आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो
नमस्कार सुहृदहो,
आज प्रबोधिनी कार्तिकी एकादशी, पंढरपूर यात्रा !!
चातुर्मास्याची सुरुवात आषाढी एकादशीला होते व चार महिन्यांनंतर कार्तिकी एकादशीला समाप्ती होते. भगवान श्रीविष्णूंचा हा चार महिन्यांचा शयनकाल मानला जातो. त्यामुळेच आषाढीला " देवशयनी एकादशी " म्हणतात व कार्तिकीला " प्रबोधिनी एकादशी " म्हणतात.
भूवैकुंठ पंढरपूर क्षेत्री प्रत्येक महिन्यातल्या शुद्ध पक्षातील एकादशीचे महत्त्व आहेच. पण त्यातही आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार एकादशींना महत्त्व जास्त असते. " आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो ।" असे श्री एकनाथ महाराज आपल्या, कर कटेवर ठेवून उभ्या राहिलेल्या कृष्णाबाईच्या गोंधळात म्हणतात.
भगवान श्रीपंढरीनाथ हे योगमूर्ती आहेत. त्यांनी आपले दोन्ही चरण जोडलेले असून नेत्र मिटलेले आहेत. समचरण असणे हे योगशास्त्रातील फार दुर्मिळ आणि दिव्य लक्षण आहे. भगवान पंढरीनाथ हे आपल्या परमप्रिय भक्तांचे निरंतर ध्यान करीत असतात, म्हणून त्यांनी आपले नेत्र मिटलेले आहेत. आपल्या लाडक्या भक्तांची ते कंबरेवर हात ठेवून अखंड वाट पाहात असतात. त्यांना भक्तांशिवाय करमतच नाही. भक्तांचीही स्थिती याहून काही भिन्न नसते.
संपदा सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा ॥
जावे पंढरीसी आवडे मनासी ।
कधी एकादशी आषाढी हे ॥
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी ।
त्याची चक्रपाणि वाट पाहे ॥
अशी प्रत्येक हरिभक्ताची हृदयभावना असते व अशाच अनन्य भक्तांसाठीच गेली अठ्ठावीस युगे श्रीभगवंत पंढरीत उभे आहेत. कारण; " प्रेमळांचे सांकड आमुचिया गावी ।" ही त्यांची खरी खंत आहे. अहो, शुद्ध व निरपेक्ष प्रेम करणा-या भक्तांची त्यांच्याकडे फार मोठी वानवा आहे. आणि ज्या गोष्टीची आपल्याकडे कमतरता असते, तिचे महत्त्व वेगळे का पटवून द्यावे लागते कोणाला? म्हणूनच श्रीभगवंतांचेही आपल्या या अनन्यदासांवर निरपेक्ष प्रेम असते.
" वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उतावीळ ॥ " असे उतावीळ होऊन प्रेमवर्षाव करणारे हे भगवंत किती प्रेमळ म्हणावेत? तुलनाच नाही त्यांच्या प्रेमाला ! म्हणूनच भूवैकुंठ श्रीपंढरीचे वैभव त्रिखंडात इतरत्र कोठेही पाहायला, अनुभवायला मिळणार नाही. पंढरी ती पंढरीच, एकमेवाद्वितीय, अलौकिक, अद्भुत आणि अवर्णनीय देखील !! तेथील सुख साक्षात् श्रीपंढरीश परमात्म्याच्या सगुण रूपाने विटेवर प्रकटलेले असून तेच सर्व वारक-यांच्या रूपाने आपल्याच प्रेमसुखाची अखंड अनुभूती घेत असते. आषाढी कार्तिकीला त्यांच्या या प्रेमसागराला उधाण येत असते. त्या आनंद-उधाणात अवघे चराचरच प्रेममय, आनंदमय होऊन ठाकले, तर त्यात नवल ते काय?
हे सगळे आपल्या अनुभूती-कक्षेच्या पूर्णपणे बाहेरचेे, बोला-बुद्धीच्या पलीकडचे आहे. शब्दांच्या असल्या कुबड्यांना तेथे काय हो मातब्बरी? प्रेम कोणाला कधी शब्दांनी सांगता येते काय? तो तर डोळे झाकून हृदयाच्या गाभेवनात अनुभवायचा भाग आहे ! म्हणून आनंदकंद भदवान श्रीपंढरीनाथांच्या त्या अपरंपार आणि अलौकिक प्रेमाचा अनुभव ज्याचा त्यानेच आपापला घेऊन सुखमय होऊन जायचे असते.
आजच भगवान पंढरीनाथांचे अत्यंत लाडके भक्त, त्यांचे प्रेमभांडारी सद्गुरु श्री नामदेव महाराजांची ७४६ वी जयंती. इ.स. १२७० मध्ये कार्तिकी एकादशीला त्यांचा जन्म झाला. श्रीनामदेवांच्या उत्कट प्रेमभक्तीचे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे महत्त्व आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीपांडुरंगांना त्यांच्याशिवाय क्षणभरही करमत नसे, यातच त्यांचे महत्त्व समजून येते. त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत!
कार्तिकी एकादशी ही प्रबोधिनी आहे. या दिवशी श्रीभगवंत चातुर्मास्य निद्रेतून जागे होतात, असे म्हणतात. देव कधी तरी झोपतात का हो? झोपतो आपण. नुसते झोपतो नाही, तर त्या झोपेत नाही नाही ती स्वप्नेही पाहतो. स्वप्नातले जगच खरे मानून त्यात इतके रमतो की खरे जग पार विसरूनच जातो. आपली ही झोप संतांना काही पाहावत नाही, म्हणून ते वारंवार आपल्याला जागे करीत असतात. त्यासाठी श्रीभगवंतांची प्रेमभक्ती ते आपल्याला प्रदान करतात. त्या विशुद्ध भगवत्प्रेमाची यथार्थ जाणीव होऊन तोच निजध्यास होणे, हीच आपल्यासाठी साधक म्हणून खरी ' प्रबोधिनी एकादशी ' आहे. मात्र ही भान-जागृती श्रीगुरुकृपेशिवाय कदापि येऊ शकत नाही. म्हणून श्रीगुरुकृपेने श्रीभगवंत त्यांच्या अलौकिक प्रेम-रूपाने आपल्या हृदयात जागे होणे, हेच आपल्यासाठी एकादशीचे खरे जागरण आहे व याचीच सतत वाट पाहत राहिले पाहिजे. हे वाट पाहणेही किती समाधानकारक आहे ना !
आज या परमपावन कार्तिकी एकादशीच्या पुण्यपर्वावर, नंद-सुनंद, जय-विजय, गरुड-हनुमंत इत्यादी सर्व पार्षदांसह भगवान श्रीरुक्मिणी-पांडुरंग आणि त्यांचेच अभिन्न प्रेमस्वरूप असणा-या माउली श्री ज्ञानदेव, श्री नामदेव, श्री एकनाथ, श्री तुकोबादी सर्व संतश्रेष्ठ-भक्तश्रेष्ठांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत करूया आणि त्यांंच्या प्रेमभक्तीच्या प्राप्तीसाठी त्यांनाच कळकळीने प्रार्थूया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )
जय जय राम कृष्ण हरी
ReplyDelete९१४५४२००९९
ReplyDeleteप्रबोधिनी चा लक्ष्यार्थ अथवा समाधी भाषार्थ भावला धन्यवाद
ReplyDeleteBeautifull Viveychan...
ReplyDeleteखूपच रसाळ...
ReplyDelete😔😔👏👏👌🙏💐🙏🙏💐🙏
खूप छान
ReplyDelete