14 Jul 2016

* तयाचिये सेवे लागो हे जीवित *



भगवान सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराज हे फार अद्भुत पूर्णावतार आहेत. त्यांच्या कृपेने त्यांच्या मांदियाळीत जन्मलेले महात्मेही त्यांच्यासारखेच विलक्षण आहेत. या सर्व माउलींच्या लीलासहचरांमध्ये स्वतःच्या गुणवैशिष्ट्यांनी अत्यंत शोभून दिसणारे विभूतिमत्व म्हणजे श्रीज्ञानेश्वरकन्या प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज हे होत ! आज आषाढ शुद्ध दशमी, दि. १४ जुलै रोजी त्यांची १३५ वी जयंती आहे. त्यानिमित्त श्रीमहाराजांच्या श्रीचरणीं ही शब्दरूप पुष्पांजली सादर समर्पण करूया !
अवघ्या बत्तीस वर्षांचे आयुष्य. त्यात नवव्या महिन्यातच दोन्ही डोळे गेलेले. लहानपणी अतिशय विपरीत परिस्थितीतून मार्ग काढावा लागला. शिक्षण नाही, काळजी घेणारेही नाही कोणी. तरीही साक्षात् पंचलतिका गोपीचे अवतार असणाऱ्या श्रीगुलाबराव महाराजांनी जे कार्य केले, जी भव्य-दिव्य ग्रंथनिर्मिती केली तिला कसलीच उपमा देता येणार नाही. आपली शब्दसूची तोकडी आहे त्यासाठी. बत्तीस वर्षांच्या काळात त्यांनी मराठी, संस्कृत, हिंदी, व-हाडी अशा भाषांमधून एकशे तेहेतीस ग्रंथ रचले. त्यांच्या रचनांमध्ये वेद, उपनिषदे, शास्त्रग्रंथ, पुराणे, संतांची वचने, विविध धर्मांचे ग्रंथ यांचे नेमके संदर्भ असतात. एवढेच नाहीतर, पाश्चात्य विद्वान डार्विन, स्पेन्सर, अॅरिस्टॉटल अशांचेही संदर्भ ते बरोबर घेतात. डार्विनच्या उत्क्रांतिवादावर त्यांनी त्यावेळी आक्षेप घेतले होते, ते आज विज्ञानानेही मान्य केले आहेत. ते कधी आणि कुठे शिकायला गेले होते सांगा बरे हे सर्व? त्यांचा तो जन्मजात अधिकारच होता, हेच त्यातले सत्य आहे.
श्रीगुलाबराव महाराजांची ग्रंथ निर्मिती फार मजेदार होती. ते भराभर श्लोक, ओव्या बोलत असत व त्यांचे लेखनिक पटापट ते लिहून घेत. ते लेखन सोपे जावे म्हणून त्यांनी स्वत: " नावंग " नावाची शॉर्टहँड लिपीच तयार केली, आता बोला. त्यांच्या त्या गंगौघातले जेवढे बरोबरचे लोक लिहून घेऊ शकले तेवढे उपलब्ध झाले. जे लिहून घेता आले नाहीत ते याच्या नक्कीच दहापट असतील. मुमुक्षूकार ल. रा. पांगारकारांनी लिहून ठेवले आहे की, गुलाबराव महाराज माउलींच्या एखाद्या ओवीवर ओवीबद्ध प्रवचन करीत असत. त्यांचा ओव्या रचण्याचा वेग इतका प्रचंड असे की, एका तासात ते सहज सहाशे ते सातशे ओव्या घडाघडा रचून म्हणत असत. एकावेळी चार पाच लोक लिहायला बसत व जेवढे जमेल तेवढे शब्द लिहून ठेवत. नंतर शांतपणे सगळे एकत्र केले जाई. अशाप्रकारे उपलब्ध झालेले वाङ्मय १३३ ग्रंथांएवढे भरले. खरोखरीच अलौकिक चमत्कार नाही का हा?
भगवान सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराजांनी स्वमुखाने स्वतःच्या नामाचा उपदेश आजवर फक्त तीनच महात्म्यांना केलेला आहे. संत एकनाथ, संत हैबतबाबा आरफळकर व संत गुलाबराव महाराज माधानकर या तीनच थोर सत्पुरुषांना माउलींनी स्वमुखाने स्वतःचेच ' ज्ञानदेव ' हे नाम अनुग्रह करून प्रदान केले होते. माउलींनी गुलाबराव महाराजांना स्वतःच्या मांडीवर बसवून हे नाम दिलेले होते. त्या प्रसंगाचे वर्णन श्रीमहाराजांनी करून ठेवलेले आहे आपल्या अभंगांमधून. म्हणून भगवान माउली हेच श्रीसंत गुलाबराव महाराजांचे सद्गुरु होते. शिवाय महाराज स्वतःला ज्ञानेश्वरकन्या म्हणवून घेत असत आणि माउलींचा उल्लेख ते ' तात ' असा करीत असत.
श्रीसंत गुलाबराव महाराजांच्या अभंगवाणीचे एक अतिशय गोड वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक अभंगाचा शेवट श्रीमाउलींच्या नावानेच करतात किंवा माउलींविषयीच काहीतरी सांगून करतात. त्यांना माउलींशिवाय अन्य काही सुचतच नाही. अत्यंत प्रेमार्द्र होऊन ते माउलींचे गुणवर्णन करू लागले की वाचणाराही आपसूकच माउलीमय होऊन जातो. त्या स्नेह-नवलाने त्याचे डोळे कधी पाझरू लागतात ते त्यालाही समजत नाही. भगवान श्रीमाउलींनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात 'आचार्योपासनं ' पदाच्या विवरणात एक्याण्णव ओव्या रचलेल्या आहेत. या गुरुसेवा वर्णनाच्या ओव्यांना गुलाबराव महाराज ' गुरूपनिषद ' असे यथार्थ नाव देतात. ती गुरुसेवेची भावभूमिका माउलीकृपेने त्यांच्या ठायी देखील पूर्ण मुरलेली होती. त्यांच्या अनेक अभंगांमधून त्यांचा अतीव गुरुप्रेमादर स्पष्ट दिसून येतो. अशाच आपल्या एका नितांत सुंदर अभंगातून महाराज श्रीगुरु माउलींना आपला मनोदय सांगतात की,
तयाची पाऊले धरीन मी शिरी ।
जयाच्या अंतरी अनुराग ॥१॥
तयाला जाईन जीवें लोटांगणी ।
आळंदी अंगणी नाचत जो ॥२॥
तयाच्या पाऊला होईन पादुका ।
ज्याचा आत्मसखा स्वामी माझा ॥३॥
तयाचिये सेवे लागो हे जीवित ।
ज्याचे चित्तवित्त ज्ञानेश्वर ॥४॥
हे सद्गुरुराया, ज्याच्या अंतःकरणात आपल्याविषयी अनुराग आहे, परमप्रेम आहे, त्या महाभाग्यवान गुरुभक्ताची पाउले मी शिरी धरीन. जो आळंदीअंगणात, तुमच्या स्मरणाने बेभान होऊन नाचत असेल, त्याच्या चरणीं मी लोटांगण घालेन. ज्या परमश्रेष्ठ भक्ताचे तुम्ही साक्षात आत्मसखा झालेला आहात, जो तुमच्याशी भक्तीने एकरूप झालेला आहे त्याच्या पावलांची मी पादुका होऊन सेवा करीन. ज्याच्या चित्तात फक्त तुम्हीच विराजमान आहात व जो तुम्हांलाच आपले सर्वस्व मानतो, परमधन मानतो, त्या परमपुण्यवान भक्ताच्या निरपेक्ष सेवेतच माझे सर्व जीवन व्यतीत होवो, अशीच माझी तीव्र इच्छा आहे.
आपल्या श्रीसद्गुरूंशी एकरूप होऊन त्यांची भक्ती करणाऱ्या सेवेकऱ्याविषयी आपला भाव कसा असला पाहिजे? याचे आदर्श वर्णन श्रीमहाराज या अभंगातून करीत आहेत. खरेतर त्यांच्या निर्मळ अंतःकरणाचे, त्यांच्या अवीट गुरुप्रेमाचे आणि उत्कट भावभक्तीचेच हे साक्षात् दिव्य दर्शन आहे. पण त्यातूनही ते जणू आपल्यासारख्या सेवकांनी गुरुसेवा करताना इतर सेवेकऱ्यांविषयी, श्रीगुरूंच्या परिजनांविषयी कसा भाव ठेवला पाहिजे हेच मोठ्या मार्मिक शब्दांमधून आपल्याला येथे सांगत आहेत.
भगवान श्रीमाउलीदेखील आपल्या गुरूपनिषदात म्हणतात की,
जो गुरुकुळें सुकुलीन ।
जो गुरुबंधु सौजन्यें सुजन ।
जो गुरुसेवाव्यसनें सव्यसन ।
निरंतर ॥
ज्ञाने.१३.७.४४४॥
आदर्श गुरुभक्त कोण ? जो गुरुकुळाची, गुरुपरंपरेची सेवा करण्यातच खरी धन्यता मानतो, आपल्या गुरुबंधूंशी अत्यंत सौजन्याने, प्रेमाने वागतो व केवळ  गुरुसेवेच्या व्यसनाने भारावून गेलेला असतो, तोच खरा गुरुभक्त होय. त्याचे आपल्या इतर गुरुसेवकांविषयी सख्ख्या भावंडांसारखे प्रेम असते. माउलींच्या ,' गुरुसेवकां सहोदर । प्रेमें भजे ॥ "  या ओवीचेच सुरेख प्रतिबिंब श्रीगुलाबराव महाराजांच्या वरील अभंगात पडलेले दिसून येते. श्रीमहाराज तसे नुसतेच म्हणतात असे नाही. त्यांच्या चरित्रात तसे प्रसंगही पाहायला मिळतात. ज्याचे माउलींवर प्रेम आहे त्याची कसलीही सेवा करण्यास ते मागेपुढे पाहात नसत.
श्रीसंत गुलाबराव महाराज म्हणजे मूर्तिमंत माउलीप्रेमच होय. प्रत्यक्ष माउलींनाही ज्याचा लळा लागावा, इतके गोड व अनोखे माउलीप्रेम इतरत्र पाहायलाही मिळणार नाही. त्यांचे सारेच वाङ्मय असे श्रीसद्गुरु माउलींच्या विषयीच्या भावोत्कट प्रेमादराने ओथंबलेले आहे. त्यांच्याच कृपेने ते वाङ्मय वाचता वाचता आपल्याही चित्ताला त्यांच्या त्या अलौकिक प्रेमाचा स्पर्श होतो आणि एक अद्भुत आनंदानुभव आपले सारे  अस्तित्वच व्यापून वर दशांगुळे उरतो. त्याचे वर्णन करणे शक्य नाही, तो ज्याचा त्यानेच घ्यायचा अनुभव आहे.
या स्वनामधन्य श्रीज्ञानेश्वरकन्येचे सर्वकाही असे माउलीमयच होऊन ठाकलेले आहे. सर्व माउलीभक्तांनी, आपले माउलीप्रेम अधिक गहिरे, सुखद, शाश्वत होण्यासाठी एकदातरी या ज्ञानानंदसागराचा आकंठ आस्वाद जरूर घ्यावा, ही माझी कळकळीची विनंती आहे. या समुद्रात जो सर्वस्व सोडून बुडेल तोच केवळ सुखरूप तरून जाईल. ही नाथाघरची उलटी खूणच म्हणा हवंतर !
श्रीसंत गुलाबराव महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन श्रीचरणीं सादर दंडवत घालून, " आपल्या माउलीप्रेमाचा कृपास्पर्श आमच्याही अंतःकरणाला करावा ", अशी कळकळीची प्रार्थना करून, त्यांना अत्यंत आवडणाऱ्या ' ज्ञानेश्वरमाउली ' या सप्ताक्षरी नामब्रह्माच्या सप्रेम स्मरणात निमग्न होऊया ! या नामाची निरंतर सेवा व सेवन हीच त्यांना सर्वात जास्त प्रसन्न करणारी भावपुष्पांजली आहे !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

14 comments:

  1. ज्ञानेश्वरमाऊली

    ReplyDelete
  2. माऊली अतिशय छान लेख व भावपूर्ण विचार.

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर...

    ReplyDelete
  4. ओघवती आणि सुंदर शब्दरचना...

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर व भावपूर्ण लेख...
    🙏🙏🙏💐💐💐

    ReplyDelete
  6. शतशः दंडवत!गुलाबराव महाराज माऊलींच्या समाधी मंदिराबाहेर पायरीवर बसले होते, समाधीची पूजा चालू होती, गुलाबराव महाराज ओरडले की समाधीला हळुवार स्नान घाला, ओरबाडू नका, आणि खरेच बाहेर महाराजांच्या पाठीवर ओरखडे उमटून रक्त येत होते, नेमके शब्द माहीत नाहीत पण अशा अर्थाची चमत्कार सांगणारी गोष्ट ऐकल्ये, हा होता त्यांचा अधिकार, ज्ञानोबांची विभूतीच होती महाराज

    ReplyDelete
  7. Truely Enlightening. Shree Sant Gulabrao Maharaj yanche charani sashtang dandavat .

    ReplyDelete
  8. कितीही दंडवत घातले तरी अपुरेच🙏🙏🙏

    ReplyDelete
  9. नजर कमकुवत असल्याने नीट वाचन जमत नाही... कृपया ध्वनी मुद्रीत कराल काय.....

    ReplyDelete
  10. छान रोहन!! संत महात्म्यांचे गुणगान करावे तेवढे थोडेच!! त्यांच्या चरणकमली साष्टांग दंडवत घालावा व विनम्रपणे शरण जावे, हे खरे!!!

    ReplyDelete