18 Jul 2018

साठवणीतली वारी - ३



श्रीसंत नामदेवराय आपल्या एका नितांतसुंदर अभंगात पंढरीचे माहात्म्य अतीव प्रेमाने सांगताना म्हणतात,
सर्व सुखरासी भीवरेचे तीरीं ।
आमुची पंढरी कामधेनु ॥१॥
प्रेमामृते दुभे सदा संतजनां ।
वोसंडतो पान्हा नित्यनवा ॥२॥
धर्म अर्थ काम मोक्ष चा-हीं थानें ।
दोहोणार धन्य पुंडलीक ॥३॥
जीयेचे दुभते नित्य नवे वाढें ।
बहुं पंढरीत पूर्वपुण्य ॥४॥
भक्तिचेनि बळे भावाचेनि मेळें ।
देखोनिया बोले बहु फार ॥५॥
भाग्यवंत नामा तें क्षीर लाधला ।
प्रेमें वोसंडला गर्जे नामा ॥६॥
श्री नामदेवराय म्हणतात, "भीवरेच्या तीरी पंढरी नगरीत अद्भुत सुखाची राशी आमच्या पांडुरंगांच्या रूपाने प्रकटलेली आहे. त्यांच्या त्या पावन अधिष्ठानाने पंढरीच कामधेनू होऊन आमचे सकल मनोरथ पुरवीत आहे. ही पंढरीरूप कामधेनू अवीट गोडीचे प्रेमकृपारूप दुभते सतत दुभत असते. विठ्ठलमय झालेल्या संतांसाठी ती आपला नित्यनवा प्रेमपान्हा अविरत स्रवत असते. म्हणूनच, धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार स्तन असणारी ही अलौकिक कामधेनू व तिचे दोहन करणारे भक्तराज पुंडलीक दोघेही धन्य होत. या कामधेनूचे दुभते पूर्वपुण्याईच्या बळावर रोज वाढतच जाते, जसजसे उपासनेेने ते शुद्ध पुण्य वाढते तसे हिचे दुभतेही वाढतेच. आपल्या भक्तीच्या बळावर व त्या भक्तीला सद्गुरुकृपेने लाभलेल्या भावाच्या प्रसादामुळे हे अपूर्व गोडीचे प्रेममय दूध अधिकाधिक प्रमाणात चाखता येते, जितके चाखावे तितकी याची गोडी व इच्छा वाढतच जाते. सद्गुरु श्री विसोबांच्या कृपानुग्रहाने लाभलेले हे प्रेमक्षीर आकंठ प्यायल्याने खरे भाग्यवान ठरलेले नामदेवराय, अत्यंत आनंदित होऊन जोरजोरात हरिनाम गर्जत आपला अनुभव सगळ्यांना येथे सांगत आहेत."
खरोखरीच, पंढरीची वारी हा अद्भुतानंदाचा अलौकिक सोहळा आहे, त्याची गोडी इतकी अपूर्व-मनोहर आहे की, ती शब्दांनी सांगताच येत नाही. त्यासाठी या आनंदसोहळ्याचा एकदातरी स्वत: अनुभवच घ्यायला हवा.
सद्गुरुकृपेने मला हा दिव्य सोहळा बालपणापासूनच सप्रेम अनुभवता आला. माझ्या त्या मधुमधुर अनुभूतीचेच सद्गुरु श्री माउली माझ्या बोबड्या लेकुरवाचेकडून या लेखमालेद्वारे स्तवन करवून घेत आहेत. हे माझे परमभाग्यच समजतो मी.
आमच्या माउलींच्या या स्वर्गीय स्तन्यपानासाठी तुम्हां सर्वांनाही माझे मन:पूर्वक हे आमंत्रणच आहे. भाग्याची परिसीमा ठरणारा ह्या पंढरीवारीच्या स्तवन-दुग्धाचा हा फेसाळता तिसरा चषक तुम्ही सर्वांनी देखील प्रेमभावे आस्वादून माझ्या आनंदात सहभागी व्हावे हीच सदिच्छा !

साठवणीतली वारी - ३

https://rohanupalekar.blogspot.com/2017/06/blog-post_29.html?m=1

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment