31 Aug 2018

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - पंचम पुष्प

पंचम पुष्प

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे चरित्र व वाङ्मय दोन्ही माधुर्यालाही मधुरता देणारे, आनंदालाही आनंदित करणारे व समाधानाला समाधान देणारे आहेत. श्रीभगवंतांचे अंशावतार बरेच होत असले तरी, सर्वांगपरिपूर्ण आणि बोलाबुद्धीच्या पलीकडचा असा एखादाच परिपूर्णावतार युगायुगांतून होत असतो. आश्चर्य म्हणजे, भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू व भगवान श्री ज्ञानराज माउली या अशाच दोन्ही महान आणि अलौकिक युगावतारांची जयंती एकाच दिवशी आहे. खरंतर आश्चर्य हे म्हणायला नुसते; ते दोन काय वेगळे थोडीच आहेत ? "कृष्णस्तु भगवान्स्वयम् ।" आणि "ज्ञानेशो भगवान् विष्णु: ।" हेच सत्य आहे त्यातले.
श्रीकृष्णावतार हा श्रीभगवंतांचा परिपूर्णतम अवतार आणि श्री ज्ञानदेव माउली देखील परिपूर्णतम श्रीकृष्णप्रभूच !
कृष्णदेव ज्ञानदेव, एकरूप एकदेह ।
एक भाव एक ठाव, भेद नाही द्वैत वाव ॥
सद्गुरु श्री माउली हे त्यांच्या काळातील सर्व संतांचे अत्यंत लाडके होते. Center of attraction च होते ते सगळ्यांचे. तो काळही किती भन्नाट म्हणावा लागेल नाही ? एकाहून एक थोर महात्मे त्यावेळी पृथ्वीवर अवतरलेेले होते आणि सगळे मिळून हरिभक्तीचा कल्लोळ करीत होते. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे त्याबद्दल नेहमी सांगतात की, तो भारतीय आध्यात्मिक वैभवाचा सुवर्णकाळच होता ! त्यांच्या आधी किंवा त्यानंतर आजवर असे कधीच पुन्हा झालेले नाही. श्रीगुरुपरंपरेच्या सात-आठ पिढ्या एकाचवेळी एकत्र नांदत होत्या. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज हे परंपरेचे आद्यगुरु तर श्री चोखोबारायांचे चिरंजीव श्री कर्ममेळा हे त्यांच्या सातव्या पिढीतील शिष्य; अशा श्रीगुरुपरंपरेच्या सात पिढ्या एकत्र लीला करीत होत्या. त्या संपन्न काळाचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो. एखाद्या खऱ्या महात्म्याच्या सान्निध्यात नित्यश्रीर्नित्यमंगलम् असा महोत्सवच चालू असतो. इथे तर अनेक महात्मे एकाचवेळी कार्य करीत होते. ते सर्व आषाढी वारीला जेव्हा पंढरीत जमत असतील, तेव्हा काय अद्भुत असेल तो सोहळा याची कल्पनाही करवत नाही. बुद्धीच नाही तेवढी आपली. कठोर साधना करणा-या योग्यांच्या मनातही प्रकट न होणारे श्रीभगवंत, या संतांच्या मांदियाळीत मात्र साक्षात् प्रकट होऊन मनसोक्त नाचत असत, प्रेमाने विलक्षण लीला करीत असत म्हणजे बघा ! प्रत्यक्ष जगत्पालक भगवान पंढरीनाथच जिथे वेडावून जातात, तिथे आपली काय कथा मर्त्य मानवांची ?
या सगळ्या संतमांदियाळीमध्ये भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजच उत्सवमूर्ती असायचे. सगळ्यांच्या सगळ्या लीला त्यांच्या भोवतीच साकारत असत. माउलींचा वेधच एवढा जबरदस्त होता की, एकदा त्यांच्याकडे ओढली गेलेली कोणीही व्यक्ती पुन्हा कधी लांब जाऊच शकत नसे. ती कायमचा त्यांचीच होऊन जाई. श्री माउलींचे स्वरूपच असे तेजस्वी, ओजस्वी आणि महन्मंगल आहे !
आपण सायन्स फिक्शन मूव्हीज मध्ये टाईम मशीन पाहतो. तसे जर खरंच कधी सापडले ना, तर आपण लगेच त्यातून श्री माउलींच्या काळातच जाऊ आणि मग ते मशीनच गायब करून टाकू. त्या अद्भुत काळातून इथे परत कोण येणार ? त्या काळाचा नुसता विचार करून देखील अंगावर रोमांच उभे राहतात, डोळे चमकू लागतात आणि आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात; मग जर प्रत्यक्ष तो काळच अनुभवता आला तर काय भन्नाट होईल ते ! सद्गुरु श्री माउलीराया, एवढी प्रार्थना पूर्ण करा कधीतरी आमची !
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी सद्गुरु श्री माउलींच्या चरित्रावर "श्रीज्ञानदेव विजय" हे महाकाव्य जसे रचले, तसेच "चैतन्यचक्रवर्ती" नावाचे एक चार अंकी संगीत प्रदीर्घ नाटकही रचलेले आहे. या नाटकाची संहिता श्रीवामनराज प्रकाशनानेच छापलेली आहे. त्या संहितेत प.पू.श्री.मामांनी इतके देखणे व सुंदर संवाद साकारलेले आहेत की बस ! माउली व इतर संतांचे, माउलींचे व त्यांच्या भावंडांचे, विशेषत: मुक्ताबाईंबरोबरचे आणि माउली व श्रीगुरु निवृत्तिनाथांचे संवाद फार फार अप्रतिम लिहिलेले आहेत. ती संहिता वाचताना आपण जणू तो दिव्य चरित्रपट साक्षात् समोर अनुभवतो आहोत असेच वाटत राहते. चैतन्यचक्रवर्ती पुस्तक हातात घ्यावे नि कोणतेही पान काढून वाचू लागावे, मन मोहरून नाही आले तरच नवल !
प.पू.श्री.मामांनी त्यात काही अद्भुत प्रवेश लिहिलेले आहेत. शास्त्रसिद्धांतांचा तसेच माउलींच्या चरित्राचा व संतांच्या वाङ्मयाचा त्यांचा गाढा अभ्यास असल्याचे त्यातून स्पष्ट दिसते. हे संगीत नाटक असल्याने त्यांनी संतांचे अगदी नेमके अभंग ठायी ठायी पेरलेले आहेत. शिवाय भाषा इतकी गोड आहे की काय सांगू ! श्री माउलींबद्दलचे पू.मामांचे प्रेम अगदी भरभरून उतू जात असते सतत. पू.श्री.मामांच्या कल्पनाशक्तीला भगवान श्री माउलींच्या कृपेने वास्तव अनुभूतीची एक अलौकिक किनार असल्याने, ह्या संहितेला अपरंपार गोडवा आणि वाचकांच्या ( प्रेक्षकांच्या ) मनाचा ठाव घेण्याचे जगावेगळे सामर्थ्य लाभलेले आहे. ही संहिता वाचताना तर मला खरंच टाईम मशीनची वारंवार आठवण येते. खरोखर काय बहार येईल ना ते सर्व प्रसंग प्रत्यक्ष समोर अनुभवायला मिळाले तर ?
श्रीसंत चोखामेळा महाराज हे सद्गुुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या शिष्यपरंपरेतील थोर विभूतिमत्त्व. श्री माउली - श्री सोपानदेव - श्री विसोबा खेचर - श्री नामदेव - श्री चोखामेळा महाराज अशी ही दिव्य गुरुपरंपरा. चोखोबांना माउलींचा खूप सहवास लाभलेला होता. त्यांनी त्यांच्या अभंगांमध्ये माउलींवर भरपूर लिहिलेले आहे. त्यांचा एक अतिशय समर्पक आणि गोड अभंग आहे. तो पं.भीमसेनजींनी अतिशय सुंदर आणि भावपूर्ण पद्धतीने गायलेला देखील आहे. त्या अभंगाच्या पठणाने आपण आजचे हे पंचम पुष्प भगवान सद्गुरु श्री माउलींच्या श्रीचरणीं समर्पू या आणि त्या अभंगात म्हटल्याप्रमाणे श्री माउलींच्या श्री ज्ञानदेवीला शरण जाऊन खरोखरीच सुखरूप होऊ या !
सुख अनुपम संतांचे चरणीं ।
प्रत्यक्ष अलंकाभुवनी नांदतसे ॥१॥
तो हा महाराज ज्ञानेश्वर माउली ।
जेणें निगमवल्ली प्रकट केली ॥२॥
संसारी आसक्त मायामोहे रत ।
ऐसे जे पतित तारावया ॥३॥
चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ ।
वाचिता सनाथ जीव होती ॥४॥
श्री चोखोबाराय म्हणतात, "संतांच्या चरणी अनुपम सुख नेहमीच असते. पण तेच सुख साकार होऊन, पुरे म्हणे पर्यंत प्रसाद देणा-या अलंकानगरीत सद्गुरु श्री माउलींच्या रूपाने प्रत्यक्ष नांदत आहे. तेच हे महाराज होत ज्यांनी, संसारात आसक्त झाल्याने मायेत रममाण होऊन मोहात गटांगळ्या खाणा-या अज्ञानी पतित जीवांच्या उद्धारासाठी वेदांचे सार असणारी भगवती श्री ज्ञानदेवीची रचना केलेली आहे. हे त्यांचे उपकार फार मोठे आहेत. श्री ज्ञानदेवी ग्रंथ हा अत्यंत श्रेष्ठ असून, जो या ग्रंथाला शरण जाईल तो नि:संशय सनाथ होईल. म्हणजेच त्याला परंपरेने आलेल्या अधिकारी महात्म्यांची पूर्णकृपा लाभून, साधनेच्या माध्यमातून तो धन्य होईलच !"
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली ।




अलौकिक वाङ्मयसम्राट श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज


आज श्रावण कृष्ण पंचमी, कलियुगातले श्रीदत्तात्रेयप्रभूंचे पाचवे अवतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांची १६४ वी जयंती.
प.प.श्री.थोरल्या महाराजांच्या दिव्य चरित्राविषयी या पूर्वीच्या काही पोस्टमधे सविस्तर लेखन केलेले आहे. त्यामुळे आज त्यावर न लिहिता, त्यांच्या अलौकिक वाङ्मयाच्या संदर्भाने काही लेखनसेवा करणार आहे. त्यांच्या चरित्रासंबंधीच्या लेखांच्या लिंक्स खाली देत आहे, त्यावर क्लिक करून तेही लेख जरूर वाचावेत.
१. श्रीवासुदेवानंद यती दत्तदिगंबर मूर्ती
https://rohanupalekar.blogspot.com/2016/08/?m=1
२. भावार्थ करुणात्रिपदीचा
https://rohanupalekar.blogspot.com/2017/06/blog-post_39.html?m=1
प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज हे अत्यंत अद्भुत अधिकाराचे महान कविवर्य, श्रेष्ठ ग्रंथकार व विलक्षण भाषाप्रभू होते. त्यांनी रचलेली विविध संस्कृत स्तोत्रे पाहताना आपण आश्चर्यचकितच होऊन जातो. वर्णमालेच्या क्रमाने रचलेले श्रीदत्तात्रेय अष्टोत्तरशतनाम किंवा दकारादि दत्तसहस्रनाम वाचताना तर हे विशेषत्वाने जाणवते. वर्णमालेच्या क्रमाने रचना करताना, एरवी कधीच वापरल्या न जाणा-या लृ, ण, ळ, ङ, ञ याही वर्णाक्षरांपासून सुरू होणा-या नामांसह भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंची एकूण एकशेआठ नावे स्वत: तयार करून या स्तोत्रात त्यांनी गुंफलेली आहेत. अशा प्रकारची रचना करणे किती अवघड असेल ? विचार पण नाही करू शकत आपण. परंतु स्वामी महाराज अगदी लीलया अशी विलक्षण रचना करून जातात.
दकारादि दत्तसहस्रनामाची गोष्टही काही वेगळी नाही. भगवान श्रीदत्तप्रभूंची ' द ' या एकाच अक्षरापासून सुरू होणारी, पूर्णपणे नवीन अशी एक हजार नावे त्यांनी रचलेली आहेत. त्यातही मनाला वाटेल तसे नाही, तर ' द ' च्या बाराखडीप्रमाणेच सर्व १५९ श्लोक रचलेले आहेत. कसले कौशल्य आहे हे, बापरे !! अशा प्रकारच्या व्याकरणाच्या किंवा शब्दांच्या एकाहून एक अद्भुत आणि चमत्कृतिपूर्ण रचना आपल्या वाङ्मयात ठायी ठायी केलेल्या आहेत श्रीस्वामी महाराजांनी. येथेच त्यांचे अवतारित्व उठून दिसते ! ते नि:संशय साक्षात् श्रीदत्तात्रेयप्रभूच होते; अन्यथा असे कार्य कोणी दुसरे कधीही करू शकणारच नाही !
भगवान श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या सोळा अवतारांची चरित्रे त्यांनी आपल्या एका ग्रंथात सांगितलेली आहेत. त्याआधी त्यांनी या अवतारांच्या जयंतीदिनी करण्यासाठी म्हणून स्वतंत्र षोडशोपचार पूजाही रचलेली आहे. या पूजेची खासियत म्हणजे यातले पूजेचे मंत्रही परब्रह्माच्या अंगाने, अद्वैत तत्त्वज्ञानाच्या सिद्धांतांचे प्रतिपादन करणारेच आहेत. ही इतकी अर्थवाही व प्रगल्भ रचना आहे की आपण चकितच होऊन जातो. नैवेद्य दाखवण्याचा प्रचलित प्राणाय स्वाहा... मंत्र देखील त्यांनी यात बदलून, स्वतंत्र नवीन मंत्र त्यासाठी तयार केला आहे. केवळ या एका पूजेवर एक स्वतंत्र पीएच.डी होऊ शकते, इतकी जबरदस्त आहे ही पूजा.
श्रीस्वामी महाराजांच्या सर्व वाङ्मयाचा मेरुमणी शोभावा असा ग्रंथ म्हणजे 'श्रीदत्तमाहात्म्य' ! प.प.श्री.स्वामी महाराजांच्या साडेतीन हजार श्लोकांच्या संस्कृत श्रीदत्तपुराणाचे मराठी भाषेतील सार म्हणजे श्रीदत्तमाहात्म्य होय. या ग्रंथात प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तप्रभूंचाच वास आहे. कारण तसाच आशीर्वाद स्वामी महाराजांनी शेवटी यात मागितलेला आहे. हा जवळपास साडेपाच हजार ओव्यांचा महान ग्रंथ म्हणजे अध्यात्मशास्त्राचा परिपूर्ण मार्गदर्शकच आहे. काय नाहीये यात ? योग आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, काव्य आहे, धर्मशास्त्र आहे, वैद्यक आहे, ज्योतिष आहे, मंत्र आहेत, लीलाकथा आहेत, अक्षरश: सर्वकाही आहे. अध्यात्माच्या 'अ' पासून ते आत्मज्ञानाच्या 'ज्ञ' पर्यंत एकूण एक गोष्टी स्वामी महाराजांनी या ग्रंथात सविस्तर मांडलेल्या आहेत. या एकाच ग्रंथाला मनापासून अनुसरले तरी आपले अवघे जीवन धन्य होऊन जाईल.
प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे सारे वाङ्मय असेच अद्भुत आहे. अत्यंत प्रभावी अशा या मंत्रमय वाङ्मयाने आजवर लक्षावधी साधकांना ऐहिक व पारमार्थिक लाभ प्रदान केला आहे, त्यांचा कवचाप्रमाणे सांभाळ करून त्यांचा परमार्थमार्ग प्रशस्त केलेला आहे. आजही या मंत्रांचे कल्पनेत बसणार नाहीत असे अलौकिक अनुभव असंख्य जणांना नेहमीच येत असतात. म्हणूनच, प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या या प्रसन्न वाङ्मयमूर्तीला सज्जनांचा, साधकांचा प्रेमळ सांगातीच म्हटले जाते.
श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या श्रीवामनराज प्रकाशनाने श्रीस्वामीमहाराजांचे महत्त्वाचे सर्व वाङ्मय *प.प.सद्गुरु श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अक्षयवाङ्मयमाला* या प्रकल्पाद्वारे, सर्वांगसुंदर अशा एकवीस ग्रंथांच्या माध्यमातून पुन:प्रकाशित केले आहे. शिवाय यातले सर्व संस्कृत वाङ्मय सोप्या मराठी अर्थासह छापले आहे. मराठी रचनांमध्ये देखील कठीण शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. याही पुढे जाऊन आजच्या प्रचंड महागाईच्या काळातही हे सगळे ग्रंथ, केवळ या दिव्य वाङ्मयाच्या प्रचार प्रसारासाठी ३०% सवलतीत भाविकांना उपलब्ध करून दिलेले आहेत; हे श्रीवामनराज प्रकाशनाचे फारच स्तुत्य कार्य आहे. म्हणूनच आता आपण भाविकभक्तांनीच या देवदुर्लभ मंत्रमय साहित्याचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा. मी त्यासाठी आपणां सर्व सुजाण वाचकांना आजच्या पावन दिनी हात जोडून कळकळीची प्रार्थना करतो. वेळात वेळ काढून प.प.श्री.थोरल्या महाराजांचे हे परमानंददायक वाङ्मय आयुष्यात एकदातरी वाचून काढावे, त्यावर मनन करावे व त्यांच्या अमोघ कृपेचा अनुभव घ्यावा, ही नम्र विनंती. ते साक्षात् परमकनवाळू श्रीदत्तात्रेयप्रभूच आहेत. त्यांची कृपा झाल्यावर मग आपल्याला कोणाची आणि कसली भीती ?
आजच्या प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पुण्यपावन जयंतीदिनी, त्यांच्याच शब्दांत त्यांच्या श्रीचरणीं आपण मनोभावे प्रार्थना करू या व त्यांच्या सकलार्थदायक पदकमली शरण जाऊन त्यांच्या कृपेची याचना करू या.
गुरो तुझी ही पदवारिधारा, धुवो सदा कायिक दोष सारा ।
सदैव माझें मन वाणि शुद्ध, करो तुझे नाम पवित्र सिद्ध ॥
"सद्गुरु स्वामीराया ! आपल्याच कृपाशीर्वादांच्या बळावर, आपले हे पावन सारस्वत आमच्या मनोमानसी स्थिर राहो, फुली-फळी बहरो आणि त्याच्या प्रसादाने आमचे अंत:करण श्रीदत्तप्रभूंच्या प्रेमाने, भक्तीने भरून जावो. श्रीदत्तनामातच आमचा श्वास न् श्वास रंगो, आमचे अवघे आयुष्य श्रीदत्तप्रेमाने प्रकाशमान होवो आणि श्रीदत्तचरणच आमचे जीवनसर्वस्व होवोत, हीच कळकळीची प्रार्थना !"
श्रीपादश्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा ।
वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा ॥
[ प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या ग्रंथांसाठी संपर्क : श्रीवामनराज  प्रकाशन, पुणे. © 02024356919 ]
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


30 Aug 2018

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - चतुर्थ पुष्प

चतुर्थ पुष्प
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर आजवर अनेक महात्म्यांनी काव्य व ग्रंथरचना केलेल्या आहेत. परंतु श्रीगुरुचरित्र किंवा श्रीनवनाथभक्तिसाराप्रमाणे पारायणासाठी त्यांचे स्वतंत्र ओवीबद्ध चरित्र उपलब्ध नव्हते. सद्गुरु श्री माउलींच्याच प्रेरणेने त्यांचे पूर्णकृपांकित भक्तराज प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज यांच्याकडून २४०० ओव्यांचे "श्रीज्ञानदेव विजय" हे महाकाव्य रचले गेले. या अतिशय सुंदर, ओघवत्या व प्रासादिक रचनेने ही उणीव पूर्णपणे भरून काढलेली आहे. पंधरा अध्यायांमधून पू.श्री.मामांनी भगवान श्री माउलींच्या दिव्य चरित्रातील काही सामान्यपणे माहीत असलेल्या व फारशा प्रचलित नसलेल्या ब-याच लीला साध्यासोप्या तरीही अत्यंत रसाळ भाषेत सांगितलेल्या आहे. माउलींच्याच कृपेने ही रचना इतकी भावपूर्ण झालेली आहे की, वाचताना वारंवार आपले अंत:करण सात्त्विकतेने भरून येते, नेत्र पाझरू लागतात, अंगावर काटा उभा राहतो, माउलींच्या प्रेमाने गहिवरून यायला होते आणि सर्वांग व्यापून उरणारी एक विलक्षण आणि मधुरातिमधुर प्रेममयता आपल्यालाही प्राप्त होते. खरोखरीच, अतीव गोड रचना आहे ही.
आपल्याला माहीत असलेल्या रेडा बोलवणे, भिंत चालवणे याबरोबरच, वेगळ्या अशा माउलींच्या काही अलौकिक लीला प.पू.श्री.मामांनी या ग्रंथात सविस्तर सांगितलेल्या आहेत. श्री गहिनीनाथांचे पूर्वचरित्र, क-हाडच्या रामराजाचे गर्वहरण व त्याला कृपादान, पांडुरंगांच्या प्रसादमालेची प्राप्ती, गोपाळ बालकाला जीवनदान, पैठण येथील श्राद्धाच्या वेळी ब्रह्मवृंदाच्या पूर्वजांना जेऊ घालणे, उज्जैनच्या वीरमंगलाची रोमांचकारी कथा व मंगलेश्वर शिवलिंगाची स्थापना, हरिपाल डाकूचा उद्धार, काशीनगरीतील महायज्ञाच्या वेळचा अग्रपूजेचा प्रसंग व भगवान विश्वेश्वरांचे प्रकट होऊन माउलींच्या हातून पुरोडाश भक्षण, मृत सायन्नाचार्याच्या मुखातून सत्यकथन, नेवाशाच्या मशिदीला बोलते केल्याचा प्रसंग; यांसारख्या सद्गुरु श्री माउलींच्या अनेक अनवट लीला पू.मामांनी फार सुंदर भाषेत या ग्रंथात कथन केलेल्या आहेत. हे सर्व वाचताना आपण अगदी रममाण होऊन जातो. यांपैकी गोपाळ बालकाची व हरिपाल डाकूची कथा वाचताना तर फारच भरून येते. पू.मामांची विलक्षण शब्दरचना हृदयात अक्षरश: माउलीप्रेमाची व एका वेगळ्याच आनंदाची कारंजीच निर्माण करते. मला तरी ही रचना त्यामुळेच अत्यंत आवडते. कधीही हा ग्रंथ हातात घ्यावा आणि दोन-चार पाने वाचावीत, त्वरित श्री माउलींच्या प्रेमाचा प्रसन्न आविष्कार होतोच आपल्या मनात. कितीही व्यग्र असले तरी एकदम शांतच होऊन जाते ते. आपल्या मनातल्या श्री माउलींविषयीच्या प्रेमभक्तीचे नि:संशय संजीवनच आहे हा अनमोल ग्रंथ !
[  http://rohanupalekar.blogspot.in ]
'श्रीज्ञानदेव विजय' हा ग्रंथराज प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी स्थापन केलेल्या पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशनाने ( संपर्क ©-02024356919 ) प्रकाशित केलेला आहे. प्रत्येक माउलीभक्ताच्या संग्रही असायलाच हवा इतका हा महत्त्वाचा ग्रंथराज आहे.
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींचे नाम जो नित्यनेमाने व प्रेमाने घेईल तो परमार्थाचा अधिकारी होतो, असे अनेक महात्म्यांनी सांगून ठेवलेले आहे. श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात,
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो ।
वासुदेवचि होतो अखंड वदनी वदे जो ।।
ज्यावेळी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वताच्या गुहेत श्री निवृत्तिनाथ महाराजांना सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराजांकडून अनुग्रह लाभला, तेव्हा प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तप्रभू , श्री मत्स्येंद्रनाथ महाराज व श्री गोरक्षनाथ महाराज प्रकटले होते. तेव्हा त्यांनी दिलेला आशीर्वाद प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी आपल्या 'श्रीज्ञानदेव विजय' चरित्रात वर्णिलेला आहे की,
जे तुमचे नाम जपतील ।
ते पापमुक्त होतील ।
सर्वदा यशस्वी व्हाल ।
आशीर्वादे आमुच्या ॥४.१४३॥
तसेच काशीतील महायज्ञाच्या प्रसंगी पुन्हा एकदा हेच त्रिमूर्ती प्रकट झाले होते. त्यावेळी सर्व संतसमुदायही सोबत होता. तेव्हा परत एकदा भगवान श्रीदत्तप्रभू आणि दोन्ही नाथसिद्धांनी माउली व तिघा भावंडांना विशेष आशीर्वाद दिलेला आहे. प.पू.श्री.मामा म्हणतात,
तिघा नाथांनी ज्ञानेशांस ।
प्रेमे दिले आशीर्वादास ।
"प्रकट करोनी भक्तिमार्गास ।
अनंत जनांसी उद्धराल ॥६४॥
तुमचे नित्य नामस्मरण ।
जे करितील संसारी जन ।
ते त्वरे पापमुक्त होऊन ।
मोक्षासी जातील निश्चये !"॥१३.६५॥
अशाप्रकारे सद्गुरु श्री माउलींच्या नामाला सद्गुरु परंपरेचा दिव्य आशीर्वाद लाभलेला असल्यानेच, वारकरी संप्रदायामधील श्रीसंत नामदेवराय, श्रीसंत जनाबाई, श्रीसंत चोखोबाराय, श्रीसंत एकनाथ, श्रीसंत तुकाराम, श्रीसंत निळोबाराय यांसारखे सर्व थोर महात्मे आवर्जून या ब्रह्मनामाचे गुणगान गाताना दिसतात. या पावन नामाच्या नित्यजपाने आजवर अगणित भक्त उद्धरून गेले आहेत व जगाच्या अंतापर्यंत उद्धरणार आहेतच !
आपणही या पुण्यसप्ताहामध्ये भगवान सद्गुरु श्री माउलींच्या परमपावन नामाचे व सुमधुर लीलांचे श्रद्धाप्रेमाने निरंतर संस्मरण करून धन्य होऊया ! तेच या लेखमालेचे एकमात्र प्रयोजनही आहे.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली । महाराज ज्ञानेश्वर माउली ।


29 Aug 2018

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् -तृतीय पुष्प


तृतीय पुष्प
भगवान सद्गुरु श्री माउलींचे जीवन आणि कार्य हाच मुळात एक अत्यंत अद्भुत आणि ज्याची आपण कधीच कल्पनाही करू शकणार नाही असा विलक्षण चमत्कार आहे. अवघ्या एकवीस वर्षे तीन महिने आणि पाच दिवस एवढ्या छोट्या कार्यकालात त्यांनी अक्षरश: युगानुयुगे पुरून उरेल एवढे अद्भुत कार्य करून ठेवलेले आहे.
सद्गुरु श्री माउलींची वाङ्मयी श्रीमूर्ती असणारी श्री ज्ञानेश्वरी हा जागतिक आध्यात्मिक वाङ्मयातला सर्वांगपरिपूर्ण आणि एकमेवाद्वितीय ग्रंथराज आहे. असा अद्भुत ग्रंथ दुसरा नाही. आज साडेसातशे वर्षे झाली तरीही अक्षरश: लाखो साधक-अभ्यासक या ग्रंथदीपाच्या स्निग्ध-शीतल ब्रह्मप्रकाशात आपली वाङ्मयीन आणि आध्यात्मिक वाटचाल सुयोग्यपणे करीत आहेत व पुढेही करीत राहतीलच !
हा 'गुरुवतीचा ठावो' असणारा महान ग्रंथराज माउलींच्या कृपेचे वैभवच आहे. हा नुसता ग्रंथ नाही तर अपरंपार बरसलेला माउलींचा कृपामेघच जणू ! कनवाळू सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या आज्ञेने, कळिकाळरूपी ज्वराने पीडित झालेल्या श्रद्धावान जनांबद्दलच्या अपार कळवळयाने, त्यांना त्या भयानक पीडेतून कायमचे मुक्त करण्यासाठी सर्व प्रकारांनी धावा करून माउलीरूप कृपामेघ घनघोर बरसला; तोच हा ग्रंथ होय ! म्हणून, माउलींची कृपाच याच्या शब्दाशब्दांतून मूर्त झालेली आहे. जो या कृपावाणीचा आश्रय घेईल, तो आज ना उद्या पूर्ण व्याधिमुक्त होऊन, ब्रह्मानंदाची सुखानुभूती घेईलच !
कायावाचामनपूर्वक सर्वभावे शरण आलेल्या भक्ताला स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट करण्याचे अमोघ सामर्थ्य अंगी बाळगणारी ही भावार्थदीपिका, सद्गुरु श्री माउलींसारखीच कृपावत्सल आहे, मायाळू आहे. अहो, तिला प्रेमभराने नुसते मस्तकस्पर्शपूर्वक वंदन केले आणि छातीशी कवटाळले ना, तरी तिचा प्रेमपान्हा पाझरू लागतो हो. तिला लेकुरवाचेने 'आई' 'माय' म्हणून घातलेली साद पुरेशी होते. भुकेने व्याकूळ झालेल्या लेकराने जवळ येऊन मागायचा अवकाश, लगेच ही मायमाउली त्याला पदराखालीच घेते. तिला तरी कुठे राहवते हो ! मग सुरू होतो तो दैवी पीयूषपान्हा, माधुर्यालाही मधुरता प्रदान करणारा प्रेमसंपृक्त दुधाचा अविरत प्रवाह..... किती प्याल तेवढा प्या ! कधीच अजीर्ण होत नाही त्याचे. आणि त्या अमृतस्तन्याची तृप्ती ? शब्दांत नाही सांगता येणार एवढी ! पण आम्हांला तशी व्याकूळ भूकच लागत नाही, हे आमचे दुर्दैव.
http://rohanupalekar.blogspot.in ]
सद्गुरु श्री माउलींना जरी आपण प्रत्यक्ष पाहू शकत नसलो, तरी त्यांचे वाङ्मयरूप तर आपण सदैव पाहू, वाचू, अनुभवू शकतोच की ! हे भाग्य किती थोर आहे आपले. करुणाभगवती श्री ज्ञानदेवीचे स्मरण, वंदन, वाचन, मनन आणि चिंतन हे जणू त्या ज्ञानमाउलीच्या प्रेमअंकावर बसून आपण केलेल्या लडिवाळ खोड्याच तर आहेत. आता लेकराने नाही करायच्या तर कोणी करायच्या खोड्या ? पण ही खोडी जन्माचीच खोड घालवणारी आहे बरं का !
आणि आमची ही माउली इतकी प्रेमळ आहे की, ती आपल्या अबोध लेकरांना हाका मारूमारून बोलावून घेते नि मांडीवर बसवून त्यांचे भरभरून कोडकौतुक करते, हवे ते व हवे तेवढे लळे पुरवते. विश्वास बसत नाही ? मांडीवर बसायचा प्रयत्न तरी करून पाहिलाय की नाही कधी ? नसेल तर वाट कशाची पाहता ? आजचाच मुहूर्त साधा की !!
श्री माउली हेच चालता-बोलता चमत्कार आहेत, त्यापुढे आपली मती, गती पूर्णपणे कुंठितच होते.
येथे केवळ शरणागतिपूर्वक साष्टांग दंडवतच योग्य आहे आणि तेच आपल्या सर्वांचे परम परम परम भाग्यही आहे !!
सद्गुरु श्री माउलींचे असेच लडिवाळ लेकरू होण्याचे सद्भाग्य लाभलेल्या श्रीसंत जनाबाई महाराज म्हणूनच म्हणतात,
भाव अक्षराची गांठी ।
ब्रह्मज्ञानाने गोमटी ॥१॥
ते हे माय ज्ञानेश्वरी ।
संतजनां माहेश्वरी ॥२॥
ज्ञानेश्वर मंगळ मुनी ।
सेवा करी दासी जनी ॥२६६.३॥
"आमच्या माउलींचे स्वरूप असणा-या या ज्ञानेश्वरीला भाव धरून शरण गेले की अक्षर अशा परमात्म्याची गाठ पडते व गोमटे असे ब्रह्मज्ञान होते. म्हणूनच या ज्ञानेश्वरीला संतजनांनी साक्षात् माहेश्वरी, प्रभू श्रीमहेशांची अर्धांगिनी अशी कृपाशक्तीच मानलेली आहे. तीच सगळ्यांची प्रेमळ माता आहे. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे जगाचे मंगल करण्यासाठी, कल्याण करण्यासाठीच अवतरलेले महामुनी आहेत. म्हणूनच मी जनी, त्यांची ( व त्याच्या ज्ञानेश्वरीची ) दासी होऊन सतत त्यांच्या स्मरणातच त्यांची जमेल तशी, जमेल तेवढी व जमेल ती सर्व सेवा करीत असते !"
आता प्रत्यक्ष श्रीसंत जनाबाईच 'काय करायला हवे' ते येथे स्पष्ट सांगताहेत म्हटल्यावर, आपण तरी वेगळे काही करण्याच्या नसत्या फंदात कशाला पडावे बरे ?
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
महाराज ज्ञानेश्वरमाउली । महाराज ज्ञानेश्वरमाउली । महाराज ज्ञानेश्वरमाउली ।


