15 Jul 2016

*** पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी ***


देवशयनी आषाढी एकादशी, भूवैकुंठ पंढरपूरची आषाढी वारी !
महाराष्ट्रातील सर्वात मोठा व तळागाळापर्यंत रुजलेला, अत्यंत देखणा व विलक्षण संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय होय. आम्हां वारकरी संप्रदायिकांचा दिवाळी-दसरा-पाडवा, सगळे सण एकाच दिवशी असणारा महासण - आषाढी एकादशी !
निष्ठावंत वारक-याला आषाढी जवळ आली की काही सुचत नाही की दुसरे काही दिसतही नाही. श्रीसंत तुकोबाराय ख-या वारकरी भक्ताची ही पंढरी-दर्शनाची विरह-कातर मनस्थिती अगदी नेमकेपणे सांगताना म्हणतात,
संपदा सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा ॥१॥
जावे पंढरीसी आवडी मनासी ।
कधी एकादशी आषाढी हे ॥२॥
इतकी तीव्र प्रेमभावना ज्या भक्ताच्या हृदयगाभा-यात सतत उमसत असते, त्या भक्ताची, पंढरीचा हा निळा लावण्यसुंदरू देखील अत्यंत कासाविस होऊन वाट पाहत असतो. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात,
तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनी ।
त्याची चक्रपाणि वाट पाहें ॥३॥
खरोखरीच, वारीची व पंढरीची ओढ खूप वेगळीच असते, शब्दांच्या कवेत न येणारी, पण तरीही अवघे हृदय अखंड भरून टाकून सतत विरहज्वाळा वाढविणारी !!
पंढरीचे भगवंत हेही जगावेगळेच नाहीत का? अहो, हा भगवंतांचा एकमात्र अवतार आहे की, ज्यांनी कोणतेही शस्त्र हातात घेतलेले नाही ! या श्रीपंढरीनाथांचे " प्रेम " हेच अस्त्र-शस्त्र आणि सर्वस्व आहे. ते प्रत्येकाला प्रेमानेच वश करतात आणि भक्ताच्या निरपेक्ष प्रेमाला क्षणात वश देखील होतात. त्यांना वेगळ्या शस्त्राची काय गरज ?
पंढरी ही प्रेमनगरी आहे, इथे सर्वत्र केवळ प्रेमाचाच व्यवहार, इथले चलन ही प्रेमच आणि त्या चलनाच्या मोबदल्यात मिळणारी वस्तूही प्रेमच ! पंढरीचा हा सावळा गोवळा भक्तवात्सल्याचे तोडर आपल्या पायात अभिमानाने बाळगतो, ते काही उगीच नाही. अहो, त्याला भक्त-प्रेमाचे इतके व्यसन आहे की, तो साक्षात् परमात्मा असूनही लाचावून भक्तांच्या मागे मागे सतत धावत असतो. भक्तांची गुरे-ढोरे राखतो, चोखोबांबरोबर मेलेली जनावरेही ओढतो. जनाबाईंना कोणी जवळचे नातेवाईक नाहीत म्हणून हा परमात्मा अखंड त्यांची काळजी वाहतो, त्यांना न्हाऊ-माखू घालतो, मायमाउली होऊन त्यांची वेणी-फणी सुद्धा करतो. गोरोबाकाकांच्या साथीने चिखल मळतो, त्यातून माठ, परळ अशा वस्तूही तयार करतो. कान्होपात्रेचे भावपूर्ण सुस्वर गायन ऐकतो, तर सोयराबाईचे बाळंतपणही विठाबाई होऊन स्वहस्ते करतो. बाल नामयाच्या हस्ते दूध पितो आणि सावतोबांसोबत मोट वळतो, धान्य पेरतो, शेतीही करतो. किती लीला सांगाव्यात या परमदयाळू भक्तवत्सल भगवंताच्या? वर्णन करायला आयुष्य पुरणार नाही ......ब्रह्मदेवाचेही !
खरं सांगू का? बाप असूनही मायपण मिरवणा-या या विठूमाउलीचे हे जगावेगळे प्रेम-वात्सल्य पाहून, अहो, आमची रुक्मिणीआई देखील चकितच झालीये. पोरांचे प्रेम ही खरी स्त्रीसुलभ भावना, पण जगाची साक्षात् माता असणारी रुक्मिणी आई देखील आमच्या देवांचे हे जगावेगळे प्रेमळपण पाहून अक्षरश: लाजली आणि त्यांच्या मागे लपून बसलीये हो ! पाहा जाऊन पंढरीत, मी मनाचे सांगत नाहीये.
अशा प्रेमळपणाचे, वात्सल्याचे आगर असणा-या माय-बापाला भेटण्यासाठी कोणते पोर आसुसलेले नसणार? म्हणूनच आज शेकडो वर्षे हा पंढरीचा प्रेम-हाट नित्य वाढतोेच आहे, फुलतोच आहे व पृथ्वीच्या अंतापर्यंत वाढतच राहील, यात अजिबात शंका नाही !
साधी कल्पना करा, खूप दिवसांनी लाडके पोर भेटल्यावर आईची काय अवस्था होते? इथे तर या विठूमाउलीची लाखो लेकरं जमलीत, त्या माउलीचा जयजयकार करण्यात, तिची अपूर्व-मनोहर लीला गाण्यात मग्न झालीत. त्या परमप्रेमळ मायमाउलीच्या आषाढीच्या अलौकिक आनंद-उधाणाची कल्पना महासागरालाही करणे केवळ अशक्य आहे.
खरेतर, आपणही कशाला असल्या काल्पनिक फंदात पडावे? मायमाउलीच्या उबदार कुशीत शिरून तिला आपले सुख-दु:ख सांगून, तिच्याकडून कुरवाळून घेणे, तिच्या आवेगभरल्या चुंबनाचे सौख्य भोगणे, हे आपले हक्काचे कौतुक आहे, तेच या आषाढी महाएकादशीच्या पावन पर्वावर आपण सर्वजण मनसोक्त उपभोगूया आणि निरंतर ते सुख मिळावे म्हणून प्रार्थनाही करूया.
सदा माझे डोळां जडो तुझी मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरीया ॥१॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्वकाळ ॥२॥
विठो माउलीये हाचि वर देई ।
संचरोनि राही हृदयामाजी ॥३॥
तुका म्हणे काही न मागे आणिक ।
तुझे पायी सुख सर्व आहे ॥४॥
भारतीय संस्कृतीतील चातुर्मास्याची सुरुवात आषाढी एकादशीला होते व चार महिन्यांनंतर कार्तिकी एकादशीला समाप्ती होते. भगवान श्रीविष्णूंचा हा चार महिन्यांचा शयनकाल मानला जातो. त्यामुळेच आषाढीला " देवशयनी एकादशी " म्हणतात व कार्तिकीला " प्रबोधिनी एकादशी " म्हणतात.
पंढरपूरला वर्षातल्या सर्वच शुद्ध पक्षातील एकादशांचे महत्त्व आहे, त्यातही आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार एकादशींना महत्त्व जास्त असते. " आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो ।" असे श्रीएकनाथ महाराज देखील म्हणतात.
भगवान श्रीपंढरीनाथ हे योगमूर्ती आहेत. त्यांनी आपले दोन्ही चरण जोडलेले असून नेत्र मिटलेले आहेत. समचरण असणे हे योगशास्त्रातील फार दुर्मिळ आणि दिव्य लक्षण आहे. भगवान पंढरीनाथ हे आपल्या परमप्रिय भक्तांचे निरंतर ध्यान करीत असतात, म्हणून त्यांनी आपले नेत्र मिटलेले आहेत. आपल्या लाडक्या भक्तांची ते अखंड वाट पाहात असतात. त्यांना भक्तांशिवाय करमतच नाही. भक्तांचीही स्थिती याहून काही भिन्न नसते. अशा अनन्य भक्तांसाठीच गेली अठ्ठावीस युगे पांडुरंग भगवंत पंढरीत उभे आहेत. कारण; " प्रेमळांचे सांकड आमुचिया गावी ।" ही त्यांची खरी खंत आहे. अहो, शुद्ध व निरपेक्ष प्रेम करणा-यांची त्यांच्याकडे फार मोठी वानवा आहे.
भगवान श्रीविठ्ठल हे रंगाने काळे असताना त्यांना " पांडुरंग " का बरे म्हणत असतील? हा प्रश्न अनेकांना नेहमीच सतावतो. याचे नेमके उत्तर प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी सांगितलेले आहे. भगवान श्रीकृष्ण किंवा श्रीविठ्ठल हे जलदश्याम, मेघश्याम आहेत. ते पूर्ण काळे नाहीत, श्यामल आहेत. ढगांचा किंवा धुक्याचा रंग जसा असतो तसेच. म्हणून त्यांचे जे दर्शन होते ते त्याच श्यामल रंगातील लखलखीत तेजस्वी स्वरूपाचे. त्या रूपाचा रंग हा पांढुरकाच असल्याने त्यांना संतांनी पांडुरंग हे नाव दिलेले आहे. त्यांचे तेज निळसर पांढरे आहे.
" वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उतावीळ ॥ " अशी भक्तांची तीव्र आवड असणारे हे भगवंत किती प्रेमळ म्हणावेत? तुलनाच नाही त्यांच्या प्रेमाला ! तेच भक्तलोभी भगवान श्रीविठ्ठल येथे उराउरी भेटतात, भक्तांना अंगाखांद्यावर वागवतात, त्यांचे सर्व लळे पुरवतात. म्हणूनच भूवैकुंठ श्रीपंढरीचे वैभव त्रिखंडात इतरत्र कोठेही पाहायला, अनुभवायला मिळणार नाही. पंढरी ती पंढरीच, एकमेवाद्वितीय, अलौकिक, अद्भुत आणि अवर्णनीय देखील !! तिथले अपरंपार महासुख साक्षात् श्रीपंढरीश परमात्म्याच्या रूपाने विटेवर प्रकटलेले असून तेच सर्व वारक-यांच्या रूपाने आपल्याच आत्मसुखाची अखंड अनुभूती घेत असते. आषाढी कार्तिकीला त्यांच्या या प्रेमसागराला अपरंपार भरते येत असते. त्या उधाणाच्या मत्त कल्लोळामध्ये अवघे चराचरच प्रेममय, आनंदमय होऊन ठाकले, तर त्यात नवल ते काय?
हे सगळे आपल्या अनुभूती-कक्षेच्या पूर्णपणे बाहेरचेे, बोला-बुद्धीच्या पलीकडचे आहे. शब्दांच्या असल्या कुबड्यांना तेथे काय हो मातब्बरी? " येथे अनुभवचि प्रमाण ।" म्हणून पंढरीनाथांच्या त्या सीमारहित आणि अलौकिक प्रेमाचा अनुभव ज्याचा त्यानेच आपापला घेऊन सुखमय होऊन जायचे असते. या परमपावन आषाढी एकादशीच्या पुण्यपर्वावर, नंद-सुनंद, जय-विजय, गरुड-हनुमंत इत्यादी सर्व पार्षदांसह भगवान रुक्मिणी-पांडुरंग आणि त्यांचेच अभिन्न प्रेमस्वरूप असणा-या माउली श्रीज्ञानदेव, श्रीनामदेव, श्रीएकनाथ, श्रीरामदास, श्रीतुकोबादी सर्व संतश्रेष्ठांच्या व त्यांच्या नावाचा गजर करीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वारीत सहभागी झालेल्या सर्व भक्तश्रेष्ठांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत घालूया व शुद्ध भक्तिप्राप्तीसाठी कळकळीची प्रार्थना करून " पुंडलिकवरदा हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम " असा जयजयकार करून त्याच परमानंदात मग्न होऊया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा माहितीपूर्ण पोस्ट नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील पेज लाईक करावे ही विनंती.
https:// rohanupalekar.blogspot.in)

14 comments:

  1. 🙏 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 🙏

    ReplyDelete
  2. Nitin padmanabh Mayya7/01/2020 8:12 am

    श्री विठुमाऊलिच्या प्रेमस्वरूपाचे वर्णन खुपचं छान ��

    ReplyDelete
  3. विठ्ठलाचे नाम उच्चारताना बेंबीच्या देठापासून महाप्रणोचार्य वरणाचा उच्चार होतो, त्यामुळे हृद्रोगं हरिमाण च नाशया या सौरातल्या ऋचेची आठवण येते, विठ्ठलाचा गजर करणाऱयांना हृद्रोग संभवत नाही
    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

    ReplyDelete
  4. Il पुंडलिक वरदा हरि विठ्ठल...श्री ज्ञानदेव तुकाराम...
    बोला, श्री पंढरीनाथ महाराज की जय...ll
    🙏🙏🙏💐💐💐
    अतिशय सुंदर व भावविभोर करुन टाकणारा लेख...

    खूप खूप धन्यवाद आपल्याला ...🙏

    ReplyDelete
  5. गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  6. भगवान श्री पंढरीनाथांचे श्रीचरणी साष्टांग दंडवत!

    ReplyDelete
  7. हा लेख पुन्हा पुन्हा वाचूनही समाधान होत नाही
    जय जय रामकृष्ण हरी

    ReplyDelete
  8. जय हरी विठ्ठल ।। जय जय विठ्ठल

    ReplyDelete
  9. Khup chan santanchi bhasha

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर लेख. कितीदाही वाचला तरी समाधान होत नाही. प्रत्येक संतांच्या बरोबर असलेल्या भगवंतांचं ते ते रूप डोळ्यांसमोर येतं.

    ReplyDelete