29 Jul 2018

श्रीगुरुपौर्णिमा - उत्तरार्ध

श्रीसद्गुरुतत्त्व हे बोलाबुद्धीच्या पलीकडचे साक्षात् परब्रह्मस्वरूपच असते. श्रीसद्गुरूंच्या अनाकलनीय व निगूढ स्वरूपाचा थांग लागणे म्हणूनच अशक्य मानलेले आहे. श्री माउली म्हणतात की, मातेच्या गर्भातील जीव आपल्या आईचे वय जाणू शकत नाही. तसेच इथेही आहे. श्रीसद्गुरूंचे स्वरूप पूर्णपणे जाणणे कोणालाही कधीच शक्य नाही.
आपली जाण ही मायेच्या प्रांतातीलच असते. कारण आपली जाणण्याची सर्व साधने ही या जगातलीच आहेत आणि हे संपूर्ण जग तर मायेचाच विलास आहे. म्हणूनच मायेच्या पलीकडे असणारे सद्गुरुतत्त्व, आपण मायेचे अंकित असणारे जीव कधीच पूर्णपणे जाणू शकत नाही.
संतवाङ्मयाचे थोर अभ्यासक व शक्तिपातयोग परंपरेचे महान अध्वर्यू प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या गुरुवर्णनाच्या एका बहारीच्या अभंगाचा आपण विचार करीत आहोत. प.पू.श्री.दादांनी या विलक्षण रचनेतून गुरुतत्त्वाचे फार सुंदर असे सूत्रबद्ध विवरण केलेले आहे. काल त्याची आपण पूर्वपीठिका पाहिली. आज त्या अभंगातील पाचही चरणांचा संतांच्या चरित्रातील अद्भुत कथांच्या माध्यमातून सविस्तर विचार करू या. सोबतच्या लिंकवरील लेखात प.पू.श्री.दादांच्या गुरु नाही नाशिवंत । ह्या नितांतसुंदर अभंगाचे त्यांच्याच कृपेने अल्पसे विवरण करण्याचा सेवायत्न केलेला आहे. श्रीगुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ही शब्दसुमनांजली श्रीगुरुचरणीं प्रेमभावे समर्पितो व तेथेच विसावतो.
गुरु नाही नाशिवंत...उत्तरार्ध
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

28 Jul 2018

श्रीगुरुपौर्णिमा - पूर्वार्ध



आज श्रीगुरुपौर्णिमा !
तुम्हां-आम्हां सद्गुरुभक्तांचा सर्वोच्च सण, अत्यंत आनंदाचा दिवस.
प्रत्येक गुरुभक्त आजच्या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये. खरोखरीच, श्रीगुरुपैर्णिमेचा दिवस अत्यंत आनंदाचा व समाधानाचाच असतो.
आजचा परमपावन दिवस आपण आपल्या श्रीसद्गुरूंच्या स्मरणात, त्यांच्या अनुसंधानातच व्यतीत करायचा असतो व आपण तसेच करतोही. तोच खरा आनंदाचा ठेवा असतो.
श्रीसद्गुरु हे तत्त्व आहे. साक्षात् श्रीभगवंतांची परमकरुणामयी अनुग्रहशक्ती म्हणजेच श्रीसद्गुरु. ज्या देहाच्या आश्रयाने हे सनातन तत्त्व आपल्यावर कृपाप्रसाद करते तो पुण्यदेहही आपल्यासाठी नित्यवंदनीय, नित्यपूजनीयच असतो. देहाच्या आधाराने प्रकटलेल्या या मूळच्या विदेही परब्रह्माचे अर्थात् श्रीगुरुस्वरूपाचे आजच्या तिथीला आपण मनोभावे पूजन, वंदन, स्मरण, सेवा व दास्य करून आपला जन्म धन्य करायचा असतो. म्हणूनच, प्रत्येक गुरुभक्तासाठी श्रीगुरुपौर्णिमेचा हा महोत्सव विशेष आनंददायीच असतो.
श्रीगुरुतत्त्व हे बोलाबुद्धीच्या पलीकडचेच असल्याने त्याचे यथार्थ आकलन होणे केवळ अशक्यच आहे. तरीही विविध महात्म्यांनी आपल्या वाङ्मयातून आजवर या करुणाब्रह्माचा यथाशक्ती अनुवाद केलेला आहे. सद्गुरुतत्त्वाचे करुणामय स्वरूप, त्या तत्त्वाच्या विविध व्याख्या, त्याचे भेद व श्रीगुरूंचे अलौकिक कृपासामर्थ्य या सगळ्यांचा धांडोळा आजवरच्या अनुभवी संतांनी घेऊन ठेवलेला आहे. भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वरमाउली, प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांसारख्या महात्म्यांनी वर्णिलेल्या त्या विलक्षण श्रीगुरु-गुणगौरवाचा, प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्या एका भावगर्भ व सुमधुर अभंगाच्या माध्यमातून रसास्वाद घेण्याचा सादर प्रयत्न खालील लिंकवरील लेखात केलेला आहे. हा त्या लेखाचा पूर्वार्ध आहे. उत्तरार्ध आपण उद्या पाहू.
सर्वांच्या वतीने ही सप्रेम आणि भावपूर्ण शब्दसुमनांजली, करुणाब्रह्म श्रीसद्गुरूंच्या श्रीचरणीं श्रीगुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर सादर समर्पितो व त्याच अम्लान सर्वतीर्थास्पद श्रीचरणीं तुलसीदल रूपाने विसावतो.
गुरु नाही नाशिवंत...पूर्वार्ध
https://rohanupalekar.blogspot.com/2016/07/blog-post_19.html?m=1
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

25 Jul 2018

अशी ठेविली मूर्ति 'कल्याण'कारी

आज आषाढ शुद्ध त्रयोदशी, सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांचे स्वनामधन्य शिष्योत्तम आणि गुरुभक्तीची साक्षात् श्रीमूर्तीच असणा-या योगिराज सद्गुरु श्री कल्याणस्वामी महाराजांची आज ३०४ वी पुण्यतिथी.
श्री समर्थांची अपर-मूर्तीच असणारे श्री कल्याणस्वामी हे तुम्हां-आम्हां साधकांसाठी निरंतर आदर्शच आहेत. श्री कल्याणस्वामींचे समग्र चरित्र म्हणजे विलक्षण गुरुनिष्ठा व अलौकिक गुरुभक्तीचे महन्मंगल महाकाव्यच आहे. जो कोणी या कल्याण-चरित्रगंगेच्या काठी क्षणभर विसावेल, तिचे अमृतमधुर जल प्राशन करेल अथवा तिला मनोभावे वंदन करेल; तो अंतर्बाह्य आनंदमयच होऊन ठाकेल, एवढे अलौकिक सामर्थ्य तिच्यात आहे. आजच्या पावन दिनी आपणही या गंगौघाचा सप्रेम आस्वाद घेऊ या व आपलेही कल्याण साधू या.
श्री कल्याणस्वामींचे शिष्य तडवळ मठाचे श्री जगन्नाथस्वामी यांनी रचलेल्या कल्याण-नमनाच्या सुंदर अशा पाच श्लोकांमध्ये एक श्लोक फारच बहारीचा आहे. ते म्हणतात,
अविनाश हें नाम कल्याण ज्याचें ।
करी सर्व कल्याण सर्वा जिवांचे ।
समर्थें जनी ऊतरायासी पारी ।
अशी ठेविली मूर्ति कल्याणकारी॥३॥
"आमच्या सद्गुरुस्वामींचे 'कल्याण' हे नाम रामनामाप्रमाणेच अविनाशी असून, त्यायोगे असंख्य जीवांचे आजवर कल्याणच झालेले आहे. सद्गुरु श्री समर्थांनी या बुडत्या जनांना सुलभतेने भवसागरातून पार जाण्यासाठीच तर ही कल्याणकारी 'कल्याणमूर्ती' जगात सुप्रतिष्ठित करून ठेवलेली आहे. या श्रीमूर्तीच्याच कृपेने आम्हीही कल्याणधामी विसावलेलो आहोत. म्हणून आमचा स्वानुभवच गौरवाने कथन करतो की, कल्याणाचे नाम, कल्याणाचे ध्यान, कल्याणाची वाणी... सर्वकाही नावाप्रमाणे कल्याणकारीच आहे !"
कल्याणशिष्य श्री जगन्नाथस्वामींचे उपरोक्त वचन अक्षरसत्यच आहे. म्हणून आजच्या पावन दिनी आपणही श्री कल्याणचरणीं सादर साष्टांग दंडवतपूर्वक कृपायाचना करू या व आपले कल्याण साधू या.
सद्गुरु श्री कल्याणस्वामींच्या दिव्य चरित्रातील काही अद्भुत व भावमनोहर हकिकती खालील लिंकवरील लेखात संकलित केलेल्या आहेत, आपण त्यांचा आजच्या पावन दिनी आवर्जून मननपूर्वक आस्वाद घ्यावा ही विनंती.
धन्य 'कल्याण' रामदास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/07/blog-post_17.html
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

23 Jul 2018

देवशयनी आषाढी महाएकादशी

देवशयनी आषाढी महाएकादशी !
आम्हां वारक-यांसाठी दसरा दिवाळी पाडवा सगळे काही आजच. कटेवरी कर ठेवून समचरणी उभ्या राहिलेल्या त्या सावळ्या सुकुमार विठाईमाउलीचाही आजच महामहोत्सव. भक्तीप्रेमाचा कल्लोळ आणि हरिनामाचा अविरत जयघोष हेच आजच्या या भूवैकुंठ पंढरीच्या अलौकिक प्रेमहाटाचे स्वरूप आहे. ऐसा अन्यत्र कधी न पाहिला, न देखिला. एकमेवाद्वितीय, अलौकिक, अद्भुत सोहळा. ब्रह्मानंदाची अपूर्व अनुभूती; शब्दांच्या पलीकडची, अकल्पनाख्य !
श्रीसद्गुरुकृपेने पंढरीच्या या प्रेमसोहळ्याचे प्रस्तुत लेखामधून भावपूर्ण संस्मरण केलेले असून, भगवान श्रीपंढरीनाथांच्या स्वरूपाचा, त्यांच्या जगावेगळ्या भक्तवात्सल्याचा,  'पांडुरंग' या त्यांच्या नामाचा आणि भक्तांच्या भक्तिभावाचा यथोचित परामर्श देखील घेतलेला आहे. आजच्या पावन दिनी हरिनामाच्या गजरात आपण सर्वांनी याचा आस्वाद घेऊन श्रीविठ्ठलप्रेमात रंगून जाऊया  !
पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम !!!!!
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी
https://rohanupalekar.blogspot.com/2016/07/blog-post_15.html?m=1
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

22 Jul 2018

श्रीसंत गुलाबराव महाराज



आज आषाढ शुद्ध दशमी, श्रीज्ञानेश्वरकन्या प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराजांची आज १३७ वी जयंती.
सद्गुरु श्री गुलाबराव महाराज म्हणजे गेल्या शतकातला जिवंत चमत्कारच होते. अक्षरश: अलौकिकानेही तोंडात बोट घालावे इतके अद्भुत व अविश्वसनीय आहे त्यांचे अवघे चरित्र. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींची ही कन्या आपल्या धर्मपित्याची कूस धन्य करणारीच आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक दंडवत घालू या.
त्यांच्या दिव्य चरित्रावर व त्यांच्या माउलीप्रेमाने भारलेल्या एका बहारीच्या रचनेवर आधारित लेख खालील लिंकवर क्लिक करून वाचावा व त्यांच्या श्रीचरणीं भावपुष्पांजली समर्पावी ही सादर विनंती.

तयाचिये सेवे लागो हे जीवित
https://rohanupalekar.blogspot.com/2016/07/blog-post_14.html?m=1
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


