29 Jun 2017

साठवणीतलीवारी_३

लागला टकळा पंढरीचा
वारी म्हणजे काय? परमाराध्य भगवान श्री माउलींच्या शब्दांत सांगायचे तर "सुखाची मांदुस" आहे वारी ! अपरंपार आनंदाचे हे गावच्या गाव मजल दरमजल करीत भूवैकुंठ पंढरीला निघालेेले आहे. त्या आनंदाच्या कल्लोळातला खरा ब्रह्मानंद आहेत साक्षात् भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज; पादुकारूपाने विसावलेला चैतन्याचा जिव्हाळा, कैवल्याचा पुतळा, कोवळिकेचा मळा, प्रेमाचा कळवळा ..... माझा ज्ञानोबा  !!!
जगात सर्वजण आनंदाकडे, आनंदासाठीच सतत धावत असतात. तो सापडतोच असे नाही. सापडला तर पूर्णपणे भोगताही येत नाही. कधी हातून निसटून जातो कळत देखील नाही. पण आमचा हा दैवी ब्रह्मानंद? अहो, हा स्वत:च सर्व सवंगड्यांना घेऊन आपल्या दारी येतो, आपल्या पाठी लागतो, मला पाहा, मला अनुभवा, माझा भोग घ्या, माझा आस्वाद घ्या असे म्हणत. हा माउलीरूप कैवल्यचंद्राचा अम्लान चांदणबहार पुरे म्हणायला उरत नाही आणि हवा म्हणून सरत नाही. याच वैकुंठीच्या अमृत-परगुण्याला आमच्या भगवान सद्गुरु श्री माउलींचा पालखी सोहळा म्हणतात. येथे येऊन जो प्रेमाने या महाप्रसादाच्या पानावर बसेल, तो देवदुर्लभ तृप्ती अनुभवूनच समाधानाच्या हाती आंचवतो. पण ही अनुभूती मात्र त्या सद्गुरु श्री माउलींच्याच कृपेने येते बरं का. ती कृपा झालेली नसेल तर मग वारीचा खरा आनंद काही जाणवतच नाही. वारी ही मग निव्वळ एक यात्राच होऊन बसते, तीही नाना कटकटींची. 
हे कैवल्याचे अलौकिक साम्राज्य जेव्हा आमच्या फलटणमधे विसावते ना, तेव्हाची स्थिती अवर्णनीयच असते. "ऐसा सुखसोहळा स्वर्गीं नाही" म्हणत आम्ही माउलींच्या स्वागतासाठी, खरेतर अपार विरहाने कातर होऊन माय-भेटीसाठी आसुसलेलो असतो. कधी एकदा ती त्रिभुवनपावन मायमाउली दृष्टीस पडते आणि सर्वस्वाचे बंधन तोडून, धावत जाऊन तिला मिठी मारून तिच्या मृदुमृदुल प्रेमअंकी बसतोय, अशीच मनाची कातर स्थिती होऊन जाते.
माझ्या लाडक्या माउलीलाही मला भेटण्याची अशीच उत्सुकता असेल का? हा प्रश्न अनाठायी असला, तरी क्षणभर येतोच हो मनात. ती नुसती लौकिक माय नाही, माउली पण आहे ना ! ती आपल्या कोणत्याही बाळाला कधीतरी विसरेल का? त्यात एखादे पोर अपंग असेल तर तिचा कळवळा अधिक पान्हावतो त्याच्यासाठी. शिवाय "तुका म्हणे जे येथे । तेथे तैसेचि असेल ॥" हा तर तिचा स्थायीभावच. हा विचार आला की मन शांत होते व पुन्हा तिच्या प्रेमात आणि त्या निरपेक्ष प्रेमाच्या मनावर गोंदलेल्या हळव्या आठवणीत मग्न होऊन जाते. या अशाश्वत जगातला हाच खरा शाश्वत सुखाचा विसावा; नाही का?
मी पहिल्यांदा वारीला गेलो १९९६ साली, दहावी झाल्यावर; तेही फलटणपासून पंढरपूरपर्यंत. पण त्याआधी माउलींचा फलटणचा मुक्काम एवढाच त्यांच्याशी, वारीशी माझा संपर्क होत असे. त्यामुळे माउली येणार म्हटले की तो दिवस शेकडो दिवाळी दस-यांसारखा वाटायचा. श्रीमंत बाळमहाराजांबरोबर दोनदा प्रस्थानाला तेवढा मी गेलो होतो. पण वारी सुरू झाल्यापासून दररोज न चुकता सकाळ मधील वारीची प्रत्येक बातमी मी अधाशासारखी वाचत असे. त्यावेळी आजच्या सारखा टीव्ही चॅनेल्सना वारीचा छंद लागलेला नव्हता, पण पेपरमध्ये मात्र माउली आणि तुकोबांच्या पालख्यांचे सविस्तर वृत्त येत असे. त्यावरच आम्ही तहान भागवायचो. सकाळी शिकवणीवरून आलो की, आधी पेपर ताब्यात घेऊन मी आमच्या स्वयंपाकघरातील ओट्यावर फतकल मारून बसायचो व नाष्टा करत करत बातम्या वाचून काढायचो. तेवढ्यानेही मी त्याच सोहळ्यात असल्याची अनुभूती मला येई.
भगवान श्री माउलींची पालखी आषाढ शुद्ध तृतीयेला फलटण मुक्कामी असते. काहीवेळा तिथीच्या वृद्धीमुळे दोन मुक्काम पडत असत. मग काय जास्तच मज्जा. तृतीयेला सकाळी केंदूरच्या श्रीसंत कान्हूराज पाठक महाराजांची पालखी आमच्या माउलींच्या मंदिरात येई. त्यांचे थोडावेळ भजन होई व मग ते पुढे निघून जात. त्यांचा सुंदर नक्षीकाम केलेला लाकडी रथ पहायला मला खूप आवडायचा. मी त्यांची दिंडी मंदिरात आली की धावत जाऊन दर्शन घेऊन यायचो. हे श्रीसंत कान्हूराज महाराज माउलींच्या काळातील, नागेश संप्रदायातील फार थोर विभूतिमत्व होते. माउली त्यांना प्रेमादराने 'काका' म्हणत असत म्हणजे पाहा. त्यांच्या हकिकती खूप जबरदस्त आहेत, पण त्यावर पुन्हा कधीतरी लिहीन. सद्गुरु माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात द्वादशीला सर्व संतमांदियाळी समोर त्यांची कीर्तनसेवा झाली होती, अशी नोंद सापडते. 
आपल्या मर्यादित मानवी, लौकिक प्रेमाला कधीच समजू शकणार नाही अशा; प्रेमाच्या अत्युच्च स्तरावरील या माउलीप्रेमाचा अगदी किंचित, कणभर स्पर्श सद्गुरुकृपेने लाभलाय. तेवढाच मला स्वर्गसुखाची अनुभूती सतत देतो आहे. माउलींनी आपल्या या प्रेमकृपेच्या मधाचे बोट लावून आजवर किती जीवांना वेडावून सोडलंय, कायमचे अंकित करून ठेवलंय, हे तेच एक जाणतात ! पण ही संख्या कोणत्याच गणिताच्या आवाक्यातली नाही, हे मात्र नक्की. आणि हेच वारीत समक्ष जाणवते. हे माउलींचे वेडेपण फार फार अद्भुत आणि हवेहवेसे वाटणारे आहे.
सद्गुरु श्री माउली दुपारी चार-साडेचारला वडजलचा विसावा घेऊन आमच्या तांबमाळावर येत. तत्पूर्वी मी तेथे जाऊन थांबत असे. रस्त्याच्या कडेला उभा राहून समोरून जाणारा वारक-यांचा मेळा पाहताना खूप आनंद होत असे. मी कधी असा वारीला जाईन? याचेच विचार मनात सतत तरळत असत. फार फार हेवा वाटायचा मला त्या पुण्यवान वारक-यांचा. अजूनही वाटतो !
सद्गुरु माउलींची पालखी आली की दर्शनासाठी गर्दी उसळायची. मी श्री.सुभाषराव शिंदे यांच्याबरोबर रथात चढून देवांना वंदन करायचो. पूजा झाल्यावर खाली उतरून मग मी पालखीबरोबर चालायला सुरुवात करी. तिथून फलटण चार-पाच किलोमीटर असल्याने साधारण दोन तासांत आम्ही पोहोचायचो. दोन तीन वर्षे असे नुसते चालल्यावर मी तळावर पालखीला खांदा द्यायलाही लागलो. पालखीला खांदा देणे हे माझ्यासाठी 'मर्मबंधातली ठेव'च आहे. या खांदा देण्यातले सुद्धा असंख्य अनुभव माझ्यापाशी आहेत. एक मोठा स्वतंत्र लेखच त्यावर होऊ शकेल.
पालखीला खांदा दिल्याची एक खूण उजव्या खांद्यावर उमटते. तशी छोटीशी खरचटलेली जखम माझ्याही खांद्याला व्हायची. ही हवीहवीशी वाटणारी हळवी खूण पुढे कित्येक दिवस श्री माउलींची तीव्र आठवण करून देत असे. खोटं सांगत नाही, त्या जखमेचा फार अभिमान वाटायचा मला आणि त्यामुळेच मी वारंवार त्या जखमेला गोंजारतही असे.
अहो, कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट या पालखीमध्ये प्रत्यक्ष बसलाय. राजा चाले तेथे वैभव सांगाते । असे म्हणतात. ते खरेही आहे. भगवान माउलींबरोबर त्यांचा सारा दृश्य-अदृश्य वैष्णवमेळाही आहेच. विठुरायाच्या प्रेमाने भारलेल्या, निरंतर आनंदाने बहरलेल्या माझ्या या सर्व हरिमय बांधवांना सादर वंदन. आणि तुम्हां-आम्हां सर्वांचेच परमाराध्य असणा-या महाभागवतोत्तम भगवान सद्गुरु श्री ज्ञानराज माउली महाराजांच्या नित्यश्रीर्नित्यमंगल श्रीचरणारविंदी अनंतानंतकोटी दंडवत प्रणाम  !!!!!
रोजच्या चालीने शिणवटा येतोच. त्यात असंख्य भक्तांची काळजी देखील वाहायची म्हणजे मग किती काम करावे लागत असेल? आमच्या या परमसुकोमल ज्ञानमाउलीला आमच्याचसाठी किती ते श्रम करावे लागतात नाही ! चला आपण सर्व मिळून आज मुक्कामी पोचल्यावर तिच्या श्रीचरणांना तेल लावून प्रेमाने मर्दन करू या आणि छान गरम पाण्याने शेकून तिचा सगळा शिणवटा दूर करू या. म्हणजे मग तिला शांत झोप लागून उद्याच्या प्रवासासाठी माउली ताजीतवानी होईल. आणि पुन्हा, "माझे जीवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥" म्हणत आपणही आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवत, तिच्यासोबत भूवैकुंठ पंढरीकडे मार्गक्रमण करू. 
माउलीराया, माझ्या तोडक्या मोडक्या, प्रेम-मायेची धड गादी उशीही नसणा-या आणि जर्जर झालेल्या हृदयमंचकावर शांत झोप येईल ना हो आपल्याला? आपल्याच कृपेने जशी जमेल तशी सेवा करतो आहे, गोड मानून घ्यावी, हीच लेकुरवाचेने कळकळीची प्रार्थना  !
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.in )