28 Aug 2018

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - द्वितीय पुष्प

द्वितीय पुष्प
           
भगवान सद्गुरु श्री माउलींचा अवतार श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ अर्थात् १५ ऑगस्ट १२७५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास, आळंदी येथील सिद्धबेटावर झाला, असे सर्वत्र मानले जाते. श्री माउलींचे आणि भगवान श्रीगोपालकृष्णांचे जन्माचे सगळे योग सारखे आहेत. दोघांची जन्मवेळ एक, जन्ममास एक, जन्मनक्षत्र एक आणि जन्मतिथीही एकच आहे.
प्रचलित मान्यतेनुसार १५ ऑगस्ट मानले जाते, पण संतांच्या अभंगांमधील उल्लेख पाहून एक संशोधक श्री.एकनाथ पाटील यांनी "बापरखुमादेविवरु" मासिकाच्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, चरित्र, कार्य आणि तत्त्वज्ञान विशेषांकात लिहिलेल्या लेखानुसार ती तारीख २२ ऑगस्ट येते. २२ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.३० च्या सुमारास ( म्हणजे उजाडता २३ ऑगस्ट ) सद्गुरु श्री माउलींचा जन्म झाला. आधुनिक संगणकीय पद्धतीने केलेल्या ज्योतिषशास्त्रीय गणितानुसार हीच तारीख योग्य आहे. त्यांनी त्या लेखात याबद्दल सविस्तर चर्चाही केलेली आहे.
आळंदीतील सिद्धबेटाच्या या पावन भूमीवर, महासिद्धांनाही बोध करणारे महायोगिराज, साक्षात् श्रीकृष्णचंद्र महाप्रभू जन्माला आले, हे किती औचित्यपूर्ण आहे ! सद्गुरु श्री माउलींचे सारे चरित्र आणि कार्य औरच आहे. म्हणूनच आज साडेसातशे वर्षे उलटली तरी त्या दिव्य चरित्राची मोहिनी किंचितही कमी झालेली नाही; उलट दिवसेंदिवस वाढतच आहे.
http://rohanupalekar.blogspot.in ]
श्रीसंत तुकाराम महाराज भगवान सद्गुरु श्री माउलींचा यथार्थ गौरव करताना म्हणतात,
जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ ।
अंगी ऐसें बळ रेडा बोले ॥१॥
करील तें काय नोहे महाराज ।
परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥२॥
जेणे हे घातली मुक्तीची गवांदी ।
मेळविली मांदी वैष्णवांची ॥३॥
तुका म्हणे तेथे सुखा काय उणे ।
राहें समाधाने चित्ताचिया ॥४॥
"ज्यांच्या द्वारी सुवर्णाचा पिंपळ शोभून दिसतो व ज्यांच्या अंगी रेड्याच्या मुखातून वेद वदविण्याचे जगावेगळे आणि अत्यंत विलक्षण सामर्थ्य आहे, त्या महायोगिराज सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांना जगात अशक्य असे काहीच नाही. शरण आलेल्या भक्ताच्या ठायी जर शुद्ध श्रद्धा व प्रेमभाव असेल, तर माउली त्याच्यासाठी काहीही करतात, त्याचे सर्व बाजूंनी कोटकल्याणच करतात. अहो, त्यांनी तर वैष्णवांची मांदियाळी एकत्र करून, दुर्मिळ अशा मोक्षाचे मुक्तद्वार अन्नछत्रच घातलेले आहे. श्री तुकोबाराय म्हणतात की, त्यांच्या चरणीं सुखाला कसलेही उणे नाही, भरभरून सुख तेथे वाहात आहे. हा प्रपंच अनित्य असून सुखरहितही आहे, पण हे श्रीचरण मात्र शाश्वत सुखाने ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून त्याच श्रीचरणीं आता आपण समाधानाने कायमचे पडून राहू या. त्यातच आपले खरे हित आहे !"
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


27 Aug 2018

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - प्रथम पुष्प

प्रथम पुष्प
आजपासून आपले परमाराध्य भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली व भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू यांच्या जन्मोत्सवास सुरुवात होत आहे. या पावन सप्ताह-पर्वकालामध्ये आपण सर्वजण मिळून दररोज सद्गुरु श्री माउलींचे गुणवर्णन करून हा सप्ताह अानंदाने साजरा करू या.
सद्गुरु श्री माउली हे साक्षात् भगवान श्रीकृष्णांचे परिपूर्णतम अवतार होत ! माउलींसारखे माउलीच !! अनुपमेय, अद्वितीय, अद्भुत, अलौकिक आणि अपरंपार करुणामय !!
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींचा जन्म आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा अचूक सारख्याच योगांवर झालेला आहे. फरक एवढाच की, श्रीभगवंतांचा जन्म बुधवारी झाला आणि श्री माउलींचा जन्म गुरुवारी. बरोबरच आहे ना, त्यांना अवघ्या जगाचे गुरुपद भूषवायचे होते म्हणूनच तर ते गुरुवारी प्रकट झाले !
सद्गुरु श्री माउलींचे पूर्ण कृपांकित, थोर सत्पुरुष श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज माउलींना अतीव प्रेमादराने "करुणाब्रह्म" म्हणत असत. खरोखरीच त्यांच्या करुणेला ना अंत ना पार !
आपले भाग्य थोर म्हणून आपल्याला त्यांच्या नामाची, त्यांचेच स्वरूप असणा-या त्यांच्या चिन्मय वाङ्मयाची आणि त्यांच्या सेवेची गोडी त्यांच्याच कृपेने लागलेली आहे. आणि त्याच प्रेमादराने आपण भगवान सद्गुरु श्री माउलींची ही नाम-गुण-कीर्तनरूप सेवा आरंभिलेली आहे. ही सेवा ते नक्कीच गोड मानून घेतील व आपल्याला अमोघ कृपामृताचे दान करतील अशा दृढ विश्वासाने त्यांच्याच नामात आपण मग्न होऊया !
महाराज ज्ञानेश्वरमाउली । महाराज ज्ञानेश्वरमाउली ।
[  http://rohanupalekar.blogspot.in ]
सद्गुरु श्री माउलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर श्री नामदेवरायांना त्यांची तीव्रतेने आठवण येऊ लागली. म्हणून त्यांनी भगवान पंढरीनाथांची कळवळून प्रार्थना केली की, माझ्या जीवीचे जीवन श्री ज्ञानदेवांची पुन्हा भेट घडवा. त्यावर देव म्हणतात कसे,
देव म्हणे नाम्या पाहे ।
ज्ञानदेव मीच आहे ॥१॥
तो आणि मी नाहीं दुजा ।
ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥
माझ्या ठायी ठेवी हेत ।
सोड खंत खंडी द्वैत ॥१२२६.३॥
"अरे नाम्या, मीच तर ज्ञानदेव होऊन आलो होतो ना, त्यात आणि माझ्यात काहीच भेद नाही. तोच माझा आत्मा आहे. तेव्हा आता ज्ञानदेव दिसत नाही ही मनातली खंत काढून टाक आणि आमच्यामध्ये द्वैत न मानता माझ्याच ठायी आता ज्ञानदेवाला पाहा !"
देवांच्या या बोलण्यावर नामदेवराय त्यांना निक्षून सांगतात,
नामदेव म्हणे देवा ।
ब्रह्मज्ञान पोटी ठेवा ॥
"देवा, तुमचे ब्रह्मज्ञान तुम्हांलाच लखलाभ. आम्हांला संतभेटीतच जास्त गोडी आहे. काहीही करा पण आता ज्ञानदेव डोळा दाखवा, बास !"
ज्ञानदेव माझें सौख्यसरोवर ।
त्यांत जलचर स्वस्थ होतों ॥
माझा ज्ञानोबा सौख्याचे साक्षात् सरोवर आहे; ज्यात माझ्यासारखा दमला-भागला जलचर स्वस्थ होतो, अंतर्बाह्य सुखरूप होतो. देवा, त्यांची प्रेम-आवडी तुम्हांला काय सांगू ? ज्ञानदेवांचे दर्शन झाल्याशिवाय मी आता पुन्हा पंढरीला येणारच नाही, काय ते तुम्ही पाहा, पण मला आता माझा ज्ञानदेव डोळा दाखवाच !
लाडक्या नामयाची ही तळमळ पाहून देवही गहिवरले व त्यांनी गरुडाला पाठवून श्री ज्ञानदेवांना बोलावून घेतले. नामदेवांनी त्यांचे चरण घट्ट धरून त्यांवर प्रेमाश्रूंचा अभिषेक केला आणि त्यांचे ते दिव्य रूप हृदयगाभा-यात कायमचे साठवून ठेवले.
या हृद्य प्रसंगाचे वर्णन करणारे २४ अभंग श्री नामदेवरायांच्या गाथ्यात आहेत. ते अभंग नुसते वाचतानाही आपले हृदय प्रेमावेगाने भरून येते व तो आवेग कधी डोळ्यांमधून वाहू लागतो तेच कळत नाही. त्या प्रेमाश्रूंचे मोल अद्भुतच असते, कारण त्यांना तर माउलींच्या करुणाकृपेची अनोखी ओल असते !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


स्वामीसुत स्वामीपायी लोळे

आज श्री श्रावण कृष्ण प्रतिपदा, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे प्रधान लीलासहचर, स्वामींचे प्रत्यक्ष पुत्रच अशा श्रीसंत स्वामीसुत महाराजांची पुण्यतिथी ! श्रीस्वामी महाराजांची पूर्णकृपा लाभलेले व त्यांचे जन्मजन्मांतरीचे सेवक असणारे श्रीस्वामीसुत महाराज हे फार विलक्षण विभूतिमत्त्व होते.
श्री. हरिभाऊ तावडे ऊर्फ स्वामीसुत हे मुंबई म्युनिसिपालिटीमध्ये नोकरीला होते. त्यांनी एक व्यापार केला पण त्यात खूप नुकसान झाले. पण पुढे श्रीस्वामीकृपेने पंडित म्हणून एका गृहस्थांनी त्यांची हमी घेतली. त्यावेळी पंडितांनी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला. आश्चर्यकारकरित्या एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले. ही स्वामीकृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले.
श्रीस्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की, "तू कुळावर पाणी सोड व माझा सुत (पुत्र) हो !"
झालेल्या फायद्यातील तीनशे रुपये त्यांनी सोबत आणले होते, त्याच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या. त्या पादुका मोठ्या प्रेमाने त्यांनी सलग चौदा दिवस वापरल्या. अनेक सेवेकऱ्यांना त्या आपल्याला प्रसाद मिळाव्यात, अशी इच्छा होती, पण स्वामींनी प्रसन्नतेने आपल्या हात, पाय, तोंड वगैरे अवयवांस लावून त्या पादुका श्रीस्वामीसुतांना प्रसाद म्हणून दिल्या. स्वत: श्रीस्वामी महाराज त्या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत. त्यांनी स्वामीसुतांना तो प्रसाद देऊन, "तू तुझे घरदार, धंदा सोडून दर्याकिनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर !" अशी आज्ञा केली.
त्याच रात्री गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली श्रीस्वामींनी हरिभाऊंना अनुग्रह केला व उशाखालची छाटी व कफनी अंगावर फेकून कृपा व्यक्त केली.
श्रीस्वामीसुतांनी श्रीस्वामीआज्ञेचे तंतोतंत पालन करून आपला संपूर्ण संसार, घरदार लुटवले. बायकोचे दागिनेही ब्राह्मणांना दान करून टाकले. त्याकाळात ते दागिने जवळपास शंभर तोळ्यांचे होते. अंगावर मणी मंगळसूत्र देखील ठेवले नाही. स्वत: भगवी कफनी नेसले व बायको ताराबाईला पांढरे पातळ नेसायला लावून स्वामीसेवा सुरू केली. अत्यंत निस्पृहपणे व वैराग्याने त्यांनी खूप मोठे स्वामी सेवाकार्य केले. मुंबई व कोकणात त्यांनी अनेक ठिकाणी स्वामी महाराजांचे मठ उभारून सेवा सुरू करून दिली. हजारो लोकांना स्वामीभक्तीस लावले. सुरुवातीला त्यांचा मठ कामाठीपु-यात होता, नंतर तो मठ कांदेवाडीत स्थलांतरित झाला. (श्रीस्वामींच्या आत्मलिंग पादुका देखील सुरुवातीला याच कांदेवाडी मठात होत्या. कालांतराने त्या मुंबईतील चेंबूर येथील मठात नेण्यात आल्या.) स्वत: श्रीस्वामींनी अनेकांना दर्याकिनाऱ्यावर जाऊन स्वामीसुतांचे मार्गदर्शन घेण्याची आज्ञा केलेेली होती.
श्रीस्वामी महाराजांच्या प्रकटदिनाच्या चैत्र शुद्ध द्वितीयेच्या उत्सवाची परंपरा श्री स्वामीसुतांनीच प्रथम शके १७९२ म्हणजेच १८७० साली सुरू केली. अक्कलकोट येथे त्या पुढील वर्षीपासून स्वामींच्या समक्षच हा उत्सव होऊ लागला. महाराज अतीव प्रेमाने स्वामीसुतांना "चंदुलाल" म्हणत असत. अनेक भक्तांना ते मनोकामना पूर्तीसाठी दर्याकिनाऱ्यावर स्वामीसुतांकडे पाठवत असत.
http://rohanupalekar.blogspot.com]
श्रीस्वामींनी आपल्या पश्चात् स्वामीसुतांना आपले कार्य पाहण्यासाठी अक्कलकोटला पाचारण केले, पण श्रीगुरूंच्या नंतर आपण राहू शकणारच नाही, असा त्यांनी पवित्रा घेतला. अनेक लोकांना स्वामींनी मुंबईला पाठवले स्वामीसुतांना घेऊन येण्यासाठी. पण शेवटपर्यंत ते श्रीस्वामींसमोर आलेच नाहीत आणि त्यांनी मुंबईतच आजच्या तिथीला देहत्याग केला. त्यावेळी स्वामींनी अक्कलकोटात विपरीत लीला करून स्वामीसुतांवरील आपले परमप्रेम प्रकट केले. स्वत: श्रीस्वामी महाराजांनी स्वामीसुतांच्या मातु:श्री काकूबाईंचे हरप्रकारे सांत्वन केले. स्वामी महाराजांचे आपल्या या अनन्य सुतावर विलक्षण प्रेम होते.
श्री स्वामीसुत महाराज खूप छान भजन करीत असत. हाती चिपळ्या व तंबुरी घेऊन ते रंगून जाऊन स्वामीमहाराजांचे मनोभावे भजन करीत असत. त्यांच्या अभंगरचनाही उत्तम आहेत. ते ज्या ज्या लीलांचे वर्णन करीत त्या त्या लीला स्वामी महाराज प्रत्यक्ष करून दाखवीत असत. श्री स्वामीसुतांच्या या अभंगांचा गाथाही प्रकाशित झालेला आहे. मुंबईच्या आत्मस्वरूप प्रकाशनाने चेंबूर मठाच्या सचित्र माहितीसह हा गाथाही नुकताच प्रकाशित केला आहे
श्री स्वामीसुतांनी रचलेला ३१ अभंगांचा 'श्रीस्वामीपाठ' अत्यंत बहारीचा असून खूप प्रासादिक आहे. असंख्य भक्तांना त्याच्या पठणाचे अद्भुत अनुभव आजही येत असतात; ही स्वामीसुतांवरील श्रीस्वामीकृपेचीच अलौकिक प्रचिती आहे. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पंचदशाक्षरी महामंत्राचे व स्वामी महाराजांच्या परब्रह्मस्वरूपाचे अप्रतिम वर्णन श्री स्वामीसुत महाराजांनी श्रीस्वामीपाठात केलेले आहे.
आपल्या श्रीस्वामीपाठात स्वामीसुत महाराज म्हणतात,
सोडूनि संशय भजा स्वामीराय ।
जरी व्हावी सोय परमार्थाची ॥२३.१॥
"सर्व संशय सोडून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करा,भजन करा, त्यातच खरा परमार्थ-लाभ आहे. कारण स्वामीराज साक्षात् परब्रह्मच आहेत."
स्वामीनामी गोडी घ्यावी ही आवडी ।
करा काही जोडी नामजपें ॥१॥
नामजपें कदा नसे ती आपदा ।
दुरिताची बाधा नसे अंती ॥२॥
नसे अंती कोण एका स्वामीवीण ।
म्हणूनि चिंतन करा त्याचें ॥१३.३॥
"मधुर अशा स्वामीनामाची गोडी एकदा चाखा बाबांनो, त्यातच रंगून जाल बघा ! स्वामीनामाचीच आवड बाळगा आणि स्वामीनामजप करून पुण्य जोडा. जो प्रेमाने नामजप करतो त्याला पापांची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण त्याला अंती सांभाळणारे स्वामीमहाराजच असतात. स्वामी महाराजांशिवाय कोणीही तुम्हांला अंतकाळी वाचवणार नाही, म्हणून आतापासूनच त्यांचे मनोभावे चिंतन करायची सवय लावून घ्यावी."
श्री स्वामीसुत महाराजांचा हा बहुमोल उपदेश आपण मनापासून पाळून परब्रह्म परमात्मा श्री स्वामीसमर्थ महाराजांची परमकृपा संपादन करण्यासाठीच सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे. हीच श्री स्वामीसुत महाराजांच्या श्रीचरणी वाहिलेली खरी श्रद्धा-सुमनांजली आहे.
आजच्याच पावन तिथीला हुबळीचे थोर सत्पुरुष श्रीसंत सिद्धारूढ स्वामी महाराजांचीही पुण्यतिथी असते. श्री सिद्धारूढ स्वामी हे शैवसांप्रदायिक महान संत होते. त्यांच्याच शिष्योत्तम, बेळगांवच्या श्रीसंत कलावती आई यांनी 'श्री सिद्धारूढ वैभव' या ग्रंथात स्वामींचे सुरेख चरित्र लिहिलेले आहे. श्री सिद्धारूढ स्वामींच्याही लीला अतीव मनोहर असून साधकांसाठी निरंतर मार्गदर्शक आहेत.
आजच्या या पावन दिनी, राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या या लाडक्या पुत्राच्या, श्री स्वामीसुत महाराजांच्या आणि श्रीसंत सिद्धारूढ स्वामींच्या श्रीचरणीं अनंत दंडवत प्रणाम !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


