मीराँ गिरधर प्रेम दिवाँणी
आज श्रावण शुद्ध प्रतिपदा !
भारतीय पंचांगामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. हा संपूर्ण महिनाच अत्यंत पवित्र व हवाहवासा वाटणारा असतो. या काळात निसर्ग देखील मोहरून आलेला असतो. एकूणच चातुर्मासातील या पवित्र महिन्यात सर्वत्र अतिशय सुंदर वातावरण असते. याच काळात त्यामुळे व्रतवैकल्ये आवर्जून करावीत असे पूर्वीच्या श्रेष्ठांनी सांगून ठेवलेले आहे.
श्रावण महिन्याला आपल्याकडे का बरे एवढे पावित्र्य दिले गेले असावे? याचा विचार करता मला नेहमी असे वाटते की, आम्हां भारतीयांचे परमआराध्य व पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंचा जन्ममास आहे, म्हणूनच तो आम्हांला अत्यंत प्रिय व पवित्र वाटतो.
एक विलक्षण योगायोग म्हणजे, या श्रीकृष्णजन्म-मासाच्या पहिल्याच दिवशी, त्या पूर्ण पुरुषोत्तमाच्या परमप्रिय भक्तश्रेष्ठ व साक्षात् भगवती श्रीराधाराणींच्याच प्रेमावतार, श्रीसंत मीराबाईंची जयंती असते !
श्री मीराबाई ह्या अलौकिक आणि अद्भुत विभूतिमत्त्व आहेत. त्यांच्या भक्तिविश्वाची व प्रगल्भ प्रेमभावाची किंचितशी कल्पनाही करणे, आपल्या मानवी बुद्धीच्या कक्षेच्या फार बाहेरचेच आहे. त्यांचे विलक्षण जीवनचरित्र, त्यांचे जगावेगळे बालपण, कर्तव्यपालन म्हणून नि:संगपणे त्यांनी केलेला संसार, कृष्णस्मरणात त्यांनी नि:संकोचपणे प्राशन केलेले विष व त्या विषाचा हरिकृपेने तत्काळ नष्ट झालेला प्रभाव, त्यानंतर सर्वसंग त्याग करून संपूर्ण भारतभर त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेला भक्तिप्रचार आणि त्यांचा अद्वितीय देहत्याग; सारेच कल्पनातीत आहे ! चमत्कारालाही विस्मय वाटावा असेच आहे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना एकदा एकाने प्रश्न विचारला, "मामा, श्रीसंत मीराबाईंना पण विष पाजले होते व सॉक्रेटिसलाही विषच पाजले गेले. मग दोघांत फरक काय?" प.पू.मामांनी दिलेले उत्तर अतिशय मार्मिक व पुरेसे बोलके आहे. ते म्हणाले, "अरे, विष पिऊन सॉक्रेटिस मेला, पण मीराबाई जिवंतच राहिल्या !" या एकाच वाक्यात पू.मामांनी श्रीसंत मीराबाईंचा अद्भुत अधिकार नेमकेपणे अधोरेखित केला आहे.
सच्च्या भक्तहृदयाचे अप्रतिम भावाविष्कार असणारे श्री मीराबाईंचे अभंग वाचताना आपल्याला अगदी भारावून जायला होते. त्यांचा तो उत्फुल्ल माधुर्यभाव, त्यांची अनन्य कृष्णप्रीती, त्यांची सडेतोड भक्तितत्त्व-मांडणी, स्वानुभूतीची अथांग खोली, सारे किती मोहक आणि विशेष आहे ना ! त्या साक्षात् भगवती श्रीराधाजीच असल्यामुळे त्यांच्या अद्भुत अधिकाराविषयी आपण काय भाष्य करू शकणार? साक्षात् श्रीकृष्णप्रेमच त्यांच्या रूपाने साकार झाले होते !! म्हणून आपण तेथे केवळ साष्टांग दंडवतच करू शकतो ! तेच आपले परमभाग्य !!
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
श्रीसंत मीराबाईंच्या अभंगांवर मराठीमध्ये फारशी पुस्तके नाहीत. थोडीबहुत जी काही आहेत ती चरित्रपरच आहे. त्यांच्या रचनांचे यथामूल चिंतन करून त्यातील विलक्षण भक्तिरहस्य कोणीच आजवर प्रकट केलेले नव्हते. अर्थात् ते सोपे कामच नाही. पण श्रीभगवंतांच्या असीम दयाकृपेने, प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या "अभंग आस्वाद" या ग्रंथमालेच्या नवव्या भागाद्वारे, श्रीसंत मीराबाईंच्या निवडक पन्नास अभंगांवर अत्यंत सुरेख असे विवरण नुकतेच प्रकाशित करून ही उणीव नेटकेपणे भरून काढलेली आहे. या पन्नास अभंगांची निवड इतकी चपखल झालेली आहे की, त्यातून श्रीसंत मीराबाईंचे अलौकिक व अद्वितीय भावविश्व अतिभव्य आणि उदात्त रूपात आपल्या समोर उभे ठाकते. श्री मीराबाईंच्या अभंगांवरचा हा मराठीतला पहिलाच असा ग्रंथ आहे. अवघ्या चाळीस रुपयांच्या या बहुमोल पुस्तकातून, चाळीस वर्षे जरी नियमाने अभ्यास केला तरी दरवेळी नवनवीन अर्थच लाभतील यात शंका नाही. श्रीसंत मीराबाईंची शास्त्रपूत मांडणी, आपल्या पूर्वजन्मातील प्रसंगांचे स्पष्ट उल्लेख करणारी शब्दरचना, प्रेमभक्तीचे मार्मिक सिद्धांत व भक्तांसाठी सुबोध उपदेशामृत हे श्री मीराबाईंचे काही काव्यविशेष आहेत. ते प.पू.श्री.दादांनी या ग्रंथात जागोजागी अगदी अचूकपणे दाखवून दिलेले आहेत. वाचकांनी, सद्भक्तांनी व अभ्यासकांनी या ग्रंथाचा जरूर अभ्यास करावा ही विनंती.
संत वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक पूजनीय श्री.शिरीषदादा कवडे यांचा "म्हाराँ रि गिरधर गोपाल" नावाचा संत मीराबाईंच्या त्याच अभंगावरील जबरदस्त विवरणग्रंथ सर्वांनी एकदातरी वाचावाच वाचावा. या चौदा प्रवचनांतून श्रीसंत मीराबाईंचे खरे, आभाळाएवढे व्यापक विभूतिमत्त्व आणि त्यांच्या नितांतमधुरा अंतरंग अनुभव स्थितीची खोली समजून येईल. भक्तिशास्त्रातले अदृष्टपूर्व सिद्धांत त्यात पू.दादांनी सविस्तर व संतचरित्रांतली आणि विशेषत: मीराबाईंच्या चरित्रातली उदाहरणे घेऊनच मांडलेले आहेत. भक्तिप्रांतातले अत्यंत गुह्य म्हणून सांगितलेल्या आणि केवळ अनुभवगम्यच मानलेल्या भावरूपकात्मक अष्टदलकमलाचे सुरेख दर्शन पू.दादांनी या ग्रंथात करविलेले आहे. ही अपूर्व माहिती अन्यत्र कुठेच पाहायलाही मिळत नाही. त्यामुळे हा ग्रंथराज अभ्यासक व प्रेमीभक्त अशा दोघांसाठीही अद्वितीय-अलौकिकच ठरतो.
श्रीसंत मीराबाईंच्याच जातकुळीची भावगहिरी कृष्णप्रचिती अंगांगी मिरवणा-या प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी, श्रीसंत मीराबाईंच्या "फागुन के दिन चार रे ।" या पदावरील आपल्या विवरणग्रंथात, भक्तहृदयात साकारणारा हरिप्रेमरसाचा दैवी होलिकोत्सव, भक्तहृदयात साजरा होणारा भगवान श्रीरंगांचा अलौकिक रंगोत्सव इतका बहारदार मांडलाय की बस ! श्रीसंत मीराबाईंची सर्वांगसुंदर प्रेमानुभूतीच त्यातून पू.सौ.ताई स्वानुभवपूर्वक आपल्यासमोर ठेवतात. श्रीसंत मीराबाईंचे अद्वितीय-अलौकिक भावविश्व समजून घ्यायचे असेल, तर वर सांगितलेले तिन्ही ग्रंथराज अभ्यासणे नि:संशय आवश्यकच आहे, असे मला मनापासून वाटते. संत हे त्यांच्या वाङ्मयरूपाद्वारे अजरामर ठरलेले असतात. म्हणूनच त्यांच्या वाङ्मयाचे वाचन, मनन व चिंतन हीच त्यांची अनोखी संस्मरणी असते, त्यांची ब्रह्मरसप्रदायिनी दिव्य संगतीच असते. या तिन्ही ग्रंथांच्या वाचनाने मी तरी प्रेमभक्तीची शाब्दिक का होईना, पण अतिशय भावमधुर अशी अनुभूती घेतलेली आहे व नेहमीच घेत असतो.
काही लोक जेव्हा या परमश्रेष्ठ विभूती विषयी ' ती मीरा ' अशा एकेरी उल्लेखाने बोलतात किंवा त्यांच्या चरित्राविषयी काही अनुदार उद्गार काढतात; तेव्हा खरंच त्यांच्या अल्पबुद्धीची कीव येते. श्री मीराबाईंसारख्या संतांचा परमादरपूर्वक उल्लेख करणे किंवा त्यांचे स्मरण होणे, हे आपल्या कैक जन्मांच्या पुण्याचे सुफलितच म्हणायला हवे. कोणत्याही संतांचा झोपेतही असा अनादराने उल्लेख होऊ नये, म्हणून आपण सर्वांनीच सतत काळजी घेतली पाहिजे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीसंत मीराबाईंच्या विषयी एक अप्रतिम दृष्टांत देत असत. ते म्हणत, "एखादा खूप प्रख्यात शिल्पकार असावा, त्याने जीव लावून आपली अजोड कलाकृती निर्माण करावी, की तशी पुन्हा होणार नाही; बघणा-यांना वाटावे की ही आपल्याच सुखासाठी केलेली आहे, म्हणून सगळ्यांनी आनंदाने ती शिल्पकृती पाहावी. आणि अशी अप्रतिम कलाकृती करणा-या शिल्पकाराला शोधायला जावे तो लक्षात यावे की शिल्प म्हणून स्वत: शिल्पकारच तेथे बसलेला आहे ! असे त्या मीराबाईंचे आयुष्य आहे. श्रीभगवंतांनी मीराबाईंच्या रूपाने अजोड कृती करून ठेवलेली आहे. त्यांच्या रूपाने अलौकिक लीलाच घडवलेली आहे !"
अनुत्तरभट्टारिका, व्रजनंदिनी महारासेश्वरी श्रीकृष्णप्रिया श्री श्री मीराबाईंच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त सर्वांच्या वतीने सादर साष्टांग दंडवत !
अभंग आस्वाद - भाग नववा मधील पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या अतिशय गोड काव्यमय अर्पणपत्रिकेच्या रूपाने आपणही महाभगवती श्री मीराबाईंच्या चरणीं प्रेमपसायाची सादर प्रार्थना करू या.
चंद्र कृष्णप्रभू, मीरा चंद्रिका ।
आराधित प्रभू, मीरा राधिका ॥१॥
मीरा गिरिधर, अंगे अद्वय ।
अवीट सुखाचे, लीला आलय ॥२॥
मधुर रतीचे, ओघ अनादी ।
शरण अमृता, राखावे पदीं ॥३॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
[ वर उल्लेख केलेले ग्रंथ 30% सवलतीत मिळवण्यासाठी श्रीवामनराज प्रकाशन, पुणे यांच्या ©02024356919 या क्रमांकावर संपर्क करावा. ]
धन्यवाद
ReplyDelete🙏.. 🌹
ReplyDeleteफारच सुंदर आणि माहितीपुर्ण साइट आहे.
ReplyDeleteमच्छिंद्र माळी औरंगाबाद.
शिल्प अणि शिल्पकार या गोष्टीतून संत मिराबाई आणि भगवान श्रीकृष्ण यांचं अद्वैत अप्रतीम वर्णन केलत
ReplyDeleteया संतश्रेष्ठ विभुतिला साष्टांग नमस्कार
खुप सुंदर
ReplyDeleteधन्य
ReplyDeleteदत्त
ReplyDeleteखुपच छान ! अद्वितीय!
ReplyDeleteखुप सुंदर
ReplyDelete