10 Jul 2018

धर्म जागो निवृत्तीचा



आज ज्येष्ठ कृष्ण द्वादशी, महावैष्णव भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचे प्राणप्रिय ज्येष्ठ बंधू व सद्गुरु, प्रत्यक्ष शिवावतार भगवान सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराजांचा आज समाधिदिन !
श्रीमुखनाम संवत्सर, माघ कृष्ण प्रतिपदा, शालिवाहन शके ११९५ अर्थात् इ.स.१२७४ मधील अंदाजे फेब्रुवारी महिन्यातील एका सोमवारी सकाळी श्री निवृत्तिनाथ महाराजांचा जन्म झाला. त्यांनी शके १२१९, इ.स. १२९७ मधील ज्येष्ठ कृष्ण द्वादशीला श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. काही ठिकाणी त्यांनी पौष कृष्ण एकादशीला समाधी घेतली असाही उल्लेख सापडतो. परंतु श्रीसंत नामदेवरायांनी समाधीवर्णनाच्या अभंगात ज्येष्ठ कृष्ण द्वादशी हीच तिथी दिलेली आहे. वारकरी संप्रदायात पौष कृष्ण एकादशीला त्र्यंबकेश्वर येथे श्रीसंत निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा देखील भरते. ज्येष्ठात वारीचे दिवस असल्याने सर्वांना तेव्हा जायला जमत नाही म्हणून पौषात आवर्जून सर्व वारकरी श्री निवृत्तिदादांच्या यात्रेला जातात.
श्रीसंत निवृत्तिनाथ महाराजांच्या विषयी श्री नामदेवराय म्हणतात,
सांगतील ज्ञान म्हणतील खूण ।
न येचि साधन निवृत्तीचें ॥
'अखंड साधनेत राहणे' हेच श्री निवृत्तिनाथ महाराजांचे वैशिष्ट्य होते. ते सदैव आपल्या ब्रह्मभावातच निमग्न होऊन राहात असत. म्हणून त्यांनी केवळ श्री माउलींवरच कृपानुग्रह केला. त्यामुळेच 'श्रीगुरूंचा मी एकुलता एक शिष्य आहे', असे श्री ज्ञानदेवीत माउली स्पष्ट म्हणतात. बाकी शिष्यपरंपरा पुढे त्यांच्या आज्ञेनुसार माउलींनीच वाढवली. आपल्या आत्मस्थितीमध्ये विघ्न आणणारा तो शिष्यप्रपंचही वाढविण्याची श्री निवृत्तिनाथांना अजिबात इच्छा नव्हती. श्री सोपानदेव व श्री मुक्ताबाईंनाही अनुग्रह श्री माउलींनी केला.
सदैव त्या ब्रह्मभावात निमग्न राहणा-या श्री निवृत्तिनाथ महाराजांनी स्वांत:सुखाय अप्रतिम अभंगरचना केलेली आहे. त्यांचे एकूण ३५७ अभंग सकलसंतगाथेत आहेत. एकाहून एक सुंदर व भावपूर्ण रचना आहेत. जात्याच अतिशय माधुर्य असणा-या या निगूढ अभंगरचना अर्थाच्या दृष्टीने मात्र सोप्या नाहीत. अलौकिक ब्रह्मस्थितीचा, निगूढ योगानुभूतीचा अद्भुत परिपोष सगुणप्रेमाच्या माध्यमातून ते इतका गोड करून सांगतात की बस ! त्या अभंगांच्या नुसत्या वाचनानेही मनात आनंदाची कारंजीच बहरून येतात; पण त्या विलक्षण आत्मस्थितीची अनुभूती असलेल्या महात्म्यालाच त्यांच्या अर्थाचे अनुसंधान करणे शक्य आहे, ते काही आपण सहजासहजी करू शकत नाही.
http://rohanupalekar.blogspot.in
श्रीगुरुकृपेचे अद्भुत माहात्म्य व अनुभूती गोड शब्दांत सांगताना ते म्हणतात,
अंधारिये रातीं उगवे हा गभस्ति ।
मालवे ना दीप्ति गुरुकृपा ॥१॥
तो हा कृष्ण हरि गोकुळामाझारीं ।
हाचि चराचरीं प्रकाशला ॥२॥
आदि मध्य अंत तिन्ही जालीं शून्य ।
तो कृष्णनिधान गोपवेषे ॥३॥
निवृत्तिनिकट कृष्णनामपाठ ।
आवडी वैकुंठ वसिन्नले ॥१४९.४॥
श्री निवृत्तिनाथ महाराज म्हणतात, "मायेच्या अंधा-या रात्री कधीही न मावळणारा श्रीगुरुकृपेचा अपूर्व तेजोमय गभस्ती प्रकाशला आणि त्याने आमचे सर्वकाही व्यापले. तोच परमतेजस्वी ज्ञानसूर्य गोकुळात श्रीकृष्णरूपाने प्रकटलेला असून तोच सर्व चराचरही व्यापून राहिलेला आहे. ज्याला आदि, मध्य व अंत नाहीत असा हा अमेय परमात्मा कृष्णरूप धारण करून गोपवेषात वावरतो आहे.  या परममंगल श्रीकृष्णनामाचा परंपरेने आलेला शक्तियुक्तिसहित असा पाठ  सद्गुरुकृपेने मला लाभला, माझे सर्वस्व झाला आणि मला सर्वत्र ते अलौकिक वैकुंठच प्रतीत होऊ लागले."
आपल्या आत्मज्ञानाच्या संपन्न जाणिवेचा, सगुणमेघश्याम अशा कृष्णरूपाच्या आधारे समन्वय करून, इतका मृदुमधुर आणि भावमनोहर स्वानुभव सांगावा तो श्री निवृत्तिनाथ महाराजांनीच ! त्यांचे सर्वच अभंग असे सगुणी गोडावलेले आहेत, मधात घोळलेल्या गोड खजुरासारखेच !
श्रीसंत निवृत्तिनाथ महाराजांच्या अशा निवडक २७ सुमधुर व ज्ञानप्रगल्भ अभंगांचे तितकेच सुंदर असे रसग्रहण प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी अभंग आस्वाद - भाग दुसरा या ग्रंथात केलेले आहे. जिज्ञासूंनी ते आवर्जून पाहावे, चित्त-मन भरून आणि भारून टाकणारी प्रेमानुभूती नक्कीच लाभेल !
सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी, समोर प्रकट असलेल्या भगवान श्रीपंढरीनाथांची एका सुंदर नमनाद्वारे शेवटची स्तुती केली होती. ते बारा ओव्यांचे नमन प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी आपल्या नित्याच्या श्री हरिपाठ क्रमात समाविष्ट केलेले असून आजही दररोज म्हटले जाते.
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज "निवृत्तिप्रसादे पावलो या सुखा । उजळलीया रेखा ज्ञानाचिया ॥" असे अत्यंत कृतज्ञतेने ज्यांच्याविषयी म्हणतात, त्या भगवान सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या श्रीचरणी समाधिदिनी सादर साष्टांग दंडवत !!
निवृत्ति निवृत्ति ।
म्हणतां पाप नुरे चित्तीं ॥१॥
निवृत्ति निवृत्ति नाम घेतां ।
जन्म सार्थक तत्त्वतां ॥२॥
निवृत्ति निवृत्ति ।
संसाराची होय शांति ॥३॥
निवृत्ति नामाचा निजछंद ।
एका जनार्दनीं आनंद ॥४॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )


0 comments:

Post a Comment