25 Jul 2016

गुरु नाही नाशिवंत गुरु सत्य तो अनंत -उत्तरार्ध


मूळ परब्रह्माचे तीन समान भाग शास्त्रांनी सांगून ठेवलेले आहे. हे तिन्ही मुळात एकरूपच असले तरी कार्यपरत्वे त्यात भेद आहे. मूळ सत्तारूप परब्रह्म हे निष्क्रिय, निष्काम, निर्विकार, निराकार आहे. ते केवळ अधिष्ठानरूप आहे. त्या परब्रह्माच्या साकार रूपाला शक्ती किंवा प्रकृती म्हणतात. " शिवाभिन्ना शिवंकरी ।  " असे भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज स्पष्टच सांगतात. शिवांहून त्यांची शक्ती भिन्न नाही. शिवांच्या अधिष्ठानावर आणि त्यांच्याच संकल्पाने ही शक्ती स्वत:पासून या चराचर जगाचा विस्तार करते. हीच मायाशक्ती होय. याशिवाय शिवांचेच म्हणजेच परब्रह्माचे आणखी एक साकार रूप म्हणजे " श्रीसद्गुरु " होय. शिव निराकार, शक्ती साकार पण नियमांनी बांधलेली आणि सद्गुरु साकार व सर्वतंत्रस्वतंत्र असतात. मायेचा कसलाही बाध त्यांना लागू होत नाही, ते कायमच मायेच्या पलीकडे असतात. श्रीसमर्थ रामदास स्वामी श्रीदासबोधातील सद्गुरुस्तवन समासाच्या पहिल्याच ओवीत म्हणतात, " आतां सद्गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शों सकेना ॥१.४.१॥" सद्गुरूंना माया स्पर्श देखील करू शकत नाही. म्हणूनच प. पू. श्री. शिरीषदादा कवडे आपल्या श्रीगुरुतत्त्वाचे अतीव सुरेख वर्णन करणा-या अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात,
गुरु नाही नाशिवंत ।
गुरु सत्य तो अनंत ॥१॥

या मायेचे नाश हेच मुख्य लक्षण आहे. " उपजे ते नाशे । " हाच खरा सिद्धांत आहे. प. पू. श्री. शिरीषदादा कवडे आपल्या आणखी एका अभंगात म्हणतात, " जे जे डोळां दिसे, ते ते पावे नाश । ऐसा श्रुतिघोष, कानी आहे ॥१॥"  डोळ्यांना जे दिसते ते सर्व नाश पावणारेच आहे. पण त्या मायेचा स्पर्शही नसल्याने सद्गुरुतत्त्व मात्र अविनाशी आहे.
श्रीगुरुतत्त्व सत्य आणि अनंतही आहे. जे कोणत्याही काळी, कोणत्याही स्थितीत अविकृत राहते, म्हणजे ज्यात कसलाही बदल होत नाही, तेच ' सत्य ' म्हटले जाते. सत्याला कसलीही सापेक्षता नाही. श्रीगुरुतत्त्व हेच या असत्य, विकारी, सतत बदलणा-या जगातील अविकारी पूर्णसत्य आहे. श्रीगुरुतत्त्व ज्या देहाच्या आश्रयाने प्रकटते तो पावन देह देखील सत्यच असतो.
अनंत म्हणजे परमात्मा. ज्याची शक्ती अनंत, सामर्थ्य अनंत, लीला अनंत, प्रेमही अनंत; तोच परमात्मा होय. श्रीगुरूच शिष्यासाठी असे चालते बोलते भगवंत असतात. म्हणून तेच अनंतही आहेत, असे प. पू. श्री. शिरीषदादा येथे म्हणत आहेत. श्रीसंत एकनाथ महाराजही म्हणतात, " एका जनार्दनी गुरु देव । येथे नाही बा संशय ॥ "
श्रीगुरूंच्या तात्त्विक स्वरूपाचे वर्णन करताना पू. दादा अभंगाच्या दुस-या चरणात म्हणतात,
गुरु शांतिबोध गुंफा ।
सिद्ध चैतन्याची प्रपा ॥२॥

श्रीगुरु हे शांती व ज्ञानाचे आगर आहेत. शांती हा परमार्थाचा सर्वोच्च गुण आहे. भगवान श्रीमाउलींनी यावर फार सुंदर विवरण केलेले आहे. आत्मज्ञान परिपूर्णतेने झाल्यानंतर त्या महात्म्याच्या ठिकाणी जो भाव प्रकट होतो, त्याला परमशांती म्हणतात. हा भगवद् भावच आहे. अशा ज्ञानोत्तर शांतीची नित्य व एकांत गुंफा म्हणजेच श्रीगुरु होत. त्यांची ती शांती कधीही कशानेही ढळत नसते. डोंगरातील निर्जन ठिकाणची गुहा जशी कायमच नि:शब्द असते, तशीच त्यांची शांती अढळ असते. त्यात कसल्याही प्रकारचे तरंग उठत नाहीत. तसेच ज्ञानाच्या बाबतीत परिपूर्णता केवळ श्रीगुरूंच्या स्वरूपातच असते. ज्ञान त्यांच्या ठायी शोभायमान होत असते.
प्रपा म्हणजे पाणपोई. श्रीगुरु हे निरंतर प्रवाहित होणा-या भगवत् चैतन्याची पाणपोईच असतात. कोणीही यावे व त्या सिद्ध ज्ञानमय चैतन्याचे पान करून सुखी व्हावे, तिथे कसलाही धरबंध नाही, कोणतीही अडवणूक नाही. फक्त अनन्यता व शरणागती मात्र हवी, तरच ह्या चैतन्याचे अमृतपान भरभरून करता येते.
शिष्याच्या विषयी असलेला श्रीगुरूंचा निखळ प्रेमभाव सांगताना अभंगाच्या तिस-या चरणात पू. श्री. दादा म्हणतात,
गुरु प्राणांचाही प्राण ।
शिष्यालागी आत्मदान ॥३॥

आपल्या शरीरात दहा प्राण असतात. प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पाच मुख्य प्राण तर नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे पाच उपप्राण. या दहांचे नियंत्रण प्राणशक्ती म्हणजेच कुंडलिनी शक्ती करते. तिच्याच साहाय्याने आपल्या शरीराची एकूण एक कामे हे दहाजण मिळून करतात. त्यामुळे महात्मे म्हणतात की, आपले शरीर प्राणांवर चालते. श्रीसद्गुरुकृपा म्हणजेच सद्गुरुशक्ती हीच त्या प्राणांचे संजीवन आहे. म्हणून पू. दादा येथे श्रीगुरूंना प्राणांचाही प्राण असे म्हणत आहेत.
कोणत्याही निर्जीव गोष्टीत केवळ कटाक्षाने प्राण फुंकण्याचे अजब सामर्थ्य श्रीगुरूंच्या कृपेक्षणात असते. त्यांची नुसती दृष्टी पडली तरी मेलेला जिवंत होऊन चालू लागतो. आजवरच्या असंख्य महात्म्यांच्या चरित्रात असे प्रसंग आपण सर्वांनी वाचलेले आहेतच. नुकताच काशीच्या पूज्यपाद श्री त्रैलंगस्वामींचा एक मजेशीर प्रसंग मी वाचला. एकदा अचानकच ते आपल्या ब्रह्मासिंह नावाच्या शिष्याला घेऊन दशाश्वमेध घाटावर आले. तेथे काशीचे महाश्मशान आहे. तेवढ्यात नावेतून एक प्रेत घेऊन काही लेक उतरले. त्याबरोबर एक स्त्री देखील उतरून त्या प्रेताला कवटाळून रडू लागली. स्वामींनी शिष्याला माहिती काढायला सांगितली. ती एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिचा नवरा मेला होता व त्यांना मूलबाळही नव्हते. म्हणून ती सती जाण्यासाठी लोकांना विनवीत होती, पण कोणी तयार होत नव्हते. हे ऐकून त्रैलंगस्वामी तिच्या जवळ गेले व तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवीत म्हणाले, " मुली तू का एवढी रडतेस? " तिने सगळी हकीकत सांगितली व त्यांचे चरण घट्ट धरून रडायला लागली. ते तिचे सांत्वन करत म्हणाले, " अगं, माझा पाय तरी सोड. तू कुठे जातेस? अजून तुला तुझ्या नव-याची भरपूर सेवा करायची आहे ना ! " ती चमकून त्यांच्याकडे पाहू लागली. ते शांतपणे उठले व त्या प्रेताच्या बेंबीला त्यांनी आपला उजव्या पायाचा अंगठा लावला आणि सोबतच्या लोकांना त्या प्रेताचे दोर सोडायला सांगितले. आश्चर्य म्हणजे काही क्षणातच त्या निर्जीव प्रेतात पुन्हा जीव आला व ते हालचाल करू लागले. लोक दिङ्मूढ होऊन पाहात आहेत तेवढ्यात स्वामी तिथून हळून निघूनही गेले. श्रीत्रैलंग स्वामींची ही हकीकत प. पू. श्री. दादांच्या " गुरु प्राणांचाही प्राण । " या चरणाचे मूर्तिमंत उदाहरणच आहे. 
या चरणाच्या उत्तरार्धात प. पू. श्री. दादा फार महत्त्वाचा विषय सांगत आहेत. श्रीगुरूंकडून होणा-या दीक्षेची प्रक्रियाच ते येथे सांगत आहेत. श्रीगुरु कृपावंत होऊन दीक्षा देतात म्हणजे काय करतात? तर ते शिष्याच्या हृदयात स्वत:ला स्थापन करतात, शिष्याला ते आत्मदान देतात. हाच महत्त्वाचा संदर्भ पू. दादा येथे मुद्दाम देत आहेत. परमार्थ पूर्णत्वाला जायला हवा असेल तर अशी श्रीगुरूंची आत्मदानरूप कृपा व्हावीच लागते व ती सर्वथा त्यांच्याच इच्छेवर अवलंबून असते. आपल्याला हवा म्हणून आपण कोणाचा असा अनुग्रह नाही घेऊ शकत. तो त्यांनीच कृपावंत होऊन, आपला पूर्व ऋणानुबंध पाहून, सगुण रूपाने किंवा यथार्थस्वप्न दृष्टांतादी मार्गाने स्वत:च्या इच्छेने व प्रसन्नतेने द्यावा लागतो. म्हणूनच असा श्रीगुरूंचा कृपाप्रसाद हा अत्यंत दुर्मिळ व अमोघ असतो असे शास्त्रांनी व संतांनी वारंवार सांगून ठेवलेले आहे. तो प्रसाद झाल्याशिवाय खरा परमार्थ सुरूच होत नाही.
श्रीगुरूंच्या संगतीचे माहात्म्य किती गोड असते, हे प. पू. श्री. दादा अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात,
गुरु निराकारा अंग ।
नि:संगासी नित्यसंग ॥४॥

गुरु म्हणजे निराकार अशा मूळ परब्रह्माचेच अंग आहेत. निराकाराला जेव्हा जगद्कल्याणासाठी साकार व्हायची तीव्र इच्छा होते, तेव्हा ते ज्या रूपात साकार होते, ते म्हणजेच हे परमकरुणामय श्रीगुरुतत्त्व होय. निराकाराचा अलौकिक आकार म्हणजे श्रीगुरु होत.
परब्रह्माचे परिपूर्ण ज्ञान झाल्यावर महात्मा नि:संग, निर्विकार, निर्विचार, निरालंब होतो. त्याला कसल्याही वासना, कामना, इच्छा वगैरे काहीही शिल्लक नसते. अशा नि:संग झालेल्या महात्म्यांनाही आपल्या श्रीगुरूंचा लौकिक तसेच अलौकिक सहवास मात्र सतत हवाहवासा वाटत असतो. आत्मतृप्त झालेल्या त्यांची श्रीगुरु सहवासाची तृप्ती कधीच होत नाही. नि:संगांनाही ज्यांचा नित्य संग व्हावासा वाटते, ते हे श्रीगुरुपरब्रह्म म्हणूनच बोलाबुद्धीच्या पलीकडचे मानलेले आहे.
या अत्यंत मनोहर अभंगाच्या शेवटच्या चरणात प. पू. श्री. शिरीषदादा म्हणतात,
गुरु सगुण निर्गुण ।
अमृतेचे देहभान ॥५॥

श्रीगुरुतत्त्व हे एकाचवेळी सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. श्रीमाउली देखील, " सगुण निर्गुण एकु गोविंदु रे । " म्हणतातच की.
सगुण व निर्गुण या संज्ञांचा अर्थ नेहमीच गोंधळात टाकणारा असतो. यांचे नेमके वर्णन करायचे झाले तर, सगुण म्हणजे गुणांसह असणारे व निर्गुण म्हणजे गुणविरहित होय. पण या दोन्ही शब्दांमध्ये अभिप्रेत असणारे " गुण " भिन्न आहेत, हे ब-याचवेळा लोक ध्यानात न घेताच अर्थ करतात आणि मग गोंधळात पडतात. सगुण म्हणजे दैवी गुणांसह प्रकटलेले. भगवंतांचे सहा विशेष गुण माउली सांगतात. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य या षड्गुणांसह ज्यांनी दिव्य पांचभौतिक पूर्ण शुद्धसत्त्वमय देह धारण केलेला आहे, त्यांच्यासाठी " सगुण " असे शास्त्रांचे संबोधन आहे. तर निर्गुण म्हणजे ज्यांच्या ठायी सत्त्व, रज व तम हे तीन गुण नाहीत ते. निर्गुणचा सामान्यत: निराकार एवढाच अर्थ लोक करतात. पण तो बरोबर नाही. त्रिगुणरहित ते निर्गुण व दैवी सद्गुणसहित ते सगुण होय. भगवान श्रीमाउलींचा " कान्होबा तुझी घोंगडी चांगली । " हा अभंग याठिकाणी  जाणून घेतला तर हे सगुण-निर्गुण वर्णन नीट समजेल. विस्तारभयास्तव एवढेच फक्त सूचित करतो.
श्रीगुरुतत्त्व हे असे एकाचवेळी सगुण व निर्गुण उभयरूप आहे व तेच श्रीगुरुकृपेने आता अमृतेचे देहभानही व्यापून दशांगुळे उरलेले आहे, असा अद्भुत स्वानुभव प. पू. श्री. शिरीषदादा कवडे शेवटी सांगत आहेत. अमृता आता नामरूपातीत होऊन अंतर्बाह्य गुरुमय होऊन गेलेली आहे. हाच परमार्थातील सर्वोच्च ब्रह्मानुभव आहे.
श्रीसद्गुरूंच्या परमकृपेने ही वेडीवाकुडी सेवा हातून घडली. माउली जिथे स्वत:ला " गुरुवर्णनी  मुका । आळशी पोसिजे फुका । " म्हणतात तिथे माझ्यासारख्या खरोखरीच्या ना-लायकाने काय मिजास मारावी? परमभाग्याने लाभलेल्या या श्रीगुरुवर्णनरूप सेवासंधीचे त्यांच्याच कृपेने सोने झालेले आहे, हे माझ्यावरील त्या दयार्द्र प्रभूंचे अपार कृपाऋणच म्हणायला हवे. म्हणून सादर कृतज्ञतेने त्याच परमाद्भुत विश्वव्यापक नित्यमंगलस्वरूप श्रीगुरुचरणकमलीं ही सेवा तुलसीदलरूपाने समर्पितो. आणि; आम्हां सर्वांच्या हातून प्रेमादराने साधन घडून आमचेही देहभान असेच निरंतर गुरुमय होऊन राहो, हीच या श्रीगुरुपौर्णिमेच्या पावन प्रसंगी प्रार्थना करून त्या श्रीचरणस्मरणानंदात माझ्या मनींचे प्रेमभाव व्यक्त करून विराम घेतो.
केव्हा मज भेटशील गुरुराया ।
मस्तक पायांवरी ठेवीन ॥१॥
डोळेभरी पाहीन रूप मनोहर ।
तुलसी चरणांवर वाहीन ॥२॥
भावनैवेद्य अर्पीन प्रेमाने ।
चरणसंवाहने सुखी होईन ॥३॥
केव्हा लाहीन तंव कृपाप्रसाद ।
फिरेल वरद कर पाठी ॥४॥
साहवेना मज विरह आता ।
तंव पोटा माया का न ये ॥५॥
दयामाया काही करी गा देवा ।
मनींच्या प्रेमभावा जाणोनिया ॥६॥
जीव कासावीस अंतर असोस ।
आत्मजा उदास अंतर्बाह्य ॥७॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

(अशा माहितीपूर्ण पोस्ट नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील पेज लाईक करावे ही विनंती.
https:// rohanupalekar.blogspot.in)

14 comments:

  1. असा प्रसादचा लाभ होत रहावा.

    ReplyDelete
  2. Il श्री सदगुरवे नमः ll
    🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹

    ReplyDelete
  3. 🙏उज
    ळील्या ज्ञान ज्योती, अश्याच त्या तेवत्या ठेवा 🙏🙏💐संजय जोशी

    ReplyDelete
  4. आम्हा सर्व साधकांच्या भावना व्यक्त केल्यात. धन्यवाद .

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेख लिहिलात, गुरुौर्णिमेनिमित्त हा दैवी प्रसाद सर्वांना अर्पण केल्या बद्दल खूप खूप आभारी, अशीच गुरू सेवा नित्य घडावी हीची प्रार्थना
    श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete
  6. नमस्कार. खूप सोपे सहजपणे विवेचन आहे.सद्गुगुरु चरणी विनम्रपणे नस्कार.

    ReplyDelete
  7. खरोखरीच, अत्यंत समर्पक, अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण लेख. शेवटचा अभंग तर सोनिया सुगंधु असा उतरलाय.

    ReplyDelete
  8. प.पू.सद्गुरु दादांच्या पावन चरणी साष्टांग दंडवत!

    ReplyDelete
  9. 🙏🙏🙏

    ReplyDelete
  10. अत्यंत गूढ गुरुतत्त्व खूप सोपे करून आपण सांगितलेत, धन्यवाद आणि गुरुतत्त्वाला साष्टांग दंडवत

    ReplyDelete
  11. खूप सुंदर.असा प्रसाद सदैव ग्रहण करता येवो ही सद्गुरु चरणी विनम्र प्रार्थना. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete