25 Apr 2017

वेणा पावली पूर्णविराम

आज चैत्र कृष्ण चतुर्दशी, समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराजांच्या स्वनामधन्य शिष्या श्रीसंत वेणाबाई महाराजांची आज पुण्यतिथी !!
समर्थ श्री रामदास स्वामींचे सर्वच शिष्य मोठे विलक्षण होते, तरीही त्यांतील श्रीसंत कल्याणस्वामी व श्रीसंत वेणास्वामी हे दोघे श्री समर्थांचे मानसपुत्र व मानसकन्या म्हणून शोभून दिसतात. दोघांचेही अलौकिक चरित्र श्रीगुरुभक्तीचा परमादर्श आहे. या दोघांचाही सद्गुरुस्वामींना किती अभिमान वाटत असेल, याची आपण कधी कल्पनाही करू शकणार नाही.
समर्थस्वामींनी आपल्या सर्व शिष्यिणींमध्ये केवळ श्री वेणाबाईंनाच कीर्तन करण्याची अनुज्ञा दिलेली होती आणि इ.स.१६५६ मध्ये मिरज येथे मठ स्थापून त्याचे मठाधिपती पदही दिलेले होते, यातच त्यांचा थोर अधिकार दिसून येतो.
श्री समर्थांच्या आज्ञेने श्री वेणाबाईंनी मोठा शिष्य संप्रदायही निर्माण केलेला होता. त्यांनी संप्रदाय कार्यार्थ फार भ्रमंती केल्याचे संदर्भ नाहीत, पण त्यांनी मोठे कार्य केले हे मात्र पूर्ण सत्य आहे. 'समर्थप्रतापा'सारखी प्रचंड रचना करणारे श्री गिरिधरस्वामी हे श्री वेणाबाईंचेच प्रपौत्र शिष्य होते.
श्रीसंत वेणाबाईंचे वाङ्मय अल्प असले तरी ते श्रीसमर्थांच्या कृपेने प्राप्त झालेल्या अद्भुत प्रतिभेचाच सुरेख प्रत्यय देणारे आहे. त्यांची समग्र अभंगरचना अलवार-प्रेमाने गुरुभक्ती गाणारी, अनन्य निष्ठेने गुरुमहिमा प्रकट करणारी व नित्यसुगंधी प्राजक्तासारखी देखणी आहे. त्या अभंगसुमनांमधून त्यांच्या हृदयीचे निखळ श्रीगुरुप्रेम, साधनेने आलेल्या आपल्या स्वानुभूतींचे सुंदर शब्दकोंदण ल्येऊन भरभरून व्यक्त होताना दिसते. त्यांचा तो प्रचितीफुलोरा वाचकांच्या चित्ताला नुसता सुखावहच नाही तर गुरुप्रेमाचा अद्भुत डोल आणणाराही आहे !
श्रीसंत वेणाबाईंच्या चरित्रातील अत्यंत हृद्य प्रसंग म्हणजे त्यांनी आजच्याच तिथीला साक्षात् आपल्या श्रीसद्गुरुस्वामींच्या समक्ष केलेले देहविसर्जन होय. पूर्वी कधीतरी शिवथरघळीत सद्गुरुसेवेत मग्न असताना एकदा अचानक श्री समर्थांनी त्यांचे वाळत घातलेले पातळ स्वत: छाटीसारखे नेसले होते. त्यांची ही भावपूर्ण लीला गुरुशिष्यांच्या एकरूपतेचेच दर्शन करविते, असे म्हणायला हरकत नाही. ते पवित्र वस्त्र वेणाबाईंनी जपून ठेवलेले होते. विलक्षण आठवणींचा भावबंध असणारे तेच पातळ त्या नेसल्या व श्री समर्थांची अनुज्ञा घेऊन कीर्तनास उभ्या राहिल्या. त्यांच्या आयुष्यातले ते शेवटचेच कीर्तन होते. साक्षात् सद्गुरुभगवान समोर बसलेले होते व वेणाबाई आपली श्रीगुरुभक्ती समरसून मांडत होत्या. कीर्तनासाठी त्यांनी "बंध विमोचन राम माझा ।" हा स्वरचित अभंगच मुद्दाम घेतलेला होता. आपल्या हृदयीचे कोमल भाव श्रीगुरुचरणीं समर्पून त्या धन्य झाल्या व अभंगाचे शेवटचे चरण, "वेणा पावली पूर्णविराम ।" हे विवरून, श्रीगुरु समर्थांच्या श्रीचरणीं वंदन करून खरोखरीच तेथेच पूर्ण विरामल्या !! हा दिव्य सोहळा समोर प्रत्यक्ष अनुभवणा-या साधकांच्या चित्ताची काय स्थिती झाली असेल बरे? त्याहीपेक्षा श्री समर्थांच्या चित्तात झालेली कालवाकालव वर्णूही शकत नाही. आपल्या या मानसकन्येचा हा अपूर्व सोहळा पाहताना नक्कीच त्यांची स्थिती, माउलींच्या समाधीप्रसंगीच्या श्री निवृत्तिनाथांप्रमाणे झाली असेल, यात शंका नाही. असे श्रीगुरुचरणीं एकरूप होण्याचे त्रिभुवनदुर्लभ भाग्य जगाच्या इतिहासात आजवर फारच थोड्या गुरुभक्तांना लाभलेले आहे. श्रीसंत वेणाबाई म्हणूनच धन्य धन्य होत. श्रीसज्जनगडावरील समर्थ समाधी मागील श्रीवेणाबाईंचे समाधी वृंदावन या मनोहर प्रसंगाची स्नेह-आठवण, कुपीत जपलेल्या नित्यसुगंधी अत्तराच्या फायासारखी आजही दशदिशांत दरवळवत उभे आहे.
श्री वेणाबाईंचे यथोचित माहात्म्य सांगताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'अभंग आस्वाद भाग सात' मध्ये म्हणतात, "आपल्या आदर्श आणि भावोत्कट सद्गुरुप्रेमामुळे, श्रीसंत वेणाबाई प्रत्येक सद्गुरुभक्ताकरिता प्रात:स्मरणीय, नित्य वंदनीय आहेत."
श्रीगुरुभक्ताग्रणी, स्वकर्तृत्वाने समर्थकन्या म्हणून शोभून दिसणा-या श्रीसंत वेणाबाई महाराजांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर दंडवत घालून लेकुरवाचेने प्रार्थना करतो, "माये, आपल्या कृपेचा लवलेश आम्हां लेकरांवर वर्षवून, आपला जन्मविशेषच असणारे ते विलक्षण श्रीगुरुप्रेम आमच्याही हृदयात प्रकट कराल का?"
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

7 comments:

  1. अप्रतीम ! गजानन महाराजांच्या साक्षीने त्यांचे सट्शिश्य भास्कर पाटिलहि वैकुंठास प्रयाण करते झाले ती आठवण झाली

    ReplyDelete
  2. खूप छान, माझ्या लहानपणी आम्ही मिरजेला त्यांच्या मठात अधून मधून जायचो पण त्यांच्या बद्दल माहिती मोठं होईपर्यंत नव्हती... आज ह्या ब्लॉव मुळे। आणखी माहिती मिळाली...

    ReplyDelete
  3. प.पू.श्री वेणाबाईंच्या श्री चरणी साष्टांग नमस्कार. किती अद्भुत गुरु भक्ति आणि प्रेम. . ����

    ReplyDelete
  4. वेण्णा पावली विराम हे कै सुनील चिंचोलकरांचे चरित्र पुस्तक मन हेलावून सोडते
    शतशः दंडवत!💐💐

    ReplyDelete
  5. अप्रतिम 🙏

    ReplyDelete
  6. Sadguru venataichya charni sashtang namaskar gadawar gelo pn vrundawan baghitale nahi

    ReplyDelete