19 Jul 2018

साठवणीतली वारी - ४

लहानपणापासून मी ऐकून होतो की, सद्गुरु श्री माउलींच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी मंदिराचा कळस हालतो. तसा तो हालताना पाहिलेले अनेक लोक नेहमीच भेटत असत. त्यांच्याकडून ऐकून ऐकून मलाही ते अद्भुत दृश्य पाहायची सतत तीव्र इच्छा लागून राहिलेली होती. आषाढी वारीचे दिवस जवळ आले की दरवर्षी वारीला जाणा-या लोकांची लगबग पाहूनही मी खूश व्हायचो. आपल्याला कधी वारीला जायला मिळेल, याचीच आस मला लागून राहिलेली होती. पण तेव्हातरी पालखीच्या फलटण मुक्कामाच्या दर्शनावरच तहान भागवावी लागत असे.
१९९२ साली मी नुकताच सातवीत गेलो होतो, तेव्हा पहिल्यांदा तसा योग जुळून आला. कै.श्रीमंत बाळमहाराज नाईक निंबाळकर हे श्रीमंत राणीसाहेबांचे धाकटे चिरंजीव. त्यांनीच राणीसरकारांची वारीची परंपरा पुढे टिकवली होती. ते माळकरीही होतेच. ते माउलींच्या मंदिरात ब-याचवेळा येत असत. मग मी त्यांच्याशी गप्पा मारायला तिथे जात असे. त्यांच्या तोंडूनही वारी, प्रस्थान वगैरे गोष्टी मी नेहमी ऐकत असे. १९९२ साली त्यांनी मला विचारले, "रोहन, येतोस का आळंदीला प्रस्थानासाठी?" मला एवढा आनंद झाला की बस. टुणकन् उडीच मारली मी तर. पण आळंदीला जाण्यासाठी सौ.आईची परवानगी काढावी लागणार होती. मी भरपूर मस्का मारलाच आईला, पण बाळमहाराजांनीही सौ.आईला सांगितले, "वहिनी, तुम्ही काळजी करू नका, मी सुखरूप नेऊन आणीन रोहनला." त्यामुळे आई कशीबशी तयार झाली.
त्यावर्षी २३ जून रोजी प्रस्थान होते. म्हणून मग २२ तारखेला मी बाळमहाराजांच्या सोनगावच्या बंगल्यावर मुक्कामाला गेलो. ते सोनगावच्या शेतातल्या बंगल्यावर राहात असत. तिथे भरपूर गाई होत्या. संध्याकाळी मी मनसोक्त गोठ्यात हुंदडलो. मला गाई अतिशय आवडतात. त्यांच्या सर्व गाई प्रेमळ होत्या. तिथे भरपूर तुळशीची झाडेही होती. तुळस पाहिली की आजही मला आनंद होतो. मी आळंदीला नेण्यासाठी भरपूर तुळशी काढून घेतल्या.
सकाळी आवरून नाष्टा वगैरे करून आम्ही निघालो. त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर हाजीमलंग म्हणून होते. त्यांचा माझा जुनाच परिचय होता. अजून एक दोन जणही होते आमच्यासोबत. त्यातल्या एका सरांनी बरोबर पोळ्या व भजी करून घेतली होती. आम्ही सोनगाव वरून मधल्या रस्त्याने मोरगाव जेजुरी मार्गाने पुण्याला व तिथून पुढे आळंदीला गेलो.
वाटेतला एक गमतीशीर प्रसंग आठवतो मला. त्या सरांची चविष्ट भजी खाऊन मी बाळमहाराजांच्या कानात हळून बोललो, "अहो, यांना ऐनवेळी बरोबर यायला सांगितले तर त्यांनी इतकी मस्त भजी करून आणली. आपण पुढच्यावेळी त्यांना आधीच सांगू, म्हणजे ते आणखी छान डबा सोबत घेऊन येतील आपल्यासाठी." बाळमहाराजांना माझ्या या टिप्पणीने अनावर हसू आले व त्यांनी लगेच मागे वळून गाडीत बसलेल्या सर्वांना ते सांगून पण टाकले. मला तर मेल्याहून मेल्यासारखेच वाटले त्यावेळी. बघा, माझा हा मिश्कीलपणा (डांबरटपणाच म्हणा हवंतर...) असा अगदी लहानपणापासूनच उतू जात असे.
(http://rohanupalekar.blogspot.in)
आम्ही साधारण कलत्या दुपारी आळंदीत पोचलो, तीनच्या सुमारास. त्यावेळी अाळंदी वारक-यांनी तुडुंब भरलेली होती. सगळे रस्ते नुसते वाहात होते वारक-यांनी. भजनाच्या कल्लोळाने, टाळमृदंगांच्या निनादाने दुमदुमलेली होती अवघी आळंदी. अकराव्या वर्षी मला या आनंदसोहळ्याचे पहिल्यांदा दर्शन लाभले.
बाळमहाराजांनी माझा हात घट्ट धरून ठेवलेला होता. गर्दीतून वाट काढत आम्ही माउलींच्या देऊळवाड्यात पोचलो. सगळे हैबतबाबांच्या ओवरीत जाऊन बसलो. बाहेर दिंड्यांचे भजन चालू होते. मी भारावून जाऊन तो सगळा सोहळा डोळ्यांत साठवत होतो. समोरच माउलींचे शिखर दिसत होते. सारखा सारखा मी त्याच्याकडेच पाहात होतो. कारण मला तो कळस हालतानाचे दृश्य पाहायची तीव्र उत्कंठा लागून राहिलेली होती.
माउलींचे चोपदार बोलवायला आल्यावर बाळमहाराज प्रस्थानाच्या कार्यक्रमासाठी मंदिरात गेले. गर्दी म्हणून त्यांनी मला मात्र नेले नाही. त्यामुळे मी पार हिरमुसलो. पण लहान असल्यामुळे काहीच बोलू शकलो नाही. मग हैबतबाबांच्या ओवरीतच बसून तो अद्भुत आनंदसोहळा मी पुरेपूर अनुभवला.
बाहेर चालू असलेला ज्ञानबा-तुकारामचा गजर टिपेला पोचलेला होता. सगळे वारकरी मोठ्या आनंदाने समरसून भजनात मग्न झालेले होते. कोणी पावली खेळत होते तर कोणी मनोरा करून त्यावर चढून पखवाज वाजवत होते. मधेच माउली माउली.... असा गगनभेदी जयजयकार व्हायचा. माउलींच्या द्वारी शोभून दिसणा-या सुवर्ण पिंपळाचाही आनंद पोटात मावत नव्हता. त्यामुळे भजनाच्या तालाला तोही सळसळून दाद देत होता. तो बिचारा नाचू शकत नव्हता ना. एवढा उदंड उत्साह व भारावलेले वातावरण मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो. ते दृश्य पाहूनही विलक्षण आनंद मिळत होता. आज नुसत्या त्या प्रसंगाच्या स्मरणानेही तेवढाच आनंद मिळतो आहे.
भजनाच्या त्या गोंधळातच प्रस्थानाचा सोहळा उरकला. मला तर काही कळलेच नाही. कळस हालतानाही दिसला नाही. म्हणजे तो कधी हालला ते मला समजलेच नाही. भजन ऐकू की पावली पाहू, भजनात रंगलेले वारकरी न्याहाळू की ज्ञानोबा-तुकारामचा गजर करू, हेच मला त्यावेळी सुधरत नव्हते. एखाद्या खेड्यातल्या माणसाला एकदम मुंबईच्या स्टेशनवरील सकाळच्या गर्दीत सोडल्यावर कसे होईल ना, तसेच माझे झाले होते. जे मी अनेक वर्षे केवळ कल्पनेच्या नेत्रांनी मनाच्या पडद्यावरच पाहात होतो, ते सर्व आता मला माझ्या डोळ्यांसमोर घडताना दिसत होते. भंजाळून गेलो होतो मी पूर्ण. आतून आनंद तर प्रचंड होत होता. आनंद पोटी माईना माईना... अशीच माझी अवस्था झालेली होती. तो वारीचा पहिला-वहिला अनुभव माझ्यासाठी तरी फारच अद्भुत होता. आजही त्याची सय आतून तेवढ्याच आनंदाच्या उकळ्या निर्माण करते. श्री तुकोबाराय म्हणतात ते काही खोटे नाही, "करील ते काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगी ॥" माउली खरोखरीच ग्रेट आहेत !
थोड्या वेळाने बाळमहाराज मंदिरातून ओवरीत आले. त्यांनी माउलींच्या पालखीतला बुक्का माझ्या कपाळावर लावला व आम्ही तेथून बाहेर पडलो.
या पहिल्या भेटीत माउलींनी मला साधे दर्शनही दिले नाही; ना समाधीचे ना पालखीचे. फक्त तो अपरंपार दिव्य सोहळा जवळून पाहायला मात्र मिळाला. बहू दिवस मनी वागविलेले आर्त काही प्रमाणात तरी पूर्ण झाले. माउलींच्या पालखीसोहळ्याचे जनक व माउलींचे निष्ठावंत भक्त, श्री हैबतरावबाबा आरफळकर यांच्या ओवरीतील पादुकांचेच दर्शन फक्त मला त्या दिवशी झाले. बहुदा माझ्या गाठीचे पुण्य तेवढेच असावे त्यावेळी. महाद्वारातून माउलींच्या मंदिराला नमस्कार करून आम्ही बाहेर पडलो व फलटणला परत आलो.
पण त्या पहिल्याच भावपूर्ण दर्शनाने माउली आणि त्यांची वारी माझ्या मनात पक्के घर करून राहिले, हे मात्र अगदी खरे. त्या बुक्क्याच्या माध्यमातून भगवान सद्गुरु श्री माउलींनी माझ्या ललाटीचे नियतीने लिहिलेले लेख पुसून, त्यांच्या मनाजोगते काही तिथेे लिहिले असावे. माझी तरी तशीच धारणा आहे. कारण त्यावेळी त्यांनी माझ्या मनाचा एक कोपरा जो पकडला, तो आजवर कधी सोडलाच नाहीये आणि पुढेही कोणत्याच जन्मात ते सोडणार नाहीत याची देखील श्रीसद्गुरुकृपेने मला आता खात्री वाटते आहे ! मी देखील त्यांचे श्रीचरण सोडू इच्छित नाही व श्री तुकोबारायांच्या शब्दांत वारंवार कळवळून प्रार्थना करतो आहे, 
तुझे दारीचा कुतरा ।
नको मोकलूं दातारा ॥१॥
धरणे घेतले द्वारात ।
नको उठवूं धरूनि हात ॥२॥
http://rohanupalekar.blogspot.in
( छायाचित्र संदर्भ : प्रस्थानानंतर देऊळवाड्यात प्रदक्षिणा चालू असताना पिंपळवृक्षाखाली टिपलेले सद्गुरु श्री माउलींच्या पालखीचे राजस रूप. श्रींच्या सुकुमार चरणपादुकाही त्यात स्पष्ट दिसतात. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

