25 Nov 2016

नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा

आज कार्तिक कृष्ण एकादशी, उत्पत्ती एकादशी, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिसोहळ्याची कार्तिकी आळंदी वारी  !!
अलं ददाति इति आलंदि । अशी आळंदी शब्दाची फोड आहे. जी पुरे म्हणेपर्यंत देते ती आळंदी  ! अहो, भगवान श्री ज्ञानराय तर आहेतच, पण त्यांची पावन
आळंदी नगरी देखील " जो जे वांच्छिल तो ते लाहो । " हा श्री माउलींचाच अमृत-शब्द गेली साडेसातशे वर्षे पूर्ण करीत आलेली आहे. साक्षात् श्रीभगवंतांचेच अभिन्न स्वरूप असणा-या श्री माउलींसारखेच अगाध व अचाट सामर्थ्य, त्यांचे चिरंतन अस्तित्व लाभल्याने ही लौकिक नगरी देखील सर्वार्थाने अंगोअंगी मिरवत आहे. प्रत्यक्ष श्री माउलींच्या संजीवन समाधीचे अधिष्ठान-माहेर लाभल्यास काय होणार नाही? ज्यांच्या दारातला पिंपळही प्रत्यक्ष सुवर्णाचा आहे, त्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री माउलींच्या साम्राज्यात उणेपणाच कायमचा उणावलेला आहे  !!
आज कार्तिकी वारी. पहाटे पवमानपंचसूक्ताच्या अभिषेकाने उत्सवास सुरुवात होते. दुपारी श्री माउलींची पालखी नगर परिक्रमेस बाहेर पडते व हजेरी मारुती मंदिरात सर्व दिंड्यांच्या हजे-या होऊन पालखी सोहळा पुन्हा मंदिरात परत येतो. उद्या द्वादशीला श्री माउलींची रथातून मिरवणूक निघते व गोपाळपु-यातून फिरून परत येते. परवा त्रयोदशीला श्री माउलींचा समाधिउत्सव साजरा होतो. वारकरी संप्रदायात या उत्सवाला अतिशय महत्त्व आहे! 
आळंदीचा व तिचे अक्षय अधिष्ठान असलेल्या श्री माउलींचा महिमा गाताना सर्व संत वेडावून जातात. श्रीसंत तुकोबाराय तर श्री माउलींविषयीच्या अत्यंत जिव्हाळ्याने शपथपूर्वक म्हणतात,
चला आळंदीला जाऊ।
ज्ञानेश्वर डोळा पाहू ॥
होतील संतांचिया भेटी।
सांगू सुखाचीया गोष्टी ॥
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।
मुखी म्हणता चुकती फेर ॥
जन्म नाही रे आणिक।
तुका म्हणे माझी भाक ॥
अशा या आळंदी क्षेत्राचे आजचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण साक्षात् श्रीपांडुरंगांनीच स्वमुखे नामदेवरायांना सांगितले आहे की, " कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कृष्ण एकादशी ज्ञानोबांची. आम्ही कार्तिकात या एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबांच्या सोबतच असू ! " श्रीभगवंतांचे हे अलौकिक माउली-प्रेम पाहून श्री नामदेवराय हर्षोत्फुल्ल होऊन धन्योद्गार काढतात,
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार ।
धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागीरथी मनकर्णिका वोघा ।
आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग ।
मिळालें तें सांग अलंकापुरी ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हें संत ।
झाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥
" कार्तिक कृष्ण अष्टमीपासून ते त्रयोदशीपर्यंत जो कोणी माझ्या परमप्रिय श्रीज्ञानराज माउलींचे स्मरण, वंदन, पूजन, भजन, नमन, चरित्रगायन व नामस्मरण करेल, त्याच्यावर मी प्रसन्न होईन ! " असा प्रत्यक्ष आनंदकंद भगवान श्रीपंढरीनाथांचाच आशीर्वाद आहे. म्हणूनच आजपासून त्रयोदशीपर्यंत सद्गुरु भगवान श्री माउलींच्या संजीवन समाधीस वारंवार साष्टांग दंडवत घालून, श्री माउलींचे प्रिय भक्त प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज विरचित श्रीज्ञानदेवाष्टकाचे प्रेमादरपूर्वक वाचन, चिंतन करून आपणही श्रीपंढरीश परमात्म्याचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घेऊया व धन्य होऊया  !!
॥ श्रीज्ञानदेवाष्टकम् ॥
महिंद्रायणीचे तटी जे आळंदी ।
दुजी पंढरीक्षेत्र लोकी प्रसिद्धी ।
असा घेतला तेथ जेणे विसावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥१॥
पिता विठ्ठल विख्यात रुक्माई माता ।
दयाशील दाम्पत्य नाही अहंता ।
तये पोटी न कां जन्म हा घ्यावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥२॥
कलीमाजी तारावया भाविकांना ।
सुविख्यात ज्ञानेश्वरी ग्रंथ केला ।
समाधान जो देई गीतार्थ जीवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥३॥
चमत्कार नाना जगी दावियेले ।
पशूच्या मुखे वेदही बोलविले ।
असे थोर आश्चर्य वाटेचि जीवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥४॥
द्विजाच्या घरी श्राद्धकाळी जिवंत ।
करी जेववी पूर्वजाते समस्त ।
मुखी घालती अंगुली लोक तेव्हा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥५॥
अगा व्याघ्रयाने वृथा खेळताहे ।
पहा भिंत निर्जीव ही चालताहे ।
असे दाखवी लाजवी चांगदेवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥६॥
नसे द्वैतबुद्धी दया सर्वभूती ।
अशी देखिली ती संतमूर्ती ।
नसे साम्य लोकी जयाच्या प्रभावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥७॥
महायोगी लोकी ऐसी प्रसिद्धी ।
आळंदीपुरी तोचि घेई समाधी ।
अशा ते न कां विश्वरूपी म्हणावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥८॥
वदे भक्तीने नित्य या भाविकांसी ।
भवाब्धि भये बाधिती ना तयासी ।
म्हणे दास गोविंद विश्वास ठेवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥९॥
इति सद्गुरु श्रीगोविंदकाका उपळेकर महाराज विरचितम् श्रीज्ञानदेवाष्टकम् संपूर्णम् ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

1 comments: