28 Oct 2016

ज्ञानाची दिवाळी



नमस्कार मित्रहो,
आज धनत्रयोदशी, भारतीय संस्कृतीतील प्रमुख महोत्सव, दीपावलीचा दुसरा दिवस. आजच्याच तिथीला देव-दानवांनी समुद्राचे मंथन केल्यामुळे, त्या रत्नाकरातून चौदा रत्ने लोककल्याणासाठी निर्माण झाली होती. म्हणून त्या चौदा रत्नांपैकी भगवान विष्णूंची पत्नी भगवती लक्ष्मी व भगवान विष्णूंचे अवतार भगवान धन्वंतरी यांची जयंती आज साजरी होत असते. उत्तर भारतात ही धनतेरस खूप मोठ्या प्रमाणावर साजरी होते.
आज भगवती लक्ष्मीमाता व धनाधिपती कुबेरांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. तसेच सप्त धान्यांचीही पूजा करतात, नवीन वस्त्र, धातू, दागिने, सोने अशा वैभवसूचक  गोष्टींची देखील खरेदी करतात. सायंकाळी प्रदोष समयी श्रीलक्ष्मी-कुबेर पूजन करून साळीच्या लाह्या व बत्तासे आणि धने-गुळाचा नैवेद्य अर्पण करून, धन-धान्य समृद्धी व्हावी म्हणून कृतज्ञतापूर्वक श्रीभगवंतांची प्रार्थना करायची असते.
आजच्या तिथीलाच सायंकाळी धर्मदेवता यमराजाच्या नावाने दक्षिणेकडे तोंड करून एक दीप अर्पण करायचा असतो. एरवी आपण वर्षभर कधीही दक्षिणेकडे वात करून दिवा लावत नाही. या दीपदानाने अकालमृत्यू पासून सुटका होते असे म्हणतात.
भगवान विष्णूंच्या श्रीमद् भागवतातील चोवीस अवतारांमध्ये भगवान धन्वंतरींची गणना होते. हे देवांचे वैद्य मानले जातात. दीर्घकाल आयुष्य व उत्तम आरोग्य टिकून राहावे म्हणून आज त्यांची देखील पूजा केली जाते.
आरोग्य हीच खरी संपत्ती असून तेच सुखी व आनंदी जीवनाचे द्योतक आहे; व तेच सर्वथा साध्य देखील ! म्हणूनच की काय, भगवती लक्ष्मी व श्रीधन्वंतरींचा जन्म एकाच वेळेला झाल्याची गोष्ट शास्त्रांमध्ये आलेली आहे. पण दुर्दैवाने लक्ष्मीच्या पाठीमागे लागून लोक पहिल्यांदा आपल्या शरीराचे व आरोग्याचेच वाटोळे करून घेतात. पैसे मिळवण्यात इतके गढून जातात की अत्यंत दुर्मिळ असणारा मनुष्यजन्म, हेलपाट्याच्या गाढवासारखा झापडे लावून तेच ते करण्यात वाया घालवतात. एवढे मर मर मरून कमावलेली संपत्ती देखील मग त्यांना सुखाने उपभोगताही येत नाही. मिळालेला पैसा औषधांवरच खर्च होऊन जातो. ना समाधान ना आरोग्य, ना सुख ना आनंद, फक्त कष्ट; अशा विवंचनेतच सर्व आयुष्य नष्ट होऊन जाते. मानवजातीचे हेच भविष्य बहुदा पूर्वीच्या द्रष्ट्या ऋषींनी आधीच ओळखून लक्ष्मी व धन्वंतरींची सांगड घातलेली असावी.
प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज एक मार्मिक गोष्ट सांगत असत. भगवती लक्ष्मीचे वाहन आहे घुबड. त्याला संस्कृतमध्ये उलूक म्हणतात. हिंदीत उल्लू म्हणतात. उल्लू म्हणजे बावळट देखील. जेव्हा ही लक्ष्मी एकटीच येते तेव्हा ती घुबडावर बसून येते व ज्याच्याकडे येते त्याला ' उल्लू ' बनवून लगेच निघूनही जाते. पण ती जेव्हा भगवान विष्णूंसोबत येते तेव्हा ती गरुडावरून येते व त्यावेळी ती स्थिर देखील राहाते. भगवान श्रीज्ञानेश्वर माउली मुद्दाम म्हणतात की, " मुकुंदीं स्थिरावली लक्ष्मी जैसी ।" एरवी अत्यंत चंचल असणारी भगवती लक्ष्मी श्रीभगवंतांबरोबर आली की एकदम स्थिर राहाते. म्हणून जो फक्त लक्ष्मीच्या मागे लागतो तो 'उल्लू'च बनतो. त्याला मग धन्वंतरींचाच आधार घ्यावा लागतो.
भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे दैवत मानले जातात. त्यांच्या एका हातात अमृतकुंभ असतो. हा सर्व औषधांचे प्रतीक आहे. औषध हे भगवान विष्णूंचे एक नाम आहे. त्यांची " अमृत, भेषज, भिषक्, वैद्य " इत्यादी अनेक नामे विष्णुसहस्रनामामध्ये आलेली आहेत. या नामांमधून श्रीभगवंतांचेच करुणामय धन्वंतरीस्वरूप आणखी स्पष्ट होते. म्हणून भगवान धन्वंतरींचा हात न सोडता अर्थात् आरोग्य न बिघडवता, गरुडावरून श्रीभगवंतांबरोबर येणारी लक्ष्मी प्राप्त करण्यासाठीच आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. अशी लक्ष्मी प्राप्त झाली तरच आयुष्य अमृतमय होते. अमृतासाठी पूर्वी जे समुद्रमंथन झाले, त्या गूढ प्रक्रियेचे हे विचारमंथनच आजच्या धनत्रयोदशीचे खरे रहस्य आहे ! हे जाणून जर धनत्रयोदशी साजरी झाली, तरच मग दीपावलीचा शाश्वत आनंद लाभेल !
दीपावलीची सुरुवात वसुबारसेला गोपूजनाने होते. गायीच्या सर्वांगात, शेणात, मूत्रातही पावित्र्याचा, मांगल्याचा, आरोग्याचा, लक्ष्मीचा वास असतो. म्हणून तिचे महत्त्व आधी जाणून तिची सेवा करायची, मग धनत्रयोदशीला आरोग्यासह लक्ष्मी प्राप्त होते. त्यानंतरच नरकासुराचा वध श्रीभगवंत करतात. तीच नरकचतुर्दशी ! मग आपल्या आयुष्यातील पापरूपी नरकाची अर्थात् आपले दुर्गुण, व्यसने व वाईट सवयी यांची व आपली संगत सुटते. तेव्हाच मिळालेली स्वर्गीय संपत्ती संपूर्ण कुटुंबासह आपल्याला सुखाने व योग्य पद्धतीने उपभोगता येते. तेच लक्ष्मीपूजन होय ! यातून आपल्या आयुष्यात एक नवे प्रकाश-पर्व सुरू होते, तोच दीपावली पाडवा होय. असा जेव्हा बोध-दीपोत्सव संपन्न होतो, तेव्हाच सर्वत्र, सर्व समाजात असूया व द्वेषरहित बंधुभाव, स्नेहभाव उत्पन्न होत असतो, म्हणून दीपावलीची सांगता ही भाऊबीजेने होते. हीच संतांना अभिप्रेत असणारी खरी बोध-दीपावली होय !
आपल्या प्रचंड बुद्धिमान व ज्ञानी ऋषीमुनींनी या सर्व भूमिकांचा सांगोपांग विचार करूनच हा तेजाचा, प्रकाशाचा महोत्सव, दीपावली महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. आपण त्यांचे मर्मच जाणून घेत नाही, हे आपलेच दुर्दैव नाही का?
आजच्या या पर्वावर आपण सर्वांनी असा निर्धार करूया की, आम्ही आमच्या प्रगल्भ संस्कृतीचा यथायोग्य मान ठेवू, ती जाणून घेऊन आपले आयुष्य खरे सुखी करू व अभिमानाने भारतीय वैदिक संस्कृतीचे पाईक म्हणून जगात मिरवू ! अशी अलौकिक बोध-जाणीव निर्माण होऊन कायमची स्थिर होणे, हीच खरी दीपावली आहे व अशाच बोध-दीपावलीच्या तुम्हां सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा !!
( आजच्या दिवशी कोल्हापूरच्या भगवती महालक्ष्मीचा धन्वंतरी रूपातलाच फोटो या लेखासोबत मुद्दाम शेयर करीत आहे. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.com )

0 comments:

Post a Comment