20 Jan 2017

गुरु हा प्राणविसांवा माझा

भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींनी रचलेला, ' गुरु हा संतकुळींचा राजा ।' हा अभंग सुप्रसिद्ध आहे. या अभंगातून माउलींनी सद्गुरूंचे स्वरूप आणि त्यांचे अलौकिक कार्य यावर सुरेख प्रकाश टाकलेला आहे. श्रीगुरूंविषयी शिष्याची काय भूमिका असावी? हेही त्यातून ते मार्मिकपणे सांगतात. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे या अभंगाच्या विवरणात म्हणतात की, "श्रीसद्गुरूंचे ' तत्त्वदर्शन ' स्पष्टपणे व नेमकेपणाने व्हावे, यासाठी साधकांनी या अभंगाचे वाचन-मनन-चिंतन अक्षरशः नित्य करीत जावे; इतका विलक्षण आणि निगूढ अभिप्राय सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या मंत्ररूप, सिद्धअभंगाद्वारे लीलया प्रकटविलेला आहे. संतसाहित्यात इतके सुंदर सद्गुरु वर्णन क्वचितच कोठे आढळेल !"
खरोखरीच माउलींनी या अभंगातून अगदी बहार केलेली आहे. माउली हे स्वत:च परमश्रेष्ठ सद्गुरुभक्त आहेत. त्यांच्या गुरुभक्तीला तोड नाही; म्हणूनच सद्गुरुवर्णन करताना त्यांना किती बोलू आणि किती नको,  असे होऊन जाते. माउलींनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातील सातव्या श्लोकातील 'आचार्योपासनं' पदावरील भाष्यात रचलेल्या गुरुसेवेच्या ओव्या तर अद्वितीय-अद्भुत आहेत. श्रीसंत गुलाबराव महाराज त्या ८२ ओव्यांना कौतुकाने 'गुरूपनिषद' असे म्हणत असत.
आजवर जगातील सर्वच संप्रदायांमध्ये आदर्श गुरुभक्त शिष्य होऊन गेलेले आहेत. किंबहुना आपल्या विलक्षण गुरुभक्तीमुळेच ते सगळे महात्मे थोरावले होते. इतर कोणतेही विशेष साधन न करता केवळ नितांत श्रद्धा व गुरुचरणीं असलेल्या तीव्रतम शरणागतीमुळेच ते महात्मे परमार्थातील सर्वोच्च अनुभूती सहज घेत होते.
श्रीदत्तसंप्रदाय हा तर गुरुसंप्रदायच आहे. या संप्रदायात सद्गुरूच देवांचेही देव मानले जातात व त्यांचीच उपासना केली जाते. म्हणूनच या संप्रदायातील थोर थोर महात्म्यांच्या जगावेगळ्या श्रीगुरुभक्तीच्या विलक्षण कथा सर्वांच्या तोंडी आवर्जून पाहायला मिळतात.
श्रीदत्तसंप्रदायातील अलौकिक विभूती, योगिराज सद्गुरु श्रीगुळवणी महाराज व त्यांचे शिष्योत्तम योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज; ही अशीच एक विलक्षण गुरु-शिष्य जोडगोळी होय ! त्यांचा परस्पर प्रेमबंध अत्यंत गहिरा, अद्भुत आणि अचंबित करणारा आहे. त्यांच्या सगळ्या कथा वाचताना आपल्याही अंतःकरणात गुरुभक्तीची बीजे दृढावतात, यात शंका नाही.
आज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांच्या ४३ व्या पुण्यतिथी निमित्त आपण नेहमीप्रमाणे त्यांचे चरित्र न पाहता, त्यांच्या गुरुभक्तीच्या दोन विलक्षण हकीकती पाहणार आहोत. या चरित्र-चिंतनाने आपण त्यांच्या श्रीचरणीं भाव-पुष्पांजली समर्पूया  !
प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज पुण्यात नागनाथ पाराजवळील वै.देशमुख महाराजांच्या माडीत राहात असताना, १९७३ साली घडलेला हा एक हृद्य प्रसंग आहे. त्यांच्याकडे एक गृहस्थ आले व म्हणाले, " मामा, तुम्ही देव पाहिलाय का? " तो प्रश्न ऐकून मामा ताडकन् उत्तरले, " हो पाहिलाय, चला तुम्हांला पण दाखवतो ! " आणि त्यांनी त्या गृहस्थांचे बखोटे धरून त्यांना रिक्षात घालून सरळ श्रीवासुदेव निवासात श्री गुळवणी महाराजांच्या समोर नेले.
प. पू. मामांनी श्री गुळवणी महाराजांना साष्टांग दंडवत घातला व त्या गृहस्थांना डबडबलेल्या नेत्रांनी सांगितले, "हे बघा साक्षात् परब्रह्म ! यापेक्षा वेगळा, दुसरा कोणता देव आम्ही बघायचा?"
खरोखरीच, सद्गुरुतत्त्वापलीकडे दुसरे काहीही परम नसते. शिष्यासाठी त्याचे सद्गुरूच सर्वकाही असतात, असायला हवेत. सद्गुरूंशिवाय त्याने दुसरे काहीही स्मरता कामा नये, सतत सद्गुरूच त्याच्या ध्यानी-मनी-स्वप्नी असायला हवेत. अशीच शरणागती दृढ झाली की आपोआप अनुभूती येतेच. यासाठीच श्रीमाउली उपदेश करतात की, " गुरुवीण देव नाही दुजा पाहतां त्रिलोकी ॥"
योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजही असेच अलौकिक गुरुभक्त होते. त्यांच्या हृदयात किती अपार गुरुप्रेम भरून राहिलेले होते, हे दाखवणारा एक अगदी छोटासाच पण फार सुंदर प्रसंग आहे.
एके दिवशी परमसद्गुरु प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांचा एक फोटो घेऊन प.पू.श्री.मामा श्रीवासुदेव निवासात सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांकडे गेले. त्यांना तो फोटो लिफाफ्यातून काढून दाखविणार इतक्यात श्रीमहाराज मामांना थांब म्हणाले. त्यांनी पाट घेऊन त्यावर आपले उपरणे अंथरले. मग पाकिटातून तो फोटो अत्यंत प्रेमभराने, हळूवार हाताने बाहेर काढून मस्तकी लावला व मग त्या उपरण्यावर ठेवला. श्रीसद्गुरूंच्या छायाचित्रालाही प्रत्यक्ष सद्गुरूंचेच स्वरूप समजून किती आदराने, प्रेमाने वागवायचे, जपायचे असते, याचा आदर्श वस्तुपाठच श्री गुळवणी महाराजांनी त्या प्रसंगातून आपल्या समोर ठेवलेला आहे. ख-या शिष्याच्या हृदयात सद्गुरु किती हळुवारपणे भरून राहिलेले असतात नाही ! अशा प्रसंगांच्या सतत चिंतनाचे, भक्ती दृढ होण्याचे सुयोग्य साधन म्हणून तुम्हां-आम्हां साधकांच्या आयुष्यात फार महत्त्व असते.
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांचेही ऋणानुबंध असेच मधुर होते. श्रीमहाराज आजारी असताना ज्येष्ठ भजन गायक कै.श्री.मनोहर सबनीस एकदा फलटणला गेले होते. त्यांनी पू. काकांच्या कानावर घातले की श्री गुळवणी महाराज आजारी आहेत. त्यासरशी पू.काकांनी घरात जाऊन एक सफरचंद आणले व पू.श्री.गुळवणी महाराजांना नेऊन द्यायला सांगितले. सबनीस म्हणाले, "काका, आपला प्रसाद म्हणून देऊ का?" त्यावर मान नकारार्थी हलवत पू. काका म्हणाले, "नाही हो, आमची स्नेहभेट म्हणून द्या." पू.काका जाणून होते की श्री. गुळवणी महाराज हे साक्षात् श्रीदत्तप्रभूच आहेत, म्हणून ते कायम प्रेमादरानेच त्यांच्याशी वागत असत.
पू.श्री.काका व पू.श्री.गुळवणी महाराज आपल्या भक्तांना नेहमी एकमेकांच्या दर्शनाला आवर्जून पाठवत असत. एकदा पू.काकांच्या आज्ञेवरून कै.श्री.गो.म.फणसे व सौ.अंबूताई फणसे पू.गुळवणी महाराजांच्या दर्शनाला गेले. पू.काकांनी पाठवले म्हटल्यावर पू.गुळवणी महाराज प्रसन्नतेने हसले व म्हणाले, "आमचे गोविंदकाका म्हणजे 'साक्षात् परब्रह्मच' !" त्यामुळे पुढे फणसे दांपत्याने लिहिलेल्या पू.काकांच्या चरित्राचे नावच त्यांनी "साक्षात् परब्रह्म" असे ठेवलेले आहे. या दोघांही संतांचे असे अत्यंत निखळ प्रेमसंबंध होते.
पौष कृष्ण अष्टमी, दि. १५ जानेवारी १९७४ रोजी पू. श्री. गुळवणी महाराजांनी दुपारी १ च्या सुमारास देहत्याग केला. त्यांच्या निर्याणाची बातमी पेपर मधे दुस-या दिवशी छापून आली होती. त्याचे कात्रण काढून, सत्याऐंशी वर्षांच्या पू.काकांनी स्वत: दुकानात जाऊन त्याला फ्रेम करून आणून आपल्या कपाटात ते जपून ठेवले होते. आजही ती फ्रेम पू. काकांच्या वापरातील वस्तूंच्या प्रदर्शनात, मोठ्या अभिमानाने या दोन अलौकिक संतांचे अद्भुत प्रेमसंबंध मिरवीत उभी आहे. एक विलक्षण योगायोग म्हणजे, पू. श्री. गुळवणी महाराजांची देह ठेवण्याची तारीख, म्हणजेच १५ जानेवारी हीच पू. श्री. काकांची जन्मतारीख आहे. दोघांनीही कृष्ण पक्षातील अष्टमीला आणि मंगळवारीच देहत्याग केलेला आहे. दोघेही अत्यंत निष्ठावंत गुरुभक्त होते. खरोखर हे सर्व महात्मे काही औरच होते. आता पुन्हा ऐसे होणे नाही !!
आज श्रीमहाराजांची पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांच्या श्रीचरणीं ही चरित्र चिंतनरूपी भावपुष्पांजली प्रेमभावे समर्पूया. सद्गुरु श्री.गुळवणी महाराज हे अत्यंत विलक्षण अशा सद्गुण-रत्नांची समृद्ध खाणच होते. त्यांचे चरित्र त्यादृष्टीने नीट अभ्यासायला हवे. कारण ते साधकांसाठी निरंतर मार्गदर्शक ठरणारे, अखंड तृप्ती देणारे फार मोठे साधना-पाथेयच आहे !!
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री.गुळवणी महाराजांच्या श्रीचरणीं अनंत दंडवत प्रणाम !!
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

19 comments:

  1. श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  2. अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त 🙏

    ReplyDelete
  3. गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  4. खरोखरच , दोन्हीही प्रसंग किती सुंदर आणि भावपूर्ण आहेत !
    प.पू. योगिराज श्री गुरुमहाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत !!

    ReplyDelete
  5. खरोखरच , दोन्हीही प्रसंग किती सुंदर आणि भावपूर्ण आहेत !
    प.पू. योगिराज श्री गुरुमहाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत !!

    ReplyDelete
  6. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.��

    ReplyDelete
  7. 🙏श्री गुरुदेव दत्त🙏

    ReplyDelete
  8. जय सद्गुरु..

    ReplyDelete
  9. अत्यंत सुंदर आणि भावमधूर.

    ReplyDelete

  10. 🙏श्री गुरुदेव दत्त🙏

    Reply

    ReplyDelete
  11. II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II
    🌺🌺🌺🙏🙏🙏

    ReplyDelete
  12. श्री गुरुदेव

    ReplyDelete
  13. श्री गुरुदेव

    ReplyDelete
  14. प पु महाराजांना शतशः दंडवत

    ReplyDelete
  15. अप्रतिम व अलौकीक

    ReplyDelete