25 Oct 2019

कलौ श्रीपादवल्लभ: ।

आज श्रीगुरुद्वादशी, कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा निजानंदगमन दिन !!
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप, अतर्क्य लीलाविहारी, अपार करुणानिधान आणि विलक्षण असे नित्यअवतार आहेत. प.प.श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनी एका ठिकाणी त्यांना साक्षात् भगवान श्रीकृष्णांचेच अवतार देखील म्हटले आहे. त्यांच्या लीला वाचल्या की ते साक्षात् परब्रह्मच होते हे मनापासून पटते.
आंध्रप्रदेशातील पीठापूर या गांवी त्यांनी श्रीगणेशचतुर्थी दिनी सूर्योदयाला श्री.अपळराज व सौ.सुमतीमातेच्या पोटी जन्म घेतला आणि कृष्णा तीरावरील कुरवपूर या तीर्थक्षेत्री वास्तव्य करून अनेक लीला केल्या.
आश्विन कृष्ण द्वादशीला श्रीदत्तसंप्रदायात मोठ्या प्रेमादराने 'श्रीगुरुद्वादशी' म्हणतात. कारण ते याच तिथीला कृष्णा नदीमध्ये अदृश्य झाले. ते नित्य अवतार असल्याने त्यांनी आपला दिव्य देह कृष्णामाईत केवळ लौकिकदृष्ट्या अदृश्य केलेला आहे, त्यांनी देहत्याग केलेला नाही, हे आपण कायम लक्षात ठेवायला हवे. ते आजही त्याच पावन देहातून कार्य करीत आहेत व पुढेही करीत राहणार आहेत.
'श्रीगुरुद्वादशी' ही भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची निजानंदगमन तिथी, 'श्रीगुरुप्रतिपदा' ही भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांची निजानंदगमन तिथी व शनिवार हा भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मवार ; म्हणूनच श्रीदत्तसंप्रदायातील स्थानांवर श्रीगुरुद्वादशी, श्रीगुरुप्रतिपदा व शनिवारची वारी करण्याची पद्धत आहे.
भगवान श्री श्रीपादांचा देह अपार्थिव, दिव्य आहे. अशा देहाला कधीच जरा-व्याधी नसतात. त्यांचे स्वरूप सर्वकाळ सोळा वर्षांच्या कुमाराएवढेच होते. ते अत्यंत देखणे व सुकुमार होते. व्याघ्रांबर परिधान केलेली त्यांची दिव्य छबी पाहताच एका अनामिक वेधाने लोक त्यांच्याकडे खेचले जात असत. ते ब्रह्मचारी होते, त्यामुळे ते कधीच भगवी वस्त्रे घालत नसत. पण नंतरच्या चित्रकारांनी त्यांना भगव्या वस्त्रातच कायम दाखवलेले आहे. अनेक महात्म्यांना त्यांचे दर्शन एक मुख व षड्भुज अशा श्रीदत्तरूपात झालेले असल्याने त्यांचे तसेही फोटो प्रचलित आहेत. या पोस्ट सोबत दिलेला फोटो प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांना प.प.सद्गुरु श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनी स्वत:च्या हृदयात करविलेल्या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या दिव्य दर्शनानुसार काढलेला आहे.
पीठापूरहून निघून भगवान श्री श्रीपाद स्वामी महाराज बदरीनाथ आदि हिमालयातील तपस्थानांवर राहून मग पश्चिमसागराच्या तीरावरील गोकर्ण महाबळेश्वर येथे तीन वर्षे गुप्तपणे राहिले. त्यानंतर काही महिने तिरूपती बालाजी येथे राहून ते कुरवपूरला आले. त्यांचे काही काळासाठी महाराष्ट्रामध्येही वास्तव्य झालेले आहे. त्यांमध्ये विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव (जामोद) येथे ते राहिले होते. आज प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या 'श्रीपाद सेवा मंडळ' या संस्थेने तेथे सुंदर मंदिर बांधलेले असून भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची बालरूपातील अप्रतिम प्रासादिक मूर्ती स्थापन केलेली आहे. आजही अनेक भक्तांना तेथे भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची प्रत्यक्ष अनुभूती वारंवार येत असते.
( http://rohanupalekar.blogspot.in )
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथेही वास्तव्य झाले होते. त्यांनी आपले शिष्य श्री रामचंद्र योगी यांना तेथेच तपश्चर्या करण्याची आज्ञा केली होती. आपल्या पुढील श्री नृसिंह सरस्वती अवतारामध्ये त्यांनी वाडीला येऊन श्री रामचंद्र योगींना दर्शन देऊन कृतकृत्य केले व स्वहस्ते त्यांना समाधी दिली. श्री रामचंद्र योगींची समाधी श्रीनृसिंहवाडीला घाट चढून आल्यावर पिंपळाखाली आजही पाहायला मिळते.
भगवान श्री श्रीपादांना, माठ/राजगिरा पालेभाजी, वांग्याची भाजी आणि साजुक तुपातला शिरा अत्यंत आवडत असे. याबद्दल एक गोड हकिकत त्यांच्या चरित्रात आलेली आहे. त्यांच्या मातु:श्री सुमतीमाता त्यांना भेटायला कुरवपूरला येत होत्या. त्यांनी मोठ्या प्रेमाने बनवून घेतलेला शिरा गार होऊ नये म्हणून, भगवान श्रीपादांनी पीठापूर ते कुरवपूर हा चार दिवसांचा त्यांचा प्रवास केवळ काही मिनिटातच घडवून त्यांना कुरवपूरला आणले व प्रेमभराने आपल्या मातु:श्रींनी केलेल्या त्या गरमागरम शिऱ्याचा आस्वाद घेतला.
अत्यंत करुणामय असे भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे स्वरूप आहे. त्यांचे जो प्रेमाने स्मरण करेल त्याच्यावर ते कृपा करतातच, असे अनेक महात्म्यांनी स्वानुभवपूर्वक सांगून करून ठेवलेले आहे. त्यांना कळवळून हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला ओ देऊन त्याचे अभीष्ट करणे, त्याच्यावर कृपा करणे, त्याचा प्रेमाने सांभाळ करणे हे भगवान श्री श्रीपादांचे आवडते कार्यच आहे. ते अत्यंत भक्तवत्सल आहेत, भक्ताभिमानी देखील आहेत !
"दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा" हा महामंत्र त्यांनीच प्रकट केलेला असून श्रीदत्तसंप्रदायामध्ये मोठ्या श्रद्धेने जपला जातो. हा महामंत्र नंतर प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी सर्वदूर प्रचलित केला. पण याचा प्रथम उपदेश भगवान श्री श्रीपादांनीच एकेदिवशी पंचदेव पहाडी परिसरातील आपल्या दरबारात कुरवपुरातील भक्तांना केला होता. म्हणून हा महामंत्र स्वत: भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनीच निर्माण केल्याचे मानले जाते.
द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आजच्याच तिथीला, भक्तांवर निरंतर कृपा करण्याच्या उद्देशाने, श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला आपल्या "मनोहर पादुका" स्थापन करून गाणगापुरी गमन केले होते. नृसिंहवाडीत औदुंबरातळी बारा वर्षे वास्तव्य करून भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी वाडीला आपल्या राजधानीचा दर्जा प्रदान केला. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीनृसिंहवाडीला श्रीदत्तप्रभूंचा "दिवाने खास" म्हणत असत. त्या राजधानीचे अधिष्ठान म्हणून भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजच श्रीमनोहर पादुकांच्या रूपाने आजही विराजमान आहेत ! म्हणून हा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर वाडीमध्येही साजरा होतो. सोबतच्या छायाचित्रामध्ये वाडीच्या मनोहर पादुकांच्या चंदनलेपनाचे सुंदर दर्शनही आहे.
स्मर्तृगामी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं आजच्या श्रीगुरुद्वादशीच्या पावन पर्वावर सादर दंडवत घालून, त्यांची अलौकिक करुणाकृपा आपल्या सर्वांवर निरंतर राहावी यासाठी आपण कळकळीची प्रार्थना करू या. "आमच्या हृदयात निरंतर निवास करून तेथेही आपल्या पावन वास्तव्याने 'सुखाची राजधानी' निर्माण करावी आणि आपल्याच सादर स्मरणात आम्हांला सदैव रममाण करून ठेवावे", अशी प्रेमादरपूर्वक प्रार्थना त्यांच्या श्रीचरणीं करून, त्यांच्या स्मरणानंदात श्रीगुरुद्वादशी साजरी करू या  !!
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment