साठवणीतली वारी - ४
लहानपणापासून मी ऐकून होतो की, सद्गुरु श्री माउलींच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी मंदिराचा कळस हालतो. तसा तो हालताना पाहिलेले अनेक लोक नेहमीच भेटत असत. त्यांच्याकडून ऐकून ऐकून मलाही ते अद्भुत दृश्य पाहायची सतत तीव्र इच्छा लागून राहिलेली होती. आषाढी वारीचे दिवस जवळ आले की दरवर्षी वारीला जाणा-या लोकांची लगबग पाहूनही मी खूश व्हायचो. आपल्याला कधी वारीला जायला मिळेल, याचीच आस मला लागून राहिलेली होती. पण तेव्हातरी पालखीच्या फलटण मुक्कामाच्या दर्शनावरच तहान भागवावी लागत असे.
१९९२ साली मी नुकताच सातवीत गेलो होतो, तेव्हा पहिल्यांदा तसा योग जुळून आला. कै.श्रीमंत बाळमहाराज नाईक निंबाळकर हे श्रीमंत राणीसाहेबांचे धाकटे चिरंजीव. त्यांनीच राणीसरकारांची वारीची परंपरा पुढे टिकवली होती. ते माळकरीही होतेच. ते माउलींच्या मंदिरात ब-याचवेळा येत असत. मग मी त्यांच्याशी गप्पा मारायला तिथे जात असे. त्यांच्या तोंडूनही वारी, प्रस्थान वगैरे गोष्टी मी नेहमी ऐकत असे. १९९२ साली त्यांनी मला विचारले, "रोहन, येतोस का आळंदीला प्रस्थानासाठी?" मला एवढा आनंद झाला की बस. टुणकन् उडीच मारली मी तर. पण आळंदीला जाण्यासाठी सौ.आईची परवानगी काढावी लागणार होती. मी भरपूर मस्का मारलाच आईला, पण बाळमहाराजांनीही सौ.आईला सांगितले, "वहिनी, तुम्ही काळजी करू नका, मी सुखरूप नेऊन आणीन रोहनला." त्यामुळे आई कशीबशी तयार झाली.
त्यावर्षी २३ जून रोजी प्रस्थान होते. म्हणून मग २२ तारखेला मी बाळमहाराजांच्या सोनगावच्या बंगल्यावर मुक्कामाला गेलो. ते सोनगावच्या शेतातल्या बंगल्यावर राहात असत. तिथे भरपूर गाई होत्या. संध्याकाळी मी मनसोक्त गोठ्यात हुंदडलो. मला गाई अतिशय आवडतात. त्यांच्या सर्व गाई प्रेमळ होत्या. तिथे भरपूर तुळशीची झाडेही होती. तुळस पाहिली की आजही मला आनंद होतो. मी आळंदीला नेण्यासाठी भरपूर तुळशी काढून घेतल्या.
सकाळी आवरून नाष्टा वगैरे करून आम्ही निघालो. त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर हाजीमलंग म्हणून होते. त्यांचा माझा जुनाच परिचय होता. अजून एक दोन जणही होते आमच्यासोबत. त्यातल्या एका सरांनी बरोबर पोळ्या व भजी करून घेतली होती. आम्ही सोनगाव वरून मधल्या रस्त्याने मोरगाव जेजुरी मार्गाने पुण्याला व तिथून पुढे आळंदीला गेलो.
वाटेतला एक गमतीशीर प्रसंग आठवतो मला. त्या सरांची चविष्ट भजी खाऊन मी बाळमहाराजांच्या कानात हळून बोललो, "अहो, यांना ऐनवेळी बरोबर यायला सांगितले तर त्यांनी इतकी मस्त भजी करून आणली. आपण पुढच्यावेळी त्यांना आधीच सांगू, म्हणजे ते आणखी छान डबा सोबत घेऊन येतील आपल्यासाठी." बाळमहाराजांना माझ्या या टिप्पणीने अनावर हसू आले व त्यांनी लगेच मागे वळून गाडीत बसलेल्या सर्वांना ते सांगून पण टाकले. मला तर मेल्याहून मेल्यासारखेच वाटले त्यावेळी. बघा, माझा हा मिश्कीलपणा (डांबरटपणाच म्हणा हवंतर...) असा अगदी लहानपणापासूनच उतू जात असे.
(http://rohanupalekar.blogspot.in)
आम्ही साधारण कलत्या दुपारी आळंदीत पोचलो, तीनच्या सुमारास. त्यावेळी अाळंदी वारक-यांनी तुडुंब भरलेली होती. सगळे रस्ते नुसते वाहात होते वारक-यांनी. भजनाच्या कल्लोळाने, टाळमृदंगांच्या निनादाने दुमदुमलेली होती अवघी आळंदी. अकराव्या वर्षी मला या आनंदसोहळ्याचे पहिल्यांदा दर्शन लाभले.
बाळमहाराजांनी माझा हात घट्ट धरून ठेवलेला होता. गर्दीतून वाट काढत आम्ही माउलींच्या देऊळवाड्यात पोचलो. सगळे हैबतबाबांच्या ओवरीत जाऊन बसलो. बाहेर दिंड्यांचे भजन चालू होते. मी भारावून जाऊन तो सगळा सोहळा डोळ्यांत साठवत होतो. समोरच माउलींचे शिखर दिसत होते. सारखा सारखा मी त्याच्याकडेच पाहात होतो. कारण मला तो कळस हालतानाचे दृश्य पाहायची तीव्र उत्कंठा लागून राहिलेली होती.
माउलींचे चोपदार बोलवायला आल्यावर बाळमहाराज प्रस्थानाच्या कार्यक्रमासाठी मंदिरात गेले. गर्दी म्हणून त्यांनी मला मात्र नेले नाही. त्यामुळे मी पार हिरमुसलो. पण लहान असल्यामुळे काहीच बोलू शकलो नाही. मग हैबतबाबांच्या ओवरीतच बसून तो अद्भुत आनंदसोहळा मी पुरेपूर अनुभवला.
बाहेर चालू असलेला ज्ञानबा-तुकारामचा गजर टिपेला पोचलेला होता. सगळे वारकरी मोठ्या आनंदाने समरसून भजनात मग्न झालेले होते. कोणी पावली खेळत होते तर कोणी मनोरा करून त्यावर चढून पखवाज वाजवत होते. मधेच माउली माउली.... असा गगनभेदी जयजयकार व्हायचा. माउलींच्या द्वारी शोभून दिसणा-या सुवर्ण पिंपळाचाही आनंद पोटात मावत नव्हता. त्यामुळे भजनाच्या तालाला तोही सळसळून दाद देत होता. तो बिचारा नाचू शकत नव्हता ना. एवढा उदंड उत्साह व भारावलेले वातावरण मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो. ते दृश्य पाहूनही विलक्षण आनंद मिळत होता. आज नुसत्या त्या प्रसंगाच्या स्मरणानेही तेवढाच आनंद मिळतो आहे.
भजनाच्या त्या गोंधळातच प्रस्थानाचा सोहळा उरकला. मला तर काही कळलेच नाही. कळस हालतानाही दिसला नाही. म्हणजे तो कधी हालला ते मला समजलेच नाही. भजन ऐकू की पावली पाहू, भजनात रंगलेले वारकरी न्याहाळू की ज्ञानोबा-तुकारामचा गजर करू, हेच मला त्यावेळी सुधरत नव्हते. एखाद्या खेड्यातल्या माणसाला एकदम मुंबईच्या स्टेशनवरील सकाळच्या गर्दीत सोडल्यावर कसे होईल ना, तसेच माझे झाले होते. जे मी अनेक वर्षे केवळ कल्पनेच्या नेत्रांनी मनाच्या पडद्यावरच पाहात होतो, ते सर्व आता मला माझ्या डोळ्यांसमोर घडताना दिसत होते. भंजाळून गेलो होतो मी पूर्ण. आतून आनंद तर प्रचंड होत होता. आनंद पोटी माईना माईना... अशीच माझी अवस्था झालेली होती. तो वारीचा पहिला-वहिला अनुभव माझ्यासाठी तरी फारच अद्भुत होता. आजही त्याची सय आतून तेवढ्याच आनंदाच्या उकळ्या निर्माण करते. श्री तुकोबाराय म्हणतात ते काही खोटे नाही, "करील ते काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगी ॥" माउली खरोखरीच ग्रेट आहेत !
थोड्या वेळाने बाळमहाराज मंदिरातून ओवरीत आले. त्यांनी माउलींच्या पालखीतला बुक्का माझ्या कपाळावर लावला व आम्ही तेथून बाहेर पडलो.
या पहिल्या भेटीत माउलींनी मला साधे दर्शनही दिले नाही; ना समाधीचे ना पालखीचे. फक्त तो अपरंपार दिव्य सोहळा जवळून पाहायला मात्र मिळाला. बहू दिवस मनी वागविलेले आर्त काही प्रमाणात तरी पूर्ण झाले. माउलींच्या पालखीसोहळ्याचे जनक व माउलींचे निष्ठावंत भक्त, श्री हैबतरावबाबा आरफळकर यांच्या ओवरीतील पादुकांचेच दर्शन फक्त मला त्या दिवशी झाले. बहुदा माझ्या गाठीचे पुण्य तेवढेच असावे त्यावेळी. महाद्वारातून माउलींच्या मंदिराला नमस्कार करून आम्ही बाहेर पडलो व फलटणला परत आलो.
पण त्या पहिल्याच भावपूर्ण दर्शनाने माउली आणि त्यांची वारी माझ्या मनात पक्के घर करून राहिले, हे मात्र अगदी खरे. त्या बुक्क्याच्या माध्यमातून भगवान सद्गुरु श्री माउलींनी माझ्या ललाटीचे नियतीने लिहिलेले लेख पुसून, त्यांच्या मनाजोगते काही तिथेे लिहिले असावे. माझी तरी तशीच धारणा आहे. कारण त्यावेळी त्यांनी माझ्या मनाचा एक कोपरा जो पकडला, तो आजवर कधी सोडलाच नाहीये आणि पुढेही कोणत्याच जन्मात ते सोडणार नाहीत याची देखील श्रीसद्गुरुकृपेने मला आता खात्री वाटते आहे ! मी देखील त्यांचे श्रीचरण सोडू इच्छित नाही व श्री तुकोबारायांच्या शब्दांत वारंवार कळवळून प्रार्थना करतो आहे,
तुझे दारीचा कुतरा ।
नको मोकलूं दातारा ॥१॥
धरणे घेतले द्वारात ।
नको उठवूं धरूनि हात ॥२॥
http://rohanupalekar.blogspot.in
( छायाचित्र संदर्भ : प्रस्थानानंतर देऊळवाड्यात प्रदक्षिणा चालू असताना पिंपळवृक्षाखाली टिपलेले सद्गुरु श्री माउलींच्या पालखीचे राजस रूप. श्रींच्या सुकुमार चरणपादुकाही त्यात स्पष्ट दिसतात. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:
Post a Comment