13 Jul 2018

श्रीवासुदेवो जयति !!

श्रीवासुदेवो जयति !!
आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, पंचम श्रीदत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांची १०४ वी पुण्यतिथी.
प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांना मोठ्या आदराने 'थोरले महाराज' म्हटले जाते व ते पूर्णपणे यथार्थ आहे. श्रीदत्तसंप्रदायाच्या आजच्या सुघटित स्वरूपामागे त्यांचेच अथक परिश्रम आहेत. त्यांनी आसेतुहिमाचल परिभ्रमण करून संन्यासधर्माचा आदर्श प्रस्थापित केला. आपल्या वर्तनातून एक परम आदर्श आणि पूर्णपणे रंगलेला श्रीदत्तभक्त साकारला. श्रुती-स्मृती-पुराणांना अभिप्रेत असणारा व करुणेची साकार मूर्तीच असणारा यथार्थ महात्मा त्यांच्या रूपाने साठ वर्षे भारतभूमीला पावन करीत होता. आजच्या तिथीला त्यांनी आपल्या नश्वरदेहाचा त्याग केला असला, तरी अव्यक्तातून त्यांनी आपले कार्य आजही सुरू ठेवलेलेच आहे. त्यांच्याच पुण्यपावन पदचिन्हांचे अनुसरण करीत लक्षावधी भाविकभक्त आजही श्रीदत्तकृपा संपादन करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील.
प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या असंख्य रचना आजही सुप्रसिद्ध आहेत. पण त्यातील 'करुणात्रिपदी' व 'श्रीदत्तात्रेयप्रार्थनास्तोत्र' म्हणजेच 'घोरकष्टोद्धरण स्तोत्र' ह्या दोन रचना सर्वात जास्त प्रसिद्ध झालेल्या आहेत. या अत्यंत प्रभावी व मंत्रमय रचनांचे कोट्यवधी भक्तांनी अत्यंत अद्भुत व अलौकिक अनुभव घेतलेले आहेत. ह्या दोन रचना जणू श्रीमत् टेंब्ये स्वामी महाराजांचे जनमानसावरील प्रचंड मोठे कृपाऋणच आहे.
प.प.श्री.थोरल्या महाराजांच्या करुणात्रिपदी बद्दल गेली काही वर्षे खूप चुकीची व खोटी माहिती सोशल मिडियामधून प्रसारित होत होती. त्यामुळे मी पूर्वी 'करुणात्रिपदीची जन्मकथा' या नावाचा एक लेख लिहिला होता. त्यानंतर गेल्यावर्षी 'भावार्थ करुणात्रिपदीचा' हा लेख अचानकच लिहीला गेला. तसेच प.प.श्री.थोरल्या महाराजांच्या चरित्रावर आधारलेला एक छोटा लेखही पूर्वीच लिहिलेला होता. खालील ब्लॉगलिंकमधे हे तिन्ही लेख आपण वाचू शकता.
करुणात्रिपदी दररोज म्हणणारा फार मोठा भक्तवर्ग आहे. त्या भावपूर्ण रचनेचा अर्थ लक्षात घेऊन जर हे पठण घडले तर नक्कीच अधिक आनंददायक व समाधानकारक ठरेल यात शंका नाही. म्हणूनच सर्वांना मनापासून प्रार्थना करतो की, खालील लिंकवरील तिन्ही लेख आजच्या पुण्यतिथीच्या पावन दिनी आवर्जून वाचावेत व परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं मनोभावे स्मरणांजली समर्पावी. आपल्या सुहृदांनाही हे आवर्जून वाचायला द्यावे ही विनंती.

https://rohanupalekar.blogspot.com/2017/06/blog-post_39.html?m=1

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


0 comments:

Post a Comment