17 Jun 2017

साठवणीतलीवारी१

लागला टकळा पंढरीचा
उन्हाळ्याची आग ओकणारी असह्य झळ निसर्गचक्रानुसार जसजशी कमी होऊ लागते, तसतसे ज्येष्ठ महिन्यात आकाशात एक दोन चुकार ढगही दिसू लागतात. अगदी त्याच सुमारास एक सतत हवीहवीशी वाटणारी भावपूर्ण आठवण मनात गर्दी करू लागते. होय, बरोबर ओळखलेत, आषाढी वारीचीच आठवण ती !
रिमझिमत्या पावसात माउलींसंगे होणारी पंढरीची वारी खरोखरीच अवर्णनीय आहे. शब्दांनी कधी तिचे वर्णनच होऊ शकत नाही. तो शांतपणे डोळे मिटून हृदयाच्या गाभ्याने अनुभवायचाच विषय आहे. म्हणून तर संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय म्हणतात, "पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ॥"
मोठ्या भाग्याने माझा जन्म भगवान श्री माउलींच्या वारीच्या वाटेवरील फलटण गावातील उपळेकरांच्या घरात झाला. थोर माउलीभक्त सत्पुरुष पूजनीय डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे कृपाशीर्वाद लाभून पावन झालेले हे घराणे, त्यात घरासमोरच श्री माउली आणि पू.काकांची मंदिरे; त्यामुळे सोन्याला सुगंधच म्हणायचा तो. वारीच्या वाटेवर गाव असल्याने नकळत वारीचा संस्कार मनात दृढावला, अगदी कळतंय तेव्हापासूनच ! मला आठवतंय, आमच्या फलटणच्या घडसोली मैदानावरच माउलींच्या पालखीचा मुक्काम असे. त्या मैदानावरच आमची शाळा पण होती. त्यामुळे पालखीच्या दिवशी व दुस-याही दिवशी शाळेला सुट्टी असायची. पालखीचे दोन मुक्काम असले तर एकूण तीन दिवस सुट्टी. मी आईबरोबर दर्शनाला जायचो. उंची कमी असल्याने पालखीपर्यंतही हात पोचत नसे. मग मला माउलींची पालखी ठेवलेल्या टेबलावर कोणीतरी उचलून ठेवी. मग मी बरोबर आणलेली घरच्या झाडांची तगरीची वगैरे फुले, बेल व तुळशी मनसोक्त माउलींच्या श्रीचरणपादुकांवर वाहत असे आणि त्या पादुकांवर डोके टेकवून नमस्कार करीत असे. आजही मला डोळ्यांसमोर ते दृश्य स्पष्ट दिसते आहे.
या पादुकांच्या रूपाने अत्यंत देखणा, मदनालाही लाज वाटेल असा तो दिव्य चैतन्याचा पुतळा, त्रैलोक्याचा जिव्हाळा, माझा ज्ञानोबाच त्या पालखीत आम्हां वेड्या भोळ्या-भाबड्या भक्तांची वाट पाहात, गोड हसत बसलाय, अशी माझ्या बालमनाची पक्की धारणाच आहे ! हे मनमोहक दृश्य माझ्या कल्पनेच्या कॅनव्हासवर आजही सजीव होऊन विलसते आहे !!
म्हणूनच सद्गुरु श्री माउलींच्या पादुकांवर कितीही वेळा डोके ठेवले, तरी माझे मन कधीच भरत नाही, कमीच वाटत राहते ते. जणू माउलींचा प्रेमळ हात आपल्या सर्वांगावरून मायेने फिरतोय, असेच त्यावेळी आतून सारखे जाणवत राहते. त्या लहान वयात, माउलींच्या फलटणमधील एक किंवा दोन दिवसांच्या मुक्कामात, मला किती वेळा त्यांचे असे डोके टेकवून दर्शन घ्यायला मिळाले, हे मी फार अभिमानाने सगळ्यांना सांगत असे. सहा-सात वेळा तरी नक्की दर्शन घेता येई मला.
गंमत म्हणजे पालखी येण्याच्या दोनतीन दिवस आधीपासून मी तगरीच्या झाडाजवळ अनेकवेळा जाऊन किती कळ्या आल्यात ते पाही. त्या झाडाला, तुला भरपूर फुले येऊ देत रे, म्हणून मी सांगत देखील असे. आज मागे वळून पाहताना जाणवतंय की, ते झाड तेव्हा नक्कीच माझ्या विनवणीला प्रतिसाद देऊन भरभरून फुलत असले पाहिजे. कारण मला चांगली पिशवीभर फुले सहज मिळायची पालखीच्या दिवशी.
वारीचे, दिंडीचे आणि भजनाचे एक आगळे प्रेम मला कायम वाटत आले आहे. वारीचे दिवस जवळ आले की बऱ्याचवेळा मला कुठूनतरी टाळमृदंगाचा आवाज ऐकू येतोय असा भास होई. असा आवाज आला की, मी हातातले सगळे सोडून त्या आवाजाच्या दिशेने धावत जात असे. आजही माझी ही आवड जशीच्या तशी टिकून आहे. दिंडीत रंगून भजन करणारे वारकरी पाहणे हा माझ्यासाठी फार मोठा स्वर्गीय आनंद असे. एकदा प्राथमिक शाळेतील दुसरीच्या वर्गात सर शिकवत असताना, असा आवाज आला म्हणून मी धावत वर्गाबाहेर आलो होतो दिंडी पाहायला, हे मला आजही लख्ख आठवते.
वारी हा माझ्या हृदयीचा चिरंतन आनंदठेवा आहे. वारीची नुसती आठवणही मला तत्काळ त्या वारीचा सुखद अनुभव देते, अगदी आजही; कुठेही असलो तरी. भगवान श्री माउलींच्या कृपेने सलग अकरा वर्षे वारीत मी अतिशय हृद्य आणि चिरस्मरणीय प्रसंग अनुभवलेले आहेत. हे एकेक प्रसंग आतून मखमली अस्तर असलेल्या देखण्या सुवर्ण पेटीत ठेवून, जन्म जन्म उराशी जपावेत इतके मधुर-मनोहर आहेत. या सर्व प्रसंगांवर लिहायचे ठरवले तर नक्कीच जाडजूड पुस्तक तयार होईल. तरीही या वर्षी त्यातील काही मोजक्याच पण भावपूर्ण स्मृतिचित्रांचे, या लेखमालेतून तुम्हां वारी-माउलीप्रेमी सुहृदांसाठी प्रदर्शन मांडण्याची व त्याद्वारे स्मृतिकुपीतले तेच आनंदप्रसंग पुन्हा पुन्हा भरभरून अनुभवण्याची मला मनापासून इच्छा होत आहे. ही माउलींचीच कृपा जणू ! माझ्या या कथनात वारंवार माझा 'मी' येईल, पण तो अहंकाराने नाही, केवळ सांगणा-याच्या भूमिकेतून येईल, हे कृपया ध्यानात असू द्यावे ही नम्र विनंती.
१९८९ साली, मी आठ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडलांनी पशुखाद्य बनविण्याचा कारखाना फलटण-पुणे रस्त्यावरील तांबमाळावर सुरू केला. त्याच्या शेजारीच फलटण दूधसंघ होता. त्याचे चेयरमन श्री.सुभाषराव शिंदे होते. सद्गुरु श्री माउलींचा दिव्य पालखी सोहळा याच रस्त्यावरून फलटणकडे जात असल्याने, दूधसंघाच्या वतीने वारक-यांना मोफत सुगंधी दूध वाटप, माउलींच्या पालखीवर पुष्पवृष्टी व श्रींची पूजा होत असे. बहुदा त्याच वर्षीपासून मी देखील दूधसंघाच्या पालखी स्वागताच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागलो. शिंदेसाहेबांबरोबर रथावर चढून पूजा देखील करीत असे मी त्यावेळी. मी वयाने बराच लहान असल्याने सर्वांना माझे तेव्हा खूप कौतुक वाटे व त्यामुळेच मलाही सगळीकडे फर्स्ट प्रेफरन्स मिळत असे, जो मला तर तेव्हा हवाच होता. अशाच एका वर्षी काढलेला फेटा बांधलेला माझा बालपणीचा एक फोटो अमित मुजुमदार व जाई हुबळीकर या माझ्या बालमित्रांनी आवर्जून मला गेल्या वर्षी पाठवला. तो फोटो पाहिल्याबरोबर माझे मन पुन्हा वारीच्या त्या समृद्ध स्मृतिकक्षात जाऊन ठाण मांडून बसले आणि वारीचे शेकडो प्रसंग चित्रपटासारखे डोळ्यांसमोरून झरझर जाऊ लागले. त्यातलेच काही प्रसंग "#साठवणीतलीवारी" या लेखमालेतून तुम्हां सर्वांसाठी आणि खरेतर स्वांत:सुखाय इथे मांडत आहे.