25 Jun 2017

श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

आज आषाढ शुद्ध द्वितीया, श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे महाराजांची १०३ वी जयंती. यावर्षी पू.मामांची तिथी व तारीख दोन्ही एकच आलेले आहेत. आजच्याच तिथीला, आजच्याच तारखेला १९१४ साली त्यांचा जन्म झाला होता.
आजच्या दिनाचे औचित्य साधून, पू.मामांचे चरित्र व त्यांचे वारीविषयक चिंतन यावर आधारलेला एक लेख दै.ऐक्य मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. त्याची लिंक सोबत देत आहे. कृपया सर्वांनी हा लेख आवर्जून वाचावा व प.पू.मामांच्या श्रीचरणीं श्रद्धासुमनांजली समर्पित करावी ही विनंती.
लेखाची लिंक -
http://www.epapergallery.com/DainikAikya/25Jun2017/Normal/Zumbar/page4.htm

24 Jun 2017

भावार्थ करुणात्रिपदीचा

शांत हो श्रीगुरुदत्ता
आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, सद्गुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज तथा श्री थोरले महाराज यांची पुण्यतिथी. श्री थोरले महाराज हे प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच होते. त्यांचे चरित्र व कार्य अत्यंत अद्भुत आणि विस्मयकारक आहे. ( त्यांच्या चरित्राविषयी आज पुन्हा लिहीत नाही, माझ्याच एका लेखाची लिंक देत आहे, त्यावर थोडक्यात चरित्र वाचायला मिळेल.)


प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे वाङ्मय अतिशय अलौकिक आहे. त्यांची स्तोत्रे, त्यांचे ग्रंथ हे श्रीदत्तसंप्रदायाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. श्रीदत्त संप्रदायाचे समग्र तत्त्वज्ञान व उपासना पद्धती या मंत्ररूप ग्रंथांमधून स्वामीमहाराजांनी लीलया प्रकट केलेली आहे. आजवर लाखो भाविकांनी याच्या अनुसंधानाने भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंची परिपूर्ण कृपा प्राप्त करून घेतलेली आहे व पुढेही अनंतकाळपर्यंत प्राप्त करून घेतीलच.
परवाच डॉ.मलिक नावाच्या एका अमराठी भाविकाने संपर्क केला व विचारले की, "तुमचा ' करुणात्रिपदीची जन्मकथा ' हा लेख वाचला. ती कशी रचली गेली हे समजले, पण करुणात्रिपदी या सुंदर रचनेचा पूर्ण अर्थ मिळू शकेल का?" त्यांनी असे विचारल्यावर माझ्या मनात विचार आला. अरेच्चा, आजवर कुठे ह्या रचनेचा अर्थ वाचलाच नाही आपण. एकतर तुम्हां आम्हां मराठी लोकांना श्रीगुरुचरित्राचा परिचय असल्याने; व ही रचना मराठीतच असल्याने तिचा अर्थ उपलब्ध असावा असे कधी आपल्याला वाटलेच नसावे. पण अमराठी लोकांना ती नक्कीच अडचण वाटत असणार. तेव्हा या सज्जनांच्या रूपाने जणू श्री स्वामी महाराजांनीच ही सूचना केली आहे, असे मनापासून वाटले. म्हणून आजच्या श्री टेंब्येस्वामी महाराजांच्या १०३ व्या पुण्यतिथीला, करुणात्रिपदीचाच पूर्ण भावार्थ या लेखनसेवेद्वारे त्यांच्या श्रीचरणीं समर्पित करीत आहे.
( ' करुणात्रिपदीची जन्मकथा ' हा लेख या लिंकवर वाचता येईल. )


प.प.श्री.थोरले महाराज भगवान श्रीदत्तप्रभूंची विनवणी करताना पहिल्या पदात म्हणतात,
शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां ॥ ध्रु.॥
तूं केवळ माता जनिता, सर्वथा तूं हितकर्ता । तूं आप्तस्वजन भ्राता,
सर्वथा तूंचि त्राता । भयकर्ता तूं भयहर्ता, दंडधर्ता तूं परिपाता ।
तुजवांचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥१॥
अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था । तरि आम्हीं गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा । तूं तथापि दंडिसि देवा,  कोणाचा मग करुं धावा । सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥२॥
तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी । पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि न च संतापी ।
गच्छतः स्खलनं क्वापि, असें मानुनी नच होऊ कोपी । निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ॥३॥
तव पदरीं असता ताता, आडमार्गीं पाउल पडतां । सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता । निज बिरुदा आणुनि चित्ता, तूं पतितपावन दत्ता । वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तू गुरुनाथा ॥४॥
सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हें घरदार । तव पदी अर्पूं असार । संसाराहित हा भार । परिहरिसी करुणासिंधो, तूं दीनानाथ सुबंधो ।
आम्हां अघलेश न बाधो । वासुदेव प्रार्थित दत्ता ॥५॥
श्रीनृसिंहवाडीच्या पुजा-यांच्या मनमानी कारभारावर कोपाविष्ट झालेल्या श्रीदत्तप्रभूंची करुणा भाकताना स्वामी महाराज म्हणतात, "हे श्रीगुरु दत्तराया, आपण नेहमी शांतच असता. आपल्याला क्रोध येणे संभवतच नाही. पण भक्तांच्या हितासाठी आपण धारण या कृतक कोपाने माझ्या मनाला अस्वस्थता आलेली आहे, तेवढी घालवून आपण मला शांती प्रदान करावी ॥ध्रु.॥
( प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी एका प्रवचनात फार मार्मिक सांगितले होते की, करुणात्रिपदीमधील 'शांत हो श्रीगुरुदत्ता' मध्ये, 'अहो शांत श्रीगुरुदत्ता' असाच अधाहृत पाठ आहे. तेथे 'शांत' हे श्रीदत्तप्रभूंचे विशेषण आहे. स्वभावत:च जे नित्यशांत आहेत, त्यांना आणखी कशाला बरे स्वामी महाराज शांत व्हा म्हणतील? )
देवा, आपणच आमची माता आहात, आम्हांला जन्माला घालणारे जनितेही आपणच आहात. आपणच आमचे सर्व बाजूंनी हित करणारे आमचे आप्त, जवळचे नातेवाईक, सगेसोयरे, आमचे वाडवडील, बंधू
आणि आमचे रक्षणकर्ते आहात. प्रसंगी आम्ही नीट वागावे म्हणून भय दाखविणारे व ती सुयोग्य जाणीव झाल्यावर ते भय हरण करणारेही आपणच आहात. म्हणूनच तुम्ही दंड धारण केलेला आहे. शिवाय तो दंड आमच्या संकटांचा, शत्रूंचा नाश करण्याच्या आपल्या लीलेचा द्योतकही आहे. म्हणूनच श्रीदत्तराया, तुमच्याशिवाय आम्हांला अन्य कोणीही माहीतच नाही. देवा, आपणच आमच्यासारख्या आर्तांचे एकमात्र आश्रय आहात. ॥१॥
हे दयाळू भगवंता, आपण चुकलेल्यांना अपराधांची शिक्षा देण्यासाठीच हा दंड हाती धरलेला आहे. हे जरी यथार्थ असले तरी आम्ही अपराधी भक्त, आमच्या चुकांची कबूली देऊन, तुमची यशोगाथा गाऊन तुमच्या चरणीं मस्तक नमवून करुणा भाकत आहोत. तरीही आपण आम्हां अज्ञ लेकरांना दंड देणार असाल, तर मग आम्ही कोणाचा धावा करावा? तुमच्याशिवाय आम्हांला संकटांमधून सोडवणारे कोण आहे दुसरे? ( एरवी तुम्हीच आम्हांला सर्व संकटांमधून बाहेर काढता, आता जर तुम्हीच संकट रूपाने समोर उभे ठाकलात तर आम्ही बापुड्यांनी जायचे कुठे? ) ॥२॥
हे दत्तात्रेयप्रभो, आम्ही सुधारावे म्हणून आपण नटाप्रमाणे क्रोधाचा आवेश आणून आम्हां पापी जीवांना एकवेळ दंड द्याल. पण आम्ही अज्ञानी, संसारी जीव पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करणार. तेव्हा आपण आम्हांवर असे रागावू नका. पडून पडून आम्ही जाणार कुठे? तुमच्याच चरणांवर पडणार ना? तेव्हा आमच्यावर आता आपण निजकृपेचा वर्षाव करावा हीच आमची कळकळीची प्रार्थना आहे. ॥३॥
हे पतितपावना, आपल्या पदांचा एकदा का आश्रय घेतला, की समजा चुकून आडमार्गावर पाउल जरी पडले, तरीही आम्हांला त्या परिस्थितीतून सांभाळून सुखरूप पुन्हा आपणच योग्य मार्गावर आणता. हेच आपले भक्तवात्सल्याचे अलौकिक ब्रीद आहे. तेव्हा आता त्याच आपल्या ब्रीदाची आठवण काढून, हे करुणाघन गुरुनाथा, आपण आपला कोप सोडून पुन्हा आमच्यावर कृपावंत व्हावे. ॥४॥
सहकुटुंब, सहपरिवाराने, अवघ्या घरादाराने आम्ही आपलेच दास आहोत. आपल्याच श्रीचरणीं आम्ही आमचा हा असार संसारभार, आमची सर्व कर्मे अर्पण केलेली आहेत. त्या कर्मांच्या जडभाराचा परिहार करून, हे करुणेच्या सागरा, दीनानाथा, आमच्या उत्तम बांधवा, हे दत्तात्रेयप्रभो, आपण आमचे ते सर्व पाप हरण करावे. त्या पापांच्या लवलेशानेही आमच्या सेवेत इथून पुढे कसलीही बाधा आणू नये, हीच कृपा आम्हां दीनदासांवर आता आपण करावी, अशी मी 'वासुदेव' आपल्याला प्रार्थना करीत आहे. ॥५॥
श्रीदत्तात्रेयप्रभूंची अशी कळकळीने प्रार्थना करूनसुद्धा ते कृपावंत होतील की नाही, अशी शंका वाटल्याने, आता दुस-या पदात श्री स्वामी महाराज त्यांना त्यांच्याच श्री नृसिंह सरस्वती अवतारातील लीलांचा दाखला देऊन पुन्हा विनवणी करताना म्हणतात,
श्रीगुरुदत्ता जय भगवंता, तें मन निष्ठुर न करी आतां ॥ध्रु.॥
चोरें द्विजासी मारितां मन जें, कळवळलें तें कळवळो आतां ॥१॥
पोटशुळानें द्विज तडफडतां, कळवळले ते कळवळो आता ॥२॥
द्विजसुत मरतां वळलें तें मन, हो की उदासीन न वळे आतां ॥३॥
सतिपति मरता काकुळती येतां, वळले ते मन न वळे कीं आतां ॥४॥
श्रीगुरुदत्ता त्यजिं निष्ठुरता कोमल चित्ता, वळवी आता ॥५॥
हे भगवंता श्रीगुरु दत्तात्रेया, तुमचे मन असे निष्ठुर करू नका. ॥ध्रु.॥
पूर्वी तुमचा भक्त असणा-या वल्लभेश द्विजाला जेव्हा चोरांनी मारले, तेव्हा तुमचे जे मन कळवळले तेच आताही आमच्यासाठी कळवळो. ॥१॥
वासर क्षेत्री असह्य पोटदुखीने व्याकूळ झालेल्या, तडफडणा-या द्विजाला पाहून जे मन कळवळे तेच आताही कळवळो. ॥२॥
शिरोळ ग्रामीच्या गंगाधर द्विजाचा तुमच्याच कृपेने जन्मलेला लहान मुलगा धनुर्वाताने मेल्यावर जे कळवळले, तेच तुमचे मन आता का बरे आमच्याविषयी उदासीन होऊन कळवळा दाखवत नाहीये? ॥३॥
माहूरच्या गोपीनाथांच्या दत्त नामक पुत्राच्या पत्नीने, त्याच्या मृत्यूमुळे काकुळतीला येऊन प्रार्थना केल्यावर, जे मन करुणेने कळवळले, तेच आता का बरे आमच्यावर कृपा करीत नाहीये? ॥४॥
श्रीगुरु दत्तात्रेयप्रभो, आपण आम्हां दीनदासांविषयीची आपली ही निष्ठुरता त्यागावी व आपल्या कोमल चित्ताने आमच्यावर पुन्हा  करुणाकृपा वर्षवावी, हीच कळकळीची प्रार्थना. ॥५॥
या दोन पदांमधून करुणा भाकल्यावर आता श्री स्वामी महाराज तिस-या पदामध्ये, श्रीदत्तप्रभूंच्या करुणामय स्वरूपाला कळवळून साद घालून निर्वाणीची प्रार्थना करताना म्हणतात,
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥ध्रु.॥
निजअपराधें उफराटी दृष्टी ।
होऊनि पोटीं भय धरू पावन ॥१॥
तूं करुणाकर कधी आम्हांवर ।
रुससी न किंकरवरद कृपाघन ॥२॥
वारी अपराध तूं मायबाप ।
तव मनी कोप लेश न वामन ॥३॥
बालकापराधा गणे जरि माता ।
तरी कोण त्राता देईल जीवन ॥४॥
प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव ।
पदी देवो ठाव देव अत्रिनंदन ॥५॥
माता अनसूयेचे सुपुत्र असणा-या, आपल्या निजभक्तांचे जीवन असणा-या करुणाघन श्रीदत्तप्रभूंचा जयजयकार असो. हे जनार्दना, आपणच आता आमचे रक्षण करावे. ॥ध्रु.॥
आमच्याच अपराधांमुळे आम्ही खजिल होऊन भयभीत झालेलो आहोत. आता दृष्टी वर करून आपल्याकडे पाहण्याची हिंमत देखील राहिलेली नाही आमची. ( त्यामुळे आम्ही मान खाली घालूनच उभे आहोत.) ॥१॥
हे दासांना वर देणा-या करुणाकर दत्तदेवा, कृपेचे मेघ असणारे आपण आमच्यावर कधीच रुसणे शक्य नाही. ( आपण आमच्यावर असे रुसू नये.) ॥२॥
हे मायबापा, आमच्याविषयीचा कोपलेश बाजूला सारून, आम्हांला आपले अपत्य मानून आमचे सर्व अपराध आता आपणच घालवा. हे दयामय वामना, मी आपल्या चरणी मनोभावे प्रार्थना करतोय. ॥३॥
अहो देवा, मातेनेच बालकाचे अपराध मानले, तर मग त्या अजाण बालकाला कोण जीवन देणार? त्याचे रक्षण कोण करणार? ॥४॥
हे देवा अत्रिनंदना, हा 'वासुदेव' आपल्या श्रीचरणीं प्रेमादराचा भाव विदित करून प्रार्थना करतो की, आपण सदैव आपल्या चरणींच मला ठाव द्यावा, मजवर कृपा करून मला कायमचे आपल्याच सेवेमध्ये रत ठेवावे. ॥५॥
सद्गुरु श्री थोरल्या महाराजांची करुणात्रिपदी हे अत्यंत प्रासादिक असे अजरामर प्रार्थनाकाव्य आहे. आजवर लाखो भक्तांनी या त्रिपदीच्या अनुसंधानाने भगवान श्रीदत्तप्रभूंच्या करुणाकृपेची अद्भुत प्रचिती घेतलेली आहे. श्री स्वामी महाराजांनी या तीन पदांमधून श्रीदत्तप्रभूंच्या करुणाप्राप्तीचा राजमार्गच तुम्हां आम्हां भाविकभक्तांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे यात शंका नाही. तेव्हा आजच्या पावन दिनी या अलौकिक करुणात्रिपदीचे अनुसंधान करून, श्री स्वामी महाराजांच्या शब्दात श्रीदत्तचरणीं कायमचा ठाव देण्याची श्रीगुरुचरणीं प्रेमप्रार्थना करू या !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.)


21 Jun 2017

साठवणीतलीवारी२

लागला टकळा पंढरीचा
वारीच्या वाटेवरील गावात माझे बालपण गेले, हा माझ्यावरचा भगवान श्री माउलींचा खूप मोठा उपकारच आहे. कारण त्यामुळेच नकळत माउली व त्यांची वारी जीवनात आले व पुढे कायमचेच अविभाज्य घटक होऊन राहिले ! फलटण गावाच्या मध्यवर्ती भागात लक्ष्मीनगर वसलेले आहे. त्यात श्रीसंत उपळेकर महाराज पथावर आमचे घर आहे. घरासमोरच भगवान श्री माउलींचे मंदिर आहे आणि त्याला लागूनच प.पू.डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे समाधिमंदिर आहे. माझे सगळे बालपण याच दोन्ही मंदिरात गेलेले आहे. इतके की मी सकाळी उठल्यावर माउलींच्याच मंदिरात माझा फुटबॉल घेऊन एकटाच खेळायला जात असे. दोन्हीकडून पळत पळत जाऊन आपणच बॉल मारायचा,असा माझा खेळ चाले. माझा दिवसातला जास्तीतजास्त वेळ या दोन्ही मंदिरांमध्येच जात असे.
हे माउलींचे मंदिर प्रशस्त असून त्यात माउलींची खूप सुंदर संगमरवरी मूर्ती आहे. अशी मूर्ती इतरत्र कुठेही नाही. फलटणच्या राणीसाहेब कै.श्रीमंत लक्ष्मीदेवी मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी हे मंदिर बांधले. त्याची हकिकतही मोठी गोड आहे.
राणीसाहेबांच्या पर्यंत जवळपास सात पिढ्या निंबाळकर राजघराण्यात औरसपुत्र कधी जगलाच नाही. सात आठ पिढ्या दत्तकपुत्रच राजगादीवर बसे. पुढे प.पू.श्री.काकांच्या प्रेरणेने कै.लक्ष्मीदेवी राणीसरकारांनी भगवान श्री माउलींची मनोभावे प्रार्थना करून उपासना केली. माउलींच्या कृपेने त्यांची संतती जगली. पण असे म्हणतात की, पूर्वीच्या कोणा महात्म्याचा तसा शाप होता. त्यामुळे महात्म्याचाच शाप तो, खोटा कसा ठरणार ? राणीसाहेबांची संतती जगली पण राज्य गेले; म्हणजे औरस पुत्र राजा झालाच नाही शेवटपर्यंत ! 
पुढे एकदा राणीसाहेब परदेशात असताना विमान अपघातात मरता मरता आश्चर्यकारकरित्या बचावल्या, तेही प.पू.काकांनी प्रवासापूर्वीच दिलेल्या मोलाच्या सूचनेमुळे आणि भगवान श्री माउलींच्याच कृपेने. तेव्हापासून राणीसाहेबांनी मात्र मनापासून माउलींची सेवा आरंभिली. स्वहस्ते पूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली. आळंदी देवस्थानला त्या काळात लक्षावधी रुपयांची मदत केली. लक्ष्मीनगर भागात माउलींचे सुंदर मंदिर बांधले व त्या सर्व ऐषोआराम सोडून मंदिरातच अवघ्या एका खोलीत राहून सेवा करू लागल्या. त्यांनी सर्व राजवैभवाचा त्याग केला.
या मंदिरात भगवान श्री माउलींची लाईफ साईझची संगमरवरी मूर्ती आहे. माउलींचे हे ध्यान खूप वेगळे आहे. त्यांच्या डाव्या हातात ज्ञानेश्वरी असून ते ती सांगत आहेत. डोळे अगदी भावपूर्ण आहेत. मूर्तीसमोर माउलींच्या पादुका समाधीशिलेवर स्थापन केलेल्या आहेत.
या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज अचानक उठून तरातरा चालत पुणे रस्त्यावर पार गावाबाहेर पर्यंत गेले. तोंडाने 'गोळा आला गोळा आला' असे पुटपुटत होते. कोणाला काहीच कळेना. थोड्या वेळाने अंगावरच्या उपरण्यात काहीतरी झाकून धरल्यासारखे ते घेऊन आले व त्यांनी माउलींच्या नुकत्याच प्रतिष्ठापना झालेल्या पादुकांवर ते उपरणे रिकामे केले. या सर्व प्रकाराबद्दल त्यांना विचारल्यावर पू.श्री.काका उत्तरले, "तुम्ही माउलींचे आवाहन केलेत पण त्यांच्या स्वागतासाठी कोणी गेलाच नाहीत, म्हणून मग मी जाऊन त्यांचे स्वागत केले व त्यांचे तेज सन्मानाने घेऊन आलो." अशाप्रकारे फलटणच्या आमच्या श्री ज्ञानेश्वर मंदिरात भगवान माउलींची प्रतिष्ठापना प्रत्यक्ष प.पू.श्री.उपळेकर महाराजांनी केलेली आहे. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज दररोज या मंदिरात दर्शनाला येत व बराचवेळ श्री माउलींशी सुखसंवाद करीत असत. त्यांचा तो नित्याचा परिपाठच होता. 
लहानपणापासून याच माउलींच्या आणि प.पू.काकांच्या मंदिरात खेळताना माझ्या बालमनावर माउलींच्या प्रेमाचे जे संस्कार झाले ते माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत.
आमच्या माउलींच्या मंदिरात रोज आरतीनंतर पंचपदी होई व दर गुरुवारी आरतीपूर्वी पादुकांची प्रदक्षिणा होई. मी दररोजच्या संध्याकाळच्या आरतीला उपस्थित असायचोच. आरतीची घंटा वाजायला लागली की खेळ सोडून धावत जायचो आम्ही तिथे. आरतीच्या वेळी तास किंवा मोठा घोळ वाजवायचे अप्रूप वाटायचे आम्हांला. कधी कधी गुरुजी नसतील तर मलाच गुरुवारच्या प्रदक्षिणेच्या वेळी माउलींच्या पादुका धरण्याचे भाग्य लाभत असे. त्यावेळी माझा मित्र कै.प्रसाद नेर्लेकर माउलींची पूजा करायचा. तो आणि मी एकत्रच रुद्र, पुरुषसूक्त वगैरे शिकलो होतो.
या माउलींच्या मंदिरात कै.सौ.भगीरथीबाई उडपीकर नावाच्या फार गोड आजी सेवेला होत्या. त्या कानडी वैष्णव ब्राह्मण होत्या. श्री राघवेंद्रस्वामी, भगवान तिरुपती बालाजी हे त्यांचे आराध्य दैवत. उडपीहून पंढरपूरला वारीसाठी आलेल्या असताना त्यांची व त्यांच्या नवऱ्याची चुकामूक झाली. बरोबर त्यांची लहान मुलगी गीता देखील होती. त्यावेळी राणीसरकार पंढरपुरातच होत्या. त्यांनी असहाय्य भगीरथीबाईंना आपल्या सोबत फलटणला आणले व माउलींच्या मंदिरात सेवेला ठेवले. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची सोयही करून दिली. कै.ती.भगीरथीबाईंसाठी माझ्या मनात अतीव प्रेमादराची भावना आहे. त्यांनीच अगदी सुरवातीला माउलींच्या प्रेमाचे संस्कार माझ्यावर केले.
ती.भागीरथीबाई फार देखणे हार करीत. त्यांचे पाहूनच मी देखील रंगीबेरंगी व नजाकतीचे हार करायला आवडीने शिकलो. त्या माझ्या घरातील देवमूर्तींसाठी देखील हार करून देत असत. त्यांचे कानडीमिश्रित मराठी ऐकायला गोड वाटे. त्या मला 'रोहनबाबा' म्हणत. मला चपला विसरायची तेव्हा खूप सवय होती. दर्शनाला जाताना मी चप्पल घालून जायचो; पण परत येताना साफ विसरून जायचो की मी चप्पल घालून गेलो होतो ते. त्यामुळे माझ्या चपला कायम हरवायच्या. पण ती.भागीरथीबाईंचे बरोबर लक्ष असायचे. त्या माझी राहिलेली चप्पल उचलून त्यांच्या खोलीच्या दाराआड ठेवत व मी शोधायला आलो की मला हाक मारून बोलावत व चप्पल देत असत. सोबत भाजलेले शेंगदाणे किंवा अांब्याची वडी वगैरे खाऊ देखील मिळायचा. दुहेरी लाभच तो ! भागीरथीबाईंनी माझ्या अशा पंधरा-वीस वेळा तरी नक्की चपला जपून ठेवलेल्या मला आठवतात.
भगवान माउलींच्या संगमरवरी मूर्तीला ठरावीक दिवसांनी त्या रिठ्याने व गरम पाण्याने स्नान घालीत; व लहान बाळाला अंघोळ झाल्यावर गच्च बांधून ठेवतात तसे डोक्यावरून अंगभर शाल घालून ठेवत. मी विचारल्यावर त्या म्हणाल्या, "बाबा, माउलींना स्नान घातले आत्ता, मग थंडी भरेल ना उघडे ठेवले तर. लहान बाळाप्रमाणे नाजूक आहेत ते !" माउलींची ही मूर्ती नसून सुकुमार कोमल असे माउलीच प्रत्यक्ष समोर आहेत, अशा थोर भक्तिभावनेने त्या सेवा करीत. त्यांच्या त्या प्रेमसेवेचा न पुसला जाणारा संस्कार माझ्या मनात खोलवर रुजलेला आहे.  भगवंतांची भक्ती कशी करावी, याचे प्रात्यक्षिक ज्ञान लाभले म्हणून मी भगीरथीबाईंचा आजही ऋणी आहे.
एक गंमत म्हणजे मला लहानपणी नेहमीच दृष्ट लागायची. त्या न सांगता माझी दृष्ट काढत असत, ती देखील माउलींच्या निर्माल्यानेच. काही कार्यक्रम वगैरे असला की आमच्या घरी येताना त्या निर्माल्य सोबत घेऊनच येत. अशाप्रकारे माउलीच माझे संरक्षक कवचही झालेले होते व आजही आहेत. भगीरथीबाई अतिशय उत्तम आणि रुचकर स्वयंपाक करीत. त्यांचे ते उंचपुरे, काठापदराचे नऊवारी लुगडे नेसलेले, तोंडात एकही दात नसलेले सात्त्विक सोज्ज्वळ रूप आजही माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात जसेच्या तसे जिवंत आहे. डोक्यावर पदर घ्यायची त्यांची विशिष्ट लकब होती. मानेला एक झटका देऊन त्या पदर सारखा करीत. ती त्यांची  सवय पाहणा-याच्या नजरेत येत असे.
ती.भागीरथीबाई गोष्टीवेल्हाळ होत्या. त्यांच्या भागातल्या कानडी हकिकती, पू.काकांच्या आठवणी, त्यांच्या गावाच्या दुर्गादेवीच्या गोष्टी व भूतकाळातील अनेक प्रसंग त्या रंगवून रंगवून सांगत असत. मूळची संपन्नता अनुभवलेली असूनही, त्यावेळच्या त्यांच्या परस्वाधीन व काही प्रमाणात गरीबीच्या परिस्थितीचे त्यांना दु:ख नक्कीच वाटत असे, पण त्यांच्या रोजच्या वागण्यात त्या दु:खाचा मागमूस नसे. त्या नेहमी अतीव आनंदातच राहात असत. ती.भागीरथीबाई वारीच्याही अनेक गोष्टी नेहमी सांगत असत. त्यामुळेच आपणही वारी करायलाच हवी, अशी तीव्र इच्छा तेव्हापासूनच माझ्या मनात तयार झालेली होती. माउलींच्या कृपेने १९९६ साली, दहावीच्या सुट्टीत ती इच्छा पहिल्यांदा पूर्ण झाली.
भागीरथीबाईंना माउलींच्याच मंदिरात राहिल्याने अनेक संतांची दर्शने झाली व सेवाही करायला मिळाली. पू.श्री.गोविंदकाका, पू.श्री.गुळवणी महाराज, पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज, पू.धुंडा महाराज देगलूरकर, पू.मामासाहेब दांडेकर इत्यादी अनेक संतांच्या दर्शनाच्या हकिकती त्या सांगत असत. त्यांना मरणही खूप चांगले आले. जन्मभर माउलींची सेवा केलेली ही भागीरथी नावाची भक्तिगंगा आषाढी एकादशीच्या सकाळी माउलींची पूजा झाल्यावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने माउलीचरणीं कायमची विसावली. केवढे मोठे भाग्य म्हणायचे हे ! त्या रोज प.पू.काकांच्या समाधीलाही एक हार देत असत. अजून मंदिरात नेऊन द्यायचा राहिल्याने त्यादिवशी तो हार त्यांच्या खोलीतच ठेवलेला होता टेबलावर. त्याच्या शेजारीच कसेतरी वाटायला लागले म्हणून त्या जरा लवंडल्या व तेथेच त्यांचे देहावसान झाले. आश्चर्य म्हणजे, पू.काकांच्या समाधीसाठी एकादशी म्हणून करून ठेवलेला भरगच्च तुळशीचा हार नेमका त्या टेबलावरून कसा काय माहीत नाही, पण त्यांच्या निष्प्राण देहावर पडला. जन्मभर त्यांनी देवांना मनोभावे दररोज हार करून वाहिला, शेवटी स्वत: प.पू.काकांनीच त्या सेवेचा त्यांना अशाप्रकारे प्रसाद दिला असे म्हणायला हरकत नाही. मी त्या वर्षी, १९९६ साली पहिल्यांदाच वारीला गेलो होतो, त्यामुळे मला त्यांचे अंत्यदर्शन होऊ शकले नाही.
माउलींनी ज्ञानेश्वरीत व समर्थांनी दासबोधात म्हटल्याप्रमाणे भागीरथीबाईंची सेवा होती. माउलींसाठी जे जे शक्य ते ते त्या अतीव प्रेमाने करत असत. त्यांना रोज भरपूर फुले लागत हार करायला. म्हणून त्यांनी स्वत: खपून छान बाग तयार केलेली होती मंदिराच्या आवारात. प्राजक्त, गुलाब, मोगरा, कुंद, शेवंती, गलांडा, झेंडू, बेल, तुळशी अशी अनेक फुलझाडे प्रेमाने वाढवलेली होती. त्यांचे नजाकतीने हार करणे चालायचे रोज रात्री. मी आईने जोरात हाक मारून बोलवेपर्यंत, शेजारतीनंतर त्यांच्या ओट्यावरच गप्पा मारत बसलेलो असायचो. आईची हाक ऐकली की त्या म्हणत, "रोहनबाबा, पळा लवकर, नाहीतर धम्मकलाडू मिळेल घरी गेल्यावर." मी लहान होतो तसेच वाटेत अंधार असायचा म्हणून मला त्या मंदिराच्या दारापर्यंत सोडायलाही येत. मी आमच्या घरात पोहोचेपर्यंत त्या दारातच थांबलेल्या असायच्या. माझ्यावर त्यांचे खूप प्रेम होते व त्यांना माझे कौतुकही होते.
ती.भागीरथीबाई गेल्यानंतर माउलींच्या मंदिरातले चैतन्यच उणावले यात शंका नाही. बहुदा त्यांच्या निर्मळ सेवेचा विरह माउलींनाही जाणवला असावा. त्यांच्यासारखे कोणीच प्रेमाने लक्ष न दिल्याने व दुर्दैवाने त्यांच्यासारख्या उत्कट प्रेमाची झाडांनाही सवय असल्यानेच बहुदा, त्या बागेतील झाडेही त्या गेल्यानंतर हळूहळू वाळून गेली. पण त्यांच्या बागेतली त्यांच्याच हाताने लावलेली मोग-याची काही झाडे मी मुद्दाम आणून माझ्या बागेत लावली होती. त्यांना जाऊन आता वीस वर्षे झाली, तरी ते मोगरे आजही भरपूर फुलत आहेत; आमच्या प्रेमळ भागीरथीबाईंची आठवण ताजी ठेवत आणि त्यांची सेवा आजही अविरत चालवत !
श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब स्वतः जातीने माउलींच्या पालखी प्रस्थानाला जात. आजही नाईक निंबाळकरांचा प्रतिनिधी उपस्थित असतोच. अंकलीचे शितोळे, ग्वाल्हेरचे शिंदे आणि फलटणचे निंबाळकर या तीन राजघराण्यांचे प्रतिनिधी प्रस्थानसमयी असतात. राणीसाहेब वारीलाही जात; पण गाडीने. चालत जाऊ शकत नव्हत्या त्या. ती.भागीरथीबाई त्यांच्याबरोबर जात असत. फलटणच्या मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी पहाटपूजेनंतर माउलींच्या पादुकांवर लक्ष तुलसीअर्चनाचा राणीसाहेबांचा नियम होता. तो आजही चालू आहे. वाखरी मुक्कामातही पहाटे निंबाळकरांना पूजेचा मान आहे. संपूर्ण सोहळ्यात फक्त एकाच ठिकाणी माउलींच्या पादुका पूजेसाठी मुक्कामाचा तळ सोडून बाहेर दिल्या जातात. माउलींची पालखी फलटणला मुक्कामाला असते त्या रात्री, पालखीसोबत दुसरा जो पूजेचा पादुकाजोड असतो तो आमच्या माउलींच्या मंदिरात आणून त्यांना पवमानाचा अभिषेक होत असतो. रात्रभर पादुका मंदिरातच असतात. या पूजेत मी लहानपणी प्रत्येकवर्षी सहभागी झालोय आणि स्वहस्ते माउलींची पूजा देखील केलेली आहे.
फलटणचा मुक्काम संपवून पंढरपूरला जाताना दुसऱ्या दिवशी माउलींची पालखी पू.काका व श्री माउलींच्या मंदिरासमोरूनच जाते. त्यावेळी  निंबाळकर संस्थानातर्फे माउलींची पूजा होते व प्रत्येक दिंडीला नारळ-साखर दिली जाते. तेव्हा होणारी पूजा रथात चढून मीच करीत असे. त्या गर्दीत झटकन रथात चढण्याचा माझा सराव चांगला असल्याने, कायम माउलींची ही सेवा मला मिळाली हे माझे परमभाग्य. पूजा झाल्यावर माउलींच्या पादुकांवर मनसोक्त डोके टेकवून नमस्कार करण्याचे सुख काही औरच असते !
या आमच्या मंदिरात परतीच्या वारीला (म्हणजे पंढरपूर ते आळंदी प्रवासात) भगवान श्री माउलींची पालखी यायची. आरती होऊन शिरावाटप व्हायचे व मग पालखी नामदेव विठ्ठल मंदिरात रात्रीच्या मुक्कामाला जाई. ही प्रथा पुढे बंद झाली. पण लहानपणी काही वर्षे त्या आरतीला उपस्थित राहिल्याचे मला व्यवस्थित स्मरते आहे. ज्यावर्षी माउलींची पालखी मंदिरात आली नाही, त्यावर्षी ती.भागीरथीबाईंचे ते अस्वस्थपण व त्यांनी केलेला त्रागा मला आजही डोळ्यांसमोर येतो. त्या खूपच उद्विग्न झालेल्या त्यावेळी.
श्रीमंत राणीसाहेबांचे सर्वात धाकटे चिरंजीव कै.श्रीमंत विक्रमसिंह तथा बाळमहाराज हे माळकरी होते. त्यांनीच राणीसाहेबांचा माउलीसेवेचा वारसा पुढे चालवला. त्यांचा माझ्यावर खूप जीव होता. मी सर्वात पहिल्यांदा त्यांच्याबरोबरच माउलींच्या प्रस्थानाला आळंदीला गेलो होतो. बहुदा १९९१-९२ साल असेल. त्याआधी माझ्या आजीच्या, कै.मालतीबाई उपळेकरांच्या कॅन्सर ट्रीटमेंटच्या वेळी १९८९ साली आयुष्यात पहिल्यांदा मी आळंदीला जाऊन माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले होते. कै.आजीबरोबर मी ज्ञानेश्वरी वाचायचाही त्यासुमारास एकदा प्रयत्न केला होता. पण फारतर पहिला अध्यायच वाचून झाला, मग 'ये अपने बस की बात नही ।' हे पटल्याने, पुढे बालसुलभ कंटाळ्यामुळे ते राहूनच गेले.
आमच्या घरात प.पू.श्री.काकांमुळे माउलींच्या हरिपाठाची उपासना आहे. त्यामुळे जवळपास दहाव्या-बाराव्या वर्षापासूनच माझी दररोज हरिपाठ म्हणायला सुरुवात झाली होती. बरेच दिवस मी संध्याकाळी स्नान करून बरोबर सात वाजता, पू.काकांच्या हरिपाठाच्या खोलीत बसून हरिपाठ म्हणत असे. नंतर पाठ झाल्यावर मात्र एका जागी बसून म्हणणे जवळपास बंद पडले. आता येताजाताच हरिपाठ म्हटला जातो.
अशाप्रकारे सद्गुरु श्री माउलींनी माझ्या जीवनात अगदी बालपणीच प्रवेश करून, पुढे कायमचा निवास केलेला आहे, ही त्यांचीच माझ्यावरची असीम दयाकृपा म्हणायला हवी. आज, "माउलींशिवाय आपल्याला दुसरे काही विश्वच असू नये", यावर सद्गुरुकृपेने माझे मत पक्के होऊ लागलेले आहे आणि हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे !!
( छायाचित्र संदर्भ  : डावीकडे, भगवान श्री माउलींची संगमरवरी श्रीमूर्ती व उजवीकडे वर कै.श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसरकार व खाली कै.ती.भागीरथीबाई उडपीकर. )
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.in )

17 Jun 2017

साठवणीतलीवारी१

लागला टकळा पंढरीचा
उन्हाळ्याची आग ओकणारी असह्य झळ निसर्गचक्रानुसार जसजशी कमी होऊ लागते, तसतसे ज्येष्ठ महिन्यात आकाशात एक दोन चुकार ढगही दिसू लागतात. अगदी त्याच सुमारास एक सतत हवीहवीशी वाटणारी भावपूर्ण आठवण मनात गर्दी करू लागते. होय, बरोबर ओळखलेत, आषाढी वारीचीच आठवण ती !
रिमझिमत्या पावसात माउलींसंगे होणारी पंढरीची वारी खरोखरीच अवर्णनीय आहे. शब्दांनी कधी तिचे वर्णनच होऊ शकत नाही. तो शांतपणे डोळे मिटून हृदयाच्या गाभ्याने अनुभवायचाच विषय आहे. म्हणून तर संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय म्हणतात, "पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ॥"
मोठ्या भाग्याने माझा जन्म भगवान श्री माउलींच्या वारीच्या वाटेवरील फलटण गावातील उपळेकरांच्या घरात झाला. थोर माउलीभक्त सत्पुरुष पूजनीय डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे कृपाशीर्वाद लाभून पावन झालेले हे घराणे, त्यात घरासमोरच श्री माउली आणि पू.काकांची मंदिरे; त्यामुळे सोन्याला सुगंधच म्हणायचा तो. वारीच्या वाटेवर गाव असल्याने नकळत वारीचा संस्कार मनात दृढावला, अगदी कळतंय तेव्हापासूनच ! मला आठवतंय, आमच्या फलटणच्या घडसोली मैदानावरच माउलींच्या पालखीचा मुक्काम असे. त्या मैदानावरच आमची शाळा पण होती. त्यामुळे पालखीच्या दिवशी व दुस-याही दिवशी शाळेला सुट्टी असायची. पालखीचे दोन मुक्काम असले तर एकूण तीन दिवस सुट्टी. मी आईबरोबर दर्शनाला जायचो. उंची कमी असल्याने पालखीपर्यंतही हात पोचत नसे. मग मला माउलींची पालखी ठेवलेल्या टेबलावर कोणीतरी उचलून ठेवी. मग मी बरोबर आणलेली घरच्या झाडांची तगरीची वगैरे फुले, बेल व तुळशी मनसोक्त माउलींच्या श्रीचरणपादुकांवर वाहत असे आणि त्या पादुकांवर डोके टेकवून नमस्कार करीत असे. आजही मला डोळ्यांसमोर ते दृश्य स्पष्ट दिसते आहे.
या पादुकांच्या रूपाने अत्यंत देखणा, मदनालाही लाज वाटेल असा तो दिव्य चैतन्याचा पुतळा, त्रैलोक्याचा जिव्हाळा, माझा ज्ञानोबाच त्या पालखीत आम्हां वेड्या भोळ्या-भाबड्या भक्तांची वाट पाहात, गोड हसत बसलाय, अशी माझ्या बालमनाची पक्की धारणाच आहे ! हे मनमोहक दृश्य माझ्या कल्पनेच्या कॅनव्हासवर आजही सजीव होऊन विलसते आहे !!
म्हणूनच सद्गुरु श्री माउलींच्या पादुकांवर कितीही वेळा डोके ठेवले, तरी माझे मन कधीच भरत नाही, कमीच वाटत राहते ते. जणू माउलींचा प्रेमळ हात आपल्या सर्वांगावरून मायेने फिरतोय, असेच त्यावेळी आतून सारखे जाणवत राहते. त्या लहान वयात, माउलींच्या फलटणमधील एक किंवा दोन दिवसांच्या मुक्कामात, मला किती वेळा त्यांचे असे डोके टेकवून दर्शन घ्यायला मिळाले, हे मी फार अभिमानाने सगळ्यांना सांगत असे. सहा-सात वेळा तरी नक्की दर्शन घेता येई मला.
गंमत म्हणजे पालखी येण्याच्या दोनतीन दिवस आधीपासून मी तगरीच्या झाडाजवळ अनेकवेळा जाऊन किती कळ्या आल्यात ते पाही. त्या झाडाला, तुला भरपूर फुले येऊ देत रे, म्हणून मी सांगत देखील असे. आज मागे वळून पाहताना जाणवतंय की, ते झाड तेव्हा नक्कीच माझ्या विनवणीला प्रतिसाद देऊन भरभरून फुलत असले पाहिजे. कारण मला चांगली पिशवीभर फुले सहज मिळायची पालखीच्या दिवशी.
वारीचे, दिंडीचे आणि भजनाचे एक आगळे प्रेम मला कायम वाटत आले आहे. वारीचे दिवस जवळ आले की बऱ्याचवेळा मला कुठूनतरी टाळमृदंगाचा आवाज ऐकू येतोय असा भास होई. असा आवाज आला की, मी हातातले सगळे सोडून त्या आवाजाच्या दिशेने धावत जात असे. आजही माझी ही आवड जशीच्या तशी टिकून आहे. दिंडीत रंगून भजन करणारे वारकरी पाहणे हा माझ्यासाठी फार मोठा स्वर्गीय आनंद असे. एकदा प्राथमिक शाळेतील दुसरीच्या वर्गात सर शिकवत असताना, असा आवाज आला म्हणून मी धावत वर्गाबाहेर आलो होतो दिंडी पाहायला, हे मला आजही लख्ख आठवते.
वारी हा माझ्या हृदयीचा चिरंतन आनंदठेवा आहे. वारीची नुसती आठवणही मला तत्काळ त्या वारीचा सुखद अनुभव देते, अगदी आजही; कुठेही असलो तरी. भगवान श्री माउलींच्या कृपेने सलग अकरा वर्षे वारीत मी अतिशय हृद्य आणि चिरस्मरणीय प्रसंग अनुभवलेले आहेत. हे एकेक प्रसंग आतून मखमली अस्तर असलेल्या देखण्या सुवर्ण पेटीत ठेवून, जन्म जन्म उराशी जपावेत इतके मधुर-मनोहर आहेत. या सर्व प्रसंगांवर लिहायचे ठरवले तर नक्कीच जाडजूड पुस्तक तयार होईल. तरीही या वर्षी त्यातील काही मोजक्याच पण भावपूर्ण स्मृतिचित्रांचे, या लेखमालेतून तुम्हां वारी-माउलीप्रेमी सुहृदांसाठी प्रदर्शन मांडण्याची व त्याद्वारे स्मृतिकुपीतले तेच आनंदप्रसंग पुन्हा पुन्हा भरभरून अनुभवण्याची मला मनापासून इच्छा होत आहे. ही माउलींचीच कृपा जणू ! माझ्या या कथनात वारंवार माझा 'मी' येईल, पण तो अहंकाराने नाही, केवळ सांगणा-याच्या भूमिकेतून येईल, हे कृपया ध्यानात असू द्यावे ही नम्र विनंती.
१९८९ साली, मी आठ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडलांनी पशुखाद्य बनविण्याचा कारखाना फलटण-पुणे रस्त्यावरील तांबमाळावर सुरू केला. त्याच्या शेजारीच फलटण दूधसंघ होता. त्याचे चेयरमन श्री.सुभाषराव शिंदे होते. सद्गुरु श्री माउलींचा दिव्य पालखी सोहळा याच रस्त्यावरून फलटणकडे जात असल्याने, दूधसंघाच्या वतीने वारक-यांना मोफत सुगंधी दूध वाटप, माउलींच्या पालखीवर पुष्पवृष्टी व श्रींची पूजा होत असे. बहुदा त्याच वर्षीपासून मी देखील दूधसंघाच्या पालखी स्वागताच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागलो. शिंदेसाहेबांबरोबर रथावर चढून पूजा देखील करीत असे मी त्यावेळी. मी वयाने बराच लहान असल्याने सर्वांना माझे तेव्हा खूप कौतुक वाटे व त्यामुळेच मलाही सगळीकडे फर्स्ट प्रेफरन्स मिळत असे, जो मला तर तेव्हा हवाच होता. अशाच एका वर्षी काढलेला फेटा बांधलेला माझा बालपणीचा एक फोटो अमित मुजुमदार व जाई हुबळीकर या माझ्या बालमित्रांनी आवर्जून मला गेल्या वर्षी पाठवला. तो फोटो पाहिल्याबरोबर माझे मन पुन्हा वारीच्या त्या समृद्ध स्मृतिकक्षात जाऊन ठाण मांडून बसले आणि वारीचे शेकडो प्रसंग चित्रपटासारखे डोळ्यांसमोरून झरझर जाऊ लागले. त्यातलेच काही प्रसंग "#साठवणीतलीवारी" या लेखमालेतून तुम्हां सर्वांसाठी आणि खरेतर स्वांत:सुखाय इथे मांडत आहे.
वारीची नुसती आठवण जरी झाली ना, तरी आपले मन, पावसाच्या आगमनाने हरखून गेलेला आणि भारदस्त पिसारा फुलवून मस्तीत नाचणारा मोरच होऊन जाते. ज्याने वारी केलेली आहे, त्यालाच मी जे म्हणतोय त्यातला खरा आनंद कळणार. माउलींच्या छत्रछायेत पंढरीची वाट चालणे, हा फार फार अद्भुत सोहळा असतो. हा ज्ञानियांचा अनभिषिक्त महाप्रभू, कैवल्यसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट 'माउली' होऊन वारीच्या वाटेवर तुम्हां आम्हां सर्वसामान्य वारक-यांसोबत चालतो, प्रत्यक्ष आपले बोट धरून आपल्याला चालवतो; आपले सुखदु:ख समजून घेऊन, मायेची फुंकर मारून आपल्याला गोंजारतो आणि भरभरून प्रेमकृपादान देऊन आपले अवघे जीवनच त्या अपूर्व प्रेमरंगाने भारून टाकतो. हा दैवी सुखानुभव कोणत्या शब्दांत सांगता येईल बरे? शब्दांच्या कुबड्या, हो कुबड्याच त्या, त्यांचा काहीही उपयोग होत नाही या वारीच्या वाटेवर. इथे फक्त नि:शब्द अनुभूतीच बोलते, ती देखील एका अगम्य वाणीत, जी फक्त माउलींवर आणि त्यांच्या वारीवर जीवापेक्षा जास्त प्रेम करणारा सच्चा वारकरीच समजून घेऊ शकतो !!
आज ज्येष्ठ कृष्ण अष्टमी, मायमाउली जगज्जीवन सद्गुरु श्री ज्ञानोबारायांच्या पालखीचे प्रस्थान; म्हणजे आषाढीवारीच्या अद्भुत, अलौकिक आणि अतुलनीय आनंदसोहळ्याची सुरुवात. चला तर, आपणही आता सद्गुरु श्री माउलींच्या स्मरणात, वारीच्या या प्रेमवर्षावात चिंब चिंब भिजून, "ज्ञानोबा-तुकाराम"च्या गगनभेदी गजरात, आनंदातिरेकाने थरथरणा-या, डोलणा-या कळसाच्या साक्षीने, आळंदीच्या देऊळवाड्यातून माउलींसंगे भगवान पंढरीनाथांच्या दर्शनासाठी, त्यांच्याचसारखे अखंड आनंदमय होण्यासाठी प्रस्थान ठेवू या !!
माझ्यासोबत या शब्द-वारीला तुम्ही सर्वांनी तर याच; पण तुमच्या सर्व सुहृदांनाही यात सहभागी करून घ्या, त्यांच्यापर्यंतही हे लेखन व्हॉटसप, फेसबुक सारख्या विविध माध्यमांतून पोहोचवून, त्यांनाही तो स्वर्गीय आनंद सप्रेम अनुभवण्यास मदत करा, ही आग्रहाची विनंती !
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.in )

करुणात्रिपदीची जन्मकथा

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांचे समग्र वाङमय हा अद्भुत चमत्कारच आहे. अत्यंत काटेकोर, व्याकरण-काव्य नियमांचा धागा न सोडता, प्रतिपादनाच्या विषयातच विविध मंत्रांची चपखल योजना करीत त्यांनी रचलेली असंख्य संस्कृत व मराठी स्तोत्रे हा भारतीय वाङ्मयातला अजरामर आणि अलौकिक असा विशेष विभाग आहे. त्यांनी रचलेल्या भगवान श्रीदत्तप्रभूंच्या अष्टोत्तरशतनाम स्तोत्रामध्ये असे १४ मंत्र खुबीने गुंफलेले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक नवीन शब्दही निर्माण केलेले आहेत. अशाप्रकारच्या रचना करण्यासाठी विलक्षण प्रतिभा आणि भाषेवर अद्वितीय प्रभुत्व लागते आणि अशा लोकविलक्षण प्रतिभेचे प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराज अक्षरश: सम्राटच होते.
प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्धी पावलेली आहे. प्रत्येक दत्तभक्त दररोज ही रचना म्हणतोच म्हणतो. त्यांची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजेच ' करुणात्रिपदी ' होय ! भगवान श्रीदत्तात्रेय जयंती महोत्सवाच्या निमित्ताने या अजरामर अशा करुणात्रिपदीची खरी जन्मकथा आपणां सर्वांसाठी सादर करीत आहोत !

गेले काही दिवस व्हॉट्सप व फेसबुकवर प. प. श्री. टेंब्येस्वामींची म्हणून एक खोटी कथा फारच फिरत होती. त्यातील सर्व संदर्भ खोडसाळपणेच तयार केलेले होते. एका मंदिराचा पुजारी देवाचा नैवेद्य खातो म्हणून स्वामी त्याला रागावतात व ते पाहून दत्तप्रभू चिडून स्वामींना ओरडतात की, आमचे पुजारी किंवा विश्वस्त काय करतात ते आम्हांला माहीत असते व त्यावर आमचे लक्ष असते, तेव्हा इतरांनी त्या फंदात पडू नये.....इत्यादी. मग स्वामी त्यांची क्षमा मागून ही करुणात्रिपदी रचून त्यांची करुणा भाकतात ; अशा स्वरूपाची ती पूर्णपणे खोटी गोष्ट सर्वत्र प्रसारीत होत होती. ही गोष्ट तर आपल्या चुकांवर रितसर पांघरूण घालण्यासाठीच कोणीतरी मुद्दाम रचलेली आहे, हे स्पष्ट दिसून येते. असा कोणताही प्रसंग प. प. टेंब्येस्वामींच्या चरित्रात कधीही घडलेला नाही. करुणात्रिपदीची रचना होण्यामागे यापेक्षा पूर्णपणे वेगळीच पण महत्त्वाची अशी एक गोष्ट घडलेली होती, तीच या लेखाद्वारे वाचकांपुढे ठेवत आहे.

श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे. त्यांच्या ' मनोहर पादुका ' कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तांचे हे अतीव प्रेमादराचे स्थान आहे. या वाडीच्या नित्यपूजेची व उत्सवांची सर्व पद्धत आणि आचारसंहिता-नियमावली स्वत: प. प. श्री. टेंब्ये स्वामींनीच घालून दिलेली आहे. तेथील परिपाठानुसार चातुर्मास्यातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा अडीच महिन्यांचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी वाडीला श्रींची पालखी प्रदक्षिणा असते.
इ.स.१९०५ मध्ये एकेदिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना, पुजारी गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. हा भलताच अपशकुन पाहून सगळे घाबरले. नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीच ही पूर्वसूचना आहे, असे जाणून ते सगळे पुजारी हवालदिल झाले. त्यावेळी प. प. श्री. टेंब्ये स्वामी हिंगोली जिल्ह्यातील नरसी (नामदेव) येथे चातुर्मास्यानिमित्त वास्तव्याला होते. तेथे पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली.
पुजारी मंडळींच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामी ध्यानाला बसले.
ध्यानात त्यांनी श्रीदत्तप्रभूंना कारण विचारले, त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, " तू घालून दिलेल्या नियमांनुसार हे लोक वागत नाहीत, पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हांलाच तेथे राहायचा कंटाळा आलाय. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी ! " ध्यानातून उठल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी पुजा-यांना रोषाने सांगितले की, " जर दुर्वर्तन सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल तर काय भयंकर परिणाम होतील ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक, नाहीतर तुम्ही जाणे आणि तुमचे देव जाणे ! " पुजा-यांनी हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागितल्यावर व नीट वागण्याची, जशी घालून दिली आहे त्याबरहुकूम सेवा करण्याची हमी दिल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी कळवळा येऊन भगवान श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना केली. त्याचवेळी त्यांनी ही तीन पदांची करुणात्रिपदी रचून ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली. आजही दररोज पालखीच्या तिस-या प्रदक्षिणेला तीन थांब्यांवर ही त्रिपदी म्हटली जाते.

' करुणात्रिपदी ' ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण, मंत्रमय व रसाळ रचना आहे. यातून श्रीस्वामी महाराज, भगवान श्रीदत्तप्रभूंना विनवणी करीत आहेत. देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर, शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केलीत तशीच आमच्यावरही करा, आमच्याकडून सेवा निरंतर करवून घ्या. आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हां सर्वांवर करुणेचे कृपाछत्र घाला, अशी अत्यंत दयार्द्र होऊन भगवंतांची ते प्रार्थना करीत आहेत.

आजच्या घडीला श्रीदत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये, दत्त संप्रदायातील संतांच्या स्थानांवर ही करुणात्रिपदी दररोज आरतीनंतर विनवणी म्हणून म्हणायची पद्धतच पडलेली आहे. साक्षात् दत्तावतार प. प. श्री. टेंब्ये स्वामींचेच हे प्रासादिक, मंत्रमय शब्द असल्याने, आजवर अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की, करुणात्रिपदीच्या भावपूर्ण गायनाने श्रीदत्तप्रभूंची कृपा नक्की होतेच. अपराधक्षमापनासाठीच्या उपलब्ध काव्यांमधील, एकमेवाद्वितीय, अद्भुत व अलौकिक काव्य म्हणून करुणात्रिपदीला सर्वदूर मान्यता आहे !
आजवर अनेकानेक सुप्रसिद्ध गायकांनी गायलेली ' शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता ' ही करुणात्रिपदी आकाशवाणी तसेच सीडी-कॅसेटच्या माध्यमातून प्रचंड प्रसिद्धी पावलेली असून अजरामरही ठरलेली आहे.
प्रार्थनेचा आदर्श वस्तुपाठ असणा-या या करुणात्रिपदीची ही रंजक जन्मकथा देखील विशेषच म्हणायला हवी.
प. प. श्री. टेंब्येस्वामी त्रिपदीचा समारोप करताना श्रीदत्तमहाराजांकडे फार सुंदर मागणे मागतात,

प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव ।

पदीं देवो ठाव , देव अत्रिनंदन ॥


देवा सद्गुरुराया अत्रिनंदना, मी आपल्या श्रीचरणीं प्रेमभाव ठेवून प्रार्थना करतो की, आपण मला कायमच आपल्या पदी ठाव द्यावा, आपल्याच श्रीचरणीं निरंतर सेवारत ठेवावे. करुणात्रिपदीच्या सतत अनुसंधानाने, श्री. टेंब्येस्वामींच्या या मागणी प्रमाणे, करुणावरुणालय भगवान श्रीदत्तप्रभू तुम्हां-आम्हां सर्वांवर कृपावर्षाव करोत, हीच या परम पावन श्रीदत्तात्रेय जयंतीदिनी सादर प्रार्थना !!

लेखक - रोहन विजय उपळेकर.

भ्रमणभाष - 8888904481

16 Jun 2017

साठवणीतली वारी

राम राम मंडळी  !!
आजपासून आषाढी वारीच्या अलौकिक सोहळ्याला सुरुवात होत आहे. आज श्रीसंत तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान, उद्या सद्गुरु श्री ज्ञानोबारायांच्या पालखीचे प्रस्थान.
खरोखरीच अद्भुत आणि विलक्षण असतो हा वारीचा सोहळा. त्याची गोडी सप्रेम अनुभवलेल्या माणसालाच मी काय म्हणतोय ते कळेल, शब्दांत सांगताच येत नाही ते सुख !! 
गेल्यावर्षी मी त्या वारीच्या निमित्ताने, लागला टकळा पंढरीचा  याशीर्षकाने  साठवणीतलीवारी ही लेखमाला लिहायला घेतली खरी, पण फक्त तीनच लेख लिहून झाले. यावर्षी आधी तेच तीन लेख पुन्हा पोस्ट करून मग पुढील लेख जमतील तसे लिहायचा विचार आहे.
शेवटी या वारीबद्दल कितीही लिहिले तरी मन भरणारच नाही माझे, खरंच सांगतोय. आणि सद्गुरुकृपेने प्रचंड अनुभव आलेले आहेत आम्हां सर्वांना या आनंदसोहळ्यात. तेच तुम्हां सर्वांना सांगून, पुन्हा त्यांचा एकत्र आनंद घ्यावा असा विचार आहे. पाहू श्रीभगवंतांची कशी कृपा होते ते. इच्छा तर तीव्र आहेच.
सर्वांना पुनश्च या साठवणीतलीवारी साठी मन:पूर्वक हार्दिक आमंत्रण  !!
चला, येताय ना माझ्यासोबत वारीला??
- रोहन विजय उपळेकर