आदिशक्ती मुक्ताबाई
आज वैशाख कृष्ण दशमी, श्रीज्ञानेश्वरभगिनी ब्रह्मचित्कला सद्गुरु श्रीसंत मुक्ताबाई महाराजांचा ब्रह्मलीन दिन !
श्री मुक्ताबाई या फार थोर विभूतिमत्व होत्या. अश्विन शुद्ध प्रतिपदेला, घटस्थापनेला पृथ्वीतलावर आविर्भूत झालेल्या त्या साक्षात् आदिशक्ती भगवती श्रीजगदंबाच होत्या. त्यांचे वर्णन करताना सर्वच संत गहिवरून जातात, ते उगीच नाही.
श्रीसंत मुक्ताईंच्या अलौकिक स्वरूपात; मातेचे वात्सल्य, कारुण्याचा परमोत्कर्ष, भगिनीचा अवखळपणा, श्रीगुरुकृपेचे शांभव समाधी-वैभव, अखंड स्वरूपस्थितीचा अपूर्व आविष्कार, स्वानुभूत ज्ञानाचा निरंतर वाहणारा झरा व त्यामुळे प्राप्त झालेला परमार्थप्रांतातला लोकविलक्षण अद्वितीय अधिकार, अखंड आत्मतदाकारतेमुळे आलेली जगाविषयीची एक मस्तवाल बेफिकिरी अर्थात् अवधूती मस्ती यांसारख्या अनेक गोष्टी एकाच वेळी प्रकटलेल्या पाहायला मिळतात. म्हणूनच सगळे संत त्यांना "आदिशक्ती मुक्ताबाई" असे अतीव गौरवाने म्हणतात.
भक्तश्रेष्ठ नामदेवांसारख्या महात्म्याला, भक्तीत न्यून ठरणारा अल्पसा अहंकारही स्पष्टपणे दाखवून देण्याची हिंमत बाळगणारी लहानगी मुक्ताई त्यांना "सणकांडी" भासली तर नवल नाही. सणकांडी म्हणजे तडतडणारी प्रकाशमय फुलबाजी. चौदाशे वर्षे योगसाधनेने जिवंत राहिलेल्या श्री चांगदेवांना, सिद्धींच्या नादात आयुष्य व्यर्थ गेले असे ठणकावून सांगून श्रीगुरुकृपेचे खरे माहात्म्य पटवून देणारी आणि वर ती अद्वयानंद वैभव असणारी श्रीगुरुकृपा प्रदान करून परिपूर्ण करणारी ही ब्रह्मचित्कला खरोखरीच अवर्णनीय व अद्भुत आहे. प्रत्यक्ष आपल्या सद्गुरूंना, श्री ज्ञानेश्वर माउलींनाही, आपल्या जन्म-कर्माचे भान सुटू नये म्हणून विनम्रपणे ताटीचे अभंग रचून बोध करणा-या या श्री मुक्ताईंचे अवघे विश्व, आपल्या सारख्यांच्या सामान्यांच्या बुद्धीला अनाकलनीय आहे, शब्दांच्या पलीकडचे, त्यांच्या कवेत न मावणारे आहे. त्या साक्षात् आदिशक्तीच आहेत, हेच त्यांच्याकडे पाहून वारंवार मनापासून पटते.
भगवान श्री माउलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर महिन्याभराने मार्गशीर्षात सासवडला श्री सोपानदेवांनी समाधी घेतली. त्यानंतर पुणतांब्याला श्री मुक्ताईंचे स्वनामधन्य शिष्य श्री चांगदेवांनीही माघातील महाशिवरात्रीला समाधी घेतली. त्यासुमारास श्री मुक्ताईंना स्वरूपाची फार ओढ लागली असल्याचे सर्व संतांना जाणवू लागले. म्हणून श्री निवृत्तिनाथांनी मुक्ताईला, "कोणत्या दिवशी तू गमन करणार ?" असे विचारले. त्यावर मुक्ताईंनी दिलेले उत्तर त्यांचा पारमार्थिक अधिकार स्पष्टपणे सांगणारे आहे. त्या म्हणतात,
आमुच्या स्वस्थानीं नाहीं पा अंधार ।
अवघे चराचर प्रकाशत्वें ॥१॥
उदय आणि अस्तु नाही स्वरूपासी ।
ऐसे मुनिऋषी जाणताती ॥२॥
आम्ही कधीं आलो स्वरूप सोडोन ।
जावे पालटोन जेथील तेथे ॥३॥
अंतर बाहेर स्वामींचें स्वरूप ।
स्वयें नंदादीप उजळिला ॥४॥
"श्रीसद्गुरुराया, आमच्या नित्यवसतीच्या स्थानी कसलाच अंधार नाही, तेथील सगळे विश्वच प्रकाशरूप आहे. आमच्या निरंतर अनुभूतीला येणा-या आत्मसूर्याला लौकिक सूर्याप्रमाणे उदय-अस्त नाहीत, तो अखंड उदितच आहे. आम्ही कधी आमचे स्वरूप सोडून आलो म्हणून आम्हांला तेथे पुन्हा जायची गरज? आमच्या श्रीगुरुस्वामींचेच अपरंपार व आनंदमय स्वरूप, त्यांच्याच कृपेने प्रकटलेल्या शांत-स्निग्ध बोधदीपाच्या तेजात आमच्या नित्य अनुभूतीला सर्वत्र प्रतीत होत असल्याने, सर्व ठिकाणी, सर्व काळी तो ब्रह्मानंदोत्सवच आम्ही अविरत साजरा करीत आहोत. तेव्हा जाणे-येणे हा आमच्यासाठी केवळ एक उपचार मात्रच आहे." काय ही अनुभूतीची सखोलता !! श्रीगुरुकृपेने आकळलेला शांभव बोध सर्वांगी धारण करून त्या बोधाचा परिपाक असणारी ही निरालंब स्वानंदस्थितीच जणू श्री मुक्ताई हे नामरूप धारण करून प्रकटलेली होती. खरोखरीच धन्य त्या श्री मुक्ताई !!
श्रीसंत मुक्ताबाईंची अभंगसंपदा अल्प असली तरी त्यांच्याच स्वरूपासारखी अत्यंत गूढ-गहन आहे. सर्वसामान्यांच्या आकलनकक्षेच्या कैक योजने दूर असणारे हे शब्दधन केवळ श्रीगुरुकृपेच्याच बळावर आपल्या बुद्धीत प्रकाशते, म्हणून त्याचे मोल अनन्यसाधारण आहे. श्रीसंत मुक्ताबाईंच्या *"मुंगी उडाली आकाशी ।"* या सुप्रसिद्ध पण अत्यंत गहन अभंगावर श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराजांच्या अधिकारी शिष्या, प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी फार सुरेख प्रवचनसेवा केलेली आहे. श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे लहानसेच पण विलक्षण पुस्तक, श्रीसंत मुक्ताबाईंचा सर्वार्थाने थोर अधिकार व त्यांच्या "सांगण्याची" खोली आपल्याला जाणवून देण्यात समर्थ आहे. हा अभंग वाचून एखाद्याला त्याचा सरळ अर्थही सांगणे शक्य नाही. पू.सौ.ताईंनी तर त्याचा अद्भुत योगार्थही अप्रतिमरित्या समजावून सांगितला आहे. भगवती कुंडलिनी शक्तीच्या कार्याचे मार्मिक वर्णन करणा-या श्री मुक्ताबाईंच्या या कूट अभंगाचे हे विवरण नक्कीच वाचनीय, नित्य चिंतनीय आहे. ( मुंगी उडाली आकाशी : श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. सवलत मूल्य: ₹ २० /-)
प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी देखील विविध संतांच्या अभंगांवरील आपल्या "अभंग आस्वाद" या सुरेख ग्रंथमालेतील दुस-या भागात श्रीसंत मुक्ताबाईंच्या आठ अभंगांचे अर्थ-विवरण केलेले आहे. ह्याही अभंगांमधून श्री मुक्ताई महाराजांचा जबरदस्त अधिकार स्पष्ट दिसून येतो. ( अभंग आस्वाद - भाग दुसरा, सवलत मूल्य, ₹ - ३५/- )
भगवान श्री माउलींबरोबर अद्भुत कार्य करण्यासाठीच भगवती जगदंबेने, शके १२०१, इ.स.१२७९ मध्ये अश्विन शुद्ध प्रतिपदेला, मध्यान्ही आळंदीच्या सिद्धबेटावर मुक्ताई रूपाने परिपूर्ण अवतार धारण केेला. त्यांचे तडफदार वागणे-बोलणे, त्यांची रोकडा ब्रह्मानुभव सांगण्याची हातोटी, त्यांचे नित्य सहजसमाधीतील वर्तन, त्यांचे प्रेमळ उपदेशन; आणि सरतेशेवटी त्यांचे जगावेगळे, अद्वितीय असे देहविसर्जन; सारे सारे खूप विलक्षण आहे. तेथे आपल्याला केवळ साष्टांग दंडवतच करणे तेवढे शक्य आहे व तेच आपल्या परमभाग्याची परिसीमा देखील !
तापी तीरावरील पुरातन तपोभूमी असलेल्या मेहूण गावी आजच्या तिथीला श्रीमुक्ताई ब्रह्मलीन झाल्या. ही आदिमाया जशी प्रकटली तशीच नकळत स्वरूपी मिसळली देखील ! मनोहर नभात अंकुरलेल्या विराटाच्या गाभ्यात वीज कडाडली, तशी ही भूलोकीची तेजस्वी ज्ञान-शलाका आपल्या मूळ स्वरूपात सर्वांच्या देखत, पण कोणाच्याही नकळत विरून गेली. मागे उरले ते त्यांचे *"मुक्ताबाई"* हे पावन नाम, त्यांनी लीलया प्रकट केलेले अलौकिक अक्षरधन आणि त्यांच्या परमपावन लीला-कथा. त्या पापहारक नाम-रूप, वाङ्मय व कथांच्या सप्रेम स्मरणाने आजच्या पुण्यदिनी आपणही पावन होऊया !!
श्रीसंत एकनाथ महाराज श्री मुक्ताबाईंचा यथोचित गौरव करताना अतीव प्रेमभराने म्हणतात,
मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ ।
सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ॥
'मुक्ताबाई' चतुर्विधा ।
जो जप करील सदा ।
तो जाईल मोक्षपदा ।
सायुज्यसंपदा पावेल ॥
जय मुक्ताई माउली !!
[ पुस्तकांसाठी संपर्क -
श्रीवामनराज प्रकाशन, पुणे
© 02024356919
contact@ssmandal.org ]
श्रीवामनराज प्रकाशन, पुणे
© 02024356919
contact@ssmandal.org ]
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
भ्रमणभाष - 8888904481
(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )
http://rohanupalekar.blogspot.in )
वा वा, संपूर्ण लेखमाला जणू 9💐 भक्तीपुष्पांची माला आपण गुंफून अनन्यभावे आम्हा भक्तांना सहभागी करून अर्पण केलीत आणि दिव्य पसायदान मागीतलेत! भगवान नृसिंह स्वामी ते दान आज प्रकट झाल्यावर परत एकदा आपल्या अक्षय्य झोळीत टाकतील यात संशय नाही
ReplyDeleteहा अवतार खरेच अद्वितीय असाच आहे, पहा श्रीरामाचे आणि श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या अनुक्रमे मर्यादा आणि प्रेम या पैलूंशी सहज जुळते पण भगवान नृसिंहांचा आवेश, रौद्रता आणि अपार भक्त प्रेम !! केव्हडा विरोधाभास!असो
भगवान नृसिंहांना आनंतानंत दंडवत आणि आपणास लाख लाख धन्यवाद अन शुभेच्छा!