वारीची नुसती आठवण जरी झाली ना, तरी आपले मन, पावसाच्या आगमनाने हरखून गेलेला आणि भारदस्त पिसारा फुलवून मस्तीत नाचणारा मोरच होऊन जाते. ज्याने वारी केलेली आहे, त्यालाच मी जे म्हणतोय त्यातला खरा आनंद कळणार. माउलींच्या छत्रछायेत पंढरीची वाट चालणे, हा फार फार अद्भुत सोहळा असतो. हा ज्ञानियांचा अनभिषिक्त महाप्रभू, कैवल्यसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट 'माउली' होऊन वारीच्या वाटेवर तुम्हां आम्हां सर्वसामान्य वारक-यांसोबत चालतो, प्रत्यक्ष आपले बोट धरून आपल्याला चालवतो; आपले सुखदु:ख समजून घेऊन, मायेची फुंकर मारून आपल्याला गोंजारतो आणि भरभरून प्रेमकृपादान देऊन आपले अवघे जीवनच त्या अपूर्व प्रेमरंगाने भारून टाकतो. हा दैवी सुखानुभव कोणत्या शब्दांत सांगता येईल बरे? शब्दांच्या कुबड्या, हो कुबड्याच त्या, त्यांचा काहीही उपयोग होत नाही या वारीच्या वाटेवर. इथे फक्त नि:शब्द अनुभूतीच बोलते, ती देखील एका अगम्य वाणीत, जी फक्त माउलींवर आणि त्यांच्या वारीवर जीवापेक्षा जास्त प्रेम करणारा सच्चा वारकरीच समजून घेऊ शकतो !!
आज ज्येष्ठ कृष्ण अष्टमी, मायमाउली जगज्जीवन सद्गुरु श्री ज्ञानोबारायांच्या पालखीचे प्रस्थान; म्हणजे आषाढीवारीच्या अद्भुत, अलौकिक आणि अतुलनीय आनंदसोहळ्याची सुरुवात. चला तर, आपणही आता सद्गुरु श्री माउलींच्या स्मरणात, वारीच्या या प्रेमवर्षावात चिंब चिंब भिजून, "ज्ञानोबा-तुकाराम"च्या गगनभेदी गजरात, आनंदातिरेकाने थरथरणा-या, डोलणा-या कळसाच्या साक्षीने, आळंदीच्या देऊळवाड्यातून माउलींसंगे भगवान पंढरीनाथांच्या दर्शनासाठी, त्यांच्याचसारखे अखंड आनंदमय होण्यासाठी प्रस्थान ठेवू या !!
माझ्यासोबत या शब्द-वारीला तुम्ही सर्वांनी तर याच; पण तुमच्या सर्व सुहृदांनाही यात सहभागी करून घ्या, त्यांच्यापर्यंतही हे लेखन व्हॉटसप, फेसबुक सारख्या विविध माध्यमांतून पोहोचवून, त्यांनाही तो स्वर्गीय आनंद सप्रेम अनुभवण्यास मदत करा, ही आग्रहाची विनंती !
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.in )

0 comments:

Post a Comment