29 Aug 2018

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् -तृतीय पुष्प


तृतीय पुष्प
भगवान सद्गुरु श्री माउलींचे जीवन आणि कार्य हाच मुळात एक अत्यंत अद्भुत आणि ज्याची आपण कधीच कल्पनाही करू शकणार नाही असा विलक्षण चमत्कार आहे. अवघ्या एकवीस वर्षे तीन महिने आणि पाच दिवस एवढ्या छोट्या कार्यकालात त्यांनी अक्षरश: युगानुयुगे पुरून उरेल एवढे अद्भुत कार्य करून ठेवलेले आहे.
सद्गुरु श्री माउलींची वाङ्मयी श्रीमूर्ती असणारी श्री ज्ञानेश्वरी हा जागतिक आध्यात्मिक वाङ्मयातला सर्वांगपरिपूर्ण आणि एकमेवाद्वितीय ग्रंथराज आहे. असा अद्भुत ग्रंथ दुसरा नाही. आज साडेसातशे वर्षे झाली तरीही अक्षरश: लाखो साधक-अभ्यासक या ग्रंथदीपाच्या स्निग्ध-शीतल ब्रह्मप्रकाशात आपली वाङ्मयीन आणि आध्यात्मिक वाटचाल सुयोग्यपणे करीत आहेत व पुढेही करीत राहतीलच !
हा 'गुरुवतीचा ठावो' असणारा महान ग्रंथराज माउलींच्या कृपेचे वैभवच आहे. हा नुसता ग्रंथ नाही तर अपरंपार बरसलेला माउलींचा कृपामेघच जणू ! कनवाळू सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या आज्ञेने, कळिकाळरूपी ज्वराने पीडित झालेल्या श्रद्धावान जनांबद्दलच्या अपार कळवळयाने, त्यांना त्या भयानक पीडेतून कायमचे मुक्त करण्यासाठी सर्व प्रकारांनी धावा करून माउलीरूप कृपामेघ घनघोर बरसला; तोच हा ग्रंथ होय ! म्हणून, माउलींची कृपाच याच्या शब्दाशब्दांतून मूर्त झालेली आहे. जो या कृपावाणीचा आश्रय घेईल, तो आज ना उद्या पूर्ण व्याधिमुक्त होऊन, ब्रह्मानंदाची सुखानुभूती घेईलच !
कायावाचामनपूर्वक सर्वभावे शरण आलेल्या भक्ताला स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट करण्याचे अमोघ सामर्थ्य अंगी बाळगणारी ही भावार्थदीपिका, सद्गुरु श्री माउलींसारखीच कृपावत्सल आहे, मायाळू आहे. अहो, तिला प्रेमभराने नुसते मस्तकस्पर्शपूर्वक वंदन केले आणि छातीशी कवटाळले ना, तरी तिचा प्रेमपान्हा पाझरू लागतो हो. तिला लेकुरवाचेने 'आई' 'माय' म्हणून घातलेली साद पुरेशी होते. भुकेने व्याकूळ झालेल्या लेकराने जवळ येऊन मागायचा अवकाश, लगेच ही मायमाउली त्याला पदराखालीच घेते. तिला तरी कुठे राहवते हो ! मग सुरू होतो तो दैवी पीयूषपान्हा, माधुर्यालाही मधुरता प्रदान करणारा प्रेमसंपृक्त दुधाचा अविरत प्रवाह..... किती प्याल तेवढा प्या ! कधीच अजीर्ण होत नाही त्याचे. आणि त्या अमृतस्तन्याची तृप्ती ? शब्दांत नाही सांगता येणार एवढी ! पण आम्हांला तशी व्याकूळ भूकच लागत नाही, हे आमचे दुर्दैव.
http://rohanupalekar.blogspot.in ]
सद्गुरु श्री माउलींना जरी आपण प्रत्यक्ष पाहू शकत नसलो, तरी त्यांचे वाङ्मयरूप तर आपण सदैव पाहू, वाचू, अनुभवू शकतोच की ! हे भाग्य किती थोर आहे आपले. करुणाभगवती श्री ज्ञानदेवीचे स्मरण, वंदन, वाचन, मनन आणि चिंतन हे जणू त्या ज्ञानमाउलीच्या प्रेमअंकावर बसून आपण केलेल्या लडिवाळ खोड्याच तर आहेत. आता लेकराने नाही करायच्या तर कोणी करायच्या खोड्या ? पण ही खोडी जन्माचीच खोड घालवणारी आहे बरं का !
आणि आमची ही माउली इतकी प्रेमळ आहे की, ती आपल्या अबोध लेकरांना हाका मारूमारून बोलावून घेते नि मांडीवर बसवून त्यांचे भरभरून कोडकौतुक करते, हवे ते व हवे तेवढे लळे पुरवते. विश्वास बसत नाही ? मांडीवर बसायचा प्रयत्न तरी करून पाहिलाय की नाही कधी ? नसेल तर वाट कशाची पाहता ? आजचाच मुहूर्त साधा की !!
श्री माउली हेच चालता-बोलता चमत्कार आहेत, त्यापुढे आपली मती, गती पूर्णपणे कुंठितच होते.
येथे केवळ शरणागतिपूर्वक साष्टांग दंडवतच योग्य आहे आणि तेच आपल्या सर्वांचे परम परम परम भाग्यही आहे !!
सद्गुरु श्री माउलींचे असेच लडिवाळ लेकरू होण्याचे सद्भाग्य लाभलेल्या श्रीसंत जनाबाई महाराज म्हणूनच म्हणतात,
भाव अक्षराची गांठी ।
ब्रह्मज्ञानाने गोमटी ॥१॥
ते हे माय ज्ञानेश्वरी ।
संतजनां माहेश्वरी ॥२॥
ज्ञानेश्वर मंगळ मुनी ।
सेवा करी दासी जनी ॥२६६.३॥
"आमच्या माउलींचे स्वरूप असणा-या या ज्ञानेश्वरीला भाव धरून शरण गेले की अक्षर अशा परमात्म्याची गाठ पडते व गोमटे असे ब्रह्मज्ञान होते. म्हणूनच या ज्ञानेश्वरीला संतजनांनी साक्षात् माहेश्वरी, प्रभू श्रीमहेशांची अर्धांगिनी अशी कृपाशक्तीच मानलेली आहे. तीच सगळ्यांची प्रेमळ माता आहे. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे जगाचे मंगल करण्यासाठी, कल्याण करण्यासाठीच अवतरलेले महामुनी आहेत. म्हणूनच मी जनी, त्यांची ( व त्याच्या ज्ञानेश्वरीची ) दासी होऊन सतत त्यांच्या स्मरणातच त्यांची जमेल तशी, जमेल तेवढी व जमेल ती सर्व सेवा करीत असते !"
आता प्रत्यक्ष श्रीसंत जनाबाईच 'काय करायला हवे' ते येथे स्पष्ट सांगताहेत म्हटल्यावर, आपण तरी वेगळे काही करण्याच्या नसत्या फंदात कशाला पडावे बरे ?
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
महाराज ज्ञानेश्वरमाउली । महाराज ज्ञानेश्वरमाउली । महाराज ज्ञानेश्वरमाउली ।


4 comments:

  1. माऊली,माऊली,ज्ञानेश्वर माऊली!!!

    ReplyDelete
  2. Dnyaneshwar आणि Dnyaneshwari माउलिना साष्टांग दंडवत

    ReplyDelete
  3. संत एकनाथ आणि संत जनाबाई तसेच त्यांचे सद्गुरू संत ज्ञानोबा राय यांना शतशः दंडवत

    ReplyDelete