7 Mar 2018

जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत

आज फाल्गुन कृष्ण षष्ठी, श्रीनाथषष्ठी  !
शांतिब्रह्म सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी  !
आजच्या तिथीला नाथ महाराजांच्या चरित्रात खूप महत्त्व आहे. हिला "पंचपर्वा षष्ठी" म्हणतात. संत एकनाथांचे सद्गुरु श्री जनार्दन स्वामींची जन्मतिथी, त्यांना भगवान श्रीदत्तप्रभूंकडून अनुग्रह व त्यांचे महानिर्वाण या तिन्ही गोष्टी याच तिथीला झालेल्या आहेत. शिवाय नाथ महाराजांची व श्री जनार्दन स्वामींची प्रथम भेट व त्यांना कृपानुग्रह याच तिथीला लाभला. म्हणूनच त्यांनी हीच पवित्र तिथी निवडून इ.स.१५९९ साली गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली. अन्य कोणाही संताच्या चरित्रात असा दुर्मिळ योग पाहायला मिळत नाही.
नाथ महाराज म्हणजे साक्षात् परमशांतीच ! त्यांना भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचेच कार्यावतार म्हणतात. म्हणून "ज्ञानियाचा  एका, नामयाचा तुका" अशी म्हण संप्रदायात प्रचलित आहे.
"नारायण विधी अत्रिनाथ, दत्त जनार्दन एकनाथ ।" अशी त्यांची श्रीगुरुपरंपरा होय. त्यांना भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी देखील स्वमुखाने 'ज्ञानदेव' हा चतुराक्षरी महामंत्र प्रदान केलेला होता. श्रीदत्त संप्रदाय व वारकरी संप्रदायाचा सुंदर समन्वय त्यांच्याठायी झालेला होता. अर्थात् हे दोन्ही संप्रदाय मुळात एकाच भागवत संप्रदायाचे विभाग आहेत.
श्रीसंत नाथ महाराज म्हणजे अलौकिक गुरुभक्ती ! प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी प्रवचनात सांगितलेले एकच जबरदस्त उदाहरण सांगतो. नाथ महाराज गुरुसेवेत देवगिरी किल्ल्यावर असतानाचा हा हृद्य प्रसंग आहे. एकदा नेहमीचा मेहेतर-सेवेकरी न आल्याने त्यांच्यावर श्री जनार्दन स्वामींचा संडास स्वच्छ करण्याची जबाबदारी आली. त्यांना या नवीन सेवासंधीचा एवढा आनंद झाला की बस. डबडबलेल्या नेत्रांनी, अष्टसात्त्विकाचा आवेश कसाबसा आवरीत, त्यांनी त्या जुन्या काळाच्या टोपलीच्या संडासातील मैला स्वत: डोक्यावरून वाहून नेऊन टाकला.  पुन्हा स्नान करून सोवळे नेसले. सर्व संडास स्वच्छ केला, शेणाने सारवला व तेथे रांगोळ्या काढून उदबत्त्याही लावल्या. संडासाला फुलांचे हार बांधले व बाहेर येऊन दंडवत घातला. आपल्या परब्रह्मस्वरूप सद्गुरूंच्या श्रीचरणांचा स्पर्श या वास्तूला नेहमी होतो, हे पाहून त्यांना त्या संडासाचा हेवाच वाटत होता. म्हणूनच त्यांनी त्या संडासाची अशी जगावेगळी सेवा करून ते भाग्य सप्रेम अनुभवले. नाथांच्या या अपूर्व, अलौकिक गुरुभक्तीचे माहात्म्य काय वर्णन करावे सांगा? तेथे साष्टांग दंडवतच फक्त घालू शकतो आपण.
( http://rohanupalekar.blogspot.in )
श्रीसंत नाथ महाराजांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे श्रीज्ञानेश्वरीची प्रतिशुद्धी हे होय. ज्ञानेश्वरीच्या संहितेत कालौघात घुसलेले व घुसवलेले अपपाठ शोधून काढून त्यांनीच प्रथम प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीची तयार केली. हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे ऋण आहे.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडीच्या मुख्य मंदिरासमोरील कृष्णामाईचा घाट स्वत: श्रीसंत नाथ महाराजांनीच बांधलेला आहे.
भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, चिरंजीवपद इत्यादी सर्व ग्रंथ मिळून एकूण लाखभर ओव्या व चार हजार पेक्षा जास्त अभंग, भारुडे, आरत्या असे प्रचंड वाङ्मय त्यांनी सहज लीलेने प्रकट केलेले आहे. त्यांनी रचलेली भगवान श्रीदत्तप्रभूंची आरती सर्व ठिकाणी म्हटली जाते. त्यांचे अवघे चरित्र अत्यंत आदर्श असून नित्य स्मरणीय, चिंतनीय व अनुकरणीय आहे. साक्षात् भगवान पंढरीनाथ त्यांच्या घरी 'श्रीखंड्या' च्या रूपाने सेवा करीत होते, यातच सगळे आले. आजही पाहायला मिळणारी त्यांच्या नित्यपूजेतील श्रीविजय पांडुरंगांची श्रीमूर्ती म्हणजे साक्षात् श्रीभगवंतच होत.
श्री नाथ महाराजांचे हे अद्भुत कार्य जाणून, तुकारामशिष्या श्रीसंत बहेणाबाई त्यांना भागवतधर्म-मंदिराचा मुख्य मध्यस्तंभ म्हणतात व ते सर्वार्थाने सत्यच आहे !
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज रात्री होणा-या आपल्या  नित्याच्या हरिपाठामध्ये संत एकनाथांची आरती रोज म्हणत असत.
श्रीसंत तुकाराम महाराज शांतिब्रह्म श्री नाथ महाराजांची स्तुती करताना म्हणतात,
शरण शरण एकनाथा ।
पायीं माथा ठेविला ॥१॥
नका पाहूं गुणदोष ।
झालों दास पायांचा ॥२॥
उपेक्षितां मज ।
तरी लाज कवणासी ॥३॥
तुका म्हणे भागवत ।
केलें श्रुत सकळां ॥४॥
श्रीमद् भागवताच्या एकादश स्कंधातील मर्म सोप्या भाषेत जनसुलभ करणा-या भक्तवत्सल नाथ महाराजांच्या चरणी कृपायाचना करून श्रीतुकोबा भक्तिभावे वंदन करतात.
आज पंचपर्वा श्रीनाथषष्ठी निमित्त श्रीसंत जनार्दनस्वामी व श्रीसंत एकनाथ महाराज या गुरुशिष्यांच्या  श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!!
( छायाचित्र संदर्भ : डावीकडे वर श्रीसंत नाथ महाराजांच्या पूजेतील श्रीविजय पांडुरंग व त्याखाली त्यांची सुशोभित समाधी. उजवीकडे महाराजांचे लेखनमग्न कल्पनाचित्र. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment