5 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख पाचवा

भगवान श्रीनृसिंह हे भगवान श्रीनारायणांचे अत्यंत उग्र व भयंकर रूप मानले जाते. आपल्या लाडक्या भक्तावर अनन्वित अत्याचार करणा-या हिरण्यकश्यपूच्या वधासाठीच हा परम विलक्षण अवतार झालेला असल्यामुळे, साहजिकच श्रीभगवंतांच्या या रूपात, लीलेत क्रोधाचे प्राबल्य होते. पण हा अवतार अतिशय उग्र असला, तरी निर्माण झाला भक्तप्रेमातूनच ना ! म्हणून या अवताराचे दृश्यरूप जरी क्रोधाविष्ट असले तरी त्याचा मूळ आधार हा अद्भुत व अपरंपार भक्तप्रेम हाच आहे. त्यामुळेच भगवान श्रीनरहरीरायांच्या अपार भक्तवात्सल्याचेच सर्व संतांनी व भक्तांनी वर्णन केलेले आढळून येते.
श्रीमद् भागवत महापुराणातील कथाभागानुसार, हिरण्यकश्यपू व त्याचा भाऊ हिरण्याक्ष हे दोघेही मूळचे भगवान श्रीविष्णूंचे द्वारपाल जय-विजय हेच होते. एके दिवशी भगवंतांच्या दर्शनाला आलेल्या सनत्कुमारादी चार भावंडांचा त्यांनी वैकुंठाच्या द्वारातच अपमान केला. त्यावर चिडून त्यांनी जय-विजयाला, "तुम्ही भगवंतांचे द्वारपाल असून तुम्हांला साधे शिष्टाचारही माहीत नाहीत? त्यांचे कोणतेही गुण तुम्ही अंगी बाणवलेले नाहीत, भगवंतांच्या लाडक्या भक्तांशी  अहंकाराने, मग्रूरीने वागता, तेव्हा शिक्षा म्हणून आता पृथ्वीवर तीन जन्म राक्षस होऊन जन्माला जा !" असा शाप दिला. त्यावेळी प्रत्यक्ष भगवान नारायणांनी येऊन आपल्या पार्षदांकडून झालेल्या अपराधांबद्दल सनत्कुमारांची क्षमा मागितली व शिक्षेचा कालावधी लवकर पूर्ण करण्याची त्यांना विनंती केली. त्या शापामुळे जय-विजय पहिल्या जन्मात हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू झाले. हिरण्याक्षाला श्रीवराह भगवंतांनी मारले तर हिरण्यकश्यपूूला श्रीनृसिंहांनी. दुस-या जन्मात तेच रावण व कुंभकर्ण झाले व भगवान श्रीरामांच्या हातून मृत्यू आला. तर तिस-या जन्मात ते शिशुपाल व दंतवक्त्र झाले व त्यांना भगवान श्रीकृष्णांनी मारले. तिन्ही जन्मांत या दोघांना साक्षात् भगवंतांनीच स्वहस्ते मारून मुक्ती दिली. हे दोघेही भगवंतांशी सरूपता झालेले त्यांचे नित्यपार्षदच होते. त्यांना शापामुळे मनुष्यजन्माला यावे लाागले, तरी त्यांची भक्ती काही थांबली नाही. त्यांनी तसा वर भगवंतांना आधीच मागून घेतलेला होता. म्हणूनच त्यांनी या तिन्ही राक्षस जन्मात "विरोधी भक्ती" करून भगवंतांचे अनुसंधान अबाधितच राखलेले होते.
हीच लीला जरा वेगळ्या दृष्टीने पाहिली तर, श्रीभगवंतांनी आपल्या पार्षदांना शापातून मुक्त होऊन पुन्हा मूळ स्थितीला लवकर जाण्यासाठी कृपापूर्वक मदतच केलेली आहे, असे स्पष्ट दिसून येते. हेही त्यांचे अपार भक्तवात्सल्यच नाही का?
भगवान श्रीनरहरीरायांच्या या प्रेमकृपेचाच अनुभव, आजही त्यांना शरण जाऊन, कळवळून प्रेमाने साद घालणा-यांना नेहमीच येत असतो. भगवान श्रीनृसिंह हे भक्तांचे कोणत्याही संकटातून हमखास रक्षण करणारे दैवत आहेत.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी देशपांडे नेहमी सांगत असत की, भगवान श्रीनृसिंहांचे नामस्मरण वैखरीने कधी घरात करू नये. कारण 'अटव्यां नारसिंहश्च' असा खरा नियम आहे. जंगलात किंवा संकटकाळी उच्चरवाने नृसिंहनाम घ्यावे म्हणजे जंगली श्वापदांपासून, चोराचिलटांपासून व अचानक आलेल्या संकटांपासून आपले पूर्ण संरक्षण होते. पण तेच वैखरी नामस्मरण घरात केले तर मात्र उलटेच परिणाम होतात. त्यांच्या एका नातेवाईकांचाच अनुभव त्या मुद्दाम त्यासाठी सांगत असत. त्यांच्या एका नातेवाईकाला नृसिंहनाम घ्यायची आवड होती. त्याला पू.पार्वतीदेवींनी आधीच बजावले होते की, तू ते नाम चुकूनही तुझ्या घरात अंथरुणावर बसून वगैरे घेऊ नकोस. पण त्याने ते ऐकले नाही. तो रोज झोपायच्या खोलीत गादीवर बसूनच जोरजोरात नृसिंहनामाचा जप करीत असे. एकेदिवशी तो जप करीत असताना अचानक त्याच्या बायकोमध्ये नृसिंहांचा आवेश झाला व तिने शेजारी बसलेल्या याचे नरडेच धरले. कसाबसा तो त्यातून सुटला. उशीरा का होईना, पण तेव्हा त्याला पू.मातु:श्री पार्वतीदेवींच्या सांगण्याचे महत्त्व पूर्णपणे पटले.
