5 Jul 2018

अनुकरणीय श्रीगुरुभक्तीचे प्रसन्न दर्शन

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा अमृतमहोत्सव सन १९८८-८९ मध्ये भारतभर खूप मोठ्या प्रमाणावर साजरा झाला होता. त्यांचा प्रथम सत्कार पुण्यात टिळक स्मारक मंदिरात संपन्न झाला. त्या महोत्सवाच्या काही हृद्य आठवणी प.पू.श्री.मामांचे मानसपुत्र श्री.नारायणराव पानसे यांनी आपल्या      'ब्रह्मानंद ओवरी' या ग्रंथात सांगितल्या आहेत. अतिशय भावपूर्ण आणि मनोहर हकिकतींनी सजलेला हा ग्रंथ सर्व सद्गुरुभक्तांसाठी अवश्यमेव वाचनीय व मननीय आहे. उदाहरण महणून त्यातली ही छोटीशीच हकिकत पाहा किती विचार करण्यासारखी व अनुकरणीय आहे.
महोत्सवाची आठवण सांगताना श्री.पानसे एका ठिकाणी लिहितात, "सत्कारासाठी व्यासपीठावर चढताना, प.पू.सद्गुरु श्री.मामांनी व्यासपीठाला दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार केला. नंतर केव्हातरी प.पू.श्री.मामांना मी त्यासंबंधी विचारले; तेव्हा ते म्हणाले, "अरे, त्याच व्यासपीठावर काही वर्षांपूर्वी प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराज यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा झाला होता !"
वास्तविक पाहता ते नाट्यगृह होते आणि त्याचे व्यासपीठ हे काही आदराचे स्थान नाही. परंतु आपल्या श्रीगुरूंचा पावन पदस्पर्श ज्या व्यासपीठाला झालेला आहे, ते त्या स्पर्शाने पुण्यपावनच झालेले आहे; शिष्य म्हणून आपल्यासाठी ते सदैव वंदनीयच आहे; अशीच प.पू.श्री.मामांची दृढ मनोधारणा होती. हृदयी वसणा-या त्या स्वाभाविक गुरुप्रेमानेच त्यांचे हात आपसूक जोडले गेले. किती दृढ आणि अलौकिक गुरुभक्ती आहे पाहा ! तुम्हां आम्हां साधकांसाठी प.पू.श्री.मामांनी फार मोठा आदर्शच येथे स्वत: आचरण करून घालून दिलेला आहे.
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे. 



0 comments:

Post a Comment