18 Jul 2018

साठवणीतली वारी - ३



श्रीसंत नामदेवराय आपल्या एका नितांतसुंदर अभंगात पंढरीचे माहात्म्य अतीव प्रेमाने सांगताना म्हणतात,
सर्व सुखरासी भीवरेचे तीरीं ।
आमुची पंढरी कामधेनु ॥१॥
प्रेमामृते दुभे सदा संतजनां ।
वोसंडतो पान्हा नित्यनवा ॥२॥
धर्म अर्थ काम मोक्ष चा-हीं थानें ।
दोहोणार धन्य पुंडलीक ॥३॥
जीयेचे दुभते नित्य नवे वाढें ।
बहुं पंढरीत पूर्वपुण्य ॥४॥
भक्तिचेनि बळे भावाचेनि मेळें ।
देखोनिया बोले बहु फार ॥५॥
भाग्यवंत नामा तें क्षीर लाधला ।
प्रेमें वोसंडला गर्जे नामा ॥६॥
श्री नामदेवराय म्हणतात, "भीवरेच्या तीरी पंढरी नगरीत अद्भुत सुखाची राशी आमच्या पांडुरंगांच्या रूपाने प्रकटलेली आहे. त्यांच्या त्या पावन अधिष्ठानाने पंढरीच कामधेनू होऊन आमचे सकल मनोरथ पुरवीत आहे. ही पंढरीरूप कामधेनू अवीट गोडीचे प्रेमकृपारूप दुभते सतत दुभत असते. विठ्ठलमय झालेल्या संतांसाठी ती आपला नित्यनवा प्रेमपान्हा अविरत स्रवत असते. म्हणूनच, धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार स्तन असणारी ही अलौकिक कामधेनू व तिचे दोहन करणारे भक्तराज पुंडलीक दोघेही धन्य होत. या कामधेनूचे दुभते पूर्वपुण्याईच्या बळावर रोज वाढतच जाते, जसजसे उपासनेेने ते शुद्ध पुण्य वाढते तसे हिचे दुभतेही वाढतेच. आपल्या भक्तीच्या बळावर व त्या भक्तीला सद्गुरुकृपेने लाभलेल्या भावाच्या प्रसादामुळे हे अपूर्व गोडीचे प्रेममय दूध अधिकाधिक प्रमाणात चाखता येते, जितके चाखावे तितकी याची गोडी व इच्छा वाढतच जाते. सद्गुरु श्री विसोबांच्या कृपानुग्रहाने लाभलेले हे प्रेमक्षीर आकंठ प्यायल्याने खरे भाग्यवान ठरलेले नामदेवराय, अत्यंत आनंदित होऊन जोरजोरात हरिनाम गर्जत आपला अनुभव सगळ्यांना येथे सांगत आहेत."
खरोखरीच, पंढरीची वारी हा अद्भुतानंदाचा अलौकिक सोहळा आहे, त्याची गोडी इतकी अपूर्व-मनोहर आहे की, ती शब्दांनी सांगताच येत नाही. त्यासाठी या आनंदसोहळ्याचा एकदातरी स्वत: अनुभवच घ्यायला हवा.
सद्गुरुकृपेने मला हा दिव्य सोहळा बालपणापासूनच सप्रेम अनुभवता आला. माझ्या त्या मधुमधुर अनुभूतीचेच सद्गुरु श्री माउली माझ्या बोबड्या लेकुरवाचेकडून या लेखमालेद्वारे स्तवन करवून घेत आहेत. हे माझे परमभाग्यच समजतो मी.
आमच्या माउलींच्या या स्वर्गीय स्तन्यपानासाठी तुम्हां सर्वांनाही माझे मन:पूर्वक हे आमंत्रणच आहे. भाग्याची परिसीमा ठरणारा ह्या पंढरीवारीच्या स्तवन-दुग्धाचा हा फेसाळता तिसरा चषक तुम्ही सर्वांनी देखील प्रेमभावे आस्वादून माझ्या आनंदात सहभागी व्हावे हीच सदिच्छा !

साठवणीतली वारी - ३

https://rohanupalekar.blogspot.com/2017/06/blog-post_29.html?m=1

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

17 Jul 2018

साठवणीतली वारी - २



भगवान श्रीपंढरीरायांचे प्रेमभांडारी भक्तराज श्री नामदेवराय पंढरीचे निष्ठावंत भक्त होते. त्यांना पंढरी व पंढरीनाथांचा विरह अजिबात सहन होत नसे. त्या विरहाच्या भीतीने ते साक्षात् माउलींसह तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळूनही नाखूशच होते. मग प्रत्यक्ष देवांनी समजूत काढल्यावर ते तयार झाले. त्यांच्या गाथ्यात पंढरीचे माहात्म्य सांगणारे फार अप्रतिम अभंग आहेत. पंढरीचे व वारीचे प्रेम असणारा कोणीही सद्भक्त ते वाचून घळघळा रडेल. त्यातील एका अभंगात ते पंढरीच्या निष्ठावंत वारक-याचे महिमान गाताना म्हणतात,
पंढरीची वारी जयाचिये कुळी ।
तयाची पायधुळी लागो मज ॥१॥
तेणे त्रिभुवनी होईन सरता ।
नलगे पुरुषार्था मुक्ति चारी ॥२॥
पंढरीच्या वारक-याची परमपावन चरणधुली मस्तकी धारण केल्याने मी त्रिभुवनात श्रेष्ठ ठरेन. त्या सुखासमोर धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ व सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या चारी मुक्तींची सुद्धा काहीच मातब्बरी नाही. किती गोड भावना आहे पाहा श्री नामदेवरायांची वारक-यांप्रति !
अशा या भूवैकुंठ पंढरीच्या वारीचे व भगवान श्री माउलींच्या सेवेचे महत्त्वपूर्ण संस्कार लहानपणी माझ्यावर ती.कै.सौ.भागीरथीबाई उडपीकर यांनी केले. त्यांच्या स्मृतीस आज पुन्हा सादर अभिवादन करतो. ती.भागीरथीबाईंच्या त्या भावपूर्ण स्मृतिकथा व फलटणच्या श्री माउलींच्या मंदिराचा इतिहास साठवणीतली वारी च्या दुस-या लेखात लिहिला होता. सदर लेख खालील लिंकवर जाऊन वाचावा ही विनंती.

साठवणीतली वारी - २
https://rohanupalekar.blogspot.com/2017/06/blog-post_21.html?m=1

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

16 Jul 2018

साठवणीतली वारी - १

साठवणीतली वारी 

सप्रेम जय हरि !!
आज आषाढ शुद्ध तृतीया, भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा फलटण मुक्काम  ! आमचे लाडके ज्ञानेश्वर माउली आज आमच्या गावात आपल्या आनंदसोहळ्यासह मुक्कामास येणार. स्वर्ग वगैरे केवळ कल्पनाच ठराव्यात या अद्भुत आनंदासमोर, खरंच सांगतो !
माउलींची वारी हा माझ्या हृदयीचा अत्यंत देखणा व कधीही न कोमेजणारा, नित्यसुगंधी असा मनमोहक फुलांचा ताटवा आहे. या प्रेमबागेत शिरले की घड्याळच काय, काळही बाहेरच राहून जातो; उरतो तो केवळ माउलींच्या अद्भुतानंदाचा सतत हवाहवासा वाटणारा, मोगरा-सोनचाफा-चंदनाचा संमिश्र सुगंध ल्यालेला प्रसन्न प्रेमाविष्कार, कालातीत आणि शब्दातीत ! सद्गुरु श्री माउलींनी एकाहाती साकारलेले हे प्रेमनाट्य जन्मजन्मांतरी पुरून उरेल इतके जबरदस्त आहे. आठवणींच्या पडद्यावर कधीही हे पाहावे, अस्वस्थ करणारा अवघा भोवताल विसरून जीव त्यात वेडावला नाही तरच नवल.
श्रीसद्गुरुकृपेने हृदयकुपीतील या आनंदविश्वाचे विहंगमावलोकन साठवणीतली वारी या लेखमालेतून घडले. गेल्यावर्षी त्यातले तीनच लेख लिहून झाले. आता मनात येते आहे की, पुढील लेखनही करावे. निदान वारी चालू आहे तोवर दोनतरी लेख अजून लिहावेत. सद्गुरु श्री माउलींची करुणाकृपा झाली तर नक्कीच ही सेवाही हातून घडेल. त्याद्वारे माझ्यासोबत तुम्हांलाही वारीच्या या स्मरणयात्रेत सहभागी होता येईल. त्यासाठीच हे प्रेमाचे निमंत्रण.
'साठवणीतली वारी' चा पहिला लेख खालील लिंकवर आहे. लेखमालेची तीच सुरुवात असल्याने पुन्हा आधीचे तीन लेख क्रमाने पाहूया व मग नवीन लेखांकडे वळू या.
आमच्या फलटणच्या माउलींच्या आनंदसोहळ्यात सहभागी होण्यासाठी आज सर्वांनी जरूर यावे.

साठवणीतली वारी - १

https://rohanupalekar.blogspot.com/2017/06/blog-post_19.html?m=1

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

14 Jul 2018

अलौकिक स्वामीकला

करुणाब्रह्म

नमस्कार !!
आज आषाढ शुद्ध द्वितीया, 'श्रीपाद जयंती'चे महापर्व आहे ! भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे महाराजांची आज १०४ वी जयंती आहे.
प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी मंगळवार दि.२३ जून १९१४ रोजी आषाढ शुद्ध प्रतिपदा लागल्यावर, रात्री साडे अकराच्या सुमारास गरुडेश्वर येथे देहत्याग केला. त्यांनी पूर्वीच प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे यांना नृसिंहवाडी मुक्कामी 'कुलोद्धारक पुत्र होईल', असा आशीर्वाद देऊन ठेवला होता. त्याचवेळी "काही अडचण भासल्यास श्रीचरणांचे मनोभावे स्मरण करावे", असेही सूचक उद्गार श्रीस्वामींनी काढले होते. त्याचा प्रत्यय प.पू.मातु:श्रींना लवकरच आला. २३ जूनच्या संध्याकाळी मातु:श्रींना प्रचंड प्रसववेदना होऊ लागल्या. काहीकेल्या त्या वेदना शमेनात. शेवटी रात्री त्यांनी कळवळून प.प.श्री.स्वामीमहाराजांची प्रार्थना केली. त्याबरोबर भक्तकरुणाकर श्रीस्वामी महाराज पुण्यातील त्यांच्या घरात सदेह प्रकट झाले व म्हणाले, "बाळ, घाबरू नकोस. या वेदना आता शमतील. आम्ही थोड्याच वेळात देह ठेवतो आहोत. परवा सकाळी तुला आमच्याच अंशाने पुत्र होईल, त्याचे नाव 'श्रीपाद' ठेवावे. तुझे कल्याण असो", असे म्हणून आशीर्वादाची मुद्रा करून श्रीस्वामी महाराज अदृश्य झाले. त्यावेळी इकडे गरुडेश्वरला खरेतर त्यांनी निरवानिरवीचे बोलून डोळे मिटून घेतलेले होते. तेवढ्यात पुन्हा डोळे उघडले. तेव्हा समोर बसलेल्या शिष्योत्तम श्री.शंकरकाका देशमुख आजेगावकर यांनी विचारले असता, "भक्तकार्यार्थ जाऊन आलो", असे स्वामी महाराज उत्तरले व त्यांनी देहत्यागाची लीला केली. प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी गुरुवार दि.२५ जून १९१४ रोजी सकाळी ९.२९ मिनिटांनी पुनर्वसू नक्षत्रावर प्रसूत झाल्या व श्रीपादांचा जन्म झाला. नेमके अगदी त्याचवेळी, साडेनऊ वाजता गरुडेश्वरी स्वामींचा पुण्यपावन देह नर्मदेत विसर्जित केला गेला. तिकडे स्वामीकुडी नर्मदामैयाच्या कुशीत विसावली तर इकडे स्वामीकला पार्वतीमातेच्या कुशीतून पुनश्च अवतरली; भक्तवत्सल श्रीस्वामी महाराजांचे भक्तोद्धाराचे कार्य अक्षुण्ण ठेवण्यासाठी !
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे साक्षात् श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजच होते; याचा आजवर अनेक भाग्यवान भक्तांनी अनुभव घेतलेला आहे. कांचीपीठाधीश्वर परमाचार्य जगद्गुरु श्रीमत् चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराज प.पू.श्री.मामांना 'प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज' असे संबोधूनच त्यांच्याशी संवाद करीत असत. श्री.रंगावधूत महाराजांचे शिष्योत्तम असलेल्या कोसंब्याच्या प.पू.पंडितजी कुलकर्णी महाराजांना प.पू.श्री.मामांच्या ठायी नेहमीच प.प.श्री.स्वामी महाराजांचे दर्शन होत असे. पू.मामांच्या जागी प्रत्यक्ष श्रीस्वामी महाराजांचे दर्शन लाभलेले काही भाग्यवान भक्त आजही हयात आहेत. अशा या अलौकिक श्रीदत्तात्रेयस्वरूपाच्या, श्रीपादरायांच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त सादर साष्टांग दंडवत !
आपल्या सद्गुरूंचे अलौकिकत्व अतिशय भावगर्भ शब्दांत मांडताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज आणि सद्गुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांची पूर्ण कृपा लाभलेले प.पू.श्री.श्री.द. उपाख्य मामासाहेब देशपांडे हे विसाव्या शतकातील एक लोकोत्तर विलक्षण व्यक्तिमत्त्व होय. श्रीदत्त संप्रदाय, श्रीनाथ संप्रदाय आणि भागवत संप्रदायांचे अध्वर्यू तसेच वैदिक प्राचीन शक्तिपात योगविद्येचे महान आचार्य म्हणून ते विश्वविख्यात आहेत. संतसाहित्याचा त्यांचा गाढा व्यासंग आणि कल्पनातीत अपूर्व असे चिंतन सर्वश्रुतच आहे. संतवाड्मयावरील त्यांचे रसाळ निरूपण भल्याभल्यांना अंतर्मुख व्हायला लावणारे, थक्क करून सोडणारे आणि भगवत्सेवेची अवीट गोडी हृदयात निर्माण करविणारे आहे.
प.पू.श्री.दत्तोपंत देशपांडे आणि प.पू.मातु:श्री सौ.पार्वतीदेवी देशपांडे या परमार्थातील थोर अशा मात्या पित्यांच्या पोटी जन्माला आलेले प.पू.श्री.मामा दैवीगुणसंपदा आणि प्रेममाधुर्याचे झळाळते मेरुशिखरच होते. ऐन तारुण्यात स्वातंत्र्य चळवळीत उडी घेऊन त्यांनी केलेली थोर राष्ट्रसेवा आणि त्यानंतर लोकसेवा, लोकोद्धारासाठी वेचलेले उर्वरित आयुष्यातील क्षण अन् क्षण जवळून पाहू गेलो तरी माथा त्यांच्या चरणी आदराने, कृतज्ञतेने लवतो. बुडतिया जनांचा आत्यंतिक कळवळा असलेली ही महान विभूती जगावेगळी असूनही जगातच रमली; जगाच्या कल्याणातच भगवत्पूजा बघून अविश्रांत कष्टत गेली; अनेकांच्या अंधकारमय आयुष्यात प्रेमदीपच उजळीत राहिली.
प.पू.मातु:श्री पार्वतीबाई देशपांडे आणि प.पू.योगिराज श्री.वा.द.गुळवणी महाराज; या आपल्या समर्थ सद्गुरुद्वयींकडून मिळालेला परमार्थाचा अतिदिव्य आणि तेजस्वी वारसा जोपासत त्यांनी अनेक जीवांना आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. जगभर विखुरलेल्या त्यांच्या हजारो साधकांच्या हृदयात त्यांच्या विभूतिमत्वाची, दैवीसंपदेची, अवतारित्वाची कोरली गेलेली सुमधुर स्मृतिचित्रे त्यांच्या सत्कीर्तीची उज्ज्वल पताका झळकवीत, त्यांची नित्य यशोगीतेच गुणगुणत आहेत."
आदर्श पुत्र, आदर्श शिष्य, आदर्श पती, आदर्श भक्त, आदर्श लोकशिक्षक व आदर्श सद्गुरु असे आदर्शांचेही परमादर्श असणारे प.पू.श्री.मामांचे समग्र चरित्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहे. तुम्हां-आम्हां परमार्थसाधकांनी ते चरित्र सदैव डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करावी असेच आहे.
लवकरच आपण प.पू.श्री.मामांच्या चरित्र व वाङ्मयाच्या सर्वांगीण अभ्यासासाठी तसेच प्रचार व प्रसार कार्यासाठी एक नवीन संकेतस्थळ सुरू करीत आहोत. या स्थळावर प.पू.श्री.मामांशी संबंधित सर्व माहिती, त्यांच्या वाङ्मयावरील अभ्यासकांचे चिंतन, पू.मामांची बोधवचने, त्यांच्या स्मृतिकथा व बोधप्रसंग, प.पू.मामांची विविध छायाचित्रे असे भरपूर साहित्य सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. भविष्यात सर्वांना या संकेतस्थळाचा सातत्याने अधिकाधिक उपयोग करता येईल.
प.पू.श्री.मामांच्या ठायी फार मनोहर असे गुरुतत्त्व प्रकटलेले होते. भगवान श्रीदत्तात्रेयांचे अतिशय अद्भुत असे करुणामय स्वरूप म्हणजेच प.पू.श्री.मामा !! याच संदर्भातला एक जगावेगळा अनुभव सोबतच्या लिंकवरील लेखात मांडलेला आहे. प.पू.श्री.मामा भगवान सद्गुरु श्री माउलींना मोठ्या प्रेमादराने 'करुणाब्रह्म' म्हणत असत. सद्गुरु श्री माउलींच्या कृपेने प.पू.श्री.मामाही अंतर्बाह्य करुणाब्रह्मच होऊन ठाकलेले होते. त्याचाच भावगहिरा प्रत्यय प्रस्तुत लेखातील, प.पू.श्री.शिरीषदादांनी स्वत: अनुभवलेल्या गोष्टीतून आपल्याला येतो. म्हणूनच, आजच्या पुण्यदिनी प.पू.श्री.मामांच्या श्रीचरणीं या लेखाच्या वाचनाद्वारे आपण भावपुष्पांजली समर्पूया व त्यांच्याच सप्रेम स्मरणात मग्न होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर


13 Jul 2018

श्रीवासुदेवो जयति !!

श्रीवासुदेवो जयति !!
आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, पंचम श्रीदत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांची १०४ वी पुण्यतिथी.
प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांना मोठ्या आदराने 'थोरले महाराज' म्हटले जाते व ते पूर्णपणे यथार्थ आहे. श्रीदत्तसंप्रदायाच्या आजच्या सुघटित स्वरूपामागे त्यांचेच अथक परिश्रम आहेत. त्यांनी आसेतुहिमाचल परिभ्रमण करून संन्यासधर्माचा आदर्श प्रस्थापित केला. आपल्या वर्तनातून एक परम आदर्श आणि पूर्णपणे रंगलेला श्रीदत्तभक्त साकारला. श्रुती-स्मृती-पुराणांना अभिप्रेत असणारा व करुणेची साकार मूर्तीच असणारा यथार्थ महात्मा त्यांच्या रूपाने साठ वर्षे भारतभूमीला पावन करीत होता. आजच्या तिथीला त्यांनी आपल्या नश्वरदेहाचा त्याग केला असला, तरी अव्यक्तातून त्यांनी आपले कार्य आजही सुरू ठेवलेलेच आहे. त्यांच्याच पुण्यपावन पदचिन्हांचे अनुसरण करीत लक्षावधी भाविकभक्त आजही श्रीदत्तकृपा संपादन करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील.
प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या असंख्य रचना आजही सुप्रसिद्ध आहेत. पण त्यातील 'करुणात्रिपदी' व 'श्रीदत्तात्रेयप्रार्थनास्तोत्र' म्हणजेच 'घोरकष्टोद्धरण स्तोत्र' ह्या दोन रचना सर्वात जास्त प्रसिद्ध झालेल्या आहेत. या अत्यंत प्रभावी व मंत्रमय रचनांचे कोट्यवधी भक्तांनी अत्यंत अद्भुत व अलौकिक अनुभव घेतलेले आहेत. ह्या दोन रचना जणू श्रीमत् टेंब्ये स्वामी महाराजांचे जनमानसावरील प्रचंड मोठे कृपाऋणच आहे.
प.प.श्री.थोरल्या महाराजांच्या करुणात्रिपदी बद्दल गेली काही वर्षे खूप चुकीची व खोटी माहिती सोशल मिडियामधून प्रसारित होत होती. त्यामुळे मी पूर्वी 'करुणात्रिपदीची जन्मकथा' या नावाचा एक लेख लिहिला होता. त्यानंतर गेल्यावर्षी 'भावार्थ करुणात्रिपदीचा' हा लेख अचानकच लिहीला गेला. तसेच प.प.श्री.थोरल्या महाराजांच्या चरित्रावर आधारलेला एक छोटा लेखही पूर्वीच लिहिलेला होता. खालील ब्लॉगलिंकमधे हे तिन्ही लेख आपण वाचू शकता.
करुणात्रिपदी दररोज म्हणणारा फार मोठा भक्तवर्ग आहे. त्या भावपूर्ण रचनेचा अर्थ लक्षात घेऊन जर हे पठण घडले तर नक्कीच अधिक आनंददायक व समाधानकारक ठरेल यात शंका नाही. म्हणूनच सर्वांना मनापासून प्रार्थना करतो की, खालील लिंकवरील तिन्ही लेख आजच्या पुण्यतिथीच्या पावन दिनी आवर्जून वाचावेत व परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं मनोभावे स्मरणांजली समर्पावी. आपल्या सुहृदांनाही हे आवर्जून वाचायला द्यावे ही विनंती.