अशा या परम विलक्षण श्रीनृसिंह रूपाचा योगार्थही फार सुंदर आहे. श्रीनृसिंह कोशाच्या प्रथम खंडाच्या "देवा तूं अक्षर" या आपल्या प्रस्तावनेत, कोशाचे संपादन-प्रमुख व श्रीनृसिंहकृपांकित थोर सत्पुरुष प.पू.श्री.शिरीषदादा कवडे नृसिंहरूपाचा योगार्थ बहारीने स्पष्ट करताना म्हणतात, "श्रीनृसिंहावतार हे योगाच्या परिभाषेतील एक गूढ रूपक आहे. हिरण्यकश्यपूरूपी दुर्वासनांचे, कुवृत्तींचे निर्दालन करून प्रल्हादरूपी भक्त जीवाला याच शरीरात भगवत्स्वरूप होता येते, हे या अवतारकथेचे मर्म आहे.
सुषुम्ना नाडीरूपी स्तंभातून नृसिंहरूपात भगवत् शक्तीचे प्राकट्य आहे. ही शक्ती अर्धनर व अर्धमृगेंद्र रूपात आहे, म्हणजे सात्त्विकभावाने उत्पन्न झालेला वासनाविरोधी क्रोधच वासना निर्दालनास मदत करीत आहे, मृगेंद्र(सिंह) रूप झाला आहे. या वासनांचे निर्दालनही संधिकालात म्हणजे सुषुम्नेतच झाले आहे व त्या हिरण्यकश्यपू निर्दालनानंतरच भगवान शांत झालेले आहेत. त्यांची अनुग्रहशक्ती आपले ईप्सित कार्य साधून मूळ निरामय स्वरूपाला आलेली आहे.
त्या भगवत् कृपाशक्तीच्या विलक्षण, अद्भुत अशा आविर्भावाचे वर्णन करताना, तिच्या अंकावर जीवस्वरूपात स्थिर झालेले भक्तराज प्रल्हाद म्हणतात, "माझे मन आपल्या अमृतस्वरूप दर्शनाच्या आस्वादनाने तृप्त होत नाही. हे प्रभो, ब्रह्मादी देवतांनाही जे दर्शन अतीव दुर्लभ आहे, असे आपले पावन दर्शन दहा लाख वर्षे मिळाले तरीही माझे मन तृप्त होणार नाही. अशा दर्शनानंतरही दर्शनासाठीच अतृप्त, आसुसलेल्या मज दासाचे चित्त आपल्याच दर्शनाशिवाय आणखी कशाची इच्छा करू शकते ?
" ( श्रीनृसिंहपुराण ४३.७४-७५ ) या श्लोकात वेदव्यासांनी साधकाच्या परम अवस्थेचे मर्मच जणू उलगडून दाखवलेले आहे !"
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी केलेले हे श्रीनृसिंहरूपाचे सुरेख योगार्थ-विवरण सर्वच भक्तांनी नित्य चिंतनात ठेवावे, इतके महत्त्वपूर्ण आहे.
श्रीभगवंतांचा प्रत्येक अवतार हा अत्यंत विचारपूर्वक झालेला असतो. म्हणूनच त्यांच्या सर्व लीलांमधून एकाचवेळी अनेक मार्मिक संदर्भ प्रकट होत असतात. आपापल्या अधिकारानुसार, बौद्धिक कुवतीनुसार व श्रीभगवंतांच्या कृपाप्रसादानुसार ते संदर्भ यथायोग्य प्रकारे व योग्यवेळी आपोआप समजून येतातच, हेच यातील खरे इंगित आहे !
भगवान श्रीनृसिंहांच्या या अद्भुत प्रकटलीलेचे व भक्तप्रेमाचे सुरेख वर्णन करताना सद्गुरु श्री एकनाथ महाराज म्हणतात,
दुर्जन तो लाथ मारी खांबावरी ।
स्तंभी नरहरी प्रकटला ॥१॥
धांवूनिया हरी आडवा तो घेतला ।
हृदयी विदारला हस्तनखीं ॥२॥
एका जनार्दनीं भक्ताचे रक्षण ।
स्वयें नारायण करीतसे ॥३॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
( छायाचित्र संदर्भ: कोळेनृसिंहपूर येथील सोळा हातांची ज्वालानृसिंह मूर्ती.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

2 comments:

  1. जय हरी विठ्ठल फारच छान

    ReplyDelete
  2. नृसिंहांचे नामस्मरण घरात करू नये हे नव्याने ज्ञान झाले, धन्यवाद आणि भगवंतांना साष्टांग दंडवत

    ReplyDelete