लागला टकळा पंढरीचा - साठवणीतलीवारी-३
वारी म्हणजे काय? परमाराध्य भगवान माउ
लींच्या शब्दांत सांगायचे तर " सुखाची मांदुस " आहे वारी ! अपरंपार आनंदाचे गावच्या गाव मजल दरमजल करीत भूवैकुंठ पंढरीला निघालेेले आहे. त्या आनंदाच्या कल्लोळातला खरा ब्रह्मानंद आहेत भगवान सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराज; चैतन्याचा जिव्हाळा, कैवल्याचा पुतळा, कोवळिकेचा मळा, प्रेमाचा कळवळा माझा ज्ञानोबा !!!
जगात सर्वजण आनंदाकडे, आनंदासाठी सतत धावत असतात. तो सापडतोच असे नाही. सापडला तर पूर्णपणे भोगताही येत नाही. कधी हातून निसटून जातो, कळत देखील नाही. पण आमचा हा दैवी ब्रह्मानंद? अहो, हा स्वत:च सर्व सवंगड्यांना घेऊन आपल्या दारी येतो, आपल्या पाठी लागतो, मला पाहा, मला अनुभवा, माझा भोग घ्या, माझा आस्वाद घ्या....असे म्हणत. हा माउलीरूप कैवल्यचंद्राचा अम्लान चांदणबहार पुरे म्हणून उरत नाही आणि हवा म्हणून सरत नाही. याच वैकुंठीच्या अमृत-परगुण्याला आमच्या सद्गुरु माउलींचा पालखी सोहळा म्हणतात. येथे येऊन जो प्रेमाने पानावर बसेल तो देवदुर्लभ तृप्ती अनुभवूनच समाधानाच्या हाती आचवतो.
आज हे कैवल्यसाम्राज्य आमच्या फलटणमधे विसावलेले आहे. " ऐसा सुखसोहळा स्वर्गीं नाही " म्हणत आम्ही माउलीच्या स्वागतासाठी, खरेतर अपार विरहाने कातर होऊन माय-भेटीसाठी आसुसलेलो आहोत. कधी एकदा ती त्रिभुवनपावन मायमाउली दृष्टीस पडते आणि सर्वस्वाचे बंधन सोडून तिच्या प्रेमअंकी बसतोय, अशीच स्थिती होऊन गेली आहे. माझ्या लाडक्या माउलीलाही मला भेटण्याची अशीच उत्सुकता असेल का? हा प्रश्न अनाठायी असला तरी क्षणभर येतोच मनात. ती नुसती माय नाही, माउली पण आहे ना ! ती आपल्या कोणत्याच बाळाला कधीतरी विसरेल का? त्यात एखादे पोर अपंग असेल तर तिचा कळवळा अधिक पान्हावतो त्याच्यासाठी. शिवाय " तुका म्हणे जे येथे । तेथे तैसेचि असेल ॥" हा तर तिचा स्थायीभावच. हा विचार येऊन मन शांत होते व पुन्हा तिच्या प्रेमात आणि त्या निरपेक्ष प्रेमाच्या मनावर गोंदलेल्या हळव्या आठवणीत मग्न होऊन जाते. या अशाश्वत जगातला हाच खरा शाश्वत सुखाचा विसावा नाही का?
मी पहिल्यांदा वारीला गेलो १९९६ साली, दहावी झाल्यावर. पण त्याआधी माउलींचा फलटणचा मुक्काम एवढाच त्यांच्याशी, वारीशी माझा संपर्क होत असे. त्यामुळे माउली येणार म्हटले की तो दिवस शेकडो दिवाळी दस-यांसारखा वाटायचा. श्रीमंत बाळमहाराजांबरोबर दोनदा प्रस्थानाला तेवढा मी गेलो होतो. पण वारी सुरू झाल्यापासून दररोज न चुकता सकाळ मधील वारीची प्रत्येक बातमी मी अधाशासारखी वाचत असे. त्यावेळी आजच्या सारखा टीव्ही चॅनेल्सना वारीचा छंद लागलेला नव्हता, पण पेपरमध्ये मात्र माउली आणि तुकोबांच्या पालख्यांचे सविस्तर वृत्त येत असे. त्यावरच माझी तहान भागायची.
भगवान श्रीमाउलींची पालखी आषाढ शुद्ध तृतीयेला फलटण मुक्कामी असते. काहीवेळा तिथीच्या वृद्धीमुळे दोन मुक्काम पडत असत. मग काय जास्तच मज्जा. तृतीयेला सकाळी केंदूरच्या श्रीसंत कान्हूराज पाठक महाराजांची पालखी आमच्या माउलींच्या मंदिरात येई. त्यांचे थोडावेळ भजन होई व मग ते पुढे निघून जात. त्यांचा सुंदर नक्षीकाम केलेला लाकडी रथ पहायला मला खूप आवडायचा. मी त्यांची दिंडी मंदिरात आली की धावत जाऊन दर्शन घेऊन यायचो. हे श्रीसंत कान्हूराज महाराज माउलींच्या काळातील, नागेश संप्रदायातील फार थोर विभूतिमत्व होते. माउली त्यांना प्रेमादराने ' काका ' म्हणत असत म्हणजे पाहा. त्यांच्या हकीकती खूप जबरदस्त आहेत, पण त्यावर पुन्हा कधीतरी लिहीन.
मी देवांच्या कृपेने कोणा पोरीच्या प्रेमात कधी पडलो नाही. पण असल्या मर्यादित लौकिक प्रेमाला कधीच समजू शकणार नाही अशा, प्रेमाच्या अत्युच्च स्तरावरील या माउलीप्रेमाचा अगदी किंचित, कणभर स्पर्श सद्गुरुकृपेने लाभलाय. तेवढाच मला स्वर्गसुखाची अनुभूती सतत देतो आहे. माउलींनी आपल्या या प्रेमकृपेच्या मधाचे बोट लावून आजवर किती जीवांना वेडावून सोडलंय, कायमचे अंकित करून ठेवलंय, हे तेच एक जाणतात ! पण ही संख्या गणिताच्या आवाक्यातली नाही, हे मात्र नक्की. हे माउलींचे वेडेपण फार फार अद्भुत आणि हवेहवेसे वाटणारे आहे.
आज कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट आमच्या फलटणी पहुडलाय. राजा चाले तेथे वैभव सांगाते । असे म्हणतात. ते खरेही आहे. भगवान माउलींबरोबर त्यांचा सारा वैष्णवमेळाही आहे. विठुरायाच्या प्रेमाने भारलेल्या, निरंतर आनंदाने बहरलेल्या माझ्या या सर्व हरिमय बांधवांना सादर वंदन. आणि आम्हां सर्वांचेच परमाराध्य असणा-या महाभागवतोत्तम भगवान सद्गुरु श्रीज्ञानराज माउली महाराजांच्या नित्यश्रीर्नित्यमंगल श्रीचरणारविंदी अनंतानंतकोटी दंडवत प्रणाम !!!!!
देवा, माझ्या तोडक्या मोडक्या, प्रेम-मायेची धड गादी उशीही नसणा-या आणि जर्जर झालेल्या हृदयमंचकावर शांत झोप येईल ना हो आपल्याला? आपल्याच कृपेने जशी जमली तशी सेवा केली आहे, गोड मानून घ्यावी, हीच कळकळीची प्रार्थना !
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।
मुखी करा हा गजर ॥१॥
करे टाळी मुखी नाम ।
तया कैचा भवभ्रम ॥२॥
दोष नासती अपार ।
पापे पळती सत्वर ॥३॥
शिर चरणांवरी गाढे ।
आत सुख दुणे वाढे ॥४॥
गुरु माउली भगवंत ।
त्रयमूर्ती एक तत्त्व ॥५॥
नेत्री वाहे अश्रुुपूर ।
आत्मजा आनंदविभोर ॥६॥
( क्रमश: )
(फोटो: फलटण मुक्कामातील समाज आरतीच्या वेळी चामर-पंखा सेवा चालू असतानाचे श्रीमाउलींचे सुंदर रूप)
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
http://rohanupalekar.blogspot.com
0 comments:
Post a Comment