करुणात्रिपदीची जन्मकथा
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांचे समग्र वाङमय हा अद्भुत चमत्कारच आहे. अत्यंत काटेकोर, व्याकरण-काव्य नियमांचा धागा न सोडता, प्रतिपादनाच्या विषयातच विविध मंत्रांची चपखल योजना करीत त्यांनी रचलेली असंख्य संस्कृत व मराठी स्तोत्रे हा भारतीय वाङ्मयातला अजरामर आणि अलौकिक असा विशेष विभाग आहे. त्यांनी रचलेल्या भगवान श्रीदत्तप्रभूंच्या अष्टोत्तरशतनाम स्तोत्रामध्ये असे १४ मंत्र खुबीने गुंफलेले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक नवीन शब्दही निर्माण केलेले आहेत. अशाप्रकारच्या रचना करण्यासाठी विलक्षण प्रतिभा आणि भाषेवर अद्वितीय प्रभुत्व लागते आणि अशा लोकविलक्षण प्रतिभेचे प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराज अक्षरश: सम्राटच होते.
प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्धी पावलेली आहे. प्रत्येक दत्तभक्त दररोज ही रचना म्हणतोच म्हणतो. त्यांची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजेच ' करुणात्रिपदी ' होय ! भगवान श्रीदत्तात्रेय जयंती महोत्सवाच्या निमित्ताने या अजरामर अशा करुणात्रिपदीची खरी जन्मकथा आपणां सर्वांसाठी सादर करीत आहोत !
गेले काही दिवस व्हॉट्सप व फेसबुकवर प. प. श्री. टेंब्येस्वामींची म्हणून एक खोटी कथा फारच फिरत होती. त्यातील सर्व संदर्भ खोडसाळपणेच तयार केलेले होते. एका मंदिराचा पुजारी देवाचा नैवेद्य खातो म्हणून स्वामी त्याला रागावतात व ते पाहून दत्तप्रभू चिडून स्वामींना ओरडतात की, आमचे पुजारी किंवा विश्वस्त काय करतात ते आम्हांला माहीत असते व त्यावर आमचे लक्ष असते, तेव्हा इतरांनी त्या फंदात पडू नये.....इत्यादी. मग स्वामी त्यांची क्षमा मागून ही करुणात्रिपदी रचून त्यांची करुणा भाकतात ; अशा स्वरूपाची ती पूर्णपणे खोटी गोष्ट सर्वत्र प्रसारीत होत होती. ही गोष्ट तर आपल्या चुकांवर रितसर पांघरूण घालण्यासाठीच कोणीतरी मुद्दाम रचलेली आहे, हे स्पष्ट दिसून येते. असा कोणताही प्रसंग प. प. टेंब्येस्वामींच्या चरित्रात कधीही घडलेला नाही. करुणात्रिपदीची रचना होण्यामागे यापेक्षा पूर्णपणे वेगळीच पण महत्त्वाची अशी एक गोष्ट घडलेली होती, तीच या लेखाद्वारे वाचकांपुढे ठेवत आहे.
श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे. त्यांच्या ' मनोहर पादुका ' कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तांचे हे अतीव प्रेमादराचे स्थान आहे. या वाडीच्या नित्यपूजेची व उत्सवांची सर्व पद्धत आणि आचारसंहिता-नियमावली स्वत: प. प. श्री. टेंब्ये स्वामींनीच घालून दिलेली आहे. तेथील परिपाठानुसार चातुर्मास्यातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा अडीच महिन्यांचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी वाडीला श्रींची पालखी प्रदक्षिणा असते.
इ.स.१९०५ मध्ये एकेदिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना, पुजारी गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. हा भलताच अपशकुन पाहून सगळे घाबरले. नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीच ही पूर्वसूचना आहे, असे जाणून ते सगळे पुजारी हवालदिल झाले. त्यावेळी प. प. श्री. टेंब्ये स्वामी हिंगोली जिल्ह्यातील नरसी (नामदेव) येथे चातुर्मास्यानिमित्त वास्तव्याला होते. तेथे पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली.
पुजारी मंडळींच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामी ध्यानाला बसले.
ध्यानात त्यांनी श्रीदत्तप्रभूंना कारण विचारले, त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, " तू घालून दिलेल्या नियमांनुसार हे लोक वागत नाहीत, पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हांलाच तेथे राहायचा कंटाळा आलाय. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी ! " ध्यानातून उठल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी पुजा-यांना रोषाने सांगितले की, " जर दुर्वर्तन सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल तर काय भयंकर परिणाम होतील ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक, नाहीतर तुम्ही जाणे आणि तुमचे देव जाणे ! " पुजा-यांनी हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागितल्यावर व नीट वागण्याची, जशी घालून दिली आहे त्याबरहुकूम सेवा करण्याची हमी दिल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी कळवळा येऊन भगवान श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना केली. त्याचवेळी त्यांनी ही तीन पदांची करुणात्रिपदी रचून ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली. आजही दररोज पालखीच्या तिस-या प्रदक्षिणेला तीन थांब्यांवर ही त्रिपदी म्हटली जाते.
' करुणात्रिपदी ' ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण, मंत्रमय व रसाळ रचना आहे. यातून श्रीस्वामी महाराज, भगवान श्रीदत्तप्रभूंना विनवणी करीत आहेत. देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर, शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केलीत तशीच आमच्यावरही करा, आमच्याकडून सेवा निरंतर करवून घ्या. आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हां सर्वांवर करुणेचे कृपाछत्र घाला, अशी अत्यंत दयार्द्र होऊन भगवंतांची ते प्रार्थना करीत आहेत.
आजच्या घडीला श्रीदत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये, दत्त संप्रदायातील संतांच्या स्थानांवर ही करुणात्रिपदी दररोज आरतीनंतर विनवणी म्हणून म्हणायची पद्धतच पडलेली आहे. साक्षात् दत्तावतार प. प. श्री. टेंब्ये स्वामींचेच हे प्रासादिक, मंत्रमय शब्द असल्याने, आजवर अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की, करुणात्रिपदीच्या भावपूर्ण गायनाने श्रीदत्तप्रभूंची कृपा नक्की होतेच. अपराधक्षमापनासाठीच्या उपलब्ध काव्यांमधील, एकमेवाद्वितीय, अद्भुत व अलौकिक काव्य म्हणून करुणात्रिपदीला सर्वदूर मान्यता आहे !
आजवर अनेकानेक सुप्रसिद्ध गायकांनी गायलेली ' शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता ' ही करुणात्रिपदी आकाशवाणी तसेच सीडी-कॅसेटच्या माध्यमातून प्रचंड प्रसिद्धी पावलेली असून अजरामरही ठरलेली आहे.
प्रार्थनेचा आदर्श वस्तुपाठ असणा-या या करुणात्रिपदीची ही रंजक जन्मकथा देखील विशेषच म्हणायला हवी.
प. प. श्री. टेंब्येस्वामी त्रिपदीचा समारोप करताना श्रीदत्तमहाराजांकडे फार सुंदर मागणे मागतात,
प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव ।
पदीं देवो ठाव , देव अत्रिनंदन ॥
देवा सद्गुरुराया अत्रिनंदना, मी आपल्या श्रीचरणीं प्रेमभाव ठेवून प्रार्थना करतो की, आपण मला कायमच आपल्या पदी ठाव द्यावा, आपल्याच श्रीचरणीं निरंतर सेवारत ठेवावे. करुणात्रिपदीच्या सतत अनुसंधानाने, श्री. टेंब्येस्वामींच्या या मागणी प्रमाणे, करुणावरुणालय भगवान श्रीदत्तप्रभू तुम्हां-आम्हां सर्वांवर कृपावर्षाव करोत, हीच या परम पावन श्रीदत्तात्रेय जयंतीदिनी सादर प्रार्थना !!
लेखक - रोहन विजय उपळेकर.
भ्रमणभाष - 8888904481

Pharach sunder.
ReplyDeleteउत्तम माहितीपूर्ण जन्मकथा!धन्यवाद
ReplyDeleteछान
ReplyDelete