29 Jun 2017

साठवणीतलीवारी_३

लागला टकळा पंढरीचा
वारी म्हणजे काय? परमाराध्य भगवान श्री माउलींच्या शब्दांत सांगायचे तर "सुखाची मांदुस" आहे वारी ! अपरंपार आनंदाचे हे गावच्या गाव मजल दरमजल करीत भूवैकुंठ पंढरीला निघालेेले आहे. त्या आनंदाच्या कल्लोळातला खरा ब्रह्मानंद आहेत साक्षात् भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज; पादुकारूपाने विसावलेला चैतन्याचा जिव्हाळा, कैवल्याचा पुतळा, कोवळिकेचा मळा, प्रेमाचा कळवळा ..... माझा ज्ञानोबा  !!!
जगात सर्वजण आनंदाकडे, आनंदासाठीच सतत धावत असतात. तो सापडतोच असे नाही. सापडला तर पूर्णपणे भोगताही येत नाही. कधी हातून निसटून जातो कळत देखील नाही. पण आमचा हा दैवी ब्रह्मानंद? अहो, हा स्वत:च सर्व सवंगड्यांना घेऊन आपल्या दारी येतो, आपल्या पाठी लागतो, मला पाहा, मला अनुभवा, माझा भोग घ्या, माझा आस्वाद घ्या असे म्हणत. हा माउलीरूप कैवल्यचंद्राचा अम्लान चांदणबहार पुरे म्हणायला उरत नाही आणि हवा म्हणून सरत नाही. याच वैकुंठीच्या अमृत-परगुण्याला आमच्या भगवान सद्गुरु श्री माउलींचा पालखी सोहळा म्हणतात. येथे येऊन जो प्रेमाने या महाप्रसादाच्या पानावर बसेल, तो देवदुर्लभ तृप्ती अनुभवूनच समाधानाच्या हाती आंचवतो. पण ही अनुभूती मात्र त्या सद्गुरु श्री माउलींच्याच कृपेने येते बरं का. ती कृपा झालेली नसेल तर मग वारीचा खरा आनंद काही जाणवतच नाही. वारी ही मग निव्वळ एक यात्राच होऊन बसते, तीही नाना कटकटींची. 
हे कैवल्याचे अलौकिक साम्राज्य जेव्हा आमच्या फलटणमधे विसावते ना, तेव्हाची स्थिती अवर्णनीयच असते. "ऐसा सुखसोहळा स्वर्गीं नाही" म्हणत आम्ही माउलींच्या स्वागतासाठी, खरेतर अपार विरहाने कातर होऊन माय-भेटीसाठी आसुसलेलो असतो. कधी एकदा ती त्रिभुवनपावन मायमाउली दृष्टीस पडते आणि सर्वस्वाचे बंधन तोडून, धावत जाऊन तिला मिठी मारून तिच्या मृदुमृदुल प्रेमअंकी बसतोय, अशीच मनाची कातर स्थिती होऊन जाते.
माझ्या लाडक्या माउलीलाही मला भेटण्याची अशीच उत्सुकता असेल का? हा प्रश्न अनाठायी असला, तरी क्षणभर येतोच हो मनात. ती नुसती लौकिक माय नाही, माउली पण आहे ना ! ती आपल्या कोणत्याही बाळाला कधीतरी विसरेल का? त्यात एखादे पोर अपंग असेल तर तिचा कळवळा अधिक पान्हावतो त्याच्यासाठी. शिवाय "तुका म्हणे जे येथे । तेथे तैसेचि असेल ॥" हा तर तिचा स्थायीभावच. हा विचार आला की मन शांत होते व पुन्हा तिच्या प्रेमात आणि त्या निरपेक्ष प्रेमाच्या मनावर गोंदलेल्या हळव्या आठवणीत मग्न होऊन जाते. या अशाश्वत जगातला हाच खरा शाश्वत सुखाचा विसावा; नाही का?