12 Aug 2018

मीराँ गिरधर प्रेम दिवाँणी



आज श्रावण शुद्ध प्रतिपदा !
भारतीय पंचांगामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. हा संपूर्ण महिनाच अत्यंत पवित्र व हवाहवासा वाटणारा असतो. या काळात निसर्ग देखील मोहरून आलेला असतो. एकूणच चातुर्मासातील या पवित्र महिन्यात सर्वत्र अतिशय सुंदर वातावरण असते. याच काळात त्यामुळे व्रतवैकल्ये आवर्जून करावीत असे पूर्वीच्या श्रेष्ठांनी सांगून ठेवलेले आहे.
श्रावण महिन्याला आपल्याकडे का बरे एवढे पावित्र्य दिले गेले असावे? याचा विचार करता मला नेहमी असे वाटते की, आम्हां भारतीयांचे परमआराध्य व पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंचा जन्ममास आहे, म्हणूनच तो आम्हांला अत्यंत प्रिय व पवित्र वाटतो.
एक विलक्षण योगायोग म्हणजे, या श्रीकृष्णजन्म-मासाच्या पहिल्याच दिवशी, त्या पूर्ण पुरुषोत्तमाच्या परमप्रिय भक्तश्रेष्ठ व साक्षात् भगवती श्रीराधाराणींच्याच प्रेमावतार, श्रीसंत मीराबाईंची जयंती असते !
श्री मीराबाई ह्या अलौकिक आणि अद्भुत विभूतिमत्त्व आहेत. त्यांच्या भक्तिविश्वाची व प्रगल्भ प्रेमभावाची किंचितशी कल्पनाही करणे, आपल्या मानवी बुद्धीच्या कक्षेच्या फार बाहेरचेच आहे. त्यांचे विलक्षण जीवनचरित्र, त्यांचे जगावेगळे बालपण, कर्तव्यपालन म्हणून नि:संगपणे त्यांनी केलेला संसार, कृष्णस्मरणात त्यांनी नि:संकोचपणे प्राशन केलेले विष व त्या विषाचा हरिकृपेने तत्काळ नष्ट झालेला प्रभाव, त्यानंतर सर्वसंग त्याग करून संपूर्ण भारतभर त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेला भक्तिप्रचार आणि त्यांचा अद्वितीय देहत्याग; सारेच कल्पनातीत आहे ! चमत्कारालाही विस्मय वाटावा असेच आहे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना एकदा एकाने प्रश्न विचारला, "मामा, श्रीसंत मीराबाईंना पण विष पाजले होते व सॉक्रेटिसलाही विषच पाजले गेले. मग दोघांत फरक काय?" प.पू.मामांनी दिलेले उत्तर अतिशय मार्मिक व पुरेसे बोलके आहे. ते म्हणाले, "अरे, विष पिऊन सॉक्रेटिस मेला, पण मीराबाई जिवंतच राहिल्या !" या एकाच वाक्यात पू.मामांनी श्रीसंत मीराबाईंचा अद्भुत अधिकार नेमकेपणे अधोरेखित केला आहे.
सच्च्या भक्तहृदयाचे अप्रतिम भावाविष्कार असणारे श्री मीराबाईंचे अभंग वाचताना आपल्याला अगदी भारावून जायला होते. त्यांचा तो उत्फुल्ल माधुर्यभाव, त्यांची अनन्य कृष्णप्रीती, त्यांची सडेतोड भक्तितत्त्व-मांडणी, स्वानुभूतीची अथांग खोली, सारे किती मोहक आणि विशेष आहे ना ! त्या साक्षात् भगवती श्रीराधाजीच असल्यामुळे त्यांच्या अद्भुत अधिकाराविषयी आपण काय भाष्य करू शकणार? साक्षात् श्रीकृष्णप्रेमच त्यांच्या रूपाने साकार झाले होते !! म्हणून आपण तेथे केवळ साष्टांग दंडवतच करू शकतो ! तेच आपले परमभाग्य !!
http://rohanupalekar.blogspot.in ]
श्रीसंत मीराबाईंच्या अभंगांवर मराठीमध्ये फारशी पुस्तके नाहीत. थोडीबहुत जी काही आहेत ती चरित्रपरच आहे. त्यांच्या रचनांचे यथामूल चिंतन करून त्यातील विलक्षण भक्तिरहस्य कोणीच आजवर प्रकट केलेले नव्हते. अर्थात् ते सोपे कामच नाही. पण श्रीभगवंतांच्या असीम दयाकृपेने, प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या "अभंग आस्वाद" या ग्रंथमालेच्या नवव्या भागाद्वारे, श्रीसंत मीराबाईंच्या निवडक पन्नास अभंगांवर अत्यंत सुरेख असे विवरण नुकतेच प्रकाशित करून ही उणीव नेटकेपणे भरून काढलेली आहे. या पन्नास अभंगांची निवड इतकी चपखल झालेली आहे की, त्यातून श्रीसंत मीराबाईंचे अलौकिक व अद्वितीय भावविश्व अतिभव्य आणि उदात्त रूपात आपल्या समोर उभे ठाकते. श्री मीराबाईंच्या अभंगांवरचा हा मराठीतला पहिलाच असा ग्रंथ आहे. अवघ्या चाळीस रुपयांच्या या बहुमोल पुस्तकातून, चाळीस वर्षे जरी नियमाने अभ्यास केला तरी दरवेळी नवनवीन अर्थच लाभतील यात शंका नाही. श्रीसंत मीराबाईंची शास्त्रपूत मांडणी, आपल्या पूर्वजन्मातील प्रसंगांचे स्पष्ट उल्लेख करणारी शब्दरचना, प्रेमभक्तीचे मार्मिक सिद्धांत व भक्तांसाठी सुबोध उपदेशामृत हे श्री मीराबाईंचे काही काव्यविशेष आहेत. ते प.पू.श्री.दादांनी या ग्रंथात जागोजागी अगदी अचूकपणे दाखवून दिलेले आहेत. वाचकांनी, सद्भक्तांनी व अभ्यासकांनी या ग्रंथाचा जरूर अभ्यास करावा ही विनंती.
संत वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक पूजनीय श्री.शिरीषदादा कवडे यांचा "म्हाराँ रि गिरधर गोपाल" नावाचा संत मीराबाईंच्या त्याच अभंगावरील जबरदस्त विवरणग्रंथ सर्वांनी एकदातरी वाचावाच वाचावा. या चौदा प्रवचनांतून श्रीसंत मीराबाईंचे खरे, आभाळाएवढे व्यापक विभूतिमत्त्व आणि त्यांच्या नितांतमधुरा अंतरंग अनुभव स्थितीची खोली समजून येईल. भक्तिशास्त्रातले अदृष्टपूर्व सिद्धांत त्यात पू.दादांनी सविस्तर व संतचरित्रांतली आणि विशेषत: मीराबाईंच्या चरित्रातली उदाहरणे घेऊनच मांडलेले आहेत.  भक्तिप्रांतातले अत्यंत गुह्य म्हणून सांगितलेल्या आणि केवळ अनुभवगम्यच मानलेल्या भावरूपकात्मक अष्टदलकमलाचे सुरेख दर्शन पू.दादांनी या ग्रंथात करविलेले आहे. ही अपूर्व माहिती अन्यत्र कुठेच पाहायलाही मिळत नाही. त्यामुळे हा ग्रंथराज अभ्यासक व प्रेमीभक्त अशा दोघांसाठीही अद्वितीय-अलौकिकच ठरतो.
श्रीसंत मीराबाईंच्याच जातकुळीची भावगहिरी कृष्णप्रचिती अंगांगी मिरवणा-या प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी, श्रीसंत मीराबाईंच्या "फागुन के दिन चार रे ।" या पदावरील आपल्या विवरणग्रंथात, भक्तहृदयात साकारणारा हरिप्रेमरसाचा दैवी होलिकोत्सव, भक्तहृदयात साजरा होणारा भगवान श्रीरंगांचा अलौकिक रंगोत्सव इतका बहारदार मांडलाय की बस ! श्रीसंत मीराबाईंची सर्वांगसुंदर प्रेमानुभूतीच त्यातून पू.सौ.ताई स्वानुभवपूर्वक आपल्यासमोर ठेवतात. श्रीसंत मीराबाईंचे अद्वितीय-अलौकिक भावविश्व समजून घ्यायचे असेल, तर वर सांगितलेले तिन्ही ग्रंथराज अभ्यासणे नि:संशय आवश्यकच आहे, असे मला मनापासून वाटते. संत हे त्यांच्या वाङ्मयरूपाद्वारे अजरामर ठरलेले असतात. म्हणूनच त्यांच्या वाङ्मयाचे वाचन, मनन व चिंतन हीच त्यांची अनोखी संस्मरणी असते, त्यांची ब्रह्मरसप्रदायिनी दिव्य संगतीच असते. या तिन्ही ग्रंथांच्या वाचनाने मी तरी प्रेमभक्तीची शाब्दिक का होईना, पण अतिशय भावमधुर अशी अनुभूती घेतलेली आहे व नेहमीच घेत असतो.
काही लोक जेव्हा या परमश्रेष्ठ विभूती विषयी ' ती मीरा ' अशा एकेरी उल्लेखाने बोलतात किंवा त्यांच्या चरित्राविषयी काही अनुदार उद्गार काढतात; तेव्हा खरंच त्यांच्या अल्पबुद्धीची कीव येते. श्री मीराबाईंसारख्या संतांचा परमादरपूर्वक उल्लेख करणे किंवा त्यांचे स्मरण होणे, हे आपल्या कैक जन्मांच्या पुण्याचे सुफलितच म्हणायला हवे. कोणत्याही संतांचा झोपेतही असा अनादराने उल्लेख होऊ नये, म्हणून आपण सर्वांनीच सतत काळजी घेतली पाहिजे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीसंत मीराबाईंच्या विषयी एक अप्रतिम दृष्टांत देत असत. ते म्हणत, "एखादा खूप प्रख्यात शिल्पकार असावा, त्याने जीव लावून आपली अजोड कलाकृती निर्माण करावी, की तशी पुन्हा होणार नाही; बघणा-यांना वाटावे की ही आपल्याच सुखासाठी केलेली आहे, म्हणून सगळ्यांनी आनंदाने ती शिल्पकृती पाहावी. आणि अशी अप्रतिम कलाकृती करणा-या शिल्पकाराला शोधायला जावे तो लक्षात यावे की शिल्प म्हणून स्वत: शिल्पकारच तेथे बसलेला आहे ! असे त्या मीराबाईंचे आयुष्य आहे. श्रीभगवंतांनी मीराबाईंच्या रूपाने अजोड कृती करून ठेवलेली आहे. त्यांच्या रूपाने अलौकिक लीलाच घडवलेली आहे !"
अनुत्तरभट्टारिका, व्रजनंदिनी महारासेश्वरी श्रीकृष्णप्रिया श्री श्री मीराबाईंच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त सर्वांच्या वतीने सादर साष्टांग दंडवत !
अभंग आस्वाद - भाग नववा मधील पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या अतिशय गोड काव्यमय  अर्पणपत्रिकेच्या रूपाने आपणही महाभगवती श्री मीराबाईंच्या चरणीं प्रेमपसायाची सादर प्रार्थना करू या.
चंद्र कृष्णप्रभू, मीरा चंद्रिका ।
आराधित प्रभू, मीरा राधिका ॥१॥
मीरा गिरिधर, अंगे अद्वय ।
अवीट सुखाचे, लीला आलय ॥२॥
मधुर रतीचे, ओघ अनादी ।
शरण अमृता, राखावे पदीं ॥३॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

