11 Jul 2018

चालते-बोलते विद्यापीठ



संत हे चालते बोलते विद्यापीठच असतात. त्यांच्या प्रत्येक वागण्या-बोलण्यातून आपल्यासारख्या सामान्य जनांना सतत बोधामृत मिळत असते. जो साधक डोळसपणे संतांच्या उपदेशाचे व लीलांचे अनुसंधान ठेवून त्यातून लाभलेल्या अशा अद्भुत बोधकणांचा आपल्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक वापर करतो, तो निश्चितच सुखी व समाधानी आयुष्य जगतो. त्याचा प्रपंचही त्यामुळे नकळतच परमार्थमय होऊन जातो. यासाठीच परमार्थमार्गात या संतबोधाला विशेष माहात्म दिलेले दिसून येते. 'संतसंगती' हा परमार्थ-प्रवासाचा कणाच आहे असे म्हटले जाते, ते वावगे नाही.
श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे तर आदर्श लोकशिक्षकच होते. अत्यंत शास्त्रपूत आणि विशुद्ध अशी जीवनशैली अंगीकारून त्यांनी सद्धर्माचा परमादर्श लोकांसमोर ठेवला. आजच्याही काळात फारसे कष्ट न होता आवश्यक असे शास्त्राचरण नक्की करता येते, याचा उत्तम वस्तुपाठच त्यांनी आपल्या स्वत:च्या वर्तनातून जगासमोर ठेवलेला आहे. अशाप्रकारे उभी हयात त्यांनी साधकांचे सर्वांगीण कल्याण करण्यात वेचली. परमार्थपूरक जीवनशैली कशी असावी? हे नीट समजून घेण्यासाठी प.पू.श्री.मामांच्या जीवनचरित्राचा अभ्यास जरूर करावा.
प.पू.श्री.मामांच्या दिनक्रमातील त्यांची एक अगदी छोटीशीच; पण आपणही दररोज सहज पालन करू शकू, अशी उत्तम सवय श्री.नारायणराव पानसे यांनी आपल्या ब्रह्मानंद ओवरी ग्रंथात सांगितलेली आहे.
"जेवण झाल्यावर प.पू.श्री.मामा आचमन करून खाली येत. खाली उतरल्यावर, देवांना नमस्कार करून त्यांच्या खांबापुढील आसनावर (आता ज्या ठिकाणी प.पू.श्री.मामांचा मोठा फोटो ठेवलेला आहे तेथे ) बसत. "भोजनोत्तर देवांना नमस्कार एवढ्याकरिता की, दोन वेळेला जे काही चार घास आपल्या पोटात जातात, ते देवांच्या कृपेमुळेच जातात !" असा खुलासा प.पू.श्री.दादांनी माझ्याजवळ एकदा केला होता. जेवण झाल्यावर देवांना नमस्कार करण्याची प.पू.सौ.शकाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचीही जुनीच सवय आहे, हेही मी पाहिले आहे."
पाहा, अगदी छोटीशीच गोष्ट; पण जर ही सवय आपण स्वत:ला लावून घेऊन निष्ठेने सांभाळली तर किती समाधान देईल ना? आठवणीने नमस्कार तर फक्त करायचाय जेवल्यावर. त्यामुळे ही इतकी साधी व सोपी सवय लावून घ्यायला फारशी कठीणही ठरणार नाही.
श्रीभगवंतांचे 'कृतज्ञ' हे एक नाम आहे. कारण ते भगवंतही भक्तांच्या प्रेमाच्या बदल्यात कृतज्ञतेने आपल्या भक्तांचा सदैव सांभाळ करतात. म्हणूनच, त्या भक्तवत्सल भक्ताभिमानी भक्तकरुणाकर श्रीभगवंतांप्रति सदैव कृतज्ञता बाळगून, त्यांच्या ऋणातच राहण्यासारखे दुसरे सुख नाही या जगात !
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे.
https://sadgurubodh.blogspot.com
https://www.facebook.com/sadgurubodh/


0 comments:

Post a Comment