7 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ- श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख सातवा

श्रीभगवंत हे अनंत-गुणनिधी आहेत. त्यांच्या गुणांचा पार लागणे कोणालाही शक्य नाही. त्यांचे सगळेच गुणैश्वर्य नेत्रदीपकच असले, तरीही त्यातील काही सद्गुण आपल्या नैसर्गिक अंगप्रभेने विशेष शोभून दिसतात. माणिक, मोती, पोवळे, पाचू इत्यादी सर्वच रत्ने देखणी असली तरी जसा पाणीदार हिरा तो हिराच, त्याला तुलना नाही; तसे श्रीभगवंतांच्या सर्व गुणांमध्ये सगळ्यात शोभिवंत दिसते ते त्यांचे अपरिमित भक्तवात्सल्यच ! किती ते वात्सल्यप्रेम? त्या प्रेमापुढे अवघे भूमंडळही उणे ठरावे, लहान वाटावे इतके त्यांचे प्रेम व्यापक आहे, अद्भुत व अलौकिक आहे !
वात्सल्य म्हटले की पहिल्यांदा आई हेच नाते समोर येते. लौकिक आईला एकच काळीज असते; पण श्रीभगवंत तर अशा मोजताही येणार नाही इतक्या आयांच्या काळजांचेच बनलेले आहेत. त्यांचे सर्वांगच आईचे काळीज होऊन भक्तांवर परमप्रेमाचा वर्षाव करते, पदोपदी त्यांचा सांभाळ करते.
श्रीभगवंतांच्या भक्तवात्सल्याच्या एका अनोख्या प्रसंगाच्या सप्रेम स्मरणाचा आज विशेष दिवस आहे. आज वैशाख शुद्ध द्वादशी, अर्थात् श्रीभगवंतांची जन्मतिथी. भक्तश्रेष्ठ अंबरीष राजासाठी आजच्याच तिथीला श्रीभगवंत प्रकट झाले व आपल्या या अनन्य भक्ताला मिळालेला शाप स्वत:वर घेऊन त्यांनी, आपल्या पायी अभिमानाने मिरवलेला, *'न मे भक्त: प्रणश्यति ।'* असा भक्तकरुणा-ब्रीदाचा तोडर पुन्हा एकदा सार्थ ठरविला.
त्याचे असे झाले की, एकदा महाक्रोधी म्हणून प्रसिद्ध असलेले शिवावतार दुर्वासमुनी अंबरीषराजाकडे आले. त्या दिवशी नेमकी आजचीच तिथी, वैशाख शुद्ध द्वादशी होती. राजाचा एकादशी व्रताचा नेम होता. दशमीच्या सूर्योदयाला सुरू झालेले हे व्रत द्वादशीच्या सूर्योदयाला संपन्न होत असे. दुर्वासमुनी नदीवर स्नानाला गेले खरे, पण लवकर परत यायची चिन्हेच दिसेनात. इकडे राजाच्या पारण्याची वेळ टळून जाऊ लागली. त्याची द्विधा मनस्थिती झाली. अतिथीला टाळून पारणे करावे तरी दोष लागणार आणि पारणे केले नाही तर व्रत मोडणार. काय करावे? या विवंचनेत असताना त्याने श्रीहरींचे स्मरण करून मध्यममार्ग निवडला. त्याने नुसती आपोष्णी घेऊन व्रताचे पारणे करावे, पण जेवण मात्र न करता दुर्वासांसाठी थांबावे, असे त्याने ठरविले. नेमके त्याने आपोष्णी घ्यायला आणि दुर्वास यायला एकच गाठ पडली. झाले, यांच्या क्रोधाचा पारा चढला. त्यांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता तणतणत एकदम शापवाणीच उच्चारली, "राजा, तू गृहस्थधर्माला जागलेला नाहीस, अतिथीला सोडून जेवायला बसलास. तुझ्या या अधर्मासाठी तू त्वरित दहा गर्भवासांना जा, तुला दहा जन्म घेऊन पुन्हा असह्य गर्भवास सोसावा लागेल." राजा तर तयारीचा भगवद्भक्तच होता, त्याने शांतचित्ताने मान झुकवून या शापाचा स्वीकार केला. पण त्या अकारणकृपाळू व भक्ताभिमानी श्रीनारायणांना ते काही सहन झाले नाही. आपल्या भक्तावरील हे महान संकट पाहून तेच कळवळले व त्वरित तेथे प्रकट झाले. त्यांचे ते दिव्य-मनोहर रूप पाहून अंबरीषाला अश्रू अनावर झाले, त्यांने देवांच्या चरणीं दंडवत घातला. देवांनी मोठ्या विनयाने दुर्वास महामुनींना प्रणाम केला व म्हणाले, "मुनिवर्य, आमच्या या अनन्यदासाकडून आपला अपराध झाला, त्याची शिक्षा म्हणून आपण याला जो शाप दिलात, तो कृपया मला द्यावा. माझ्या या लाडक्याचे गर्भवास मी सोसतो, पण याला कसलीच काही तोशीस पडू नये, असे मला वाटते !" तोवर दुर्वासांचाही राग शमलेला होता व देवांच्या आविर्भावामुळे सगळी परिस्थितीच बदललेली होती. दुर्वासांनी प्रसन्नचित्ताने म्हटले, "देवा, माझ्या शापाने आपण दहा वेळा सुप्रसिद्ध व्हावे !" महर्षी दुर्वासांच्याच या शापामुळे तुम्हां आम्हां भक्तांवर अमृतकृपेची धारा खळाळून बरसली आणि श्रीभगवंतांचे मत्स्यकूर्मादी दहा अवतार झाले; नव्हे, 'यथा पूर्वमकल्पयत् ।' या नियमाने, प्रत्येक कल्पात, युगानुयुगे हे अवतार होतच आहेत व पुढेही होतच राहतील. 'महात्म्यांचा शापही एकप्रकारे वरप्रसादच असतो', हे संतांचे सांगणे काही खोटे नाही बरे !
आपण गेले सहा दिवस ज्या परमानंदकंद श्रीभगवंतांच्या श्रीनृसिंहरूपाच्या त्रिभुवनपावन लीलाकथा-गंगेत सचैल स्नान करून तिचा सप्रेम अनुभव घेत आहोत, त्या अवताराचे मूळ या अंबरीषांच्या कथेतच दडलेले आहे. आजच्याच तिथीला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावी श्रीभगवंत प्रकटले होते, म्हणून त्या गावाचे नाव द्वादशी=बारस=बार्शी असे पडलेले आहे. तेथे 'अंबरीषवरद श्रीभगवंत' आजही आपले भक्तवात्सल्याचे ब्रीद गाजवत उभे आहेत.
श्रीभगवंतांच्या या संपूर्ण अवतारमालिकेचे मूळच भक्तवात्सल्य आहे, त्यामुळे हे दहाही अवतार प्राधान्याने वात्सल्यप्रेम हाच सद्गुण-शिरोमणी अभिमानाने मिरवताना दिसतात. मग प्रल्हादवरद श्रीनृसिंह भगवंत का म्हणून अपवाद ठरतील बरे?
भगवान श्रीनृसिंहांचा अवतार हा तर केवळ भक्त रक्षणासाठीच झालेला असल्याने भक्ताभिमान व भक्तवात्सल्य हे या अवताराचे मूळ वैशिष्ट्यच आहे. भगवान श्रीराम व श्रीकृष्ण हे दोन प्रमुख पूर्णावतार सोडता, इतर आठ विष्णू अवतारांमध्ये श्रीनृसिंह अवतारच जनमानसात जास्त प्रसिद्धी पावलेला दिसतो. सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त करणारा व अतीव वात्सल्यप्रेमाने ओतप्रोत भरलेला असल्यानेच बहुदा श्रीनृसिंह अवताराची आज हजारो वर्षे उपासना होत राहिलेली आहे. इतर देवतांच्या मानाने श्रीनृसिंह हे कुलदैवत असणा-या घराण्यांचीही संख्या खूप मोठी आहे. त्यामुळेच संत व पंत कवींनी नृसिंह विषयक प्रचंड वाङ्मय रचलेले आहे. भारतभरात नृसिंह मंदिरांची संख्या देखील भरपूर आहे. तसेच विपुल प्रमाणात स्तोत्रमंत्रादी श्रीनृसिंह उपासना वाङ्मय सुद्धा उपलब्ध आहे. ( अशा सर्व वाङ्मयाचा व इतर प्रचंड माहितीचा एकूण साडेसोळाशे पृष्ठांचा तीन खंडात्मक "श्रीनृसिंह कोश" प्रकाशित झालेला आहे. याविषयी थोडी माहिती पुढच्या लेखात पाहू.)
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांची कथा तर सर्वश्रुत आहेच, पण अगदी तशीच कथा भगवान आद्य श्रीशंकराचार्यांच्या चरित्रात देखील घडलेली आहे. भगवान श्रीनृसिंहांनी पुन्हा एकदा आपले भक्तरक्षणाचे ब्रीद त्यांच्या बाबतीतही सार्थ ठरविलेले आहे. ही विलक्षण कथा आपलाही भक्तिभाव वाढवणारी आहे.
एकदा श्रीमदाद्य शंकराचार्यांचा श्रीशैल्याला मुक्काम असताना, अनेक अघोरी धंदे जेथे चालत असत, अशा त्या कर्दळीवनातील एक वामाचारी कापालिक त्यांच्याकडे आला. त्याने आचार्यांना पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की, हे सर्व उत्तम लक्षणांनी युक्त आहेत. अशा बत्तीस लक्षणी पुरुषाचा जर आपण आपल्या देवीला बळी दिला तर ती प्रसन्न होऊन इच्छित वर तत्काल देईल. म्हणून तो आचार्यांकडे आला व त्यांना सरळ म्हणाला की, "मला आपला बळी देण्याची इच्छा आहे. तुमचा बळी दिला की माझी इष्टदेवता प्रसन्न होऊन मला सिद्धी प्रदान करेल." देहाविषयी कसलीही ममता न बाळगणा-या श्री आचार्यांनी शांतपणे त्याला होकार दिला व परोपकारार्थ आयुष्य व्यतीत करणारे भगवान श्री शंकराचार्य, त्याने सांगितलेल्या रात्री बळी जाण्यासाठी तयार राहिले.
आचार्यांनी ही गोष्ट आपल्या कोणाही शिष्यांना कळू दिलेली नव्हती. कापालिकाबरोबर ते जायला निघाले. इकडे आचार्यांचे प्रमुख शिष्य श्री पद्मपादाचार्य यांना ध्यानात त्यांच्या इष्टदेवतेने अर्थात् भगवान श्रीनृसिंहांनी सांगितले की, "तुझ्या गुरूंवर मोठे संकट येऊ पाहते आहे. तू केवळ त्यांच्या मागे मागे जा, पुढचे आम्ही पाहून घेतो." देवांच्या आज्ञेनुसार श्रीपद्मपादाचार्य तडक निघाले. लपून छपून ते कापालिकाच्या मागोमाग त्याच्या कर्दळीवनातील अड्ड्यावर गेले. तेथे गेल्यावर त्या कापालिकाने आचार्यांची पूजा करून त्यांना बळी देण्यासाठी देवीसमोर ओणवे बसवले. एवढ्यात अचानकच श्री पद्मपादाचार्यांच्या देहात भगवान श्रीनृसिंहांचा आवेश झाला व त्यांनी भयंकर गर्जना करून त्या दुष्ट कापालिकाच्या हातातली तलवार घेऊन त्याचाच वध केला. कापालिक मेला तरी त्या उग्र रूपाच्या भयंकर गर्जना चालूच होत्या.
ते क्रोधाविष्ट पण भक्तवत्सल 'आवेशरूप' पाहून श्री शंकराचार्यांचे अष्टसात्त्विक भाव जागे झाले; व नृसिंहरूपाचा तो अनावर क्रोध आवरावा म्हणून त्यांनी तत्काळ एक सुंदर स्तवन रचून देवांची स्तुती केली. त्या भावभिजल्या स्तुतीने प्रसन्न होऊन श्री पद्मपादाचार्यांच्या देहात प्रकटलेले श्रीनृसिंह भगवान शांत झाले व आचार्यांना आशीर्वाद देऊन गुप्त झाले. याशिवाय भगवान शंकराचार्यांनीच, 'नृसिंह पंचरत्नम्''लक्ष्मीनृसिंह करावलम्बन स्तोत्र' ही दोन्ही स्तोत्रेही फार सुंदर रचलेली आहेत. नृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्री आचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन त्याला, "या वैराण मरुभूमीसारख्या जगातील नश्वर गोष्टींमागे सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी, ख-या आनंदासाठी भगवान श्रीलक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद तू सतत सेवन करावास", असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे, त्यामुळे ते सहज पाठ होऊन सारखे गुणगुणावेसे वाटते.