[ वर उल्लेख केलेले ग्रंथ 30% सवलतीत मिळवण्यासाठी श्रीवामनराज प्रकाशन, पुणे यांच्या ©02024356919 या क्रमांकावर संपर्क करावा. ]




10 Aug 2018

सांवत्याने केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ||

सांवत्याने केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ||
आज आषाढ कृष्ण चतुर्दशी, श्रीसंत सांवता महाराजांची ७२३ वी पुण्यतिथी.
श्रीभगवंतांना वैविध्याचे प्रचंड प्रेम आहे. म्हणूनच तर त्यांनी आपल्या प्राप्तीचे असंख्य मार्ग सांगून ठेवलेले आहेत. या सर्व मार्गांचे दिग्दर्शन करण्यासाठी श्रीभगवंतांच्याच प्रेरणेने, एकेका महात्म्यांनी अवतरून तो तो मार्ग स्वत: अवलंबून त्याविषयी इतरांना मार्गदर्शन करून ठेवलेेले आहे. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हाच जगाचा नियम असल्याने, प्रत्येकाच्या प्रकृतीला अनुकूल होईल असा उद्धाराचा मार्गही भगवंतांनी निर्माण करून ठेवलेला आहेच. श्रीसंत सांवता माळी महाराज हे श्रीपांडुरंगांचे अनन्य भक्तोत्तम होेतेच, पण ते श्रीमाउलींच्या 'कर्मे ईशु भजावा ।' या सिद्धांताचे पालन करणारे होते. त्यांनी आपल्या दैनंदिन व्यवहारातूनच श्रीपांडुरंगांची उपासना केली. पंढरपुराच्या जवळच असणाऱ्या अरण या गावी राहणारे श्री सांवता महाराज, आयुष्यात कधीच पंढरीला दर्शनासाठी गेले नाहीत, असे सांगितले जाते. कारण त्यांचा पांडुरंग त्यांना सदैव समोरच दिसत होता. आपला स्वानुभव सांगताना ते म्हणतात,
कांदा मुळा भाजी ।
अवघी विठाबाई माझी ॥१॥
लसूण मिरची कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरि ॥२॥
मोट नाडा विहीर दोरी ।
अवघी व्यापिली पंढरी ॥३॥
सांवता म्हणे केला मळा ।
विठ्ठल पायीं गोंविला गळां ॥४॥
माळियाची जात असल्याने सांवतोबा आपल्या मळ्यातच पंढरीचा अनुभव घेत होते. श्रीगुरुकृपेने त्यांच्या दृष्टीला सर्वत्र ते सावळे परब्रह्मच प्रतीत होत होते. म्हणूनच तर, मळ्यात लावलेला कांदा, मुळा, कोथिंबीर, मिरची ही झाडेही त्यांच्यासाठी विठ्ठलरूपच होती. त्या झाडांची निगा राखण्याची साधने असणारी मोट, मोटेचा नाडा, विहीर हे सर्वच त्यांना पंढरीरूप वाटत होते. सांवता महाराज म्हणतात की, मी असा मळा केला व त्याद्वारेच माझा गळा विठ्ठलपायी गोविला.
गळा हे त्यांच्या सर्वस्वाचे द्योतक आहे इथे. त्यांनी आपले सर्वस्वच विठ्ठलपायी सर्वभावे समर्पिले व त्यामुळे तेही अंतर्बाह्य विठ्ठलरूपच होऊन ठाकले होते. स्वत:च विठ्ठलरूप झाल्यावर, त्या परमात्म्याचा अद्वैताने पूर्णानुभव घेतल्यावर, पुन्हा पंढरीतील विटेवरचा सगुण परमात्मा वेगळा पाहिला काय नि नाही पाहिला काय? काय फरक पडतो? याच भूमिकेने ते कधी पंढरीला गेलेच नसावेत. अर्थात् या गोष्टीला तसा स्पष्ट आधार नाही कुठे. पण म्हणतात की, सांवतोबा कधीच पंढरीला गेले नाहीत, पांडुरंग परमात्माच त्यांच्या भेटीला अरणला येत असे.
"ते पंढरीला कधी गेलेच नाहीत" ही केवळ लोकवदंताच असण्याची जास्त शक्यता आहे. कारण त्याकाळातल्या संतांच्या अभंगांमधून स्पष्ट उल्लेख येतात पंढरीतल्या कार्यक्रमांमधील श्री सांवता महाराजांच्याही उपस्थितीचे. इतर संतांबरोबर तेही सहभागी होत असत पंढरीतल्या उत्सवांमध्ये. श्री सांवता महाराजांच्या ठायी अद्वैताधिष्ठित कर्मयोग पूर्ण बहरलेला होता, हे सांगण्यासाठीच केवळ अतिशयोक्तीने तसे म्हटले जात असावे.
श्रीसंत एकनाथ महाराजांनी एका अभंगातून भगवान श्रीपंढरीनाथ, श्री सांवता महाराज व श्री नामदेव महाराजांची एक फार गोड लीला कथन केली आहे. श्री नामदेवरायांना झालेला, "आपणच देवाचे लाडके आहोत", हा अभिमान नष्ट करण्यासाठी एकदा भगवान श्रीविठ्ठलांनी नामदेवरायांना सांगितले की, "आपण लपाछपीचा खेळ खेळू या. मी लपतो, तू मला शोध." त्यानुसार पांडुरंग अदृश्य झाले. पण ते काही ना काही माग सोडत होते. त्याप्रमाणे नामदेवराय त्यांना शोधत शोधत अरणला पोचले. पण तेथून पुढे काहीच माग सापडेना, देव कोठे गेले हेच कळेना त्यांना.
http://rohanupalekar.blogspot.in ]
त्याआधी पांडुरंग परमात्मा सांवता महाराजांकडे आले व त्यांना म्हणाले, "अरे सांवत्या, माझ्या मागे एक चोर लागलाय, पटकन् मला लपवून ठेव कुठेतरी." सांवतोबांना गंमत वाटली. अवघ्या जगाचा नियंता चोर मागे लागलाय असे सांगून लपव म्हणतोय... काय पण ती लीला ! त्यांनीही मागचा पुढचा विचार न करता, आपल्या खुरप्याने आपलेच पोट फाडून त्यात पांडुरंगांना हळूच लपविले. आपल्या अनन्यभक्ताच्या विशुद्ध उदरात कृपेचे सिंहासन निर्माण करून देवही त्यावर सुखाने बसून राहिले पुढची गंमत पाहायला.
तेवढ्यात धापा टाकत नामदेव आले व देवांचा काहीच पत्ता न लागल्याने कासावीस होऊन रडू लागले. आपल्या कर्माला दोष देत ते सांवतोबांपाशी स्फुंदून रडू लागले. देवांच्या विरहाने व्याकूळ झालेल्या नामदेवरायांनी शेवटी प्राणत्याग करण्याचा निर्धार केला. त्याबरोबर श्री सांवता महाराज त्यांना म्हणाले, "अरे नामदेवा, देव तर हृदयात राहातो भक्तांच्या. पण जर तेथे अभिमानाने वसती केलेली असेल तर मात्र तो दिसत नाही. तुझ्या मनात अभिमान तर नाहीये ना? मग तुला दिसत का नाही तो परमात्मा?" सांवतोबांचे हे मार्मिक शब्द ऐकताच नामदेवांचा अभिमान गळून गेला व त्यांनी सांवता महाराजांच्या चरणी मिठी घालून देव दाखवण्याची प्रार्थना केली. अतिशय प्रेमळ अशा सांवता महाराजांनी निरभिमान झालेल्या नामदेवांना प्रेमभराने पोटाशी कवटाळले. त्याक्षणी नामदेवांना सांवतोबांच्या पोटात लपलेल्या देवांचा चुकून बाहेर राहिलेला पीतांबर झळकताना दिसला. त्यांनी त्या पीतांबराची दशा पकडून देवांना बाहेर काढले व त्यांच्या चरणीं प्रेमाश्रूंचा अभिषेक केला. अशाप्रकारे देव-भक्तांची एक मधुर प्रेमलीला संपन्न झाली.
सांवता महाराज सद्गुरु श्री माउलींबरोबर झालेल्या तीर्थयात्रेत सहभागी झाले होते. सर्व संतांसोबत तेही अानंदाने हरिभजनात दंग होत असत. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी रचलेल्या "श्रीज्ञानदेव विजय" या महाकाव्यात त्यांनी सांवता महाराजांचे मनमोहक वर्णन केले आहे. सांवता महाराजांचे रूपवर्णन करताना ते म्हणतात, "जाडे गोरे उंच विशाल । चंदनचर्चित भव्य कपाळ । स्वर जयांचा अतिकोमल ।(१२.२९)". शरीराने जाड, उंच व विशाल अशा सांवता महाराजांचा रंग गोरा होता पण आवाज मात्र अतिशय सुकोमल होता. अहो, ज्यांच्या हृदयी राजस सुकुमार मदनाचा पुतळा कायमचा विराजमान झालाय, त्यांचा आवाजही सुकोमलच असणार ना ! "श्रीसद्गुरुकृपेने ज्ञानोत्तराभक्तीची परिपूर्ण प्राप्ती झाल्यावर त्या भक्ताचे अंतर्बाह्य विश्वच प्रेममय होते, मधुरातिमधुर होऊन जाते, त्याचा आवाज अतीव गोड होतो, शरीर लोण्यासारखे मऊ होते", असे प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी "की भक्तिसुखालागी" या ओवीवरील आपल्या प्रवचनात सांगितलेले आहे.
श्रीसंत सांवता महाराजांनी आपल्या निर्याणाचा अभंगच रचलेला आहे. त्यानुसार मन्मथ नाम संवत्सरात, शके १२१७ म्हणजेच इ.स.१२९५ मधील आषाढ कृष्ण चतुर्दशीला सूर्योदयसमयी वायू निरोधन करून कुंभक साधून त्यांनी आपले प्राण स्वरूपी मिसळून टाकले. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेण्याच्या एक वर्ष आधी श्री सांवता महाराजांचे निर्याण झाले. त्यांची समाधी अरण गावी असून आज तेथे मोठा उत्सव संपन्न होतो.
श्रीसंत सांवता महाराजांचा "समयासी सादर व्हावें । देव ठेवील तैसें राहावे ॥१॥" हा अभंग सुप्रसिद्ध आहे. त्यातून त्यांनी 'परमेश्वराच्या इच्छेतच आपली इच्छा मिळवून राहावे', या भक्तिशास्त्रातल्या महत्त्वाच्या सिद्धांताचा उदाहरणे देऊन सुंदर उपदेश केलेला आहे. सांवता महाराजांचे समग्र चरित्र हा सद्गुरु श्री माउलींच्या "तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्म कुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागीं ॥ज्ञाने.१८.४६.९१७॥" या ओवीचे साक्षात् आदर्श उदाहरणच आहे. म्हणूनच आपण सर्वांनी या दिव्य चरित्राचे रोजच्या कर्मांमध्ये मननपूर्वक अनुसंधान ठेवले पाहिजे. म्हणजे मग आपली ती बंधनकारक कर्मेच आपल्या मोक्षाला कारण होतील.
आजच्या पावन दिनी, प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथांनाही आपल्या पोटात लपवून ठेवणा-या परमभागवत श्रीसंत सांवता महाराजांच्या श्रीचरणीं, त्यांचे पावन नामस्मरण करीत प्रेमभावे दंडवत घालू या व त्यांच्या उपदेशानुसार समयाला सदैव सादर होऊन देवांच्याच इच्छेत आपली इच्छा मिळवून राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून आपल्याही आयुष्याचे सोने करू या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
http://rohanupalekar.blogspot.in ]


