4 Dec 2019

श्रीस्वामीतनया - प.पू.सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे

अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या कृपापरंपरेतील महान विभूतिमत्व म्हणजे प.पू.सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे ; साक्षात् श्रीस्वामीतनया !!
राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामी महाराजांच्या मांडीवर बसून खेळण्याचे, त्यांच्याकडून प्रेमभराने कुरवाळून घेण्याचे व त्यांचा अमोघ कृपाहस्त शिरी मिरवण्याचे देवदुर्लभ सौभाग्य प्रेमादराने मिरवणारी ही त्यांची लाडकी लेक खरोखरीच अत्यंत अद्भुत आहे ! सद्गुरुकृपेने सदैव ब्रह्मभावातच विचरण करणाऱ्या मातु:श्री, श्री ज्ञानेश्वरीची ओवी न् ओवी अक्षरश: जगल्या. लौकिक अर्थाने लिहायलाही न येणाऱ्या मातु:श्रींच्या सर्वांगी भगवती ज्ञानदेवीच भरून राहिलेली होती, त्यांचे जीवनसर्वस्व झालेली होती. श्री ज्ञानदेवीची अलौकिक ज्ञानमयता त्यांचे पूर्ण अस्तित्वच व्यापून वर दशांगुळे उरलेली होती. त्यामुळेच त्यांनी अगदी साध्या साध्या उदाहरणांनी व सोप्या शब्दांत केलेला बोध उपनिषदांप्रमाणे श्रेष्ठतेला पावलेला आहे, आजही हजारो साधकांना अचूक मार्गदर्शन करीत आहे.
सद्गुरु श्री माउलींच्या, "जो अंतरीं दृढ । परमात्मरूपीं गूढ । बाह्य तरी रूढ । लौकिक जैसा ॥ज्ञाने.३.७.६८॥" या अमृतवचनाचे आरस्पानी नितळ आणि तेजस्वी प्रतिबिंब प.पू.मातु:श्रींच्या चरित्रात मूर्तिमान झालेले आपल्याला दिसून येते. सद्गुरु श्रीस्वामी महाराजांच्या कृपापरंपरेचे शांभव अद्वयानंदवैभवच प.पू.मातु:श्रींच्या रूपाने परिपूर्णतेने सगुणसाकार झाले होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अपरंपार सद्गुरुशरणागतीचा पुण्यपावन आविष्कार प.पू.मातु:श्रींच्या ठायी समग्रतेने झालेला होता. त्यांचे दिव्य चरित्रच याचे प्रत्यक्ष द्योतक आहे ; आणि म्हणूनच ते सर्व साधकांसाठी सतत प्रेरणादायी आहे, साधनेच्या मार्गावर दृढतेने अग्रेसर करणारे आहे. श्रद्धेने रोज त्याचे थोडे जरी परिशीलन केले, तरी साधनेतील समस्त विघ्नांचा आपोआप नाश होतो, अशी असंख्य साधकांची रोकडी प्रचिती आहे.
आज मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, प.पू.मातु:श्री पार्वतीदेवींची ७८ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त या महान विभूतिमत्वाचे श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत प्रणाम !
प.पू.मातु:श्रींच्या पावन चरित्राचा मी स्वत: अनुभवलेला एक विलक्षण प्रत्यय व साधकांनी सदैव चिंतनात ठेवाव्यात अशा त्यांच्या चरित्रातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा ऊहापोह खालील लिंकवरील लेखात केलेला आहे. आजच्या पावन दिनी सर्वांनी त्याचे चिंतन करून प.पू.मातु:श्रींच्या श्रीचरणीं श्रद्धासुमने समर्पावीत ही मन:पूर्वक प्रार्थना.
खरोखरीच, या लेखात वर्णन केल्याप्रमाणे, श्री.कुलकर्णी यांच्यासारखीच प.पू.मातु:श्रींच्या करुणेची, अमोघ कृपेची प्रचिती आपल्यालाही आली, तर तो आपल्या परमार्थ-साधनेसाठी अत्यंत दिव्य अनुभवच ठरेल यात शंका नाही !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
प्रसन्न कृपाछाया 'श्रीस्वामीतनया'

https://rohanupalekar.blogspot.com/2016/12/blog-post.html?m=1

0 comments:

Post a Comment