श्रीनृसिंह भगवंतांनी अशा प्रकारे पुन्हा एकदा आपले भक्तवात्सल्य दाखवीत भक्तरक्षणाचे ब्रीद पूर्ण केलेले आहे. भगवान श्रीनृसिंह ही वरकरणी जरी अत्यंत उग्र देवता असली तरी ती आपल्या भक्तांचा मातेप्रमाणे प्रेमानेच सांभाळ करीत असते. समर्थ श्री रामदासस्वामी आपल्या एका अभंगात भगवंतांच्या याच दोन्ही वैशिष्ट्यांचा एकत्रित उल्लेख करून सांगतात की, "उग्र बहु नृसिंहोपासना । लोभे सांभाळी देव भक्तजना ॥" म्हणूनच, सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त करून, भक्तांना अंतर्बाह्य सांभाळणारे भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीनृसिंह हे निजभक्तांचे लाडके दैवत न झाले तरच नवल !!
श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या करावलम्बन स्तोत्रात,  भक्तकरुणाकर श्रीनृसिंहरूपाचे सुंदर व अगदी चित्रदर्शी वर्णन करून त्यांची करुणा भाकताना म्हणतात,
एकेन चक्रमपरेण करेण शङ्खं
अन्येन सिन्धुतनयामवलम्ब्य तिष्ठन् ।
वामेतरेण वरदाभय-पद्मचिन्हं
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१४॥
आचार्य म्हणतात, "डावीकडील वरच्या एका हातात चक्र व दुस-या हातात शंख धरणा-या तर तिस-या हाताने सिन्धुतनया भगवती लक्ष्मीला आलिंगन दिलेल्या आणि उजवीकडील एका हाताने वर देणा-या, दुस-या हाताने अभयदान देणा-या व तिस-या हातात कमल धारण करणा-या हे नृसिंहप्रभो, आपण मला आपल्या हाताचा आधार द्या, अर्थात् माझा सर्वतोपरि सांभाळ करा !"
मोजके आणि मार्मिक अनुप्रास साधून रचलेले हे संपूर्ण करावलंबन स्तोत्र फार मनोहर आहे. त्यातून भगवान आद्य शंकराचार्यांनी श्रीनृसिंहांची नेमक्या व भावपूर्ण शब्दांमध्ये महती गाऊन करुणा भाकलेली आहे. अनेक नृसिंहभक्तांच्या नित्यपाठात विसावलेली भगवान आद्य श्री शंकराचार्यांची ही दोन्ही स्तोत्रे अप्रतिम तर आहेतच, पण श्रीनृसिंहदेवांना अतीव प्रियही आहेत. म्हणूनच या स्तोत्रांच्या प्रेमाने केलेल्या नित्यपठणाने श्रीभगवंतांचा कृपाप्रसाद लाभतो, असा अनेक भक्तांचा स्वानुभव आहे !
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
( छायाचित्र संदर्भ: डावीकडे भगवान श्रीनृसिंहांची स्तुती करून करुणा भाकणारे श्रीमदाद्य शंकराचार्य व उजवीकडे बार्शीचे अंबरीषवरद श्रीभगवंत, त्यात देवांच्या उजव्या हाताखाली लहानगे भक्तराज अंबरीष.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

3 comments:

  1. आद्य प पु शंकरायार्याना अभय देऊन रक्षण केले ही अपरिचित कथा आणि भगवनांचे भक्तवात्सल्य ओतप्रोत वर्णिलेत आपण, धन्यवाद आणि भगवान नृसिंहांना आनंतानंत दंडवत

    ReplyDelete
  2. लक्ष्मी नृसिंह भगवान नमस्तुभ्यं!

    ReplyDelete