मी पहिल्यांदा वारीला गेलो १९९६ साली, दहावी झाल्यावर; तेही फलटणपासून पंढरपूरपर्यंत. पण त्याआधी माउलींचा फलटणचा मुक्काम एवढाच त्यांच्याशी, वारीशी माझा संपर्क होत असे. त्यामुळे माउली येणार म्हटले की तो दिवस शेकडो दिवाळी दस-यांसारखा वाटायचा. श्रीमंत बाळमहाराजांबरोबर दोनदा प्रस्थानाला तेवढा मी गेलो होतो. पण वारी सुरू झाल्यापासून दररोज न चुकता सकाळ मधील वारीची प्रत्येक बातमी मी अधाशासारखी वाचत असे. त्यावेळी आजच्या सारखा टीव्ही चॅनेल्सना वारीचा छंद लागलेला नव्हता, पण पेपरमध्ये मात्र माउली आणि तुकोबांच्या पालख्यांचे सविस्तर वृत्त येत असे. त्यावरच आम्ही तहान भागवायचो. सकाळी शिकवणीवरून आलो की, आधी पेपर ताब्यात घेऊन मी आमच्या स्वयंपाकघरातील ओट्यावर फतकल मारून बसायचो व नाष्टा करत करत बातम्या वाचून काढायचो. तेवढ्यानेही मी त्याच सोहळ्यात असल्याची अनुभूती मला येई.
भगवान श्री माउलींची पालखी आषाढ शुद्ध तृतीयेला फलटण मुक्कामी असते. काहीवेळा तिथीच्या वृद्धीमुळे दोन मुक्काम पडत असत. मग काय जास्तच मज्जा. तृतीयेला सकाळी केंदूरच्या श्रीसंत कान्हूराज पाठक महाराजांची पालखी आमच्या माउलींच्या मंदिरात येई. त्यांचे थोडावेळ भजन होई व मग ते पुढे निघून जात. त्यांचा सुंदर नक्षीकाम केलेला लाकडी रथ पहायला मला खूप आवडायचा. मी त्यांची दिंडी मंदिरात आली की धावत जाऊन दर्शन घेऊन यायचो. हे श्रीसंत कान्हूराज महाराज माउलींच्या काळातील, नागेश संप्रदायातील फार थोर विभूतिमत्व होते. माउली त्यांना प्रेमादराने 'काका' म्हणत असत म्हणजे पाहा. त्यांच्या हकिकती खूप जबरदस्त आहेत, पण त्यावर पुन्हा कधीतरी लिहीन. सद्गुरु माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात द्वादशीला सर्व संतमांदियाळी समोर त्यांची कीर्तनसेवा झाली होती, अशी नोंद सापडते. 
आपल्या मर्यादित मानवी, लौकिक प्रेमाला कधीच समजू शकणार नाही अशा; प्रेमाच्या अत्युच्च स्तरावरील या माउलीप्रेमाचा अगदी किंचित, कणभर स्पर्श सद्गुरुकृपेने लाभलाय. तेवढाच मला स्वर्गसुखाची अनुभूती सतत देतो आहे. माउलींनी आपल्या या प्रेमकृपेच्या मधाचे बोट लावून आजवर किती जीवांना वेडावून सोडलंय, कायमचे अंकित करून ठेवलंय, हे तेच एक जाणतात ! पण ही संख्या कोणत्याच गणिताच्या आवाक्यातली नाही, हे मात्र नक्की. आणि हेच वारीत समक्ष जाणवते. हे माउलींचे वेडेपण फार फार अद्भुत आणि हवेहवेसे वाटणारे आहे.
