6 Jul 2016

करुणाब्रह्म


हृदयातील अखंड भगवद् अधिष्ठानामुळे संतांना आप-पर भावनाच नसते. ज्याने लावले त्याला आणि ज्याने तोडण्यासाठी घाव घातला त्यालाही वृक्ष समानच सावली देतो; त्याप्रमाणे संत देखील सर्वांशी समान प्रेमानेच वागतात. आपल्याला कारण नसताना त्रास देणा-याला आपण सहसा सोडणार नाही, पण संत त्यालाही क्षमाच करतात. कारण संतांपाशी अखंड प्रेमाचा अनवरत झराच असतो !
संत हे प्रेम-करुणेची साक्षात् मूर्ती असतात. दयाकरुणेचा अलौकिक आविष्कार त्यांच्या ठायी प्रसन्न प्राजक्तासारखा बहराला आलेला असतो. प्राजक्ताच्या सर्वांगसुंदर फुलो-या प्रमाणे, आपल्या या अकारण-करुणेचा अखंड वर्षाव संपर्कात आलेल्या प्रत्येकावर संत   निरपेक्षपणे करीत असतात.
अशा संतत्वाचे श्रेष्ठ आदर्श असणारे, नाथ-दत्त-भागवत संप्रदायांचे अध्वर्यू आणि थोर स्वातंत्र्यसेनानी प. पू. सद्गुरु योगिराज श्री. श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे महाराजांची आज १०२ वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरित्रातील एक करुणाप्रेमाचा अलौकिक प्रसंग आपण पाहूया. प. पू. श्री. मामांचे उत्तराधिकारी प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी स्वत: अनुभवलेली ही अद्भुत हकीकत आपल्या ' अभंग निरूपण - द्वितीय खंड ' ग्रंथामध्ये नमूद केलेली आहे.
प.  पू. मामांचा छत्तीसगढ राज्यातील भिलाई येथे मोठा शिष्यपरिवार होता. तेथील एका अत्यंत गरीब सायकल रीक्षा चालविणा-या भक्तावर त्यांची कृपा झालेली होती. तो नियमाने साधनाही करत असे.
सगळेजण प. पू. मामांना घरी बोलवतात व तेही प्रेमाने जातात, हे पाहून त्यालाही वाटत असे. पण आपले घर तर झोपडपट्टीत, तिथे कसे बोलवावे? याची त्याला खूप खंत वाटे. त्याची ती तळमळ जाणून एके दिवशी स्वत: प. पू. मामांनीच त्याला विचारले, " काय रे, आज दुपारी मोकळा आहेस का?" तो म्हणाला, " हो, मी केव्हाही मोकळा आहे." त्यावर पू. मामा शांतपणे म्हणाले, " मग असे कर, आज दुपारी आपण तुझ्या घरी जाऊ! " हे ऐकून त्याचा आनंद गगनात मावेना.
दुपारी ठरलेल्या वेळी तो आपली सायकलरीक्षा घेऊन आला. पू. मामा व पू. दादांना त्याने बळेच त्या रीक्षात बसवले. पण पुढे चढाचे निमित्त करून पू. मामा उतरले व सगळे चालतच निघाले. त्याचे घर एका बकाल झोपडपट्टीत होते. सर्वत्र उघडी गटारे वाहत होती. त्यांची दुर्गंधी सुटलेली होती. तशातच चालत प. पू. मामा त्याच्या झोपडीजवळ पोचले. त्याने कुठूनतरी एक फाटका सतरंजीचा तुकडा आणलेला होता. त्यावर प. पू. मामा प्रेमाने बसले.
त्याने खूण केल्यावर त्याची बायको एक केळे व अकरा रुपये घेऊन पुढे आली. मोठ्या आदराने त्याने ते प. पू. मामांच्या हातावर ठेवले व त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्या दोघांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहत होते. कारण जे अनेक वर्षे त्यांच्या मनात होते, ते प्रेममूर्ती श्रीसद्गुरूंनी न मागताच पूर्ण केले होते. त्याचवेळी त्या दोघांचा तो कोमल भाव पाहून अचानकच प. पू. श्री. मामांच्याही डोळ्यांतून प्रेमाश्रू पाझरू लागले. त्यांनी आपल्या कोटाच्या खिशातून एक शंभर रुपयांची नोट काढली. ते अकरा रुपये त्यात घालून त्याच्या बायकोच्या हातावर ते एकशे अकरा रुपये ठेवले. मग त्या साधकाचा हात अतीव प्रेमाने घट्ट धरून त्या दोघांना प. पू. मामा म्हणाले, " तुम्ही दोघे इतके शहाणे आहात की, केवळ आम्हांला अकरा रुपये व केळे देता यावे म्हणून तुम्ही तीन दिवस उपास काढलेले आहेत ! आम्हांला हे माहीत नाही काय? आताच जा, सगळे सामान घेऊन या, इथे माझ्यासमोर स्वयंपाक करा आणि जेवा; तरच मी येथून जाईन !" आपल्या दयाकरुणार्णव  श्रीसद्गुरूंच्या अंतर्यामित्व, सर्वसाक्षित्व आणि अपरंपार स्नेहमय अंत:करणाच्या त्या तेजस्वी व भावपूर्ण दर्शनाने ते दोघे भारावूनच गेले. त्यांना काही बोलायलाच सुचेना.
ताबडतोब त्या बाई बाजारात गेल्या, त्यांनी डाळ-तांदूळ आणून खिचडी बनवली. प. पू. श्री. मामांनी त्या दोघांना आपल्यासमोर बसवले आणि स्वत:च्या हाताने त्यांना भरवले. प. पू. श्री. मामांचा तो आनंद अवर्णनीय होता. चौघांच्याही डोळ्यांतून अविरत अश्रूधार लागलेली होती.
श्रीसद्गुरुतत्त्वाच्या " अहेतुकदयानिधी व  अकारणकृपाळू " अशा जगावेगळ्या गुणवैशिष्ट्यांची ही संपन्न अनुभूती नित्यस्मरणीयच म्हणायला हवी. खरोखरीच त्यांच्या दयाकरुणेला सीमाच नसते !!
श्रीसद्गुरूंच्या प्रेमाला, करुणेला ना अंत ना पार. त्यांच्या त्या लोकविलक्षण अपेक्षारहित प्रेमामध्ये जात, धर्म, संपत्ती, सामाजिक प्रतिष्ठा असले काही कधीच आडवे येत नाही. त्यांना भक्ताचा एक अनन्यभावच पुरेसा होतो प्रेमाचा घनघोर वर्षाव करायला. म्हणूनच भगवान श्रीज्ञानेश्वर माउली श्रीसद्गुरूंना ' निरंतर दयार्द्र ' म्हणतात.
अशा सद्गुरुतत्त्वाचे साकार रूप, श्रीदत्तसंप्रदायातील अवतारी विभूतिमत्व व राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे जिवलग सवंगडी असणा-या, श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराजांची आज १०२ वी जयंती. ' मामा ' या नावातच दोनदा आईचा उल्लेख होतो, तो उगीच नाही. मातृत्वाचेही दुहेरी अस्तित्व त्यांच्या ठायी स्वाभाविकपणे नांदत होते. आजही ते शरण आलेल्या भक्तांवर त्याच प्रेमभावाने कृपेचा अमृतवर्षाव करीत आहेत व पुढेही करीत राहतीलच. अपरंपार ' करुणाब्रह्म ' सद्गुरु श्री. मामा महाराजांच्या श्रीचरणीं जयंतीनिमित्त अनंतानंत दंडवत प्रणाम !!!!!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


6 comments:

  1. बोलायला आणि लिहायला शब्दच सुचत नाहीत .श्रीसद्गुरूचरणी अनंतकोटी साष्टांग प्रणिपात .

    ReplyDelete
  2. डोळ्यातून अश्रुधारा येतात ही कथा ऐकून
    प पू मामासाहेब आणि प पू शिरीशदादा ,यांना साष्टांग दंडवत

    ReplyDelete
  3. सदगुरु महारजांचा वर्णनातीत महिमा मी कसा वर्णू ???

    ReplyDelete
  4. प.पू.मामांच्या चरणी साष्टांग दंडवत...🙏🙏🙏गुरुदेव दत्त🙏🙏🙏

    ReplyDelete
  5. 🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  6. श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete