*** धन्य कल्याण रामदास ***
भगवान श्रीज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात एक सुंदर ओवी घालतात. गुरुद्रोही माणसाचे नाव मुखाने जरी घेतले तरी ते महान पाप ठरते. मग गीतेच्या विवरणाच्या ओघात अज्ञानलक्षणे सांगताना हे जे पाप झाले, त्याचे प्रायश्चित्त म्हणून माउली म्हणतात,
आतां गुरुभक्तांचें नांव घेवों ।
तें वाचे प्रायश्चित्त देवों ।
गुरुभक्तांचें नाम पाहों ।
सूर्य जैसा ॥१३.६७५॥
येथे माउली अतीव प्रेमादराने गुरुभक्तांच्या नामस्मरणाचे माहात्म्य सांगत आहेत. गुरुभक्त आपल्या गुरुचरणीं समर्पित निष्ठेने इतके मोठे झालेले असतात की, श्रीभगवंतांच्या नामासारखे त्यांचे नामही घेणा-याच्या पापांचा नाश करते.
अशा परम अद्भुत गुरुभक्तांचे शिरोमणी म्हणून शोभून दिसणा-या समर्थ रामदासांचे बहिश्चर प्राण योगिराज श्रीकल्याणस्वामींची आज ३०२ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त या महान विभूतिमत्वाची ही शब्दपूजा करण्यासाठी तुम्हां सर्वांना मी सादर आमंत्रित करीत आहे. आपलीही गुरुभक्ती दृढावण्यातच या पूजेचे सुफल आहे.
आजवरच्या भारताच्या देदीप्यमान इतिहासात फार थोर गुरु-शिष्य होऊन गेलेले आहेत. मत्स्येंद्रनाथ- गोरक्षनाथ, निवृत्तिनाथ-ज्ञानेश्वर, गुरु नानक- गुरु अंगददेव, मुक्ताई-चांगदेव अशा स्वनामधन्य गुरु-शिष्य जोडगोळ्यांमध्ये स्वतेजाने तळपणारी आणखी एक जोडगोळी म्हणजे समर्थ रामदास-कल्याणस्वामी ही होय !
राष्ट्रगुरु समर्थ रामदासांचे श्रेष्ठ शिष्य अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी तथा कल्याणस्वामी हे समर्थ संप्रदायात पूजनीय मानले जातात. अंबाजींची समर्थांशी पहिली भेट इ. स. १६४५ मध्ये कोल्हापूर येथे झाली. त्या वेळी त्यांचे वय अंदाजे बारा वर्षांचे असावे. समर्थांच्याही मनात या हरहुन्नरी, सालस व गुणी मुलाने घर केले असावे. प्रत्येक कामातले त्याचे कौशल्य, कल्पकता व टापटीप, नेटकेपणा, तीव्र स्मरणशक्ती पाहून समर्थ खूश झाले. अंबाजीसोबत त्याच्या मातोश्री रखमाबाई व बंधू दत्तात्रेय हेही समर्थ सेवेत रुजू झाले. समर्थ संप्रदायाच्या इतिहासात मसूर गावी घडलेली झाडाच्या फांदीची गोष्ट प्रचलित आहे. सद्गुरु आज्ञेचे तंतोतंत पालन करण्यासाठी उलट्या बाजूने अंबाजीने फांदी तोडली; पण त्यामुळे फांदीसह तो विहिरीत पडला. समर्थांनी त्याला ‘‘कल्याण आहेस ना?’’ असे विचारले. तेथूनच पुढे हा पट्टशिष्य ‘कल्याण’ नावाने ओळखला जाऊ लागला.
समर्थ रामदास हे फार विलक्षण विभूतिमत्त्व होते. त्यांचा साक्षेप, त्यांचे सूक्ष्म निरीक्षण, त्यांचे अलौकिक व्यवस्थापन कौशल्य, त्यांची दूरदृष्टी, समाजहिताची तळमळ, त्यांचा स्वधर्म व स्वराष्ट्राविषयीचा तीव्र प्रेमादर, सारेच अद्भुत होते. त्यांच्या सर्व सद्गुणांचा दुसरा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे कल्याणस्वामी होत! समर्थांना अभिप्रेत असणारा खरा महंत कल्याणांच्या रूपाने त्यांच्या अखंड सोबत वावरत होता !
कल्याण स्वामींना ही स्थिती काही फुकट मिळालेली नव्हती. समर्थ रामदासांनी या शिष्याची वारंवार परीक्षा घेऊन, तावून-सुलाखून त्याला तयार केलेले होते. कल्याणस्वामींच्या यशस्वी कारकीर्दीत समर्थांचे प्रयत्न व श्रेय नक्कीच महत्त्वाचे आहे.
कल्याणस्वामी इ. स. १६७८ पर्यंत समर्थांच्या सावलीसारखे सोबत वावरले. त्यांना समर्थांचे मार्गदर्शन ३६ वर्षे लाभले. समर्थांचाही आपल्या या पट्टशिष्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे आपल्या पश्चात हाच आपला संप्रदाय व उभारलेले ११०० मठांचे संघटन व्यवस्थितरीत्या सांभाळू शकेल, याची खात्री वाटल्याने आपल्या देहत्यागाच्या तीन वर्षे आधी समर्थांंनी कल्याणस्वामींना लोकोद्धारासाठी डोमगावकडे रवाना केले.
कल्याणस्वामींचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची तीव्र स्मरणशक्ती व सुरेख हस्ताक्षर हे होय. व्यवहारामध्ये असे म्हणतात, की शारीरिक बळ आणि बौद्धिक बळ कधी एकत्र जात नाही; पण कल्याणस्वामी हे याला मोठाच अपवाद होते. बलदंड शरीर आणि कुशाग्र बुद्धी, विशेष प्रज्ञा यांचा सुरेख संगम कल्याणस्वामींच्या ठायी झालेला होता. आपल्या या लाडक्या शिष्याचा हा अलौकिक अधिकार, त्याचा हकनाक द्वेष करणा-या इतर शिष्यांना सप्रमाण दाखवून द्यावा म्हणून एकेदिवशी समर्थांनी लीला रचली. दासबोधातील एक ओवी सांगून ती कोणत्या समासातली कितवी ओवी आहे, हे समर्थांंनी विचारले. दासबोधाची निरंतर पारायणे करणार्या शिष्यांनाही आठवेना. समर्थ म्हणाले, ‘‘कल्याणाला विचारा!’’ एक शिष्य धावत गेला. कल्याणस्वामी कोठी घरात सुपार्या निवडत होते. त्या शिष्याने ओवी उच्चारताच कल्याणस्वामींनी एका क्षणात त्या ओवीचा समास व क्रमांक सांगितला. सगळेच शिष्य अचंबित झाले. समर्थांंनी कल्याणांना बोलावून विचारले, ‘‘कधी वाचलास रे दासबोध?’’ कल्याणस्वामी नम्रपणे उत्तरले, ‘‘स्वामी, रोजच्या कामात वेळ कुठे होतो? आपण सांगितलात तेव्हा लिहून घेतानाच तेवढा वाचला मी दासबोध!’’ आपल्या पट्टशिष्याची जगावेगळी स्मरणशक्ती पाहून समर्थही मनोमन सुखावले.
कल्याणस्वामींनी त्यांच्या शिष्य परंपरांमध्ये लेखनक्रिया रोजच्या रोज झालीच पाहिजे, असा दंडकच घातला होता. कल्याणांचे सर्वच शिष्य एकटाकी, सुंदर व देखणे लेखन करण्यात पटाईत होते. त्या परंपरेतील दासबोधाच्या प्रतींचा सर्मथभक्त शंकरराव देवांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे. याशिवाय कल्याण-परंपरेतील मठांमधून ज्ञानेश्वरी, संतांचे गाथे यांच्याही सुंदर हस्तलिखित प्रती आजही पाहायला मिळतात. छापखाने अस्तित्वात नव्हते त्या काळात अत्यंत दूरदृष्टीने कल्याणस्वामींनी चालविलेला हा ग्रंथ संवर्धनाचा उपक्रम मोलाचा ठरतो !
बलभीम मारुतीरायांची उपासना करणार्या, गुरूंसाठी दोन प्रचंड मोठे हंडे पाणी दररोज सज्जनगड उतरून उरमोडी नदीतून भरून आणणा-या श्रीकल्याणस्वामींनी त्या काळात शारीरिक व बौद्धिक अशा दोन्ही प्रकारांनी बलवान, सशक्त समाज घडवण्याचे केलेले कार्य फारच महत्त्वाचे मानायला हवे. आपले स्वत्वच विसरु लागलेल्या समाजाला पुन्हा जागृत करण्याचे व त्याला सामर्थ्य देण्याचे मौलिक कार्य या समर्थशिष्याने नेमकेपणे केलेले दिसून येते.
आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम जवळील हेळवाकच्या घळीत या गुरुशिष्यांच्या अनोख्या स्नेहबंधाचे दर्शन करविणारा एक सुंदर प्रसंग घडला होता. श्रीसमर्थ रामदास स्वामी हेळवाकच्या घळीत मुक्कामाला असताना एकदा त्यांची विड्याची पाने संपली. म्हणून त्यांनी तसल्या भयाण पावसाळी रात्रीच ती आणून देण्याविषयी आपल्या सोबतच्या शिष्यांना आज्ञा केली. कोणीच ते दिव्य करायला तयार होईना. तेवढ्यात कल्याणस्वामींच्या कानावर समर्थांची इच्छा आली. ते तत्काळ त्या अंधा-या रात्री पाने आणायला बाहेर पडले. आजही हेळवाक परिसरात चांगले जंगल आहे, त्याकाळी तर काय असेल? नेमके त्याचवेळी कल्याणस्वामींच्या पायाला एका भुजंगाने दंश केला व ते बेशुद्ध पडले. हे वृत्त कानी पडताच समर्थ कळवळले. तोवर लोकांनी कल्याणांना घळीत आणले. आपला बहिश्चर प्राण निपचित पडलेला पाहून समर्थांनाही धीर धरवेना. त्यांनी त्याच तगमगीत भैरवनाथाला अकरा मण साखरेचा नवस बोलला. भगवंतांच्याच संकल्पाने तो भुजंग डसला होता, समर्थांच्या संकल्पाने त्याचे विष त्वरित उतरले. कल्याणस्वामी शुद्धीवर आले. समर्थांनी प्रेमपडिभराने आपल्या शिष्याला हृदयाशी धरले. पुढे छत्रपती शिवरायांनी जातीने ती अकरा मण साखर पाठवून दिली व समर्थांनी भैरवनाथाचा नवस फेडला. आजवरच्या इतिहासात शिष्याचे प्राण वाचावेत म्हणून श्रीगुरूंनी नवस केल्याचे हेच एकमात्र उदाहरण आहे. शिष्याची गुरुआज्ञा पालनाची तीव्रतम निष्ठा व गुरूंचे आपल्या शिष्यावरील अकृत्रिम प्रेम यांचा सुरेख वस्तुपाठ असणारी ही कथा प्रत्येक साधकाने मनावर कोरून ठेवावी, इतकी विशेष आहे.
उभी हयात गुरुवचनाचे तंतोतंत पालन करण्यात घालविलेल्या कल्याणस्वामींनी आपली ही गुरुनिष्ठा शेवटच्या क्षणीही कायम ठेवली. सद्गुरु श्रीसमर्थांंचा अस्थिकलश चाफळ मंदिरातील वृंदावनात जपून ठेवलेला होता. त्या अस्थींचे विसर्जन करण्याविषयी उंब्रज मठाच्या केशवस्वामींनी श्रीकल्याणस्वामींना वारंवार विचारले; पण नेहमी ‘ पुढें पाहू ’, असेच उत्तर मिळे.
शेवटी इ. स. १७१४ मध्ये अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशीला, केशवस्वामींनी विसर्जनाची परवानगी मिळेलच या खात्रीने तो पवित्र अस्थिकलश वृंदावनातून उचलला आणि डोमगावकडे प्रयाण केले. पण घडले आक्रीतच ! ज्याक्षणी इकडे तो अस्थिकलश जागेवरून हलवला त्याचक्षणी तिकडे डोमगांवी समर्थांंच्या लाडक्या कल्याणानेही सद्गुरुस्मरणात आपला देह ठेवला. डोमगावला पोहोचल्यावर केशवस्वामींना घडलेली घटना समजून अतीव दु:ख झाले. आश्चर्य म्हणजे गुरु-शिष्यांनी आपली जोडगोळी तिथेही सोडली नाही. शेवटी दोघांच्याही अस्थी एकत्रच गंगेमध्ये विसर्जित झाल्या. काय त्या जगावेगळ्या प्रेमाचे वर्णन करावे? ऐसे गुरुशिष्य होणे नाही !!
या भावभरल्या प्रसंगाविषयी तितक्याच भावपूर्ण शब्दांत आपल्या " हृदयसंवाद " ग्रंथातील " जईं आनंदघनु स्वामी भेटे " या अप्रतिम लेखात, संत वाङ्मयाचे जाणते अभ्यासक प. पू. श्री. शिरीषदादा कवडे म्हणतात, " ....डोमगांवहून उभय गुरु-शिष्यांच्या अस्थी एकत्रच मार्गस्थ झाल्या आणि पुढे श्रीकेशवस्वामींच्या हस्ते काशीक्षेत्री गंगेत एकाचवेळी विसर्जित झाल्या. तब्बल तेहेतीस वर्षे श्रीसद्गुरुचरणांचे अनुसंधान राखत अखेर त्याच श्रीचरणीं श्रीकल्याणस्वामी कायमचे विसावले. आपल्या सद्गुरूंची छत्रसावली भक्तिबळाने त्यांनी अखेरच्या प्रवासातही मिळवली. सद्गुरुभक्तीने लाभणा-या कृतार्थतेचीही ही परिसीमाच म्हणायला हवी.
कृतार्थतेने धन्यतेच्या आश्रयाला जाण्याचे प्रसंग आधीच अत्यंत दुर्मिळ असतात; आणि अशा प्रसांगांचे साक्षिगणेश तर त्याहून विरळ. चाफळच्या वृंदावनाने मात्र ते महद्भाग्यलेणे वर्षानुवर्षे अंगभर मिरवून जपून ठेवलेले आहे ! बा मायबापा कल्याणराया; आपल्या सद्गुरुसेवास्फूर्ती प्रदान करणा-या चरणधूलीच्या स्पर्शाचे सौभाग्य तरी मज पामराला लाभू द्यावे ! आपल्या लोकोत्तर, सर्वकलासंपन्न अशा सुमंगल सद्गुरुभक्तीला माझे वारंवार साष्टांग दंडवत प्रणाम असोत ! "
आज आषाढ शुद्ध त्रयोदशी, दि. १७ जुलैला याच भाव-मनोहर प्रसंगाला तीनशे दोन वर्षे पूर्ण होत आहेत. कल्याणस्वामींचे भावोज्ज्वल आणि देदीप्यमान जीवन व कार्य केवळ समर्थ संप्रदायच नाही, तर जगातील सर्व गुरुसंप्रदायांना अनंतकाळपर्यंंत प्रेमभक्तीच्या सोज्ज्वळ दीपाचा शांत-स्निग्ध ब्रह्मप्रकाश देऊन भक्तिमार्गावर अग्रेसर करीत राहील, यात शंका नाही ! श्रीकल्याण स्वामींच्या पुण्यतिथीच्या या पावन पर्वावर, आजवर होऊन गेलेल्या सर्व थोर थोर गुरुशिष्यांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक दंडवत घालून आपणही, " आमची गुरुभक्ती दृढ होवो, " अशीच सप्रेम प्रार्थना करूया व त्यांच्या दिव्य चरित्र चिंतनाच्या माध्यमातून गुरुप्रेमाचा भावगर्भ आस्वाद घेत श्रीगुरुचरणीं विसावूया !!
[ श्रीकल्याणस्वामींच्या विषयी अधिक माहितीसाठी kalyanswami.blogspot.com या ब्लॉगला जरूर भेट द्यावी ही विनंती. ]
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा माहितीपूर्ण पोस्ट नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील पेज लाईक करावे ही विनंती.
https:// rohanupalekar.blogspot.in)
apratim.
ReplyDeleteखरोखर लेख वाचून डोळ्यात पाणी आले.धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य.
ReplyDelete🙏🙏🙏💐💐💐
ReplyDeleteअसा गुरू आणि असा शिष्य होणे नव्हे!त्रिवार दंडवत!
ReplyDeleteधन्य क्षेत्र डोमगाव!श्री कल्याणस्वामींचा जेथे ठाव!
ReplyDeleteगुरू आज्ञेचा करूनी गौरव!जगदुद्धारा पातले!
परंडा-डोमगाव-डोंजा!तीन तपे केली ये जा!
समाजसेवेचे काजा!देह कष्टविला!
समर्थांचा दासबोध!श्रीकल्याणहस्ते झाला सिद्ध!
तयांचे चरणी हे मस्तक! राहो सदा!
जयराम गोले (देशमुख)
डोमगावकर
खूप सुंदर शब्दांकन दादा
ReplyDeleteअतिशय भावपूर्ण
ReplyDeleteया अद्वितीय गुरुशिष्य जोडीला शतशः दंडवत
ReplyDeleteRam Krishna hari
ReplyDeleteपरम पूज्य सद्गुरू श्री कल्याण स्वामी महाराजांच्या चरणी अनेकानेक शिर साष्टांग नमस्कार
ReplyDelete🙏 श्री राम
ReplyDeleteJay Jay shreeram 🙏🙏
ReplyDelete