17 Jan 2017

नवल गुरुभक्ताचा महिमा

परमार्थामध्ये 'सद्गुरुभक्ती'ला अनन्यसाधारण महत्त्व असते. परमार्थातील सर्वोच्च अनुभूती, ही केवळ शिष्याने आत्यंतिक निष्ठेने, श्रद्धेने केलेल्या गुरुसेवेचे फळ म्हणून मिळणा-या अलौकिक अशा श्रीसद्गुरुकृपेनेच लाभते, असे श्रीज्ञानेश्वर माउलींनी स्पष्ट सांगून ठेवलेले आहे. आजवर जे जे थोर महात्मे उच्च पारमार्थिक शिखरावर प्रतिष्ठित झाले, ते श्रीसद्गुरूंच्या चरणीं असलेल्या त्यांच्या अनन्य भक्तीमुळेच !  साक्षात् ज्ञानाचे ईश्वर असणारे माउली देखील स्वत:ला, " ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा । " असेच म्हणवून घेण्यात धन्यता मानतात, यातच श्रीसद्गुरूंचे सर्वश्रेष्ठत्व दिसून येते.
प.पू.श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजही थोर गुरुभक्त होते. त्यांनी कठोर सद्गुरुसेवा केली. त्यांचे परमशिष्य व उत्तराधिकारी, प.पू.श्री. श्रीकृष्ण कुकडे तथा बागोबा महाराज हेही अलौकिक गुरुभक्त होते. प.पू.काकांनी त्यांच्या अनेकवेळा खडतर परीक्षा पाहिल्या. पण आपल्या अनन्यनिष्ठेच्या बळामुळे ते कायम त्या परीक्षा सहज उत्तीर्ण झाले. आज पौष कृष्ण पंचमी, दि. १७ जानेवारी २०१७ रोजी प. पू. बागोबा महाराजांची ५७ वी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त त्यांच्या अलौकिक गुरुसेवेचे चिंतन-मनन करून आपण त्यांचे पुण्यस्मरण करूया.
प. पू. श्री. बागोबा कुकडे महाराज हे फार थोर गुरुभक्त होते. ते व्यवसायाने जवाहिरे होते. अहमदनगर हे त्यांचे गाव. त्या काळात त्यांच्या पदरी सत्तर सोनार कामाला होते, दिवसाला जवळपास दोन हजार रूपयांचा ते व्यवहार करत असत, एवढी श्रीमंती होती. पण पहिल्यापासून वृत्ती मात्र पारमार्थिक होती.
नगर मधील काही मंडळींनी सत्संग मंडळ स्थापन केलेले होते, त्यात बागोबा सक्रिय होते. यांपैकी काही जण हे धनकवडीच्या सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या नवरत्न दरबारातील होते. पू.बागोबाही त्यांच्यापैकी एक भाग्यवान भक्तराज होते. त्या आठ भक्तांचे श्री शंकर महाराजांसमवेत काढलेले एक छायाचित्रही उपलब्ध आहे.
इ.स. १९२७-२८ मधे कधीतरी ही सर्व मंडळी श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे गेली होती. रात्री तेथेच मुक्काम करायचा ठरवला होता, पण ते भयानक वातावरण पाहून श्री.बागोबा सोडता सर्वजण नगरला परत फिरले. बागोबा एकटेच मंदिरात मुक्कामाला राहिले. एक वेडसर दिसणारा इसमही होता तिथे.त्याने पू.बागोबांना तू बाहेर बस सभामंडपात, अशी आज्ञा केली व स्वत: गाभा-यात जाऊन बसला. मध्यरात्री मंदिराचे दार एकदम खाडकन् उघडले व एक ढाण्या वाघ आत आला. तो गाभा-यापर्यंत गेला व परत फिरला. रात्री दोनच्या सुमारास एक बारा-चौदा फुटांचा मोठा भुजंग आला व शिवपिंडीपाशी जाऊन परत फिरला. जाताजाता पू.बागोबांना हुंगून गेला. पहाटे चारच्या सुमारास प्रखर प्रकाशझोत शिवपिंडीवर प्रकट झाला. बागोबांना या घटनांचे खूप आश्चर्य वाटले, पण त्यांनी न घाबरता ते सगळे मनापासून अनुभवले. 
सकाळी ते शौचाला जात असताना त्यांनी त्या वेडसर दिसणा-या इसमास झाडाला दगड मारताना पाहिले. हा माणूस इतक्या सकाळी बाहेर कुठून आला, याचेच त्यांना नवल वाटले. त्यांनी विचारले, " का हो, झाडाला बेछूट दगड मारताय, त्याला पण जीव असतो माहीत नाही का तुम्हांला? " त्यावर ते गृहस्थ म्हणाले, " यातला एखादा दगड लागतोय का पाहतोय." बहुदा हा वेडा माणूस दिसतोय, असा विचार करून बागोबा निघून गेले. थोड्या वेळाने मंदिरात परत आले तर मगाचेच गृहस्थ शिवपिंडीवर ठाण मांडून बसून तोंडाने 'शंक-या शंक-या' असे बडबडत होते. बागोबा निमूटपणे दर्शन घेऊन बाहेर आले, ते गृहस्थही मागोमाग बाहेर आले. कुठे जाता? असे त्यांनी विचारल्यावर बागोबा चिडून उत्तरले, "आम्हांला चहाची सवय आहे, इथे कुठे मिळणार चहा? दूध पण संपलंय." त्या गृहस्थांनी शांतपणे लोट्याकडे बोट दाखवले तर त्या रिकाम्या लोट्यात दूध दिसले. बागोबा एकदम चमकले. हे कोणीतरी साधू दिसतात, आपण उगीच त्यांना वेडा समजतोय, असे वाटून ते म्हणाले, नगरला चला, आपली सेवा करतो. नंतर कधीतरी येऊ म्हणून ते गृहस्थ टाळू लागले. बागोबांनी घराचा पत्ता सांगायला सुरुवात केली, तर त्याच गृहस्थांनी सर्व खाणाखुणांसह बागोबांचा पत्ता सांगितला.
पुढे १९२९ साली एकेदिवशी अचानक हे गृहस्थ बागोबांच्या नगरच्या घरी आले, एक रात्र मुक्काम केला. पण नावगांव काहीही सांगितले नाही. दुस-या दिवशी बागोबांनी त्यांना मंडळात नेले व एक फोटोही काढून घेतला. या महात्म्याची बागोबांना फार ओढ लागून राहिली होती, पण बाकी काहीच माहिती मिळेना. पुढे त्यांना समजले की हे गृहस्थ म्हणजेच फलटण येथील थोर अवलिया सत्पुरुष डॉ. गोविंदमहाराज उपळेकर हे होत. बागोबांना अंतरीची खूण पटलेलीच होती. हेच आपले सद्गुरु आहेत, हे जाणून त्यांनी फलटणला धांव घेतली व खडतर सेवेने पू.काकांची पूर्णकृपा संपादन केली.
शिष्याची अत्यंत कठीण परीक्षा पाहून, १९३३ साली एकेदिवशी पुसेसावळी येथे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांच्या समाधीवर प. पू. काकांनी प. पू. बागोबांच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवला व त्यांना तात्काळ आपणासारिखे करून सोडले. त्यावेळी त्यांनी कफनी व काही वस्त्रे, कापडी पिशवी अशा वस्तूही प्रसाद म्हणून दिलेल्या होत्या, आजही त्या दौंड येथील प. पू. बागोबांच्या घरी पाहायला मिळतात. (खालील फोटो मध्ये त्या प्रसाद वस्तूंचे आपल्याला दर्शन होईल.)
प. पू. बागोबांनी प. पू. काकांचे संपूर्ण वाङ्मय अत्यंत परिश्रमपूर्वक प्रकाशित केले. त्यासाठी त्यांनी अक्षरश: जीवाचे रान करून कष्ट केले. प. पू. काकांची भाषा आत्ममग्न फकिराची आहे, अवधूती मस्तीत केलेले लिखाण आहे सर्व. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला ते कळत नसे, पण बागोबा अगदी सहजतेने ते सोपे करून सांगत असत. श्रीगुरुकृपेने पू. बागोबांच्या हृदयात ज्ञानसूर्य प्रकाशलेला होता, त्यामुळे त्यांना पू. काकांचे गुह्य बोलणे सहज समजत असे. प. पू. बागोबांमुळेच प. पू. काकांचे दैवी सारस्वत आज आपल्याला उपलब्ध आहे, हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे ऋण आहे. एवढेच नाही तर, प. पू. बागोबांमुळेच खरेतर लोकांना प. पू. काकांची महती समजून आली. बागोबांनी निरलस सेवेने प. पू. काकांची पूर्ण कृपा मिळवलेली होती. पू.काकांचे नुसते नाव घेतले तरी त्यांचे अष्टसात्त्विक भाव जागृत होत असत. प.पू.काका हेच त्यांच्यासाठी साक्षात् श्रीभगवंत होते. पू. काकांचेही पू. बागोबांवर निरतिशय प्रेम होते. साहजिकच आहे म्हणा, या दोघां गुरुशिष्यांचा जन्मजन्मांतरीचा ऋणानुबंधच होता ना !!
पू.बागोबांवर केडगांवच्या श्रीसंत नारायण महाराजांचा व अवतार मेहेरबाबांचाही आशीर्वाद होता. या दोघांनीही त्यांना, आपल्यानंतर पुढील कार्यभार सांभाळण्याबद्दल वारंवार विचारले होते. पण पू.बागोबा एकदाही हो म्हणाले नाहीत. कारण त्यांच्या सर्व चित्तवृत्ती पू.काकांच्या पायी कायमच्या विसावलेल्या होत्या. पू.काकांना सोडून इतर कोणाचा विचार करणेही त्यांना केवळ अशक्य होते.
पुण्याचे सरदार रावसाहेब मेहेंदळे हे पू.काकांचे सहाध्यायी होते. मेहेंदळे वाड्यात पू.शंकर महाराजही नेहमी येत असत. ती.ताईसाहेब मेहेंदळे ज्ञानेश्वरीवर प्रवचने करीत. कधी कधी त्यावेळी पू.शंकर महाराज, पू.गोविंदकाका असे संतही उपस्थित राहात असत. एकदा पू.बागोबांना कळले की पू.काका मेहेंदळ्यांकडे आलेले आहेत. खूप दिवसांत श्रीगुरूंची भेट झालेली नसल्याने, दर्शनाच्या अनावर ओढीने पू.बागोबा लगबगीने पुण्यात आले. मेहेंदळे वाड्यात जाऊन पाहतात तर पू.काका नुकतेच फलटणला निघून गेलेले होते. पू.बागोबांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले व त्यांनी विचारले, "पू.काका कुठे बसले होते?" रावसाहेबांनी खुर्चीकडे हात दाखवला. पू.बागोबांनी त्या खुर्चीला प्रेमभराने वंदन केले व खूप वेळ त्यावर डोके टेकवून बसून राहिले. जणू ते आपल्या परमदयाळू परमप्रेमळ गुरुमातेशी मूक संवादच साधत होते. त्याच भावभरल्या अंत:करणाने ते तिथून उठले व कोणाशीही न बोलता निघूनही गेले. पू.बागोबांच्यासाठी पू.काकाच सर्वस्व होते.
पू.बागोबांनी केलेल्या अलौकिक श्रीगुरुसेवेच्या प्रभावाने त्यांच्याठायी असंख्य सिद्धी अक्षरश: पाणी भरत होत्या. त्यांनी त्या सिद्धींचा कधीही स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धीसाठी वापर केला नाही. श्रीभगवंतांच्याच प्रेरणेने अनेकवेळा त्यांच्याकडून अचाट गोष्टी सहजच घडून येत असत. पण त्यांनी त्याचे श्रेय कधीच स्वत:कडे घेतले नाही. ते शेवटपर्यंत आतून-बाहेरून पूर्ण शरणागत श्रीगुरुभक्तच राहिले, स्वत:ला पू.काकांचा क्षुद्र दासच मानून सेवारत राहिले. आणि हीच त्यांची सर्वश्रेष्ठ महासिद्धी होती !
प.पू.बागोबांना १९५९ साली जलोदराची व्याधी जडलेली होती. त्यातून ते बाहेर येऊ शकतील अशी आशाच राहिलेली नव्हती. प्रारब्धाच्या खेळात हा परम गुरुभक्त महात्मा कधीच गुंतला नाही. ते तर आपल्या श्रीगुरूंशी कधीच एकरूप होऊन ठाकलेले होते. परंतु सोबतच्या लोकांना ते काही पाहवेना, म्हणून मग पू. काकांचे एक भक्त सबजज्ज श्री.मंजेश्वर यांनी पू. काकांना फलटणला निरोप पाठविला. त्यानुसार पू.काका दौंडला आले. त्यांनी पू.बागोबांना उठवून बसवले. त्यांच्या गळ्यात हार घातले, कपाळाला बुक्का लावला, हातात गुलाबाची फुले दिली. समोर ज्ञानेश्वरीची सर्व पुस्तके मांडून ठेवली, उदबत्त्या लावल्या. असा सोहळा करून पू.काका फलटणला परत गेले.
त्यापुढे पू.बागोबांच्या तब्येतीत सुधारणा काही झाली नाही. पौष कृष्ण पंचमी दि. १८ जानेवारी १९६० रोजी पू. काकांनी श्री ज्ञानेश्वर माउलींना अभिषेक केला व " Praying Shree Dnyaneshwar maharaj for relief " अशी तार दुपारी पावणे पाच वाजता दौंडला पाठवली. ती तार पू. बागोबांना वाचून दाखवली व त्यांच्या उशीखाली ठेवली गेली. तोच शेवटचा संकेत जाणून, पू. बागोबांनी दौंड येथील श्रीकृष्णकुंज या आपल्या वास्तूत सूर्यास्तसमयी सद्गुरुस्मरणात नश्वर देहाचा त्याग केला. शेवटच्या क्षणी देखील गुरुआज्ञेसाठी पू. बागोबा थांबून राहिलेले होते, ती मिळताच त्यांनी समाधानाने देह ठेवला व ते कायमचे गुरुरूप होऊन गेले. सोबतच्या फोटोमध्ये ती तारही आपणास पाहायला मिळेल.
पू. बागोबा गेल्यावर दुस-या दिवशी दौंडचे भक्त फलटणला गेले. त्यांना पू.काकांनी सांगितले की, "तो मुक्त झाला, रडत बसू नका. घरात एक चांदीचा करंडा आहे, त्यात अस्थी ठेवा. दोन गाद्या शिवून आणा व ते बसत तिथे ठेवा. सर्व फोटोंना हार घाला व कपाटातील पेढे वाटा. " अशा प्रकारे पू.बागोबांच्या घरी त्यांच्या गादीची स्थापना झाली व दररोज त्यासमोर हरिपाठ म्हणण्याची प्रथा सुरू केली. आजही सदर गादी दौंडच्या घरी असून रात्री हरिपाठ झाल्यानंतरच ती आवरून ठेवली जाते. "जोपर्यंत ती गादी तेथे आहे, तोपर्यंत पू.बागोबा आहेत व माझा आशीर्वादही आहे", असे पू.काकांनीच सांगून ठेवलेले होते. सोबतच्या फोटोमध्ये प. पू. काकांनी पाठविलेल्या त्या तारेचे व स्थापलेल्या पावन गादीचेही आपल्याला दर्शन होते.
पू. बागोबा गेल्यानंतर पू. काकांनी व त्यांच्या पत्नी पू. सौ. रुक्मिणीदेवींनी बागोबांच्या घरची सर्व कार्ये संपन्न केली. बागोबांच्या चिरंजीवांचे लग्न स्वत: करून दिले, वर्षाचे सर्व सणवारही सौ. रुक्मिणीदेवींनीच फलटणला केले होते. कुकडे मंडळींना पू. बागोबांची उणीव त्यांनी कधीच भासवून दिली नाही. पू. बागोबा गेल्यावर काहींनी पू. काकांना विचारले, "काका, आता बागोबांनंतर पुढे तुमचे कोण ?" त्यावर पू. काका म्हणाले, "मी कृष्णदेवांचा एकटा व माझा बागोबा एकटाच, नंतर कोणी नाही आमचे पुढे. " इतके पू. काकांचे पू. बागोबांवर प्रेम होते.
पू. बागोबा म्हणजे परिपूर्ण गुरुभक्तीच होय! त्यांच्या चरित्रातील गुरुभक्तीचे एक एक अद्भुत प्रसंग वाचताना आपलेही हृदय गुरुप्रेमाने दाटून येते. विलक्षण होती त्यांची गुरुनिष्ठा व भक्ती !
आज परमगुरुभक्त प.पू.श्री.बागोबा महाराजांच्या ५७ व्या पुण्यतिथी दिनी, त्यांचे प्रेमादरपूर्वक स्मरण करून आपण त्यांच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊया; आणि त्यांच्याकडे गुरुप्रेमाचाच वरप्रसाद मागूया! 
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

13 comments:

  1. खूप सुंदर आणि अर्थपूर्ण माहिती दिली आहे.

    ReplyDelete
  2. Thank you very much. I have visited many times to his home with Mr. Punde, but was not knowing much about him. श्री काका महाराज व श्री बागोबा यांच्या गुरुभक्तीला शतशः प्रणाम. - Mr. G.P. Ghospurkar

    ReplyDelete
  3. सादर साष्टांग नमन। 🙏

    ReplyDelete
  4. प पू बागोबा महाराज या अपरिचित सत्पुरुषाण्चे थोडक्यात चरित्र वाचून आनंद झाला .आपणांस धन्यवाद !

    ReplyDelete
  5. श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  6. Beautiful Narration and Valuable Information shared and its a eyeopener, learning moments ...

    ReplyDelete
  7. Wonderful.. .. 🙏🙏🙏 Jai Jai Ram Krishna Hari

    ReplyDelete
  8. गुरुदेव दत्त रोहन जी

    ReplyDelete
  9. थोर संत विभूतीस साष्टांग नमस्कार🙏🙏🙏

    ReplyDelete
  10. Abhinay Pangarekar1/31/2024 11:06 am

    खूप सुंदर ! थोर संत श्री गोविंदकाका उपळेकर आणि बागोबा महाराजांच्या चरणीं साष्टांग नमस्कार 🙏🏻

    ReplyDelete