सद्गुरु श्री माउली दुपारी चार-साडेचारला वडजलचा विसावा घेऊन आमच्या तांबमाळावर येत. तत्पूर्वी मी तेथे जाऊन थांबत असे. रस्त्याच्या कडेला उभा राहून समोरून जाणारा वारक-यांचा मेळा पाहताना खूप आनंद होत असे. मी कधी असा वारीला जाईन? याचेच विचार मनात सतत तरळत असत. फार फार हेवा वाटायचा मला त्या पुण्यवान वारक-यांचा. अजूनही वाटतो !
सद्गुरु माउलींची पालखी आली की दर्शनासाठी गर्दी उसळायची. मी श्री.सुभाषराव शिंदे यांच्याबरोबर रथात चढून देवांना वंदन करायचो. पूजा झाल्यावर खाली उतरून मग मी पालखीबरोबर चालायला सुरुवात करी. तिथून फलटण चार-पाच किलोमीटर असल्याने साधारण दोन तासांत आम्ही पोहोचायचो. दोन तीन वर्षे असे नुसते चालल्यावर मी तळावर पालखीला खांदा द्यायलाही लागलो. पालखीला खांदा देणे हे माझ्यासाठी 'मर्मबंधातली ठेव'च आहे. या खांदा देण्यातले सुद्धा असंख्य अनुभव माझ्यापाशी आहेत. एक मोठा स्वतंत्र लेखच त्यावर होऊ शकेल.
पालखीला खांदा दिल्याची एक खूण उजव्या खांद्यावर उमटते. तशी छोटीशी खरचटलेली जखम माझ्याही खांद्याला व्हायची. ही हवीहवीशी वाटणारी हळवी खूण पुढे कित्येक दिवस श्री माउलींची तीव्र आठवण करून देत असे. खोटं सांगत नाही, त्या जखमेचा फार अभिमान वाटायचा मला आणि त्यामुळेच मी वारंवार त्या जखमेला गोंजारतही असे.
अहो, कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट या पालखीमध्ये प्रत्यक्ष बसलाय. राजा चाले तेथे वैभव सांगाते । असे म्हणतात. ते खरेही आहे. भगवान माउलींबरोबर त्यांचा सारा दृश्य-अदृश्य वैष्णवमेळाही आहेच. विठुरायाच्या प्रेमाने भारलेल्या, निरंतर आनंदाने बहरलेल्या माझ्या या सर्व हरिमय बांधवांना सादर वंदन. आणि तुम्हां-आम्हां सर्वांचेच परमाराध्य असणा-या महाभागवतोत्तम भगवान सद्गुरु श्री ज्ञानराज माउली महाराजांच्या नित्यश्रीर्नित्यमंगल श्रीचरणारविंदी अनंतानंतकोटी दंडवत प्रणाम  !!!!!
रोजच्या चालीने शिणवटा येतोच. त्यात असंख्य भक्तांची काळजी देखील वाहायची म्हणजे मग किती काम करावे लागत असेल? आमच्या या परमसुकोमल ज्ञानमाउलीला आमच्याचसाठी किती ते श्रम करावे लागतात नाही ! चला आपण सर्व मिळून आज मुक्कामी पोचल्यावर तिच्या श्रीचरणांना तेल लावून प्रेमाने मर्दन करू या आणि छान गरम पाण्याने शेकून तिचा सगळा शिणवटा दूर करू या. म्हणजे मग तिला शांत झोप लागून उद्याच्या प्रवासासाठी माउली ताजीतवानी होईल. आणि पुन्हा, "माझे जीवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥" म्हणत आपणही आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवत, तिच्यासोबत भूवैकुंठ पंढरीकडे मार्गक्रमण करू. 
माउलीराया, माझ्या तोडक्या मोडक्या, प्रेम-मायेची धड गादी उशीही नसणा-या आणि जर्जर झालेल्या हृदयमंचकावर शांत झोप येईल ना हो आपल्याला? आपल्याच कृपेने जशी जमेल तशी सेवा करतो आहे, गोड मानून घ्यावी, हीच लेकुरवाचेने कळकळीची प्रार्थना  !
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.in )

0 comments:

Post a Comment