9 Aug 2018

नामा तयाचा किंकर तेणे केला हा विस्तार

आज आषाढ कृष्ण त्रयोदशी, भगवान श्रीपंढरीनाथांचे प्रेमभांडारी व अत्यंत लाडके भक्तश्रेष्ठ श्रीसंत नामदेव महाराज, त्यांचे बारा कुटुंबीय व त्यांच्या दासी श्रीसंत जनाबाई महाराज यांचा आज समाधिदिन !
जगाच्या आजवरच्या इतिहासात, एकाच कुटुंबात एवढे थोर भगवद्भक्त महात्मे एकाचवेळी अवतरल्याचे दुसरे उदाहरण नाही. श्रीसंत नामदेवराय, त्याच्या पत्नी राजाई, आई गोणाई, वडील दामाशेट्टी; नारा, विठा, महादा व गोंदा हे चार सुपुत्र; लाडाई, गोडाई, साखराई व येसाई या चार सुना; लिंबाई ही कन्या व आऊबाई ही बहीण, असे चौदा जण भगवद्भक्त होते. श्रीनामदेवरायांच्या स्वनामधन्य शिष्या श्रीसंत जनाबाई या त्यांच्याघरी दासी म्हणून राहात होत्या. त्यांना धरून हे पंधरा लोकांचे अलौकिक कुटुंब म्हणजे भक्तिप्रांतातील विलक्षण चमत्कारच आहे !
या सर्व हरिभक्तांच्या रसपूर्ण काव्यरचना आजही उपलब्ध आहेत. या विलक्षण कुटुंबाला फार मोठे भाग्य लाभले. श्री ज्ञानदेवादी भगवदवतारी संतांच्या पंढरीतील वास्तव्यात त्यांची हरप्रकारे सेवा करण्याची आणि त्यांच्या समाधिप्रसंगी उपस्थित राहून सर्व व्यवस्था करण्याची महान सेवासंधी श्री नामदेवांच्याच या भगवद्भक्त कुटुंबाला लाभलेली होती. हे खरोखर अपूर्वच म्हणायला हवे. हे सर्व कुटुंबीय आतून पूर्ण रंगलेले हरिभक्तच होते. त्यांचा परस्पर व्यवहार, त्यांचा घरातला वावर किती मोहक आणि रम्य असेल नाही? माउली म्हणतात तसे, शेजारची काठोकाठ भरलेली दोन सरोवरे परस्परात मिसळतात ना, अगदी तसाच पराभक्तीचा उत्स्फूर्त कल्लोळ श्री नामदेवांच्या घरात सदैव चालत असणार. म्हणूनच तर, साक्षात् भगवान श्रीपंढरीनाथही या पावन घरात अखंड विराजमान असत, या प्रेमळ हरिभक्तांच्या जगावेगळ्या भक्तिप्रेमाचा पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी !
सद्गुरु श्री माउलींच्या कृपापरंपरेतून अनुगृहीत असलेले, सद्गुरु श्री विसोबा खेचरांच्या कृपेने पूर्णत्वास गेलेले श्री नामदेवराय हे विठ्ठलभक्तांचे शिरोमणीच आहेत. प्रल्हाद - अंगद - उद्धव या क्रमाने श्रीभगवंतांच्या प्रत्येक अवतारात हरिभक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी प्रकटणारे हे थोर भक्तराज, श्री माउलींच्या अवतारकाळात श्री नामदेवराय म्हणून जन्मले. ऐंशी वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. त्यांनी भारतभर फिरून भक्तिप्रसार केला. त्यांची प्रसिद्धीच एवढी होती की, त्यानंतर निर्माण झालेल्या शिखांच्या श्री गुरुग्रंथसाहिब मध्ये देखील श्री नामदेवांची अभंगवाणी ग्रथित केलेली आढळते.
http://rohanupalekar.blogspot.in
श्रीसंत जनाबाई या देखील नामदेवांसोबत युगानुयुगे कार्यार्थ अवतरत होत्या. पद्मिनी - मंथरा - कुब्जा - जनाबाई असा अवतारक्रम त्यांनी स्वत:च सांगून ठेवलेला आहे. या सर्व अवतारांमध्ये त्यांनी अनन्य दासीचेच पद मोठ्या प्रेमाने भूषविले होते, हे विशेष. त्यांच्यावर श्रीभगवंतांचे एवढे प्रेम होते की, माझ्या जनीला कोणी नाही म्हणून प्रत्यक्ष विठाईच त्यांचे सर्वकाही करीत असे. जनीची वेणी-फणी करणे, न्हाऊ माखू घालणे, सोबत दळण कांडण करणे, रानात शेण्या वेचायला जाणे या सर्व गोष्टी प्रत्यक्ष जनीचा लाडका विठोबाच करीत असे. देव-भक्ताचे असे सर्वांगांनी बहरलेले, गहिरे आणि अलौकिक प्रेमनाते या ठिकाणी पाहायला मिळते.
देवांचे जनाबाईंवर एवढे प्रेम होते की, भगवान पंढरीनाथच स्वहस्ते त्यांना सुचणारे अभंग वेळोवेळी लिहून घेत असत. एकदा श्रीपांडुरंगांनी स्वत: श्री माउलींना विनंती केली, *'जनीचे अभंग जो कोणी वाचेल, त्यांचे मनन करेल, त्याच्या अंगणात पांडुरंग नाचेल, त्याच्यावर पूर्ण कृपा करेल', असा आशीर्वाद तुम्ही द्यावा.* माउलींनी देखील देवांची इच्छा पाहून अगदी तसाच आशीर्वाद आपल्या लाडक्या लेकीला, श्रीसंत जनाबाईंना दिला. देवांनी स्वत:ची इच्छा अशी सद्गुरुमुखाने इथे पूर्ण करवलेली आहे. हा प्रसंगच किती गोड आणि गोजिरा आहे पाहा. त्यातून प्रकटणारे भगवंतांचे जनाबाईंवरचे परमप्रेम फारच मधुर आहे, भावगहिरे आहे.
भगवान पंढरीरायांच्या समक्ष, आजच्याच तिथीला इ.स.१३५० मध्ये या कुटुंबातील चौदा जणांनी श्रीपंढरीनाथांच्या महाद्वारात एकाचवेळी समाधी घेतली. लाडाई ही त्यावेळी बाळंतपणासाठी माहेरी गेलेली असल्याने ती तेवढी मागे राहिली. तिला जेव्हा सर्वांच्या समाधीचे वृत्त कळले, तेव्हा तिने, "मी काय देवा तुला परकी वाटले की काय? मलाच फक्त सोडलेस नि बाकीच्यांना तेवढी समाधी दिलीस?" असे म्हणून प्रत्यक्ष श्रीपांडुरंगांशीच भांडण केले व पोटच्या पोराला योग्य हाती सोपवून तिनेही हरिस्मरणात ऊर्ध्व लावून योगमार्गाने देहत्याग केला. इतके हे अलौकिक होते सगळे महात्मे !
भगवान पंढरीनाथांच्या थोर भक्ताची पावन पायधुळी अखंड लाभावी म्हणूनच या सर्वांनी मंदिराच्या पहिल्या पायरीखालीच समाधी घेतली. म्हणूनच पंढरपूरच्या मंदिराच्या पहिल्या पायरीला "श्री नामदेव पायरी" असेच म्हणतात.
श्रीसंत नामदेवराय व त्यांच्या शिष्य श्रीसंत जनाबाई, हे फार गोड प्रेमनाते असणारे थोर गुरु-शिष्य होते. युगानुयुगे भक्तिप्रसाराच्या कार्यासाठी एकत्रच अवतरत असलेली ही जोडगोळी अंतर्बाह्य हरिरंगी रंगलेली होती, हरिरूपच झालेली होती. प्रत्यक्ष परब्रह्म श्रीपांडुरंग सदैव त्यांच्या सोबत, त्यांच्या अवतीभोवती, त्याच्या आत-बाहेर वावरत असत; त्यांच्या मधुरातिमधुर भक्तिप्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी अखंड आसुसलेले असत. केवढे हे अद्भुत भक्तिभाग्य !!
आजच्या पावन पुण्यदिनी श्रीसंत नामदेव, श्रीसंत जनाबाई व त्यांच्या परमभाग्यवान कुटुंबीयांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
http://rohanupalekar.blogspot.in ]