर्थात् श्रेष्ठ मार्ग आहे. शिवाय हाच मार्ग पूर्णपणे बिनधोक असा राजमार्ग देखील आहे. श्री स्वामींचे नाम घेणे हेच संतांना महत्त्वाचे काम वाटते. हे स्वामीनाम सा-या मंत्रांचे सार असून, त्याच्या श्रद्धायुक्त अंत:करणाने केलेल्या सतत उच्चाराने आपल्या अवघ्या कुळाचा उद्धार होतो. म्हणूनच अमृतेला स्वामीनामाचा एवढा प्रेम-जिव्हाळा आहे.
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

1 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - चौथा

नामरूप नोहे आन ।
संत वाहताती आण ॥१॥
नाम सर्वांसी साधन ।
नामे योग-तप-ध्यान ॥२॥
नामे धर्मलाभ कलीं ।
नामीं कर्मे चोखावली ॥३॥
नामजपे गुरुभेट ।
वोळतसे स्वामीपीठ ॥४॥
नामपाठ संजीवन ।
जाली अमृता पावन ॥५॥
श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ।

अर्थ  : श्रीभगवंतांचे नाम व रूप हे भिन्न नसतात, असे सर्व संत प्रतिज्ञापूर्वक सांगतात. नामजप हे सर्वांना सहज करता येण्यासारखे भगवत्प्राप्तीचे सोपे साधन आहे. ( नामजपाला वय, लिंग, जात-पात, धर्म, आर्थिक परिस्थिती, इतर साधन सामग्री इत्यादी कशाचीच गरज नसल्याने ते सर्वात सोपे साधन ठरते. ) श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे नामजप करण्यामध्येच योगाभ्यास, तपश्चर्या व ध्यानही आपोआप घडते, त्यामुळे ह्या गोष्टी पुन्हा वेगळ्या करण्याची आवश्यकता राहात नाही. कलियुगात केवळ नामजपानेच सर्व धर्माचरणाचे फळ मिळते. ( म्हणूनच धर्माचरणात राहून गेलेल्या उणिवा 'विष्णवे नम:।' असे नाम घेऊनच पूर्ण केल्या जातात. ) मनापासून केलेल्या नामजपानेच कर्मसाम्यदशा येऊन सद्गुरुप्राप्ती होते व त्यांच्या कृपेने श्री स्वामीही कृपा करतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामपाठ हे अंतर्बाह्य संजीवनी देणारे अमृतच आहे व या नामपाठानेच *'अमृता'* देखील पावन झालेली आहे !  
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]