https://rohanupalekar.blogspot.com/2017/06/blog-post_39.html?m=1

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


11 Jul 2018

चालते-बोलते विद्यापीठ



संत हे चालते बोलते विद्यापीठच असतात. त्यांच्या प्रत्येक वागण्या-बोलण्यातून आपल्यासारख्या सामान्य जनांना सतत बोधामृत मिळत असते. जो साधक डोळसपणे संतांच्या उपदेशाचे व लीलांचे अनुसंधान ठेवून त्यातून लाभलेल्या अशा अद्भुत बोधकणांचा आपल्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक वापर करतो, तो निश्चितच सुखी व समाधानी आयुष्य जगतो. त्याचा प्रपंचही त्यामुळे नकळतच परमार्थमय होऊन जातो. यासाठीच परमार्थमार्गात या संतबोधाला विशेष माहात्म दिलेले दिसून येते. 'संतसंगती' हा परमार्थ-प्रवासाचा कणाच आहे असे म्हटले जाते, ते वावगे नाही.
श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे तर आदर्श लोकशिक्षकच होते. अत्यंत शास्त्रपूत आणि विशुद्ध अशी जीवनशैली अंगीकारून त्यांनी सद्धर्माचा परमादर्श लोकांसमोर ठेवला. आजच्याही काळात फारसे कष्ट न होता आवश्यक असे शास्त्राचरण नक्की करता येते, याचा उत्तम वस्तुपाठच त्यांनी आपल्या स्वत:च्या वर्तनातून जगासमोर ठेवलेला आहे. अशाप्रकारे उभी हयात त्यांनी साधकांचे सर्वांगीण कल्याण करण्यात वेचली. परमार्थपूरक जीवनशैली कशी असावी? हे नीट समजून घेण्यासाठी प.पू.श्री.मामांच्या जीवनचरित्राचा अभ्यास जरूर करावा.
प.पू.श्री.मामांच्या दिनक्रमातील त्यांची एक अगदी छोटीशीच; पण आपणही दररोज सहज पालन करू शकू, अशी उत्तम सवय श्री.नारायणराव पानसे यांनी आपल्या ब्रह्मानंद ओवरी ग्रंथात सांगितलेली आहे.
"जेवण झाल्यावर प.पू.श्री.मामा आचमन करून खाली येत. खाली उतरल्यावर, देवांना नमस्कार करून त्यांच्या खांबापुढील आसनावर (आता ज्या ठिकाणी प.पू.श्री.मामांचा मोठा फोटो ठेवलेला आहे तेथे ) बसत. "भोजनोत्तर देवांना नमस्कार एवढ्याकरिता की, दोन वेळेला जे काही चार घास आपल्या पोटात जातात, ते देवांच्या कृपेमुळेच जातात !" असा खुलासा प.पू.श्री.दादांनी माझ्याजवळ एकदा केला होता. जेवण झाल्यावर देवांना नमस्कार करण्याची प.पू.सौ.शकाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचीही जुनीच सवय आहे, हेही मी पाहिले आहे."
पाहा, अगदी छोटीशीच गोष्ट; पण जर ही सवय आपण स्वत:ला लावून घेऊन निष्ठेने सांभाळली तर किती समाधान देईल ना? आठवणीने नमस्कार तर फक्त करायचाय जेवल्यावर. त्यामुळे ही इतकी साधी व सोपी सवय लावून घ्यायला फारशी कठीणही ठरणार नाही.
श्रीभगवंतांचे 'कृतज्ञ' हे एक नाम आहे. कारण ते भगवंतही भक्तांच्या प्रेमाच्या बदल्यात कृतज्ञतेने आपल्या भक्तांचा सदैव सांभाळ करतात. म्हणूनच, त्या भक्तवत्सल भक्ताभिमानी भक्तकरुणाकर श्रीभगवंतांप्रति सदैव कृतज्ञता बाळगून, त्यांच्या ऋणातच राहण्यासारखे दुसरे सुख नाही या जगात !
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे.
https://sadgurubodh.blogspot.com
https://www.facebook.com/sadgurubodh/


10 Jul 2018

धर्म जागो निवृत्तीचा



आज ज्येष्ठ कृष्ण द्वादशी, महावैष्णव भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचे प्राणप्रिय ज्येष्ठ बंधू व सद्गुरु, प्रत्यक्ष शिवावतार भगवान सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराजांचा आज समाधिदिन !
श्रीमुखनाम संवत्सर, माघ कृष्ण प्रतिपदा, शालिवाहन शके ११९५ अर्थात् इ.स.१२७४ मधील अंदाजे फेब्रुवारी महिन्यातील एका सोमवारी सकाळी श्री निवृत्तिनाथ महाराजांचा जन्म झाला. त्यांनी शके १२१९, इ.स. १२९७ मधील ज्येष्ठ कृष्ण द्वादशीला श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. काही ठिकाणी त्यांनी पौष कृष्ण एकादशीला समाधी घेतली असाही उल्लेख सापडतो. परंतु श्रीसंत नामदेवरायांनी समाधीवर्णनाच्या अभंगात ज्येष्ठ कृष्ण द्वादशी हीच तिथी दिलेली आहे. वारकरी संप्रदायात पौष कृष्ण एकादशीला त्र्यंबकेश्वर येथे श्रीसंत निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा देखील भरते. ज्येष्ठात वारीचे दिवस असल्याने सर्वांना तेव्हा जायला जमत नाही म्हणून पौषात आवर्जून सर्व वारकरी श्री निवृत्तिदादांच्या यात्रेला जातात.
श्रीसंत निवृत्तिनाथ महाराजांच्या विषयी श्री नामदेवराय म्हणतात,
सांगतील ज्ञान म्हणतील खूण ।
न येचि साधन निवृत्तीचें ॥
'अखंड साधनेत राहणे' हेच श्री निवृत्तिनाथ महाराजांचे वैशिष्ट्य होते. ते सदैव आपल्या ब्रह्मभावातच निमग्न होऊन राहात असत. म्हणून त्यांनी केवळ श्री माउलींवरच कृपानुग्रह केला. त्यामुळेच 'श्रीगुरूंचा मी एकुलता एक शिष्य आहे', असे श्री ज्ञानदेवीत माउली स्पष्ट म्हणतात. बाकी शिष्यपरंपरा पुढे त्यांच्या आज्ञेनुसार माउलींनीच वाढवली. आपल्या आत्मस्थितीमध्ये विघ्न आणणारा तो शिष्यप्रपंचही वाढविण्याची श्री निवृत्तिनाथांना अजिबात इच्छा नव्हती. श्री सोपानदेव व श्री मुक्ताबाईंनाही अनुग्रह श्री माउलींनी केला.
सदैव त्या ब्रह्मभावात निमग्न राहणा-या श्री निवृत्तिनाथ महाराजांनी स्वांत:सुखाय अप्रतिम अभंगरचना केलेली आहे. त्यांचे एकूण ३५७ अभंग सकलसंतगाथेत आहेत. एकाहून एक सुंदर व भावपूर्ण रचना आहेत. जात्याच अतिशय माधुर्य असणा-या या निगूढ अभंगरचना अर्थाच्या दृष्टीने मात्र सोप्या नाहीत. अलौकिक ब्रह्मस्थितीचा, निगूढ योगानुभूतीचा अद्भुत परिपोष सगुणप्रेमाच्या माध्यमातून ते इतका गोड करून सांगतात की बस ! त्या अभंगांच्या नुसत्या वाचनानेही मनात आनंदाची कारंजीच बहरून येतात; पण त्या विलक्षण आत्मस्थितीची अनुभूती असलेल्या महात्म्यालाच त्यांच्या अर्थाचे अनुसंधान करणे शक्य आहे, ते काही आपण सहजासहजी करू शकत नाही.
http://rohanupalekar.blogspot.in
श्रीगुरुकृपेचे अद्भुत माहात्म्य व अनुभूती गोड शब्दांत सांगताना ते म्हणतात,
अंधारिये रातीं उगवे हा गभस्ति ।
मालवे ना दीप्ति गुरुकृपा ॥१॥
तो हा कृष्ण हरि गोकुळामाझारीं ।
हाचि चराचरीं प्रकाशला ॥२॥
आदि मध्य अंत तिन्ही जालीं शून्य ।
तो कृष्णनिधान गोपवेषे ॥३॥
निवृत्तिनिकट कृष्णनामपाठ ।
आवडी वैकुंठ वसिन्नले ॥१४९.४॥
श्री निवृत्तिनाथ महाराज म्हणतात, "मायेच्या अंधा-या रात्री कधीही न मावळणारा श्रीगुरुकृपेचा अपूर्व तेजोमय गभस्ती प्रकाशला आणि त्याने आमचे सर्वकाही व्यापले. तोच परमतेजस्वी ज्ञानसूर्य गोकुळात श्रीकृष्णरूपाने प्रकटलेला असून तोच सर्व चराचरही व्यापून राहिलेला आहे. ज्याला आदि, मध्य व अंत नाहीत असा हा अमेय परमात्मा कृष्णरूप धारण करून गोपवेषात वावरतो आहे.  या परममंगल श्रीकृष्णनामाचा परंपरेने आलेला शक्तियुक्तिसहित असा पाठ  सद्गुरुकृपेने मला लाभला, माझे सर्वस्व झाला आणि मला सर्वत्र ते अलौकिक वैकुंठच प्रतीत होऊ लागले."
आपल्या आत्मज्ञानाच्या संपन्न जाणिवेचा, सगुणमेघश्याम अशा कृष्णरूपाच्या आधारे समन्वय करून, इतका मृदुमधुर आणि भावमनोहर स्वानुभव सांगावा तो श्री निवृत्तिनाथ महाराजांनीच ! त्यांचे सर्वच अभंग असे सगुणी गोडावलेले आहेत, मधात घोळलेल्या गोड खजुरासारखेच !
श्रीसंत निवृत्तिनाथ महाराजांच्या अशा निवडक २७ सुमधुर व ज्ञानप्रगल्भ अभंगांचे तितकेच सुंदर असे रसग्रहण प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी अभंग आस्वाद - भाग दुसरा या ग्रंथात केलेले आहे. जिज्ञासूंनी ते आवर्जून पाहावे, चित्त-मन भरून आणि भारून टाकणारी प्रेमानुभूती नक्कीच लाभेल !
सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी, समोर प्रकट असलेल्या भगवान श्रीपंढरीनाथांची एका सुंदर नमनाद्वारे शेवटची स्तुती केली होती. ते बारा ओव्यांचे नमन प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी आपल्या नित्याच्या श्री हरिपाठ क्रमात समाविष्ट केलेले असून आजही दररोज म्हटले जाते.
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज "निवृत्तिप्रसादे पावलो या सुखा । उजळलीया रेखा ज्ञानाचिया ॥" असे अत्यंत कृतज्ञतेने ज्यांच्याविषयी म्हणतात, त्या भगवान सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या श्रीचरणी समाधिदिनी सादर साष्टांग दंडवत !!
निवृत्ति निवृत्ति ।
म्हणतां पाप नुरे चित्तीं ॥१॥
निवृत्ति निवृत्ति नाम घेतां ।
जन्म सार्थक तत्त्वतां ॥२॥
निवृत्ति निवृत्ति ।
संसाराची होय शांति ॥३॥
निवृत्ति नामाचा निजछंद ।
एका जनार्दनीं आनंद ॥४॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )


5 Jul 2018

अनुकरणीय श्रीगुरुभक्तीचे प्रसन्न दर्शन

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा अमृतमहोत्सव सन १९८८-८९ मध्ये भारतभर खूप मोठ्या प्रमाणावर साजरा झाला होता. त्यांचा प्रथम सत्कार पुण्यात टिळक स्मारक मंदिरात संपन्न झाला. त्या महोत्सवाच्या काही हृद्य आठवणी प.पू.श्री.मामांचे मानसपुत्र श्री.नारायणराव पानसे यांनी आपल्या      'ब्रह्मानंद ओवरी' या ग्रंथात सांगितल्या आहेत. अतिशय भावपूर्ण आणि मनोहर हकिकतींनी सजलेला हा ग्रंथ सर्व सद्गुरुभक्तांसाठी अवश्यमेव वाचनीय व मननीय आहे. उदाहरण महणून त्यातली ही छोटीशीच हकिकत पाहा किती विचार करण्यासारखी व अनुकरणीय आहे.
महोत्सवाची आठवण सांगताना श्री.पानसे एका ठिकाणी लिहितात, "सत्कारासाठी व्यासपीठावर चढताना, प.पू.सद्गुरु श्री.मामांनी व्यासपीठाला दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार केला. नंतर केव्हातरी प.पू.श्री.मामांना मी त्यासंबंधी विचारले; तेव्हा ते म्हणाले, "अरे, त्याच व्यासपीठावर काही वर्षांपूर्वी प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराज यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा झाला होता !"
वास्तविक पाहता ते नाट्यगृह होते आणि त्याचे व्यासपीठ हे काही आदराचे स्थान नाही. परंतु आपल्या श्रीगुरूंचा पावन पदस्पर्श ज्या व्यासपीठाला झालेला आहे, ते त्या स्पर्शाने पुण्यपावनच झालेले आहे; शिष्य म्हणून आपल्यासाठी ते सदैव वंदनीयच आहे; अशीच प.पू.श्री.मामांची दृढ मनोधारणा होती. हृदयी वसणा-या त्या स्वाभाविक गुरुप्रेमानेच त्यांचे हात आपसूक जोडले गेले. किती दृढ आणि अलौकिक गुरुभक्ती आहे पाहा ! तुम्हां आम्हां साधकांसाठी प.पू.श्री.मामांनी फार मोठा आदर्शच येथे स्वत: आचरण करून घालून दिलेला आहे.
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे.